संतसाहित्याचा भाषेवरील प्रभाव

वैयक्तिक मते बाजूला ठेवून भाषेच्या अभ्यासाच्या द्रुष्टीने पाहिले तरी संतसाहित्याचा भाषेवर पडलेला प्रभाव स्पष्ट दिसतो आणि तो कोणालाही मान्य होईल. उदाहरण म्हणून खाली दिलेला अभंग पाहा. बोली भाषेत वारंवार वापरले जाणारे ५ वाक्प्रचार या एकाच अभंगात किती खुबीने गोवले गेले आहेत!

खटपट करणे, दातखीळ बसणे, बापाचे काय जाते, दाही दिशा न पुरणे, माती जड होणे

यातील काही काही वाक्प्रचार कदाचित तुकाराम महाराजांच्या आधी देखील वापरात असतील पण त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्याचे श्रेय त्यांनाच मिळते. संतांचं अध्यात्म मान्य नसणाऱ्यांना देखील त्यांचे काव्य आणि भाषेचं लेणं भावेल असं मला तरी वाटतं.

पोटासाठी खटपट करिसी अवघा वीळ ।
राम राम म्हणता तुझी बसली दातखीळ ॥ १ ॥
हरीचे नाम कदाकाळी कारे नये वाचे ।
म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे ॥ २ ॥
द्रव्याचिया आशा तुजला दाही दिशा न पुरती ।
कीर्तनासी जाता तुझी जड झाली माती ॥ ३ ॥
तुका म्हणे ऐशा जीवा काय करू आता ।
राम राम न म्हणे त्याचा गाढव मातापिता ॥ ४ ॥

लेखनविषय: दुवे:

Comments

महत्वाची बाब..

उदाहरण म्हणून खाली दिलेला अभंग पाहा. बोली भाषेत वारंवार वापरले जाणारे ५ वाक्प्रचार या एकाच अभंगात किती खुबीने गोवले गेले आहेत!

तुकोबांसारख्या थोर संतकवींनीही आपल्या काव्यात प्रमाणभाषेपेक्षा बोलीभाषेचा वापर केला ही बाब मला महत्वाची वाटते!

शंतनुराव, छोटेखानी लेख छान.

आपला,
(बोलीभाषा प्रेमी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

प्रमाण आणि अप्रमाण बोलीचे इथे काही दिसत नाही

उदाहरणात दिलेला अभंग तरी मला प्रमाणबोलीतलाच दिसत आहे (म्हणजे पुण्याच्या आजूबाजूच्या सुशिक्षित लोकांची बोली).

येथे प्रमाण विरुद्ध अप्रमाण मत मांडण्यासारखे काही मला प्रकर्षाने जाणवत नाही.

काही संतकवींनी प्रमाणेतर बोलींमध्ये उत्तम रचना केली आहे. काव्याला प्रमाण-प्रमाणेतर असे सर्टिफिकिट ("प्रमाण"पत्र!) लागत नाही. प्रमाण-प्रमाणेतर फरक वर्तमानपत्रातील लेखांना, आणि बिगर-खाजगी पत्रांनाच महत्त्वाचा असतो. (म्हणून ही बाब शाळेत शिकवणे जरुरीचे असते.)

"खटपट करणे", "दातखीळ बसणे" वगैरे प्रमाणबोलीत आणि प्रमाणलेखनात चालणार नाही असे तुमच्या कोण्या शिक्षकाने सांगितले असेल तर वाईट वाटते. अशा शिक्षकाने शाळेत मराठी शिकवू नये. पण मग तुमचा राग त्या शिक्षकाबद्दल हवा, आणि शिक्षणसंस्थांचा दर्जा वाढवण्याबाबत हवा. तुकारामाला त्याचा अधिकार असलेला साहित्यिक मान देण्यापूर्वी त्याचे प्रमाणलेखन बळेच अप्रमाण वाटून घेण्याची गरज वाटू नये. तसेच अन्य काही कवींना मान देण्यापूर्वी प्रमाण-अप्रमाण बोलीचा निकष लावायची गरज नाही.

बोलीभाषा आणि प्रमाणभाषा: व्याख्या

बारा कोसाच्या जरा पलीकडे राहणार्‍या लोकांना जी परकी वाटते ती बोलीभाषा. बारा हजार कोसांच्या अंतरावर राहणारे लोकही जे वाचून समजू शकतात ते प्रमाणभाषेतले लेखन!--वाचक्‍नवी

विषय फारच रोचक

विषय फारच रोचक आहे. बरेच काही लिहिता येईल, भर घालता येईल असा आहे. तुकोबांचे अभंग तर लोकोक्तीचा भाग बनले आहेत. त्यामुळे तुकोबांची गाथा वाचली तर पदोपदी मराठी म्हणी आणि वाक्प्रचार वाचतो आहोत असेच वाटत राहते.

तुकोबांच्या अशा लगेच आठवणाऱ्या काही ओळी

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
हाचि नेम आतां न फिरें माघारी
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं
कानडीनें केला मऱ्हाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये
वसनें थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी
श्वानासी भोजन दिलें पंचामृत । तरी त्याचें चित्त हाडावरि
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे
मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदू ऐसे
भले तरी देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठी देऊं माथा

अलंकारिक भाषा

तुकारामाने वापरलेली अलंकारिक भाषा आता सामान्य बोलण्यात रूढ झाली आहे, याचे उदाहरण मजेदार वाटले. (शेक्स्पियरबद्दल इंग्रजीत अशीच उदाहरणे देतात.) अशा प्रकारे अलंकार वापरणे म्हणजे उच्च प्रतीची प्रतिभा होय.
धन्यवाद शंतनू.

आश्चर्यकारक,

संताच्या समाज प्रबोधान कार्याकडे आणि द्रुष्टी कडे पाहिल्यावर ह्या मागे नक्की काय उद्देश असेल याचि जाणिव आश्चर्यकारक आहे!

शब्दांचा इतिहास

आपल्याकडे शब्दांचा, म्हणींचा आणि वाक्‌प्रचारांचा लिखित इतिहास सहजासहजी उपलब्ध होत नाही. इंग्रजीत एखादा शब्द पहिल्यांदा केव्हा लिखाणात आला आणि जर अप्रचलित झाला असेल तर सर्वात शेवटी केव्हा वापरला गेला हे सांगणारे शब्दकोश आहेत. उदाहरणार्थ, द शॉर्टर ऑक्सफ़र्ड डिक्शनरी ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्ज़. मराठीत असे कोश असते तर तुकारामाने वापरलेले वाक्‌प्रचार आधीपासून होते की त्यांतले काही त्याने स्वत: निर्माण केले ते समजले असते. आपल्या दृष्टीने ते तुकारामाने वापरले म्हणूनच रूढ झाले असा काहीसा प्रकार आहे. --वाचक्‍नवी

मस्त विषय !

संत तुकारामांच्या अभंगाची भाषा आणि तुकोबांचा उद्देश पाहिला की लक्षात यावे की, सामान्य माणसाला आपले बोलणे कळावे याच उद्देशाने तुकोबांनी अभंग रचना केली असावी. साधी सुटसुटीत अशी भाषा त्यांनी वापरली आहे. तत्वज्ञान किंवा काव्य यातील सांकेतिक कल्पनांपेक्षा शेती,व्यवहार, व्यापार यातील उपमा -दृष्टांत वापरुन तुकारामांनी त्यांच्या अभंगाची भाषा लोकाभिमुख (लोक जे बोलतात त्यांच्याच बोलण्यातले शब्द ) केली आहे. म्हणून तर त्यांच्या भाषेला सुभाषिताचा दर्जा प्राप्त झाला आहे.

चित्तरंजन वर टाकलेली उदाहरणे त्याचाच एक नमुना आहे.

आलीया भोगाशी असावे सादर | देवावर भार ठेवूनिया
निश्चयाचे ऐसे बळ | तुका म्हणे तेची फळ |
नाही निर्मळ जीवन | काय करील साबण |
जगाच्या कल्याणा संताच्या विभूती | देह कष्टवीती परोपकारे |

अशी कितीतरी सुभाषिते तुकारामांच्या अभंगानी जनसामान्यांना दिली आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टीका; गट १

श्री शंतनू यांना भाषेवरील परिणाम म्हणजे नक्की काय म्हणावयाचे आहे ? कारण भाषा लेखी व मौखिक अशा दोन प्रकारची असते. आपण लिहतो तसे बोलत नाही किंवा बोलतो तसे लिहित नाही म्हणून अशी विभागणी करणे सोयिस्कर.तसेच संत वाङ्मय हे ज्ञानेश्वरमहाराज ते निळोबाराय यांच्यापुरतेच विचारात घेवू. तसेच काळ ठरवतांना स.१८०० पर्यंत आणि त्यानंतरचा असे दोन भाग करावेत. याचे कारण असे की, दुसऱ्या भागातील लेखक लिहतांना व माणसे बोलतांना त्यांच्यासमोर संत वाङ्मय नसते. संत वाङ्मयाचे अभ्यासक सोडले तर उरलेल्या लेखकांचा याच्याशी संबंध उरलेला नाही. वारकरी समाज सोडला तर इतर लोक हे लिखाण वाचतच नाहित.त्यामुळे परिणाम बघावयाचा म्हणजे स. १८०० पूर्वी पुरता.

