थँक्यू फॉर स्मोकिंग

चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील पडद्यामागच्या घडामोडी रंजकेतेने दाखवणारे चित्रपट बर्‍याचदा रोचक असतात. ह्याच वर्णनात चपखल बसणारा चित्रपट म्हणजे 'थँक्यू फॉर स्मोकिंग'. नावावरूनच कळते कुठल्या क्षेत्राचे दर्शन घडणार आहे ते. अर्थातच सिगरेट उद्योग. करोडो डॉलर्सची उलाढाल असणारा आणि नैतिकच्या व्याख्यांना आव्हान देणारा कायदेशीर उद्योग म्हणजे सिगरेट निर्मिती. दर वर्षी सरासरी चार लाख लोकांचा एकट्या अमेरिकेत जीव घेणारा हा कायदेशीर धंदा. थँक्यू फॉर स्मोकिंग आपल्याला घेऊन जातो ह्या उद्योगातील पडद्यामागच्या अफलातून सफरीवर. निक नेलर नावाच्या एका टोबॅको लॉबिस्टच्या नजरेतून.

निक नेलरच्या कामाचा प्रमुख उद्देश म्हणजे सिगरेट उद्योगाची बाजू मांडणे. त्यावर उडलेले रक्तरंजित शिंतोडे धुऊन काढणे. जो उद्योग लाखो लोकांचे लहान मुलांचे प्राण घेतो आणि प्रचंड टीकेच्या अग्रभागी असतो अश्या उद्योगाची बाजू मांडणे हे महाकठीण काम म्हणजे निक नेलरची रोजी रोटी. चित्रपटाची सुरुवातच होते टीव्ही वरील एका परिसंवादाच्या कार्यक्रमातून. ह्या कार्यक्रमात सिगरेटच्या व्यसनाने कॅन्सर झालेला एक तरुण, एका तंबाखू विरोधी राजकारण्याचा प्रवक्ता आणि निक नेलर असे एकत्र परिसंवादात भाग घेतात. अश्या ह्या संवादात निक नेलर केवळ आपल्या चतुराईने आपल्या विरोधकांना कसे निरुत्तर करतो ते बघूनच कल्पना येते की चित्रपटात नक्कीच काहीतरी वेगळे पाहायला मिळणार आहे. तिथून सुरू होतो निक नेलरचा प्रवास. सतत कसल्या ना कसल्यातरी कॢप्त्या योजून विरोधकांना निरुत्तर करणे आणि त्याच वेळेला सिगारेटचा खप वाढण्यासाठी पद्धतशीर यंत्रणा राबवणे हे एका ब्लॅक कॉमेडीच्या माध्यमातून खूप प्रभावीपणे सादर केले आहे. अतिशय धूर्त वाक् चतुर, एका मुलाचा बाप असणारा घटस्फोटित निक नेलर ऍरन एकहार्टने खूप छान साकारला आहे. 'सब गंदा है पर धंदा है ये' ह्या भूमिकेतून तो आपल्या कामाशी अतिशय प्रामाणिक राहून करत असलेल्या युक्त्या पाहून खूप करमणूक होते. राजकारणी, उद्योगपती, चित्रपट व्यवसायातील लोक अशी पूरक पात्रे आपल्याला ह्या सगळ्यातील गुतांगुंत आणि एक निराळीच बाजू दाखवतात.

निकच्या आणि त्याच्या मुलामधील प्रसंगही छान रंगवले आहेत. मुलगा सतत बापाला प्रश्न विचारत असतो आणि त्याच्या उत्तरांमधून निक नकळत त्याला आपला मुद्दा कसा मांडायचा, आपला मुद्दा खरा ठरवण्यासाठी दुसऱ्याला खोटं ठरवलं की झालं वगैरे गोष्टी नकळत शिकवत असतो ते प्रसंग खूप छान जमले आहेत. चॉकलेट आइसक्रीम आणि व्हेनिला आइसक्रीमचे उदाहरण घेऊन तो ज्या पद्धतीने लहान मुलाला समजेल अश्या भाषेत आपला युक्तिवाद समजावून सांगतो तो प्रसंग तर खासच. सिगरेट उद्योगाचा लॉबिस्ट निक तर त्याचे खास मित्र म्हणजे मद्यनिर्मिती उद्योगाची लॉबिस्ट आणि बंदुका हत्यारे उद्योगांचा लॉबीस्ट. असे हे रूढार्थाने समाजातील खलनायक वाटावेत असे तिघे मिळून जेवायला भेटत असतात आणि त्यावेळेला त्यांच्या होणाऱ्या गप्पांचे प्रसंगही रंजक आहेत. तसेच निकला शेरास सव्वाशेर भेटणारी आणि आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून बरीच गुपिते काढून घेऊन वर्तमान पत्रात छापणारी संधी साधू पत्रकार केटी होम्सने छानच दाखवली आहे.

सिगरेटी आणि तंबाखू उद्योग अश्या विवादास्पद विषयावर आधारीत चित्रपट असूनही कुठेही त्याला रुक्ष डॉक्युमेंट्रीचे स्वरूप नाही. कसलाही मेलोड्रामा नाही लांबलचक आरोप आणि कंटाळवाणी भाषणबाजी नाही आणि उगीच संदेशांचा भडिमार तर नाहीच नाही आणि त्यामुळेच दिग्दर्शक (जेसन राईटमन) चित्रपट रंजक करण्यात त्याचे करमणूक मूल्य अबाधित ठेवण्यात प्रचंड यशस्वी झाला आहे असं मला वाटतं. ह्या चित्रपटाला असलेली काळ्या विनोदाची झालर आणि पटापट सरकणारी पटकथा ह्यामुळे चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. क्रिस्तोफर बकलीच्या कादंबरीवर आधारलेला आणि खरं तर अतिशय गंभीर विषयावरील तरीही हलका फुलका असणारा हा चित्रपट त्याच्या वेगळेपणामुळे नक्कीच बघण्यासारखा.

लेखनविषय: दुवे:

Comments

वर्णनामुळे

हा चित्रपट त्याच्या वेगळेपणामुळे नक्कीच बघण्यासारखा.

आम्हाला कोलबेरपंतांच्या वर्णनामुळे नक्कीच बघण्यासारखा वाटतो आहे.


+१

आम्हाला कोलबेरपंतांच्या वर्णनामुळे नक्कीच बघण्यासारखा वाटतो आहे.

+१
मस्त परिक्षण

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

असेच

म्हणतो. या चित्रपटाविषयी बरेच ऐकले आहे. परीक्षण वाचून बघायचा निर्धार पक्का झाला.

----
परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.

असेच

म्हणतो.
सन्जोप राव

बघायचा चुकला होता

थेटरात आला तेव्हा बघायचा चुकला होता. बघायला आवडेल.

(नेटफ्लिक्सची वर्गणी भरावी का? असा विचार मनात येतो आहे.)

सुंदर परिचय

असे म्हणण्याचे कारण म्हण्जे आम्ही हा सिनेमा बघु असे वाटत नाही. मग त्याचा परिचय तरी झाला हेही नसे थोडके.
(फुकटा पुणेरी)
प्रकाश घाटपांडे

बिड्या

आमच्या हमाल बंधूंना आम्ही बिड्या फुंकू नका असे सांगतो. हा पिच्चर् मराठीत आला तर त्यांना दाखवू. इंग्रजी त्यांना कळत नाही.

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

 
^ वर