स्लमडॉग मिलिअनेर

चित्रपट बघितल्यानंतर तो प्रेक्षकांना विचार करण्यास लावतो आहे की नाही यावरुन चित्रपटाच्या दर्जाचा अंदाज येतो. असाच एक दर्जेदार चित्रपट बघितला - स्लमडॉग मिलिअनेर. एक साधा चहावाला पोर्‍या (जमाल) हु वॉन्ट्स टु बी अ मिलिअनेर या कार्यक्रमात एक मिलीयन जिंकतो, आणि फसवणुकीच्या संशयावरुन त्याला पोलीसात दिले जाते. या कार्यक्रमात जिंकण्याएवढी माहीती तुला मिळाली कशी ? या प्रश्नाचे उत्तर जमाल देत असतो आणि त्याबरोबर त्याचे आयुष्य उलगडत जाते. जमाल आणि सलीम रहात असतात मुंबईतील एका झोपडपट्टीत. तिथेच त्याची लतिकाशी ओळख होते. एका दंगलीमधे त्यांची वाताहत झाल्यानंतर ते एका गँगच्या हाती लागतात. मुलांचे डोळे फोडुन त्यांना भिक मागायला लावणारे हे लोक आहेत असे त्यांच्या लक्षात आल्यावर सलीम व जमाल तेथुन पळ काढतात परंतु लतिका त्या गँगच्या तावडीत सापडते. इथुन पुढे, सलीमचा गुन्हेगारी जगताकडे प्रवास होतो. जमाल लतिकाला विसरु शकत नाही व तो तिला पुन्हा शोधुन काढतो. इथेच दोघा भावांमधे दरी पडते. सलीम पिस्तुलाच्या बळावर लतिकाचा गैरफायदा घेतो. मधे पुन्हा काही बर्ष गेल्यानंतर जमाल लतिकाला शोध घेतो पण लतिका आता जावेद नावाच्या मोठ्या गुंडाकडे असते. लतिका तिथुन सुटका होते का. जमालचे निरपराधित्व सिद्ध होते का ? आणि पुन्हा हु वॉन्ट्स टु बी अ मिलिअनेर च्या सेटवर येउन तो संपुर्ण जिंकतो का हे चित्रपटातच पाहणे उचित ठरेल.

चित्रपटात भारतातील गुन्हेगारी, झोपडपट्टीतले जीवन, गरीबी, दंगल या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. चित्रपटातील पहील्या काही मिनीटातील दृष्यात, जमाल व सलीम मागे लागलेल्या हवालदारापासुन वाचण्यासाठी पळतात, तेंव्हा कॅमेरा त्यांच्या पाठीमागे पळवुन झोपडपट्टीचे दर्शन घडवले आहे. तसेच लहान मुलांचे डोळे फोडणारे दृष्य अंगावर काटा आणते. जमाल परदेशी पर्यटकांना स्थळे दाखवत असताना, त्यांच्या गाडीचे टायरसकट काही भाग चोरीला जातात, तेंव्हा जमालच्या तोंडी एक वाक्य आहे, इफ यु वाँट टु सी द रियल इंडिया, धिस इज रियल इंडिया.

चित्रपटात काही चुका आहेत. उदा. चित्रपटात कधी हिंदीत संवाद आहेत तर कधी इंग्लीश. जमालच्या इंग्लीशचे अक्सेंट भारतातले नक्कीच वाटत नाही. सलीम पिस्तुल कोठुन मिळवतो ते दाखवलेले नाही. तसेच त्यासंबंधी एक प्रश्न जमालला विचारला जातो त्याचे उत्तर जमाल बरोबर देउ शकतो हे पटत नाही. त्याच प्रमाणे मुंबईतल्या झोपडपट्टीतील शाळा इंग्लीश मिडीयमची असु शकते का हा प्रश्न पडतो.

