दुसरी भाषा म्हणून संस्कृत जिवंत की मृत? प्रा. माधव देशपांडे यांचे मत
श्री. माधव देशपांडे ही मिशिगन विद्यापीठात भाषाशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या "संस्कृत अँड प्राकृत: सोशिओलिंग्विस्टिक इश्शूज" या पुस्तकातला भाषांतर करून देत आहे. लेखाचा दुवा शेवटी आहेच. मागच्या वर्षी या विषयावर बरीच चर्चा झाली होती. शेल्डन पोलॉक यांच्या लेखावरून (त्याचा दुवा अन्यत्र दिला आहे) संस्कृत मृत असल्याचा निष्कर्ष काही अभ्यासकांनी काढला होता. या पार्श्वभूमीवर हा उतारा रोचक वाटावा.
१. वरील चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होईल की अर्वाचीन संस्कृतला दुसरी भाषा म्हणण्याबद्दल पतंजली आणि एफ. सी. साऊथवर्थ यांचे एकमत होईल. बहुतेककरून आपल्या आईकडून ही भाषा कोणी शिकली नसावी. परंतु दुसरी भाषा म्हणून संस्कृत जिवंत होती का मृत या प्रश्नाचा निकाल साऊथवर्थ यांच्या बाजूने अजून लागलेला नाही. दुसरी भाषा म्हणून व्याकरण - निरपेक्ष संस्कृतचे अस्तित्त्व पतंजलीच्या चर्चेमध्ये बर्याच तपशीलाने सिद्ध केले आहे. व्याकरणत़ज्ञ आपल्या शास्त्राचे पक्षपाती असल्याने संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी व्याकरण शिकण्याची आवश्यकता प्रतिपादन करत. तरी त्यांनाही हे कबूल करावे लागे की पुस्तकातून व्याकरण न शिकताही प्रमाण संस्कृत अस्खलितपणे बोलणारे लोक होते. या व्याकरणतज्ज्ञ्नांना व्याकरण - निरपेक्ष संस्कृतचे अस्तित्त्व केवळ मान्य करूनच भागत नसे तर त्याचा समावेश करून घेण्यासाठी त्यांना नियम बदलावे लागत. कात्यायन आणि पतंजली यांनी पाणिनीच्या व्याकरणात घातलेली भर आणि केलेल्या सुधारणा या अन्य कुठल्या व्याकरणाच्या पुस्तकावर आधारित नव्हत्या तर ते स्वतः वापरत असलेल्या "शिष्ट"संस्कृतवर आधारित होत्या. म्हणून अश्या नवीन भर घातलेल्या गोष्टींना "इष्टी" म्हणजे "इच्छित वापराची रूपे (जी कुठल्याही आधी अस्तित्त्वात असलेल्या नियमापासून मिळवता येत नाहीत). पारंपरिक व्याकरणाच्या नियमांपासून घेतलेले स्वातंत्र्य हे प्रमाण संस्कृतच्या जुन्या आणि नव्या अश्या दोन्ही स्वरूपात तसेच "देशी संस्कृत" च्या नवीन स्वरूपात पहायला मिळते. पतंजलीच्या "संस्कृत ही प्रामुख्याने आर्यावर्तात बोलली जाणारी भाषा होती" या वाक्याचे समर्थन एका अनपेक्षित अश्या शाखेतल्या आधुनिक संशोधनातून मिळते. डामस्टीट (१९७८:२०८) हा आपल्या "कोरीव कामातील (शिलालेख, नाणी वगैरे) मिश्र संस्कृत" या विषयावरील अभ्यासात म्हणतो:
"मथुरेतल्या कोरीव कामात संस्कृतचे प्रमाण जास्त आहे. मथुरा बहुधा आर्यावर्तात आहे. या भागात भारतीय संस्कृती बहरली. पतंजलीच्या महाभाष्यात या भागाचे आदर्श ब्राह्मणांचे मूळ वसतिस्थान असा उल्लेख आहे. हे ब्राह्मण लोक प्रमाण (संस्कृत) भाषा त्याचे व्याकरन न शिकता बोलू शकत. यावरून हे स्पष्ट होते की पतंजलीच्या (इ. स. पू. ५ वे शतक) काळी हा भाग ब्राह्मणी संस्कृतीचा अभेद्य किल्ला होता आणि त्यात संस्कृतला मानाचे स्थान होते. हेही शक्य आहे की पूर्वेकडून आर्यावर्तात प्रवेश करणारे बौद्ध आणि जैन लोक ब्राह्मणांच्या, त्यांच्या संस्कृतीच्या आणि त्यांच्या भाषेच्या, म्हणजेच संस्कृतच्या संपर्कात आले."
हे उघड आहे की संस्कृत ही लोकांची पहिली भाषा होती की दुसरी या प्रश्नाचा विचार पतंजलीच्या काळी व्याकरण - निरपेक्ष संस्कृतचा वापर होता की नाही या प्रश्नाहून वेगळा केला पाहिजे. मीमांसा आणि न्याय परंपरा अगदी मध्ययुगापर्यंत असे प्रतिपादन करीत की संस्कृत शिकण्यासाठी व्याकरण शिकायची आवश्यकता नाही आणि संस्कृत फक्त बोलणारे कशा प्रकारे बोलतात याचा अभ्यास करून शिकता येते. वस्तुस्थिती बहुधा या दोन टोकांच्या मध्ये असावी. या व्याकरण - निरपेक्ष संस्कृतच्या वापरामुळेच मी संस्कृतला एका प्रकारे "जिवंत" म्हटले आहे. पहिल्या भाषेसारखी (आईकडून शिकलेल्या भाषेसारखी) प्रत्येक अर्थाने ती "जिवंत" भाषा नव्हती परंतु केवळ (काळात) गोठवलेल्या लेखनात अस्तित्त्व दाखवणारी पूर्णपणे "मृत" भाषाही नव्हती. ती दुसरी भाषा म्हणून जिवंत होती, तिचे स्वरूप कडाकडांनी बदलत होते आणि व्याकरण तज्ज्ञांना ते बदल सामावून घेण्यासाठी व्याकरणाचे नियम बदलावे लागत होते. हे बदल किरकोळ स्वरूपाचे होते. आमूलाग्र असे नव्हते. त्यामुळे पाणिनीच्या व्याकरणापासून फारकत घेण्यास भाग पडावे इतके प्रभावी नव्हते. त्यामुळे हे किरकोळ बदल पाणिनीच्या व्याकरणात सामावून घेण्यासाठी परंपरेने आवश्यक ती साधने सहज मिळवली. ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की एका बाजूला संस्कृत व्याकरण तज्ज्ञांनी वेदोत्तर संस्कृत भाषेला वेदांच्या संस्कृत इतकेच धार्मिक महत्त्व मिळवून दिले (दर्जेदार साहित्यनिर्मितीक्षमता असल्याने) तर दुसर्या बाजूला (बोली) वापरातली संस्कृत कडाकडांनी बदलत होती आणि व्याकरणतज्ज्ञ त्याबद्दल जागरूक होते आणि त्याची दखल घेत होते. मोठ्या प्रमाणातला संस्कृतचा वापर (बोली भाषेतला) हा "गोठलेल्या रचनांपासून" पुढे चालू अश्या प्रकारचा असला तरी त्याच्या कडा प्रवाही होत्या.
विनायक
Comments
शुद्धीपत्र
लेख लिहिल्यावर तपासताना संगणक हँग झाल्याने काही दुरुस्त्या करता आल्या नाहीत.
पहिली ओळ
१. हा आकडा नको.
