शेअर् बाजरात् गुंतवणूक् करावी काय्?

शेअरबाजारात गुंतवणूक करण्याबाबत
कोणताही व्यवसाय मग तो एकट्याच्या मालकीचा असो किंवा भागीदारीत अथवा मर्यादित कंपनीचे स्वरूपात असो, व्यवसायासाठी भांडवल हे लागतेच. एकट्याच्या मालकीचा असो किंवा भागीदारीतील व्यवसायासाठी भांडवल उभारणीत मर्यादा येतात मात्र जर मोठ्याप्रमाणावर व्यवसाय करावयाचा असेल तर त्यासाठी भांडवली खर्चही मोठा असतो व अशा व्यवसायासाठी शेअर बाजाराचे माध्यमातून आवश्यक तेवढे भांडवल लोकांकडून समभाग विक्री करुन उभारले जाते. अशा कंपनीचे नांवात मर्यादित (लिमिटेड) हा शब्द असतो ज्याचा अर्थ समभागधारकांची आर्थीक जबाबदारी हि त्यानी धारण केलेल्या समभागांपरतीच मर्यादित असते. कंपनीची आर्थीक परिस्थीती भविष्यात कितीही खराब झाली तरी त्यांना त्याव्यतरिक्त अधिक काही रक्कम भरावी लागत नाही. तसेच, जर सर्व नियम व कायदे पाळून केलेल्या व्यवसायामुळे कंपनी आजारी झाली तरी कंपनी संचालकांना अथवा प्रवर्तकाना ते नुकसान भरुन देण्याची जबाबदारी नसते. शेवटी ते समभागधारकांचे एकत्रीत नुकसान असते. तसेच व्यवसायात होणारा फायदा हा सर्व समभाग धारकांचा असतो व तोही त्याने धारण केलेल्या समभापुरताच मर्यादित असतो.
कोणताही व्यवसाय सुरू करताना प्रवर्तक त्याचे स्वत:चे, नातेवाइकांचे व त्याचे परिचीतांकडून भांडवल उभारणी करतो ज्यापोटी या सर्व गुंतवणूकदाराना तो समभागची (शेअर्सची) विक्री करतो. हे सर्वजण त्या कंपनीचे प्रवर्तक असू शकतात. मात्र यानंतर कंपनीचे विस्ताराकरिता जादा भांडवलाची आवश्यकता असेल तर बँकेकडून कर्ज घेण्याचा पर्याय वापरता येतो मात्र अशा कर्जावर ठरावीक दराने व्याज द्यावे लागते व कर्जाचे प्रमाणात कंपनीची मालमत्ता बँकेकडे तारण ठेवावी लागते. मात्र बँक कर्ज देतान कर्ज व भांडवल यांचे प्रमाण विचारात घेऊनच कर्ज देत असते कारण कर्ज व भांडवल यांचे योग्य प्रमाण राखले तरच कंपनी व्यवस्थीत चालू शकते. मात्र जर व्यवसायाला विस्तारीकरणासाठी व खेळत्या भांडवलासाठी जर या पेक्षा अधीक रकमेची गरज असेल तर ती कंपनी जनतेला समभाग खरेदिसाठी आवाहन करुन भांडवल उभारणी करु शकते मात्र यासाठी काही नियम पाळून सेबीकडे भांडवल उभारणीचा प्रस्ताव सादर करून तो योग्य आहे अशी सेबीची खात्री होऊन सेबीने परवानगी दिल्यानंतर आयपीओ (Initial Public Offer) द्वारे प्राथमिक बाजारात समभागांची विक्री केली जाते यासाठी अगोदरच, (समभागाचे दर्शनी मुल्य जरी १ ते १० मध्ये कितीही असले तरी) समभागाचे किमान व कमाल मुल्य (Price Brand) जाहिर केले जाते, त्यासाठी कंपनीची संपूर्ण माहिती असलेले माहितीपत्रक (Offer Document) कंपनीतर्फे जारी केले जाते त्याचा आधार घेऊन सर्वसामान्य जनता, संस्थात्मक गुंतवणूकदार ज्यात म्युच्युअल फंड, विमा कंपन्या, बँका इ., परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors - FII), थेट परदेशी गुंतवणूकदार (Direct Foreign Investors) ते समभाग खरेदी करतात. अशी समभागांची विक्री बाजारात करुन झालेनंतर त्या कंपनीचे बीएसई (Bombay Stock Exchange) अथवा एनएसी (National Stock Exchange) अथवा दोन्ही एक्सचेंजीसवर नोंदणी केली जाते. बाजारातील गुंतवणूकदार सदर समभागाचे त्या कंपनीची, आर्थिक पत, मागे केलेला व्यवसाय, नफ्याची क्षमता, गुंतवणूकीवर भविष्यात मिळणारे परताव्याचा अंदाज वगैर ब-याच बाबी विचारात घेऊन बाजार म्हणजेच गु्तवणूकदार त्या समभागाचे मुल्य ठरवीत असतात आणि म्हणूनच काही वेळा समभागाचे मुल्यांकन जास्त तर काही वेळा कमी झाल्याचे दिसून येते. अशा खरेदी केलेल्या समभागावर किती परतावा मिळेल हे निश्चित नसते. एकदा का समभागांची एक्सचेंजवर नोंदणी झाली कि कोणीही त्यांची क्षणाक्षणाला बदलणारे बाजार भावाने त्याची खरेदि अथवा विक्री करू शकतो. या बाजाराला दुय्यम बाजार असेही संबोधले जाते.
अशाप्रकारे आयपीओ द्वारे भांडवल उभारणी व एक्सचेंजवर नोंदणी करुन झाल्यानंतरही जादा भागभांडवलाची गरज भासल्यास ती कंपनीच्या पुढील भांडवलाची विक्री सेबीचे नियमानुसार एफपीओ (Follow-up Public Offer) द्वारे केली जाते.
