आर्थिक संकटाचे पुढचे पाउल कसे असेल?

होणार होणार म्हणुन गाजावाजा झालेली जी २० देशांची बैठक एकदाची संपन्न झाली. त्या चर्चेचे फलित काहीही असो, या बैठकीनिमित्ताने जागतिक अर्थकारण, समाजकारण तसेच राजकारणावर असलेली अमेरिकेची पकड आता ढिली होत आहे तसेच येत्या काळात त्यांचे वर्चस्व संपुष्टात येणार हे अधोरेखित झाले, हीच काय ती खरी गोष्ट. त्याच बरोबर बड्या राष्ट्रांना इतर देशांच्या समस्येबद्दल काही देणे घेणे नसुन अशा प्रकारच्या चर्चांमुळे आज असलेल्या समस्या सोडवण्याचा केवळ देखावा केला जाईल पण समस्या जशा आहेत तशाच रहातील हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. याचे कारण स्पष्ट आहे, की केवळ रोगामुळे दिसणा-या बाह्य लक्षणांवर उपचार न करता रोगाच्या मुळापाशी जावुन रोग निवारण करणे गरजेचे असते. परंतु रोगाचे मुळ कारण पुर्णपणे दुर्लक्षित करुन जर उपचार करत बसले तर रोग अधिकच फैलावणार व तो रोग्याचा जीव घेणार हे निश्चित.

त्यामुळेच जी२० बैठक केवळ बँकाची खराब अवस्था, कोसळलेले बाजार, कधीही कोलमडु शकणारा डेरिव्हेटीव्हचा डोलारा तसेच बाजारातील चलनाची कमतरता याभोवतीच रेंगाळत राहीली. पण याच्या मागचे मुळ कारण म्हणजे अमेरिकन डॉलर हा आंतरराष्ट्रीय बाजाराच्या मनातुन उतरत चालला असुन त्याच्या अस्तित्वाबद्दल म्हणजेच ब्रेटनवुडस सिस्टीम बद्दल असलेल्या अविश्वासाला सामोरे जाण्याचे धैर्य अमेरीकेत नव्हते त्यामुळे आंतरराष्ट्रिय बाजार सौद्यांच्या करता आवश्यक अशा या सिस्टीम मधे नवीन युगाला अनुसरुन जे बदल होणे आवश्यक आहेत ते होत नाहित. जर असे बदल केले गेले तर पर्यायाने अमेरिकेन डॉलरची पुर्ण वाट लागेल तसेच अमेरीकेत सुपरइन्फ्लेशन नावाचा राक्षस धिंगाणा घालेल ज्याला आजपर्यत १९४४ पासुन दुर ठेवले गेलेले आहे.

जर येत्या सहा महिन्यात अमेरिकेला बाजुला सारुन जर इतर देशांनी नवीन आंतरराष्ट्रिय चलन किंवा वेगळी व्यवस्था जर आणली नाही तर जागतिक बाजार पुर्णपणे ठप्प होईल. व त्याचबरोबर अमेरिकेला मध्यवर्ती ठेवुन आर्थिक, सामाजिक, राजकिय अस्थैर्याचे वादळ संपुर्ण पृथ्वीवरील सर्व देशांमधे हाहाःकार माजवेल ज्याची कल्पना करणे आजतरी अत्यंत अवघड आहे. केवळ कल्पनाच करायची तर मी इतकेच सांगेन की गेल्या दोन महिन्यात जे शेअर बाजाराने पाहीले आहे ते केवळ ट्रेलर आहे २ मिनिटाचा. तीन तासाचा पिक्चर बाकी आहे. फक्त तो रिलीज कधी होईल आणि नक्कि रिलीज होईल का नाही ते सांगणे अतिशय अवघड आहे.

