भेंड्या

भेंड्या

आमच्या लहानपणी मोठ्या आवडीने खेळला जावयाचा खेळ. तुम्ही म्हणाल, " आमच्या लहानपणी" काय कौतुक करून सांगताय ? अजूनही खेळला जातो कीं. फार तर अंताक्षरी म्हणत असतील, नावात काय आहे ? दूरदर्शनवरही दाखवत होते ! मान्य. नावात काही नाही.पण तरीही आमच्या लहानपणच्या भेंड्या आणि आजची अंताक्षरी यात फरक दिसतो. परवा काही लहान मुले खेळत होती, म्हटले चला. आपणही त्यांना दाखवून देऊ की आजोबांनाही काही कळते बरे . नाही तर मोबाईलसंबंधीच्या माझ्य अज्ञानामुळे त्या सर्वांची खात्री झाली होती की या तमाम टकल्य़ा लोकांना काही म्हणजे काही कळत नाही. सुरवात झाल्यावर लगेच लक्षात आले की अंताक्षरी म्हणजे हिन्दी गाणी, तीही सिनेमातली. आणि मराठी म्हणजे मालिकांची शीर्षकगीते. मी म्हणत असलेल्या कविता त्यांना माहितच नव्हत्या. व त्यांच्या नियमानुसार कडवी बाद.कारण सिनेमातल्या गाण्याच्या फक्त पहिल्या दोन ओळी जेमतेम पाठ. मी हळूच पाय काढला.

लहानपणी सुट्टीत रात्रीची जेवणे झाल्यावर पत्ते किंवा भेंड्या ही दोनच करमणुकीची साधने होती. काही घरात व्यापार, सापशिडी. पण तसा कमीच. तेव्हा ह्या फुकटच्या करमणुकीला वरिष्टांचा विरोध नसे. शिवाय जाता येता कोणी अडले की मधेच दोन ओळी सागून जात(त्यामुळे फक्त आमच्यात भांडणे लागत हा भाग निराळा!) नियम ठरलेले असत. कोणतीही भाषा चाले (म्हणजे मराठी व संस्कृत, फारच थोडी हिंदी गाणी पाठ असत). कडवी चालत, दोन किंवा चार ओळी (पूर्ण धृपद वा कडवे), गाणे चुकले तर नवीन म्हणावे लागे व दुसर्‍या पार्टीला ते म्हणावयास परवांगी असे, जरा अडते आहे असे वाटले की एssक,दोssन तीssन असा घोष सुरू होई, दहाच्या आत आठवले नाही की भेंडी चढवली जाई. ' तुम्ही फार भराभर म्हणता" असा वाद घालून पहिली बाजू १५-२० सेकंदाचा वेळ मिळवावयाचा प्रयत्न करे. एक मजेदार नियम होता. रामरक्षा म्हणावयाला बंदी. "र" आला तर रामरक्षा नाही. घरातल्या शेंबड्या पोरा-पोरींना पाठ असलेली रामरक्षा उपयोगात आणणे कमीपणाचे मानले जाई. साधारणत: दीड दोन तासांपर्यंत कोणीच अडत नसे. मग हळुहळु वेळ लागे. अकरा वाजावयास आले की घरची माणसेही गाद्या पसरावयाची वगैरे कामे काढत. मजेत वेळ जाई.

काही अक्षरे उदा. र, ल, परत परत येतात व त्यांची गाणी लवकर संपतात. त्यामुळे सर्वांना माहीत असलेली गाणी पहिल्यांदी म्हटली जात. काही राखून ठेवली जात. आपल्या बाजूचा कोणी म्हणतो आहे असे वाटले तर त्याला दाबले जाई. पण खरी कसोटी ट, ठ ढ मध्येच. ठ ची काही गाणी आज देतो आहे. आणखी कोणाला आठवत असतील तर अवष्य द्या. ट आणि ड चा प्रयोग करून पहावयासही हरकत नाही.
(१) ठकारे पर्वताऐसा नेटका सडपातळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लतेपरी !
(२) ठुमकी चलत रामचंद्र बाजत पैंजणिया !
(३) ठुमक ठुमक पग कुमुक-कुंज मग,चपलचरण हरि आये रे !
मेरे प्राणभुलावन आये मेरे नैन लुभावन आये रे !!

ठुमकी चलत रामचंद्र ही पं. द.वि. पलुसकर यांनी गायलेली प्रसिद्ध ध्वनिमुद्रिका तर दुसरी तेवढी प्रसिद्ध नसलेली पं. भीमसेन यांची. हीची खासियत म्हणजे ही रचना काजी अशरफ महमूद यांनी केलेली आहे.

