प्रतिसाद

प्रतिसाद
आज माझे वैयक्तिक विचार मांडणार आहे. फ़क्त उपक्रमपुरते मर्यादित असलेले. कारण काही वेळा मी इतर स्थळे पहातो, पण क्वचितच. त्यामुळे मी लिहतो फ़क्त येथेच.आणि फ़क्त येथील प्रतिसादांबद्दल लिहणे उचित ठरेल.मला वाटते मिपावर या विषयावर दोन छान लेख आहेत. पण त्या जागी शोभणारे. मी थोडॆ गंभीरपणाने लिहणार आहे.
काही उपक्रमी दोन-तीन ठिकाणी लिहतात, दोहीकडे चपखळ बसेल अशा शैलीत. [ इतर वेळी मी Dr. Jekil & Mr.Hyde म्हटले असते !] पण ही कसरत सर्वांना जमतेच असे नाही.मग साद गंभीर व प्रतिसाद हलकाफ़ुलका [किंवा बाष्कळ] .आता असा प्रतिसाद साजेसा [RELEVENT] असेल तर हरकत नसावी. पण बऱ्याच वेळी ही कसरत वाटते. तीच गोष्ट +१,+२, या घाऊक प्रतिसादांची. जरा वेळ काढून, विचार करून, नवीन शब्द निवडा ना. लेखकाला जास्त सुखद वाटेल. तुमचा शब्द निवडण्याचा अभ्यास वाढेल. आपल्या अभ्यासाची, रसिकतेची, ओळख सर्वांना करून द्या.

खरे म्हणजे, या विषयावर लिहावयास जरा अवघड वाटते. कारण प्रतिसाद हा जालावरच्या लिखाणाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. लेखकाने दोन ओळी लिहल्यावर दोन तासात २० प्रतिसाद मिळणे येथेच शक्य आहे. मला वाटते की याचे कारण पान खाल्यानंतर पिचकारी टाकण्याइतके ते सोपे झाले आहे.[ह.घ्या.].] एके काळी एखादी कथा आवडली, चित्र भावले, गाणे मनाला भिडले तर वर्तमान पत्रात तुमचा प्रतिसाद यावयाला ४-६ दिवस आणि मासिकात १-२ महिने लागावयाचे. छापून आला तर ! . जागाही मर्यादित
असल्याने संपादक तुमचे ज्ञान, अभ्यास, शैली, यांचा विचार करूनच प्रसिद्धी द्यावयाचे. आता संपादकाचे अधिकार जरा मर्यादित झालेले दिसतात. अगदीच अचरटपणा झाला तर प्रतिसाद उडवला जाईल. नाहीतर कुणीही काहीही लिहावे हाच अलिखित नियम झालेला दिसतो. हे चूक आहे का ? माझे मत " नाही." तुमच्या मताच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळत असेल तर उत्तमच आहे. मग भले ते बरोबर असो वा चूक. हे कबूल केल्यावर, तरीही म्हणेन की असे प्रतिसाद देणाऱ्याने प्रतिसाद देण्यापूर्वी दोन मिनिटे विचार करावा की " मी हा प्रतिसाद का पाठवत आहे ? त्या करिता माझा विचार स्वच्छ आहे ना ? मी शब्द योजना काळजीपूर्वक केली आहे ना ? हा प्रतिसाद
वाचणाऱ्याची माझ्याबद्दलची प्रतिमा काय होणार आहे ? मी जाणीवपूर्वक कोणाची अवहेलना, टिंगल-टवाळी करत तर नाही ना ? कडवटपणा टाळता येईल का ? " असा विचार करून प्रतिसाद देण्यास ५ मिनिटे जास्त जातील पण सर्व लिखाणाचा दर्जा वाढेल.
प्रतिसाद तीन - चार प्रकारात विभागता येतील
[१] रसास्वाद .... लेख, चित्र आपल्याला आवडले. लेखकाला त्याची पावती द्यावी असे वाटले. नुसते छान, सुन्दर असे लिहावयाच्या ऐवजी थोडक्यात का होईना कारणे द्या.
[२] टीका ... आवडला नाही, पटला नाही, चूकीचा वाटला.लेखकाच्या व वाचकांच्या निदर्शनास आणावे असे वाटले. का आवडला नाही/पटला नाही/चूकीचा वाटला याची सुयोग्य कारणे दिली पाहिजेत.
[३] तांत्रिक ... माहिती विचारणे/ देणे. चूका दाखविणॆ./दुरुस्ती करणे.
[४] तदनुरूप ... विषयाला धरून असलेली इतर माहिती , जी वाचकांना उपयोगी पडेल असे आपणास वाटते.

