कवी गीतकार २: साहिर
सकारात्मक दृष्टीकोन, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, म्हणजे काय? तर एका तरुणीला तणावाखाली असताना नखे कुरतडण्याची सवय होती. ती जावी म्हणून कुणीतरी तिला योगाभ्यास करण्याचा सल्ला दिला. काही दिवसांनी तिच्या बोटांची न कुरतडलेली नखे पाहून कुणीतरी विचारले की आता ती तुझी सवय गेलेली दिसतेय. त्यावर उदासवाणे हसून ते तरुणी म्हणाली की नाही, पण योग शिकायला लागल्यापासून आता मी पायाची नखे कुरतडते!
विनोद सोडा, पण साहिर लुधियानवी या गुणी गीतकाराच्या बाबतीत आपल्याला असेच काहीसे म्हणता येईल. साहिरच्या स्वभावात त्याच्या वडीलांचे सरंजामी वर्तन (निदा फाजलींच्या शब्दांत ‘फ्यूडल रवैय्या’ (रवैया - काय शब्द आहे!)) आणि त्याच्या आईला त्यांनी दिलेली कनिष्ठ वागणूक यामुळे एक कडवटपणा आणि प्रस्थापितांविरुद्ध बंडाची भावना जन्माला आलेली दिसते. लहानपणीच्या अशा घटनांनी मन करपले जाणे ही काही चांगली गोष्ट नाही, पण यात चांगले बघायचेच झाले तर त्यामुळे साहिरच्या उत्तमोत्तम क्रांतिकारी रचना आपल्याला वाचायला मिळाल्या. स्त्रीचे पुरुषाकडून होणारे शोषण यावर साहिरने लिहिलेल्या या ओळी आजही अंगावर शहारा आणतात….
औरत ने जनम दिया मर्दोंको, मर्दोंने उसे बाजार दिया
जब जी चाहा मसला कुचला, जब जी चाहा दुत्कार दिया
औरत म्हणजे काय? तर एक ऐयाशीची चीज! आणि चीज म्हटले की तिला विकता आणि विकत घेता येते! साहिर म्हणतो…
तुलती है कहीं दीनारोंमें, बिकती है कहीं बाजारोंमें
नंगी नचवाई जाती है, ऐय्याशों के दरबारोंमें
ये वो बेईज्जत चीज है जो, बट जाती है इज्जतदारोंमें
राजपूत स्त्रियांनी आपली इज्जत वाचवण्यासाठी केलेलेया अग्निप्रवेशाचे आपल्याला केवढे कौतुक! पतीच्या चितेवर सती जाणाऱ्या स्त्रीला आपण केवढे महान करुन ठेवले आहे! पण या जिवंत जळण्यातली वेदना कोण लक्षात घेतो?
औरत के जिंदा जलने पर, कुर्बानी और बलिदान कहा
इस्मत के बदले रोटी दी और उसको भी अहसान कहा
(इस्मत म्हणजे अब्रू - धन्यवाद चित्त!)
आणि ही सगळ्या श्रद्धा चुरगाळून टाकणारी, मनाला खोल भेगा पाडणारी ओळ.. कसली नाती घेऊन बसलात? जगात खरं नातं एकच! पुरुष आणि स्त्री… नर आणि मादी.. माणूस आणि पशु यात काय फरक आहे?
औरत संसार की किस्मत है, फिर भी तकदीर की हेटी है
अवतार पयंबर जनती है, फिर भी शैतान की बेटी है
ये वो बदकिस्मत मां है जो, बेटोंकी सेजपे लेटी है (साधना)
म्हणूनच का कुणास ठाऊक, साहिरच्या गीतांमधला दर्द इतर भावनांपेक्षा अधिक प्रभावीपणे उमटलेला दिसतो. अर्थात असे लिहिणे म्हणजे साहिरच्या उत्तुंग प्रतिभेवर अन्याय करण्यासारखे आहे.
इतनी हसीन इतनी जवां रात क्या करें
जागे है कुछ अजीब से जजबात क्या करें
सासों में घुल रही है किसी सास की महक
दामन को छू रहा है कोई हाथ क्या करें (आज और कल)
ही रफीच्या आवाजाने चार चांद लावलेली बेचैनी असो किंवा
तुझमें जो लोच है तेरी तहरीर में नही
जो बात तुझमें है तेरी तसवीर में नही (ताज महल)
ही पुन्हा रफीच्या आवाजातलीच नक्षीदार नजाकत असो, तिथे साहिरच्या लेखणीची आपली एक छाप आहेच, पण
हम गमजदा हैं लाये कहां से खुशी के गीत
देंगे वही जो पायेंगे इस जिंदगी से हम
हे बाकी साहिरचे खास स्वतःचे वाटते!
मैं दूं भी तो क्या दूं ऐ शोख नजारों
ले दे के मेरे पास कुछ आंसू हैं कुछ आहें
असो किंवा
इसको ही जीना कहते है तो यूंही जी लेंगे
उफ न करेंगे लब सी लेंगे आंसू पी लेंगे
गम से अब घबराना कैसा गम सौ बार मिला (प्यासा)
यातला दु:खाच्या अतीव टोचणीतून आलेला कोडगेपणा असो, तिथे साहिर निखाऱ्यासारखा फुलून आलेला दिसतो. ‘प्यासा’ त साहिर
सनसनाहट सी हुई
थरथराट सी हुई
जाग उठे ख्वाब कई
बात कुछ बन ही गयी
किंवा
मोहे अपना बना लो
मेरी बांह पकड
मैं हूं जनम जनम की दासी
मेरी प्यास बुझा दो, मनहर गिरिधर
मैं हूं अंतर्घट तक प्यासी
प्रेम सुधा इतनी बरसा दो
की जग जल थल हो जाये
किंवा
हम आप के कदमों पर गिर जायेंगे रश खा कर
इस पर भी हम अपने आंचल की हवा दे तो
अशा तरल ओळीही लिहितो आणि
ये पुरपेच गलियां, ये बदनाम बाजार
ये गुमनाम राही, ये सिक्कोंकी झनाकार
ये इसमत के सौदे, ये सौदों पे तकरार
जिन्हें नाज है हिंद पर वो कहां है
ये सदियों से बेखौफ सहमी सी गलियां
ये मसली हुई अधखिली जर्द कलियां
ये बिकती हुई खोखली रंगरलियां
जिन्हें नाज है हिंद पर वो कहां है
अशा दुभंगून टाकणाऱ्या ओळीही. यातल्या ‘मसली हुई अधखिली जर्द कलियां’ ने तर मनावर एक न पुसला जाणारा चरचरीत डाग पडतो! ‘जला दो इसे फूंक डालो ये दुनिया, मेरे सामनेसे हटा दो ये दुनिया, तुम्हारी है तुम ही संभालो ये दुनिया….’ हे आक्रंदणारे कविमन ‘प्यासा’ ला आणखी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.
