एक बाळबोध प्रश्न

महाराष्ट्रात 'हिंदू धर्म बालसंस्कार दिनचर्या' सदराखाली संध्याकाळी दिवेलागण झाल्यानंतर किंवा संध्याकाळी 'देवापुढे दिवा' लावल्यानंतर पुढील सुभाषित म्हटले जाते - (जात असे असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल)

शुभंकरोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा |
शत्रुबुद्धी विनाशाय दीपोज्योति नमोस्तुते||

या संस्कृत ओळींनंतर मराठीत -

दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतिहार, दिव्याला पाहून नमस्कार||
दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी||
घरातली पीडा बाहेर जाऊदे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊदे, घरच्या धन्याला उदंड आयुष्य मिळूदे||

अशा ओळी म्हटल्या जातात. ही झाली सर्वसाधारण माहिती.
मला पडलेले काही बाळबोध प्रश्न असे-
१. अग्नीपूजा हे मूळ धरून संस्कृत श्लोकांचा उद्गम समजू शकतो. पण हे श्लोकवजा सुभाषित प्रथमतः कोणत्या पुस्तकात/ग्रंथात लिहिले गेले? कर्ता कोण?
२. महाराष्ट्रात अनेक गायिकांनी हा श्लोक गायिला आहे. एक आधारित मराठी गाणेही पटकन आठवते.पण इतरभाषिय प्रांतात हा श्लोक इतका प्रसिद्ध झालेला आढळत नाही. शिवाय 'शत्रुबुद्धी विनाशाय'च्या जागी 'ममबुद्धी प्रकाशाय' असे शब्द कुठेकुठे आढळतात. असे का असावे? हा श्लोक कोण्या बर्‍यापैकी अर्वाचिन महाराष्ट्रीय संस्कृत पंडिताने रचला असावा काय?
३. मूळ संस्कृत श्लोकाला जोडून आलेल्या मराठी ओळी महाराष्ट्राच्याच वेगवेगळ्या भागात बदललेल्या आढळतात का? कुणी काही अन्य ऐकले असेल तर कृपया माहिती द्यावी.
४. दीपत्कार या शब्दाचा अर्थ काय?
५. संस्कृत श्लोकानंतरच्या मराठी ओळी कोणी व कोणत्या काळात रचल्या? की त्या ओळी लोकसाहित्य स्वरूपातील आहेत?

याशिवाय या अनुषंगाने 'दीपकाला प्रार्थना' या विषयावर अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

क्षुद्रबुद्धी!

"क्षुद्रबुद्धी विनाशाय" असेच आम्ही म्हणत आलोय.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

रोचक

रोचक प्रश्न आहे. यावरचे प्रतिसाद वाचायला आवडतील.तुम्ही जो श्लोक दिला आहेत, तोच मी अगदी जसाच्या तसा म्हणते
राधिका

आणखी एक ओळ -

आणखी एक ओळ काही वेळा ऐकलेली आठवते -
तिळाचं तेल, कापसाची वात, दिवा कळू दे मध्यानरात||

जळू दे

तिळाचं तेल, कापसाची वात, दिवा जळू दे मध्यानरात||

बाकी उत्तरे माहीत नाहीत.

जे आणि के

जे आणि के शेजारी असल्याने टंकलेखनात चूक झाली. ;)
क्षमस्व!

कळू दे(?)

कळू दे की जळू दे?

शत्रूबुद्धी आणि क्षुद्रबुद्धी हे मौखिक बदल (वेरिएशन) वाटते. अशाच प्रकारचे बदल जय जगदीश हरे आणि इतर आरत्यांतही दिसून येतात.

बाकी,

शुभंकरोति कल्याणम् मी वर दिल्याप्रमाणेच म्हणत असे. परंतु, मूळ सुभाषित सोडल्यास बाकीचे मला बडबडगीत वाटायचे.

दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतिहार

कोणाच्या कानी कुंडले आणि मोतिहार (बहुधा गळ्यातच असावा, कानात नाही) ते कळलेले नाही.

ही ओळ मी अशी म्हणते-

तिळाचं तेल, कापसाची वात, दिवा तेवो मध्यान्रात.
राधिका

आमच्याकडे

तिळाचं तेल, कापसाची वात, देवांनो तुम्हाला सांजवात ..

बाकी सगळे तसेच.

रोचक प्रश्न

दिव्या दिव्या दिपत्कार नंतर आम्हि असे म्हणतो:

तिळाचं तेल कापसाची वात
दिवा जळु दे सारी रात

घरातली इडापीडा बाहेर जावो
बाहेरची लक्ष्मि घरात येवो
घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो

(नंतर कैलासराणाचा पहिला श्लोक, मग सुखादुखाला सुखप्राप्त झाले... मग नेत्री दोन हिरे.. मग मोरया मोरया.. असे अनेक श्लोक लहानपणी एका रांगेत म्हटल्याचे आठवत आहे )

बाकी हे प्रश्न मलाहि होते.. कधी विचारले नाहि इतकेच :)
उत्तरांची वाटा पातोय

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

बडबड गीत

दीपत्कार या शब्दाचा अर्थ काय?

