मराठीच्या संगणकीय वापरासाठी युनिकोडचा वापर- शासनाची उदासिनता
कालचा लोकसत्ता वाचला (दिनांक २८ नोव्हेंबर २००८). युनिकोड च्या वापराबाबतीत शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाची काळझोप व प्रशासकीय विभागाची उदासिनता बघून मन सून्न झाले. केंद्र शासनाने काही महिन्यांपूर्वी मराठी सहित सर्व प्रमुख भारतीय भाषांमधील युनिकोड फॉन्ट्स व टायपिंग शिक्षक, ओपन ऑफिस, मराठी ब्राऊजर असे अनेक उपयोगी सॉफ्टवेअर असणारी सीडी सर्व शाळा व शासकीय कार्यालयांना मोफत पाठवली होती. मी शिक्षक म्हणून काम करीत असलेल्या शाळेत ही सीडी आल्यावर एका मराठी प्रेमी माणसाला जितका आनंद होईल तितकाच मला झाला. परंतु काही दिवसांनी शाळांच्या संगणकीकरणासाठी माहितीची सीडी मागणारे शासनाचे पत्र शाळेला प्राप्त झाले. या पत्रात सर्व माहिती ही डीव्हीबी टी टी सुरेख या फॉन्टमध्येच असावी अशी अट घातलेली होती. युनिकोडचा कुठेच उल्लेख नव्हता. आजही माझे वैयक्तिक लिखाण सोडले तर इतर कामासाठी खाजगी कंपन्यांचे महागडे अथवा चोरीचे फॉन्ट्सच वापरावे लागतात. कारण जेथे माहिती पाठवायची त्या शासकीय कार्यालयांनाही खाजगी लोकांनी आपले फॉन्टस् अव्वाच्या सव्वा किमतीला विकून आपले उखळ पांढरे करून घेतलेले आहे. शासनाने युद्धपातळीवर युनिकोडचा प्रसार करून मराठी भाषेच्या कक्षा रुंदावायला हव्यात. अनेक मराठी भाषेचा गाजावाजा करत सुरू झालेल्या वेबसाईट्सही अजून खाजगी फॉन्ट वापरून मराठीच्या लिखाणासाठी इंग्रजीची उजळणी करायला सांगतात. उपक्रमवर मात्र सहज सुलभरीत्या मराठी लिहीतांना हात व मन दोन्हीही मोकळे करता आले. उपक्रमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सप्रेम शुभेच्छा.
तुमचा अक्षरांकीत,
बाबासाहेब.
Comments
सहमत
लेखाचा दुवा
बाकी
सहमत. उअपक्रम आणि तत्सम सर्व युनिकोड आधार्रीअ मराठी संस्थळांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. त्याच बरोबर ओंकारसारख्या मुक्त प्रणाली बनवणार्यांचेही
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
केन्द्र सरकारचे फॉन्ट्स
केंद्र सरकारचे फॉन्ट्स हे प्रामुख्याने हिन्दी लिहिण्यासाठी आहेत. त्यांतले अक्षरांचे वळण हिन्दी थाटाचे असल्याने ते फॉन्ट्स माझ्याकडे असूनसुद्धा मी ते वापरत नाही. माझ्या संगणकावरील 'वर्ड'सारखी पाने तसल्या हिन्दी वळणाच्या कुरूप फॉन्ट्समध्ये उघडतात आणि ती वाचायला अतिशय त्रास होतो. अजूनपर्यंत उपक्रम किंवा मनोगतावर आहेत तितके उत्तम मराठी फॉन्ट्स कुणीही फुकट देऊ केलेले नाहीत. मायक्रोसॉफ्टने दिलेल्या मंगल या युनिकोड फॉन्ट्समध्ये र्हस्व वेलांटी कान्यासकट व्यंजनानंतर उमटते. त्यामुळे ते फ़ॉन्ट्सही नोटपॅडवर लिहिण्यासाठी वापरता येत नाहीत. --वाचक्नवी
सीडॅकने उपलब्ध करून दिलेले टंक
उपक्रमावर वापरण्यात येणारा सीडॅक-योगेशजिस्ट हा टंक सीडॅकने उपलब्ध करून दिलेला आहे. मनोगतावरही बहुधा योगेशच वापरण्यात येतो. गुगलून काढल्यास अनेक युनिकोड देवनागरी टंक मिळतील.
भारतीय भाषांसाठी तंत्रज्ञान विकास ह्या दुव्यावर जाऊन आपण सीडीही मागवू शकतो.
असेच म्हणतो
अगदी असेच मनात आले होते. प्रमुख मराठी वृत्तपत्र म्हणवून घेणारे दैनिक महाजालिय आवृत्तीबद्दल कमालीचे उदासिन असते.
युनिकोडवरचा मुख्य आक्षेप
युनिकोडवरचा मुख्य आक्षेप असा आहे की त्यातील अक्षरे १६ बाइट खातात(आस्की, ८!) त्यामुळे संगणकावर विदा साठवायला दुप्पट जागा लागते. लोकसत्ताचे जुने अंक जतन करायचे असतील कमाल मर्यादा निम्यावर येईल. म्हणून लोकसत्ता युनिकोड वापरत नाही. असे अनेक जण आहेत. --वाचक्नवी
"टू-बाइट" होय? मग ठीक आहे
टू-बिट म्हटल्यास "स्वस्त आणि बेकार" असा अर्थ शब्दकोशात दिलेला आहे. (दुवा) हे विशेषण मी फक्त व्रात्य संदर्भात ऐकले आहे.
"टू बाइट" चावरे वाटले, तरी व्रात्य नाही खास. इतकेच काय, टू(२)बाइट कोड असूनही हा यूनि(१)कोड आहे. प्रकृती-पुरुष दोन असले तरी एकच आहेत, हरी आणि हर दोन असले तरी एकच आहेत, या पुरातन तत्त्वाचे चिंतन होते, नाम घेता फुकाचे. तरी या कारणांसाठी लोकसत्तेने बदल करावा.
आश्चर्य
म्हणून लोकसत्ता युनिकोड वापरत नाही. असे अनेक जण आहेत.
हे वाचून आश्चर्य वाटले. डिलबर्ट इतका वास्तववादी आहे याची कल्पना नव्हती.
----
हा हा!
लै भारी! :)
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
धन्यवाद्
बिट् की बाइट् टंकावे हा मनात गोंधळ होता. शेवटी बिट्चा विजय झाला आणि चूक झाली. युनिकोड जर इतके चांगले असतील तर बाकीचे फॉन्टप्रकार बंद का होत नाहीत?--एक शंका.---वाचक्नवी
सहमत आहे
बाबासाहेब, आपला उद्वेग समजू शकतो. आपल्याशी सहमत आहे.
सर्किट ने बरीच माहिती दिली पण त्याचा एक लेखच यावा या प्रतिक्षेत!
आपला
गुंडोपंत