नच सुंदरी व रतीहुन सुंदर

भगवान कृष्ण ही एक महान विभुती असली पाहिजे. असं बघा, जन्मता जन्मता तुरुंगातून पळणे ते सोन्याची द्वारका समुद्रात बुडवून नंतर एका रानात शांतपणे मरणाची वाट पहाणे या दोन नाट्यमय क्षणांमधील आयुष्यात त्याने काय काय केले किंवा खरे म्हणजे काय काय केले नाही ? सर्व स्तरातील माणसांना मग ते स्त्री-पुरुष, आबालवृद्ध, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी कोणी असोत, आपल्याला भावेल, तेथे आपण पाहिजे होतो, असे वाटावे अशी एक तरी घटना कृष्णाच्या आयुष्यात घडलेली असते. तुमचा देवावर विश्वास नसेल तर विश्वदर्शन तुम्हाला भाकडकथा वाटेल व त्याला महान विभुती म्हणावयास तुम्ही तयार होणार नाही. पण जगातील यच्चयावद नवर्‍यांना एक गोष्ट मान्य करावीच लागेल कीं आपली सालस, सरळस्वभावी, प्रेमळ बायको ( आमच्या सौभागवती एखादेवेळी उपक्रम वाचतात, तेव्हा ही अशी चार लोकांत सांगावयाची विशेषणे मला पाठ असतात, ती इथे घालून टाकणे बरे !) नांदवतांना आपल्या नाकीं नउ येते तर हे गृहस्थ एका वेळी आठ (सोळा हजार एकशे सोडून द्या, मला म्हणावयाचे आहे विचारात घेऊ नका) बायकांना गुण्या-गोविंदाने नांदवतात (हा वाक्प्रचार कृष्णावरून पडला बर का) म्हणजे यांना महान म्हणावयासच पाहिजे. बरे या बायका काय साध्यासुध्या होत्या ? एक अस्वलाची (जांबुवानाची) मुलगी, अर्थात बोचकारण्यात तरबेज असावी. दुसरीने नवर्‍याची किंमत काय मिळणार म्हणा असा विचार करून त्याचे दानच करून टाकले ! तर हे महोदय पहिल्या भागात लिहल्याप्रमाणे मनधरणी करतांना गाण्याचाच आधार घेतात. पहिल्यांदी ज्येष्ट नृपकन्या रुक्मिणी. बरेच दिवसात चक्कर मारली नाही तेव्हा रागावलेली असणारच हे ग्रुहित धरून महालात गात गातच प्रवेश केला.

नच सुंदरी करूं कोपा ! मजवरी करी अनुकंपा !
रागाने तव तनु ही पावत कशी कंपा ! !!धृ!!
नारी मज बहु असती ! परि प्रीती तुजवरती !
जाणसि हें तूं चित्तीं ! मग कां ही अशि रीती !
करिं मी कोठे वसती ! परि तव मूर्ती दिसती !
(चाल) प्रेमा तो मजवरिच्या नेउ नको लोपा ! !!१!!
करपाशी या तनुला ! बांधुनि करी शिक्षेला !
धरुनियां केशाला ! दंतव्रण करी गाला !
कुचभल्ली वक्षाला ! टोचुनि दुखवी मजला !
(चाल) हाच दंड योग्य असे सखये मत्पापा ! !!२!!

पहिल्याच कडव्यात कशा शिताफीने, "रागावणे ही तुझीच चुकीची रीत आहे" असे सांगून Offence is the best diffence याचे सुंदर दर्शन घडवले आहे. दुसर्‍या कडव्यात तर कहरच आहे. आरोपीनेच न्यायाधीशाला काय शिक्षा द्यावी हेच सांगून टाकले आहे. कीतीही रागवली असली तरी रुक्मिणीला हसण्याशिवाय काही वावच ठेवला नाही. (सगळे पद द्यावयाचे कारण छोटा गंधर्व पहिले कडवे चांगले ५-६ मिनिटे ताना मारत आळवतात व दुसरे कडवे ३० सेकंदात उरकतात ! शब्द नीट कळणे अत्यावष्यक आहे कीं नाही ?)

