प्रश्नपत्रिका
प्रश्नपत्रिका
प्रेषक यनावाला (शनि, 03/14/2009 - 16:06)
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रश्नपत्रिका:
श्री.शरद यांनी भाषेच्या अलंकारांविषयी उत्तम लेख लिहिले आहेत.हे लेख वाचून आपली या विषयाची उजळणी झाली.श्री.शरद यांनी अपह्नुती,उपमा,उत्प्रेक्षा,रूपक या अर्थालंकारांचा,तसेच यमक आणि अनुप्रास या शब्दालंकारांचा परिचय करून दिला आहे.
त्यावर आधारित असे हे प्रश्न आहेत.इथे अलंकार केवळ ओळखायचे आहेत.एकाच उदाहरणात दोन अथवा अधिक अलंकार असू शकतील. अशावेळी जो प्रकर्षाने प्रतीत होईल तो अलंकार मानावा. शब्दालंकारापेक्षा अर्थालंकाराला प्राधान्य देणे उचित ठरेल.
**********
(१) पहा पाखरें चरोनि होती झाडावर गोळा।
कुठें बुडाला पलीकडिल तो सोन्याचा गोळा॥
*
(२)तल्लिलेमधि तल्लीन न हो कल्लोलिनि कवि कवण तरी।
जय संजीवनी जननि पयोदे श्रीगोदे भवताप हरी॥
*
(३) तो शर गरवरधरसा पविसा रविसा स्मरारिसायकसा।
पार्थभुजांतरिं शिरला वल्मीकामाजि नागनायकसा॥
*
(४)माझ्या छकुलीचे डोळे दुध्या कवsडिचे डाव
बाई कमळ कमळ गोड चिडीचं ग नांव
जरी बोलते ही मैना माझी अजून बोबडे
मला लागती ते बाई खडिसाखsरेचे खडे।
*
(५)रदन दिसति जणू शशिबिंबाचे खंड मुखी खोविले
कुरल केश शिरिं सरल नासिका नेत्र कमलिनीदले।
*
(६)त्वां काय कर्म करिजे लघुलेकराने।
बोलोनिया मग धनू धरिलें कराने॥
*
(७)शाळिग्रामासम काळा देह कसा घोटीव ।
तेजदार नागावाणी दिसे कोवळा जीव ॥
*
(८)जिच्यावरि नद्या ,झरे, नहि जवाहिरे गोमटी
जिच्या घनवनस्पती, परि न पैठणी पोपटी॥
*
(९)हे मंद मंद पदसुंदर कुंददन्ती।
चाले जसा मदधुरंधर इंद्रदन्ती ।
हंसा धरूं जवळि जाय कृशोदरी ते ।
निष्कंप कंकणकरासि पुढे करी ते ॥
*
(१०)भो पंचम जॉर्ज भूप, धन्य धन्य! विबु्धमान्य,सार्वभौम भूवरा।
बहुत काळ तूच पाळ ही वसुंधरा,| नयधुरंधरा॥
(नयधुरंधर=न्यायदानात कुशल)
*
(११) न हे नभोमंडळ वारिराशी।
न तारका फेसचि हा तयासी।
न चंद्र हा नावचि चालताहे ।
न अंक तो तीवर शीड आहे॥
*
(१२) कालिंदीतटपुलिनलांच्छितसुरतनुपादारविंद जयजय।
*
(१३)किती माझा कोंबडा ऐटदार
चाल त्याची किती बरे डौलदार
शिरोभागी छानसा तुरा हाले
जणू जास्वंदी फूल उमललेले।
*
(१४)सुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो।
*
(१५)पंचतुंड नररुंडमाळधर पार्वतीश आधी नमितो
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो।
*****************************************************
कृपया उत्तरे प्रतिसादात लिहावी.
**********************************************
»
Comments
उत्प्रेक्षा
या प्रकाराची शरद यांनी ओळख करून दिलेली मला हवी आहे. (अजून केलेली नाही.)
या बाबतीत मला अनेक शंका आहेत. मम्मट वगैरेंच्या उदाहरणातून मला हवा तितका बोध झाला नाही. कदाचित "उत्प्रेक्षा" अलंकार कशाला म्हणत/म्हणतात यात काळानुसार फरक पडला असेल तरीसुद्धा माझ्या गोंधळात भरच पडली आहे.