तिसरी ओळ
व्याकरणत़ज्ञ- व्याकरण तज्ज्ञ
चौथी ओळ
व्याकरणतज्ज्ञ्नांना - व्याकरणतज्ज्ञांना
सातवी ओळ
(जी कुठल्याही आधी अस्तित्त्वात असलेल्या नियमापासून मिळवता येत नाहीत). - (जी कुठल्याही आधी अस्तित्त्वात असलेल्या नियमापासून मिळवता येत नाहीत) म्हणत.
बारावी ओळ
व्याकरन - व्याकरण
सोळावी ओळ
संस्कृत फक्त बोलणारे - फक्त संस्कृत बोलणारे
सतरावी - अठरावी ओळ
या व्याकरण - निरपेक्ष संस्कृतच्या वापरामुळेच मी संस्कृतला एका प्रकारे "जिवंत" म्हटले आहे. पहिल्या भाषेसारखी (आईकडून शिकलेल्या भाषेसारखी) प्रत्येक अर्थाने ती "जिवंत" भाषा नव्हती परंतु केवळ (काळात) गोठवलेल्या लेखनात अस्तित्त्व दाखवणारी पूर्णपणे "मृत" भाषाही नव्हती.
संपादकांना विनंती - शक्य असल्यास हे बदल करून हा प्रतिसाद नष्ट करावा.
विनायक
वा वा वा वा
धन्यवाद. काही मजकूर संपादित.
मला तुम्हाला 5 प्रश्न विचारायचे आहेत.
१- दुसरी भाषा ही काय भानगड आहे हो?
२-
या वाक्यांमध्ये 'होते', 'होती' ही भूतकाळी रुपे का बरे वापरली आहेत, वर्तमानकाळी रुपे का नाही वापरलेली?
३- बरे हा लेख वाचला, पण यातून तुम्हाला नेमके काय सांगायचे आहे?
४- आपण अनुवादित केलेला हा उतारा मूळ पुस्तकात कितव्या पानावर आहे?
पाचवा प्रश्न थोडा व्यक्तीगत आहे, तो व्यक्तीगत निरोपातून विचारेन.
राधिका
उत्तरे
प्र. १ दुसरी भाषा म्हणजे सेकंड लँग्वेज. ३० व्या पानावर मथळा आहे. संस्कृत ऍज सेकंड लँग्वेजः लिव्हिंग ऑर डेड - त्याचे शीर्षकात भाषांतर केले आहे.
प्र.२. भूतकाळी रूपे वापरली आहेत कारण मूळ लेखकाने तशी वापरली आहेत.
प्र. ३ भाषाशास्त्रीयदृष्ट्या एखादी भाषा जिवंत किंवा मृत असते म्हणजे नेमके काय असते हे समजावून घ्यायचा हा प्रयत्न आहे. तुमच्या आणि धनंजयांच्या पूर्वीच्या लेखनातून कसलाही खुलासा झाला नाही. आपण ज्याचा संदर्भ दिला होता तो शेल्डन पोलॉक यांचा लेख, त्याची सुरूवातच भाजप, विहिंप यांच्या निंदेने केल्याने, एक प्रकारचा राजकीय अजेंडा पुढे ठेवून लिहिल्यासारखा एकांगी वाटला, पटला नाही. त्यामुळे स्वतंत्रपणे शोध घेतला असता माधव देशपांड्यांच्या पुस्तकाचा दुवा मिळाला. त्यात त्यांनी कोणालाही समजेल इतक्या सोप्या भाषेत जिवंत - मृत भाषांविषयी चर्चा केली आहे असे वाटल्याने त्यातल्या योग्य वाटलेल्या भागाचे भाषांतर केले. यापेक्षा जास्त मला काही सांगायचे नाही.
प्र. ४ उत्तर आधीच दिले आहे.
प्र. ५ उत्तर व्यनिने
विनायक
उत्तर
प्रश्न क्र. ४ -
३० व्या पानावर असलेला परिच्छेद वाचावा. बाकी प्रश्नांची उत्तरे मिळावीत अशी अपेक्षा आहे.
भाषांतरात चुका असणे शक्य आहे. त्याबद्दल माफी मागून ठेवतो.
विनायक
नाही हो
आम्हाला नीट उकल करून सांगितल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे कळत नाहीत. कृपया नीट उकल करून उत्तरे सांगा.
राधिका
अवांतर
संस्कृत जिवंत की मृत या चर्चेबरोबर संस्कृत भाषा प्रेमींनी वेळ मिळेल तेव्हा मराठी विकिपीडियात संस्कृत भाषा या विषयात भर घालावी किंवा या लेखाचा मराठी अनुवाद करुन मराठी विकिपीडिया समृद्ध करण्यास हातभार लावावा असे वाटते. संस्कृतभाषा प्रचार प्रसाराच्या कार्याचा आनंदही मिळेल नाही का !
-दिलीप बिरुटे
[संस्कृत जीवंत की मृत यावर वैचारिक मारामा-याचा मूड नसलेला]
मराठी, गुजराती, कोंकणी वगैरे हीच लोकांत न-गोठलेली रूपे होत
माधव देशपांडे यांचे पुस्तक मला फार उपयोगी पडले. गूगल दुव्यावर काही थोडीच पाने मोफत दिसतात. ज्यांना विषयाबद्दल कुतूहल आहे त्यांनी जरूर विकत घेण्यासारखे पुस्तक आहे.
विनायक उद्धरण करतात त्या लेखाचे नाव असे -
"लोक - पतञ्जलिच्या काळातले भाषाशास्त्रीय जग"
अर्थातच लेख पतंजलीच्या काळातले वर्णन त्या काळातले संदर्भ घेऊन करत आहेत.
खुद्द पतंजलीच्या काळात प्राकृत-मातृभाषा बोलणारे लोक व्याकरण न शिकता ऐकीव कौशल्य प्राप्त करत, ही बाब प्राध्यापक देशपांडे सप्रमाण दाखवतात.
(अशाच प्रकारचा युक्तिवाद प्रमाण-मराठी-बोली बद्दल मी केलेला आहे, तेही व्याकरणमहाभाष्याचे निमित्त करूनच. महाराष्ट्रातले बहुतेक लोक प्रमाणावेगळी कुठली मातृबोली बोलतात, पण मराठी प्रमाण-बोलीचे व्याकरण न शिकताही आत्मविश्वासाने मराठी प्रमाण बोली बोलतात-लिहितात.)
न-गोठलेल्या व्याकरण-निरपेक्ष संस्कृत-संबंधित "प्रमाण" लोकबोलींचा इतिहास असा : आजकाल भारतात मराठी, हिंदी, गुजराती, कोंकणी वगैरे नावांनी असे बोलणे आपल्याला दररोज ऐकू येते, वाचनात येते.
जर येथील लेखाचे शीर्षक "पतंजलीच्या काळात दुसरी भाषा म्हणून संस्कृत जिवंत की मृत? प्रा. माधव देशपांडे यांचे मत" असे असते, तर ते अधिक सुस्पष्ट आणि नेमके झाले असते.
भाषांतराच्या आदल्या प्रास्ताविकाच्या परिच्छेदातही प्रा. देशपांडे यांचे मत सद्यस्थितीबद्दल आहे, असा काहीसा गैरसमज होऊ शकतो. तो गैरसमज टळला असता.
लेख
माझ्या माहितीत आपली मातृभाषा सोडून साधारणपणे इंग्रजी, हिंदी , स्पॅनिश या भाषेत बोलणारे लोक आहेत पण घरी / मित्रमंडळीत संस्कृत बोलणारे कोणी पाहण्यात नाही. संस्कृत आजही शाळेत शिकवतात, मुले तो विषय घेतात. माझाही होता. पण पुढे त्यात लेखन वाचन करणार्यांची संख्या मर्यादित राहते असा माझा अनुभव आहे.