एकीकडे ते तसे तर दुसरीकडे तलतच्या स्वर्गीय आवाजात साहिरच्या अर्थवाही ओळी आहेत…
कही ऐसा न हो पांव मेरे थर्रा जाये
और तेरी मरमरी बाहोंका सहारा न मिले
अश्क बहते रहें खामोशा सियाह रातोंमें
और तेरे रेशमी आंचल का किनारा न मिले (सोने की चिडिया)
काहीकाही गाण्यांचं नशीबच असं असतं की गाणं ‘हिट’ होण्यासाठी आवश्यक सगळं त्यात असूनही ते म्हणावं तितकं लोकप्रिय होत नाही. ‘तराना’ मधल्या ‘नैन मिले नैन हुए बावरे’ चा मी यापूर्वी असाच उल्लेख केला होता. ‘टॅक्सी ड्रायव्हर’ मधलं ‘दिल से मिलाके दिल प्यार कीजिये’ हे असंच एक कमनशिबी गाणं. ‘टॅक्सी ड्रायव्हर’ म्हटलं की लगेच ‘ जाये तो जाये कहां’ गुणगुणावसं वाटतं. ते गाणं थोर आहे याबाबत वादच नाही. पण ‘दिल से मिलाके दिल’ काही कमी गोड नाही. ‘शरमाना कैसा, घबराना कैसा, जीने से पहले मर जाना कैसा’ हे साहिरचे शब्द, लताचा शोख आवाज आणि सचिनदांची नटखट रचना.. क्या कहने!
‘तू मेरे साथ रहेगा मुन्ने’ मध्ये ‘मैं तुझे दूध ना बक्षूंगी तुझे याद रहे’ असले जळते शब्द लिहिणारा साहिर ‘कभी कभी’ मध्ये शायराबाबतचे काय पण आपणा सर्वांबाबतचे एक निष्टुर पण अपरिहार्य सत्य सांगून जातो…
कल और आयेंगे नगमोंकी खिलती कलियां चुननेवाले
मुझसे बेहतर कहनेवाले तुमसे बेहतर सुननेवाले
कल कोई मुझको याद करे क्यूं कोई मुझको याद करे
मसरुफ जमाना मेरे लिये, क्यूं वक्त सुहाँ बरबाद करे
‘हम दोनो’ मधील ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया’ या गाण्याचा रंग काही वेगळाच आहे. ‘हर फिक्र को धुंए मे उडाता चला गया’ ही एखाद्या चित्रासारखी डोळ्यापुढं उभी रहाणारी कल्पना तर
‘गम और खुषी में फर्क न महसूस हो जहां
मैं दिल को उस मुकाम पे लाता चला गया ’ इथं युद्धात सगळ्या भावभावना बेचिराख झालेल्या सैनिकाची मनस्थिती! ‘वो सुबह कभी तो आयेगी’ हा दुर्दम्य आशावाद एकीकडं तर
‘जो भी है वो ठीक है जिक्र क्यूं करें
हम ही सब जहान की फिक्र क्यूं करें
जब उसे ही गम नही क्यूं हमें हो गम (फिर सुबह होगी)
ही बेफिकिरी दुसरीकडं! साहिरच्या लेखणीचे हे रंग थक्क करुन टाकतात.’क्या मिलिये ऐसे लोगोंसे जिनकी फितरत छुपी रहे, नकली चेहरा सामने आये, असली सूरत छुपी रहे’ (इज्जत) असे लोकांच्या दिखाऊपणावर आघात करणारा साहिर ‘ आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू,जो भी है , बस यही इक पल है ’ (वक्त) अशा काव्यमय ओळीही लिहितो आणि ‘दूर रहकर न करो बात करीब आ जाओ, याद रह जायेगी ये रात करीब आ जाओ’(अमानत) असेही. ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’ असं साहिर म्हणतो आणि ‘जहां में ऐसा कौन है के जिस को गम मिला नही’ (हम दोनो) हेही साहिरच म्हणतो! ‘के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिये’ असं साहिर म्हणतो आणि ’मैं जानता हूं की तू गैर है मगर यूंही’ (कभी कभी) हेही साहिरच म्हणतो! ‘उनका भी गम है, अपना भी गम है,अब दिल के बचने की उम्मीद कम है एक कश्ती, सौ तूफां, जाये तो जाये कहां..’ (टॅक्सी ड्रायव्हर) लिहिणाराच साहिर ‘ये शोखियां ये बांकपन, जो तुझमें है, कहीं नहीं’ (वक्त) असंही लिहितो!