असे असले तरी चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट आहे. चित्रपटाला चार गोल्ड्न ग्लोब ऍवार्डस मिळाले आहेत. त्यात उत्कॄष्ट संगीत चे ऍवार्ड आपल्या ए.आर. रेहमानला मिळाले याचा प्रत्येक भारतीयाला आनंद होईलच. चित्रपटात जो भारत दाखवलेला आहे तोच आणि तेवढाच फक्त 'रियल इंडिया' नाही, हे पाश्चात्यांना कळले आहे की नाही हे मला माहीत नाही. परंतु, प्रगतीची स्वप्ने पाहताना, यात दाखवलेला रियल इंडिया अस्तित्वात आहे याचा विचार हा चित्रपट करायला लावतो यात शंका नाही.

- सूर्य
(http://shashankdixit.blogspot.com/)

लेखनविषय: दुवे:

Comments

थोडक्यात मस्त

चित्रपटाचे परिक्षण थोडक्यात व मस्त. आवडले.

ह्या चित्रपटाची पटकथा व मांडणी दोन्ही छान.

बाकी यातली गाणी मात्र इतकी चांगली आहेत असे वाटते नाही. पुन्हा ऐकली पाहीजेत.

स्लमडॉग

माझे मत वेगळे आहे. चित्रपट पाहिला. सर्व बाबतीत उत्कृष्ट आहे. वेग, अभिनय, रहमानचे संगीत. तरीही चित्रपट आवडला नाही. असे फार क्वचित होते आणि हे पूर्णपणे वैयक्तिक आहे. चित्रपट चांगला असूनही आवडत नाही. मागे लगानच्या बाबतीत असेच झाले होते. याचे नेमके कारण अजूनही कळलेले नाही.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

उत्तम परीक्षण

परीक्षण चांगले झाले आहे - अभिनंदन!

तुमच्याकडून आणखीही दर्जेदार चित्रपटांची परीक्षणे वाचण्यास उत्सुक आहोत! (आम्ही नावे सुचवत जाऊ ;))

अमित

धन्यवाद

धन्यवाद अमित.

आंतरजालावरचे पहिलेच लिखाण आहे. असाच लोभ राहु द्यात. ;)

आम्ही नावे सुचवत जाऊ
जरुर सुचवा. :)

- सूर्य.

परीक्षण चांगले आहे

लहानसेच परीक्षण आवडले.

कालच कोणीतरी म्हणत होतं की अमिताभ बच्चनने या चित्रपटात भारताचं विपर्यस्त वर्णन केल्याबद्दल ताशेरे ओढले आहेत, हे खरे का? (गुगलायचा कंटाळा)

नाही

खरे नसावे. आजच अमिताभने त्याच्या ब्लॉगवर याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

अमिताभ

हा चित्रपट निव्वळ मनोरंजनाचा मसाला भरलेला आहे. भारताची खरी ओळख ह्या चित्रपटातुन व्हावी असा कसलाही दावा त्यात नाही. अमिताभने ताशेरे ओढले असल्यास आम्ही त्याला फाट्यावर मारतो. आणि मनोरंजक चित्रपटांमधुन भारत पहायचाच झाला तर अमिताभच्याच गल्लाभरू, आपटलेल्या चित्रपटांइतके भारताचे विपर्यास्त वर्णन कुठल्याच चित्रपटात नसेल.

सहमत

स्लमडॉग मला मनोरंजक वाटला. (चांगल्या अर्थाने) मात्र तो ऑस्कर मटेरियल आहे हे पटत नाही. दुसऱ्याच दिवशी पाहिलेला ग्रॅन टॉरिनो फारच आवडला. ईस्टवूडला यंदा ऑस्कर मिळायला हवे.

अमिताभला फाट्यावर मारण्याबाबत सहमत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हलवता येतील का?

स्लमडॉगमधील चर्चेतले ग्रॅन टोरिनोसंबंधित प्रतिसाद 'सध्या काय पाहताय' या चर्चेत वर्ग करता येतील का ? (हलवता येतील का?)

धन्यवाद.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ग्रॅन टुरीनो

This comment has been moved here.

अमिताभ

अमिताभने याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे याची कृपया नोंद घ्यावी.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

नोंद घेतली आहे!

मी प्रतिसाद लिहित असतानाच तुमचा प्रतिसाद आल्याने वरील प्रतिसाद दिला.अमिताभच्या दुव्याबद्दलदल आभारी आहे.

फाट्यावर मारतो?