आता जावयाचे आहे प्रियतम भार्येकडे, सत्यभामेकडे. फार समजूत घालण्याची गरज दिसत नाही कारण फार दिवसांची दांडी नसावी. व महत्वाचे म्हणजे तीला काय हवे ते देण्याचे कबूल करतांना चार गोड शब्दानी गोंजारून थोडे credit गाठीला मारून ठेवावयाचे आहे.

रतिहून सुंदर मदन-मंजिरी ! मदनाचे वरदान तुला !!
ललित कोमला तव सुंदरता लाजविते मंदार-फुला
बघुनि तुला गगनांत खंगते कलेकलेने चंद्रकला
कळे न मजला, वृथा फुलाचा, नाद कशाला हवा तुला !!

येथे दुसर्‍या कडव्याची गरज भासली नसावी ! नसो नसो. तेच पुरुष भाग्याचे.
आज नटनागर कृष्णाचा चालूपणा पाहिला. शेवटच्या तिसर्‍या भागात यांचेच शिष्योत्तम अर्जुन काय करतात ते पाहू.

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

दुसरे कडवे ३० सेकंदात उरकतात...

बरोबरच आहे.. त्यावेळच्या संस्कृतीरक्षकांना "नीट्" अर्थ कळला असता तर् नाटक टिकलं असतं का? :)

आयला, असं कोड्यात आणि हाय-फाय मराठीत लिहिलेलं चालतं आणि आम्ही फक्त "आती क्या खंडाला" म्ह्टलं की कपाळावर आठ्या? :)

प्रश्न

शरद,

तुम्ही या विषयावर इतक्या अधिकाराने कसा काय लिहू शकता असा मला नेहेमीच प्रश्न पडलेला आहे. भलताच जोरदार व्यासंग दिसतो!

सालस, सरळस्वभावी, प्रेमळ बायको (आमच्या सौभागवती एखादेवेळी उपक्रम वाचतात, तेव्हा ही अशी चार लोकांत सांगावयाची विशेषणे मला पाठ असतात...)

थोडा अंदाच येतोय. बाकी वेगळा आयडी वगैरेची सोय त्यांना माहीत आहे का? :-)

देव हे देव व्हायच्या आधी 'आदर्श', हेवा वाटण्यासारखे आणि पराक्रमी गृहस्थ असावे लागतात. मला वाटतं कृष्ण हा सर्वच बाबतीत पराक्रमी होता. आणि हे थोडं, तेही थोडं असा अर्थसंकल्पासारखा कॉंप्रोमाइज म्हणून नाही - सगळ्यांसाठीच भरपूर... राजा, मुत्सद्दी, तत्त्ववेत्ता, शूर, मल्ल, उत्तम मित्र आणि सगळ्यात कहर म्हणजे गोपींमध्ये प्रिय. तो देव म्हणून मान्यता पावायला एकदम १५ ते २५ चं तरुणाईचं डेमोग्राफिक त्याच्या खिशात!

अवांतर...
त्यात ते गाणं छोटा गंधर्वांनी म्हटलं म्हणजे शब्द कळणं महा कठीण. त्यांच्याविषयी मी एक किस्सा ऐकला आहे. ते चीज म्हणत होते

'चतुर सुदरा बालमवा...'
सगळेच त, च, द, ल हे द्ज सारखे ऐकू येत होते. लोकांना काही केल्या कळलं नाही. एका महाभागाने शेवटी अंदाज केला ते म्हणत असावेत
'जठर सुधरा वारंवार...' ताना चालू असताना त्याने इतरांना सांगितलं व त्यांनाही हुबेहुब तसंच ऐकू यायला लागलं!