हळुहळु भेंड्या खेळणे कमी कमी होऊ लागले पण लक्षात असावीत म्हणून पुढील हिंदी गाणीही ध्यानात ठेवली.

(४) ठाडे रहियो,
(५) ठंडी हवाये,लहराके जाये,
(६) ठंडे पानीसे नहाना छायिये,
आता मला ही पाठ नाहीत पण सुरवात केली की आपल्या बाजूची एखादी बाई ते गाणे म्हणतेच.
या शिवाय
(७) ठकाराचे ठाण, करी चापबाण ! माझे ब्रह्मज्ञान, ऐसे आहे ! रामदास
(८) ठाव तुझ्यापाशी! आता झाला हृषिकेशी ! तुकाराम
(९)ठायी मीची नाही म्हणे ! हारपलो भ्रांतीगुणे ! निळोबाराय
(१०) ठेवी जाणिव गुंडुन ! य़ेथे भावची कारण ! तुकाराम

ही चार, फक्त एकच ओळ लक्षात ठेवावयाची असल्याने पठडीत आहेत.तर आता नव्या पिढीकडून प्रतिसादांची अपेक्षा.

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

+१

छान लेख. एकदम पन्नास वर्षे मागे गेल्यासारखे वाटले. त्यावेळी टीव्ही नसल्यामुळे हे खेळ म्हणजेच करमणूक होती.
चंद्रशेखर

ढॅण्टॅणॅण...टॅणॅणॅण!

मस्त हं काका! वाचतोय.

-राजीव

मस्त लेख

भेंड्यांमध्ये मी कच्चाच होतो :-(

पण मजेदार खेळ!

'ड' चं गाणं

शरदभाऊ, ठ् ची गाणी झाली पण 'ड्' चं एक गाणं आठवलं...डम् डम् डिगा डिगा...

आते-मामे भावंडाच्या गोतावळ्यात, आजोळच्या झोपाळ्यावर दिवे गेलेले असतांना भेंड्या खेळायला मजा येत असे.
लेखावरुन बालपणची मे महिन्याची सुट्टी आठवली.

गौरी

भेंड्या

आपण सुरु करुया का? .. .

उपक्रम वर जर चालत असेल तर न संपण्यारी अंताक्षरी खेळुया.. शब्दांची ..

शब्दाची मुळ जात शो धयची...

जसे बिन पाण्याने साहेबांनी केली

हा वाक्य प्रचार (न्हावी समाजाची देणं) तसे शब्द शोधावे त्याची जी माहीती असेल ती द्यायची.. त्याच्या अंताक्षराचा शब्दापासुन दुसरा...

शब्द त्याची फ़ोड तसेच विवीध समाजाचे भाषा समृध्दी बाबतचे योगदान समजेल.

शैलु.

थाडे रहियो च्या ऐवजी ठाडे रहियो म्हणण्याची आयड्या भारी.
असो. ठ चे अजून एक गाणे "ठंडी हवा काली घटा आ ही गयी झूमके"

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

छान ! आता उपक्रमवर अंताक्षरी / आठवणी

छान आठवण. मनोरंजनाची साधनं नव्हती तेव्हा समृद्ध घरात भरल्या पोटांनी 'अंताक्षरी' आणि अन्य खेळ खेळल्या जात असतीलच म्हणा. साला, माझ्या आजोबा-आज्जीला मी कधी गाण्याच्या अंताक्षरी वगैरे खेळतांना, गाणी म्हणतांना पाहिलं नाही. दिवसभर काम आणि कामानं थकून जात असतील बिच्चारे. आज्जी मात्र जात्यावरची गाणी म्हणायची एवढे चांगले आठवते.

हं, आता नव्या पिढीत अंताक्षरी चांगलीच रंगते. महाविद्यालयाच्या सहली, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम याच्यात अंताक्षरी आहेच. हिंदी गाणी जास्त, मराठी गाण्यांचे प्रमाण कमी दिसते. मी माझ्या आवडत्या गाण्यावर दबा धरुन बसतो. पण, हा अंताक्षरीचा कार्यक्रम तासाभरापेक्षा जास्त चालला की कंटाळा यायला लागतो. गाणं म्हणता आले नाही म्हणून एक भेंडी झाली, दोन भेंड्या झाल्या, अशा भेंड्या आमच्या नव्या जमान्यात होत नाहीत.