सर्व समभागधारक हे त्यानी धारण केलेल्या समभागापुरते कंपनीचे मालक समजले जातात. समभागाचे विक्रीचे माध्यमातून उभारल्या जाणा-या भांडवलासाठी कंपनीला कोणाकडेही व कोणतीही मालमत्ता तारण ठेवावी लागत नाही. कंपनीला भविष्यात होऊ घातलेल्या नफ्या तोट्यावर भरवसा ठेऊन लोक समभाग खरेदि-विक्रीचे व्यवहार करतात.
जर का एखादी कंपनी बंद करण्याचीच वेळ आलीच तर अशावेळी समभाग धारकांचा हक्क हा सर्वात शेवटचा असतो.
अशी जर अनिश्चितता समभागांपासून मिळणारे परताव्यांचे बाबत असेल तर लोक त्याची खरेदी का करत असावेत? याचे कारण म्हणजे खरेदी केलेल्या समभागांवर मिळणारा लाभांश, समभागांचे किंमतीत होणारी संभाव्य वाढ. कंपनीचे एकूण उत्पन्नातून सर्व खर्च आणि सर्व प्रकारचे कर भरल्यानंतर जो निव्वळ नफा उरतो तो सर्व नफा हा समभागधारकांचाच असतो. अशा नफ्यातील काही भाग कंपनी लाभांश (Dividend) म्हणून भागधारकांमध्ये त्यांचे समभागाचे प्रमाणात काही टक्केवारीने वाटला जातो व उर्वरीत नफा हा राखीव निधी म्हणून ठेवला जातो. म्हणजे कंपनीला जेवढा जास्त नफा तेवढा त्या कंपनीचे समभागाचा बाजारभाव जास्त असतो. कारण येथेही अर्थशास्रातील मागणी व पुरवठा हा नियम लागू होतो.
काही वेळा असे वाटते कि काही कंपन्यांचे समभागाचे बाजारमुल्य फारच जास्त आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे समभागांचे बाजारमुल्यावर अनेक बाबींचा परिणाम होत असतो, जसे कि, नफ्याचे प्रमाण, निव्वळ नफ्याचे वाढीचा दर (Profit to Earning Ratio – PE Ratio), ताळेबंद, कर्ज व समभागाचे प्रमाण (Debt Equity Ratio), रोखता (Cash Flow & Liquidity), प्रतीसमभाग परतावा (Earning Per Share – EPS), व्यावसाईक व्यवस्थापन (Professional Management), व्यवहारांची पारदर्शकता (Corporate Governance & Transference), कंपनीचे नांव व बाजारातील पत (Brand Image & Value), कंपनी कोणत्या क्षेत्राशी संबधीत आहे (Sector), उत्पादन व विक्रीपश्चात सेवा (Product & Services), कंपनीचे मालाला बाजारात असलेली मागणी (Demand for product in market), कंपनीच्या भविष्यकालीन योजना (Future Plans), सद्या हातात असणारी मागणी व भविष्यात यऊ घातलेली मागणी (Orders in hand and in process) या व अशा अनेक बाबींवर समभागाचे बाजारमुल्य ठरत असते. याशिवाय देशातील व देशाबाहेरील परिस्थिती व सर्वत्र घडणा-या अनेक घटनांचा अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम कंपनीचे कामगीरीवर पडत असतो व त्याचे पडसाद समभागाचे बाजार मुल्यावर होत असतो. त्यापैकी काही कारणे:
• देशाचे सकल उत्पादन वाढीचा दर (GDP Ratio).
• महागाईचा/चलनवाढीचा दर.
• व्याजदरातील बदल.
• देशाची मुद्रास्थिती – रुपया व अन्य देशांचे चलनाचा विनिमय दर.
• सरकारची स्थिरता, कायदा व सुव्यवस्था, आर्थिक सुधारणांबाबतचे धोरण.
• अतिरेकी कारवाया अथवा युध्दजन्य परिस्थिती.
• परदेशी अर्थसंस्थाची बाजारातील खरेदि-विक्रीची उलाढाल.
• कंपनी ज्या क्षेत्रात काम करत असेल त्या क्षेत्रावर ज्यामुळे अल्प अथवा दिर्घ मुदतीने होणारे परिणाम.
भारतातील व परदेशातीलही पर्वानुभव पहाता जो पर्यंत देशाची अर्थव्यवस्था गतिशील आहे तो पर्यंत चांगल्या कंपन्यांचे समभागांचे किंमतीत दिर्घ मुदतीत भरिव व लक्षणीय वाढ होतच असते. व जर का देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे सुस्त झाली तरच समभागांचे बाजारमुल्यात वाढ होणे थांबू शकते. अधुन-मधुन हे होऊ शकते व होतही असते मात्र जेव्हा शेअर बाजार लुडकतो तेव्हा तर खरी गुंतवणूकीची सुवर्ण संधी असते. कारण जेव्हा परत बाजार सुधारतो तेव्हा असा स्वस्त झालेला समभाग चांगलाच वधारत असतो व मागील सर्व तोटा भरुन काढून तो समभाग गुंतवणूकदाराला भरिव परतावा देत असतो. सर्व जगभर असे दिसून आलेले आहे कि दिर्घ काळात, शेअरबाजारातून सरासरी वार्षीक परताव्याचा दर हा बँक वा अन्य ठेवींवरील व्याज दराचे वाढीपेक्षा कितीतरी अधिक असतो.
मात्र सर्वसामान्य गुंतवणूकदाराने शेअरबाजारात थेट गुंतवणूक करावयाचीच असेल तर केलेली गुंतवणूक दिर्घकाळासाठी विसरून जाण्यासाठीच करावी अन्यथा नियमितपणे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हे केव्हाही फायदेशीरच होते.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तर