माझ्या मते तो काव्यसौंदर्याचा भाग असावा. पाडगावकरांनी थेंबोणी असा पावसाच्या थेंबाला शब्द दिला काव्यात गेयता किंवा लय साधण्या साठी वापरलेला.
बाकी लोकसाहित्य मौखिक परंपरा यातुनच हे श्लोक जपले गेले असावेत. प्रियाली म्हणते तसा बडबड गीताचा चेहरा या काव्यांत अधिक दिसतो.
बदका बदका नाच रे!
तुझी पिल्ले पाच रे!
एक पिल्लु म्यालं! ( मेलं)
गाडीत घालून न्यालं! (नेलं)
गाडी गेली डोंगरी!
आपन जाउ बाजारी!

प्रकाश घाटपांडे

सहमत्

मी ही मूळ लेखातलेच श्लोक ऐकले व म्हटले आहेत..
दिवा लावणे ही तर परंपरा होतीच.
दीपत्कार म्हणजे दिव्याचे उजळणे..जसे टणत्कार व चमत्कार..
कानात घातलेल्या कुंडलाप्रमाणे (आत छोटी ज्योत व भवताली वलय) असा दिवा दिसतो.

अशा अनेक ओळी केवळ् प्रथा परंपरेने एकत्रित झाल्या आहेत. देवाच्या आरतीनंतरी घालीन लोटांगण पासून मंत्रपुष्प् आणि प्रदक्शिणा मंत्रापर्यंत अशीच संस्क्रुत मराठी विविधता दिसते.

शुभम्‌ करोति आणि दीपत्कार

शुभम्‌ करोति..या श्लोकात काही संस्कृत व्याकरणाच्या चुका असाव्यात. 'शुभं करोति' ऐवजी 'शुभं कुरुष्व' म्हटले तर अधिक योग्य होईल. धनसंपदा हा शब्द देखील खटकतो, तो धनसंपद: असा असायला हवा होता. कल्याणम्‌, आरोग्यम्‌ ही द्वितीया विभक्तीतील रूपे आहेत, संपद: ही तसेच हवे.
चमत्कार, साक्षात्कार टात्कार, टणत्कार (टात्‌ किंवा टणत्‌ असा आवाज), सत्कार या जंत्रीत दीपत्कार बसत नाही. दीपत्‌ असा मूळ शब्द नाही. कदाचित तो दीप्तचा अपभ्रंश असेल.
तरीसुद्धा परंपरेने आलेले हे श्लोक जशेच्या तशे म्हणायला काही हरकत नसते, नव्हे ते तसेच म्हणावेत. 'सत्यमेव जयते' मधले 'जयते' हे वैदिक रूप अशुद्ध असून ते 'जयति' असे हवे, हे किती जणांना पटेल? मूळ श्लोक:
सत्यमेव जयति, नानृतम्‌
सत्येन पन्था विततो देवयान: ।
येनाक्रमन्तिऋषयो ह्याप्तकामा
यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्‌ ॥
--मुण्डकोपनिषद्‌ ३.१.६

दीपोत्कार्?

दीपोत्कार असा शब्द नाहीए ना? मला का कोण जाणे असंही म्हटल्याचे आठवत आहे. कदाचित मी चूकही असू शकेन. कल्पना नाही.

पण बरीच माहीती कळली या धाग्यातून! :)

धन्यवाद, पण अजूनही -

सर्व प्रतिसाददात्यांना धन्यवाद.
प्रियाली, प्रकाश घाटपांडे यांच्या मते मराठी ओळी या मौखिक परंपरा किंवा लोकसाहित्य यातून प्रसारित झाल्या.
तर वाचक्नवी यांच्यामते संस्कृत श्लोकही व्याकरणदृष्ट्या सदोष आहे.म्हणजे तोही मौखिक परंपपरेचाच एक भाग झाला.

दैनंदिन संस्कारात समाविष्ट होण्याइतकी आणि त्या संस्काराला 'शुभंकरोति' असेच विशेषनाम मिळण्याइतकी महत्त्वाची गोष्ट असल्याने तिच्याबद्दल माहिती मिळवण्याचे अगत्य मला वाटते.
मग ही मौखिक परंपरा संस्कृतमध्ये कधी सुरू झाली असावी? आणि तिला मराठी ओळी कधी चिकटल्या?
वाचक्नवींनी उल्लेखलेल्या चुका आजपर्यंत कुणी दुरुस्त करण्याचा प्रयत्न का केला नसेल?
महाराष्ट्रात होऊन गेलेले अनेक विद्वान त्यांच्या लहानपणी 'शुभंकरोति' त्यातील मराठी ओळींसकट म्हणत असणार. त्यातील कोणी त्यांच्या मोठेपणी या संस्कृतातील चुका किंवा 'दीपत्कार'सारखे शब्द दुरुस्त करण्याकडे लक्ष दिले होते काय?