असो, 'ठ' चे गाणे 'ठाणेदार आया हो ठाणेदार आया. पहिली पहिली बार ऐसा ठाणेदार आया...

-दिलीप बिरुटे

फाउल

'थानेदार आया' असे गाणे आहे... ठाणेदार नव्हे! ठ अक्षर आले तर हे चालणार नाही.
ह्यावेळेस संजोप रावांनी लक्षात आणून द्यायच्याआधी मीच दाखवतो :)

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

वीज गेल्यावर

आमच्या घरी मी लहान असताना रात्री नेहमी 'वीजपुरवठा काही काळासाठी बंद होत असे', तेव्हा इतर कसली करमणूक नसल्याने आम्ही असेच भेंड्या खेळत असू.

कधीकधी "ठ" सारखी अक्षरे येऊन वात आणत.
ठ चे अजून एक गाणे -
'ठंडी हवा काली घटा .. आ ही गयी झूम के"
http://www.youtube.com/watch?v=d88IFXnnuDM

(अरेच्चा, वर झाले वाटते.. ).

ठहरीये होशमें आ लूं

१. ठहरीये होशमें आ लूं| तो चले जाइयेगा|

बघा किती सुंदर गाणे आहे -

२. टुटे हुए ख्वाबो ने हुमको यह सिखाया है,
दिल ने जिसे पया था आंखो ने गंवाया है,

भेंडी

भेंडी या शब्दाची उत्पत्ती कशी झाली असावी बरे? आमच्याकडे शहरातील नातेवाईक ज्यावेळी येत त्यावेळी हा असा प्रकार खेळला जाई. अन्यथा भेंडी पत्ते हा प्रकार वर्ज्य.
बाकी रामरक्षा हा आमचा लहानपणाचा अविभाज्य घटक. एकदा मला रामाचा साक्षात्कार देखील झाला होता. चक्क मुर्तीचा हात हलल्यासारखे वाटले. आपली तपश्चर्या फळाला आली असेच वाटले होते. वर काय मागायचा या विचारात तो साक्षात्कार फसला.
प्रकाश घाटपांडे

ठैर जरा

ठैर जरा ओ जानेवाले, बाबू मिस्टर गोरे काले ...
असे एक गाणे लहानपणी मला पाठ होते. टीव्हीवर काही काळ अंताक्षरी चालली, पण घराघरातल्या भेंड्या बंद पडल्या. विभक्त कुटुंबपध्दतीमुळे कुटुंबातल्या सदस्यांची संख्या घटणे, लोकांनी एकत्र येणेच कमी होणे वगैरे कारणे आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे आजकालच्या सिनेसंगीतातले शब्द कळतच नाहीत, मग ते लक्षात कसे राहणार?

ठोकर के जो सारा जमाना...

ठोकर के जो सारा जमाना, बन जाये वो अपना निशाना
क्योंके, सारी की सारी ये दुनिया, मेरी जेब में

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सूड कथा आवडली

डॉ. बिरुटे सर, सूड ही कथा आपणास का आवडली यावर उपक्रमवर थोडे लिहाल का ? ( श्री. संजोपरावांचे सोडा) मी गेली
चाळीस वर्षे जीएंच्या कथा परतपरत वाचतो व त्या पासून आनंदही मिळवतो. पण या कथा का आवडतात यांचे उत्तर देणे
अवघड जाईल.जर आपल्या मार्गदर्शनाने याचा उलगडा झाला तर फार आनंद होईल. माझ्यासारखेच इतर जीएप्रेमीही उपकृत होतील. आता लेक्चरांची गर्दीही आटोपली असेल तर थोडा वेळ काढा ना. आपला नम्र,
समित्पाणी शरद.

सूड कथेचे कारण...

'सूड' कथा मला आवडण्याचे कारण असे की, माझ्या महाविद्यालयाचा स्टाफ रुम माझ्या डोळ्यासमोर असतो. त्या निमित्ताने होणार्‍या चवीष्ट चर्चांचा मी एक साथीदार असतो. 'सूड' कथेतील शाळेची स्टाफ रुम कशी असेल् त्याचे चित्रण सहज डोळ्यासमोर 'सूड' कथेमधून उभे राहते. जे-जे सुंदर असेल त्याकडे माणसाची नैसर्गिक ओढ असते, असावी. दोन महिन्यासाठी शाळेत शिकवण्यासाठी येणारी चोवीस वर्षीय तरुणी आणि शाळेत डोक्यावर टक्कल पडलेली म्हातारपणाकडे झुकलेले मास्तर, शिक्षिका येणार या नुसत्या कल्पनेने 'आता शाळेत रंग भरणार' अशी चर्चा करु लागतात. पण जेव्हा ती शिक्षिका येते तेव्हा तिच्याकडे पाहून या सर्व म्हातार्‍यांचा रसभंग होतो. लेखक म्हणतो यांची तोंडे खापरासारखी झाली.