प्रथम लेखी भाषा बघू. संत सोडले तर या काळातील लेखक म्हणजे पंत, तंत आणि बखरकार. पंतांचा संत वाङ्मयाचा अभ्यास होता. भरपूर होता. पण त्यांची लिहण्याची पद्धत निराळी होती. विषय निराळे होते. अंतीमत: परिणाम शून्य होता. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरमहाराज आणि वामन पंडित यांच्या गीतेवरील टीका पहा. कलगी-तुऱ्यातील बाष्कळपणा सोडला तर तंत कवीही बाजूला केले पाहिजेत. बखरकार तर बोलून-चालून राजकारणातील माणसे.त्यांच्यावर परिणाम फ़ारशीचा. अतएव १८०० पूर्वीही संत वाङमयाचा लेखी भाषेवर परिणाम काही नाही.

आता मौखिक भाषेबद्दल विचार करू. या बाबतीत आपणाला काहीही माहित नाही. आपणाला म्हणजे मला तरी. कारण स्वच्छ आहे. याचा कुठलाही पुरावा मिळणे दुरापास्त आहे. आजही आपणाला कोंकणी, वऱ्हाडी, माणदेशी, भाषांबद्दल जुजबी माहितीही नसते,अहिराणी, झाडी वगैरे सोडाच. मग उगाच ३००-४०० वर्षांपूर्वीच्या मौखिक भाषेबद्दल मते मांडण्यात काय अर्थ आहे ? जाची आपणाला कल्पनाही नाही तो विषय सोडून द्यावा हे बरे

आता प्रतिसादातील काही मुद्द्यांचा विचार करू.

१. चित्तरंजन
वृक्षवल्ली आम्हा, आम्हा घरी,हाची नेम आता, यांना लोकोक्त्ती म्हणने उचित वाटत नाही. वाचकांपैकी किती जणांनी यांचा लेखनात किंवा बोलण्यात एकदा तरी उपयोग केला आहे ? पाच जण सापडणे अवघड वाटते.

२. वाचक्नवी
महाराष्ट्र शब्दकोष तयार करतांना दाते-कर्वे यांनी शब्दाचा उपयोग प्रथम कोठे मिळतो त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तावना बघा.

३. बिरुटे सर
आपली चारही उदाहरणे लोकोक्त्तीपेक्षा जनमान्य सुभाषिते म्हणून वापरली जातात हे एकदम मान्य.

शरद

चिरंजिवी म्हणी

वृक्षवल्ली आम्हा, आम्हा घरी,हाची नेम आता, यांना लोकोक्त्ती म्हणने उचित वाटत नाही.

शरदराव, सुभाषितेदेखील लोकोक्तीचाच भाग असतात असा माझा समज. ह्याबाबतीत अनिल गुडेकर ह्यांचा लोकसत्तात आलेला खाली दिलेला लेख अगदी वाचावासा आहे.

चिरंजिवी म्हणी

‘म्हण‘ हा शब्द संस्कृत भण या धातुपासून अपभ्रंश होऊन बनलेला आहे. याचा अर्थ जे म्हटलेले आहे ते, जे म्हणण्यात येते ते. जी गोष्ट लोकांच्या वारंवार म्हणण्यात येते, बोलण्यात येते (थोडक्यात योग्य अर्थ सांगणारे) त्यास ‘म्हण‘ असे म्हणतात. संस्कृत ‘लोकोक्ति‘ व मराठी ‘म्हण‘ दोन्हीही एकाच अर्थाचे शब्द आहेत. कदाचित थोडक्यात योग्य अर्थ सांगणारे शब्द बोलताना म्हटले जाते की ‘म्हणतात ना...‘ म्हणून सुद्धा त्या शब्दांना ‘म्हण‘ म्हणून बोध गेले असेल, ‘म्हणीला‘ किंवा ‘लोकोक्तीला‘ आहं, ब्रू. वच, कथ हे चारही ‘बोलणे‘ या अर्थाचे धातु पूर्वीपासून वापरले गेले. ‘भण‘ धातुही पुढे वापरला गेला. त्या पासूनच ‘म्हणणे‘ हे मराठी क्रियापद व ‘म्हण‘ हे ‘नाम‘ निघाले. ‘कथ‘ पासूनच ‘कहावत‘ शब्द आला. हा धातु वैदिक काळीच लोप पावला. ‘आह, आहु, आहणा‘तून तो बोली भाषेत वापरला जातो. आभाणक, आहणा, ‘म्हण‘ ही एकाच तर्‍हेची परंपरागत, सर्वतोमुखीची वचने आहेत. मुक्तेश्वर ‘आह‘ वापरतो, तो ‘म्हण‘ या अर्थीच. सुभाषित, सूक्ति, लोकोक्ति, आभाणक, लौकिक प्रवाह, लोकप्रवाह लौकिकी गाथा, वाक्‌संप्रदाय, लौकिकोक्ति इ. पर्यायी शब्द ही ‘म्हणीस‘ वापरण्यात येतात.
म्हणीचा विचार व व्याख्या प्रथम केली ती ऍरिस्टॉलने.ती अशी Proverbs are remarks which on account of their shortness and correctness have been saved out of the wreek and ruins of ancient philosophy.
अलेक्झांडर क्राप आपल्या 'The science of folklore या ग्रंथात लिहितात की, ‘अगदी मार्मिकपणे शक्य तितक्या मोजक्या शब्दांत विदारक सत्य प्रगट करणारे वचन म्हणजे ‘म्हण‘. तर 'The words of the wise are as Gods असे म्हणीचे वर्णन बायबलमध्ये केले आहे. म्हणी या सर्व भाषांमध्ये आढळतात. भारतीयसुद्धा व विदेशीसुद्धा. युरोपीय भाषांतून ‘म्हणी‘साठी आलेले पर्यायी शब्द बहुतांशाने लॅटिनच्या Proverbium शी मिळते जुळते आहेत.
मराठी व हिंदी साहित्यकारांनी पण म्हणीची व्याख्या करण्याचे प्रयत्न केले आहेत. उदा. कोशाकार वि. वि. भिडे यांच्या मते ‘म्हण‘ म्हणजे ‘ज्यात काही अनुभव, उपदेश, माहिती, सार्वकालिक सत्य किंवा ज्ञान गोवलेले आहे, जे अल्पशब्दात्मक आहे, ज्यात काही चटकदारपणा आहे आणि लोकसंभाषणात वगैरे जे वारंवार योजनात असे वचन किंवा वाक्य‘. ‘चिमुकले, चटकदारपणाचे चतुर वाक्य‘ म्हणजे ‘म्हण‘ असे न.चिं.केळकरांना वाटते.
हिंदी लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी म्हणीमध्ये खूपच रस घेऊन अध्ययन केले आहे. ना.शं.अग्रवालांच्या मते म्हण म्हणजे ‘लोकोक्तियां मानवी ज्ञानके चोखे और चुभते हुए सूत्र है। अनंत काल तक धातुओंके तपाकर सूर्यराशी नाना प्रकारके रत्न उपरत्नोंका निर्माण करती है, जिनका आलोक सदा छिटकता रहता है। उसी प्रकार मानवी ज्ञानके घनीभूत रत्न है। जिन्हे बुद्धि और अनुभवकी किरणों से फुटनेवाली ज्योती प्राप्त होती है।‘ डॉ.एम.एस.दक्षिणामूर्ती म्हणतात, ‘कहावत सामान्यतः सक्षित, सारगर्भित और प्रभावशाली उक्ती है, जिसमें जीवनकी अनुभूतीयां स्पष्टतः झलकती है, और जो परिस्थितिको अनुकूलता की दृष्टीसे रखकर प्रयोग में लायी जाती है।‘
‘सुंदर रीती कही गई उक्तिकोही सूक्ति कहतके है। इसी उक्तिको यदि लोक, अर्थात साधारण मनुष्य प्रयोग में लाने लगते है, तब उसका नाम लोकोक्ति प.ड जाता है!‘- कृष्णदेव उपाध्याय.
देशी विदेशी भाषांनी म्हणीचे फारच गुणगान केले आहे. त्यावरून म्हणीचे महत्त्व जसे कळते, तशीच म्हणींची वैशिष्ट्येही आपल्या लक्षात येतात. त्यामुळे म्हणीचे अंतरंगही आपल्यापुढे उलगडू लागतात. हिब्रूमध्ये ‘म्हणी‘ला बागेतील फूल, भोजनात मिष्टान्न, पोषाखात अलंकार, जेवणात जसे मीठ तशा भाषणांत ‘म्हणी‘ चवदार मानते. तामिळ भाषेनुसार ‘स्वर्ग आणि पृथ्वीचा नाश होऊ शकेल, पण म्हणी कधीच नष्ट होऊ शकणार नाहीत. बास्क भाषा मानते की, म्हणीत असत्य काहीच नसते. काळोखातील शब्ददीप म्हणून बोस्निअन भाषा म्हणीकडे आयरिशचा म्हणीच्या चतुराईवर विश्वास आहे. he wisdom of the proverb can not be surpassed. स्कॉटिश म्हणीहून लोकांची पारख करते. As the people, so the proverb. फ्रेंचांना म्हणी या स्मरणात ठेवण्यायोग्य वाक्ये वाटतात.
जर्मन भाषा म्हणींचे स्वरूप स्पष्ट करते. मृत्यू आणि म्हण यांचे संक्षेपावर प्रेम असते. लेनिनने काढलेले उद्‌गार लोकशाहीवादी लोकांचे घोषणावाक्यच बनले आहे - ‘जनतेचा आवाज हा ईश्वराचा आवाज होय.‘ स्पॅनिश लोक म्हणीला बोधवाक्य मानतात. सत्याने ओतप्रोत असे लहान वाक्य जे दीर्घकाल चालत राहिल्याने मोठे होऊन गेले. स्विस भाषा स्मरणात राहणार्‍या सुंदर म्हणीला बटव्यात ठेवलेल्या सुवर्णासमान मानते. जर्मन भाषा म्हणीला पक्ष्याच्या चोचीच्या लहान पण टोकदार स्वरूपात बघते. अल्पस्वल्प मोबदल्यात फार मोठा धडा म्हणी देतात, ही तिची धारणा आहे. रशियन भाषेला म्हणी ‘जनतेची नाणी‘ दिसतात. त्या भाषिकांमते म्हणींमुळे बुद्धी वाढते आणि बुद्धीमुळे म्हणी चालतात.
म्हणींचा संग्रह असलेले पुस्तक वाचले त्याची भाषा स्वच्छ व शुद्ध झाली अशी चिनी मान्यता आहे. जपानीला त्यातून ईश्वरी आवाजाचा साक्षात्कार होतो. इराणीला त्या भाषेची आभूषणे वाटतात. शब्दांचे भोजन करण्यासाठी इबो भाषेस म्हणीची पत्रावळी अपरिहार्य वाटते. म्हणीच्या उपेदशानुसार चालणार नाही तो माणूस आपल्या आयुष्यात चुका केल्याखेरीज राहणार नाही. असे तुर्कीचे भविष्य आहे. कोंगोला म्हणीतून राष्ट्राचा परिचय होतो. नंडी तिला द्वर्थी मानते. ओसी भाषेनुसार म्हणीचा मुर्खावर काहीही परिणाम होत नाही, असे म्हणून म्हणीचा सूज्ञपणाशीच ती संबंध जोडते. योरुबा भाषा म्हणीत एक चैतन्य अनुभवते. म्हणी गप्पागोष्टीमधील घोडा असतात. गप्पागोष्टी थंडावतात, तेव्हा म्हणी त्यात प्राण ओततात.
मराठीने तर म्हणींमध्ये अनुभवाच्या खाणी अनुभवलेल्या आहेतच. अशा या म्हणी. त्या जागतिक कीतीaच्या असून चिरंजिवी राहणार आहेत.

