पुस्तक परिचय -"कॉफी ट्रेडर"

अ‍ॅमस्टरडॅम, १६५९. मायगेल लिएन्झो कर्जात गळ्यापर्यंत बुडाला आहे. त्यात दोष सर्वस्वी त्याच्या एकट्याचा नाही म्हणा. सट्टेबाजीला कायदेशीर मैत्रिण मानणार्‍या जगातल्या त्या पहिल्या-वहिल्या शेअर-बाजारात एका रात्रीत जसे रंकाचे राव होतात तसे मायगेल सारखे रावाचे रंक झालेलेदेखील अनेक होते.
भावाच्या घरात, ओलीने आणि कुबट हवेने भरलेल्या अंधार्‍या तळघरात उधारीवर राहताना मायगेलला भविष्यात फक्त निराशेचा मिट्ट काळोखच दिसतोय.
दरम्यान अवचितच त्याची एका भुरळ पाडणार्‍या डच स्त्रीशी - गर्ट्र्युडशी ओळख होते. एकदा, गर्ट्र्युड पुर्वी कधी न चाखलेल्या पण एकदा प्यायल्यावर चटक लावणार्‍या कॉफीची चव मायगेलला देते.
आणि दोघे मिळून एक महत्वाकांक्षी योजना आखतात - इतर व्यापार्‍यांना सुगावा लागण्या आधीच ह्या जादुई पदार्थाचा संपुर्ण युरोपात दणकून प्रचार करायचा आणि कॉफीच्या व्यापारावर पुर्ण कब्जा मिळवायचा! बेत यशस्वी झाला तर मग अनेक पिढ्या बसून खातील एव्ह्ढ्या पैशांचे ढिग आपल्या पायांनी चालत येणार! मात्र त्यासाठी मायगेलला आपले कौशल्य आणि बाजारतली पत पणाला लावावे लागेल! शिवाय मधाळ बोलीने, केसांनी गळा कापणारे मैत्रीचा आव आणणारे कट्टर शत्रू जागोजागी टिपून बसले आहेत!

डेव्हिड लिस नावाचा उगवत्या ब्रिटिश लेखकाची "कॉफी ट्रेडर" ही दुसरीच पण क्षणोक्षणी उत्कंठा वाढविणारी कादंबरी आहे.
१७व्या शतकातल्या युरोपियन व्यापार्‍यांची पंढरी असणार्‍या अ‍ॅमस्टरडॅम शहरात हे कथानक घडते. अनेक जाती-धर्माचे रिती रिवाजांचे व्यापारी तिथे ट्युलीपची फुले, चॉकोलेट, मसाल्यांचे पदार्थ, रेशिम अशा अनेकाविध गोष्टींची उलाढाल करायचे. जगाच्या कानकोपर्‍यातून अ‍ॅमस्टेल नदीच्या तीरी, गोदामांत माल यायचा आणि मायगेल सारख्या चलाख व्यापार्‍यांच्या हाती म्हणता म्हणता खपून जायचा!

आपला नायक आहे जन्माने "पोर्तुगीज ज्यु". इतर वेळी धर्माचे कट्टर पालन करणारा पण व्यापारात सर्व विधीनिषेध बाजूला ठेवणारा त्याचा हा छोटासा समाज पैसा मिळवण्याच्या सगळ्या युक्त्या-प्रयुक्त्या कोळून प्यायला होता -काहिसा धंदापाण्यात कुशल असलेल्या मारवाडी बनियांसारखा. त्या समाजातल्या रोजच्या जीवनातल्या घटना, हेवेदावे, प्रेमप्रकरणे, झटपट श्रीमंती आणि छानछोकीत राहण्यासाठी चालणारी धडपड ह्याचे मनोरंजक चित्रण आपल्याला कॉफी ट्रेडर मधे दिसते.
मायगेलचे डावपेच, नानाविध अडचणी, नशीबाने दिलेला हात अशा अनेक घटनांमधून कथानक पुढे सरकत राहते.
आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग असणारा शेअर बाजार, फ्युचरस् आणि अडत या गोष्टींचा पाया इथे रचला गेला. तो शेअर बाजार सुद्धा कथेत अनेक वेळा डोकावून जातो. तिथल्या एजंटांच्या आरोळ्या, घटकेत वर-खाली होणारे भाव, गिर्‍हाईकाला गटवून जास्तीत जास्त फायदा कसा होईल ह्या विवंचनेत असणारे अडते आणि चढ्या भावात कर्ज देणारे सावकार यांच सहसा कादंबर्‍यांमधून न दिसणारे जिवंत चित्र कॉफी ट्रेडर मधे बघायला मिळते.

पुस्तकाच्या शेवटी लेखकाची मुलाखत आहे. त्यात पुस्तक लिहिण्याची प्रेरणा (डिग्रीला असताना केलेला अभ्यास/संशोधन), "कॉफी"ची निवड आणि एकूण आर्थिक थरारकथा (फायनान्शियल थ्रिलर)ह्या धाटणी(जेनेर) मागचा विचार विस्ताराने येतो.
'गारंबीच्या बापू'त असं वातावरण बापूच्या सुपारी-व्यापारात येते खरे पण ते साम्य तितपतच आहे.
शेवटी मायगेल कॉफीच्या व्यापारावर एकहाती हुकमत गाजवण्यात यशस्वी होतो की नाही ते मुळातूनच वाचण्यात मजा आहे. पण ह्या निमित्ताने थोड्या अनवट धाटणीच्या कादंबरीची ओळख करून द्यायचा हा छोटासा प्रयत्न

पुस्तकाचे नावः कॉफी ट्रेडर
प्रकाशनः बॅलेन्टाईन बुक्स
पृष्ठे: ३८६
किंमत: १७$

लेखनविषय: दुवे:

Comments

लय जोरदार

कादंबरी म्हणजी एक मोठी सूक-दूकाच्या गोष्टी सांगणारी कथा.