फाट्यावर मारतोहा वाक् प्रचार खूप वेळा वाचायला मिळाला.फाट्यावर मारतो यामदधील फाटेम्हणजे नेमके काय?फाटे शब्दाशी इतर् काही वाक् प्रचार वाचायला आवडतील.

कल्पना नाही

या वाक्प्रचाराच्या अर्थाची तितकीशी कल्पना नाही. दुर्लक्ष करणे, भाव न देणे असा काहीसा अर्थ असावा. फाटा म्हणजे काय हे स्पष्ट झाल्यास वाक्प्रचाराचा अर्थ समजेल असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अमिताभचा फाटा

अमिताभने ताशेरे ओढले असल्यास आम्ही त्याला फाट्यावर मारतो.

अमिताभला फाट्यावर मारा हो. आमच्या तीर्थरुपांचे काय जातं? ;-) पण अमिताभच्या फाट्यापर्यंत तुमच्या तंगड्या पोहोचतात यावरून तुमच्या उंचीचा अंदाज करतो आहे.

चित्रपट पाहिला नाही. लवकरच बघेन.

-राजीव.

धन्यवाद

लहानसेच परीक्षण आवडले.

धन्यवाद प्रियालीताई.

- सूर्य

भारताची खरी ओळख

अमिताभला फाटयावर मारण्याविषयी सहमत. (ताशेरे ओढले असतील किंवा नसतील तरी ;) )

स्लमडॉग मसालापट(च) आहे. यात वाद नाही. भारताची खरी ओळख चित्रपटातुन व्हावी असा दावा जरी नसला तरी 'रियल इंडिया' काय आहे या विषयी भाष्य मात्र यात आहे. किंबहुना याच कारणामुळे आधी हा चित्रपट मला आवडला नाही. परंतु नंतर विचार केल्यावर वाटले कि डॅनी बॉइल ला काय् किंवा अजुन कोणाला 'रियल इंडिया' बद्दल काही दाखवावेसे वाटले असेल तर त्याचे कारण तशी परिस्थीती असु शकेल / आहे हेच कारण असावे. आता यावरुन भारताची प्रतिमा मलिन होत असेल असे वाटण्याची काही गरज नाही असे वाटते (जे मला आधी वाटले होते). त्यामुळे कोणी ताशेरे मारण्याची (मारले असतील तर) पण गरज नसावे. चित्रपटाचा दर्जा हा, त्याच्या दर्जेदार तांत्रिक बाबी, दिग्दर्शन, पटकथा यावरुन ठरावा व त्यात स्लमडॉग मधे ऑस्कर मटेरिअल असावे असे वाटते आहे.

- सूर्य.

सहमत

सहमत आहे! तांत्रिक बाबतीत मला हा चित्रपट खूपच उजवा वाटला. विशेषतः वेगवान छायाचित्रण फारच आवडले.
छोटेखानी परिक्षण मस्तच!

हा चित्रपट मला बर्‍यापैकी आवडला

मसालापट तर आहेच.

सूर्य यांचे परीक्षण आवडले.

किंचीत सुधारणा

त्यांच्या गाडीचे टायरसकट काही भाग चोरीला जातात, तेंव्हा जमालच्या तोंडी एक वाक्य आहे, इफ यु वाँट टु सी द रियल इंडिया, धिस इज रियल इंडिया.

गाडीचे भाग चोरीला गेल्यावर त्याचा संशय जमालवर आल्याने गाडीचा ड्रायव्हर अमेरिकन पर्यटकांदेखत जमालला तुडवुन काढतो तेव्हा जमाल वरील डायलॉग मारतो. आणि अमेरिकन पर्यटक झाल्या प्रकाराने गोंधळून जाऊन पटकन पैसे काढून त्याच्या हातावर ठेवतात आणि पोबारा करतात तेव्हा 'धिस इज रियल अमेरिका' असे म्हणतात.

बरोबर

हो बरोबर. म्हणजे दोन्ही देशांविषयी भाष्य आहे.

-सूर्य.

आवडला.

