"लक बाय चान्स"

हा चित्रपट येऊन काही महिने उलटले तरी पहाण्याचा योग कालपर्यंत आला नव्हता. अनेक चित्रपट पाहिले जातात पण थोडेसेच लिहिण्यासारखे असतात. "लक बाय चान्स" हा त्यापैकी एक.

डिस्क्लेमर : पुढील काही परिच्छेदांत , चित्रपटाच्या कथानकादि घटकांबद्द्ल माहिती आहे. ज्यांना त्याबद्दल वाचायचे टाळायचे असेल त्यांनी वाचू नये.

हा चित्रपट एका होतकरू , चित्रपट-नायक बनू पहाणार्‍या तरुणाच्या - "स्ट्रगल"च्या दिवसांची कहाणी रेखाटतो. एका बिनचेहर्‍याच्या , बिननावाच्या अस्तित्त्वापासून पदार्पणाच्या यशापर्यंत त्याचा प्रवास कसा घडतो आणि या प्रवासादरम्यान त्याचे त्याच्या आजूबाजूच्या लोकांशी नाते कसे घडते ? हे झाले स्थूलमानाने कथानक. या सगळ्या नात्यांमधे त्याचे सगळ्यात महत्त्वाचे नाते (अर्थातच) त्याचे प्रेमपात्र असलेल्या , जवळजवळ त्याच्याइतक्याच नवी असलेल्या मुलीबरोबरचे. चित्रपटात असे वळण येते की चित्रपट या नायकाचा म्हणून सुरू तर होतो ; पण त्याच्या या प्रेयसीचा बघता बघता होऊन जातो .... मला वाटते , कथानक याच्यापेक्षा सांगणे अयोग्य होईल.

कथानक पूर्ण

चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन आहे झोया अख्तरचे. झोया म्हणजे जावेदसाबांची मुलगी आणि फरहानची बहीण. सिनेमाचा नायक आहे फरहान आणि नायिका आहे कोंकोणा सेन.
झोयाबाईना हा चित्रपट सुचला सुमारे ७ वर्षांपूर्वी. या संकल्पनेला प्रत्यक्षात यायला इतकी वर्षे गेली. दरम्यानच्या काळात नायक-नायिका बदलत गेल्या. शेवटी फरहान-कोंकोणा यांनी हा चित्रपट केला.

तर अशा या चित्रपटाबद्दल मुद्दामहून लिहावे असे काय ? तर अर्थातच , चित्रपटाची , कथानकाची हाताळणी.

सर्वप्रथम सांगायचे तर हा चित्रपट पहाणे हा अतिशय आनंददायक अनुभव बनला , याचे कारण , चित्रपटाच्या टायटल्स पासून शेवटच्या प्रसंगा-फ्रेम पर्यंत जपलेली अर्थपूर्णता. (सटल्टी ला योग्य मराठी शब्द काय ?) हिंदी चित्रपट बर्‍याचदा गाळून गाळून पहावा लागतो. अर्थहीन तण कापत कापत. इथे म्हणजे प्रत्येक प्रसंग आस्वाद घ्यावा असा.

या चित्रपटाचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल केलेली ही एक टिप्पणी आहे. आणि ही टिप्पणी आहे अर्थातच , नर्मविनोदी. इथल्या माणसांमधल्या , त्यांच्या व्यवहारांमधल्या विसंगती, स्पर्धा, स्वार्थ , असूया , खोटेपणा , यशापयश, नातेसंबंध, त्या संबंधांमधला तात्पुरतेपणा इ. इ. बद्दलची टिप्पणी. आणि यात कुठेही , भडक, बटबटीतपणाचा स्पर्श नाही. म्हणजे , प्रसंगी माणसे बटबटीत वागतात, ढोंगीपणा दाखवतात ; पण त्याचे चित्रण मात्र अगदी अलगदपणे केलेले आहे. किंवा एरवी ढोंगी , बटबटीत वागणार्‍या कुणाचे ठसठसते दु:ख कधीकधी व्यक्त होते. या चित्रपटाचा मला सगळ्यात आवडलेला पैलू म्हणजे , ही नजाकत. अशा छोट्या छोट्या क्षणांना शब्दबंबाळपणा किंवा आचरटपणा यांचा शाप नाही.