(मूळ दुवा : http://www.loksatta.com/daily/20031026/lmciran.htm)

वा !

चित्तरंजन,चांगला लेख वाचायला दिला !

-दिलीप बिरुटे

उत्तम

उत्तम लेख आहे. येथे दिल्याबद्दल धन्यवाद.

लेख आणि प्रतिसाद आवडले.

संतवचने

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आपल्या लेखात श्री.शंतनू म्हणतात"वैयक्तिक मते बाजूला ठेवून भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टीने पाहिले तर संतसाहित्याचा भाषेवर पडलेला प्रभाव स्पष्ट दिसतो आणि तो कोणालाही मान्य होईल."
श्री.शंतनू यांच्या या विचाराशी मी सहमत आहे. संतसाहित्याचा मराठी भाषेवर मोठा प्रभाव आहे. संतवचने हे मराठी भाषेचे अविभाज्य अंग आहे. कित्येक संतवचने लोकोक्ती म्हणून रूढ झाली आहेत. उदा:
"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले|'' (तुका.)
"कोणी निंदा कोणी वंदा आम्हां स्वहिताचा धंदा|"(तुका.)
"पुण्य पर उपकार पाप ते परपीडा"(तुका.)
"असाध्य ते साध्य करिता सायास,कारण अभ्यास तुका म्हणे|"
"यत्‍न तो देव जाणावा" (रामदास)
"मरावे परी कीर्तीरूपे उरावे|"('' )
"उडदामाजी काळे गोरे..."(देविदास)
अशी अनेकानेक आहेत. तुकोबांची कित्येक वचने मराठीतील म्हणी आणि वाक्प्रचार झाली आहेत.
(तुकाराम गाथा-एक भाषिक चिकित्सा या प्रबंधावर विद्यावाचस्पती पदवी-मराठी डॉक्टरेट-मिळविणारे एक लेखक प्रस्तावनेत लिहितातः गाथेत म्हणी आणि वाक्प्रचार यांचा अतिरिक्त वापर दिसतो.हे टाळता आले असते. चांगल्या लेखनात हे नसावे असा संकेत आहे!!...हे मी काल्पनिक लिहिले आहे. पण वास्तवापासून तसे दूर नसावे..यनावाला.)

गोंधळ तर होत नाही ना ?

>>भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टीने पाहिले तर संतसाहित्याचा भाषेवर पडलेला प्रभाव स्पष्ट दिसतो आणि तो कोणालाही मान्य होईल."

चर्चा प्रस्ताव वाचल्यापासून जरासा (माझातरी ) गोंधळ होतोय असे वाटते. संत साहित्याचा मराठी भाषेवर परिणाम म्हणजे, काही सुभाषिते, काही विचार लोकप्रिय झाले म्हणजे सर्व मराठी भाषेवरच त्या त्या संतांचा परिणाम झाला असे कसे म्हणावे बॉ ? त्या त्या काळात बोलल्या जाणार्‍या बोलीचा प्रभाव त्यांच्यावर झाला नाही का ?

-दिलीप बिरुटे
(गोंधळलेला )

त्या काळातल्या बोलींच्या "परिणामा"पेक्षा खूपच अधिक

त्या काळातली बोली ते बोलत होते, त्यात न्हाऊन निघाले होते.

मासळी परिणाम करते, तसे पाणी मासळीवर परिणाम करत नाही का? !!!
अर्थातच करते. पण "तळ्यातल्या सामान्य मासळ्यांपेक्षा ही रंगीबेरंगी मासळी तळ्याला सुशोभित करते" असे म्हणायची इच्छा होऊ शकते.

सगळेच लोक बोली बोलतात, प्रतिभावंत कवीही ती बोली बोलतो. पण त्याने केलेला बोलीचा वापर जर अतिशय चपखल असला तर तो रूढ होतो. बाकी सामान्य लोकही तोच प्रयोग दीर्घकाळपर्यंत वापरतात. अशी काही चर्चा चालू आहे, असे मला वाटते.

असे म्हटल्यामुळे "आपल्या आई-बाप-मित्रांकडून शिकलेली मराठी भाषा हेच कवीचे माध्यम होते, त्या मराठीशिवय त्याची कविता अस्तित्वातच नाही," या सत्याचे खंडन होत नाही.

अवांतर्

गट : अवांतर

चिरंजिवी म्हणी हा श्री. अनिल गुडेकर यांचा लेख वाचनीय आहे. पण तरीही श्री.शंतनू यांच्या लेखाशी पूर्णत: असंबंधित आहे. विषय चालला आहे संत साहित्याचा भषेवरील प्रभाव. श्री.चित्तरंजन म्हणतात " तुकोबांचे अभंग लोकोक्त्तीचा भाग बनले आहेत. " आता ते म्हणतात " लोकोक्त्ती म्हणजे म्हण " आता अभंग हा म्हणीचा " भाग " कसा होईल ? बहुदा त्यांना अगदी उलटे म्हणजे " अभंगाचा भाग म्हण झाली आहे " असे तर म्हणावयाचे नाही ना ? हे समजण्यासारखे आणि पटण्यासारखे आहे. पण ओढाताण करूनही " हाची नेम आता " हा अभंग किंवा त्याचा कोणताही भाग " म्हण " म्हणताच येणार नाही. श्री. बिरुटे सरांनी दिलेली उदाहरणे , अभंग नव्हेत, त्यांचे भाग, म्हणी म्हणावयास हरकत नाही; वैयक्तिक मत म्हणून मी त्यांना सुभाषितेच म्हणेन.

चला. एवीतेवी " अवांतर " लेखनच चालले आहे तर म्हणींवर विचार करू. भिडे-केळकर यांच्या व्याख्यांपेक्षा महाराष्ट्र शब्द कोषातील अर्थ जास्त चांगला वाटतो. लोकोक्ती आणि म्हण हे समानार्थी शब्द असे सांगून ते म्हणतात, म्हण - लोकपरंपरेने चालत आलेले दृष्टांताद्युपयोगी लोकमान्य झालेले, सुटसुटीत आणि चटकदार दृष्टांताभूत वाक्य, ज्याचा रूढ अर्थच घ्यावयाचा; शब्दश; अर्थ घ्यावयाचा नाही; उदा. डोळ्यात तेल घालून रहाणे, डोक्यात राख घालणे. मराठीत इतकी स्पष्ट, सोदाहरण व्याख्या असतांना अभारतीय व्याख्या कशाला पाहिजेत ? " शुद्ध बीजापोटी ! फ़ळे रसाळ गोमटी ! म्हणताना तुकोबांना कलमी हापूस म्हणावयाचा नाही हे सहज कळते. दृष्टांत सुटसुटीत आणि चटकदार आहे." हाची नेम " किंवा " आम्हा घरी धन " या नक्कीच म्हणी नाहीत.