येथे (अशाच दुसर्या एका कडव्यात) अलंकार उत्प्रेक्षा असल्याबद्दल माझी बिरुटेसरांबरोबर चर्चा झाली होती. "जणू" शब्दामुळे. पण "जणू" आणि "सारखा"मधील अर्थांचा फरक मला कळलेला नाही.
त्या मानाने उत्प्रेक्षा (=बळेच उपेक्षा) हा अर्थ मला थोडासा समजतो. म्हणजे प्रत्यक्षाला गैरलागू अशा अप्रत्यक्षाच्या तपशिलाचा प्रत्यक्षावर आरोप करणे. आणि अशा प्रकारे काव्यरसपूर्ण चमत्कृती साधणे. अशा कल्पनाविलासाची सुरुवात शक्यतोवर "जणू" शब्दाने सुरू होऊ शकते हे मान्य.
(परीक्षा लिहिताना शिक्षकाला धड्याचे स्पष्टीकरण विचारू नये, असा संकेत आहे. पण "उत्प्रेक्षा" धडा गुर्जींनी अजून शिकवला नसल्यामुळे हे क्षम्य मानले जावे.)
अवघड !
उपमा
पहा पाखरें चरोनि होती झाडावर गोळा।
कुठें बुडाला पलीकडिल तो सोन्याचा गोळा॥
पुष्पयमक !
सुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो।
उत्प्रेक्षा
किती माझा कोंबडा ऐटदार
चाल त्याची किती बरे डौलदार
शिरोभागी छानसा तुरा हाले
जास्वंदी फूल उमललेले।
बाकी अवघड आहे, प्रश्नपत्रिका ! :(
अलंकार
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी पुष्पयमक आणि उत्प्रेक्षा हे दोन अलंकार अचूक ओळखले आहेत. मात्र "कुठे बुडाला पलीकडिल तो सोन्याचा गोळा|" हा माझ्या मते रूपक अलंकार आहे.
हम्म :(
"कुठे बुडाला पलीकडिल तो सोन्याचा गोळा|" रुपक अलंकारच असेल तर आमची काही हरकत नाही.
पण आम्ही समजायचो की, उपमेत एक वस्तू दुस-यासारखी म्हणजे (सादृश्य) उपमा ! तरिही...उपमेय व उपमान यांच्यात एकरुपता असते तेव्हा रुपक अलंकार होतो..म्हणून आमचा गोंधळ :(
स्वगत : च्यायला व्याकरण म्हणजे निव्वळ गोंधळ आहे. तरि आम्ही म्हणतो की, कॉलेजच्या पोरांनाही मराठीच्या धड्यात व्याकरण टाका. विद्यार्थ्यांचा अभ्यास तर होईल.पण मास्तरांचाही अभ्यास त्या निमित्ताने पक्का होईल.
-दिलीप बिरुटे
(व्याकरणातला कच्चा मास्तर )
पुन्हा माझे पालूपद
अलंकारमीमांसेचा व्याकरणाशी काहीएक संबध नाही.
(मात्र शब्दार्थमीमांसा हा व्याकरणाचा भाग आहे, हे खरे. तुलनात्मक शब्दातून ऐकणार्याच्या मनात योग्य अर्थ कसा प्रकाशित होतो? याचे वर्णन हे व्याकरणाचे क्षेत्र. केलेली तुलना सुंदर आहे की नाही, आणि वेगवेगळ्या सौंदर्यप्रतीतीला अनुसरून उपप्रकारांना नावे देणे, हे सौंदर्य-मीमांसाशास्त्राचे क्षेत्र. तिथे व्याकरणाने काहीही लुडबुड करू नये.)
"रंगहीन हिरव्या कल्पना टणाटण झोपतात."
हे वाक्य व्याकरणाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. याची गंभीर व्याकरणमीमांसा होऊ शकते. पण याची सौंदर्यमीमांसा करायची कल्पनाशक्ती असलेला असामी क्वचितच सापडेल.