चित्रपटात उपरोक्त सर्वात महत्त्वाच्या दोन पात्रांशिवाय अक्षरशः डझनावारी पात्रे आहेत. ऋषि कपूर, डिंपल , जुही चावला , संजय कपूर , हृतिक रोशन आणि नवतारका इशा श्रावणी यांच्या भूमिका या दोघांच्या खालोखाल महत्त्वाच्या. यांच्या व्यतिरिक्त शाहरुखखान पासून आमीर खान पर्यंत आणि करीनाकपूर पासून बोमन इराणी पर्यंत अनेकानेक लोकांची एकेका प्रसंगापुरती हजेरी आहे. या सार्‍यांना "ओम शांति ओम" सारखे , एकाच लांबच लांब गाण्यात गुंफण्यापुरते आणलेले नाही , तर या सर्वांच्या प्रसंगांना चित्रपटाच्या "थीम" च्या संदर्भात अर्थपूर्ण स्थान आहे. या मोठ्या मोठ्या स्टार्स च्या "कॅमीओज" इतकेच महत्त्वाचे आहेत अनेक इतर , अनोळखी सहकलाकारांचे छोटे छोटे प्रसंग. मग ती एखादी नायिकेची मैत्रीण असो , नायकाचे मित्र असोत , कुणाचे पी ए असोत , एखादी नृत्यदिग्दर्शिका असो ... कोणाच्याही छोट्याशा संवादामधे आनंद घेण्यासारखे , काहीतरी नर्मविनोदी किंवा अर्थपूर्ण असे काहीतरी आहेच. सगळ्यांना आपल्या मिळालेल्या तुकड्याचे चीज करायला मिळाले आहे. संजय कपूर , ऋषि कपूर यांना माझ्या मनात फार मोठे अभिनेते म्हणून स्थान नव्हते. मात्र या चित्रपटात त्यांना मिळालेल्या महत्त्वाच्या भूमिकेत ते फिट्ट बसतात , त्यांना मिळालेले प्रसंग खरोखरच एंजॉय करण्यासारखे.

अर्थात , उपरोल्लेखित वास्तववादी चित्रण , किंवा अर्थपूर्ण हाताळणी हाच काही या चित्रपटाचा एकमेव मानबिंदू नव्हे. किंबहुना , त्याच्याइतकेच महत्त्वाचे आहेत काही असे चर्चिलेले मुद्दे जे कथानकाच्या ओघाने येत रहातात. हे मुद्दे जुने आहेत - जसे , "तकदीर की तदबीर ?" म्हणजेच , "नशीब की कर्तृत्व ?" किंवा " फेट् की चॉइस?" . मात्र चित्रपटात चितारलेल्या एकूण अनिश्चिततेच्या , उमेदवारीच्या , जीवघेण्या स्पर्धेच्या चित्रणात , एकूण कथानकात हे प्रश्न अलगदपणे गोवले जातात . म्हणूनच अर्थपूर्ण वाटतात.

जवळजवळ सगळा चित्रपट नायकाच्या पर्स्पेक्टीव्हने मांडला जातो. मात्र शेवटच्या प्रसंगात नायिकेचा नि नायकाचा जो संवाद होतो तो प्रसंग सोन्याचा. त्या एका प्रसंगाने नायिकेच्या पात्राला एका निराळ्य प्रतलावर नेऊन ठेवतो - आणि चित्रपटाच्या एकंदर परिणामालाही.

कोंकोणा सेन आणि फरहान अख्तर दोघांचीही कामे उत्तम यात वेगळे सांगायला नको. मात्र शेवटी काहीही झाले तरी हा चित्रपट झोया अख्तरचा आहे. चित्रपटाच्या संकल्पनेपासून एकेका फ्रेमवर तिचे गोंदण उमटलेले आहे. आणि एकेक पैलू निरखून पारखून घेतलेला.

इतके सगळे गुणगान गाइल्यावर अर्थातच काही न आवडलेले रहातेच. काही बाबींवर अगदी काहीच इलाज नाही. उदा. फरहान अख्तरचा आवाज. या नटाचा पडद्यावरचा वावर एकदम जबर. पण तो बोलायला लागतो आणि अर्रर्रर्रर्र.... आपण हुकतो एकदम. एखाद दोन गाणी टाळली असती तर बरे झाले असते. त्या गाण्यांच्या चालींमधेही फार काही लक्षात ठेवण्यासारखे नाही. आणि माझे चुकत नसेल तर कोंकोणाताई अंमळ "खात्या-पित्या घरच्या" दिसतात. ( यात काही चूक आहे असे नाही ; पण मला व्यक्तिशः थोडे खटकले खरे. )