आणि ज्या काही गाण्यांच्या उल्लेखाशिवाय साहिरवरचा लेख म्हणचे चुन्यावाचून पान ठरेल त्या गाण्यांपैकी एक म्हणजे ‘ना तो कारवांकी तलाश है’ ही ‘बरसातकी एक रात’ मधली कव्वाली! त्या कव्वालीविषयी लिहायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ती कव्वाली जशीच्या तशी उतरवून काढायची आणि एक सलाम ठोकून बाजूला उभं रहायचं!’मेरे नामुराद जुनून का, है इलाज कोई तो मौत है, जो दवा के नाम पे जहर दे, उसी चारागर की तलाश है’ काय किंवा ‘इश्क मजनू की वो आवाज है जिसके आगे, कोई लैला किसी दीवार से रोकी ना गयी’ काय… हे साहिरनं कोणत्या कैफात लिहिलं कुणास ठाऊक! ‘धूल का फूल’ मधलं ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा’ हेही माझं अत्यंत आवडतं गाणं. कुणाला ते प्रचारकी थाटाचंही वाटेल. वाटू दे! यातल्या किती लोकांना ‘कुरान न हो जिसमें वो मंदिर नही तेरा, गीता न हो जिसमें वो हरम तेरा नही है’ असं लिहिता येईल? यातला साहिरचा प्रस्थापितांविरुद्दचा विखार रफीच्या टिपेल्या पोचलेल्या आवाजात आपल्या आत मृतवत झालेल्या एका माणसाला गदागदा हलवतो…’इन्सानोंके लाशोंसे कफन बेचनेवाले… ये महलोंमें बैठे ये कातिल ये लुटेरे…’
तलतची जशी वाईट गाणी फारच कमी आहेत तसंच साहिरचंही आहे. करपलेलं बालपण, गरीबी, विफल प्रेम, त्या काळात इस्लाममध्ये न स्वीकारला जाणारा नास्तिक स्वभाव, जवळजवळ गर्वाच्या जवळ जाणारा अत्यंत तीव्र स्वाभिमान आणि उणंपुरं साठ वर्षाचं आयुष्य या सगळ्यात साहिर नावाच्या एका जादुगारानं जे काय तयार केलं ते अफलातून आहे. मग हे सगळं बघतानाच आपण सैरभैर होऊन जातो. ‘दिल जो न कह सका’ (भीगी रात), ‘जिसे तू कबूल कर ले ’ (देवदास) -त्यातलं ‘मेरी बेबसी है जाहिर, मेरी आहें बेअसरसी’ हे खास- ‘देखा है जिंदगी को कुछ इतना करीब से’ (एक महल हो सपनोंका), ‘तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही’ (दिल ही तो है), ‘चीन -ओ -अरब हमारा’ (फिर सुबह होगी), ‘तेरी दुनिया में जीने से’ (हाऊस नं ४४), ‘छू लेने दो’ (काजल), ‘चलो इक बार फिर से’ (गुमराह), ‘हम दर्द के मारों का’ (दाग) अशी एकाहून एक रत्नं आठवत जातात. हे सगळं निव्वळ प्रयत्नसाध्य असणं शक्य नाही असं वाटायला लागतं. साहिरनं ज्याला कधी मानलं नाही त्या अल्लाचाच त्याला स्पर्श झाला असावा असं वाटतं!
Comments
वा!
सन्जोप,
तुमचा साहिरवरचा हा लेख आवडला.
वेगवेगळ्या मूड्समधली साहिरची अनेक गाणी सर्वश्रुत आहेतच; पण दोन टोकाच्या मूड्समधली दोन गाणी एकाच चित्रपटात असण्याचा उत्तम दाखला म्हणजे माझ्या मते तरी १९६४ सालचा 'गझल'. लताबाईंच्या आवाजातलं 'नग्मा-ओ-शेर की सौगात किसे पेश करूं' आणि रफीसाहेबांच्या आवाजातलं 'रंग और नूर की बारात किसे पेश करूं'. पहिल्या गाण्यात 'गर्म सासों में छुपे हुए राज' आणि 'शोख आखों के उजाले' आहेत, 'मस्त जुल्फों की रात' आहे; तर दुसर्या गाण्यात 'बेताल्लुकसी मुलाकात' आहे, 'ये मेरे शेर मेरे आखरी नजराने' आहेत. अशी उदाहरणे तशी कमीच असतील, असे मला वाटते.
त्याचबरोबर लक्षात राहणार्या त्याच्या गाण्यांमध्ये 'वक्त' मधलं मन्नादांचं 'ऐ मेरी जोहर जबी' आशाताईंचं 'आगे भी जाने ना तू', 'तुमसा नही देखा' मधलं नय्यरसाहेबांनी चालवेल्या (;))घोड्याच्या टापांच्या संगतीतलं रफीसाहेबांनी गायलेलं शीर्षकगीत, कभी कभी मधलं शीर्षकगीत आणि 'मैं पल दो पल का शायर हूं', 'नया दौर' मधली 'मांग के साथ तुम्हारा मैने मांग लिया संसार','ये देश है वीर जवानों का', 'उडे जब जब जुल्फें तेरी' ....... घ्यावी तितकी नावं कमीच आहेत. असो.
असेच आणखी लेख वाचायला नक्कीच आवडेल.
दिल भर गया !
सन्जोप राव आणि परीवश यांस_
तुम्ही लिहीलेल्या या लेखांनी मन तृप्त पण झाले आणि तुम्ही तहान पण वाढवलित.जो पदार्थ भरपेट खाल्यावर अजून खावासाच वाटतो तो खरा रसना- खेचक [ दिल खेचक टाईप] पदार्थ.
बहोत खूब! धन्यवाद!!
२?
या लेखाचा भाग एक कुठे आहे? उ.सं.डु. की ले.डु.?
भाग १
कवी गीतकार या मालिकेतला पहिला भाग गुलजार यांच्यावर होता. हा दुसरा भाग साहिरवर. उर्जा आणि उत्साह शिल्लक राहिल्यास हिंदी गीतलेखनात मोलाची कामगिरी केलेल्या एकेका शायरावर एक एक भाग लिहिण्याचा मानस आहे.