(हे वाक्य नोआम चोम्स्की याच्या स्फूर्तीचे रचले आहे. मूळ इंग्रजी वाक्याबद्दल खूप वाचल्यामुळे कदाचित त्याची सौंदर्यमीमांसा करणे मला जमेल :-) )
व्याकरण म्हणजे
>>तुलनात्मक शब्दातून ऐकणार्याच्या मनात योग्य अर्थ कसा प्रकाशित होतो?
त्याबरोबर...
व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र . (पाहा: सुगम मराठी व्याकरण लेखन) भाषा कशाची बनते, वाक्याचे घटक, शब्दांचे जाती, त्यांची रुपे, वाक्याचे परपस्परांशी संबध, शब्दांचे अर्थ, अलंकार, शब्दार्थ, हे सर्व व्याकरणात येते...आणि त्याचा पुढील अभ्यास म्हणजे सौंदर्य शास्त्र..वगैरे..पण ते येतेच व्याकरणात असे वाटते.
-दिलीप बिरुटे
आमच्या शाळेत
आमच्या शाळेत इतिहास आणि नागरिकशास्त्राची एकच परीक्षा (पेपर) असे. असे असण्यात काही फायदे आहेत असे आमच्या परीक्षामंडळाला वाटले असणार. मीसुद्धा मानतो. दोन्ही शास्त्रांमध्ये राज्यव्यवस्थेबद्दल माहिती कळते. तरी नागरिकशास्त्र आणि इतिहास हे एकच आहे, असे म्हणणे मात्र योग्य नाही. दोन्ही शास्त्रांची प्रयोजने वेगळी, प्रमाणे वेगळी आणि फलिते वेगळी.
त्याच प्रमाणे व्याकरण आणि सौंदर्यमीमांसा हे दोन विषय सोयीचे असल्यास एकाच शिक्षकाकडून शाळेत शिकवून घ्यावेत किंवा त्याची एकच परीक्षा (पेपर) ठेवावा. पण त्या दोन विषयांची प्रयोजने, प्रमाणे, आणि फलिते वेगवेगळी आहेत.
व्याकरण कुठल्याही विशिष्ट भाषासमाजातल्या भाषेचे वर्णन आहे. समजा कोण्या व्याकरणकाराने म्हटले की वर्हाडीत 'मी' शब्दाचे एक विभक्तिरूप "मले" असे होते; तर त्याबद्दल वाद मिटवायचा एकच मार्ग आहे. वर्हाडी स्वभाषा बोलणार्या कोणत्याही सामान्य माणसाचे बोलणे ऐकावे, तो आपणहून विशिष्ट वाक्यरचना करेल असा संवाद साधावा - जर तो/ती "मले" म्हणाला/ली तर सिद्ध! कुठल्याही मराठी माणसाला मराठी बोलण्यासाठी किंवा समजण्यासाठी व्याकरण शिकायची काहीएक गरज नाही, आणि व्याकरण शिकल्यामुळे अर्थ अधिक कळूही लागत नाही. व्याकरण न शिकता प्रौढांनाही आपलीशी वाटणारी अर्थवाही मराठी भाषा ४-५ वर्षांचे मराठी मूल बोलू लागते, आणि समजू लागते.
सौंदर्यमीमांसेचे काम अस्वादासाठी महत्त्वाची स्थाने वर्णावीत. कोणाला अमुक सौंदर्यप्रतीती होते, कोण्याला तमुक. दुसर्या एका संकेतस्थळावर एक शाळकरी युवक निबंध लिहितो आहे, त्याच्या भारंभार टाकलेल्या उपमांबद्दल लोकांनी तीव्र नापसंती दाखवली - सुंदर रचना ही "मातृभाषा मराठी"सारखी लहानपणीच हस्तगत होत नाही.
व्याकरणातली प्रमाणे वेगळी - संदर्भात असेल तशी कुणब्याची किंवा वर्हाडी माणसाची ध्वनिफीत पुरेल. त्या कुणब्याला, किंवा वर्हाडी माणसाला व्याकरणाची शिकवण असण्याची काही गरज नाही - उलट कसले पाठांतर नसून अनुभव-शिक्षण असले तरच प्रमाण अधिक बळकट. पण बिरुटेसरांना इथे उपमा-सौंदर्य अनुभवाला आले, आणि यनावालासरांना रूपक-सौंदर्य अनुभवाला आले, तर सामान्य मराठी माणसाकडे वळता येत नाही. या वादाचा निर्णय वस्तुनिष्ठ नसून विद्वानांच्या युक्तिवादाने होतो. व्याकरण शिकल्यामुळे मराठी भाषा अधिक अर्थवाही होत नाही - विभक्ती दोन आहेत की चार की सात या वैयाकरणवादाचा काहीही निर्णय होवो - मराठी भाषा तितकीच अर्थवाही राहील. मात्र सौंदर्यस्थाने चर्चिल्यामुळे आस्वाद अधिक गडद होतो - म्हणजे सौंदर्यमीमांसेचे फलितही व्याकरणाच्या फलितापेक्षा वेगळे आहे.
