यतो वाचो निवर्तंते

यतो वाचो निवर्तंते ....( तैत्तिरीय उपनिषद २.९ )

उपनिषदांमध्ये "ब्रह्मा"बद्दल बोलतांना ऋषींनी हताशपणे उद्गार काढले कीं "याच्या संबंधात काहीच बोलता येत नाही कारण वाणी काय किंवा मन काय, एकदम निरुपयोगी. "ते" अप्राप्य आहे." मला आज उपनिषदांबद्दल लिहावयाचे नाही ( पण कोणी लिहले तर आनंदच होईल) तर आपल्या हरघडीच्या, सामान्य आयुष्यातही असे अनेक प्रसंग येतात कीं जेथे वाणी अपुरी पडते, त्या बद्दल बोलावयाचे आहे. आपण गदिमांसारखे शब्दांवर प्रभुत्व गाजवत नसू पण आपला शव्दसंग्रह अगदीच गचाळ असतो असेही नाही.मग मला सांगा कीं आप्तेष्टांकडे
निधन झाले म्हणून भेटावयाला गेल्यावर आपली वाचा का बसते? हा, काही तरी बोलून (विशेषत: बायकांकडून) ही कोंडी फ़ोडली जाते. पण बोलणारा व ऐकणारा दोघेही मनोमन जाणत असतात कीं हे अवांतर आहे. हेही जाणत असतात कीं याला इलाज नाही. दु:खच कशाला आनंदाच्या प्रसंगीही अशीच अडचण येते.ज्या व्यक्तीच्या आनंदसमयी तुम्ही "Congrats" किंवा "अभिनंदन" म्हणून भागवून नेवू शकता ती तुमची "जिवलग" नव्हेच! शोक, आनंद, करुणा, घृणा ....कोणतीही भावना घ्या. ती व्यक्त करावयाला चेहरा, आंसू, अडखळणारे उच्चार जास्त समर्पक वाटतात. शेकडो वर्षे विकसित होत असलेली भाषा इथेही का अपुरी पडावी? रामकृष्ण परमहंसांना एकाने "समाधीसुखा" बद्दल विचारले,ते म्हणाले, " अरे काय सांगू, मलाही बोलावेसे वाटते, पण शब्दच येत नाहीत." अध्यात्माचे सोडा, जगातील सर्व भाषांतील श्रेष्ट ग्रंथकारांची व्यथा एकच, "मला काय सांगावयाचे आहे त्या करिता योग्य शब्द सापडत नाहीत!"
अमृतानुभवात ज्ञानेश्वरांनी शब्दाचे छान विवेचन केले आहे. हे सर्व सोडून तुमच्या लहान-मोठ्या आयुष्यात असे प्रसंग आले असतीलच ना? तुम्ही काय केलेत? की अशी अडचण कधी आलीच नाही?

ही अडचण तुमची आमचीच आहे असे समजण्याचे कारण नाही. संगीताच्या मैफ़लीवर लिहतांना मोठ्यामोठ्या लोकांना काय करावे याचा विचार करावा लागला. श्री.गोविंदराव टेंबे, प्रा.अरविंद मंगरुळकर ही संगितातली दर्दी होती व त्याच बरोबर चिकित्सक वाचक-लेखक होती. त्यांनी इतर विषयांवर पुस्तके लिहली आहेत. त्यांनाही एखाद्या जोरकस तानेबद्दल लिहतांना कसे सांगावे लागले ?..." वीजेने लखलखाट करत अंधारावर विजय मिळवावा तसे उ...यांच्या मल्हाराच्या तानेने श्रोत्यांवर कबजा बसवला..." आता पावसाळ्यातला प्रकाश आणि मैफ़लीतला ध्वनी यात साम्य कोणते शोधावयाचे? ही एक पळवाटच नव्हे का? य़ा ठिकाणी अडचण अशी की तानेचे वर्णन करणार कसे? दाणेदार(?), मद्र सप्तकापासून तार सप्तकापर्यंत घेतलेली, इत्यादी पुरेसे नाही व दुसऱ्या ध्वनीचे उदाहरण देणेही शक्य नाही.मग वाचकाला, श्रोत्याला आलेला अनुभव सांगणार तरी कसा? वाचकाला वीज माहीत आहे,तीची प्रकाशा बाबतची चपलता माहीत आहे, अपेक्षा अशी करावयाची की तो प्रकाश-ध्वनी यांच्यात ती माहीती फ़िरवून घेईल. ही एक शक्यता पडताळून पहावयाची. आपण असे
hyrid प्रयोग केलेत का?

मला म्हणावयाचे आहे की शब्द बऱ्याच वेळी अपुरे असतात व काही वेळी तर निरुपयोगी!

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

अपुरेपण

स्फुट आवडले.

