संस्कृत जिवंत की मृत - रॉब अमेरी यांचा दृष्टीकोन

पहिल्यानेच काही गोष्टी स्पष्ट करतो. मी भाषातज्ज्ञ नाही तसेच काहीही करून संस्कृत जिवंत भाषा आहे हे सिद्ध करायचा माझा अट्टाहास नाही. फक्त भाषा जिवंत किंवा मृत ठरवण्याचे निकष काय असतात किंवा मृत शब्दाच्या निरनिराळ्या छटा असतात का? असल्यास त्यांचे अर्थ कसे बदलतात याची उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीशी चर्चा करताना तिने एक मुद्दा सांगितला" आपण संस्कृत मृत आहे म्हणतो पण त्याचवेळी मराठी, हिंदी, बंगाली अशा भाषांमध्ये किती संस्कृत शब्द आहेत याचा विचार करतो का? दुसरे म्हणजे परकीय शब्दाला प्रतिश्ब्द शोधताना एक तर संस्कृतमधूनच घेतो किंवा संस्कृतोद्भव असा नवीन शब्द तयार करतो (उदा. पंतप्रधान, महापौर, वगैरे). असे असताना हिरिरीने संस्कृत मृत आहे म्हणण्यात काही अर्थ आहे का?"

तिचे म्हणणे ऐकल्यावर त्या दृष्टीने जालावर शोध घेतला असता जालावर "वार्राबर्ना कौर्ना - रिक्लेमिंग ऍन ऑस्ट्रेलियन लॅंग्वेज" या पुस्तकामधल्या खालील उतार्‍याने मला मृत शब्दाच्या निरनिराळ्या छटा जाणवून दिल्या. लेखाचा दुवा (पाने १८ - १९) शेवटी आहेच.

"मृत की निद्रिस्त भाषा: टर्मिनॉलॉजीने महत्त्वाची आहे

बहुतेक भाषातज्ज्ञांनी लागू केलेल्या निकषांनुसार ज्यांचे वर्णन खर्‍या अर्थाने "मृत" म्हणता येतील अश्या भाषेचा हा अभ्यास आहे. पण कौर्ना भाषेच्या चळवलीच्या केंद्रस्थानी असलेले लोक या भाषेकडे निराळ्या दृष्टीने बघतात. त्यांचे मते ही भाषा "निद्रिस्त" किंवा "लुप्त" स्वरूपात पण अस्तित्त्वात आहे.
कन्साईज ऑक्स्फर्ड डिक्शनरीच्या व्याख्येनुसार मृत भाषा म्हणजे "जी भाषा सामान्यपणे बोलली जात नाही" अशी. ऑस्ट्रेलियामध्ये बहुतेक लोक संस्कृत आणि लॅटिन यांना मृत भाषांचे आदर्श समजतात. परंतु ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका आणि जगातील इतर काही भागातील स्थानिक भाषा ज्या अर्थाने मृत झाल्या त्या अर्थाने मृत झाल्या नाहीत. लॅटिन आणि संस्कृत भाषा बदलल्या आणि अनेक शतकांमध्ये उत्क्रांत होऊन इटालियन, फ्रेंच, स्पॅनिश आणि हिंदी, उर्दू, मराठी अश्या लेकींना जन्म देत्या झाल्या. लॅटिन आणि संस्कृत यांना दोन कारणांसाठी "मृत" म्हटले जाते. त्यांच्यापासून उत्पन्न झालेल्या भाषांना वेगळ्या नावांनी ओळखले जाते त्यामुळे त्या भाषा या मूळ भाषांपेक्षा स्वतंत्र भाषा आहेत असे मानले जाते. रोजच्या वापरातली भाषा ही मूळ भाषेपासून बरीच लांब गेली तरी मूळ लॅटिन आणि संस्कृतचा वापर लेखी स्वरूपात किंवा मर्यादित स्वरूपात धार्मिक कारणांकरता होत राहिला. लॅटिन आणि संस्कृत यांच्याशी इतर सर्व बाबतीत बरोबरीच्या असल्या तरी जुनी इंग्लिश, जुनी जर्मन, किंवा प्रोटो इंडोयुरोपियन भाषा या मृत समजल्या जात नाहीत.

लॅटिन आणि संस्कृत यांनी काही ठिकाणी पुनरागमन केले आहे. सरकारी, साहित्यिक, माध्यमे आणि धार्मिक वापराच्या अधिकृत रजिस्टर्समध्ये संस्कृतच्या वापराबद्दल (राजेश्वरी) पांढरीपांडे यांनी चर्चा केली आहे ( इथे भाषांतर गंडले आहे. जि़ज्ञासूंनी मूळ उतारा वाचावा). आकाशवाणीवरील बातम्या आणि नवीन साहितिक लेखन (क्रिएटिव्ह रायटिंग) यामधल्या वापराचीही पांढरीपांडे चर्चा करतात ज्यामध्ये भाषेला टिकून राहण्यासाठी स्वतःमध्ये रचनात्म्क बदल घडवून स्वतःमध्ये आधुनिकता आणावी लागत आहे. पश्चिम भारतामधल्या कर्नाटक राज्यातल्या दोन ब्राह्मण गावांमध्ये रोजच्या वापरात संस्कृतचा वापर होत असल्याचे डेव्हिड लिहितो. पेजावर मठाच्या अधिपतींनी या गावांना भेट देऊन संस्कृतचे पुनरुज्जीवन करण्याचे आवाहन केल्यानंतर हा बदल घडून आला. हे आवाहन काही पुजार्‍यांनी स्वीकारले आणि लोकांना संस्कृत शिकवण्याचे वर्ग काढले. याला स्त्रिया, शेतकरी, डॉक्टर्स यांच्यासारख्या लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला."

माझ्या दृष्टीने महत्त्वाचे

पहिल्या परिच्छेदात मृत शब्दाच्या दोन छटा उलगडून दाखवल्या आहेत. संस्कृत आणि लॅटिन या लेकींना जन्म देऊन आता मर्यादित वापरात राहिल्या आहेत तर लेखकाने म्हटल्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका आणि जगातील इतर काही भागातील स्थानिक भाषा या लेकींना जन्म न देताच मृत झाल्या आहेत.

रॉब अमेरि यांचे मत

लेखनविषय: दुवे:

Comments

शुद्धीपत्र

नेहमीप्रमाणे संगणक सुपूर्त करायच्या आधी हँग झाल्याने काही चुका राहिल्या आहेत.

तिसरी ओळ
प्रतिश्ब्द - प्रतिशब्द
नववी ओळ
चळवलीच्या - चळवलीच्या
अठरावी ओळ
साहितिक - साहित्यिक
एकोणिसावी ओळ
रचनात्म्क - रचनात्मक

विनायक

अरेरे..!

पश्चिम भारतामधल्या कर्नाटक राज्यातल्या दोन ब्राह्मण गावांमध्ये रोजच्या वापरात संस्कृतचा वापर होत असल्याचे डेव्हिड लिहितो. पेजावर मठाच्या अधिपतींनी या गावांना भेट देऊन संस्कृतचे पुनरुज्जीवन करण्याचे आवाहन केल्यानंतर हा बदल घडून आला.

इतक्या थोर भाषेचे पुनरुज्जीवन करण्याकरता, ती जिवंत राहण्याकरता आवाहान वगैरे करण्याची वेळ यावी? अरेरे..!

असो..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

 
^ वर