असो. हा चित्रपट मला आवडला. तुम्हाला आवडेल याची शाश्वती नाही. पण कुणी पाहिला असल्यास त्यांच्या मताशी ताडून पहायला नक्की आवडेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

लक बाय चान्स

परीक्षण लिहिण्याची पद्धत आवडली. पण माझं मत काहीसं वेगळं आहे. पूर्ण एकसंध चित्रपट एक चित्रपट म्हणून मला फारसा आवडला नाही, परंतू त्याचे काही काही तुकडे आणि बरीचशी पात्रं भन्नाट आवडली. हृतिक रोशनने मस्त काम केलं आहे. त्याचे ऋषी कपूरला पटवण्याचे सीन्स (विशेषतः आरशासमोरचा) मस्त झाले आहेत. चित्रपटांत काम करणार्‍यांना शेवटी आपल्या खर्‍या आयुष्यातही अभिनयाचा आश्रय घ्यावा लागतो, हे खूप छान दाखवलं आहे. 'मे जग हारा' या गाण्यात मात्र बिचार्‍या हृतिक रोशनला जे कपडे चढवले आहेत आणि त्याच्या केसांचं जे काही केलं आहे, ते बघून मला त्याची फार दया आली.

आणखी एक असाच लक्षात राहिलेला सीन म्हणजे हृतिकने नकार दिल्यावर ऋषी कपूर वेगवेगळ्या अभिनेत्यांना विचारतो तो. त्यातली एकेकाची उत्तरं आणि पुढे केलेल्या सबबी झकास आहेत. अभिषेक बच्चनने 'पिताजी आपको याद कर रहे थे' म्ह्णणं, रणवीर कपूरने 'हा २०१५ हे डेट्स देता हू' म्हणणं, अक्षय खन्ना मात्र सगळ्यात जास्त भाव खाऊन जातो. इतक्या वेळा मान हलवल्यावर फक्त 'नाही' एवढंच सरळ सरळ तो म्हणतो, हे जाम आवडलं.

या चित्रपटाची मला सर्वाधिक आवडलेली गोष्ट म्हणजे त्याचं कास्टिंग. ते इतकं योग्य आहे. इतके सगळे मोठे मोठे कलाकार आहेत या चित्रपटात. तरी त्यातल्या बर्‍याच जणांना काहीशाच सेकंदांपुरतं काम आहे. आणि त्यांनी त्या काहीशा सेकंदांत आपली छान छाप सोडली आहे. स्क्रीप्ट लिहिणारा आणि मग नायिकेला हिंदी शब्द येत नाही म्हणून स्क्रीप्टमधले शब्द बदलावे लागल्याने चरफडणारा अनुराग कश्यप, महाराजांकडे आपल्या नवर्‍याला घेऊन जाणारी आणि चॉकलेट खात खात मॅगझिनचा गॉसिप कॉलम वाचणारी आणि मग त्यात मोठं गॉसिप सापडल्यावर डोळे मोठ्ठे करणारी जुही चावला (जुही चावलाने मस्स्स्स्त काम केलं आहे.) वगैरे वगैरे. आणि फरहान अख्तर तर काय... रॉक ऑन पासून त्याच्याबद्दलचा आदर नुस्ताच दुणावला नाही तिणावला आहे. (:ड्) आणि शिवाय मला त्याचा आवाज विशेष करून आवडतो.

माझ्या मते या चित्रपटाचे मूळ कथाबीज, प्रसंगबांधणी, पात्रे, अभिनेते यांमुळे हा चित्रपट बराच बरा झाला आहे. परंतू दिग्दर्शन मात्र चांगलेच गंडले आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा चित्रपट त्याच्यातल्या कथेच्या प्रवाहामुळे नायकप्रधान वाटतो खरा, पण तो बनवला गेला आहे नायिकाप्रधान म्हणून. म्हणूनच पहिला आणि शेवटचा प्रसंग नायिकेचा आहे. आणि शेवटच्या प्रसंगात नायिकेचं जे स्वगत दिलं आहे, त्यावरून त्यावर शिक्कामोर्तब होतं. दिग्दर्शकाला मुळात हा नायिकेचा चित्रपट बनवायचा असावा, परंतू प्रसंग बांधताना ते तिच्या लक्षात राहिलं नसावं. एकूण दिग्दर्शनशैलीवर मधुर भांडारकरचा बराच प्रभाव जाणवतो.