हा अनुवाद वाचून दुसरी भाषा म्हणून पूर्णपणे मृत नाही आणि जिवंत पण नाही असे मला वाटले. या प्रश्नाचे याचे हो किंवा नाही असे एकच उत्तर द्यायचे झाले तर काय देणार?
नक्की काय म्हणायचे आहे ते समजले नाही. पूर्ण माहिती मिळाली नाही. पण त्या पुस्तकात या मुद्द्यावर सखोल विवेचन असावे. असे वाटते. धनंजय यांनी पूर्ण पुस्तक वाचले असेल तर त्यांनी त्यांचा नेमका मुद्दा आणखी सोप्या भाषेत सांगावा अशी विनंती.
या लेखाला प्रतिसाद देणारे राजीव आणि राधिका हे सुद्धा यात मदत करू शकतील.
मठूर
मठूर हे केवळ एकच गाव आहे का जिथे सर्वजण संस्कृत मधे बोलतात (आणि सर्व गावकरी खर्या अर्थाने "सुसंस्कृत" आहेत् :) ) ?
त्यावरील बजाजची ही मस्त जाहीरात मला वाटते मी आधीपण दिली होती.
माधव देशपांडे यांची व्याख्या
माधव देशपांडे अशी काही व्याख्या करतात :
prescriptive grammar-independent existence
उपदेश म्हणून शिकवलेल्या व्याकरणाच्या (prescriptive grammar) पेक्षा स्वतंत्र भाषेचे अस्तित्व.
"अस्तित्व" म्हणजे वापर असे प्रा. देशपांडे यांच्या लेखातून दिसते. पतंजली आणि कात्यायन "अमुक प्रयोग योग्य की नाही" हे कसे ठरवत? आपल्या स्वतःच्या आणि अन्य शिष्टसमाजाच्या बोलण्यातून. "शिष्टसमाजात बोलले जाते ते योग्य आणि व्याकरणाचे नियम हे त्यावेगळे असले, तर नियम बदलले पाहिजेत" असा आत्मविश्वास त्यांच्यात होता. अर्थातच "योग्य प्रयोग" हा नियमांमधून कळत नव्हता, तर उपयोगामधून कळत होता. म्हणजे उपयोग नियमांपासून स्वतंत्र होता.
याचे अद्ययावत उदाहरण : आज मला मराठी प्रयोग कसा असावा अशी काही शंका असली तर मी "गुंजीकरांनी काय नियम सांगितला", किंवा "तर्खडकरांनी काय नियम सांगितला" हे चरम प्रमाण मानत नाही. आजूबाजूचे लोक आत्मविश्वासाने काय बोलतात, ते ऐकतो. तसे बोलतो. मग तर्खडकरांनी काही वेगळे सांगितले असेल, तर ते बाजूला ठेवतो.
पतंजलीच्या काळात मातृभाषा म्हणून शिष्ट लोकही प्राकृत शिकत होते, म्हणून संस्कृत ही त्या काळची "प्रथम भाषा नाही", याबद्दल प्रा. देशपांडे साउथवर्थशी सहमत आहेत. त्या काळात तरुण वयात ब्राह्मण संस्कृत शिकत होते, आणि व्याकरणाच्या नियमांशिवाय "नियमापेक्षाही आमचे बोलणेच प्रमाण" अशा प्रकारचा आत्मविश्वास त्या काळात शिष्ट लोकांत होता. या अर्थाने पतंजलीच्या काळात prescriptive grammar-independent existence या निकषावर संस्कृत द्वितीय-शिकलेली भाषा म्हणून जिवंत होती.
या लेखात तरी विनायक यांनी "हल्लीच्या काळात" या निकषावर संस्कृत भाषा तपासलेली नाही. त्यामुळे त्यांना या विषयावर चर्चा हवी आहे की नाही, हे मला माहीत नाही. परंतु वर एका प्रतिसादात विनायक यांनी माझ्या नावाचा उल्लेख एका चर्चेच्या संदर्भात केला, ती चर्चा हल्लीच्या काळाच्या बाबतीत होती. म्हणून पुढील स्पष्टीकरण.
घरी, शिष्टसमाजात लोकांत संस्कृत बोलताना/श्लोक म्हणताना वगैरे अपाणिनीय प्रयोग आपण सर्वांनी ऐकले आहेतच. माझ्या स्वतःच्या बाबतीत किंवा माझ्या कुठल्याही गुरुजनांचा स्वतःच्या बाबतीत असा आत्मविश्वास नाही "आम्ही आमच्या शिष्टसमाजात ऐकले ते संस्कृत प्रयोग पाणिनीपेक्षा प्रमाण". त्यावरून पाणिनीचे नियम सुधारायला मी किंवा माझे कुठलेही गुरुजन धजावणार नाही.
(इतकेच काय खुद्द शंकराचार्यही पाणिनीय प्रयोगच शुद्ध मानत, अपाणिनीय प्रयोग फक्त ऋषींनाच करता येत असे मानत असे दिसते - आणि ही बाब १०००-१५०० वर्षांपूर्वी भारत विंचरून काढलेल्या या प्रकांडपंडिताची!)
उलट अशी कुठली माझी अपाणिनीय चूक लक्षात आणून दिल्यास मी लक्षपूर्वक माझे बोलणे बदलतो. याला prescriptive grammar-dependent existence म्हणावे. प्रा. देशपांडे यांच्या निकषावर द्वितीय भाषा म्हणून हल्लीच्या काळात, मठूरबाहेर (म्हणजे महाराष्ट्रात) संस्कृत "जिवंत" म्हणून उतरत नाही.
विकास यांनी दिलेल्या दुचाकीच्या जाहिरातीत मठूर येथले काही उच्चार अपाणिनीय दिसतात. ते ऐकले म्हणून मी काही पाणिनीचे नियम सुधारायला निघालो नाही. (पण कात्यायन-पतंजलींच्या काळात लोकांचे ऐकून कात्यायन-पतंजलींनी पाणिनीचे नियम सुधारलेत.)
मात्र त्या काळापासून आतापर्यंत प्रवाह पावलेल्या काही बोलण्याबद्दल मला तसा आत्मविश्वास आहे. पण त्याला "मराठी", "हिंदी", "कोंकणी" वगैरे म्हणायची पद्धत आहे, ती मला सोयीची वाटते. इतकेच काय ज्ञानेश्वरांनीही या लोकांनी-बदललेल्या प्रवाहाला संस्कृतावेगळे मानले, "मराठी" नावाने उल्लेख केला. म्हणजे हे वेगळे नाव द्यायची सोय शेकडो वर्षांपासून जाणवते आहे.
व्याख्येचा प्रश्न आहे.
१. "कुठेतरी कोणीतरी बोलते" व्याख्येत मठूर पुरते. या व्याख्येने जिवंत आहे.
२. "कोणीतरी प्राथमिक भाषा म्हणून बोलते" व्याखेत बहुधा मठूर पुरत नाही - (त्यांच्या संस्कृत उच्चारांना कर्नाटकी हेल आहे. बहुधा कुठलीतरी आधुनिक कर्नाटकी भाषा त्यांची प्राथमिक भाषा असावी.) या व्याखेने जिवंत नाही.
३. "कोणीतरी द्वितीय-शिकलेली भाषा म्हणून व्याकरणाशिवाय आत्मविश्वासाने बोलते." हे अखिल भारतातील संस्कृत-शिकलेल्या शिष्टसमाजाबद्दल खरे नाही. या व्याखेने अखिल भारतात जिवंत नाही.