शरद

मी असे काहीही म्हटलेले नाही हो

श्री.चित्तरंजन म्हणतात " तुकोबांचे अभंग लोकोक्त्तीचा भाग बनले आहेत. " आता ते म्हणतात " लोकोक्त्ती म्हणजे म्हण " आता अभंग हा म्हणीचा " भाग " कसा होईल ? बहुदा त्यांना अगदी उलटे म्हणजे " अभंगाचा भाग म्हण झाली आहे " असे तर म्हणावयाचे नाही ना ? हे समजण्यासारखे आणि पटण्यासारखे आहे. पण ओढाताण करूनही " हाची नेम आता " हा अभंग किंवा त्याचा कोणताही भाग " म्हण " म्हणताच येणार नाही.

शरदराव, मी असे काहीही म्हटलेले नाही हो. गुडेकरांचा लेख मी "सुभाषितेदेखील लोकोक्तीचाच भाग असतात असा माझा समज" ह्या वाक्याच्या पुष्ट्यर्थ दिला आहे.

सुभाषित, सूक्ति, लोकोक्ति, आभाणक, लौकिक प्रवाह, लोकप्रवाह लौकिकी गाथा, वाक्‌संप्रदाय, लौकिकोक्ति इ. पर्यायी शब्द ही ‘म्हणीस‘ वापरण्यात येतात.

ह्याबद्दल तुमचे काय मत आहे?

पण ओढाताण करूनही " हाची नेम आता " हा अभंग किंवा त्याचा कोणताही भाग " म्हण " म्हणताच येणार नाही. श्री. बिरुटे सरांनी दिलेली उदाहरणे , अभंग नव्हेत, त्यांचे भाग, म्हणी म्हणावयास हरकत नाही; वैयक्तिक मत म्हणून मी त्यांना सुभाषितेच म्हणेन.

अवश्य.

उत्तम

लेख. प्रतिसाद आणि लेखातून समजते आहे ते खूपच रंजक आहे.

असहमत

चर्चा प्रस्तावाशी ढोबळ मानाने असहमत.

यातील काही काही वाक्प्रचार कदाचित तुकाराम महाराजांच्या आधी देखील वापरात असतील पण त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्याचे श्रेय त्यांनाच मिळते.

भाषेवर प्रभाव टाकणार्‍या संतांशिवाय इतर घटकांचे साहित्य वाचल्या/ अभ्यासल्याशिवाय असे विधान करणे धाडसाचे वाटते. शरद यांनी संताशिवाय 'पंत' व 'तंत' कवी साहित्य निर्माण करीत असा उल्लेख केला आहे. तसा, खटपट करणे हा वाक्प्रचार (उदाहरणार्थ) एखाद्या लावणीद्वारे मराठी मुलुखात पसरलेला असू शकतो.

बाकी रामनामाच्या उपदेशाविषयी तुकारामांशीही असहमत.

गोंधळ

गोंधळ तुमचा झाला नाही, बिरुटे सर. तुमच्या दि.०३-३० च्या लेखात तुम्ही कोठेही प्रभावाबद्दल लिहलेले नाही. तुम्ही तुकोबांच्या उक्तींना सुभाषिते म्हटले आहे आणि ते योग्यच आहे. आणि म्हणूनच ती शाळेच्या फ़ळ्यावर लिहिली जातात. ह्या लोकप्रिय सुभाषितांचा भाषेवरील प्रभावाशी काही संबंध नाही. आता भाषेवरील " प्रभाव " म्हणजे नक्की काय ह्या बद्दल मला काय वाटते ते एक उदाहरण देवून स्पष्ट करतो.

महाराष्ट्रात मुसलमान अंमल सुरू झाल्यावर राज्यकर्त्यांची भाषा म्हणून फ़ारशी येथे आली. हा हा म्हणता तीने मराठी लेखी आणि मौखिक भाषेवर कब्जा बसवला. जवळ जवळ तीनशे वर्षे ही परिस्थिती होती.पंडित असो वा अडाणी,शहरातला असो वा खेड्यातला, कोकणातला असो वा विदर्भातला, त्याच्या लेखी वा मौखिक भाषेत फ़ारशी शब्द अनिर्वायपणे येवू लागले.श्री. शिवाजी महाराजांना हा पगडा दूर करण्याकरिता प्रयत्न करावे लागले. याला म्हणावे भाषेवरील " प्रभाव ."

ही झाली माझी व्याख्या. ती समोर ठेवून मी म्हणतो, " संत वाङ्मयाचा मराठी भाषेवर परिणाम झाला नाही ". तुम्ही तुमची व्याख्या सांगा, उदाहरण द्या, मत मांडा. विषय गंभीर असल्याने खंडण-मंडण पद्धतीने चर्चा चालू दे. वरील व्याख्या आवडली नाही/पटली नाही तर खोडून काढा. शक्य तो, अवांतर टाळा.

शरद

आता वळणावर आली चर्चा

ज्ञानेश्वर-एकनाथ-नामदेव-तुकाराम या मराठी संताचा भाषेचा प्रभावाचा अंगाने विचार केला की , आपण म्हणता तसे महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतरे विचारात घ्यावी लागतील आणि त्यांचे लेखन कोणत्या परंपरेतले होते, मग खर्रच मराठी भाषेवर संताचा किती परिणाम झाला त्याच्या काहीएक आकलनाकडे सरकता येईल. ज्ञानेश्वराच्या समाधीपूर्वी उत्तरेकडील मुसलमान महाराष्ट्रात पोहचले पुढे खिलजी, तुघलक वगैरेंमुळे यादवांचे साम्राज्य संपुष्टात आले. युद्ध, दुष्काळ,महाराष्ट्रीयन जीवन उद्धवस्त झालेले होते तेव्हा बरीच वर्ष जुने पंथ आणि परंपरा कशाबशा तग धरुन होत्या इतकेच म्हणावे लागेल. (पुढील संप्रदायाचा इतिहास सोडून देऊ )

ज्ञानेश्वर नामदेवांच्या भाषिक वैशिष्टे ग.बा. सरदार म्हणतात त्या प्रमाणे ''प्रसन्नता व उत्साह, कोमलता व माधुर्य उत्कटता व चापल्य या गुणांच्याऐवजी गांभीर्य, विशालता, वैचित्र्य, ओज, प्रगल्भता, प्रोढी यासारखे गद्याचे गुण काळातील भाषेत उतरले आहेत'' विचारात पोक्तपणा, पांडित्य, असा एक प्रकार एकनाथ,मुक्तेश्वर, ते तुकारामापर्यंत दिसतो.

बरं ! ज्ञानेश्वर /एकनाथ पारंपरिक परंपरेतले असल्यामुळे त्यांचे लेखनात सामान्यजनाची तळमळ असली तरी त्यांच्या लेखनाला संस्कृत टच होता. त्यामुळे दिलीप चित्रे म्हणतात तसे ( यना सरांनी खाली प्रतिसादात उल्लेख केलाच आहे) ' बोजड परिभाषा, क्लिष्ट रचना टाळून तुकोबांनी 'गावरान' किंवा 'साधीभोळी' सामान्य माणसाला कळणा-या भाषेचा वापर केला. आपल्या अलौकिक प्रतिभेचा वापर आपल्या रचनेत केला. आज तुक्याचे पाच हजार अभंग उपलब्ध आहेत (लोकगंगेतील इंद्रायणीत तरल्यामुळे) वरीजनल किती हा विषय सोडूनही त्यात त्यांनी मराठी भाषेला किती नवीन शब्द दिले, पुढे भाषिक व्यवहारात त्यांचे किती शब्द आपण वापरतो, त्यापूर्वी ते शब्द मराठी भाषेत होते का ? असा अभ्यास केला तर आपल्याला संताचा (तुकारामांचा) भाषेवरील प्रभाव समजून घेता येईल. साहित्य समाजाचा आरसा असतो त्याचेच प्रतिबिंब साहित्यात उमटते, तसे संत तुकारामांना समाजमनात जे दिसले ते त्यांनी आपल्या प्रतिभेद्वारे मांडले.त्यामुळे त्यांची रचना भाषिक\सांस्कृतिक गुणवैशिष्टे शोधण्यास कदाचित मदत करतील, पण पूर्ण भाषाच प्रभावीत झाली असे म्हणने जरा धाडसाचे होईल असे वाटते !

अवांतर : पुन्हा तुकाराम या दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या पुस्तकातील प्रास्ताविक एकदा वाचले की तुकारामांचे मोठेपण मान्य करावे लागते. तुकाराम वाचल्यानंतर त्यांची मराठीची गोडी वाढली असावी (पाहा. पुन्हा तुकाराम पृ.क्र. १६).

अतिअवांतर : विठठल नामाची शाळा भरली

-दिलीप बिरुटे

संस्कृत टच?

ज्ञानेश्वर /एकनाथ पारंपरिक परंपरेतले असल्यामुळे त्यांचे लेखनात सामान्यजनाची तळमळ असली तरी त्यांच्या लेखनाला संस्कृत टच होता?

यात वावगे काय आहे हे समजले नाही. तुकारामांइतकेच प्रचंड लोकप्रिय लेखन ज्ञानेश्वर/एकनाथांचे आहे. सामान्यजनांना त्यांचे लेखन आपलेसे करताना त्यातला संस्कृत टच टोचला नाही मग आपल्यालाही खटकण्याचे कारण नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

न्यानेश्वरी

तुकारामांइतकेच प्रचंड लोकप्रिय लेखन ज्ञानेश्वर/एकनाथांचे आहे.