आता हे चालु असलेले संकट खरोखर गंभीर आहे याची सगळ्यांना जाणीव झाली आहेच. कालपर्यंत भारतावर काहीही परिणाम होणार नाही असे ठासुन सांगणारे पंतप्रधान व अर्थमंत्री आपलीच विधाने बदलुन परिणाम होईल पण फार होणार नाही असे म्हणत आहेत. पण त्यांची देहबोली मात्र या संकटाची तीव्रता तितक्याच गंभीर स्वरुपाला अनुरुप अशीच असल्याचे निदान टिव्हिवर तरी दिसते. हीच गोष्ट इतर देशांच्या प्रमुखांची आहे. सगळ्यांनी घराला आग लागल्याचे एकमुखाने मान्य केले आहे. परंतु अजुनही मान्यता दिली जात नाही ती या गोष्टीला की घराचा पायाच भुसभुशीत झाला आहे. किंवा याची तुलना अमेरिकेवरील ९/११ हल्याशी करता येईल. आंतरराष्ट्रिय बाजार म्हणजे जुळे टॉवर्स आणि एकामागोमाग एक सब प्राईम, लिक्विडीटी क्रंच, रेसेशन, अमेरीकेची कर्ज फेडण्याची ढासळत चाललेली क्षमता ही आदळणारी विमाने.. आणि कॉफीचे घुटके घेत करायच्या योजनांच्या गप्पा म्हणजे आग विझवणारा एकुलता एक बंब. नाव द्या हो कितीही गोंडस - जी २० किंवा अजुन काहीही...

आजचे जागतिक नेते अजुन ह्या संकटाच्या व्याप्तिविषयी तसेच त्याच्या परिणामाविषयी इतके कमी आकलन दाखवतात की जसे २००७ च्या सुरवातीला पुळी म्हणुन दुर्लक्षिलेला सबप्राईम कर्करोगाच्या रुपाने समोर आला, तसेच आताही होत आहे असे खेदाने म्हणावे लागते. आजपर्यत कुरवाळलेल्या कल्पना अन विश्वास ठेवुन उभारलेले जग झपाट्याने नाहीसे होतांना दिसत असले तरी ते मानायची अजुन अनेकांची तयारी नाही असेच म्हणावे लागत आहे. तरी अजुन ही समस्या तळागाळापर्यत पोहोचणे बाकी आहे. ती जेव्हा पोहोचेल तेव्हाच्या जगाची कल्पना करणे अवघड आहे. पण एक निश्चित आहे की मानवी इतिहासाला वळण लावणारे संकट अशीच याची पुढील काळात नोंद होईल.

मी मागे म्हटल्याप्रमाणे येत्या सहा महिन्यात अमेरीका कर्जाची परतफेड करण्यास असमर्थता दर्शवेल याचे प्रमूख कारण असेल ते म्हणजे डॉलरचे बाजारातील घसरलेले मुल्य. त्यामुळे अमेरिकेला डॉलर्स फिरवत आपली अर्थव्यवस्था चालवता येणार नाही. अशा वेळेस पर्यायी व्यवस्था म्हणुन युरोचाच स्विकार सर्वत्र केला जाईल. जपान, चीन, तसेच रशिया याबाबतीत महत्वाची भुमिका बजावुन अमेरिकेला आपले म्हणणे मानणे भाग पाडतील. तसेच अरब राष्ट्रे स्थिर चलनाच्या प्रतिक्षेत असल्याने तसेच सर्वसाधारण अमेरिकनांविषयी असलेल्या रागामुळे युरोचा स्विकार करुन अमेरिकन डॉलर्सचा त्याग केला जाईल. याचेच लाक्षणिक उदाहरण म्हणजे तैवानने अमेरिकन बॉण्डस विकत घेण्यास दिलेला नम्र (?) नकार ! व जपानने चालु केलेला अमेरिकी बॉण्डसचा विक्रिचा मारा.