- - -
या वेगवेगळ्या व्याख्यांनी करायचे काय? सर्व काही प्रत्यक्ष उपयोगावर अवलंबून आहे.
व्याख्या १. संस्कृत शिकून मला मठूर येथे जाऊन राहायचे असेल, तर ती जिवंत भाषा म्हणावी लागेल. आणि पाणिनी, कालिदास वगैरेंचे प्रयोग बाजूला ठेवून मठूरकरांचे प्रयोग प्रमाण मानावे लागतील. यात काहीच चूक नाही, (पण मला रस नाही).
व्याख्या २. संस्कृत प्राथमिक भाषा जर कोणाची असेल, तर त्यांना मराठी, कन्नड वगैरे शिकणे जाचक होईल. सरकारी अर्ज भरणे जाचक होईल. असे लोक कुठे राहात असतील, तर सरकारी कार्यालयात संस्कृतात अर्ज भरण्याची मुभा देणे लोकशाहीला साजेसे आहे. (पण महाराष्ट्रात संस्कृतात अर्ज छापायची गरज नाही, असे मला वाटते.)
व्याख्या ३. मला संस्कृतातील समृद्ध वाङ्मय अभ्यासायचे असेल, तर त्या काळचेच प्रयोग प्रमाण मानून त्या काळच्या व्याकरणाच्या नियमांप्रमाणे मला भाषा शिकावी लागेल. यात मला सर्वाधिक रस आहे. आणि महाराष्ट्रातील किंवा गोव्यातील शाळां-कॉलेजांमध्ये हेच समृद्ध संस्कृत वाङ्मय (विद्यार्थ्यास रस असल्यास) शिकवावे, असे एक नागरिक म्हणून मला वाटते.
म्हणून "मठूरमध्ये जिवंत म्हणून जिवंत" या मर्यादित उपयोगाच्या व्याख्येपेक्षा "पूर्वीच्या काळची समृद्ध म्हणून त्या काळची शिकण्यायोग्य भाषा" (आता जिवंत नाही असे म्हटले तर चालेल) या व्याखेचा मला अधिक उपयोग आहे.
- - -
विनायक यांनी प्रा. देशपांडे यांच्या व्याखेचा सद्यस्थितीकरिता कसा उपयोग केला हे त्यांनी जरूर सांगावे.
प्रतिसाद
व्याख्येचा प्रश्न आहे.
१. "कुठेतरी कोणीतरी बोलते" व्याख्येत मठूर पुरते. या व्याख्येने जिवंत आहे.
संस्कृत जिवंत आहे म्हणताना ही व्याख्या मनात होतीच.
२. "कोणीतरी प्राथमिक भाषा म्हणून बोलते" व्याखेत बहुधा मठूर पुरत नाही - (त्यांच्या संस्कृत उच्चारांना कर्नाटकी हेल आहे. बहुधा कुठलीतरी आधुनिक कर्नाटकी भाषा त्यांची प्राथमिक भाषा असावी.) या व्याखेने जिवंत नाही.
बहुधा प्राथमिक भाषा म्हणून भारतात संस्कृत बोलत नसावे. माधव देशपांड्यांच्या लेखात याचा उल्लेख आहेच. त्यामुळे वरील वाक्याशी सहमत आहे.
३. "कोणीतरी द्वितीय-शिकलेली भाषा म्हणून व्याकरणाशिवाय आत्मविश्वासाने बोलते." हे अखिल भारतातील संस्कृत-शिकलेल्या शिष्टसमाजाबद्दल खरे नाही. या व्याखेने अखिल भारतात जिवंत नाही.
या व्याख्या मान्य आहे. पण आपण काढलेला निष्कर्ष मान्य नाही. "संस्कृत - भारती "संस्था भारतभरातल्या लोकांना व्याकरणाशिवाय संस्कृत भाषा आत्मविश्वासाने बोलायला शिकवते. इथले संस्कृत प्रसारक त्याबद्दल जास्त माहिती देऊ शकतील. आतापर्यंत २० लाख लोक या पद्धतीने बोलायला शिकले असा दावा ते करतात. आकडा जरी अतिरंजित मानला तरी नेमका आकडा किती असला तर संस्कृत जिवंत समजायची आणि त्यापेक्षा कमी असेल तर मृत समजायची याबद्दल काही निकष असल्यास सांगावे.
या वेगवेगळ्या व्याख्यांनी करायचे काय? सर्व काही प्रत्यक्ष उपयोगावर अवलंबून आहे.
व्याख्या १. संस्कृत शिकून मला मठूर येथे जाऊन राहायचे असेल, तर ती जिवंत भाषा म्हणावी लागेल. आणि पाणिनी, कालिदास वगैरेंचे प्रयोग बाजूला ठेवून मठूरकरांचे प्रयोग प्रमाण मानावे लागतील. यात काहीच चूक नाही, (पण मला रस नाही).
आज मला इटली, फ्रान्स वगैरे देशांमध्ये जाऊन राहायचे नाही. मग या भाषा मी मृत समजाव्यात का? या न्यायाने मला येत असलेल्या हिंदी, मराठी आणि इंग्रजी व्यतिरिक्त सर्व भाषा मृत ठरतील.
व्याख्या २. संस्कृत प्राथमिक भाषा जर कोणाची असेल, तर त्यांना मराठी, कन्नड वगैरे शिकणे जाचक होईल. सरकारी अर्ज भरणे जाचक होईल. असे लोक कुठे राहात असतील, तर सरकारी कार्यालयात संस्कृतात अर्ज भरण्याची मुभा देणे लोकशाहीला साजेसे आहे. (पण महाराष्ट्रात संस्कृतात अर्ज छापायची गरज नाही, असे मला वाटते.)
संस्कृत कोणाचीही प्राथमिक भाषा नाही यावर सहमत असल्याने वरील चर्चा "हायपोथिटिकल" सदरात जमा. मला त्यात रस नाही.
व्याख्या ३. मला संस्कृतातील समृद्ध वाङ्मय अभ्यासायचे असेल, तर त्या काळचेच प्रयोग प्रमाण मानून त्या काळच्या व्याकरणाच्या नियमांप्रमाणे मला भाषा शिकावी लागेल. यात मला सर्वाधिक रस आहे. आणि महाराष्ट्रातील किंवा गोव्यातील शाळां-कॉलेजांमध्ये हेच समृद्ध संस्कृत वाङ्मय (विद्यार्थ्यास रस असल्यास) शिकवावे, असे एक नागरिक म्हणून मला वाटते.
आज मी व्याकरणाशिवाय आईवडिलांचे ऐकून मराठी शिकलो तरी शाळेत मला व्याकरणाच्या नियमाप्रमाणे मराठी शिकायलाच लागते. इतकेच नव्हे तर मराठीच असलो तरी ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानेश्वरांची "पूर्णपणे निराळी भाषा आहे" असे वाटणारी शब्दकळा आणि व्याकरण शिकावेच लागले. त्याने मराठी जिवंत भाषा असण्यात अंतर पडत नाही असे वाटते.
म्हणून "मठूरमध्ये जिवंत म्हणून जिवंत" या मर्यादित उपयोगाच्या व्याख्येपेक्षा "पूर्वीच्या काळची समृद्ध म्हणून त्या काळची शिकण्यायोग्य भाषा" (आता जिवंत नाही असे म्हटले तर चालेल) या व्याखेचा मला अधिक उपयोग आहे.