न्यानेश्वर, तुकाराम यायच्यात मोठे कोन ते जाऊ द्या पर लोकप्रियतेगी गोष्ट आसन तर
तुकोबा भारी पडतेन्.
न्यानेश्वरंची न्यानेश्वरीत सांख्यशास्त्राचा प्रक्रुतीपुरुष विचार;निर्गुण निराकार ब्रह्माची ओळख करुन देनारा मायावाद, हठयोग,वर्णाश्रमाचा कर्मयोग असे सारेच इषय अवघड.

न्यानेश्वराची न्यानेश्वरी देवघरात पूजा करायचा ग्रंथ, डो़क्यावर मिरायचा ग्रंथ, सामान्य लोकायच्या डोक्यात उतरायाच्या कनत्याच गोष्टी त्यायच्यात नाही.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

माझे मत

बरं ! ज्ञानेश्वर /एकनाथ पारंपरिक परंपरेतले असल्यामुळे त्यांचे लेखनात सामान्यजनाची तळमळ असली तरी त्यांच्या लेखनाला संस्कृत टच होता.

प्राध्यापक साहेब आपण ज्ञानेश्वरी - अमृतानुभव वाचून हे अनुमान काढले आहे असे मी समजतो. मी पण हे ग्रंथ वाचले आहेत. इतर कुठल्याही संतसाहित्यिकापेक्षा ज्ञानेश्वरांच्या लेखनात संस्कृत टच कमी आहे हे मी सिद्ध करू शकतो. उदाहरणादाखल काही ओव्या देतो आहे. पहिल्याने ज्ञानेश्वरीतल्या पाच ओव्या बघू.

कैंचा लोंबेवीण कांबळा | मातियेवीण मोदळा |
कां जळेवीण कल्लोळा | होणे आहे ||

की आंधारे खतलें अंबर | झालेया दिवसनाथासमोर |
तेणें तयातें पर्‍हा सर | म्हणितले काईं ||

मिया गीतां येणे नावे | तुझे पसायामृत सुहावे |
वानूं लाधलो तें दुणेन थांवे | दैवले दैव||

जी जीवित्वांचां आडवी | आतुडलो होतो मरणगावी |
ते अवदसाचि आघवी | फेडिली आजी ||

जे गीता येणे नावे नावाणिगी | जे अविद्या जिणोनि दाटुगी |
ते कीर्ती तुझी आम्हां जोगी | वानावया जाली ||

आता अमृतानुभवातल्या सुरूवातीच्याच पाच ओव्या बघू.

जो प्रीयुचि प्राणेश्वरी | उलथे आवडीचे सरोभरी |
चारुस्थळी एकाहारी | एकांगाची ||

आवडीचेनि वेगे | एकएकाते गिळिती आंगे |
द्वैताचेनि पांगे | उगळिते आहाति ||

जी एकचे नव्हे एकसरे | दोघां दोपण नाही पुरे |
काय नेणो साकारे | स्वरूपे जिये ||

कैशी स्वसुखाची अळुकी | जे दोनीपण मिळुनि एकी |
नेदेतीच कवतुकी | एकपण फुटो ||

या दहाही ओव्यांचा अर्थ कोणास हवा असेल तर तो मी नंतर देईन. फक्त ज्ञानेश्वरांच्या लेखनात संस्कृत टच अगदी कमी , जवळजवळ नाहीच इतकेच मला दाखवायचे आहे.

पारंपरिक परंपरेतले

म्हणजे आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे? मी घेतलेला याचा अर्थ असा: हे दोघे ब्राह्मण त्यामुळे ब्राह्मणी परंपरेतले. त्यामुळे बहुजनसमाजातून आलेल्या नामदेव, सावता माळी, गोरा कुंभार, जनाबाई, बहिणाबाई या संतांपेक्षा ज्ञानेश्वर - एकनाथांच्या लेखनात संस्कृत टच जास्त आहे. त्यामुळेच बहुजन समाजातून आलेल्या संतांचा विशेषतः तुकारामांचा मराठी भाषेवर प्रभाव जास्त आहे .

एक तर हे जातीय विश्लेषण आक्षेपार्ह आहे यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते साफ चुकीचे आहे.

यातल्या ज्ञानेश्वरांच्या लेखनातल्या "संस्कृत टच"चा फोलपणा मी वर दाखवलेलाच आहे. एकनाथांच्या लेखनात संस्कृतप्रचुरता जास्त दिसते हे जरी खरे असले तरी त्यांनी गौळणी, भारुडे वगैरे सर्वसामान्य लोकांना आवडेल असे लेखन केले आहे. मला वाटते की एकनाथांच्या काळात ज्ञानेश्वरांची भाषाही लोकांना समजेनाशी झाली होती त्यामुळे एकनाथांनी ज्ञानेश्वरांचे विचार सोप्या भाषेत सांगितले. आज लोकांना ज्ञानेश्वरांपेक्षा नामदेव, जनाबाई, सावता माळी, तुकाराम इतकेच काय एकनाथ आणि रामदासस्वामी (ब्राह्मण असल्यानेच यांचा उल्लेख आतापर्यंत झाला नाही असे असेल काय?) यांचे लेखन लवकर समजत असेल तर त्याचे कारण हे आहे की या लोकांच्या लेखनात "संस्कृत टच" ज्ञानेश्वरांपेक्षा जास्त आहे.

ज्ञानेश्वरांनी लोकांना समजावी म्हणून सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली असे म्हणतात. ज्ञानेश्वरांची भाषा त्यांच्या काळातसुद्धा फार लोकांना समजत होती असे मला वाटत नाही. फक्त प्रतिभावंत माणसाला देशी भाषेतसुद्धा(म्हणजे संस्कृत आणि प्राकृत यांच्या संगमातून ज्ञानेश्वरांनी स्वतः उत्पन्न केलेल्या भाषेत) संस्कृतच्या तोडीस तोड निर्मिती करता हे दाखवण्यासाठीच त्यांनी या भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली. एके ठिकाणी वाचलेले वाक्य मला फार आवडले "चिद्विलासवादाचे स्वतंत्र तत्त्व़ज्ञान (शंकराचार्यांपेक्षा वेगळे) आणि ते सांगणारी भाषा (संस्कृतपेक्षा वेगळी) या दोन गोष्टी ज्ञानेश्वरांनी एकदमच उत्पन्न केल्या."

ज्ञानेश्वरांचा प्रभाव पुढे काही शतके कवींवर कायम होता. त्यांच्या विचारांचा प्रभाव एकनाथांवर तर शैलीचा परिणाम "रुक्मिणीस्वयंवर" लिहिणार्‍या नरेंद्रावर आणि "अमृतानुभवटीका" लिहिणार्‍या शिवकल्याणांवर होता. मध्यंतरी प्रा. मोहसीना मुकादम "मुसलमान मराठी साहित्यिक" या विषयावर लेखमाला लिहीत होत्या. त्यात त्यांनी जुन्या काळातल्या मुसलमान कवींवर ज्ञानेश्वरांचा परिणाम दिसतो असे लिहिले होते. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी ज्ञानेश्वरांच्या ओव्याच जशाच्या तशा घेतल्या असल्याचेही लिहिले आहे. बहामनी सुलतान मुंतोजी बहामनी याचा उल्लेख त्यात होता.

संस्कृतमध्ये "सर्व जगत् हे व्यासांचे उच्छिष्ट आहे" या अर्थाचे वचन आहे तसेच (अतिशयोक्तीचा दोष पत्करूनही) मला "सर्व मराठी भाषा हे ज्ञानेश्वरांचे उच्छिष्ट आहे" असे म्हणावेसे वाटते.

हम्म

>>प्राध्यापक साहेब आपण ज्ञानेश्वरी - अमृतानुभव वाचून हे अनुमान काढले आहे असे मी समजतो.

नाही, मी ज्ञानेश्वरी-अमृतानुभव वाचलेले नाही. केवळ काही माहितीच्या आधारे तसे विधान केले. मात्र जमले तर त्यांच्या लेखनावर संस्कृतचा प्रभाव होता का (तो आहेच म्हणा ) ? असे काही संदर्भाने माझ्या मताला पुढे रेटेन. हे खरं आहे की, लोकभाषेचा वापर करुन वेदांताचा विचार त्यांनी सामान्यांच्या दारापर्यंत नेला तरीही ज्ञानेश्वरांची भाषाही लोकांना समजेनाशी झाली होती . काही ठिकाणी त्यांनी शंकराचार्य आणि रामानुजाचार्य यांचे अनुकरण केले आहे, असे काही तरी वाचल्याचे स्मरते, ते कशाबद्दल होते ते आठवत नाही.

>>ज्ञानेश्वरांच्या लेखनातल्या "संस्कृत टच"चा फोलपणा मी वर दाखवलेलाच आहे.

अर्रर्र घाई करु नका ! पारंपरिक संस्कारांनाच सांभाळण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्या लेखनात 'संस्कृत टच' नाहीच असा अर्थ काढू नका. ( संस्कृत शब्द शोधून काढणे म्हणजेच संस्कृत टच नव्हे, तर संस्कृत वाडःमयाचा प्रभाव असाही अर्थ घ्यावा कारण चर्चा भाषा प्रभावाची आहे )

आणि आपणच म्हणता की.....

>>(संस्कृत आणि प्राकृत यांच्या संगमातून ज्ञानेश्वरांनी स्वतः उत्पन्न केलेल्या भाषेत)

म्हणजे संस्कृत टच नाही का ?

