शाळेंत 'लैंगिक शिक्षण' हा वेगळा विषय असावा काय?
वरील विषय संदर्भांत मी एक पत्र काही वृत्तपत्रांना पाठवले आहे. ते छापून येईल की नाही ते सांगता येत नाही. पण त्यांतील विचार निदान उपक्रम-सदस्यांपर्यंत तरी पोचावेत या हेतूने त्याचा मजकूर खाली देत आहे.
"मुलांना प्रजननाचे कार्य व त्याच्याशी संबंधित रोग व सुरक्षितता याविषयी शास्त्रशुद्ध माहिती व्हावी व मुलांचा लैंगिकतेकडे पाहाण्याचा दृष्टीकोण निकोप व्हावा म्हणून शाळेंत लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे असे सर्वसाधारणपणे म्हंटले जाते. शास्त्रशुद्ध माहितीसाठी त्यांना जीवशास्त्र या विषयांतर्गत ज्याप्रमाणे पचनसंस्था, श्वसनसंस्था, मज्जासंस्था यांच्या कार्याची व त्यांना होणार्या रोगांची व प्रतिबंधक उपायांची माहिती दिली जाते त्याचप्रमाणे प्रजननसंस्थेविषयीही माहिती देता येईल. त्यासाठी 'लैंगिक शिक्षण' अशा वेगळ्या विषयाची गरज नाही. मुलांचा लैंगिकतेकडे पाहाण्याचा दृष्टीकोण निकोप होण्याच्या दृष्टीनेही या वेगळ्या विषयाचा कितपत उपयोग होईल ते सांगणे कठीण आहे. 'Gestalt Therapy' या पुस्तकाचे लेखक डॉ. एफ्.एस्.पर्ल्स् यांनी 'Anti-Social and Aggression' या प्रकरणांत मांडलेल्या विचारांप्रमाणे लैंगिकता ही निसर्गतःच लहरी, तर्काच्या चौकटींत न बसणारी व मनाचा संपूर्ण ताबा घेणारी असते. आणि त्यामुळेच तिच्यांत एक प्रकारची उत्कटता असते. तिला नियमांच्या चौकटींत बसवून अधिकृत स्वरूप दिल्यास तिच्यांत कृत्रिमपणा येऊन मनुष्य उत्कट अनुभवाला मुकण्याची शक्यता असते. Rank या मानसशास्त्रद्न्याने तर असे म्हंटले आहे की "...the place to learn the facts of life is in the gutter, where their mystery is respected......"
"लैंगिक शिक्षण हवे की नको, हवे असल्यास ते कशा प्रकारचे असावे हे ठरवतांना त्याचे तात्कालिक व दूरगामी परिणाम लक्षांत घ्यावे. त्यासाठी मानसशास्त्रांतील अत्याधुनिक संशोधनाची मदत घ्यावी."
Comments
स्वतंत्र विषय
मी शाळेत असताना, पचनसंस्था, मज्जासंस्था वगैरेंसोबत मानवी प्रजननासाठी उपतयुक्त ठरणारे अवयव्, त्यांची माहिती, कार्य इत्यादींवरही एक धडा होता. माझ्या अनुभवानुसार केवळ मुलांच्या वा केवळ मुलींच्या शाळेमध्ये ह्या धड्यातील काही भाग तरी शिक्षक शिकतवित असत, तेही मुलांच्या शाळेतील जीवशास्त्रासाठी शिक्षक आणि मुलींच्या शाळेत जीवशास्त्र शिकविणार्या शिक्षिका असतानाच हे होत असे. तरीही पचनसंस्था वा मज्जासंस्थेवरील धडा जेवढा खोलात जाऊन शिकवला जात असे तेवढाच प्रजनन संस्थेची माहिती देणारा धडा वरवर शिकवला जात असे. मुले-मुली एकत्र असलेल्या शाळेमध्ये शिकविताना शिक्षक/शिक्षिकांना अत्यंत अवघडल्यासारखे वाटल्यामुळे सदर धडा न शिकविण्याकडेच कल दिसून येई. तसेच ह्या धड्यावर एकही प्रश्न परीक्षेत विचारला जात नसे. आता ही परीस्थिती बदलली असल्यास कल्पना नाही. तेव्हा हा विषय जीवशास्त्राच्या पुस्तकात अंतर्भूत असल्यामुळे तो वगळून इतर धड्यांवर भर देणे सहज शक्य होते. मात्र हा स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासक्रमामध्ये घेतला तर तो वगळणे शक्य होणार नाही आणि खात्रीपूर्वक शिकवला जाईल असे वाटते.