बाजारात पैसा टाका असा सल्ला मी अजुनही देणार नाही कारण बाजार अजुन खाली येईल तर त्यावेळेला पैसे टाकल्याने आपला जास्त फायदा होईल असे मला वाटते. कारण आपण कितीहि आशावादी असलो तरी २१००० सेन्सेक्स परत मी निदान माझ्या हयातीत पाहु शकेल असे मला तरी वाटत नाही. २१००० च्या वरती गेला तर चांगलेच आहे पण जाण्याची शक्यता खुप धुसर आहे, कारण आता ख-या अर्थाने बाजारातुन मुख्य अर्थव्यवस्थेकडे संकटाने मोर्चा वळवला आहे. आता कामगार कपात, उत्पन्नात घट, उत्पादन थंडावले, मागणी नाही, कंपन्या दिवाळखोर अशाच बातम्यांनी बाजार ढवळुन निघणार आहे. त्यातच भर म्हणजे डिप्लेशन होवुन किंमती झपाट्याने खालती येणार आहेत ज्याचा परिणाम म्हणुन पगार कमी, खर्च कमी, उत्पन्न कमी, शेअरचा भाव कमी असे दुष्टचक्र चालु होईल.

सिटी गृपने कालच ५३००० लोक कमी करण्याचा निर्णय घेतला. वित्तसंस्था फार अडचणीत आहेत. अजुन ब-याच बातम्या बाहेर येणे बाकी आहे. या संस्थांच्यामुळे भारतातील आयटी व आयटी एनेबल्ड कंपन्यांचा चांगला जम २००० नंतर बसला होता. त्यांना दुर्देवाने आता पडता काळ येणार आहे. कितीतरी कंपन्या कदाचित नामशेष होतील. कितीतरी आज आहे त्याच्या तुलनेत निम्या किंवा पाव होतील. इन्फोसिसने नुकतीच योजना जाहिर केली असुन दोन वर्षापेक्षा जुने लोक एक वर्षाची सुटी घेउ शकतात अर्थात काही अटी शर्ती आहेत. कालच कुठेतरी बातमी वाचली एका एअरलाईन्सने तिच्या ट्रेनी पायलटांचा पगार दोन लाख रुपये प्रतिमाह वरुन केवळ वीस हजार रु प्रतिमाह इतका कमी केला आहे. बिल्डरांचे धाबे दणाणले असुन दर सुमारे २५ ते ४० टक्के कमी झाला आहे पण गि-हाईक नाही अशी अवस्था आहे. असो.

शेअरबाजाराकडे कमी व आपल्या नोकरीकडे जास्त लक्ष द्या. कामातली किंचितही चुक वरिष्टांना आपल्याला पिंक स्लिप द्यायला कारणीभुत ठरेल. धंद्यात असाल तर आहे ते गि-हाईक टिकेल कसे ते पहा.

अजुन काय सांगु... काळजी घ्या.

लेखनविषय: दुवे:

Comments

अभ्यासपूर्ण पण

जगबुडी/महासत्तांतर होणार आहे हे भाकीत ओढले-ताणलेले वाटते.

माझ्या मते शेअर बाजारातील इतपत उच्चांक २० वर्षांत दिसल्यास आश्चर्य वाटू नये. (नाना चेंगट यांना मी याहून दीर्घ आयुष्य चिंततो.) येथे डाऊ-जोन्स निर्देशांकाचे कालक्रमण दाखवले आहे. लक्षात असू द्यावे, की किमतीचे निर्देशांक घातांकाच्या मानदंडाने कालक्रमण करतात (लॉगॅरिद्मिक स्केल).

डाऊ-जोन्स निर्देशांकाचे कालक्रमण
डाऊ-जोन्स निर्देशांकाचे कालक्रमण

घातांकाच्या सरासरी सरळमार्गी कालक्रमाभोवती (लॉग-लिनियर ट्रेंडभोवती) निर्देशांक ३०-४० वर्षांच्या पुनरागमनाचा नागमोडी मार्ग चालत आहे.

(मुं.शे.बा.सेन्सेक्सचे असे विश्लेषण जाणकारांनी करावे. साधारण असाच काही निष्कर्ष निघेल, असे मला वाटते.)

१८००-१९५० काळातही काही बाजारबुड्या आल्या, पण तेवढ्याने महासत्तांतरे झाली नाहीत. त्यांच्या अनुषंगाने युद्धे झालीत, हे खरे. पण त्या युद्धांच्या नंतर कधीकधी महासत्तांतरे झालीत, तर कधीकधी झाली नाहीत.