हातात चमचम करणारी पर्स, डोळ्याला चष्मा, रेडकाच्या पायासारखे हात, जुने पॉलिश न केलेले सँडल्स, पण एम.ए. झालेली. कारण शाळेत कोणीच एम.ए. नाही. सारांश काय तर सौंदर्याचा आणि तिचा कोणताच संबंध नाही. स्त्री सुलभ हावभाव तिच्याजवळ होते पण ते तिला न शोभणारे होते. ती स्टाफ रुममधे असली तरी तिच्याशी कोणी फारसं बोलायचं नाही. ती शिकवत असतांना पोरं मस्ती घालायचे. तरीही, ती जीव तोडून शिकवायची. कविता म्हणायची तेव्हा तिचा आवाज खूप सुंदर यायचा. 'मधुघट' सारखी भा.रा. तांबेची कविता शिकवतांना ती भान हरपून शिकवते. पण पोरं इतकी सुंदर कविता शिकवतांना खिदळतात म्हणून स्टाफरुमधे कपाटाआड मान खाली घालून रडणारी मास्तरीन.

शाळेतही शेवटचा निरोपा-निरोपीचा दिवस. सर्व एकमेकांचे पत्ते लिहून घेताहेत. ती सर्वांच्या चर्चा टीपून घेत आहे. पण, तिच्याबद्दल कोणी काहीच विचारीत नाही. तिच्याशी कोणी बोलत नाही. तिच्याकडे पत्ता टीपून देण्यासाठीची वही येते तेव्हा ती मानेने नकार देते. त्या दिवशीची वेळ संपते. सर्व बाहेर पडतात तीही निघून जाते. आणि लेखकाला आता तिची आठवण यायला लागते. ती कोण असेल, ती कुठली वगैरे अशी काहीच चौकशी न केल्यामुळे एक हुरहुर लागते. स्टाफरुमधील तिचा वावर आठवायला लागतो. तिच्यावर प्रेम करणारे कोणी तरी असेल आणि त्यांना कळाले आम्ही तिच्याशी कसे वागलो तर त्यांना काय वाटेल ? एक अपराधीपणाची भावना या कथेत व्यक्त झालेली दिसते.

ती केवळ कुरुप आहे म्हणून तिच्याशी फटकून वागणारे तिलाही एक मन आहे, भावना आहे, हे विसरुन जातात. हे या कथेचे स्वरुप.

एक शैक्षणिक वर्षापुरते शिकवायले येणारे. कुरुप नसतील ते, पण त्यांच्याशी आमचे वागणे कसे असते. डोळे उघडे करायला लावणारी ती कथा मला माझ्या आजूबाजूची वाटते, म्हणून मला 'सूड' कथा आवडली.

>>>मी गेली चाळीस वर्षे जीएंच्या कथा परतपरत वाचतो व त्या पासून आनंदही मिळवतो. पण या कथा का आवडतात यांचे उत्तर देणे अवघड जाईल.

अहो, आपण चाळीस वर्षापासून कथा वाचताय. माझे अजून चाळीस वय व्हायचे आहे.:)
कथा आवडण्याची आपापली अशी वेगवेगळी कारणं असतात. मला आवडलेली कथा आपल्याला आवडेलच असे काही नाही.

>>>जर आपल्या मार्गदर्शनाने याचा उलगडा झाला तर फार आनंद होईल.
बस का आता ! आमची टींगल करताय का ? आम्ही आपल्याला काय मार्गदर्शन करणार. आपले वाचन, आपले रसग्रहण आम्ही आपल्यापासून शिकतोय. अनुभवी होण्यासाठी आम्हाला खूप काळ जायचा आहे.

>>लेक्चरांची गर्दीही आटोपली असेल
परीक्षा सुरु आहेत. पर्यवेक्षणाचे कामही सुरुच आहे. आज रविवार म्हणून जरासा वेळ मिळाला.

-दिलीप बिरुटे
[आपलाच फॅन]

 
^ वर