>>> मला म्हणावयाचे आहे की शब्द बऱ्याच वेळी अपुरे असतात
- शब्दांच्या अपुरेपणाबद्दल सहमत आहे. खुद्द ज्ञानेश्वरांना जिथे 'परी ही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे मी सांगे' म्हणावे लागले, तिथे इतरांची काय कथा. भाषा कितीही विकसित झाली तरी ती एकंदरीत अनुभवांचे वर्णन करण्याच्या क्षमतेच्या दृष्टीने कायम थोडी पिछाडीवरच असते - यात अर्थात आपले शब्दसामर्थ्य तोकडे पडते हा भागही आलाच; पण शब्द-रेषा-सूर ह्या चढत्या क्रमाने अनुभवांच्या जवळ जाण्याच्या पायर्‍या असाव्यात. 'सर्व कलांना संगीत व्हायचे असते', असं म्हटलं जातं, ते याच उद्दिष्टाच्या (अ)पूर्तीबद्दल असावं. 'राग ललित' या लेखात एलकुंचवारांनी या गोष्टीचा सुंदर मागोवा घेतला आहे.

हे जसं नवीन, शब्दातीत अनुभवांबाबत खरं आहे; तसं त्याच्या उलट टोक जुन्या, घासून गुळगुळीत झालेल्या नैमित्तिक प्रसंगांविषयी. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बर्‍याचशा प्रसंगी असे अवांतर/औपचारिक बोलणे अपरिहार्य होते (आठवा : "चालायचंच! जीवनात..." असल्या प्रसंगी प्रसंगाला उचित अशी वाक्ये बोलायला शिकवणारा एखादा पोष्टल कोर्स असला तरी मी तो घ्यायला तयार आहे.).

(संदर्भ द्यायच्या सोसाचा आळ पत्करून) नुकत्याच वाचलेल्या मादाम बॉवरीतला एक उतारा या संदर्भात येथे द्यावासा वाटतो. रॉडॉल्फ या परपुरूषाच्या प्रेमात पडलेली कथानायिका आपल्या भावनांची कबुली त्याला देते, तेव्हा बाहेरख्याली स्वभावाच्या त्या जमीनदाराच्या डोक्यात आलेले विचार आणि त्या निमित्ताने फ्लॉबर्टने भाषेच्या दुबळेपणाविषयी केलेलं चिंतन असं - त्यानेही शेवटी दिलेलं उदाहरण योगायोगाने संगीताचंच -

He could not see - this man of such broad experience - the difference of feeling, beneath the similarity of expression. Because wanton or venal lips had murmured the same words to him, he only half believed in the sincerity of those he was hearing now; to a large extent they should be disregarded, he believed, because such exaggerated language must surely mask commonplace feelings: as if the soul in its fullness did not sometimes overflow into the most barren metaphors, since no one can ever tell the precise measure of his own needs, of his own ideas, of his own pain, and human language is like a cracked kettledrum on which we beat out tunes for bears to dance to, when what we long to do is make music that will move the stars to pity.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांतीक्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांतीक्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!
क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांतीक्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांतीक्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!क्षुद्राक्षरकार्त्स्न्य
क्षि!१२क्षांतीक्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांतीक्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांतीक्षुद्रा
क्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांतीक्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२

शब्द अपूरेच असतात..!

>>शब्द बऱ्याच वेळी अपुरे असतात व काही वेळी तर निरुपयोगी!

सहमत आहे ! माझी तर वाचाच बसली आहे, उपक्रमवर संपादकांचे काम पाहून !

डिलीट होणारे प्रतिसादांचे प्रमाण पाहता, टंकण्याचे सुद्धा कष्ट घ्यावे वाटत नाही

स्फुटक आवडले

तत्त्वज्ञानातले नेहमीच्या ऊहापोहाचे तत्त्व साहित्यिक मासले देऊन विषद केले आहे, ते वाचायला रंजक झाले आहे.

नंदन यांचा प्रतिसादही उत्तम पुरवणी आहे.

शब्दाचे कार्य जाणले, तर शब्दाची मर्यादा ही मर्यादा वाटत नाही. शब्दाबद्दल अप्रस्तुत अपेक्षा मनात आणली नाही, तर बरे. मग त्यांची अचाट शक्ती कुठल्या क्षेत्रात आहे, हे लक्षात ठेवून त्यांचा वापर होईल.

बोलाचा भात आणि बोलाची कढी खाऊन पोट भरत नाही, हे खरे. पण ते भरावे, ही अपेक्षा अयोग्य आहे. परंतु कच्चा तांदूळ, बेसन, ताक समोर असले, समजा. शिधा "बोलाचा" नसला, "खरा" असला, तरी तोही पचत नाहीच. आईने शिकवलेल्या शब्दाच्या सहाय्याने जो खरा भात शिजतो, जी खरी कढी बनते, ती त्या शब्दाविना बनली नसती. ती शब्द-संस्कारित कढी, तो शब्द-संस्कारित भात पोषण करतो.