इथे मतभेद आहे. अन्य एका संकेतस्थळावर त्याच्या मालकांनी
आज व्यवहारात संस्कृत भाषेचा मला कुठेच वापर होतांना दिसत नाही.. संस्कृत ही भारतीय भाषा आहे. परंतु भारतातल्या मुंबई, दिल्ली, कलकत्ता, लखनऊ, हैद्राबाद, जयपूर, कोल्हापूर, इत्यादी अनेक शहरातून मी वावरलो आहे परंतु आजतागायत मला यापैकी कुठल्याही ठिकाणी संस्कृत भाषेचा रोजच्या दैनंदिन व्यवहारात उपयोग होतांना आढळला नाही. असे का बरे?
असा युक्तिवाद "संस्कृत मृत आहे" हे सिद्ध करण्यासाठी केल्यावर त्यावर आपण
१) व्यवहारात तिचा नित्यनियमित वापर.
(येथे व्यवहार म्हणजे माणसा-माणसांतला व्यवहार असे गृहीत धरले आहे.) बहुतेक होत नसावा. कर्नाटकात मठूर नावाचे अग्रहार आहे (खेडे), तिथे दैनंदिन बोलचालीसाठी संस्कृतचा व्यवहार होतो, असे ऐकून आहे.
असे लिहून मर्यादित प्रमाणावर का होईना वापर होत असल्याने "ती मृत नाही" असा अर्थ ध्वनित केला होतात. "संस्कृत बोलणारे कमी आहेत" यावर "गोंड, कोर्कू वगैरे भाषा बोलणारेही कमीच आहेत" असे लिहिले होते. पुढे तर स्पष्टच लिहिले होते.
(मिसळपावाबाहेरच्या आयुष्यात मात्र "अमुक भाषा मृत आहे" असे मी म्हणणार नाही. फारतर "अमुक भाषेवर सरकारी पैसे खर्च करताना व्यवहारातील फायदे-तोटे बघा" एवढेच म्हणेन. वैयक्तिक पैसे कोणी कितीही खर्च करावेत - मला त्याचे काही नाही.)
असे असताना "(आता जिवंत नाही म्हटले तरी चालेल)" असे हृदयपरिवर्तन नेमके कशाने झाले? हे त्यावेळी तिथे लिहिले असते तर तिथल्या मालकांनी आनंदाने मिठीच नसती का मारली? तिथले मालक वेगळे काय म्हणत होते? की तिथे संस्कृतबद्दलच्या तळमळीने मालकांशी वाद घातला आणि त्याचवेळी इथे "संस्कृत मृत आहे" असे म्हणणार्या विदुषींशी सहमती दाखवली, त्याबद्दल मी बर्याच उशीराने जाहीर प्रश्न विचारल्याने मृत असण्याशी सहमतीबद्दल आता घाईघाईने स्पष्टीकरण तयार करून दिले?
विनायक
दुसर्या संकेतस्थळावर आपण आणि तिथले मालक यांच्यातील संवाद खालील दुव्यावर वाचता येतील.
संस्कृत मृत भाषा समजावी काय?
- - -
मतपरिपर्तन
१. "आता जिवंत नाही म्हटले तरी चालेल" म्हणजे "दुसर्या कोणाने या व्याख्येनुसार जिवंत नाही असे म्हटले, तर मी खंडन करणार नाही"
आणि
२. मिसळपावाबाहेरच्या आयुष्यात मात्र "अमुक भाषा मृत आहे" असे मी म्हणणार नाही. (येथे "स्वतःहून म्हणणार नाही" असे स्पष्ट अध्याहृत आहे.)
मला तर काहीही परस्परविरोध दिसत नाही.
वरील दोन वाक्यांत अध्याहृते संदर्भाशिवायही स्पष्ट आहेत, संदर्भ त्या-त्या चर्चेत स्पष्ट आहेत. माझे कुठलेतरी मतपरिवर्तन इथे सिद्ध करण्याचा अट्टाहास का होत आहे, हेच मला कळत नाही.
"माझे मतपरिवर्तन कधीच होत नाही" असा कुठला हास्यास्पद दावा मी केलेला नाही. सर्व शिक्षण मतपरिवर्तनच असते. उलट स्वतःचे मतमरिपर्तन होऊ देण्यासाठी संवाद साधणे मला फायदेशीर वाटते. संवादातून माझे मतपरिवर्तन झाल्याचा आनंद व्यक्त करणारी माझी वाक्ये तुम्हाला उपक्रमावर सापडतील.
या विवक्षित विषयावरती गेल्या एक-दोन वर्षांत माझे मोठ्या प्रमाणात मतपरिवर्तन झालेले नाही. या बाबतीत माझी मते (आणि विचारलात तेव्हा शब्दांचा अर्थ व संदर्भ) हे सर्व जमेल तितके समजावून सांगितलेले आहे. मी अर्थ-संदर्भ कधी समजावून सांगितलाच नाही असेच जणू मिसळपावावरचे एक वाक्य आणि येथील एक वाक्य उद्धृत करून, सुस्पष्ट अध्याहृते बळेच न समजून काहीतरी जाब विचारणे - विचारत राहाणे - हा प्रकार मला कोड्यात टाकतो आहे.
(कंत्राटांच्या सुरुवातीला व्याख्यांची कलमे असतात : या कंत्राटामध्ये "प्रथम पक्ष" म्हणजे श्री. क्ष, श्री. य, आणि ट लिमिटेड... "गाव" म्हणजे साखळी ग्रामपंचायत क्षेत्रातील जमीन... कारण दुसर्या कुठल्या कंत्राटात "प्रथम पक्ष" म्हणजे श्री. द, श्री. ह असतात; "गाव" म्हणजे "उसगांव ग्राम पंचायत क्षेत्र असते... कंत्राटांबाहेर असे बोलायची पद्धत नाही, आणि सुस्पष्ट अध्याहृते घालून रोजव्यवहाराची भाषा मी त्रासदायक करून घेणार नाही. जमेल तितके समजावूनही जर कोणी गैरसमज करून घेत असेल, तर काय करू? माझ्या आयुष्यात वेळ मर्यादित आहे.)
काही रोचक चलिच्चित्रे
काही रोचक चलिच्चित्रे
१
आणि
२
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
मिपावरचे खंडन नव्हते?
"आता जिवंत नाही म्हटले तरी चालेल" म्हणजे "दुसर्या कोणाने या व्याख्येनुसार जिवंत नाही असे म्हटले, तर मी खंडन करणार नाही"
मिपाचे मालक "संस्कृत मृत आहे"असे ठासून सांगत असताना आपण जो प्रतिवाद करत होतात ते खंडन नव्हते? तात्या तुम्ही "शब्दच्छल" करीत आहात असेही तिथे म्हणाले होते. जाऊ दे. दोन्ही चित्रे लोकांसमोर आहेत.
विनायक
सिद्ध काय करायचे आहे
मिसळपावावर कुठल्या व्याख्येनुसार मृत घोषणा होत होती? अगदी इथल्या इथे माझ्या प्रतिसादातले उद्धरण करताना, इथलाच संदर्भ सोडून अनर्थ करायचा? हे सगळे करून "धनंजय खोटे बोलतो" हे सिद्ध करायचे आहे का?
हे सिद्ध करून काय विशेष संवाद साधला जातो आहे? संवाद बंद करण्यासाठी ही सिद्धता असेल, तर त्या उद्दिष्ट्यापाशी तुम्ही पोचला आहात.
माझ्याशी संवाद बंद करणे हे उद्दिष्ट्य नसले तर या "संदर्भ सोडून दोन चित्रे बघा" सिद्धतेचे चे प्रयोजन सांगावे. संवाद चालू राहील.