मी आजच हा चित्रपट पाहिला. मला बुवा फारच आवडला. कथेच्या बांधणीच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास ती एक परीकथा आहे. पण मला परीकथा आवडतात. शिवाय इथे सगळे म्हणतायत तसा हा चित्रपट मसाला चित्रपट आहे हे तसे खरे आहे परंतू मसाला घालायचा म्हणून उगाच कोणते प्रसंग घातले आहेत असे मला तरी वाटले नाही. (शेवटचे गाणे आणि त्यावरचा नाच सोडल्यास)

यात दाखवलेले प्रसंग वास्तववादी आहेत. वाट्टेल तेथे जाऊन खेळणारी झोपडपट्टीतील पोरे, त्यांचा बिन्धास्त स्वभाव, ती मुले पोलिसाला भीक घालत नाहीत, त्याला वेडावून दाखवतात, पण झोपडपट्टीतला भाई दिसल्यावर मात्र लगेच सॉरी, आणि ही अक्कल् गुढघ्याएवढ्या पोरांना. पुढे हिंदू- मुल्सिम दंगल, लहान मुलांना भिकारी बनवून कामाला लावण्याचा उद्योग करणारी माणसे, लहान मुलांचे डोळे फोडणारी, हात-पाय कापणारी. ट्रेनच्या टपावर बसून भारतभर फिरणारी लहान मुले. नाना भानगडी करून टूर गाईड होणे, पुढे परत त्याच झोपडपट्टीत जाणं, वेश्याव्यवसाय इ. इ. यांत काहीच खोटं आहे असं वाटत नाही. हा, आता त्यात गुंफलेली प्रेमकथा थोडी मुद्दाम घातलेल्या मसाल्यासारखी वाटेल, पण ती मुले काही प्रेमात पडतच नसतील का? आणि एवढे पैसे जिंकणे खोटे वाटत असेल, तर तेवढे थोडेसे चालते असे वाटते. हा चित्रपट पाहताना सतत 'सलाम बाँंबे'ची आठवण येत होती. आता नीटसे आठवत नाही पण त्यात असे दाखवले होते की १०-१२ वर्षांच्या मुलाने आपल्या या टीचभर आयुष्यात ड्रग्जचं सेवन केलेलं असतं, खून केलेला असतो आणि वेश्येसाठी कामही केलेलं असतं.

राधिका

राधिका

सहमत आहे

चित्रपटाच्या सुरुवातीला विमानतळाच्या धावपट्टीवर क्रिकेट खेळणारी आणि अचानल मागुन विमान उडल्याने रेहमानच्या पार्श्वसंगीतावर पळत सुटलेली पोरं हा भन्नाट प्रसंग खास मोठ्या पडद्यावर बघण्या सारखाच आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी विमानतळाला अगदी घासुन असलेली झोपडपट्टी बघीतली की ह्यात अवास्तव काहीच वाटत नाही.

सहमत

शब्दाशब्दाशी सहमत आहे.

- सूर्य.

सूर्यसेठ चित्रपट पाहिल्याशिवाय...

सूर्यसेठ,
चित्रपट पाहिल्याशिवाय काही लिहिणार नाही. आपले परिक्षण वाचले आणि ते आवडले,त्याहीपेक्षा आपण लिहिते झाल्याचा सद्यक्षणी खूप आनंद आहे !!!

-दिलीप बिरुटे

हे काय नवीनच?

स्लमडॉगमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचे कळले. आपल्या धार्मिक भावना गोष्टीतील राजकुमारीपेक्षाही कोमल असाव्यात. म्हणूनच दा विंची कोड कॅथोलिक इटलीमध्ये धो-धो चालला पण भारतातील किरीस्तावांच्या भावना लगेच दुखावल्या.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

भावना

हे भावना दुखावणे काय प्रकरण आहे हे मला कधी कळले नाहीये. भारतात सारख्या कोणाच्यातरी भावना दुखावतच असतात :). चित्रपटात कुणाच्या भावना दुखावण्यासारखे काही नाही असे मला वाटते.

- सूर्य.

रहमान - जय हो!