आपल्या आवडत्या व्यक्तीला आनंदसमयी कडाडून मिठी मारणे वेगळे. "Congrats", इतकेच काय "मी तुला मिठी मारतो" शब्द वेगळे. त्यांच्या कक्षा वेगळ्या.

परंतु अर्थ-चिह्न म्हणून शब्दांची अचाट शक्ती बघून त्यांनाच अर्थ-धारी शक्ती देण्याचा मोह भल्याभल्यांना चुकला नाही. भारतीय संहितांत शब्द हेच ब्रह्म आहे, बायबलमध्ये शब्द हेच जगत् बनते, वगैरे, असे उल्लेख आपल्याला सापडतात. मग शब्द ब्रह्म नाही, शब्द हेच जगत् नाही असे पुन्हा जाणून त्यांच्याबाबत हिरमुसायचे :-) या विचार प्रगल्भ होण्याच्या पायर्‍या आहेत.

"गूळ" शब्दाने तोंडात गोडी अनुभवता येत नाही, पण "लोणचे" शब्दाच्या उल्लेखानेच तोंडाला पाणी सुटते! असे हे गूढ शक्तीचे शब्द. त्यांच्या बद्दलचे हे स्फुटक आवडले, हे पुन्हा सांगून शब्द टंकन बंद करतो.

आवडले

स्फुट आणि नंदन, धनंजय यांच्या प्रतिक्रिया आवडल्या. वाचल्यावर लगेच 'शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले' मनात वाजायला लागले. :)

----

संवाद महत्वाचा

एका मनुष्याने दुसर्‍या माणसाला काही संकेत, सूचना वगैरे देण्यासाठी भाषा तयार झाल्या. त्यापूर्वी सुद्धा 'शब्देविण संवादू' चाललाच होता आणि आणि त्यानंतर तो चालतच आहे. पशुपक्षी कीटक वगैरे सुद्धा असा संवाद साधत असतात. भाषेच्या उपयोगामुळे संवादात थोडा नेमकेपणा येतो, त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता किंचित कमी होते. तसेच संवादातील विषयांची व्याप्ती खूप वाढते. शिवाय लेखन व वाचनाच्या सोयीमुळे संवाद साधण्यासाठी प्रत्यक्ष समोर असावे लागत नाही, स्थळकाळाची सर्व बंधने पार करून निदान एकतर्फी तरी तो साधता येतो. असे अनेक फायदे असले तरी मनातल्या भावनाच काय पण डो़ळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यांपासून होणार्‍या कोणत्याही संवेदना शब्दांमधून पूर्णपणे व्यक्त करता येत नाहीत आणि तशी अपेक्षासुद्धा धरायचे कारण नाही.

तुमच्या लहान-मोठ्या आयुष्यात असे प्रसंग आले असतीलच ना? तुम्ही काय केलेत? की अशी अडचण कधी आलीच नाही?

असे विचारले असल्यामुळे एक मजेदार अनुभव सांगतो. परदेशात किंवा परप्रांतात गेल्यावर असे अनुभव सर्वांनाच येतात. त्यात विशेष असे कांही नाही. मी एकदा कांही कामानिमित्य दोन चार दिवसांसाठी जर्मनीमधील एका लहानशा गांवी गेलो होतो. पहिल्याच दिवशी संध्याकाळी रस्त्यातून फिरत असतांना एक स्टॉल पाहून मला कांहीतरी खाण्याची इच्छा झाली, पण त्या जागी काय उपलब्ध आहे ते विचारून त्यातले मला काय पाहिजे ते सांगताही येत नव्हते आणि तिथला बोर्ड वाचताही येत नव्हता त्यामुळे बोट दाखवता येत नव्हते. पाच मिनिटे रेंगाळून कोण काय घेत आहे ते पाहिले, त्यातला एक बर्गर आकर्षक वाटला. त्या गिर्‍हाइकाच्या हातातल्या बर्गरकडे बोट दाखवून तिथल्या विक्रेतीला खुणेने सांगितले. तिलाही ते समजले आणि तिने तसाच बर्गर तयार करून मला दिला. तिने सांगितलेली त्याची किंमत मला कळली नाही. मग खिशातून वेगवेगळ्या नोटा काढून तिच्या समोर धरल्या. तिने त्यातून योग्य ती नोट घेऊन सुटे सेंट मला परत केले.

.

.

अत्यंत गमतीदार

एक दर्जेदार आणि विचारप्रवर्तक प्रतिसाद.