काय राव
धनंजय,
तुमच्यासारख्यांनी (संस्थळावर नियमित येणेजाणे असणार्या एका समतोल माणसाने) असा कोणाबरोबरही (पुर्वोतिहास ज्ञात असूनहि) वाद घालण्यात - विनाकारण स्पष्टीकरणे देण्यात - घालवलेला वेळ बघुन खेद झाला.
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
सहमत आहे
धनंजय,
तुमच्यासारख्यांनी (संस्थळावर नियमित येणेजाणे असणार्या एका समतोल माणसाने) असा कोणाबरोबरही (पुर्वोतिहास ज्ञात असूनहि) वाद घालण्यात - विनाकारण स्पष्टीकरणे देण्यात - घालवलेला वेळ बघुन खेद झाला.
हम्म ! सहमत आहे.
-दिलीप बिरुटे
मिपा आणि उपक्रम भूमिकांमधील विरोधाभास
म्हणून "मठूरमध्ये जिवंत म्हणून जिवंत" या मर्यादित उपयोगाच्या व्याख्येपेक्षा "पूर्वीच्या काळची समृद्ध म्हणून त्या काळची शिकण्यायोग्य भाषा" (आता जिवंत नाही असे म्हटले तर चालेल) या व्याखेचा मला अधिक उपयोग आहे.
आपली मर्यादित उपयोगाची व्याख्या "मठूरमध्ये जिवंत म्हणून जिवंत"
(आता जिवंत नाही असे म्हटले तरी चालेल) असे आपण म्हणता तेव्हा "तिचा जिवंतपणा मठूरपुरताच मर्यादित आहे, मला मठूरमध्ये जाऊन रहायचे असेल तरच संस्कृत शिकण्याचा उपयोग आहे एरवी नाही. मठूरबाहेर संस्कृत जिवंत नाही , मठूर हा भारताचा ०.१% ही भाग नसावा म्हणून ९९.९% भारतात मृत म्हणून अखिल भारतात जिवंत नाही" असा आपल्या म्हणण्याचा अर्थ मी गृहीत धरला आहे. अन्य एका व्याख्येनुसारही अखिल भारतात संस्कृत जिवंत नसल्याचे आपण म्हटले आहे यावरून मी घेतलेला आपल्या म्हणण्याचा अर्थ बरोबर असावा.
मिपावर नेमके याच व्याख्येनुसार विसोबा खेचर युक्तिवाद करत होते.
"मठूरचे नावही मी ऐकले नाही, पण दिल्ली, जयपूर, मुंबई, कलकत्ता वगैरे शहरात संस्कृत बोलताना लोक दिसत नाहीत म्हणून ती मृत आहे" या तात्यांच्या म्हणण्यात आणि आपल्या वरच्या म्हणण्यात साधर्म्य आहे.
"मर्यादित वापर" हा विसोबांचा एक मुद्दा होता. दुसरा म्हणजे संस्कृतच्या बोलीभाषा नाहीत आणि त्यात साहित्यनिर्मिती नाही वगैरे मुद्दे होते ते वेगळे. मुख्य चर्चा वापराच्या मुद्द्यावर होती. वापर मर्यादित असण्यावर आपण आणि विसोबा यांचे एकमत होते. त्यामुळे विसोबा संस्कृतला "मृत" म्हणण्याबद्दल आग्रही होते तर आपण कुठल्याही भाषेला मृत म्हणणार नाही असे लिहिलेत. यावरून विसोबांचा (आणि माझाही) असा समज झाला की आपण विसोबांचे खंडन करत आहात. विसोबांनी आपण शब्दच्छल करता असेही लिहिले. एक गोष्ट प्रामाणिकपणे मान्य केली पाहिजे की तिथे आपण विसोबांना "मी आपल्या बहुतांशी मुद्द्यांशी सहमती व्यक्त केली आहे" असे लिहिले आहे. तरीपण आपण मतभेदाचे छोटे छोटे मुद्दे मांडलेत. त्यावरून विसोबांचा (आणि माझा) असा समज झाला की मुख्य मुद्द्यांबद्दल सहमती असली तरी संस्कृतला "मृत" म्हणण्याबद्दल आपण सहमत नाही, उलटा आपला विरोधच आहे.
त्यामुळे "संस्कृत मृत आहे असे इतर कोणी म्हणाले तर मी त्याचे खंडन करणार नाही" हे वाक्य बरोबर ठरत नाही. आता मी खंडन केले नाही उलट मंडनच केले, विसोबा (आणि मी) मंदबुद्धीचे असल्याने त्यांच्या लक्षात आले नाही असे म्हणायचे असेल तर पुढच्या वेळी खबरदारी घेऊन अगदी मंदबुद्धी मनुष्यालाही समजेल अशा नि:संदिग्ध भाषेत लिहावे म्हणजे विसोबासारख्यांचे (आणि माझ्यासारख्यांचे) गैरसमज होऊन आपण दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या गोष्टी प्रतिपादन करता असे म्हणायला जागा उरणार नाही.
नवा प्रतिसाद.
नवा प्रतिसाद.
नमस्कार,
हा नवा प्रतिसाद आहे. ह्या लेखातील काही प्रतिसाद वर-वर वाचले आहेत, परंतु त्यात उल्लेख आलेले मूळ उपक्रमावरिल तसेच मिसळपावावरिल लेख वाचलेले नाहीत.
खरे पाहता एखादी भाषा जिवंत आहे अथवा नाही ह्यापेक्षा तिचा काही उपयोग आहे काय, असल्यास तो काय अशी चर्चा अभ्यासकांकडून अपेक्षिली जावी. परंतु येथे प्रश्न मांडला गेलाच आहे, तर त्यावर आतापर्यंत न चर्चिला गेलेल्या मुद्द्याकडे लक्ष वेधू इच्छितो.
भारतीय राज्यघटनेने संस्कृत भाषेस अधिकृत भाषेचे अधिष्ठान दिलेले आहे. ह्याचा एक सरळ अर्थ असा, सध्या भारताचे शासन त्या भाषेस मृतभाषा मानित नाही. संस्कृतास अधिकृत भाषा म्हणून अधिष्ठान देतांना मृतभाषेचा प्रश्न येवून वाद झाला होता, त्यावेळी मार्गदर्शक भारतीय भाषाभ्यासकांच्याकडून 'मृतभाषा' ह्या संज्ञेची व्याख्या 'जी भाषा संभाषणस्वरूपात अथवा लेखनस्वरूपात समजणारी कोणी एक व्यक्ती अथवा व्यक्तीसमूह अस्तित्त्वात नाही तिला मृतभाषा म्हणावे' अशी करण्यात आली होती असे भारतीय राज्यघटनेच्या इतिहासात नोंदवलेले आढळेल. जिज्ञासूंनी शोध घ्यावा.
ही व्याख्या आंतरराष्ट्रीय भाषाभ्यासकांनी मान्य केलेल्या व्याख्येपेक्षा निश्चितच भिन्न आहे, तथापि आंतरराष्ट्रीय भाषाभ्यासकांनी व्याख्यानिश्चिती करतांना भारतीय भाषांचा विचार केला होता अथवा नाही हे कळण्यास मार्ग नाही. आंतरराष्ट्रीय भाषाभ्यासकांनी 'मृतभाषा' ह्या संज्ञेची व्याख्या 'ज्या भाषेस मातृभाषा म्हणून बोलणारे कोणीही अस्तित्त्वात नाही ती भाषा मृतभाषा' असे साधारण शब्दांत केली आहे. ही व्याख्या सर्वसमावेशक नाही. ह्याचे कारण असे, की संस्कृत भाषा ही इतिहासकाळी कोणाची मातृभाषा ह्या अर्थाने अस्तित्त्वात नसून ती केवळ ज्ञानभाषा / संपर्कभाषा / शासन, व्यापार इत्यादि व्यवहारोपयोगी भाषा अशा अर्थाने अस्तित्त्वात होती असे म्हणणारा एक मतप्रवाह आहे. अर्थात्, मत्तूर ग्रामाचे (मठूर नव्हे. ते उगीचच 'माठ' म्हटल्यासारखे वाटते!) उदाहरण येथे अभ्यासण्यासारखे आहे. मत्तूरातील लोक संस्कृताचा मातृभाषा म्हणून उपयोग करतांत काय, हे तपासणे त्यासाठी आवश्यक आहे.