>>आज लोकांना ज्ञानेश्वरांपेक्षा नामदेव, जनाबाई, सावता माळी, तुकाराम इतकेच काय एकनाथ आणि रामदासस्वामी (ब्राह्मण असल्यानेच यांचा उल्लेख आतापर्यंत झाला नाही असे असेल काय?) यांचे लेखन लवकर समजत असेल तर त्याचे कारण हे आहे की या लोकांच्या लेखनात "संस्कृत टच" ज्ञानेश्वरांपेक्षा जास्त आहे.

उदाहरणार्थ कसा ?

>>जातीय विश्लेषण आक्षेपार्ह आहे यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते साफ चुकीचे आहे.

जातीय विचार करण्यापेक्षा त्यांच्या घरात वेदाध्यन करण्याची परंपरा होती असा आपण अर्थ घेतला असता तर बरे झाले असते.

-दिलीप बिरुटे

उत्तरे

नाही, मी ज्ञानेश्वरी-अमृतानुभव वाचलेले नाही. केवळ काही माहितीच्या आधारे तसे विधान केले. मात्र जमले तर त्यांच्या लेखनावर संस्कृतचा प्रभाव होता का (तो आहेच म्हणा ) ? असे काही संदर्भाने माझ्या मताला पुढे रेटेन.

आधी निष्कर्ष मग संशोधन असली प्रक्रिया सुरू होणार हे लक्षात आले होतेच. त्याप्रमाणे आपला
विनायक महाराज,
ज्ञानेश्वरी पुन्हा एकदा वाचा...संस्कृत,संस्कृतोद्भव शब्द खूप सापडतील.
(आज आम्ही ज्ञानेश्वरी नुसती वरवर चाळली, तरी बरेच शब्द सापडले )

हा प्रतिसाद आला. आता मी वाचलेल्या साहित्याची यादी देतो.

ज्ञानेश्वरी - दांडेकर प्रत (गेल्या १७ - १८ वर्षात तीन चार वेळा वाचलेली आणि एकदा लिहून काढलेली)
ज्ञानदेवी खंड १-३ - केळकर आणि मंगरूळकर प्रत (मूळ राजवाडे प्रतीवरून)
ज्ञानेश्वरी - सरकारी प्रत
ज्ञानेश्वर दर्शन खंड १ आणि २
महाराष्ट संस्कृती - खंड २ - ज्यामध्ये श्री. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर यांची तुलना करणारा अप्रतिम लेख आहे
अमृतानुभव - जोगमहाराज
चांगदेवपासष्टी - जोगमहाराज
ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी - न. र. फाटक
अमृतानुभवटीका - शिवकल्याण
अमृतानुभव पद्यानुवाद - विंदा करंदीकर
नरहर कुरुंदकर - विविध लेख (तंत्रमार्गी शैव अभिनवगुप्त आणि ज्ञानेश्वर यामधील साम्य)
मोहसीना मुकादम - मराठी मुसलमान संत या विषयावरची लेखमाला
म. वा. धोंड - कालनिर्णय मधील लेख (वर्ष आठवत नाही)

ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकाला आवश्यक आहे त्या मानाने हे वाचन अत्यल्प आहे हे मला मान्यच आहे, पण "आज ज्ञानेश्वरी वरवर चाळली" यापेक्षा नक्कीच जास्त आहे.
तसेच आपल्या

त्यामुळे त्यांच्या लेखनात 'संस्कृत टच' नाहीच असा अर्थ काढू नका. ( संस्कृत शब्द शोधून काढणे म्हणजेच संस्कृत टच नव्हे, तर संस्कृत वाडःमयाचा प्रभाव असाही अर्थ घ्यावा कारण चर्चा भाषा प्रभावाची आहे )
ओळींबरोबरच संस्कृत,संस्कृतोद्भव शब्द खूप सापडतील.
(आज आम्ही ज्ञानेश्वरी नुसती वरवर चाळली, तरी बरेच शब्द सापडले )
याही ओळी वाचल्याने बरीच करमणूक झाली.

पारंपरिक संस्कारांनाच सांभाळण्याचे काम त्यांनी केले.
म्हणजे नक्की काय केले हो? ज्ञानेश्वरांनी परमेश्वरभक्तिमध्ये "कुळजाति वर्ण गा अप्रमाण|" असे लिहिले, नामदेव शिंपी, सावता माळी, चोखामेळा (महार), गोरा कुंभार, जनाबाई अशा अठरापगड जातीच्या लोकांना घेऊनसंतमेळा स्थापन केला, एकनाथमहाराजांनी अस्पृश्याच्या घरी भोजन केले हे सर्व पारंपरिक संस्कार की क्रांती?

असो. या विषयावरचा माझा हा शेवटचा प्रतिसाद.

विनायक

धन्यवाद !

व्वा ! सर्वप्रथम ज्ञानेश्वरीवर इतका अभ्यास असलेला माणूस उपक्रमवर आहे, याचा आनंद झाला.

आपण ज्ञानेश्वरीवरील ग्रंथाचा इतका अभ्यास केला आहे, वाचन केले आहे, दांडेकर प्रणित ज्ञानेश्वरी वाचली / लिहून काढली आहे, तर संस्कृत / संस्कृतोद्भव शब्द ज्ञानेश्वरीत नाही का ? इतकेच उत्तर द्या ना !

त्याचबरोबर इतर संतावर संत साहित्यावर संस्कृतचा कसा प्रभाव होता, त्याचे उदाहरण सांगा म्हटले तर त्या पासून का पळत आहात ? ठीक आहे की आम्ही माहितीच्या आधारे निष्कर्ष काढला(वरवर ज्ञानेश्वरी चाळली ) पण तो चुकीचा नाही. आणि आमच्या वाक्यांनी आपली करमणूक झाली तर आनंदच आहे. एका विद्वानाशी चर्चा करता येईल म्हणून तर आम्ही साखरे महाराजांची सार्थ ज्ञानेश्वरी आणून ठेवली होती. पण आपल्याला चर्चाच करायची नाही म्हटल्यावर काय बोलायचे ? इथे आम्हाला श्रेष्ठ म्हणून किंवा आमचे मत आम्हाला रेटायचेच आहे, त्यासाठी हा प्रपंच नाहीच. असेलेले ज्ञान वाटले पाहिजे / चर्चा झाली पाहिजे हीच आमची भुमिका.

ज्ञानेश्वरांनी काय केले, परमेश्वरभक्तिमध्ये "कुळजाति वर्ण गा अप्रमाण|" त्याची चर्चा करता आली असती, तत्पूर्वी काही नोंदी आपल्यासाठी ' वर्णव्यवस्थेचे एक प्रधान अंग सामाजिक विषमता याचा पाठपुरावा ज्ञानेश्वरांनी केला. ज्ञानेश्वर हे भिक्षाजीवी होते. नामदेवांसारखे श्रमजीवी नव्हते म्हणूनच त्यांनी ब्राह्मणवादी संस्कारांनाच सांभाळण्याचे कामकेले. एवढेच नव्हे तर ज्ञानेश्वरांची लेखणी राजप्रशस्तीच्या वाटेने साडेतीन पावलांचे अंतर चालून गेली'' असे मत डॉ. अ. ना. देशपांडे यांनी मांडले आहे, अशा अभ्यासू माणसाचे मत टाळता येण्यासारखे नाही. ( प्राचीन मराठी वाडःमयाचा इतिहास पृ. ३४५) ते जाऊ द्या अशा चर्चा करण्याने काही समज-गैरसमज वाढीस लागतात तो भाग सोडून देऊ.

असो...

धन्यवाद !

-दिलीप बिरुटे

प्रतिसादातील व्यक्तिगत वाटलेला मजकूर वगळला आहे. व्यक्तिगत टिप्पणींसाठी खरडवहीचा वापर करावाः संपादक

पुन्हा वाचा...

विनायक महाराज,
ज्ञानेश्वरी पुन्हा एकदा वाचा...संस्कृत,संस्कृतोद्भव शब्द खूप सापडतील.
(आज आम्ही ज्ञानेश्वरी नुसती वरवर चाळली, तरी बरेच शब्द सापडले )

-दिलीप बिरुटे

लहान तोंडी मोठा घास

याविषयात मधे बोलण्याइतकाअभ्यास नाहि तरीही जिज्ञासा + असहमतीपोटी माझे दोन पैसे:

संत वाङ्मयाचा मराठी भाषेवर परिणाम झाला नाही

हे वाक्य इतके सरसकट आहे की जसेच्यातसे पटत नाहि. तुम्हाला अपेक्षित असा परिणाम मोठ्याप्रमाणावर काहि संताच्या बाबतीत 'कदाचित' दिसत नाहि.
मात्र संतवाङ्मयात तुकारामांपासुन रामदासस्वामिंच्या आरत्यांपर्यंत अनेक गोष्टी येतात. जर रामदासस्वामिंच्या आरत्यांमुळे / एकनाथांच्या भारुडांमुळे लोकांच्या भाषेवर परिणाम झाला नाहि असेहि तुम्हि म्हणता का?
छत्रपतिंच्या वेळच्या पत्रांत आढळणारी भाषा आणि आरत्यांमधील भाषा इतकी वेगळी असुनहि ती रुजली म्हणजे लोकांच्या बोलीभाषेवर आणि पर्यायाने मराठी भाषेवर त्यांनी परिणाम केला नाहि का?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

आणखी काही..