आता कीस काढायचा झाला तर असे -
१. वरील प्रतिसाद नि:शब्द नाही.
त्यात प्रेषकाचे नाव आहे - म्हणजे "हा प्रतिसाद आहे, ही चौकट आहे, याचा प्रेषक ऋषिकेश आयडी आहे" हे सर्व सांगितले जात आहे. हे का म्हणतो? कारण वर प्रत्येक दोन प्रतिसादांच्या मध्ये चौकट नसलेली मोकळी जागा आहे. ती बघून "नि:शब्द प्रतिसाद" असा विचारही मनात येत नाही. त्यामुळे चौकट आणि प्रेषकाचा आयडी घातल्यामुळेच वरील प्रतिसाद अर्थ-संदेशक झालेला आहे.

२. वरील प्रतिसाद निश्चिह्न नाही.
यात ऋषिकेश यांनी "." चिह्न विचारपूर्वक घातले आहे. हे चिह्न घातले नसते, तर ऋषिकेश यांच्याकडून "प्रतिसाद पाठवा" बटनावर चुकून टिचकी मारली गेली असा गैरसमज झाला असता.

लोक एकमेकांना "नि:शब्द झालो", "गप्पगार पडलो", "अवाक झालो" म्हणतात, तेव्हा कुठलातरी संदेश एकमेकांना पोचवतात हे निश्चित. तो संदेश ही वाक्ये बर्‍यापैकी कार्यक्षमपणे पोचवतात, असे दिसते. हा प्रयोग करून ऋषिकेश यांनी हे दर्शवून दिले आहे. त्यांचा हा प्रयोग अतिशय कल्पक आहे.

!

:-)

छान

लेखाचा विषय, लेख आणि प्रतिसाद छान आहेत.
तुम्ही म्हणता तसे हायब्रिड उदाहरणे आपण अनुभवत असतो..पण आत्ता आठवत नाहित.

भावणे आणि ते शब्दांत मांडणे या दोन क्रिया मेंदूतील कुठली स्थाने ठरवतात आणि त्यांचा परस्पर संबंध कसा असतो याबद्दलची माहिती सुद्धा या बाबतीत उपयोगी पडेल असे वाटते.
--लिखाळ.

अप्राप्य मनसासह

(अति अवांतर, केवळ मनोरंजनाकरिता)
मागे प्रतिसाद या विषयावर लिहतांना प्रतिसादाचे ५-६ प्रकार कल्पले होते. त्यात आता एका नवीन प्रकाराची नोंद करावयास पाहिजे."नि:शब्द". याचे चांगदेवानुयायी प्रवर्तक श्री. ऋषिकेश व पहिले सहचर श्री. आपला नम्र. यांचे प्रतिसाद बघितल्यावर ( ते नि:शब्द असल्याने वाचता येत नाहित, फ़क्त बघता येतात) मला श्री ग्रेस यांच्या कविता, जीएंच्या कथा आणि श्री.पु.शि. रेगे यांच्या कवितेतल्या दोन शब्दांमधील मोकळ्या जागेतील अर्थ ( म्हणजे नक्की काय याचा शोध गेली ४० वर्षे घेण्याचा प्रयत्न करत आहे!) हे सर्व किती सोपे आहे हे झटकन कळले. आता प्रतिसादाबद्दल म्हणाल तर आचार्य धनंजय यांची टीका वाचली म्हणजे झाले. आचार्यांना काय, ते तर दर्शनांवरही टीका लिहतात. ज्ञानेश्वरीचा अभ्यास असल्याने मोकळ्या प्रतिसादावर (पक्षी : पत्रावर) लिहणे ही किस झाडकी पत्ती! असो. आता "वेळ नाही म्हणून प्रतिसाद लिहला नाही" असा दावा कोणाला करता येणार नाही. प्रत्येक सभासदाच्या नावावर वार्षिक २५ प्रतिसाद धरून चालावयास हरकत नाही. संपादकांचे कामही कमी झाले, यात "उडवण्या"सारखे काहीच नाही. असो.

मला एका गोष्टीची थोडी काळजी वाटते. एखादा, बिचारा ज्योतिषी एखाद्या चौकोनात, चार वेड्यावाकड्या चौकटी आखून, त्यात काही आकडे व नवग्रहांची नावे लिहून एखादे "भाकित" सांगत असेल तर आमचे घाटपांडेकाका त्याच्यामागे हात धुवून लागतात; इथे तर सगळी चौकट कोरी, तरीही त्यात "काय आहे" ओळखणारी टीका आली तर हे काय करतील याची कल्पनाच करवत नाही.म्हणजे एका लेखावर नि:शब्द प्रतिसाद, पुढे श्री.धनंजय, पुढे श्री. घाटपांडे , काय? मजा आहे की नाही? चला, चला. आम्ही तर खुश आहोत. अधूनमधून अशी हिरवळ हवीच.

शरद

 
^ वर