यां शिवाय, जे प्रतिसाद मी अप्रस्तुत म्हणतो ते
[५] मनोरंजक टिपणी,----- विषया़शी असंबंधित, पण तरीही वाचकांचे मनोरंजन करतील असे [अवांतर ?] प्रतिसाद मर्यादित असतील तर हरकत नसावी पण ४-५ पेक्षा जास्त झाले की मूळ लिखाणाचा दुवा तुटतो व बाष्कळपणाच वाढलेला दिसतो.
[६] कटू ---- लेखकाला हिणवण्याकरिता, हास्यास्पद बनवण्याकरिता, टवाळी करण्याच्या उद्देशाने लिहलेले.
[७] वैयक्तिक हेवेदावे --- जुने हिशेब-ठिशेब पुरे करण्याकरिता लिहलेले.[ ब़ऱ्याचवेळा प्रतिसादावरचा प्रतिसाद ! ]
[८] -------- जाणकार यात भर घालू शकतील.

मला वाटते की जास्तीत जास्त प्रतिसाद १-४ या गटातले असावेत. पण उपक्रमवरील लेख हा काही एशियॅटिक सोसायटी जर्नलमधील शोध निबंध नव्हे. जालावरील लोक तो वाचणार आहेत हे लक्षात घेऊन ५ लाही प्रवेश असावा. या गटात लिहणाऱ्या उपक्रमींची जबाबदारी थोडी वाढेल एवढेच.असो.

या लेखाचा दुसरा भाग म्हणून मी श्री. कोलबेर यांच्या एकाग्र या छायाचित्रावरील ३२ प्रतिसादांचा अभ्यास केला, त्यांची गटवारी केली व त्यावरची माझी टिप्पणीही केली. मग विचार केला, मीच कशाला ? सर्व उपक्रमवासी कोणताही लेख निवडून त्यावरील प्रतिसादांवर आपले विचार आजमावून पाहू शकतातच कीं.
दोस्त हो, चार मित्रांच्या संध्याकाळच्या गप्पांमधील स्वैर विचार या दृष्टीकोनातूनच वाचलेत नां ?
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रतिसाद (विचार क्ररून् लिहिलेले!)

प्रतिसादाचे आपले विष्लेषण आवडले. लेखाची कसोटी प्रतिसादांच्या भरमसाठ संख्येवरून न ठरविता प्रतिसादांच्या गुणवत्तेवरून ठरविणे उचित ठरेल. परंतु ही गुणवत्ता ठरवायची कशी व कुणी? त्यासाठी आपण सुचविलेली वर्गवारी नक्कीच उपयोगी पडेल. (चू.भू.दे.घे.)

अतिशय् योग्य विचार्

अतिशय् योग्य विचार् आहेत. तुमच्याशी सहमत व् पाठिंबा.

कळला नाही

अहो शरदकाका, पण एखादा लेख कळलाच नाही तर काय प्रतिसाद द्यायचा? दुसर्‍या मुद्द्यात न कळण्याचा उल्लेखही हवा होता.

- राजीव.

प्रतिसादकांना काही मर्यादांचे पालन आवश्यक ठरते.

कळले नाही तर काय कळले नाही ते प्रश्न विचारुन समजुन् घेता येऊ शकते. लेखकालाही त्याच्या पुढील लेखा साठी काय् चुका टाळता येतील हे कळेल. शेवटी आपण जर ज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठी एकत्र येत असलो तरी, किंवा प्रचलित प्रसारमाध्यमांच्या मर्यादांमुळे येणाऱ्या आडकाठ्यांना टाळून झटकन विचारांना वाट मोकळी करण्यासाठी एकत्र येत असलो तरी प्रतिसादकांना काही मर्यादांचे पालन आवश्यक ठरते.