शेअर बाजारात गुंतवणुक करावी काय? याचे उत्तर अर्थातच व्यक्ती सापेक्ष आहे. सदानंद ठाकुर या विषयातील तज्ञ आहेत ते धोके फायदे तोटे हे वस्तुनिष्ठपणे सांगु शकतात. शेअर बाजार व ज्योतिष हा विषय आता चांगला मूळ धरु लागला आहे असे आमच्या लक्षात आले आहे कारण दोन्हीत भविष्यातील अनिश्चितता हा भाग समाईक आहे. दोन्ही अनिश्चित गोष्टीसाठी गुंतवणूक हा जुगार आहे. जुगार या शब्दाला एक वाईट छटा असल्याने शेअर बाजाराला जुगार म्हटलेले काही लोकांना आवडत नाही. 'भूत'काळातील 'कामगिरी' यावर 'भविष्या'तील परताव्याचा अंदाज बांधणे यावर हे आधारित आहे. लोक शेअर बाजारात गुंतवणुक करताना फलज्योतिषाचा आधार घेतात का? हा विषय दीर्घकाळ मनात रेंगाळत आहे. अजुन् पुरेशी माहिती मिळाली नाही. कंपनीला व्यक्तीसमान मानुन त्याची स्थापना म्हणजे जन्म असे मानुन त्याची कुंडली तयार केली जाते.
प्रकाश घाटपांडे

चांगली माहीती.

सामान्य गुंतवणुकदाराला जरा त्याचे रिस्क प्रोफाइल म्हणजे काय समजवुन द्या. म्हणजे शेयरबाजारात यायचे का व कसे ह्याचे अजुन चांगले मार्गदर्शन होईल.

 
^ वर