लैंगिक विस्फोटाच्या उंबरठ्यावरील भारत
कालच या विषयावरील एक चर्चा पाहिली. लैंगिक शिक्षणाची गरज नाही असे म्हणणार्या मंडळींना असे वाटते की पौगंडावस्थेत शरीराच्या गरजा आपसूकपणे आतून धडका द्यायला लागतात. त्यामुळे त्याचे शिक्षण वगैरे देण्याची गरज नाही. लोक हेही म्हणतील की कित्येक हजार वर्षे माणूस प्रजनन करतो आहेच की, मग आताच शिक्षणाची गरज काय? माझ्या मते याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेतः
१. भारतासारख्या उष्ण कटिबंधात मुले-मुली वयात येण्याचे वय हळूहळू कमी होत चालले आहे. वयाच्या दहाव्या वर्षी मुलीला मासिक पाळी सुरु झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. या वयात मुलीचे शरीर तयार होत असले तरी तिचे मन एका बालिकेचेच असते. तिला तिच्यात होणार्या बदलांची जाणीव करुन देणे आवश्यक आहे.
२. माध्यमांचा रेटा, विशेषतः इंटरनेटवर अक्षरशः लाखोंच्या संख्येने उपलब्ध असणारी पोर्नोग्राफिक संकेतस्थळे आणि त्यातून उतू जाणारी लैंगिक विकृती, भारतात अगदी सहजासहजी उपलब्स असणारे लैंगिक साहित्य आणि पोर्नोग्राफिक फिल्म्स यांच्यापासून या मुलांचा बचाव करायचा असेल तर त्यांना निकोप कामजीवनाची ओळख शाळेतच करुन दिली पाहिजे. लैंगिक सुखाविषयी चुलकीच्या किंवा अवास्तव कल्पना याने एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते.
भारतासारख्या देशात, जिथे आधीच लैगिक संबंधांबद्दल इतका चोरटेपणा आणि अपराधीपणा आहे, तिथे ही कोंडी फुटून यात जितक्या लवकर मोकळेपणा येईल तेवढे बरे. काही ना काही कारणाने ज्या देशात एक मोठी लोकसंख्या लैंगिकदृष्ट्या अतृप्त आहे, तिथे असेच सुरु राहिले तर त्या देशाला भविष्यात लैंगिक विस्फोट आणि त्याचे भयानक परिणाम यांना सामोरे जावे लागेल असे वाटते.
सन्जोप राव
समजले नाहीत!
शरदराव,
आपले विचार फारसे समजले नाहीत.
आपला,
(पौगंडावस्थेतला!) तात्या.
:))
वेगळा विषय
लैंगिक शिक्षण वेगळा विषय म्हणून असावा असे माझे(ही) मत आहे. अश्या विषयाच्या अभावी लैंगिकतेबद्दलची विकृत माहिती मिळणे हा एक धोका आहे हे खरेच, पण अजिबात काहीच शास्त्रीय माहिती न मिळणे हा महत्वाचा तोटा आहे.
असा विषय अभ्यासक्रमात येत नाही तोपर्यंत पालकांनीच पुढाकार घेऊन दहा वर्षांपासूनच्या (म्हणजे साधारण तिसरी चौथीतल्या) मुलांना प्रजननसंस्थेबाबतची माहिती द्यायला हवी आहे.
असावा
लैंगिक शिक्षण हा विषय असायला हवा आणि तो इतर विषयांइतकाच गंभीरतेने शिकवला गेला पाहिजे. आपल्या देशात लैंगिकतेबद्दल नको इतका अवघडलेपणा आहे. हा जितक्या लवकर दूर होईल तितके बरे.