कळले नाही

अहो, जगातली प्रत्येक गोष्ट आपल्याला कळावी असा अट्टाहास नाही माझा. आपल्याला जे कळवून घ्यायचं नाही तिथे प्रतिसाद देऊन उपयोगाचा नाही असे म्हणायचे होते.

-राजीव.

जगातली प्रत्येक गोष्ट

जगातली प्रत्येक गोष्ट आपल्याला कळावी असा अट्टाहास नाही माझा.

अहो, आपण जेव्हा अशा ओपन कम्युनिटीमधे वावरतो तेव्हा आपण जसे आपल्याला काही नवे मिळावे ह्यासाठी जमतो तसेच् इतरांनाही तुमच्या कडून नवे काही मिळावे अशा पद्धतीने जरी तुम्ही ते प्रश्न विचारले तरी लेखकाला उपयोगी पडतील, नाहीका? तुम्हाला ते कळवुन घ्यायचे असेल् तेव्हाच प्रतिसाद् द्या असा पावित्रा घेतलात् तर ओपन कम्युनिटी कशी व्वाढणार्?

हाहाहा!

अहो, आपण जेव्हा अशा ओपन कम्युनिटीमधे वावरतो तेव्हा आपण जसे आपल्याला काही नवे मिळावे ह्यासाठी जमतो तसेच् इतरांनाही तुमच्या कडून नवे काही मिळावे अशा पद्धतीने जरी तुम्ही ते प्रश्न विचारले तरी लेखकाला उपयोगी पडतील, नाहीका? तुम्हाला ते कळवुन घ्यायचे असेल् तेव्हाच प्रतिसाद् द्या असा पावित्रा घेतलात् तर ओपन कम्युनिटी कशी व्वाढणार्?

हो की. आता असं करा, मला प्रतिसाद द्यायला लावण्याआधी इथे बाकीचे लेख आहेत त्यांना आपण स्वतः माहितीपूर्ण प्रतिसाद द्या. मी जमल्यास तुमचा आदर्श ठेवतोच नजरेसमोर. ह. घ्या हो.

-राजीव.

माझे (ही, च, पण) मत

उत्तर १. प्रतिसादांशी संपूर्ण सहमत आहे. :)

आता खरे उत्तर. विषय चांगला आहे. प्रतिसाद अर्थातच वैयक्तिक आहे त्यामुळे असे मला वाटते सगळीकडे लागू आहे. पहिल्यांदा +१, सहमतविषयी. बरेचदा एखादा प्रतिसादही इतका चांगला असतो की त्याला दाद दिल्यावाचून रहावत नाही. आणि त्यापेक्षा वेगळे काही लिहायला सुचत नाही. अर्थात याचा विपर्यास करून +३१ पर्यंत रांगा लावल्या तर वाचणारी अर्थातच वैतागेल.

एखाद्या लेखाला प्रतिसाद न देण्याचीही बरीच कारणे असू शकतात. पहिले लेख डोक्यावरून गेला आणि इतका गेला की शंका विचारून काही उपयोग नाही. (आडातच नाहीये.) दुसरे अर्थातच वेळ. बरेच लेख संशोधन करून लिहीलेले असतात आणि ते वाचून समजण्यासाठी वेळ लागतो. तिसरे आवड. मला काही विषयांवरचे लेख वाचायला अधिक आवडतात त्यामुळे तिकडे माझा कल जास्त आहे. माझा विषय भौतिकशास्त्र असला तरी इथे आल्यावर मला परत भौतिकशास्त्र नको वाटते. (मागे काही लोकांना मी भौतिकशास्त्रावर लिहीत नाही याचे अपरंपार दु:ख झाले होते त्यामागचे कारण हे आहे.) त्यापेक्षा मला उत्क्रांती, भाषा असे विषय इथे वाचायला जास्त आवडतात. इथे येऊन परत भौतिक एके भौतिक केले तर हापिसात असल्यासारखेच वाटते.