या बाजारबुडीत जगातील बहुतेक देशांच्या चलनाच्या तुलनेत संयुक्त राज्यांचे (यू.एस.चे) चलन "डॉलर" वधारले आहे. बहुतेक आंतर्राष्ट्रीय आर्थिक उलाढालींमध्ये सं.रां.च्या सरकारी वचनाची किंमत (=डॉलर) वाढलेली आहे, असेच दिसते आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या बाबतीत हे महत्त्वाचे पर्व आहे, याबाबत लेखाशी सहमत. पण पूर्वीच्या बाजारबुड्यांसारखीच ही शक्यता आहे, की बाजाराधिष्ठित पुंजीवादात काही थोड्या माफक प्रमाणात समाजवादाचे मिश्रण घातले जाईल. घराची डागडुजी केली जाईल - नवी पायाभरणी नव्हे. आणखी २५-५० वर्षांची सोय होईल.

अधिक प्रकाश

या बाजारबुडीत जगातील बहुतेक देशांच्या चलनाच्या तुलनेत संयुक्त राज्यांचे (यू.एस.चे) चलन "डॉलर" वधारले आहे. बहुतेक आंतर्राष्ट्रीय आर्थिक उलाढालींमध्ये सं.रां.च्या सरकारी वचनाची किंमत (=डॉलर) वाढलेली आहे, असेच दिसते आहे.

डॉलरची किंमत कशामुळे वाढली आहे यावर जरा प्रकाश टाकता का?

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

डॉलरची किंमत

डॉलरची किंमत कशामुळे वाढली आहे यावर जरा प्रकाश टाकता का?

अमेरिकेतील वित्तसंस्थांनी जगातील सर्व बाजारातुन आपली गुंतवणुक काढुन घेण्यास सुरवात केल्यामुळे डॉलरची किंमत वाढली आहे. पण हे केवळ तात्पुरते असुन काहि दिवसांनी डॉलरची किंमत घसरणीला लागेल.

अमेरिकेतील द्रवता

अमेरिकेत द्रवता नसल्याने त्या कंपन्या व अमेरिकी सरकारही इतरत्र गुंतवलेले डॉलर पुन्हा देशात घेऊन येत आहे. त्यामुळे बाहेरील देशांमध्ये डॉलरचा पुरवठा कमी आणि मागणी जास्त झाल्याने डॉलरची किंमत वाढत आहे असे ऐकले आहे.

आपला,
(आर्थिक) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

किंमत = ??

डॉलरची किंमत कशामुळे वाढली आहे यावर जरा प्रकाश टाकता का

येथे किंमत = व्हॅल्यु? की किंमत = कॉस्ट म्हणायचे आहे?
कॉस्ट असेल तर ठिक आहे ..पण डॉलरची व्हॅल्यु (पक्षी: पत) वाढली आहे का?

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

व्हॅल्यू आणि प्राईस

येथे "किंमत" = "प्राईस" या दृष्टीने वापरले आहे.

मूल्य (व्हॅल्यू) आणि किंमत (प्राईस) यांचा काही संबंध असतो. पण तो संबंध नेमका काय ही अर्थशास्त्राच्या तत्त्वज्ञानातील मोठी वादविवादाची बाब आहे. तत्त्वज्ञानाची कुठली का शाखा असेना, अधिक मूल्याच्या वस्तूंची किंमत बाजारात साधारणपणे अधिक असावी, असे सर्व शाखांचे मत असते.

म्हणूनच किमतीवरून मूल्याबद्दल काही ढोबळ निष्कर्ष काढता येतात. ते निष्कर्षसुद्धा काढायचा माझ्या प्रतिसादाचा रोख होता. त्यामुळे ढोबळमानाने "पत" वाढली आहे, हा निष्कर्षसुद्धा काढायचा आहे.