सन्जोप राव
सुंदर
अतिशय सुंदर
सुंदर लेख.
रावसाहेब .
साहिरवरचा लेख आवडला.
संजोपशेठ,
वा संजोपशेठ, बहोत अच्छा लिखा है..
इसको ही जीना कहते है तो यूंही जी लेंगे
उफ न करेंगे लब सी लेंगे आंसू पी लेंगे
गम से अब घबराना कैसा गम सौ बार मिला (प्यासा)
क्या बात है! फार सुंदर गाणं..
‘हम दोनो’ मधील ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया’ या गाण्याचा रंग काही वेगळाच आहे. ‘हर फिक्र को धुंए मे उडाता चला गया’ ही एखाद्या चित्रासारखी डोळ्यापुढं उभी रहाणारी कल्पना तर
‘गम और खुषी में फर्क न महसूस हो जहां
मैं दिल को उस मुकाम पे लाता चला गया ’ इथं युद्धात सगळ्या भावभावना बेचिराख झालेल्या सैनिकाची मनस्थिती!
वा!
ना तो कारवांकी तलाश है’ ही ‘बरसातकी एक रात’ मधली कव्वाली! त्या कव्वालीविषयी लिहायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ती कव्वाली जशीच्या तशी उतरवून काढायची आणि एक सलाम ठोकून बाजूला उभं रहायचं!
क्या बात है..
रावसाहेब, आपके व्यासंगको मान गये..
तात्या.
व्यासंगाला हिंदी शब्द कोणता असावा बरं? ;)
परखड मत
सन्जोप राव
आपण नेहमीच माझ्या परखड मताचा आदर करता. म्हणूनच ते इथे देतो. लेख अपुरा वाटला. एखाद्या पी. एच. डी. करणार्या विद्यार्थ्याने लिटरेचर रिव्ह्यूच नीट केला नसावा तसे झाले आहे. एकूण ३-४ प्रतिसाद लिहिण्याचा विचार आहे.
पहिल्याने एक दोन चुका झाल्यात ते सांगतो.
दिल जो न कह सका’ (भीगी रात),- हे गाणे साहिरचे नाही. हे अफलातून सुंदर गीत मजरूह ने लिहिले आहे. संगीतकार रोशनमुळे अनेकांचा असा गोंधळ होतो.
हम दर्द के मारों का’ (दाग) - हे गाणे हसरत जयपुरींनी लिहिले आहे. साहिरने नाही. हे गाणे जुन्या "दाग" मधले आहे - गीतकार - शैलेंद्र - हसरत. साहिरने गाणी लिहिलेला "दाग" नवीन आहे.
आणखी कुठली गाणी हवी होती ते प्रथम लिहितो.
१. तुम न जाने किस जहाँ में खो गये - सजा
२. तदबीरसे बिगडी हुई तकदीर बना ले - बाजी
३. चांद मध्यम है आसमाँ चुप है नींद की गोद में ये जहाँ चुप है - रेल्वे प्लॅटफॉर्म
४. बस्ती बस्ती पर्बत पर्बत गाता जाये बंजारा - रेल्वे प्लॅटफॉर्म
५. बहार आयी खिली कलियाँ हँसे तारे चले आओ - अलिफ़ लैला (संगीतकार श्यामसुंदर)
६. पिघला है सोना दूर गगन में फैल रहे है श्याम के साये - जाल
७. ये रात ये चाँदनी फिर कहाँ सुन जा दिल की दास्ताँ - जाल
८. वो देखे तो उनकी इनायत ना देखे तो रोना क्या, जो दिल गैर का हो उस दिल का होना क्या और न होना क्या - फंटुश (दुखी मन मेरे - अगदीच सुमार आहे यापुढे)
९. फैली हुई है सपनों की बाहे आजा चल दे कहीं दूर वहीं मेरी मंज़िल वही तेरी राहे - घर नं ४४ (अति सुंदर गीत)
१०. साजन बिन नींद न आए बिरह सतावे - मुनीमजी (यात शैलेंद्र व साहिर दोघांची गाणी आहेत आणि हे गाणे शैलीवरून हे शैलेंद्रने लिहिले असावे असा माझा ठाम समज आहे. पण ऑफिशियली साहिरने लिहिले आहे)
११. जीवन के सफर मे राही - मुनीमजी
१२. सुरमयी रात ढलती जाती है रूह गम से पिघलती जाती है, अब तेरा इंतजार कौन करे - जोरू का भाई (तलत, संगीतकार - जयदेव)
१३.सुबह का इंतजार कौन करे - जोरू का भाई (लता)
१४. इंतजार और अभी और अभी और अभी - चार दिल चार राहे (लता, संगीतकार अनिल बिस्वास)
१५. कभी तो सुध लेता जा मोरे बलमा - चार दिल चार राहे (मीना कपूर)
१६. मुहब्बत तर्क की मैने गरेबाँ सी लिया मैने - दो राहा (संगीतकार - अनिल बिस्वास)अनेकांच्या मते हे तलत चे सर्वोत्कृष्ट गीत आहे.