असो, एकदा बघून आस्वाद घेण्यासारखा हा चित्रपट नक्कीच आहे

राधिका

राधिका

प्रतिसाद

सुरेख प्रतिसाद.

आणखी एक असाच लक्षात राहिलेला सीन म्हणजे हृतिकने नकार दिल्यावर ऋषी कपूर वेगवेगळ्या अभिनेत्यांना विचारतो तो. त्यातली एकेकाची उत्तरं आणि पुढे केलेल्या सबबी झकास आहेत. अभिषेक बच्चनने 'पिताजी आपको याद कर रहे थे' म्ह्णणं, रणवीर कपूरने 'हा २०१५ हे डेट्स देता हू' म्हणणं, अक्षय खन्ना मात्र सगळ्यात जास्त भाव खाऊन जातो. इतक्या वेळा मान हलवल्यावर फक्त 'नाही' एवढंच सरळ सरळ तो म्हणतो, हे जाम आवडलं.

या प्रसंगात बहुदा वास्तव आयुष्यात हे सगळे नट जसे वागतील तसे बहुदा दाखवले गेले असावे :-) अक्षय खन्नाचे खोटी कारणे न देता , शेवटी ".. न्नो !" असे म्हणणे त्याच्या वास्तव आयुष्यातल्या प्रतिमेशी जुळणारे वाटते. आणि अभिषेक बच्चनचे आपल्या वडलांच्या पदराखाली दडणेही ;-)

:ड्

आणि अभिषेक बच्चनचे आपल्या वडलांच्या पदराखाली दडणेही ;-)

:ड्

राधिका

छान परि़क्षण

मला फरहान अख्तरचा आवाज आवडतो, तरीही हा सिनेमा आवडला नाही.

आता फारसा आठवत सुद्धा नाही पण् आवडला नाही इतके आठवते आहे (म्हणूनच विसरला गेला असावा.. ;)

अरे वा!

सुंदर परीक्षण. वाचून चित्रपटाबद्दल उत्सुकता वाटते आहे. बघायला हवा.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

हेच म्हणतो

उत्सुकता वाटते आहे.

बाय द वे यूट्यूबने यूट्यूब मूवीज आणि यूट्यूब शोज असे दोन चॅनेल चालू केले आहेत असे वाचले. चित्रपटनिर्मितीसंस्थांशी करार करुन त्यांचे पूर्ण लांबीचे चित्रपट कायदेशीररीत्या यूट्यूबवर पाहता येतील. :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

रटाळ

खूपच लाम्बवल्यासारखा वाटला. आता आठवतसूद्धा नाही पण नाविण्यपूर्ण काहीच नव्हते.

परत वा!

चित्रपट पाहिला. आणि मग परत पाहिला.

बरेच दिवसांनी असा चित्रपट बघायला मिळाला. लेखातील बहुतेक सर्व मुद्यांवर सहमत आहे. फरहानचा आवाज सोडून, मला ठीक वाटला. ऋषी कपूरने कमाल केली आहे. त्याच्या अभिनयातील बारकावे लाजबाब आहेत. निर्माता कथा सांगत असताना चणे की शेंगदाणे खाणे किंवा डिंपलच्या मागण्यांना संयम राखून तोंड देणे. लेखात म्हटल्याप्रमाणे यात कुणीही संपूर्ण चांगले किंवा वाइट नाही. सगळे आपापले अस्तित्व टिकवून धरण्यासाठी झगडत आहेत. यातील विनोदही अफलातून. खून च्या जागी मर्डर कर देता हूं किंवा अभिषेक, अक्षय यांचा वेगवेगळ्या तर्‍हेने चित्रपटाला नकार देणे.

फिल्मी दुनियेत असणारी हिप्पोक्रसी, कुठलाही आवेश न आणता अत्यंत कौशल्याने चित्रित केली आहे. अर्थात यात झोयाचा वाटा किती आणि फरहान, जावेद, शबाना यांचे सहाय्य किती असा प्रश्न पडणे साहजिक आहे. किंबहुना झोयाला यांचे पाठबळ नसते तर हा चित्रपट असा बनू शकला असता का असाही प्रश्न पडतो. पण अशा जरतर प्रश्नांना काही अर्थ नाही. आहे हे असे आहे. चित्रपट उत्कृष्ट झाला आहे यात वादच नाही.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

 
^ वर