भाड्याने मिळणारे गर्भाशय

आजच्या इथल्या वर्तमानपत्राबरोबर एक पुरवणी आलेली आहे. त्या पुरवणीमधे भारताला जगाचा पाळणा किंवा भाड्याने मिळणार्‍या गर्भाशयांची जागतिक राजधानी असे संबोधले आहे. या लेखाप्रमाणे जगातील प्रत्येक तिसरा भाड्याने दिलेला गर्भाशय भारतातला असतो. ज्या जोडप्यांच्या आयुष्यांत चिमणे बोबडे बोल ऐकणे नशिबात नव्हते त्यांना व हा गर्भाशय भाड्याने दिल्यामुळे ज्या काही भारतीय कुटंबाना दारिद्र्यामधून बाहेर येता आले आहे त्या सगळ्यांसाठी ही वैद्यकीय चिकित्सा एक वरदान ठरली आहे असे मला वाटते.आपल्याला या बाबतीत काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

भारतीय महिलांची त्यागवृत्ती

ज्या जोडप्यांना आयुष्यात चिमणे बोबडे बोल ऐकणे नशीबात नव्हते त्या जोडप्यांना ही चिकित्सापद्धती वरदान ठरली आहे हे खरेच. भारतातील मातांनी गर्भाशय भाड्याने देण्यासाठी मोठ्या संख्येने पूढाकार घेतला यामागे फक्त आर्थिक कारणे आहेत असे म्हणणे थोडे अन्यायाचे ठरते. भारतीय निम्नमध्यमवर्गीय किंवा गरीब स्रीची सोशिकता ही या गोष्टीला पोषक आहे. काही महिने पोटात वाढवलेला जीव हा जरी दुस-या कुणाच्या वंशाची बीजे घेऊन आलेला असला तरी सारा सत्वार्क तो मिळवतो गर्भाशय धारण करणा-या मातेकडूनच. तिच्या त्याच्याशी जोडल्यागेलेल्या सगळ्या शब्दातीत नात्यांची नाळ तुटल्याबरोबर सांगता होते असे म्हणता येणारच नाही. ही ताटातूट कुटुंबाच्या भल्यासाठी आणि तत्कालिक आर्थिक लाभासाठी जरी त्या मातेने सोसली तरी आयुष्यभराची एक रुखरुख तिच्या कायमची अंतरी रहात असणार. म्हणून भारतीय महिलेची सोशीक परंपरा येथे प्रकर्षाने सामोरी येते. तिच्या सोशिकपणाला तद्दन पुरूषी सहानुभूती देण्यापेक्षा किंवा तिच्या दारिद्र्याशी याचा संबंध जोडण्यापेक्षा भारतीय महिलेच्या त्यागाचेच या निमित्ताने कृतीशील कौतुक व्हायला हवे.

मूळ कारणे आर्थिकच

भारतीय स्त्रीच्या त्यागाचे उदात्तीकरण ही काही नवीन गोष्ट नाही. 'अच्छा, अब स्वर्ग में मिलेंगे' असे आपापल्या नवर्‍यांना म्हणत अग्नी भक्षण करणार्‍या राजपूत स्त्रियांची त्यागवृत्ती किती आणि नाईलाज किती याचे मोजमाप कसे करावे? तर ते असो.
भारतीय स्त्रिया गर्भाशय भाड्याने देण्यात आघाडीवर आहेत याचे साधे स्वच्छ कारण त्यातून होणारा आर्थिक लाभ हे आहे. गुजरातमधील आणंद हे गाव "टेस्ट ट्यूब बेबी' आणि 'सरोगेट मदरहुड' यासाठी प्रसिद्ध आहे. गर्भाशय भाड्याने देणार्‍या बहुतेक स्त्रिया अशिक्षित आणि ज्यांना रोजगाराची इतर कोणतीही संधी उपलब्ध नाही अशा वर्गातल्या आहेत, हे ध्यानात घेण्यासारखे आहे. जैवतंत्रज्ञानाने ('इन विट्रो फर्टिलायझेशन) ज्या जोडप्यांना नैसर्गिकरीत्या अपत्यप्राप्ती होणे शक्य नाही त्यांना अन्य स्त्रीचे गर्भाशय भाड्याने घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. भारतातले दारिद्र्य लक्षात घेता भारतीय स्त्रियांना आपल्या तुटपुंज्या उत्पन्नाला हातभार लावण्याची ही एक संधी निर्माण झाली आहे, इतकेच. यात भारतीय स्त्रियांचे कौतुक जरुर आहे, पण ते यासाठी की त्या आता आपल्या शरीरावरील स्वतःच्या हक्काबाबत अधिक जागरुक झाल्या आहेत. गर्भाशय भाड्याने देणे ही गोष्ट काही भारतीय स्त्रियांना तरी आता 'सोशल टॅबू' वाटत नाही, हे कौतुकास्पद आहे. एरवी पत्नीच्या शरीरावर आणि मनावर नवरेशाही गाजवणार्‍या (काही) भारतीय नवर्‍यांनी आर्थिक लाभासाठी का होईना, आपल्या पत्नीचा तिच्या स्वतःच्या शरीरावरचा अधिकार मान्य केला आहे, यासाठी अशा नवर्‍यांनाही एक पुसट टाळी द्यावी, असे वाटते.
सन्जोप राव
उर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोती मे!

सरोगेट

एरवी पत्नीच्या शरीरावर आणि मनावर नवरेशाही गाजवणार्‍या (काही) भारतीय नवर्‍यांनी आर्थिक लाभासाठी का होईना, आपल्या पत्नीचा तिच्या स्वतःच्या शरीरावरचा अधिकार मान्य केला आहे,

हे तरी खरे का? की धनलाभाच्या लालचीने, नवरे बायकांना बाळंतपणे सोसायला भाग पाडीत आहेत?

अवांतरः उर्ध्वबाहु:प्रवक्षामि हे मी कोठेतरी ऊर्ध्वबाहु: विरोम्येषः असे वाचले होते.

गरीबाचा वाली

भारतामधी आधीच गरीब लोकं पोटासाठी येगयेगळे भाग देतच होते.
आता गर्भ भाड्याने देऊन पैशाचे एक साधन त्यायला भेटले पर
गर्भाशयाच्या आजारामुळे बायामाणसाची मरणाच्या दारात संख्या वाढून राह्यली हीबी गोट ध्यानात ठेवली पाह्यजेन् वाचा एक बातमी

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

 
^ वर