१६. कश्ती का खामोश सफ़र है शाम भी है तनहाई भी दूर किनारे पर बजती है लहरोंकी शहनाई भी आज मुझे कुछ कहना है - गर्ल फ़्रेंड (संगीतकार - हेमंतकुमार)
१७. उम्र हुई तुम से मिले फिर भी जाने क्यूँ ऐसे लगे जैसे पहली बार मिले हम - बहुरानी (संगीतकार - सी. रामचंद्र)
१८. आसमाँ पे है खुदा और जमीं पे हम आजकल वो इस तरफ़ देखता है कम - फिर सुबह होगी
१९. फिर ना कीजे मेरी गुस्ताख निगाही का गिला देखिये आप ने फिर प्यार से देखा मुझ को - फिर सुबह होगी
२०. दो कलियाँ बचपन की - फिर सुबह होगी
२१. वो सुबह कभी तो आएगी - फिर सुबह होगी
२२. जो "बोर" करे यार को उस प्यारसे तौबा - फिर सुबह होगी (एक धमाल विनोदी कव्वाली)
२३. तुम चली जाओगी परछाईयाँ रह जाएगी कुछ ना कुछ हुस्न की रानाईयाँ रह जाएगी - शगुन
२४. तुम अपना रंजो गम - शगुन
२५. बुझा दिये है खुद अपने हाथो मुहब्बतों के दिये जला के - शगुन
२६. जिंदगी जुल्म सही जब्र सही गम ही दिल की परियाद सही रूह का मातम ही सही... हम ने हर हाल में जीने की कसम खायी है - शगुन
२७. पर्वतोंके पेडों पर शाम का बसेरा है - शगुन
२८. ये पर्बतोंके दायरे ये शाम का धुआँ ऐसे में क्यूँ न छेड दे दिलों की दास्ताँ - वासना (संगीतकार चित्रगुप्त)
२९. अश्कोंमें जो पाया है वो गीतोंमें दिया है उस पर भी सुना है के जमाने को गिला है - चाँदी की दीवार
३०. अब कोई गुलशन ना उजडे अब वतन आज़ाद है - मुझे जीने दो
३१. रात भी है कुछ भीगी भीगी चाँद भी है कुछ मध्यम मध्यम - मुझे जीने दो
३२. नदी नाले न जाओ श्याम तोरे पैया पडूं - मुझे जीने दो
३३. माँग में भर ले रंग सखी री आँचल भर दे तारे मीलन रितु आ गयी- मुझे जीने दो
३४.यहाँ तो हर चीज बिकती है बाबुजी तुम क्या क्या खरीदोगे - साधना
३५. मितवा, मितवा, लागी रे कैसी ये अनबुझ आग - देवदास
३६. किस को खबर थी ऐसे भी दिन आएंगे - देवदास
३७. आन मिलो आन मिलो श्याम साँवरे - देवदास
३८. मैने चाँद और सितारोंकी तमन्ना की थी मुझ को रातोंकी सियाही के सिवा कुछ ना मिला - चंद्रकांता (संगीतकार - एन. दत्ता)
३९. जब भी जी चाहे नयी दुनिया बसा लेते है लोग एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग - दाग
४०.मायूस तो हूँ वादेसे तेरे, मैं अपने खयालोंके सदपे तू पास नहीं और पास भी है - बरसात की रात (या चित्रपटातील माझे अत्यंत आवडीचे गाणे)
४१. मैंने शायद तुम्हे पहले भी कहीं देखा है - बरसात की रात
४२. जिंदगी भर नहीं भूलेगी वो बरसात की रात
४३. गरजत बरसत सावन आयो रे - बरसात की रात (साधारण अशाच मुखड्याचे गीत रोशनच्या "मल्हार" मध्ये लताने गायले आहे. "गरजत बरसत भीगत आईलो" ती पारंपारिक रचना आहे, मला ती जास्त आवडते)
४४. ऐसी खुशी लेके आया चाँद - बरसात की रात
४५. मेरे साथी खाली जाम, तुम आबाद घरोंके वासी मैं आवारा बदनाम - दूज का चाँद (रोशन)
४६. गीत मेरा सुलाए जगाए तुझे प्यार के पालने में झुलाए तुझे - सुरत और सीरत ( या चित्रपटात हे एकच गीत साहिरचे आहे, बाकी सर्व शैलेन्द्रची, संगीतकार - रोशन)
४७. निगाहें मिलाने को जी चाहता है - दिल ही तो है
४८. तुम अगर मुझ को न चाहो तो कोई बात नहीं - दिल ही तो है
४९. तुम्हारी मस्त नज़र गर इस कदर नही होती - दिल ही तो है
५०. संसारसे भागे फिरते हो भगवान को तुम क्या पाओगे - चित्रलेखा
५१. छा गये बादल नील गगन पर घुल गया कजरा साँझ ढले - चित्रलेखा
५२. कहे तरसाए जियरा - चित्रलेखा
५३ मन रे तू काहे न धीर धरे - चित्रलेखा
यापैकी प्रत्येक गाण्यावर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल. पण आपण म्हटल्याप्रमाणे फक्त गाणे लिहून सलाम करावा हेच उत्तम.
श्रवणसूची?
(ता. क. ही प्ले लिस्ट - प्रतिशब्द? - तयार केली आहे. बास.)
जे (जी गाणी) ऐकायचे (ची) आहे(त) त्यांची सूची = श्रवणसूची असा शब्द प्लेलिस्टसाठी वापरता येईल काय?
श्राव्यसूची?
नुसतेच गीतसूची ही केवळ 'गाण्यांची यादी' च्या पुढे जाणार नाही.
श्रवणसूची म्हटले की गीतांबरोबरच पुल किंवा वपुंचे कथाकथन असलेली एम पी थ्री फाइल किंवा तत्सम सुद्धा या सूचीमध्ये अंतर्भूत होऊ शकेल. मला वाटते 'प्लेलिस्ट'मध्ये हेच अपेक्षित आहे.
श्रवणसूचीच्याच जवळ जाणारा श्राव्यसूची हा आणखी एक शब्द सुचला (श्राव्य = श्रवणीय/ऐकण्यासारखे या अर्थाने जसे 'सुश्राव्य') :-) श्रवणसूचीपेक्षा हा सुटसुटीत वाटला, म्हणून विषयांतर असूनही येथेच प्रतिसाद म्हणून लिहिला आहे.