खरे म्हणजे या दोन गोष्टी एका वर्गात एका शिक्षकाकडून शिकवून काय सोय साधणार आहे, तेदेखील मला समजत नाही. उच्चशिक्षणात तरी वेगवेगळ्या शिक्षकांनी सौंदर्यमीमांसा आणि शब्दानुशासन शिकवावे, असे मला वाटते.
("सुगम मराठी व्याकरण लेखन" पुस्तकाचा लेखक वैयाकरण आहे की पाठ्यपुस्तक-लेखक? "भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र" ही व्याख्या फारच धूसर आहे - भाषेचा इतिहास, म्हणजे शिवशाहीत मराठी राजभाषा कधी झाली, भारताच्या भाषावार प्रांतरचनेत संयुक्त महाराष्ट्र चळवळ, हे सगळे विषय "भाषेचे स्पष्टीकरण" मध्ये येतात; पण त्या सर्वांना व्याकरण म्हणणे म्हणजे जरा अतीच वाटते.)
(येथे प्रतिसाद येणे बंद झाले आहे. रूपक-की-उपमा या वरील प्रश्नाच्या मुळाशी जाणारा हा प्रतिसाद आहे. तो अति-अवांतर मानण्यात येऊ नये.)
हद्द ठरवली पाहिजे !
मलाही शाळेत शिकतांना इतिहासाला जोडून नागरिकशास्त्र होते. राज्यशास्त्राचा विषय असतांना तो विषय इतिहासाला जोडलेला होता. तो काही सोय म्हणुन कदाचित असावे, अर्थात त्याचा परस्परांशी कोणताच संबंध नाही हे कळायला वयाची बरीच वर्ष उजाडली.
भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणतांना लेखकाला कदाचित भाषेचे घटक असे म्हणायचे असेल. मो. रा. वाळंबे यांचे सुगम मराठी व्याकरण-लेखन हे पुस्तक यात पृ.क्र. ३ मधे ते म्हणतात '' भाषा कशाची बनलेली असते, वाक्याचे घटक कोणते, शब्दांच्या जाती किती, त्यांची कार्य कोणती, शब्द कसे बनतात, त्यांचा वाक्यात वापर करतांना शब्दांच्या रुपात कोणते बदल होतात, वाक्यातील शब्दांचा परस्परांशी कोणता संबंध असतो, वगैरेंचा विचार व्याकरणात केलेला असते. व्याकरण हा शब्द 'वि+आ+कृ (=करण) यापासून बनलेला आहे. याचा शब्दशः अर्थ 'स्पष्टीकरण' असा आहे. आपली भाषा कशी घडते याचे स्पष्टीकरण व्याकरणाता केलेले असते. आधी भाषा बनते, मग तिचे व्याकरण ठरते.व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. भाषेचा मागोवा घेत व्याकरणाला जावे लागते. ''
आता आमचे मत असे की, व्याकरण म्हणून आपण ज्याचा अभ्यास करतो ज्याचा उल्लेख आम्ही पूर्वीच्या प्रतिसादात केला आहे, ते सर्व व्याकरणात यावे. पण आपण म्हणता ते वेगवेगळे आहे असे जर समजायचे असेल तर आपल्याला त्यांच्यासाठी एक सिमारेषा आखावी लागेल जसे की,व्याकरणाची हद्द इथे-इथे संपते. आपण ज्या सौंदर्यशास्त्राचा उल्लेख करत आहात ते साहित्यशास्त्रात येते. साहित्याचे स्वरुप, साहित्याचे प्रयोजन, साहित्याची निर्मिती प्रक्रिया, शब्दशक्ती आणि अर्थ विचार, साहित्याची भाषा आणि शैली, रसविचार आणि आस्वाद. ( आमच्या विद्यापीठात पदवीच्या मराठीच्या विद्यार्थांना साहित्य शास्त्र शिकवले जाते, व्याकरण नाही ) हे सौंदर्यशास्त्रात येते. व्याकरणशास्त्र, भाषाशास्त्र, साहित्यशास्त्र, या वेगवेगळ्या शास्त्रांमधे येणार्या विषयांच्या सिमारेषा एकदा ठरल्या म्हणजे मला वाटते आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
समाजशास्त्र
इतिहास आणि नागरिकशास्त्राचा काही संबंध नसावा. आमच्या वेळी इतिहास-नागरिकशास्त्र हा ५० + २५ = ७५ मार्कांचा आणि भूगोल-अर्थशास्त्र हा ५० + २५ मार्कांचा, असे समाजशास्त्राचे दोन पेपर असत. एक सोय याव्यतिरिक्त या विषयांमध्ये काही संबंध असल्याचे जाणवले नाही.
