"मोठ्या नोटांचा इकॉनॉमिकल लोच्या"
दोनतीन दिवसांपूर्वी ई-मेल् मधून मला वरील शीर्षकाचा नीलेश बने यांचा लेख मिळाला. त्यांत त्यांनी असे म्हंटले आहे की औरंगाबादचे एक अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी काळा पैसा व भ्रष्टाचार यांना आळा घालण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत ते असे :
१) पन्नास (५०) रुपयांवरील नोटा चलनातून बाद करणे.
२) २००० रुपयांवरील सर्व व्यवहार बँकेमार्फत करण्याची सक्ती करणे.
या प्रस्तावांचे समर्थन अनिल बोकील खालीलप्रमाणे करतात.
१) पन्नास रुपयांवरील नोटा चलनांतून बाद करणे
अमेरिकेत दरडोई उत्पन्न ४०००० (चाळीस हजार) डॉलर आहे. तिथे चलनांतील सर्वात मोठी नोट १०० (शंभर) डॉलरची आहे. म्हणजे दरडोई उत्पन्नाचे सर्वांत मोठ्या चलनी नोटेशी प्रमाण ४००:१ इतके आहे. इंग्लंड व जपानमध्येही हेच प्रमाण आहे. भारतांत दरडोई उत्पन्न २३००० (तेवीस हजार) रुपये आहे व चलनांतील सर्वात मोठी नोट १००० (एक हजार) रुपयांची आहे. म्हणजे आपल्याकडे दरडोई उत्पन्नाचे सर्वात मोठ्या चलनी नोटेशी प्रमाण २३:१ इतके आहे. यामुळे आपल्याकडे मोठ्या रकमेचे व्यवहारही रोखीने होतात व काळ्या पैशात भर पडायला मदत होते. (त्याचबरोबर लाच देण्यासाठीही मोठ्या नोटा सोयीच्या ठरत असाव्यात. कल्पना करा एखाद्याला दोन लाख रुपयांची लाच द्यायची आहे. जर ५० रुपयांवरील नोटा चलनांत नसतील तर ५० रुपयांच्या शंभर नोटांची चाळीस बंडले न्यावी/आणावी लागतील. पण हजार रुपयाच्या नोटांची दोन बंडले सहज नेता/आणता येतील. - इति अस्मादिक). अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड् निक्सन यांनी १४ जुलै १९६९ ला १०० डॉलरपेक्षा अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द केल्या. लेखात पुढे असे म्हंटले आहे की अनिल बोकीलांच्या माहिती प्रमाणे भारतात ७८ टक्के लोकांचे रोजचे उत्पन्न २० रुपयांपेक्षा कमी आहे. पण चलनांत ५० रुपयांपेक्षा मोठ्या नोटांचे प्रमाण ९२ टक्के आहे.
२) २००० रुपयांवरील सर्व व्यवहार बँकेमर्फत करण्याची सक्ती करणे.
आपल्या देशांत ८० टक्के व्यवहार रोखीच्या माध्यमांतून होतात तर प्रगत देशांत ९० टक्के व्यवहार बँकेच्या माध्यमांतून होतात. सर्व व्यवहार बँकेमार्फत केल्यास व प्रत्येक व्यवहारावर व्यवहार कर (समजा २ टक्के) लावल्यास व तो ज्याला पैसे मिळतात त्याच्या खात्यांतून परस्पर वजा केल्यास कोणी टॅक्स् चुकवण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. अनिल बोकिलांच्या म्हणण्याप्रमाणे ११ सप्टेंबर २००१ ला वर्ल्ड् ट्रेड् सेंटर्वर हल्ला झाल्यावर अल् कायदा चे नेटवर्क उद्ध्व्स्त करण्यात अमेरिकेला यश मिळाले कारण त्यांनी अल् कायदा ची खाती गोठवून टाकली. आपल्याकडे बहुतेक व्यवहार रोखीने होत असल्यामुळे अल् कायदा चे नाक दाबणे आपल्याला शक्य झाले नाही.