शक्य असल्यास यासह वरील ३ प्रतिसाद योग्य तेथे हलवावेत, ही उपक्रमरावांना नम्र विनंती.
श्राव्यसूची ?
मला वाटत, आपण संग्रहित केलेल्या श्रवणीय फाइल ऐ़कण्यासाठी सूची बनवतो.
आपण संग्रहित करण्याला "संचय" शब्द वापरला तर श्रवणीय फाइलच्या सूची करीता 'श्रवणसंचय' / 'श्रवणसंच' शब्द कसा वाटतो ?
सूचीतली फाइल ऐकण्याला 'संचयश्रवण' असे म्हणू शकू.
कभी खुद पे ...
साहिर म्हणजे खल्लासच चीज आहे. पण संजोपराव आणि खुद्द विनायकरावसुद्धा एक सुंदर गीत कसे विसरले? (की ते साहिरचे नाही? हो, आमचे अज्ञानही विनायकांच्या ज्ञानाइतकेच महान आहे)
कभी खुद पे कभी हालात पे रोना आया
बात निकली तो हर-इक बात पे रोना आया
कौन रोता है किसी और के खातिर ऐ दोस्त
सब को अपनीही किसी बात पे रोना आया (खल्लास!)
साहिर म्हणजे न संपणारी गोष्ट आहे हेच खरे.
- दिगम्भा
उत्तम टीका
नुस्ती गाण्याची यादी देण्यापेक्षा आपण आपल्या विविध गाण्याच्या बद्दलच्या भावना लिहिल्यात हेच जास्त उत्तम झाले, with due respect to विनायक !! नाहीतर चित्रपटाच्या परिक्षणामधे चित्रपटाची कथा लिहिण्यासारखे वाटले असते
दिगम्भा व आवडाबाई
दिगम्भा
"कभी खुद पे कभी हालात पे रोना आया" हे गाणे साहिरचेच आहे. तशी बरीच गाणी विसरलो. एका बैठकीत जेवढी आठवली तितकी लिहीली. धर्मपुत्र, ताजमहल, बाबर, दीदी वगैरे चित्रपटातील गीते राहीलीच. सचिनदेव बर्मन यांचे चाहते अंगारे, जीवनज्योती, लालकुंवर. राधाकृष्ण , शहेनशहा वगैरे चित्रपटातील गाणी विसरलो म्हणून नाराज होतील.
संगीतकार रवीची गाणी मात्र विसरलो नाही, तर मला ती आवडत नाहीत म्हणून मुद्दाम गाळली आहेत. अजून ३-४ प्रतिसाद लिहायचे आहेत.
आवडाबाई
मला जर शब्दांची/ भाषेची देणगी असती तर माझे नाव माधव मोहोळकर किंवा संजोप राव नसते का?
आपल्याला काही लिहायचे असेल तर जरूर लिहा. मला आनंदच होईल.
विनायक
हे काय भलतेच?
मला जर शब्दांची/ भाषेची देणगी असती तर माझे नाव माधव मोहोळकर किंवा संजोप राव नसते का?
हे काय भलतेच? आम्ही आता (हिंदी चित्रपटात एखाद्याला फाशीची शिक्षा दिल्यानंतर न्यायमूर्ती मोडतात तशी ) आमची लेखणी मोडूनच टाकावी काय? साहिरच्या शब्दांतच सांगायचे तर 'गम कुछ इस कदर बढे, की मैं घबराके पी गया, इस दिल के बेदिली पे तरस खाके पी गया, ठुकरा रहा था मुझको बडी देरसे जहां, मैं आज इस जहान को ठुकराके पी गया' असे आमचे लिखाण!
विनायक,अपेक्षेप्रमाणेच अभ्यासपूर्ण प्रतिसाद. साहिरच्या संग्राह्य गाण्याची यादी आयतीच मिळाली! पुढच्या प्रतिसादांची वाट पहात आहे.
आपणा सर्वांचे आभार. असे लेख लिहिणे यात प्रामुख्याने स्वतःला मिळणारा आनंद हा स्वार्थी हेतू असतो, हे खरे असले तरीही.
सन्जोप राव
प्रतिसाद २
गीतकार साहिरच्या कारकीर्दीचे मी चार टप्पे मानतो.
१. १९५० ते १९५७ - याला सचिनदेव बर्मन पर्व म्हणू या. कारण या काळात त्याने प्रामुख्याने त्यांच्यासाठीच गीते लिहिली. यातील अजूनही बरीचशी गाणी मलाही माहिती नाहीत. "सजा" मधल्या " तुम न जाने किस जहाँ में खो गये" पासून सुरूवात झाली. मग देव आनंदच्या बाजी, टॅक्सी ड्रायव्हर, फंटुश, घर नं. ४४, मुनीमजी, जाल बऱ्याचशा चित्रपटांसाठी त्याने गाणी लिहिली. देव आनंदच्या व्यक्तिमत्वाशी सुसंगत अशी हलकीफुलकी गाणी लिहिली, ती बरीच लोकप्रिय पण झाली. पण "जाये तो जाये कहाँ", "दुखी मन मेरे, सुन मेरा कहना" वगैरे गाणी मला कविता म्हणून सामान्य वाटतात. मात्र "जाल"मधले "पिघला है सोना दूर गगन में फैल हरे है शाम के साये", घर. नं ४४ मधले "फैली हुई है सपनोंकी बाहे", तसेच "मुनीमजी" मधले " साजन बिन नींद न आए" ही मला अतिशय आवडतात.
देव आनंद शिवाय इतर चित्रपटांपैकी "देवदास" मधली जास्त प्रसिद्ध झाली. संजोप रावांनी "जिसे तू कबूल कर ले" चा आवडत्या गाण्यांमध्ये उल्लेख केला आहे म्हणून एक मजा सांगतो. शकील बदायुनींनी १९५३ सालच्या दिल ए नादान मध्ये एक गाणे लिहिले होते "जो खुशीसे चोट खाए वो जिगर कहाँ से लाऊँ". त्यातल्या ह्या ओळी पहा.