तव्हा व्यापार, त्यायच्यातल्या बारा भानगडी, अशा गोष्टी कादंबरीत असन तर कादंबरी फेमस व्हती का,
आन ती लोकायला आवड्ती का,असा सवाल बाबूरावला पल्डाय.

तरीबी, कॉफी ट्रेडर बूकाची वळख आवल्डी

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

अवांतर

वरच्या आपल्या प्रतिसादात केवळ "ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल" एव्हढीच वाक्ये एकदम व्याकरणदृष्ट्या बिनचूक कशी काय? काय नक्की जादु आहे ही? मी तर बुवा आजपर्यंत अंतरजालावर सर्वत्र केवळ एकाच प्रकारे लिहू शकते. अगदी कानामात्रेचा पण फरक कधी पडत नाही. हे प्रमाण आणि अप्रमाण मराठीचे बेमालून मिश्रण करणे आपल्याला कसे काय जमते?

बाकी आपला प्रतिसाद पाहून आमच्या हमालभाऊंची आठवण आली. हल्ली ते कुठल्या पिंपळावर गेलेत कोणास ठाऊक. (वाटले तर हा प्रतिसाद उडवला गेला तरी हरकत नाही).

_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

अवांतर..

१) अंतरजालावर नाय आंतरजालावर
२) बेमालून नाय बेमालूम

अशा चुका व्हण्यापेक्शा अप्रमान लिव्हलेले बरं का नाय :-)

हे प्रमाण आणि अप्रमाण मराठीचे बेमालून मिश्रण करणे आपल्याला कसे काय जमते?

सारं देव करुन घेतो आपुन निमितमात्र

इंजीनेर साहेब, खुलाशाबद्दल आभारी.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

वेगळे मत्त!

तेव्हा व्यापार, त्यायच्यातल्या बारा भानगडी, अशा गोष्टी कादंबरीत असन तर कादंबरी फेमस व्हती का,
आन ती लोकायला आवड्ती का,असा सवाल बाबूरावला पल्डाय.

माझं वैयक्तिक मत असं की कुठलिही कादंबरी किंवा कथा आवडायला त्यातली वातावरण निर्मिती महत्वाची असते. पण पात्रांचा कथेतला वावर, शेवट आणि सुरुवात या गोष्टींपेक्षा काकणभर कमी महत्वाची.

म्हणजे असं बघा, भेळ खाताना, चौपाटीवरच्या त्या भैय्याच्या पातेल्यात पळी फिरवताना होणारा खटखट आवाज, खजूर्-चिंचेच्या चटणीचा वास, मंद वाहणारा खारा वारा, आजुबाजूला पाण्यात डुंबूणार्‍या पोरासोरांच्या आरोळ्या, ह्याच्या ऐवजी प्लॅस्टीकच्या निष्प्राण, पांढर्‍या ताटलीत, डिस्पोजेबल हातमोज्यात पुढे आलेली भेळ एसी खोलीत एकट्याने बसून खाण्यात कितपत मजा आहे?
पण त्याच्याच बरोबर, मुळात भेळ चविष्ट असली पाहिजे हेही तितकेच महत्वाचे !!

दुसरं असं की, लेखकाचा हात धरून नित्य नव्या देशा जाण्यात असलेली मजा हा तर वाचनानंदाचा अविभाज्य भाग! तसा तो नसता तर सिंदबादच्या गोष्टी आणि गुलिव्हरच्या सफरी जगभरात गाजल्याच नसत्या!

मराठी साहित्य (?)

पुस्तक परिक्षणाबद्दल धन्यवाद. पण पुस्तक मराठी साहित्यापेक्षा इतिहासाच्या जास्त जवळ आहे.

लेखनदोष

पण पुस्तक मराठी साहित्यापेक्षा इतिहासाच्या जास्त जवळ आहे.

पक्षी साहेब(की काकू?)
मोकळ्या प्रतिसादाबद्दल आभार.
पुस्तक परिक्षणातून मी फायनाशियल थ्रिलर (आर्थिक थरारकथा) या लेखनशैलीतल्या एका कादंबरीची ओळख करून द्यायचा प्रयत्न केला होता.
त्यातून आपल्याला इतिहासाचा भास झाला असेल तर ती परिक्षकाच्या टीकेची लेखनत्रुटी (की मर्यादा?) समजावी. मुळात पुस्तकाची धाटणी कादंबरीची आहे.

समुदाय

तुमच्या पुस्तक परिक्षणाची ही त्रुटी नाही. सध्या इथे इंग्रजी साहित्यावर समुदाय नसल्याने आपण पुस्तक परिक्षण मराठी साहित्य या समुदायात टाकले. पण ही कादंबरी ऐतिहासिक थरारकथा असल्यासारखे वाटले. तिचे वर्णन तसेच केल्याचेही वाचनात आले म्हणुन असे म्हणालो.

मस्त

परिक्षणाची शैली आवडली.. कथानकाइतकेच परिक्षणहि रंजक झाले आहे.
लायब्ररीत शोधली पाहिजे आता हि कादंबरी

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

असेच म्हणते.

असेच म्हणते. नक्की वाचणार. मस्त - उत्सुकता वाढवणारे परीक्षण.

असेच म्हणतो

परीक्षणाची शैली आवडली.

अति अवांतर : बारुख स्पिनोझा हासुद्धा त्याच सेफार्डिक ज्यू समाजातला...

+१

परीक्षण आवडले. पुस्तकाबद्दल उत्सुकता वाटते.

वा..

परिक्षणाची शैली आवडली..
ऋषिकेशसारखेच म्हणते.
स्वाती

 
^ वर