असो. एवढं अवांतर पुरे झालं. खरं तर पूर्ण प्रतिसाद अवांतर झाला, आणि आपल्या उत्क्रांत झालेल्या पुस्तिकेच्या चिंधड्या उडाल्या. हा दोष पूर्णपणे तुमच्या रसाळ (रटाळ नव्हे, ते इतर) विषयावर व विवेचनावर टाकून मोकळा होतो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

राजा सोडून

भलताच जोरदार व्यासंग दिसतो!

याच्याशी सहमत. शरद यांचे असे रसग्रहण नेहमीच रोचक असते.

परंतु आणि आता अवांतर,

कृष्ण हा सर्वच बाबतीत पराक्रमी होता.

पण तो रणछोडरायही होता. :-) पराक्रमी असण्यापेक्षा अतिशय बुद्धीमान आणि राजकारणी होता.

तसेच, कृष्ण राजा कधीच नव्हता. किंगमेकर (याला मराठी शब्द काय बरे?) मात्र होता.

कृष्णाबद्दल उपक्रमावर चर्चा झाल्याचे आठवत नाही. वेगळी चर्चा सुरु करायला हवी.

गाणे आवडले, शब्दांबद्दल...

शोधून ध्वनिफीत ऐकली. आवडली. (पहिली) कविता फारशी आवडली आहे. तंतकवीसाहित्यातही भडक वाटावी अशी रचना वाटली.

लेख आवडला. कविता थोडीशी नावडूनही रसग्रहण आवडले.

पद "संगीत सौभद्रातले आहे", अशी माहिती माझ्यासारख्यांसाठी शरद यांनी द्यावी अशी विनंती. लहानपणी संगीत नाटके बघण्याचा फारसा योग आला नाही. त्यामुळे अगदी प्रसिद्ध नाट्यगीते, नाटकेसुद्धा माझ्या ओळखीची नाहीत.

नाटकातली पदे कोणी लिहिलेली आहेत? (नाटककार किर्लोस्कर आहेत, पण कधीकधी पदे वेगळा कवी लिहीत असे, ऐकले आहे.)

माझ्या आठवणीप्रमाणे..

माझ्या आठवणीप्रमाणे संगीत सौभद्रचे लेखन, पद्यलेखन आणि संगीत दिग्दर्शन या तीनही भूमिका अण्णासाहेब किर्लोस्करांनी बजावल्या होत्या.--वाचक्नवी

गमतीशीर

नच सुंदरी करूं कोपा ! मजवरी करी अनुकंपा !

हे " नच सुंदरी करूं कोपा ! मजवरी धरी अनुकंपा !" असे ऐकल्याचे स्मरते. चुभुदेघे.

लेख गमतीशीर.

असेच म्हणते

मजवरी धरी असेच ऐकले आहे.

नच सुंदरी करू कोपा इथे ऐका.

Get this widget | Track details | eSnips Social DNA

आणि दुसरे इथे..
http://www.youtube.com/watch?v=XW42yqsX5G4

करी धरी

पुस्तकातल्या पदात "करी" आहे व गाण्यात "धरी" आहे. मान्य. पण मला वाटते कृष्णाला " करी धरण्यातच " इन्टरेस्ट् असावा.
शरद्

नच सुंदरी करु कोपा, भरपुर तू घे झोपा

लेख छान आहे. कोणे एकेकाळी दिवाळी अंकातल्या एका कासवछापी जाहिरातीत पहिल्या पदाचे 'नच सुंदरी करु कोपा, भरपुर तू घे झोपा' असे विडंबन वाचले होते. त्या विडंबनामुळेच मूळ पद अजूनही लक्षात राहिले आहे. जुनी नाट्यपदे कुठे कुठे थोडी चावट, आचरट, आंबट झालेली दिसतात.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मराठी नाट्यसंगीत

या नावाचे पुस्तक श्री बाळ सामंत यानी प्रकाशित केले आहे. त्यात शाकुंतलपासून गोरा कुंभार पर्यंतच्या नाटकांतील ७५० पदे आहेत.नाट्यव्यवसायाबद्दल माहिती देणारी ३० पानी प्रस्तावना आहे. प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन, पुणे.
शरद

 
^ वर