जाणकारांनी या विषयावर अधिक प्रकाश टाकावा अशी इच्छा आहे.

विचारच केला नव्हता

या "संस्कृत" श्लोकाबद्दल मी पूर्वी विचार केला नव्हता.

आमच्या घरीही "शत्रुबुद्धि" शिकवले जाते. "क्षुद्रबुद्धि" पाठ चांगला वाटतो.

हा श्लोक मराठीभाषकांच्या चर्चांमध्येच महाजालावर दिसतो. अन्य भाषकांच्या चर्चांत दिसत नाही. त्यामुळे त्याचा प्रसार मराठी प्रदेशापुरताच असावा. कदाचित मराठी बोलणार्‍या, संस्कृतशी तोंडओळख असणार्‍या कोण्या कवीने लिहिला असावा.

हल्लीच रामजोशी शाहिराच्या रचनांचे पुस्तक वाचायला घेतले आहे. त्याने काही संस्कृत रचना केल्या आहेत. त्या रचनांमध्ये एका प्रकारचा मराठमोळेपणा जाणवतो. (पूर्वीच्या संस्कृत काव्याशी शैलीचा फरक जाणवतो, व्याकरणाच्या बाबतीत दुर्लक्ष जाणवते.) त्या काळातल्या कोण्या कवीने हा श्लोक रचला असल्याचे कोणी मला सांगितले, तर मला आश्चर्य वाटणार नाही. नाहीतरी रामजोशी शाहिराचे साहित्य हल्लीहल्लीच मौखिकी परंपरेतूनच गोळा झालेले आहे. होनाजीची "घनश्याम सुंदरा" भूपाळी कित्येक मराठी घरांमध्ये ठाऊक असते.

माणिक वर्मा यांच्या गायलेल्या ध्वनिफितीत "धनसंपदा" असा प्रयोग सापडतो. तसेच लता मंगेशकर यांनीही "धनसंपदा" असेच म्हटले आहे. लता मंगेशकर "शत्रुबुद्धि" असे शब्द गातात, "दीपज्योतिर् नमोस्तु ते ।" असा "र्" असलेला उच्चार गातात. अमेरिकेतील विश्वहिंदूपरिषदेच्या संकेतस्थळावर "धनसंपदः" असा पाठ आढळतो.

मौखिकी रूढीने आलेल्या पाठ्याचा संस्कृतात अर्थ लावला तर लागतो, पण तो फारच द्राविडी प्राणायाम करून लागतो.
शुभंकरोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा | हे एक वाक्य; आणि
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते|| हे दुसरे वाक्य मानले, तर

धनसंपद् च्या ठिकाणी धनसंपदा असा आधुनिक प्रयोग मानता येईल, प्रथमा एकवचनात.
(जसे वाच्->वाचा; त्वच्->त्वचा; दिश्->दिशा... तसेच संपद्->संपदा हा त्याच अर्थाचा शब्द. व्यंजनांत शब्दांपेक्षा आ-कारांत शब्द हे स्त्रीलिंगी म्हणून प्राकृतभाषकांना जास्त पटत असावेत.)
पहिल्या ओळीचा अर्थ - धनसंपदा ही शुभ आरोग्य आणि कल्याण करते.

"दीपज्योति" या शब्दाला जुन्या संस्कृताशी जोडणे कठिण जाते. आगीच्या ज्वालेला किंवा दीपशिखेला "ज्योति/ज्योती" फारसे म्हणत नसत. त्यातल्या त्यात "ज्योतिष्" हाच शब्द तेजस्वी पिंडाला वापरला जाई. त्याचे रूप संबोधनात "ज्योतिर्-(नमो)..." असे होईल. "ज्योती" या मराठी-संस्कृत शब्दाचे "ज्योति!" असे संबोधनही ठीक आहे.

पूर्ण श्लोकाचे एकवाक्य करायचे असेल तर "धनसंपदा" हे धनसंपद् चे तृतीय एकवच न केले तर चालेल. अर्थ धनसंपदेच्या मार्फत ती ज्योत शुभ, कल्याण, आरोग्य करते.

हा सगळा उलटसुलट प्रकार करण्याऐवजी तो श्लोक मराठी श्रोत्यांसाठी आहे असे मानावे. काही अम्-कार संस्कृत-सौंदर्याचा आभास करण्याकरता, काव्यालंकार म्हणून, घेतलेले आहेत (वयं मोठं खोटम् सारखे ), असे मानूनही अर्थ चांगला लागतो.

"दीपत्कार" हा साक्षात्कार-वगैरे शब्दांशी मनातल्यामनात यमक जुळवण्यासाठी, गोडव्यासाठी (शिवाय वृत्त साधण्यासाठी) कवयित्रीने निर्माण केला असावा, असे वाटते. वाचक्नवी आणि प्रकाश घाटपांडे यांच्याशी मी सहमत आहे.

 
^ वर