प्रतिसाद १-५ असावेत. माझ्या मते विनोदी प्रतिसाद असायला अजिबात हरकत नाही. (आम्ही १००% रामदासांच्या व्याख्येत बसतो.) विनोदबुद्धी शाबूत ठेवून देखील ज्ञान मिळवता येते. या संदर्भात "/." या संकेतस्थळाचे उदाहरण द्यावेसे वाटते. इथे प्रतिसाद जसा असेल तसे लेबल त्याला दिले जाते उदा. रोचक, माहितीपूर्ण किंवा विनोदी. यात अर्थातच वैयक्तिक हेवेदावे नसले तर बरे पण असे मसवर म्हणणे(च) सोपे आहे.

पण उपक्रमवरील लेख हा काही एशियॅटिक सोसायटी जर्नलमधील शोध निबंध नव्हे. जालावरील लोक तो वाचणार आहेत हे लक्षात घेऊन ५ लाही प्रवेश असावा.
थोडे अवांतर. हा मुद्दा मला बरेच दिवस छळतो आहे. शास्त्रीय निबंधांमध्ये विनोदी वाक्ये असली तर चालते का? नसले तर का नाही? एकदा मी विनोदी पद्धतीने शास्त्रीय निबंध लिहूनही पाहिला होता. मला तरी आवडला. :)

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

+१

+१

--- उपक्रमी

+१

आता राजेंद्रच्या वरील प्रतिसादाशी मी संपुर्ण सहमत आहे. अश्यावेळी तोच/तसाच प्रतिसाद परत लिहिण्यात काय हशील?
अश्या वेळी +१ / असेच म्हणतो यापेक्षा उत्तम प्रतिसाद नाहि असे वाटते.

काहिसे अवांतर:

शास्त्रीय निबंधांमध्ये विनोदी वाक्ये असली तर चालते का?

का नाहि?.. यापुढे जाऊन विनोदातून माहिती देता आली तरयाजूनच मस्त.. जर एखाद्या गोष्टीतुन, संवादांतुन, कवितेतून जर शास्त्रीय माहिती देता येते तर विनोदातून का नाहि? (आणि माझ्या मते अशी माहितीपूर्ण कथा, कविता उपक्रमावर लिहिण्यास मनाई नसावी - नसल्यास उत्तमच).
जसा एखाद्या पोवाड्यातून जसा वीररस चेतवला जातो तसे एखाद्या पथनाट्यातून सूर्यग्रहण कसे होते हे समजावले तर तो कलाविष्कार तर आहेच पण त्याबरोबरच शास्त्रीय दस्ताऐवजदेखील!

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

छानच!

लेख आणि प्रतिसाद दोन्हीही छानच!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

शब्दातीत..!

[१] रसास्वाद .... लेख, चित्र आपल्याला आवडले. लेखकाला त्याची पावती द्यावी असे वाटले. नुसते छान, सुन्दर असे लिहावयाच्या ऐवजी थोडक्यात का होईना कारणे द्या.

अहो पण काही गोष्टी शब्दातीत असतात त्याचे काय?!

अश्या वेळेस,

--

!!!

नि:शब्द!

असे काही प्रतिसाद चालतील का?

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

चांगले विश्लेषण

पटण्यासारखे आहे.

पण [१] लिहिताना कल्पकता पणाला लागते. +१ हेच कधीकधी बरे.
[२] लिहिताना स्पष्टीकरण देणे हेच दाक्षिण्य (बहुतेक [६], [७] लिहिणार्‍यांना आपण [२] लिहीत आहोत असे मनोमन वाटत असावे.)

[५] कधीकधी लिहावे - सहमत.

मान्य

जॅक स्प्यॅरो -- कळला नाही तर विचारा की. तुमच्या सारखे इतरही असतील, त्यांचाही फ़ायदा होईल.पण मला वाटते की इथे थोडेसे आत्मनिरिक्षण आवश्यक आहे. उदाहरण देतो. मघ्ये उपक्रमवर आय.टी.वरचे काही लेख आले होते. मला कळले नाहीत. कारण या विषयावरचे माझे ज्ञान मोठे शून्य.मी काही विचारून उपयोग नाही, लेखक काय डोके फ़ोडणार ? या विषयावर
माझा प्रतिसाद अपेक्षित नाही.फ़ार फ़ार तर, हौस असेल तर, प्राथमिक धडे कोठे मिळतील याचे दुवे विचारावेत.