मुझे तेरी आरजू है
मेरे दिल में तू ही तू है
बसे गैर जिस में आकर
मैं वो घर कहाँ से लाऊँ
आता १९५५ सालच्या "देवदास" मधल्या "जिसे तू..." मधल्या या ओळी पहा.
तुझे और की तमन्ना
मुझे तेरी आरजू है
तेरे दिल में गम ही गम है
मेरे दिल में तू ही तू है
आता याला काय म्हणावे?
बाकी "अंगारे " मध्ये तलत चे एक सुंदर गीत आहे, " डूब गये आकाश के तारे जाके न तुम आये". त्यातल्या
बहते बहते चाँद की कश्ती दूर गगन में खोने लगी
आस की इक नन्हीं सी किरन थी वो भी ओझल होने लगी
अशा सुंदर ओळी आहेत. आणखी राधाकृष्ण, शहेनशहा, जीवनज्योती वगैरे चित्रपटातली गीते मीच जास्त ऐकली नाहीत.
सचिनदेव बर्मन सोडून त्या काळात मदनमोहनसाठी "रेल्वे प्लॅटफॉर्म" मध्ये, अनिल बिस्वास साठी "दो राहा" मध्ये (एकच गाणे), जयदेव साठी "जोरू का भाई" व श्यामसुंदर "अलिफ़ लैला" साठी गाणी लिहिली. यातील बरीचशी गाणी अप्रसिद्ध असली तरी देव आनंदच्या वर सांगितलेल्या चित्रपटातल्या गाण्यांपेक्षा जास्त सुंदर आहेत. ज्यांनी "चाँद मध्यम है", "मुहब्बत तर्क की मैंने", "अब तेरा इंतजार कौन करे" आणि "बहार आई खिली कलियाँ" ज्यांनी ऐकली आहेत त्यांना मी काय म्हणतो ते समजेल.
त्यानंतर १९५७ मध्ये 'प्यासा' आला.
क्रमशः
मुहब्बत तर्क की मैंने
बस अब् तो मेरा दामन छोड दो बेकार उम्मिदों
बहुत दुख सह लिये मैने बहुत दिन जी लिया मैने
क्या बात है!
ऐहिक
वा!
वा विनायकराव,
आपला व्यासंग पाहून थक्क झालो. बहोतही अच्छे!
तात्या.
निरोप
मंडळी
इथे मी साहिरवर जे काही लिहिले त्यावर आवडाबाई, राजू ८२, ईश्वरी यांना आवडलेले दिसत नाही. त्यामुळे ज्यांना पुढचे लेखन वाचायची इच्छा आहे त्यांनी, विशेषतः दिगम्भा, सर्किट, ऐहिक, तात्या यांनी , ते संजोपरावांच्या अनुदिनीवर वाचावे अशी विनंती आहे. तसेच आवडलेल्या गाण्यांचा प्रकल्पही "भरघोस" प्रतिसादांमुळे रद्द करण्यात आला आहे. यापुढे साहिरवर (आणि बहुतेक अन्य कुठल्याही विषयावर) मी काही लिहिणार नाही.
विनायक
हेच..
त्यामुळे कृपया येथे लिहिणे सोडू नये, ही विनंती.
हेच म्हणतो. विनायकराव, वाटल्यास थोडा ब्रेक घ्या. पण पुन्हा अवश्य लिहा आणि येथेच लिहा, ही विनंती.
तात्या.
अहो काका
तुम्हई लिहिलेले सर्वांना आवडायलाच पाहिजे अस् थोडच आहे? नाही आवडल त्याला नाही आवडल म्हटल, आवडलं कधी तर आवडलं म्हणतील लोक.
(मजकूर संपादित)
-राजीव.
काका,
आपले येथे लिहिणे बन्द करावे असा हेतू कधीच नव्हता, पण ते माझे वैयक्तिक मत आहे आणि तसा तो असण्याचा माझा अधिकार आपणही मान्यच कराल
२-३ निगेटिव्ह प्रतिक्रियामुळे लिहिणे बन्द करण्यापेक्षा इतर कौतूक करणार्यान्चा मान राखून लिहित रहावे !!
निदान मी तरी असा विचार केला असता. अर्थात हे ही माझे वैयक्तिकच मत आहे.
साहिर लुधियानवी
संजोपराव, आपका लेखन मुझे बहुत ही उत्तम लगा, मैं आपके ब्लॉग पर भी जाकर साहिर के बारे में पढ़ चुका हूँ... बहुत उम्दा लिखते हैं आप... मैं भी हिन्दी फ़िल्मी गीतों का दीवाना हूँ, कभी समय मिले तो मेरे ब्लॉग पर भी आईयेगा, जो कुछ टूटा-फ़ूटा मैं लिखता हूँ उसका रसास्वादन कीजिये... दरअसल १९५५ से १९७० तक का समय फ़िल्मी गीतों के स्वर्णकाल के रूप में जाना जायेगा... जब एक साथ सारे दिग्गज लिखते थे और उनमें अहं का कोई टकराव नहीं था, सभी के आपस में मधुर सम्बन्ध थे, जबकि आज चार फ़िल्में करने के बाद एक दूसरे का मुँह नहीं देखते, आलोचना करते हैं, भले ही नाक से या कहीं और से गाते हों या माइक को बीयर की बोतल समझकर उल्टा-सीधा करते रहते हों... ना ही गीतकारों में वह पाकीजगी बची है ना संगीतकारों में वो सुर... अब और क्या कहूँ...
http://sureshchiplunkar.blogspot.com
उपसंपादक
येन इदु? ननगे इ प्रतिसाद गोत्तिल्ला. नानु वोन्ली कन्नडा मत्तु मर्हाटी माताडुत्तेने.
