दोन बायकांचा दादला

दोन बायकांचा दादला : कथा १.

खरे म्हणजे ही बला स्वत:हून ओढवून घेतलेली.आपल्याला त्याबद्दल फार कणव येण्याचे कारण नाही."भोग स्वत:च्या कर्माची फळे" असे म्हणून बाजूला व्हावे हे उचित. पण जेव्हा देवांनी वा देवावतारांनी हे लफडे मागे लावून घेतलेले असते तेव्हा काय करावयाचे ? फार फार तर गंमत पहावी हे बरे. सुरवात करू या महादेवांपासून. हिमालयातील या स्मशानवासीच्या पहिल्या पत्नीने माहेरी जाऊन जीव दिला खरा पण भारतीय परंपरेला जागून दुसर्‍या जन्मात घोर तपश्चर्या करून जिद्दीने परत तोच पती मिळवला. "सारीपाटात नेहमी हरवत असे" एवढे सोडले तर या "कोमल,सुंदर हिमनगदुहिते" बरोबर सुखाने संसार करावयास हरकत नव्हती. पण या जगदीश्वराने तीला सवत आणली, इतकेच नव्हे तर तीला डोक्यावर बसवली ! एवढे झाल्यावर भांड्याला भांडे लागून आवाज होणारच. बघा कवीला काय दिसले :

यावरी मदनांतक पाहें ! सिंहासनीं बैसला आनंदमयें !! जगदंबा मुखाकडे पाहें ! हास्य वदन करोनियां !!
यावरी विरुपाक्ष बोलत ! कां हो हास्य आले अकस्मात !! यावरी त्रैलोक्यमाता म्हणत ! नवल एक दिसतसे !!
तुमच्या जटामुकुटांत ! ललनाकृति काय दिसत !! तुमची करणी अदभुत !पद्मज-बिडौजा समजेना !!
कैलासपति म्हणे इभगमने ! हरिमध्ये मृगशावकनयने !! मस्तकीं जळ धरले वरानने ! बिंबाधरे पिकस्वरे !!
यावरी चातुर्यसरोवरमराळी ! हेरंबजननी म्हणे कपालमाळी !! जळांतरीं स्त्रीचें वदन ये वेळीं ! दिसते मज भालनेत्रा !!
यावरी बोले कैलासराज ! विद्रुमाधरे मुख नव्हे ते वारिज !! शोभायमान सतेज ! टवटवीत दिसतसे !!
यावरी सजलजलदवर्णा ! स्कंदमाता म्हणे पंचदशनयना !! नीलकेश व्याघ्रचर्मवसना ! कृष्णवर्ण दिसताती !!
यावरी बोले पंचवदन ! कमळीं मिलिंद घे सुगंध बैसोन !! नसतेच पुससी छंद घेवोन ! रमारमणसहोदरी !!
यावरी बोले भुजंगत्रिवेणी ! कमळास भोवयां कां खट्वांगपाणी !! तुमच्या मायेची विचित्र करणी ! आम्नायश्रुती नेणती !!
यावरी बोले हिमनगजामात ! भृकट्या नव्हे पाहें त्वरित ! सलिललहरी तळपत ! दृष्टी तरळली तुझी कां हो !!
यावरी सकल प्रमदांची वामिनी ! बोले कंबुकंठी कमंडलुस्तनी !! कैरवास नेत्र पिनाकपाणी ! कां हो दिसती आकर्ण ते !!
यावरी शफरीध्वजदहन बोलत ! कमळाभोंवतें नीर बहुत !! नेत्र नव्हेत मीन तळपत ! हंसगमने निरखीं बरें !!
जे अनंतगुणपरिपूर्ण वेल्हाळ ! त्रिपुरहरसुंदरी बोले प्रेमळ ! म्हणे राजीवा स्तनयुगुळ ! कमंडलूऐसे दिसती कां !!
यावरी बोले त्रिशूळपाणी ! ऐके वसुधाधरनंदिनी ! ते स्तन नव्हती दोन्ही ! विलोकूनि पाहें बरें !!
गंगार्‍हदाचे दोन्ही तीरीं ! चक्रवाके बैसलीं साजिरीं !! दुर्गा म्हणे मदनारी ! बहुत साहित्य पुरवितसां !!
एकाचे अनेक करून ! दाखविले हे त्रिभुवन !! तुमचे मीनेच धरावे चरण ! बोलता अप्रमाण न म्हणावे !!