श्री. राजेंद्र --- +१,+२ लिहावयाच्या ऐवजी प्रतिसादाला दाद द्या. लेखक आणि प्रतिसाद देणारा दोघेही सुखावतील.
थोडे अवांतर --- शोध निबंधात विनोद असावा की नाही यावर मी बोलत नाही. मुद्दा अशा लेखावरील प्रतिसाद विनोदी असावा की नाही हा आहे. उपक्रमावरील सर्वश्री. घारे, नानावटी इत्यादींचे शास्त्रीय माहिती देणारे लेख आहेत; त्यांवर विनोदी प्रतिसाद द्यावेत का ? ते अप्रशस्त ठरणार नाही का ? आता आपण लिहला आहे तो लेख[ ती कविता] मला वाचावयास मिळाली तर नक्कीच आवडेल.खरडवहीत टाका आणि कळवा. गट ५ लिहताना तारतम्य वापरावे एवढेच मला वाटते.

श्री. विसोबा --- का नाही ? " शब्दातीत " हा प्रतिसाद बरेच काही सांगून जाईल. द.वि. पलुस्करांचा श्री किंवा अमीरखानांचा मारवा ऐकल्यावर मीही नि:शब्द होतो. दाद कसली देता ?
शरद

वा!

द.वि. पलुस्करांचा श्री किंवा अमीरखानांचा मारवा ऐकल्यावर मीही नि:शब्द होतो. दाद कसली देता ?

वा शरदराव! काय सुरेख याद दिलीत!

आपला,
(गानप्रेमी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

गंमत बघा

प्रतिसाद कसे असावेत यावर समरसून चर्चा करणार्‍या मंडळी विसोबा खेचरांच्या लेखात दिसणारे प्रतिसाद कसे नसावेत याची उदाहरणे चर्चेस घेतील काय?

इथे प्रतिसादांवर चर्चा सुरू असताना, बाजूच्याच लेखात प्रतिसाद कसे नसावेत याची भरभरून उदाहरणे येणे हे या लेखाचे अपयश मानावे की लोक वेळ जात नाही म्हणून चर्चा करतात नंतर आपल्याला जे करायचं ते करतात असं म्हणायचे?

-राजीव.

असो..!

विसोबा खेचरांच्या लेखात दिसणारे प्रतिसाद कसे नसावेत याची उदाहरणे चर्चेस घेतील काय?

चांगली कल्पना आहे. माझ्या लेखात संस्कृतचा, मिथून चक्रवर्तीचा, अमिताभचा, किंवा व पु काळ्यांचा संबंध कसा काय आला, ही एक मोठी मौजेचीच बाब आहे. अर्थात, उपक्रमाच्या संपादक मंडळाने त्या अवांतर प्रतिसादांचे काहीही संपादन केलेले नाही. ल्यामुळे उपक्रम प्रशासनालाही ते प्रतिसाद व्यक्तिगत रोखाचे वगैरे न वाटता विषयानुरूपच वाटतात हीदेखील मोठी मौजेचीच बाब आहे!

असो,

उपक्रम प्रशासनाची सर्व धोरणे आणि नियम मला अर्थातच शिरसावंद्य आहेत!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

लेख आवडला

लेख आवडला. तसेच प्रतिसादही रंजक आहेत.