भूगोलाच्या मास्तरांनाच अर्थशास्त्र शिकवावे लागायचे त्यामुळे आमचे अर्थशास्त्र हे सदाहरित होण्याऐवजी समशीतोष्ण व वाळवंटी झाले.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हे सगळे विषय
इतिहास , भूगोल, अर्थशास्त्र नागरीकशास्त्र, समाजशास्त्र वगैरे विषयांचा हमाली करताना काहीही उपयोग नाहि. असा स्वानुभव आहे.
- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है
मालोपमा - पण अर्थ?
एका प्रत्यक्ष शराला एक-एक करून अनेक उपमाने दिलेली आहेत प्रत्येकाला "-सा"="जसा" शब्द जोडला आहे.
पहिली उपमाने समजली नाहीत किंवा पटली नाहीत.
गरवरधर - उच्च कोटीचे विष धारण करणारा, शिव?
पवि - भाल्याचे किंवा बाणाचे टोक?
रवि - सूर्य?
स्मरारिसायक - कामदेवाच्या शत्रुचा (= शंकराचा) बाण?
वल्मीकामाजि नागनायक - वारुळात नाग
संदर्भ काय? किरातार्जुनीय लढाई का?
मला येथे पहिल्या ओळीत अनुप्रासाचा हव्यास झाल्यासारखा वाटतो. दुसर्या ओळीतली उपमा थोडीशी आवडली की खूप आवडली याबद्दल मन दोलायमान आहे.
मालोपमा:अर्थ
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
(३) तो शर गरवरधरसा पविसा रविसा स्मरारिसायकसा।
पार्थभुजांतरिं शिरला वल्मीकामाजि नागनायकसा॥
*
येथे मालोपमा अलंकार आहे असे श्री.धनंजय लिहितात ते बरोबरच आहे. या आर्येचा अन्वय पुढील प्रमाणे लावता येईलः
अन्वयः ॰गरवरधरसा, पविसा,रविसा, स्मरारिसायकसा तो शर ; वल्मीकामाजी नागनायकसा; पार्थभुजांतरी शिरला.
अर्थ पुढीलप्रमाणे असावा.
अर्थः तीव्रगरलधारी सापासारखा (विषारी),भाल्याच्या पात्यासारखा (धारदार), सूर्यासारखा(तेजस्वी), शंकराच्या बाणासारखा (अचूक लक्ष्य वेधणारा) असा तो बाण;वारुळात नागराज शिरावा त्याप्रमाणे अर्जुनाच्या बाहूत(सळसळत) घुसला.
.....प्रसंग किरातार्जुनीय युद्धाचा आहे की कसे याची कल्पना नाही. पण नसावा असे वाटते.
धन्यवाद
अर्थ पटला. म्हणूनच पहिल्या ओळीत अनुप्रासाच्या हव्यासाने उपमेचा रसभंग झाला असे मला वाटते.
पुढे वारुळात शिरणारा नागराज होणार आहे, तर सुरुवातीला अत्यांत विषारी सापाची (जवळजवळ तशीच) उपमा देऊन काय साधले.
"बाण शंकराच्या बाणासारखा आहे."