अनिल बोकिलांच्या वरील प्रस्तावांनी पंतप्रधान व राष्ट्र्पतीही प्रभावित झाले. राष्ट्र्पति प्रतिभाताई पाटील तर असे म्हणाल्या म्हणे की जेव्हा मी वरील दोन विधेयकांवर सह्या करेन तो माझ्या आयुष्यांतील सर्वात आनंदाचा क्षण असेल.
आपल्यापैकी काही जणांना वरील गोष्टी अगोदरच माहीत असतील.
आपणास काय वाटते?
Comments
चांगला विषय
अनिल बोकिलांचे म्हणणे वाचले आहे आणि आवडले देखील आहे. पण २००० ची मर्यादा ५००० अथवा १०००० असावी असे वाटते. यावर माझे मत सविस्तर मांडायला आवडेल. तोवर इतर प्रतिसादांची वाट पाहतोय.
जाता जाता,
मान्य, पण प्रतिभाताईंना परत परत राष्ट्रपतीपदावर येण्याची इच्छा अथवा खात्री वाटते आहे अथवा त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास दिसतो आहे :).
बाकी हा विषय आणखी खोलवर समजुन घ्यायला आवडेल. तज्ञ लोकांचे प्रतिसाद वाचनीय असतील असे वाटते आहे.
फारसे उपयोगी नाहीत्
दरडोई उत्पन्नाचा सर्वात् मोठ्या चलनी नोटेशी होणार्या गुणोत्तराबद्दल पूर्वीही कुठेतरी वाचले होते. इंग्लंडात सर्वात मोठी चलनी नोट ५० पौडांची असते.
पण ह्या देशांतील गुणोत्तर भारतात तसेच्या तसे वापरता येणार नाही. तेथिल बहुतांश व्यवहार हे प्लॅस्टीक मनी (कार्ड) वर होतात. भारतातील बहुसंख्य जनतेची स्थिती पाहिली तर येथे हे शक्य नाही. येथे बॅकांची खातीदेखिल सर्वांकडे असण्याची शक्यता कमी.
काळा पैसा रोखण्यासाठी हे उपाय भारतासाठी फारसे उपयोगाचे नाहीत, असे वाटते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
पटले नाही.
हे खरे म्हणजे पटण्यासारखे नाही. ज्यांची योग्य मार्गाने मिळालेल्या मोठ्या नोटा बाळगण्याची ऐपत आहे. त्यांच्याकडे बँकेचे खाते असेलच. आणि ज्यांना योग्य मार्गाने मिळालेल्या नोटांसाठी बँक खाते असणे परवडत नाही त्यांना मोठ्या नोटा असणे गैरसोयीचेच आहे.
मोठ्या नोटांचे काळे व्यवहार बंद करण्यासाठी वरील मार्ग चांगला आहे असे वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
थोडे पटले, थोडे नाही
मुद्दा १:पन्नास (५०) रुपयांवरील नोटा चलनातून बाद करणे.
पटला आणि व्यवहार्यही आहे. रोजच्या व्यवहारात ५० च्या वरील नोटा नसल्यातरी अड्णार नाही. उदा. रोजचे व्यवहार, जसे की भाजी आणणे, पेट्रोल भरणे, डॉक्टरकडे जाणे १०, २० आणि ५० च्या नोटांनी करणे नक्कीच शक्य आहे. मासिक खर्च जसे की, किराणा, बिले भरणे, शैक्षणिक खर्च इ. ५० च्या नोटांनी करणे थोडेसे अवघड वाटले तरी अशक्य नक्कीच् नाही.
मात्र, जेथे मोठ्या रकमेचे व्यवहार होतात, जसे की भ्रष्टाचार, रोखीचे व्यवहार अडचणीचे ठरतील आणि थोडाबहुत आळा बसू शकेल.(मात्र भारतातले लोक् हजारो वर्षांपासून हुश्शार असल्याने ते यातूनही काहे मार्ग शोधून काढतीलच.)