स्लमडॉगला १० ऑस्कर नामांकने मिळाली आहेत. त्यापैकी रहमानला तीन नामांकने आहेत. यातील दोन जय हो आणि ओ साया साठी आहेत आणि तिसरे बेस्ट ओरिजनल स्कोअरसाठी आहे.
रहमानला तीन-तीन नामांकने मिळालेली असताना त्याच्याबरोबर शर्यतीत असलेले ब्रूस स्प्रिंगस्टीन आणि इस्टवूड यांना एकही नामांकन मिळालेले नाही.
----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

गुलजार - जय हो!

'जय हो' चे ऑस्कर नामांकन रहमान सोबत कवी गुलजार यांनाही आहे.

----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

टोपीकर

अमुच्या पूर्वजांची पुण्याई आज फळाला आली. चित्ती परमसंतोष जाहला. टोपीकराला आपल्या तालावर नाचायला लावले याहून हिंदुपतपातशाहीचा मोठा विजय कुठला?
----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

माझी प्रतिक्रिया

मी या 'उपक्रम' वर नवीन आहे, काही चूकले तर सांभाळून घ्यावे :)
ही त्या चित्रपटावरची प्रतिक्रिया नाही. किंबहूना अजून तो चित्रपट पाहिलाही नाही. फक्त त्या नावावरून इतिहासातील त्या घटनेची आठवण झाली. अन या दोन घटनांमधील तफावत - व्यत्यास जाणवला म्हणून ....
And Oscar goes to..

जरूर बघा

चित्रपट जरूर बघा.

या चित्रपटात अमेरिकन लोक कोण्या भारतीयाला "स्लमडॉग" म्हणत नाहीत. (काही भारतीय लोक अन्य भारतीय लोकांना म्हणतात, आणि तसे म्हणू नये, असे चित्रपटाचे स्पष्ट सांगणे आहे.)

(१) सर्व भारतीयांना (कुत्रे म्हणून) कुठेच मज्जाव होत नाही. (तुमची चित्रे १-३)

(२) त्याला ऑस्कर मिळाला ते सर्व भारतीयांना "कुत्रे" म्हणाल्यामुळे मिळाला असे नव्हे (तुमची चित्रे ४-५)

(३) ऑस्कर मिळालेले लोक जल्लोश करीत आहेत, ते अमेरिकनांनी त्यांना "कुत्रा" म्हणाल्यामुळे नव्हे (तुमचे चित्र ५)

तर "ज्याला उच्चभ्रू भारतीय मनुष्य 'गली का कुत्ता' म्हणेल, तोसुद्धा आशा-आकांक्षा-प्रेमभावना असलेला तुमच्या-आमच्यासारखाच आहे" असा गोड (आणि माझ्या मते चांगला) बोध तो चित्रपट देतो.

आरतीताई, थोडीशी शहानिशा गरजेची आहे

सर्वप्रथम, हा चित्रपट अमेरिकन निर्मात्यांनी बनवला नसून ब्रिटिशांनी बनवला आहे. त्याला इनाम दिलं अमेरिकनांनी. त्यामुळे खापर फक्त अमेरिकनांवर नको. :-)

(अमेरिकन) इंग्रजीत अंडरडॉग म्हणून एक संज्ञा आहे. जिंकण्याची शक्यता नसलेली व्यक्ती अचानक सर्वांना मागे टाकून पहिली येते, जिंकते तेव्हा त्या व्यक्तीला अंडरडॉग असे म्हटले जाते. केवळ याच कारणास्तव या चित्रपटाचे नाव स्लमडॉग आहे.

तुम्ही चित्रपट अवश्य बघा. स्मिता पाटीलच्या चक्रमध्येही सुमारे २५-३० वर्षांपूर्वी झोपडपट्टीचे असेच दर्शन होते आणि त्याची कथा होती जयवंत दळवींची आणि तो चित्रपट दिग्दर्शीत केला होता जब्बार पटेल यांनी. चू. भू. दे. घे. केवळ परदेशस्थांनी बनवला म्हणून वास्तव आपण नाकारू शकत नाही आणि त्यांना "हम आपके है कौन"च्या धर्तीवर गुडी-गुडी लग्नाचे विडिओ काढा असे सुचवूही शकत नाही.

कोणत्याही प्रकारे चौकशी न करता अशाप्रकारचा पावित्रा घेण्यापेक्षा चित्रपट बघून मत बनवावे.

 
^ वर