(हा प्रश्न ऋषिकेश यांना का पडला असावा? सरकारी प्रतिभूत "चलन" हा असा अपवादात्मक माल आहे, ज्याबाबत किंमत=मूल्य, हे अक्षरशः खरे असते. चलनाच्या बाबतीत मूल्य कमी होऊन किंमत वाढणे कसे शक्य आहे? याबद्दल त्यांची काय विचारधारा आहे?)

स्वैर विचार

याबद्दल त्यांची काय विचारधारा आहे?

फारशी काहि विचारधारा वगैरे नाहि. आणि अर्थशास्त्राचे कणभरही ज्ञान नाहि. त्यामुळे काहि स्वैर आणि कदाचित चुकीचे विचार इथे मांडतो:

डॉलरची किंमत म्हणताना ती तुलनात्मक दृष्ट्या आहे असे वाटते. त्यामुळे ती वाढण्याची कारणे पुढीलपैकी एक असु शकतील असे वाटले:
१. डॉलरची पत वाढली आहे आणि त्यामुळे किंमत वाढली आहे
२. डॉलरची पत घसरली आहे परंतू इतर चलनांची घसरण त्याहूनहि जोरदार आहे.. त्यामुळे डॉलरची तुलनात्मक "किंमत" वाढलेली वाटते (तरी पत घसरलेलीच आहे)

तुम्हाला अजूनहि डॉलरमधे कमवायला आवडेल का? ह्या प्रशांची होकारात्मक उत्तरे गेल्यावर्षी आणि यावर्षी देणार्‍या लोकांमधे वाढ आहे का घट हा विदा मिळाला तर डॉलरची जनमानसांतील किंमत अधिक स्पष्ट होईलसे वाटते ("पत"म्हणताना केवळ सांख्यिकी किंमत नसून मानसिक पैलू विचारात घेऊ पाहतो आहे. माहित नाहि हे योग्य आहे का)

(निर'अर्थ'क)ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

वेगळा प्रश्न असावा

कुतूहलासाठी चांगला विषय आहे.

"तुम्हाला डॉलर मध्ये पैसे कमवायला आवडेल का?" हा विचारायला मोठा कठिण प्रश्न आहे. कोणाला विचारावा? शक्यतोवर ज्याला पर्याय आहे त्या व्यक्तीला विचारण्यातच अर्थ आहे.

म्हणजे या क्षणी तेच काम करण्यासाठी डॉलरमध्ये मोबदल्याचा करार, आणि दुसर्‍या चलनात मोबदल्याचा करार, दोन्ही पर्याय हातात असलेल्या व्यक्तीला हा प्रश्न विचारण्यात काही अर्थ आहे. असे लोक थोडेच असतात.

पण जर असा प्रश्न विचारला "तुमची पुंजी/बचत तुम्हाला डॉलरमध्ये ठेवायची आहे, की दुसर्‍या कुठल्या चलनात?" तर तसे पर्याय असलेले लोक बरेच सापडतील. विशेषकरून आर्थिक संस्था. अर्थात, संस्था जे उत्तर देतात, तीच वेगवेगळ्या चलनांची किंमत.

२. डॉलरची पत घसरली आहे परंतू इतर चलनांची घसरण त्याहूनहि जोरदार आहे.. त्यामुळे डॉलरची तुलनात्मक "किंमत" वाढलेली वाटते (तरी पत घसरलेलीच आहे)

हाच तो गहन तात्त्विक मुद्दा - तुलनात्मक नसलेले पण स्थायी/स्वाभाविक असे "मूल्य" ते काय असते? याबद्दल वेगवेगळ्या तत्त्वचिंतकांचे मत खूप वेगवेगळे आहे. त्यांची मतमतांतरे सोडा. तुमचे मत काय आहे - हे पढिक नसणार म्हणून मोलाचे आहे... "पत"मध्ये काही मानसिक घटक तुम्ही विचारात घेतले आहेत. पण ते नेमके कुठले? अगदी अयमान अल्ज़वाहिरीलाही सध्या डॉलरच हवे असतील. (कारण जगातील प्रमुख चलने ही एकमेकांत सहज बदलली जाऊ शकतात. उद्या तेच पैसे तो यूरोमध्ये परिवर्तित करू शकेल.)