सोने खरेदी, लग्न-व्यवहार, घर/मालमत्ता खरेदी, असे व्यवहार मोठ्या रकमेचे असले तरी दैनंदिन नसल्याने मोठ्या रकमेवाचून काही खोळंबणार नाही. आणि घर/मालमत्ता खरेदीसारखे व्यवहार बँकेच्या माध्यमातून करता येतीलच.
मुद्दा २:२००० रुपयांवरील सर्व व्यवहार बँकेमार्फत करण्याची सक्ती करणे.
फारसा नाही पटला आणि व्यवहार्यही वाटत नाही. कारण बहुतेक सामान्य व अतिसामान्य लोकांची आर्थिक, शैक्षणिक परस्थिती असे करण्याची परवानगी देत नाही. मात्र हा मुद्दा खोडून काढण्यासाठी लोकांकडे बँक खातीच नसतील असे म्हणणे योग्य नाही. आज काल अगदी गरीबांच्या घरातही किमान एक खाते असतेच.(यातील बहुतेक लोक असंघटित क्षेत्रात काम करीत असल्याने त्यांना भविश्यनिर्वाह निधी, निवृत्तीवेतन आदी गोष्टींचे लाभ मिळत नाही. त्यामुळे ते स्वतःहून काही बचत करतच राहतात. त्यासाठी त्यांच्याकडे खाते असते.) देशातील दुर्गम भागांची थोडीशी अडचण होऊ शकते पण आजानुकर्ण यांनी म्हटल्याप्रमाणे ज्यांना योग्य मार्गाने मिळालेल्या नोटांसाठी बँक खाते असणे परवडत नाही त्यांना मोठ्या नोटा असणे गैरसोयीचेच आहे.
||वाछितो विजयी होईबा||
तक्रार नव्हे, विश्लेषण.
सदर चर्चा-प्रस्तावावर मोजकेच प्रतिसाद आले. हरकत नाही. वाचणार्या प्रत्येकाने प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षाही नाही. पण वाचनसंख्याही म्हणावी तशी नाही. बहुधा शीर्षकांतील "इकॉनॉमिकल" या शब्दामुळे "हे काहीतरी अर्थशास्त्राशी संबंधित असावे आणि अर्थशास्त्र हा आपला प्रांत नाही" असा विचार करून बहुतेकांनी त्याकडे लक्ष दिले नसावे. तथापि चर्चा-प्रस्ताव अर्थशास्त्रांतील कुठल्याही गुंतागुंतीच्या प्रमेयावर आधारित नाही व सर्वसामान्य व्यवहार ज्ञान असणार्या कुठल्याही व्यक्तीच्या विचारशक्तीला चालना देणारा आहे असे मला वाटते.
कर्मण्ये वाधिकारास्ते....
लेख वाचला आणि आवडला. सध्या यावर विचार चालू आहे इतकेच.
माझ्या मते १०० ची पत्रमुद्रा असावी आणि आवश्यकता असल्यास २०० ची पत्रमुद्रा छापावी.
५०० आणि वरील मुद्रा रद्द करण्यास हरकत नसावी.
धनादेश, धनकोष आणि पतपत्राचा वापर केल्यास पत्रमुद्राचा वापर नियंत्रीत करता येईल.
आपल्या लेखात एक मुद्दा चांगला वाटला. आपण लोकं अजूनही इंग्रजी शब्दांना घाबरतो, त्यामूळे अश्या लेखांचे प्रतिसाद सुयोग्य मराठी शब्दातच हवे आहे.
प्रतिसाद द्यायचा राहिला होता
विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
इंदिरा गांधी सरकारने असा प्रयोग केला होता असे अंधुक स्मरते.