प्रतिसादातील व्यावहारिकता

प्रथम गोष्ट म्हणजे प्रतिसाद ही 'साद' या क्रियेवर असलेली प्रतिक्रिया आहे.त्यानुसार खालील गोष्टी संभवतात
१)मी जर साद ऐकलीच नाही तर मी प्रतिसाद देणार नाही
२) मी साद ऐकली आहे परंतु त्याचा त्याचा अर्थ मला समजलेला नाही त्यामुळे प्रथम मी त्याचा अर्थ समजावुन घेण्याचा प्रयत्न करणार. मगच प्रतिक्रिया देण्यास उद्युक्त होणार.
३)मला समजेला अर्थ व सादकाला अभिप्रेत असलेला अर्थ हा एकच आहे का? असा माझ्या मनात संभ्रम आहे म्हणुन मी प्रतिसाद देत नाही.
४) मी साद ऐकली आहे त्याचा अर्थही मला समजेलेला आहे परंतु मला साद पेक्षा सादक महत्वाचा वाटतो . सादकाशी असलेल्या पुर्वग्रह पोषित/ दुषित संबंधांवर यावर माझी प्रतिक्रिया देणे / न देणे अवलंबुन आहे
५) मी साद ऐकली आहे त्याचा अर्थही मला समजलेला आहे परंतु मला प्रतिसाद देण्याची उर्मी नाही. कारण माझे वाचनमात्र असण्याची उर्मी ही प्रतिसाद देण्याच्या उर्मीवर मात करते.
६) मला अभिप्रेत असलेला प्रतिसाद हा अन्यकोणी अगदी मला हवा तस्साच दिला आहे. मी त्याच्याशी सहमत आहे हे सादकाला कळावे (त्याला तसे कळावे ही माही गरज आहे) म्हणुन माझा प्रतिसाद हा +१ / सहमत एवढाच देतो. त्यात माझे टंकायचे कष्ट वाचतात.

आवडला नाही, पटला नाही, चूकीचा वाटला.लेखकाच्या व वाचकांच्या निदर्शनास आणावे असे वाटले. का आवडला नाही/पटला नाही/चूकीचा वाटला याची सुयोग्य कारणे दिली पाहिजेत.

लव्ह / हेट ऍट फर्स्ट साईट या चे सुयोग्य कारण स्वत:लाच देता येत नाही. इथे विचारांपेक्षा भावनांना अधिक महत्व असते. मला बासुंदी आवडली किंवा भेंडीची भाजी आवडली नाही याची कारणे मलाच देता येत नाही पण मी प्रतिक्रिया देउन मोकळा होतो कारण ती माझी भावनिक गरज असते अथवा प्रतिक्षिप्त क्रिया असते.
प्रतिसादक हा कोणत्या मनःस्थितीत आहे. त्याचा पिंड काय आहे. त्यावर देखील प्रतिसाद अवलंबुन असतो. वेगळ्या मन:स्थितीत असता तर प्रतिसाद देखील कदाचित वेगळा आला असता.
कधी कधी अन्य कुणी दिलेला 'प्रतिसाद' हीच मला दिलखुलास प्रतिसाद द्यावा अशी साद वाटते.त्यावेळी प्रतिप्रतिसाद . प्रतिप्रतिप्रतिसाद अशी मालिका चालु होते. मग चर्चेची दिशा भरकटत जाते.
असो !कधी कधी भरकटण्यातला प्रवास सुद्धा पुर्वनियोजित प्रवासा पेक्षा आनंद देणारा असतो.

प्रकाश घाटपांडे

प्रतिसाद

प्रतिसाद आवडला.

प्रतिसाद उस्फुर्त असावा.

बरेचदा असे दिसते की काही विशिष्ठ लोक एकमेकांना त्यांच्या लेखावर भरभरून चांगले प्रतिसाद देतात. हे बर्‍याचदा साटंलोटं असतं...एकमेकांची पाठ खाजवण्यासारखे.
काही लोक निव्वळ पूर्वग्रहदूषित मनाने प्रतिसाद देतात किंवा काहीजण निव्वळ री ओढण्यासाठीच प्रतिसाद देतात. बर्‍याचदा त्यात विषयापेक्षा व्यक्तीवर रोख असतो. अर्थात जे सामान्य जीवनात घडते तेच इथे महाजालावर घडणार हे केव्हांही मान्य करावे लागेल. आपल्या लेखावर नेहमी प्रतिक्रिया देणार्‍या(आपल्याच कंपूतील) लोकांशिवाय अन्य कुणी प्रतिसाद दिला तर ते जास्त उत्साहवर्धक ठरते असे मला स्वत:ला वाटते.
मला स्वत:ला दुसर्‍याच्या लेखांना प्रतिसाद द्यावासा वाटतो तो केवळ उस्फुर्तपणाने तसे वाटेल तेव्हाच. एरवी वाचनमात्र राहणे मी पसंत करतो.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

 
^ वर