चित्तरंजन, आपण दिलेली उदाहरणे आजकाल सर्रास वापरात आहेतच पण ती वापरताना हे अभंग आहेत, तुकाराम महाराजांचे आहेत याची आपल्याला जाणीव असते. मात्र याशिवाय तुकारामांची इतरही अनेक उदाहरणे आपण वापरत असतो मात्र ती वापरताना हे अभंगातले तुकडे आहेत, तुकाराम महाराजांचे आहेत असे आपल्याला माहितही नसते. (जशी उदाहरणे बिरुटे यांनी दिली आहेत तशी) कदाचित आपल्या नकळत आपण वापरत असलेल्या अशा वाक्प्रचारांकडे शंतनू यांचा निर्देश असावा.

काही उदाहरणे!

  1. कोणी निंदा कोणी वंदा आम्हा स्वहिताचा धंदा.
  2. आलिया भोगासी असावे सादर (वर आलेच आहे)
  3. एक एका साह्य करु अवघे धरु सुपंथ.
  4. जे का रंजले गांजले.
  5. आनंदाचे डोही आनंद तरंग
  6. दया क्षमा शांति तेथे देवाची वसति
  7. आले देवाचिया मना तेथे कोणाचे चालेना
  8. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.
  9. जोडोनिया धन उत्तम वेव्हारे
  10. आम्ही जातो आपुल्या गावा आमुचा रामराम घ्यावा.
  11. वगैरे वगैरे.........:-)

सौरभ.

अवांतरः अभंगांचा गाथा का असतो? अभंगांची गाथा का नसते?

==================

खरे आहे. पण

चित्तरंजन, आपण दिलेली उदाहरणे आजकाल सर्रास वापरात आहेतच पण ती वापरताना हे अभंग आहेत, तुकाराम महाराजांचे आहेत याची आपल्याला जाणीव असते.

सौरभ, खरे आहे. पण असे असले तरी ही जाणीव असायलाच हवी असे काही नाही. आणि असतेच असेही नाही. जाणीव आहे म्हणून ते सुभाषित आणि नाही म्हणून वाक्प्रचार असे कसे? एखाद्याची "जाणीव" फारच प्रगत असली तर त्याच्यासाठी सगळीच सुभाषिते. असेच काहीसे शेक्सपिअरच्या काही वाक्यांबाबत म्हणता येईल. किंवा काही संस्कृत सुभाषितांबाबत म्हणता येईल. ही वाक्ये लोकांच्या सामुदायिक आठवणीचा (कलेक्टिव मेमरी) भाग असतात. म्हणून त्यांना लोकोक्ती म्हणत असावेत. असो. तसेही व्याख्येत जखडणे महत्त्वाचे नाही. (गुडेकरांच्या लेखात लोकोक्तीची व्यापक अशी व्याख्या आली आहे ती मला मान्य आहे.) "लकीर के फकीर" बनायला नको. लोकांना ही वाक्ये, ह्या ओळी आठवतात ना हे बघायला हवे.

तसेच "नकळत आपण वापरत असलेल्या अशा वाक्प्रचारांकडे शंतनू यांचा निर्देश" स्पष्ट नाही. "नकळत" हा शब्द महत्त्वाचा. तसेच ज्या अवांतरामुळे माहिती प्रसूत, प्रसृत होण्यास मदत होते आहे त्या अवांतराचे अवांतर असणे मला मान्य नाही.

चित्तरंजन
बरा देवा कुणबी केलों । नाहींतरी दंभे असतों मेलों

हो...

एखाद्याची "जाणीव" फारच प्रगत असली तर त्याच्यासाठी सगळीच सुभाषिते. आणि
लोकांना ही वाक्ये, ह्या ओळी आठवतात ना हे बघायला हवे. ही वाक्ये पटण्याजोगी आहेत.
अवांतर प्रश्नाबद्दलही कुणीतरी माहिती द्यावी.

-सौरभ.

==================

पुन्हा तुकाराम

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
"पुन्हा तुकाराम" या पुस्तकाचे लेखक श्री. दिलीप पु. चित्रे प्रस्तावनेत लिहितातः
"...जर एखाद्या समकालीन प्रतिभावंताने भाषेचा विस्तृत पट उलगडून त्याच्या परिप्रेक्ष्यात आपल्या भाषिक कृती निर्माण करून ठेवल्या , तर, एरव्ही जे कालप्रवाहात अदृश्य झाले असते असे प्रचण्ड शब्दभांडार पुढल्या अनेक पिढ्यांसमोर महाकृती होऊन ठाकते." श्री.चित्रे म्हणतात की ज्ञानदेव,नामदेव , एकनाथ आणि तुकाराम या चार प्रमुख मराठी संतकवींनी अशा भाषिककृती त्या त्या काळी निर्माण केल्या म्हणून मराठी
भाषेचे मूळ शब्द भांडार टिकून राहिले.
पुढे ते लिहितातः
''.....हजार वर्षे जुन्या आणि सातशेपेक्षा अधिक वर्षे वाङ्मयीन परंपरा असलेल्या आपल्या मराठी भाषेचा मानदंड असा लेखक कोण? याचे उत्तर मी 'तुकाराम' असे दिले तर बहुदा कोणीही समंजस मराठी वाचक फारसा वाद घालणार नाही.आपल्या आपल्या तोंडी असलेल्या मराठी भाषेवर इतका सर्वांगीण प्रभाव असलेला दुसरा कोणीच लेखक नाही. ...तुकोबांच्या जन्मानंतर तीनशे ऐशी वर्षांनी आज आपण जी मराठी भाषा वापरत आहोत तिचा कस तुकोबांच्या गाथेतून आलेला आहे.चार शतके तो कोट्यवधी निरक्षर वारकर्‍यांच्या मौखिक परंपरेद्वारा आपल्या भाषिक अभिसरणात मिसळलेला आहे."

".....फुले आणि आंबेडकर यांच्या भाषाशैलीत आणि भाषेच्या मुखड्यातच तुकारामी वळण आहे. मात्र फुले आणि आंबेडकर दोघेही तुकोबांचे नाव न घेता ,अभंगाच्या ओळी उद्धृत न करता त्यातले शब्द प्रयोग करतात."...
(मला वाटते अनेक मराठी लेखक/कवी यांच्या संदर्भात हे उण्या अधिक प्रमाणात सत्य असावे.)

बोली-गीता

पार्थ म्हणे गा हृषीकेशी । या युद्घाची ऐशी तैशी ।
बेहेत्तर आहे मेलों उपाशी । पण लढणार नाहीं !

धोंडयात जावो ही लढाई । आपल्या बाच्यानें होणार नाही ।
समोर सारेच बेटे जावाई । बाप, दादे, काके ।

काखें झोळी, हातीं भोपळा । भीक मागून खाईन आपला ।
पण हा वाह्यातपणा कुठला । आपसांत लठ्ठालठ्ठी ।

या बेटयांना नाही उद्योग । जमले सारे सोळभोग ।
लेकांनो ! होऊनिया रोग । मराना कां !

लढाई का असते सोपी ? मारे चालते कापाकापी ।
कित्येक लेकाचे संतापी । मुंडकीहि छाटती ।

मग बायका बोंबलती घरी । डोई बोडून करिती खापरी ।
चाल चाल कृष्णा माघारीं । सोड पिच्छा युद्घाचा ।

अरे, आपण मेल्यावर । घरच्या करतील परद्बार ।
माजेल सारा वर्णसंकर । आहेस कोठे बाबा !

कृष्ण म्हणें, रे अर्जुना ! हा कोठला बे बायलेपणा ?
पहिल्यानें तर टणटणा । उडत होतास लढाया ।

मारे रथावरी बैसला । शंखध्वनि काय केला ।
मग आतांच कोठें गेला । जोर तुझा मघांचा ?

तू बेटया । मूळचाच ढिला । पूर्वीपासून जाणतों तुला ।
परि आता तुझ्या बापाला । सोडणार नाही बच्चमजी !

अहाहारे भागूबाई ! म्हणे मी लढणार नाही ।
बांगडया भरा कीं रडूबाई । आणि बसा दळत !

कशास जमविले आपुले बाप ? नस्ता बिचार्‍यांसी दिला ताप ।
घरी डारडुर झोंप । घेत पडलें असते ।

नव्हते पाहिलें मैदान । तोवर उगाच करी टुणटुण ।
म्हणें यँव करीन त्यँव करीन । आताच जिरली कशानें ?

अरे तू क्षत्रिय की धेड ? । आहे की विकिली कुळाची चाड ?
लेका भीक मागावयाचें वेड । टाळक्यांत शिरलें कोठूनी ?

अर्जुन म्हणे ‘गा’ हरी ! आतां कटकट पुरे करी ।
दहादां सांगितले तरी । हेका का तुझा असला ?

आपण काही लढत नाही । पाप कोण शिरीं घेई !
ढिला म्हण की भागूबाई । दे नांव वाटेल ते ।

ऐसे बोलोनि अर्जुन । दूर फेकूनी धनुष्यबाण ।
खेटरावाणी तोंड करून । मटकन्‌ खाली बैसला ।

_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

अहाहा हाहाहा

व्वाव्वा! बोलीभाषेची खुमारी आगळीच.
कुणी केली आहे हो ही गीता? कुठे वाचायला मिळेल?

आपसांत लठ्ठालट्ठी

फारच आवडली ही गीता. कोणी लिहिली ते ही सांगा.