चलनी नोटा समांतर अर्थव्यवस्थेत जातात, हिशोबी अर्थव्यवस्थेतून गायब होतात, तेव्हा चलनफुगवट्याच्या दृष्टीने काय फरक पडतो - विचार चालू आहे. येथे काही वाहात गेलेले उथळ विचार लिहितो :
सकृद्दर्शनी वाटते, की चलनी नोट्या काळ्या होऊन गहाळ झाल्या, की रुपयाची किंमत हिशोबी बाजारात वधारायला पाहिजे. म्हणजे हिशोबी पैशांच्या मोबदल्यात अधिक वस्तू खरेदी करता आल्या पाहिजेत. मात्र बिनहिशोबी चलनी नोटा "गहाळ" न होता पुन्हा बाजारात खरेदीसाठी सर्रास वापरल्या गेल्यात तर असे होणार नाही.
बिनहिशोबी व्यवहाराने करवसुलीत घट होते, हे महत्त्वाचे. परंतु चलनी नोटा छापल्याने सरकारला अर्थसंकल्पीय तूट रुपयाच्या बाजारभावात भरून काढता येते, भविष्यात व्याज देण्याचे कुठलेही वचन द्यावे लागत नाही.
सर्व मोठ्या आर्थिक उलाढाली एखाद्या बँकेच्या मध्यस्थीने झाल्या पाहिजेत, या बाबतीत खाजगीपणाबाबत (प्रायव्हसीबाबत) प्रश्न उत्पन्न होऊ शकतात. याबाबत माझे वैयक्तिक मत असे की "मला चालेल". पण याबाबत अधिक विचार करण्यालायक आहे. सध्यातरी बहुतेक "वैयक्तिक" मोठ्या उलाढाली अनिष्ट कारणांसाठी असतात. म्हणजे लाच, हुंडा वगैरे. पण काही इष्ट-अनिष्ट-पलीकडच्या वैयक्तिक गोष्टी असू शकतील का, याबाबत कसून विचार केला पाहिजे.
मोठ्या चलनी नोटा अर्थव्यवस्थेतून बाद केल्यात तर या कामासाठी अन्य चलन निर्माण केले जाईल. उदाहरणार्थ : (१) सोने, (२) परदेशी मुद्रा.
एक हजाराची नोट
आठवते त्या प्रमाणे मोरारजी सरकार (जनता पार्टी) मधे १०००ची नोट रद्दबादल ठरवली. काही अंशी काळा पैसा वर आला, पण काही अंशी तो इतरांकडून पांढरा करवून घेतला असे काहीसे आठवते. पण आता ५००ची नोट प्रचलात आणावी लागली...
या गोष्टी (५० र् नोट आणि २०००च्या वरील व्यवहार) कृष्णधवल पद्धतीने वर्गिकृत करता येणार नाहीत, (उत्तर सोपे नाही). त्यामुळे अजून बरेचसे आयकर बदल (रीफॉर्म्स) करावे लागतील. तसे ते होत आहेत असे देखील वाटते. बाकी बँकामधे पण अत्याधुनीक सोयी/सवलती लागतील. उ.दा. एका गावातील बँकेचा चेक दुसर्या गावातील तिसर्याच बँकेत वठायला सुलभ करणे आणि वठणावळीचे पैसे न लागणे इत्यादी केले तरी काही अंशी फायदा होईल...
मोठ्या नोटा
उशीरा प्रतिसाद्.
मोठ्या नोटांचा जसा इकॉमॉमिकल लोचा असतो तसाच लहान नोटांचाही असतो. लहान नोट छापायला (नोटेच्या मूल्याच्या मानाने) खर्च जास्त येतो. (अर्थातच याचा एक फायदा म्हणजे लहान नोटा बनावट छापणे फायद्याचे ठरत नाही).
सर्व व्यवहार बँकेमार्फतच करण्याला अडचण म्हणजे चेकबुक देण्यासाठी बँक मला १००० रु बँकेकडे अडकवून ठेवायला लावते. १०,००० च्या आत पगार असणार्यांना ही रक्कम जड आहे. दुसरे म्हणजे सरकार स्वतःच अनेक प्रकारचा भरणा रोखीने करण्याचा आग्रह धरते.
पण १००० व ५०० च्या नोटा रद्द करता येऊ शकतील् असे वाटते.