पवि म्हणजे बाणाचे टोक किंवा भाल्याचे पाते. बाण बाणाच्या टोकासारखा शिरला म्हणण्याने रसभरित अर्थवैचित्र्य मला वाटत नाही.
रविसारखा तेजस्वी बाण? असेल म्हणा. सळसळत शिरणारा बाण लखलखावा की तळपावा?
अर्थाच्या दृष्टीने - छ्या!
गरवरधर शर, पवि-रवि, स्मरारि, सायक/नायक - या अनुप्रास-यमकांच्या हव्यासापायी अर्थाचे बोडण ढवळणारी रचना या कवीने केलेली आहे.
२. प्रकर्षाने अनुप्रास
(२)तल्लिलेमधि तल्लीन न हो कल्लोलिनि कवि कवण तरी।
जय संजीवनी जननि पयोदे श्रीगोदे भवताप हरी॥
यात प्रकर्षाने अनुप्रास जाणवतो. पादांतीचे यमक तर आहेच.
"जननी" हे रूपक मानायला जागा आहे. (संजीवनी, भवतापहरी, हे कवीच्या दृष्टीने स्पष्ट अर्थवचन असू शकेल.)
"पयोदे" (दूध देणारी किंवा पाणी देणारी) जननीच्या सान्निध्यामुळे "दूध देणारी" हा अर्थ भासायला लागतो, पण लगेच पाणी देणारी म्हणून कळते - अपह्नुती.
हे अर्थालंकार असले तरी सर्वाधिक जाणवणारा तो अनुप्रास.
चार अलंकार
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
चार अलंकार
उपमा,उत्प्रेक्षा, रूपक आणि अपह्नुती या चार अलंकारांविषयी माझा ढोबळ समज पुढील प्रमाणे आहे.
या चारही अलंकारांत प्रस्तुत (उपमेय.. इथे तुरा) आणि अप्रस्तुत (उपमान..इथे जास्वंदीफूल) या दोन्ही गोष्टी असतात.(क्वचित एखादीचा लोपही असतो).या दोन गोष्टींतील साम्याच्या प्रमाणावरून चार भिन्न नांवे आहेत. कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात,"उपमा हीच कोणी नटी निरनिराळी सोंगे आपल्या पुढे येते आणि आपण त्या त्या प्रसंगी त्या रचनेला अलंकाराचे भिन्न नाव देतो."
*
उपमा: प्रस्तुत आणि अप्रस्तुत यांत आल्हादजनक रीतीने साम्य दाखवलेले असते. दोहोंतील भेद स्पष्ट असतो. सम,समान,प्रमाणे, परी,जैसा, सा,असे शब्द असतात.
उदा.: जास्वंदीच्या कुसुमासम हा शिरीं शोभतो तुरा।
इथे तुरा फुलासारखा दिसतो एव्हढेच म्हटले आहे. अन्यथा या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत हे मान्य आहे.
*
उत्प्रेक्षा: यांत दोन गोष्टीचे साम्य अधिक गडद असते. इतके की उपमेय (तुरा) हे उपमान (फूल) असावे असा भास निर्माण होतो.यात जणो,जणूकाही,भासे, गमे असे शब्द येतात.( मात्र हे व्यवच्छेदक लक्षण नव्हे. हे शब्द असले म्हणजे हा अलंकार असेलच असे नाही.तसेच हा अलंकार असला म्हण्जे हे श्ब्द असतीलच असेही नाही.)
उदा. शिरोभागीं छानसा तुरा हाले। जणू जास्वंदी फूल उमललेले।
*
रूपक: यांत उपमेय आणि उपमान यांतील भेदच नाहीसा होतो.
उदा.: रक्तवर्ण जास्वंदफुलाचा शिरीं छानसा तुरा।
इथे कोंबड्याच्या शिरोभागी असलेला तुरा जास्वंदीचे फूलच आहे असे म्हटले आहे.म्हणजे दोघांत अभेद आहे.
*
अपह्नुती: यात प्रथम उपमेय स्पष्टपणे नाकारून (दडवून) त्याजागी उपमानाची स्थापना केली जाते.
न,नव्हे ,नाही असे शब्द येतात.
उदा: नव्हे लाल हा तुरा शिरावरि, जपाकुसुम हे खरोखरी।
.....................................................................................................................................................................