काखें झोळी, हातीं भोपळा । भीक मागून खाईन आपला ।
पण हा वाह्यातपणा कुठला । आपसांत लठ्ठालठ्ठी ।

या बेटयांना नाही उद्योग । जमले सारे सोळभोग ।
लेकांनो ! होऊनिया रोग । मराना कां !

हे फारच आवडलं.

-राजीव.

बोली-गीता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
गीतेच्या पहिल्या अध्यायाचे हे विडंबन कवि जयकृष्ण केशव उपाध्ये (१८८३-१९३७) यांनी केले आहे. मात्र या चर्चेत ते अप्रस्तुत आहे. माझ्या मते ही बोलीभाषा(डायलेक्ट) नव्हे. प्रमाणभाषा आहे. त्यात नेहमीच्या बोलण्यातले सोपे शब्द वापरले आहेत इतकेच.प्रमाणभाषेत संस्कृत शब्दांचे प्राचुर्य असलेच पाहिजे असे नाही.

सहमत

वरील विडंबन प्रमाणबोलीच्या लेखी शैलीत आहे, असे माझेसुद्धा मत आहे.

खेटरावाणी तोंड करून । मटकन्‌ खाली बैसला ।

ऐवजी

ख्याट्रावानी त्वांड कूनशान । मटकान् खाल् बसल्याती ॥

असे म्हटले तर बहुधा अप्रमाण आहे. (आणि ही बोली मला येत नसल्यामुळे बहुधा अशुद्ध सुद्धा आहे. "ख्याट्रावानी" म्हणणारा मराठीभाषक बहुधा "बसल्याती" म्हणणार नाही, ही बोली मला नीट येत नसल्यामुळे माझे लेखन अशुद्ध आहे.)

पुनश्च वरती तात्यांच्या उपप्रतिसादात मी लिहिल्याप्रमाणे : कवितेसाठी अप्रामाण्याचा निकष नसतो. कवीला "ख्याट्रावानी" म्हणून गोडवा किंवा ठसका साधायचा असेल, तर वाचकानेही तसाच आस्वाद घ्यावा.

पण जी कविता मुळात प्रमाणबोलीत आहे, ती "अप्रमाण आहे म्हणून आवडते" असे म्हणण्याचा अव्यापारेषु व्यापार का बरे करावा?

मीही सहमत

आचार्य अत्र्यांची भाषा काहीशी अशीच होती. विनाकारण संस्कृतप्रचुर शब्द न वापरता केलेले लिखाण. तशीच ही बोलीगीता. बोलीभाषेतली नाही. ज्याअर्थी ही भाषा कुणाही मराठी माणसाला सहज समजू शकते, त्याअर्थी ही बोलीभाषा नाही.
का कोण जाणे, बोलीभाषेचे पुरस्कर्ते मला विहिरीतल्या बेडकांसारखे वाटतात. त्यांच्या बोलीला व्याकरण असते, शुद्धलेखन असते आणि नादमाधुर्यही असते. त्यांच्या बोलीत वाचास्वरूप वाङ्‌मय असते, लोकगीते असतात. मंडूकसूत्राची रचना त्यांच्याच पूर्वजांनी केलेली असते. त्यांच्या आगळ्यावेगळ्या लोकसंगीतावर बसवलेली त्यांची बेडूकनृत्ये असतात. फक्त विहिरीत साठवता येत नाही म्हणून कागद नसतो आणि म्हणून लिपी नसते. अनंत अंतरावरून स्थलांतर करीत पक्षी येतात. ह्या थोर मंडूकसंस्कृतीचा आणि भाषेचा अभ्यास करतात. आणि आपल्या देशाला परत गेल्यावर आपल्या जगभर प्रचलित असलेल्या द्विज-भाषेत त्यावर संशोधनग्रंथ लिहितात व त्या संस्कृतीला अमर करतात. भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी अशाच विहंगम-दृष्टिकोणाची आवश्यकता असते.--वाचक्‍नवी

सुरेख उतारा. जतन करावासा.

का कोण जाणे, बोलीभाषेचे पुरस्कर्ते मला विहिरीतल्या बेडकांसारखे वाटतात. त्यांच्या बोलीला व्याकरण असते, शुद्धलेखन असते आणि नादमाधुर्यही असते. त्यांच्या बोलीत वाचास्वरूप वाङ्‌मय असते, लोकगीते असतात. मंडूकसूत्राची रचना त्यांच्याच पूर्वजांनी केलेली असते. त्यांच्या आगळ्यावेगळ्या लोकसंगीतावर बसवलेली त्यांची बेडूकनृत्ये असतात. फक्त विहिरीत साठवता येत नाही म्हणून कागद नसतो आणि म्हणून लिपी नसते. अनंत अंतरावरून स्थलांतर करीत पक्षी येतात. ह्या थोर मंडूकसंस्कृतीचा आणि भाषेचा अभ्यास करतात. आणि आपल्या देशाला परत गेल्यावर आपल्या जगभर प्रचलित असलेल्या द्विज-भाषेत त्यावर संशोधनग्रंथ लिहितात व त्या संस्कृतीला अमर करतात. भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी अशाच विहंगम-दृष्टिकोणाची आवश्यकता असते.--वाचक्‍नवी

सुरेख उतारा. जतन करावासा आहे.

फारच छान

चित्तोपंतांशी सहमत आहे. अतिशय सुंदर उतारा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बोली

ज्याअर्थी ही भाषा कुणाही मराठी माणसाला सहज समजू शकते, त्याअर्थी ही बोलीभाषा नाही.

म्हन्जे मराठी मान्साला समजली नाही, तर ती बोलीभाषा आहे, अस म्हनायच का ?
आमच्या मराठी हमाल बंधूंना इंग्रजी आनि जर्मन आनि संस्कृत आनि रशियन समजत नाही. ती बोलीभाषा आहे का ?

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

इंग्रजी, जर्मन आणि संस्कृत हमालबांधवासाठी आणि....

इंग्रजी, जर्मन आणि संस्कृतसारख्या भाषा, हमालबांधवासाठी आणि आमच्यापकी काहीजणांकरिता बोलीभाषाच! जोपर्यंत आम्ही इंग्रजी युद्धपट फक्त बघतो आणि त्यांतली जर्मन सैन्याधिकार्‍याची बोलणी ऐकतो, भटजींनी म्हटलेले वैदिक आणि अन्य मंत्रदेखील अर्थ न समजता ध्यानपूर्वक ऐकतो आणि असे असूनही या भाषांमधले लिखाण मात्र आपल्याच्याने वाचवत नाही, तोपर्यंत या भाषांना आपल्या लेखी बोलीभाषाच म्हणायला लागेल. लक्षपूर्वक ऐकत राहिले तर थोड्या प्रयत्‍नाने बोलीभाषाही समजतात. हमालबंधूंना विमानतळावरून सामान उतरवून घेतलेल्या परदेशी प्रवाशांची भाषा समजत नाही? बोटीवरले भारतीय खलाशी जर परदेशी भाषा बोलू शकतात, तर तशी संधी मिळालेल्या हमालांना त्या नक्की समजू शकतात. मुंबईच्या बंदरसंकुल आणि गेट वे ऑफ़ इंडियाच्या परिसरातले फेरीवाले परकीय भाषा बोलताना नेहमीच आढळतात.
आता आपले हे हमालबंधू आपला व्यवसाय एखाद्या विहिरीतल्या विहिरीत करत असतील तर गोष्ट वेगळी.--वाचक्‍नवी

लय भारी

तोपर्यंत या भाषांना आपल्या लेखी बोलीभाषाच म्हणायला लागेल.

म्हन्जे बोलीलेखीभाषा, लेखीलेखीभाषा, आनि बोलीबोलीभाषा कोन्त्या ? आनि ज्या अलेखी अबोली हायेत त्या भाषा कोन्त्या ?

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

जबरदस्त

जबरदस्त आहे....
कमी शब्दात चांगला आशय...






म्हन्जे

कमी शब्दात चांगला आशय...

(काही भाग संपादित. --संपादक)

जुलै म्हैना आला की आमच्या ठेसनावर लय ब्येडूक जमतात. त्यातला एक बेडूक दुसर्‍या बेडकाला विहिरीतला बेडूक म्हनला की मग रुळावरचा बेडूक आनि रुळामधला बेडूक ह्यांच्यात लय डरावडराव् होते. पन लोकल आली की दोघेपन मरतात.

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

सहमत्

प्रमाण भाषेचे वाद जाउ देत.
पण आज प्रचलित असलेले अनेक शब्दप्रयोग्, वाक्प्रचार हे संत साहित्यातून आले आहेत हे मान्य करावेच लागेल.
तसाच प्रभाव अलीकडच्या काळात गदिमा व इतर भावगीतांचा आहे की ज्यातले अनेक शब्द् व शब्दसमूह हे दैनंदिन व्यवहाराच्या भाषेचा एक भाग बनले...

श्या!

कुठे कुठे जालावर लिंक मिळते अन् उपक्रमावरील कुण्या धाग्यावर पुनः पुन्हा येऊन पोहोचावे लागते.
उद्बोधक चर्चा वाचताना मधेच ती संपलेली दिसते. अर्धवट विणून सोडून दिलेल्या स्वेटरसारखी.
हे असं का होतं?
अन् चांगल्याच धाग्यांवर का होतं?
समारोप नाही, सारांश नाही चर्चेचं निष्कर्षाप्रत येणं नाही.

श्या!

 
^ वर