इभ : गज, हरि : सिंह, हरिमध्ये : सिंहकटी, पिकस्वरे : कोकिळेच्या आवाजाची, मराळी : हंसी, विद्रुम : पोवळे, विद्रुमाधरी : पोवळ्याच्या रंगाचे ओठ असलेली, वारिज : कमळ, सजलजलदवर्णा : मेघश्यामा, आम्नायश्रुती " वेद-पुराणे, हिमनगजामात : हिमालयाचा जावई, वामिनी : स्वामिनी, कंबुकंठी शंखासारखा गळा असलेली (एक स्त्री सौंदर्य लक्षण), कैरव : कमळ, शफरीध्वज : मदन, वसुधाधर : पर्वत, हिमालय,
गंगार्‍हद : गंगाजळ, मीनेच : (मौनपणे), मिनने :एकरूप होणे, मीनेच : एकरूप होऊन.

थोडक्यात तुम्हाला दुसरे लग्न करावयाचे असेल तर (१) हजरजबाबीपणा पाहिजे, (२) निखालस खोटे बोलता आले पाहिजे, (३) लाडीगोडीने बायकोची (समोर असलेल्या), तीच्या सौंदर्याची, स्तुती करता आली पाहिजे.बायकोने कितीही टोमणे मारले तरी तिकडे सोयिस्कर दुर्लक्ष करता आले पाहिजे.
पण कित्येकवेळी एवढे पुरेसे होईलच असे नाही. मग, "जाऊ दे ग, तीच्यापेक्षा तूच किती छान आहेस, मी तुझ्यावरच जास्त प्रेम करतो," असे सांगताना गाणेही म्हणावे.

शंकर गिरिजेस बोले !!धृ!!
रुक्ष जटाजूट शिरी
त्यातच गंगेस धरी हृदयासी तुज धरिले !!१!!
कोठे ती तरंगिणी
कोठे तू रतिरंगिणी
ती चंचल,ती अचला
तुजला मी मन दिधले !!२!!

असो. भारतीय स्त्री चार शिव्या देईल पण संभाळून घेईल यावर विश्वासून रहावे हेच खरे.

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

दोन बायकांचा दादला

दोन बायकांचा दादला हा सध्याच्या काळात दयेस पात्र व्यक्तीच मानली पाहिजे मग तो देव असो मानव असो नाहीतर असुर.

चन्द्रशेखर

मजेशीर

शंकर पार्वतीचे सवाल जवाब मजेशीर आहेत. आवडले.

माझ्या मते, पार्वती शंकराची फिरकी घेत असावी. गंगा ही देखील पार्वतीप्रमाणेच हिमवानाची मुलगी ना. पार्वतीला काय घडते आहे त्याची कल्पना असावी. असो. "साली आधी घरवाली" असे म्हटले जाते परंतु शंकराने तिला पूरी घरवालीच केलेली दिसते. शंकरदेव महान आहेत. ;-)

बहुतेक

पार्वतीने मनात खूणगाठ बांधली असावी, नवरोबांवर लक्ष ठेवले पाहिजे.

थोडक्यात तुम्हाला दुसरे लग्न करावयाचे असेल तर (१) हजरजबाबीपणा पाहिजे, (२) निखालस खोटे बोलता आले पाहिजे, (३) लाडीगोडीने बायकोची (समोर असलेल्या), तीच्या सौंदर्याची, स्तुती करता आली पाहिजे.बायकोने कितीही टोमणे मारले तरी तिकडे सोयिस्कर दुर्लक्ष करता आले पाहिजे.

हेहेहे. बहुदा पहिले लग्न करायचे असले तरी हेच सर्व करावे लागेल असे वाटते - :)

गंमतीशीर सवाल जवाब. बाकी हे काव्य कोणाचे?

मजेशीर (उत्प्रेक्षा?)

मजेशीर!

उत्प्रेक्षा म्हणावी काय?

भासे ललनाकृती, नव्हे, ते जळ
भासे वदन त्यात, नव्हे! वारिज
भासे कृष्णवर्ण परि ना, मिलिंद
...
भासे स्तनयुगुळ, ना! चक्रवाके
...
गंगादेवीबद्दल पार्वतीच्या मते प्रत्यक्षवर्णन, तर शंकराच्या मते गंगानदीबद्दल अप्रत्यक्ष उपमानांचा आरोप.

काव्य

काव्य श्रीशिवलीलामृतमधले. या अशा पोथ्या (नवनाथभक्तीसार त्यातलेच) तुम्ही माझ्यासारखे, रूढ अर्थाने धार्मिक नसाल,तरीही करमणुकीसाठी वाचण्यासारख्या आहेत. अनुभावामृत वाचल्यावर डोक्याला शीण झाला तर मनोरंजनार्थ अवश्य वाचाव्यात.
शरद

 
^ वर