तरीही, जोपर्यंत संस्कृतभाषा समजणारे विद्वान अस्तित्त्वात आहेत तोपर्यंत शासन त्या भाषेस अधिकृतरीत्या मृतभाषा मानू शकणार नाही. राज्यघटना तथा अधिनियम हेही त्तिला मृतभाषा मानू शकणार नाहीत. त्यामुळे एखाद्या भाषेस 'ती मृतभाषा आहे' असे जाहिर करणारे विद्वान त्यांचे पुरोगामीत्त्व एकार्थाने सिद्ध करू शकणार नाहीत. काही अभ्यासकांना 'शासन ब्राह्मणांस धार्जिणे आहे, ब्राह्मण्यवादी, मनुवादी, जातीयवादी आहे' इत्यादि आरडा करून शिमगा करता येईल कदाचित; परंतु जोपर्यंत असे अभ्यासक आहेत, तोपर्यंत इतर काही अभ्यासकांना एकाच वेळी अनेक लोकांना खुश करून स्वतःचा "पोलिटिकल करेक्टनेस" अर्थात् दुटप्पी मुत्सद्दीपणा दाखवणे भाग आहे.
अर्थात् ह्यात चूक कोणा एकाची नाही. ह्याचे कारण असे: जोपर्यंत संस्कृतभाषा समजणारे विद्वान अस्तित्त्वात आहेत, तोपर्यंत तिच्या मृततेवर होणारे वाद हे फालतू आहेत.
--
ता.क. प्रतिसाद छापून झाल्यानंतर गूगल् मध्ये शोध घेतला असता लोकसत्ता आज दि. ०१ नोवें २००९ रोजी प्रसिद्ध झालेला एक लेख दिसला. त्या लेखात ती जिवंत भाषा असल्याचे म्हटले आहे. त्याची लिङ्क् येथे देतो आहे.
संस्कृत : जागतिक दर्जाची भाषा - अच्युत राईलकर
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
नकारात्मक प्रतिसाद क्र. १
>>एखादी भाषा जिवंत आहे अथवा नाही ह्यापेक्षा तिचा काही उपयोग आहे काय, असल्यास तो काय अशी चर्चा अभ्यासकांकडून अपेक्षिली जावी.
सहमत आहे. मला असे वाटते संस्कृत भाषेचा इतिहासातील ग्रंथ सोडल्यास आता तिचा उपयोग नाही. ज्या अर्थी नामशेष होत असलेल्या भाषेत प्राण भरण्याचे काम चालू आहे त्या अर्थी शब्दशः नसेल पण ती जवळ जवळ मृतच आहे.
>>संस्कृत भाषा ही इतिहासकाळी कोणाची मातृभाषा ह्या अर्थाने अस्तित्त्वात नसून ती केवळ ज्ञानभाषा / संपर्कभाषा / शासन, व्यापार इत्यादि व्यवहारोपयोगी भाषा अशा अर्थाने अस्तित्त्वात होती असे म्हणणारा एक मतप्रवाह आहे.
संस्कृत भाषा इतिहास काळात बोलल्या जात होती. सामान्य लोकही ती बोलत होते. तिचे स्वरुप बोलीप्रमाणेही होते. शासन,व्यापार, आणि पंडित हे प्रमाण संस्कृत बोलत होते, याचे दाखले भाषाभ्यासक देतात. 'ज्या भाषेस मातृभाषा म्हणून बोलणारे कोणीही अस्तित्त्वात नाही ती भाषा मृतभाषा' ही व्याख्या थोडीशी पटणारी आहे. माझ्या घरात मी संस्कृत (ओढून -ताणून) बोलतो म्हणून ती जीवंत आहे, असे म्हणू नये असे वाटते.
>>संस्कृतभाषा समजणारे विद्वान अस्तित्त्वात आहेत तोपर्यंत शासन त्या भाषेस अधिकृतरीत्या मृतभाषा मानू शकणार नाही. राज्यघटना तथा अधिनियम हेही त्तिला मृतभाषा मानू शकणार नाहीत.
शाळेत, विद्यापीठात, संस्कृत शिकवल्या जाते. पण त्याचा संबंध गुण मिळविणे आणि कुठल्याशा शाळेत, महाविद्यालयात, नौकरी मिळविणे इतका उद्देश सोडला तर, पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थी घरच्या दशम्या बांधून संस्कृत प्रचार-प्रसाराचे काम करतो असे दिसत नाही. किंवा त्याचा त्याला संभाषणासाठी, किंवा आपले दैनंदिन व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्या भाषेचा त्याला पुढे सार्वजनिक जीवनात उपयोग होतो असेही दिसत नाही. केवळ मी संस्कृत शिकलो आहे,मला त्याची ओळख आहे. इथपर्यंत तिचे अस्तित्व असावे. शासनाचे काम भाषेचे संवर्धन करणे आहे त्यासाठी शासन अशा भाषांना अनुदान देते. तेव्हा शासनाचा उद्देश काही तिला राजभाषेचा दर्जा देण्याचा नाही तर अस्तित्व टीकावे यासाठी शासनाचे प्रयत्न चाललेले असतात, असे वाटते. संस्कृत सर्वांची भाषा व्हावी यासाठीचे मी चर्चासत्रे ऐकली आहेत. चर्चासत्रात तेच तेच वक्ते आणि तेच तेच श्रोते तेच तेच व्याख्यानं ऐकतात. संस्कृत भाषा सर्वांची होण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत, यावर काथ्याकूट होतो. आणि ते शासनाचा निधी वाया घालवतात असे माझे मत आहे. त्यामुळे शासनास संस्कृत ही भाषा मृत आहे, असे जाहीर करण्याची गरज नसावी असे वाटते. शासनास जर पटवून दिले की, प्राकृत भाषेतील वैशिष्ट्ये आजच्या भाषेत दिसतात म्हणून प्राकृतलाही जीवंत म्हटले पाहिजे. शासन त्याही भाषेला मृत म्हणनार नाही. 'प्राकृत भाषा विकास आणि संवर्धन' अशा एखाद्या संस्थेला लाखो रुपयांचे अनुदान शासन देईल, आणि आपण म्हणू की शासन ज्या अर्थी प्राकृत भाषेसाठी अनुदान देते त्या अर्थी ती भाषा जीवंत आहे, असा निष्कर्ष काढू. तेव्हा भाषा व्यवहारात शासन काय म्हणते ती गोष्ट मला गौण वाटते.
बाकीचे मुद्दे, जातीविषयक असल्याने त्यावर काही लिहित नाही. भाषेच्या बाबतीतही जातीच्या द्वेषातून प्रतिसाद लिहिल्या जातो असे समज होण्याची शक्यता असते. पण एक उदाहरण पुस्तकातील सांगतो. त्यावरुन मला काय सांगायचे आहे. हे आपल्या ध्यानात यावे.
आणखी एक उदाहरण सांगतो.