नाइलाज
चिपळूणकरांचा ब्लॉग हिंदीच आहे हे पाहता त्यांना मराठी येत नाही असे वाटले. अशा परिस्थितीत त्यांना इथे यावेसे वाटते (मुळचे नाव मराठी असले तरीही) हे कौतुकास्पद वाटले.
सहमत
आहे.
त्यांनी मराठीतूनच त्यांचे विचार मांडले असते तर अजूनच बरे वाटले असते.
सुरेशजी
सुरेशजी,
हे संकेतस्थळ (वेबसाइट) मराठी असल्याने इथे कृपया मराठीतूनच लेखन करावे.
केवळ सन्जोप राव
सन्जोप राव,
(इथे राव हे आदरार्थी नाव म्हणून वापरतोय).
काय झकास लेख लिहिलाय. वाचून काही उत्तमोत्तम गीतांची उजळणी झाली आणि काही वेळ मजेत गेला.
तुमच्या "तुम्ही उपक्रमवर का येता" ह्या चर्चाप्रस्तावाच्या प्रतिसादानंतर मी तुमच्या लेखनाचा "फॅन" झालो आहे. पण बरेच दिवसात तुमच्याकडुन काही विषेश विनोदी लेखन नाही... (तुम्ही ते इतर कुठल्यातरी संकेतस्थळावर करत असाल तर त्याचा पत्ता जरा कळवा).
खिरे
साहिर लुधियानवी
सर्व हिंदी चित्रपट गीतकारांमध्ये व शायरांमध्ये साहिर लुधियानवीचे नाव मी प्रथम क्रमांकाने घेईन. साहिर लुधियानवीने आपली गाणी व गज़ल स्वाभिमान राखून लिहिली. साहिरचा नायक किंवा नायिका कधीही स्वाभिमान शून्य किंवा स्वत्व हरविलेली नसतात. प्रत्येक गाणे वास्तवाचे भान ठेवून, आपले पाय जमीनीवर घट्ट रोवून, जीवनाबद्दल अतिशय सकरात्मक दृष्टी देणारे असते. मग ती एखादे प्रेमगीत असो (दिन है बहारके तेरे मेरे इकरारके, हम आपकी आखोंमे इस दिल को बिठा दें तो) किंवा सामाजिक जाणीवेने झालेली वेदना असो (औरतने जनम दिया मर्दोंको, जिन्हे नाज़ है हिंद पर वो कहाँ हैं). साहिरचा नायक किंवा नायिका कधीही विफल झालेल्या अवस्थेत रडणार नाहीत, किंवा नशिबाला दोष देत वेडे होणार नाहीत.
जीवन जसे आहे तसे स्वीकरा व प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढा असा संदेश प्रत्येक कवितेत साहिर देत असतो. जरी जीवन दु:खाने भरलेले असले (कभी खुदपे कभी हालातपे रोना आया) तरी केवळ हेच सत्य नसून त्यातूनच आपण पुढे जायचे आहे( न मुहॅ छुपाके जिओ और न सर झुकाके जिओ, मैं जिंन्दगीका साथ निभाता चला गया).
साहिरचा प्रेमवीर प्रेम करताना सभ्यतेच्या मर्यादा कधीही ओलांडत नाही (हम आपकी आखोंमें इस दिलको बिठा दें तो), उलट प्रेम हे त्याच्या आयुष्यात एखाद्या भेटीसारखे (तोह्फा) येते (मिलती हैं जिन्दगीमें महोब्बत कभी कभी). प्रेम करताना तो सर्वस्व अर्पण करायला तयार असतो, प्रेयसी ही फक्त माझी, बाकी कोणाची होऊच शकत नाही ही त्याची भावना सच्चीच असते (तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही), पण हक्क दाखवून तिच्या मताचा किंवा भावनेचा अपमान करणे हे त्याला मान्य नाही. जर प्रेम सफल झाले तर स्वर्गसुखच पण अन्यथा उफ न करेंगे लब सी लेंगे आसू पी लेंगे असे आयुष्य काढायची त्याची तयारी आहे.
ज्या उत्कटतेने साहिरने प्रेम गीते लिहिली तशीच भजने लिहिली (अल्ला तेरो नाम इश्वर तेरो नाम). काही वेळा हे भजन आहे की प्रेम गीत असा प्रश्न पडेल (आज सजन मोहे अंग लगा लो,जनम सफल हो जाए), सदरच्या गाण्यात वर वर पहाता एक प्रेमवेडी आपल्या प्रियकरासाठी आतूर झालेली आहे असे वाटेल परंतू एक भक्त आपल्या देवाकडे भेटीची आस बाळ्गून प्रार्थना म्हणते आहे हे ध्यानी येते. या भजनावरून साहिरवर सूफी साहित्याचा असलेला प्रभाव लक्षात येतो. ना तो कारवॉकी तलाश हैं मध्ये अखेरीस असलेल्या कडव्यांमध्ये जब जब कृष्ण की बन्सी बाजी पासून पुढे सर्व कव्वाली प्रेम गीत असूच शकत नाही, ते एक प्रेमवेडी मीरा आपल्या कृष्णासाठी आळवणी करीत आहे असेच वाटते. मला वाटते की साहिर हा अमिर खुसरोंचा पट्टशिष्य असावा. कारण अमीर खुसरो अश्या गीतांसाठी प्रसिध्द होते. मी ऐकल्याप्रमाणे वरील कव्वाली मूळ अमीर खुसरोंचीच आहे. तज्ज्ञांनी, जाणकारांनी खुलासा करावा.
असो. साहिर जसा मला जाणवला, जसा भावला तसा मी सादर केला. साहिरच्या अनेक गीतांबद्दल खूप लिहावे असे वाटते. पुन्हा केव्हातरी.
धन्यवाद.