नाशिवंत अन्नाचे मानसिक मूल्य फार असते. पण चलने नाशिवंत नसल्यामुळे, आज डॉलरमध्ये दुसर्‍या कुठल्या देशातले नाशिवंत अन्नही विकत घेतले जाऊ शकते. कदाचित डॉलरच्या फ्यूचर-बाजारातून "पत काय" हा निष्कर्ष काढता येईल - म्हणजे आजची किंमत नव्हे, तर उद्या काय किंमत असेल त्याबद्दल लोकांनी लावलेली बोलणी. याचा "मानसिक पतीशी" काही संबंध लागतो काय?

असा विचार करत करत जो काय तुमच्या मनातला प्रश्न आहे, त्याबद्दल समाधानकारक उत्तर तुम्हा-आम्हाला मिळू शकेल.
---
पण स्वाभाविक मूल्य म्हणजे जे काय असेल, ते सर्व चलनांच्या बाबतीत साधारणपणे एकच असणार. जगातील सर्व चलनांचे मूल्य खूप खालावत असेल, पण सं-राज्यांच्या डॉलरचे थोडेच खालावत असेल, तर माझ्या वरील प्रतिसादात फारसा फरक पडत नाही. सं-राज्यांच्या सरकारच्या आर्थिक अभिवचनावर लोक सर्वाधिक (तुलनात्मक का होईना) विश्वास ठेवत आहेत. हे महासत्तांतराचे लक्षण नव्हे.

घातांक वगैरे

घातांकाच्या सरासरी सरळमार्गी कालक्रमाभोवती (लॉग-लिनियर ट्रेंडभोवती) निर्देशांक ३०-४० वर्षांच्या पुनरागमनाचा नागमोडी मार्ग चालत आहे.

हे वाक्य पुन्हा वाचता आचरटपणे क्लिष्ट वाटते.

संख्या बदलण्याचा काही मापदंड असतो. सरळ रेषेतला मापदंड आपल्या नेहमीच्या ओळखीचा होय. साधे व्याज या प्रकारचे असते. काळ-काम-वेगाची गणिते या प्रकारची असतात.
१ शिंपी १ तासांत १ सदरा शिवतो = १ शिंपी ७ तासात ७ सदरे शिवतो
तो शिंपी +१ तास काम करेल तर ७+१ = ८ सदरे शिवून होतील वगैरे.
म्हणजे १ शिंप्याच्या कारखान्यात एक-दोन-तीन-चार तासांत बनणारे सदर्‍यांची राशी
१->२->३->४... अशी असेल

चक्रीवाढीचा मापदंड वेगळा असतो. हा घात-मापाने जातो.
७% वार्षिक व्याजाने ठेवलेली १०० रुपये रक्कम १० वर्षांत १००+७+७+७+७+७+७+७+७+७+७=१७० रुपये होत नाही, तर
१००*(१.०७)^१० =~ २०० रुपये होते. (म्हणजे +१००/दहा वर्षे काय? - तर नाही...)
आणखी १० वर्षांनी ती रक्कम दुप्पट = रुपये ४००, इतकी होईल.

चक्रीवाढीत रक्कम मूळ रकमेच्या घाताने (=काही पटीने) वाढते. म्हणजे १०-२०-३०-४० वर्षांत:
१००->२००->४००->८००रुपये... =
१००*२^->१००*२^->१००*२^->१००*२^->
पण रकमेचा जर घातांक घेतला (येथे २ चा घात)
१००*२^(१->२->३->४...)
म्हणजे घातांक आपल्या शिंप्याच्या सदर्‍यांसारखे एकरेषीयच असतात. एकरेषीय आकडे आकळायला सोपे असतात. त्यांचे सहज विश्लेषण करता येते. त्यामुळे चक्रीवाढ-घाताच्या गणितापेक्षा एकरेषीय-घातांकाचे गणित खूप सोपे जाते. कर्जाच्या व्याजाचे एकरेषीय-घातांकाचे गणित असते, ते तसे केल्यास सोपे जाते.