''गंगाधर दीक्षित-फडके नावाचे ब्राम्हण पंडित मुंबईमधे १८२० ते १८२५ पर्यंत युरोपियन लोकांना संस्कृत शिकवून उदरनिर्वाह करीत. ते पुण्यात परत गेल्यावर त्यांच्यावर ब्राम्हणांनी बहिष्कार टाकला. ते युरोपियन लोकांच्या पंक्तीस जेवले असावेत असे पुण्यातील लोकांना वाटले. बिचारे गंगाधर पंडित पुढे सन्यासी झाले आणि ब्राम्हणांच्या सोवळ्या जगातून नाहीसे झाले.''२
भाषा व्यवहारासाठी भाषा सर्वांची होणे गरजेचे असते. आमची भाषा-आमची भाषा असे म्हणून ती केवळ एका गटाची भाषा असे झाल्यामुळे, तीची आजची दयनीय अवस्था झाली आहे. ''भाषा वापरणारा प्राणी'' अशी एक माणसाची व्याख्या केली जाते. आणि अशा या भाषेची काही लक्षणे असतात.
१) भाषेत पूर्वी कधी ऐकले नाही किंव स्वतः उच्चारले नाही असे नवे शब्द, नवे वाक्य, नवी रचना, नवे भाषिक प्रयोग आपण करु शकतो. एखाद्या नवीन शब्दाचा उच्चार केल्यावर ऐकणार्याला तो शब्द समजण्यासाठी त्याला काही खास प्रयत्न करावे लागत नाही. त्याचा अर्थ त्याला लगेच समजतो. म्हणजेच व्यक्तीच्या डोक्यात भाषेची एक नियमव्यवस्था तयार होत असते, झालेली असते. एकच आशय व्यक्त करण्यासाठी इष्ट वाटेल ते शब्द वापरून तो नवीन रचना करतो असतो. भाषेच्या निर्मितीशीलतेमुळे भाषेचा व्यवहार अमर्यादित होतो.
२) भाषेत संकेत बदलते असले पाहिजेत, त्यामुळे भाषेत अर्थपरिवर्तन होतात, बदल होतात. जसे 'माझी आज गोची झाली राव'. गोची झाली म्हणजे काय झाले असेल बरे. आणि त्याचा अर्थ थोडा तान दिला की कळतो. गोचीचा अर्थ 'अडचण' असा आहे. आपल्या सभोवतालचा कोणताही नवा अनुभव व्यक्त करायचा असेल तर त्याचे संकेत सहजपणे बदलता आले पाहिजेत. जुने भाषिक संकेत टाकून नवे भाषिक संकेत आले पाहिजेत.
३) भाषेत शब्दांची अदलाबदल होत असते. नवनिर्मित शब्दांची भर जशी भाषेत पडते. तशा अन्य भाषेतून काही शब्दांनी भाषा समृद्ध होत जाते. आदानप्रदान हे भाषेचे वैशिष्टे असते.
४) भाषेचा वारसा, भाषेची परंपरा एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जात असते. भाषा एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जातांना नव-नवीन बदलांसहीत जात असते. तिच्यात काही भर पडत असते. म्हणजे भाषेचा शब्दसंग्रह वाढत जात असतो. ती भाषा समृद्ध होत जाते.
संस्कृत या भाषेवर ती मृत कशी आहे, यावर अनेकदा अनेक प्रतिसाद दिले आहेत. कधी गमतीने तर कधी गंभीर. पण संस्कृत भाषेला वरील कसोट्या लावल्यावर तिच्या मर्यादा लक्षात येतात. त्यामुळे संस्कृतला मृत म्हणनारे वाद फालतू असतील की माहित नाही. पण, इतिहासातील 'एक भाषा' एवढेच तिचे महत्त्व माझ्याजवळ आहे.
संदर्भ : १ आणि २. महात्मा फुले : प्रेरणा व तत्वज्ञान; कै. धनंजय कीर यांच्या लेखातून घेतला आहे.
सदरील पुस्तक म.जोतीबा फुले प्रतिष्ठान डॉ.बा.आ.मराठवाडा विद्यापीठ. औरंगाबाद.यांनी संपादित केले आहे.
- दिलीप बिरुटे
आभार
चर्चेत सकारात्मक भाग घेतल्याबद्दल श्री. धनंजय, श्री. विकास आणि श्री. हैयोहैयैयो यांचे आभार!
विनायक
माझं म्हणणं (पुन्हा एकदा) -
माझं म्हणणं (पुन्हा एकदा) -
कुठल्याही जिवंत भाषेची आपल्याला सर्वसाधारणपणे खालील लक्षणे सांगता येतील..
अ) व्यवहारात तिचा नित्यनियमित वापर.
आज व्यवहारात संस्कृत भाषेचा मला कुठेच वापर होतांना दिसत नाही.. संस्कृत ही भारतीय भाषा आहे. परंतु भारतातल्या मुंबई, दिल्ली, कलकत्ता, लखनऊ, हैद्राबाद, जयपूर, कोल्हापूर, इत्यादी अनेक शहरातून मी वावरलो आहे परंतु आजतागायत मला यापैकी कुठल्याही ठिकाणी संस्कृत भाषेचा रोजच्या दैनंदिन व्यवहारात उपयोग होतांना आढळला नाही. असे का बरे?
ब) बोलीभाषेतील तिचे स्वरूप. जसे मराठीबाबत सांगायचे तर कोकणी, मालवणी, आगरी, खास कोल्हापुरी ढंगाची, माणदेशी इत्यादी.
बोलीभाषा हे माझ्या मते कुठल्याही भाषेचे एक वेगळेच सौंदर्य आहे. तिचा स्वत:चा असा एक खास ढंग आहे, गोडवा आहे. सर्वसाधारण, सामान्य माणसाला भाषेचा बोलीभाषा हा प्रकार वापरायला खूप बरा पडतो. कारण तिथे भाषेचे नियम, व्याकरणाचे नियम आपोआपच थोडे शिथिल झालेले असतात. जसा प्रान्त असतो तशी बोलीभाषा असते. एवढेच नव्हे, तर मुख्य भाषेप्रमाणेच बोलीभाषेतही खूप चांगली निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळेल! जसे एखाद्या चित्रपटातले बोलीभाषेतील गावरान संवाद, गं साजणी..कुन्न्या गावाची.. या सारखी काही फक्कड गाणी इत्यादी..
संस्कृतमध्ये बोलीभाषा हा प्रकार आहे का? असल्यास सर्रास आहे का? नसल्यास बोलीभाषा या भाषेचे सौंदर्य वाढवणार्या प्रकाराला संस्कृत भाषा पारखी कशी राहिली? काय कारणे असावीत?
क) त्या भाषेत होणारी नवनिर्मिती. जसे कथा, कांदंबर्या, कविता, नाटके, चित्रपट, इत्यादी..
आपल्या मायमराठीचे उदाहरण घ्यायचे झाले तर अगदी आजच्या घडीलाही मराठीमध्ये उत्तमोत्तम साहित्य निर्मिती होत आहे. मराठी भाषेत, किंवा हिंदी भाषेत अनेक मंडळी उत्तमोत्तम कथा, कादंबर्या, काव्य, गाणी, नाटके, चित्रपट इत्यादींची निर्मिती करत आहेत. आजच्या घडीला संस्कृत भाषेत मला एकही चित्रपट अथवा नाटक पाहायला मिळत नाही. 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या..' सारखे एखादे तरल गाणे आजतागायत मला संस्कृत भाषेत ऐकायला मिळाले नाही..
का बरे असे?
वरील सर्व पार्श्वभूमीवर आजच्या घडीला संस्कृत भाषा मला कुठेच दिसत नाही. कुणाला दिसल्यास दाखवून द्यावे..
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!