या व्याजाच्या गणिताचा समभाग बाजारातील निर्देशांकाशी काय संबंध, असे म्हणाल... गुंतवणुकीच्या अपेक्षित फायद्याचा कर्जावरील व्याजदराशी फार घनिष्ठ संबंध असतो. ज्याच्याकडे पैशाची पूंजी असते, त्याच्यापुढे दोन पर्याय असतात. उद्योगपतीला चक्रीवाढ दरात कर्ज द्यावे, की उद्योगात समभाग विकत घ्यावा. फायद्याचा दर कर्जाच्या दरापेक्षा कमी असला तर पूंजीपती कर्जच देईल, समभाग विकत घेणार नाही. पण भरपूर लोक कर्जे द्यायला तयार असतील, तर उद्योगपती त्यातल्या त्यात कमी व्याजाचे कर्जच घेईल - अशी चढाओढ करता-करता व्याजाचा दर आणि अपेक्षित फायद्याचा दर सम-समान होतात (फक्त सरासरीतच! कुठल्या एका कंपनीचे समभाग अवाच्यासवा वाढतात, किंवा आपटतात...) अशा प्रकारे समभागांची सरासरी किंमत (म्हणजेच निर्देशांक) चक्रीवाढीने वाढणे क्रमप्राप्त असते. म्हणून दरवर्षी बाजारातला बदल हा शिंप्याच्या सदर्‍यांच्या उत्पन्नासारखा साधाच एकरेषीय नसून घातांकाच्या मापात एकरेषीय असतो.

म्हणून वरील डाऊ-जोन्स निर्देशांकाचे कालक्रमण घातांकाच्या मापात काढलेले आहे. अर्थातच निर्देशांक बरोबर त्या रेषेवर जात नाही, थोडा कमीजास्त असतो. त्या रेषेभोवती पिंगाच घालतो. (खरे तर पिंग्यात-पिंगा घालत मोठा गुंतागुंतीची चाल करतो - म्हणूनच दलालांना काही काम मिळते - उद्या निर्देशांक काय करेल हे त्या रेषेवरून मुळीच सांगता येत नाही.) गेल्या शतकात हा "पिंगा" ३५-४० वर्षांचा होता.

हे सर्व वर्णन त्या एका वाक्यात दिले होते. पुन्हा :

घातांकाच्या सरासरी सरळमार्गी कालक्रमाभोवती (लॉग-लिनियर ट्रेंडभोवती) निर्देशांक ३०-४० वर्षांच्या पुनरागमनाचा नागमोडी मार्ग चालत आहे.

शॉर्ट सेलिंगवर बंदी

कोसळत्या शेअर बाजारात शॉर्ट सेलिंग करून पैसा मिळवणे म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखं आहे. त्यावर काही काळ (शेअर बाजार आजारांतून उठेपर्यंत) तरी बंदी घालणे आवश्यक आहे. पण सेबीचा अशा बंदीला विरोध आहे. सेबी सट्टेबाजांसाठीच आहे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी नाही असे वाटते.

भाग भांडवल बाजार

भाग भांडवल बाजारात् जो कोणी येतो तो पैसा कमाविण्यासाठीच येतो. मग त्यात आदर्शवाद येवु शकतो का?

पथ्य

भाग भांडवल बाजारात् जो कोणी येतो तो पैसा कमाविण्यासाठीच येतो. मग त्यात आदर्शवाद येवु शकतो का?

पैसा कमवायला बाजार शिल्लक तर राहिला हवा ना. तो जिवंत राहण्यासाठी आदर्शवादाचे पथ्य आवश्यक आहे. सट्टेबाज पैशाच्या हव्यासापायी सोन्याची अंडी देणारी कोंबडी (सगळी अंडी एकदम मिळावी म्हणून) कापायला निघाले आहेत. ते स्वतःचे भविष्य स्चतःच नष्ट करीत आहेत व आपल्याबरोबर इतरांना (सर्वसामान्य गुंतवणूक् दारांना) खड्ड्यात नेत आहेत.

 
^ वर