दिवाळी अंक
"दिवाळी अंक" हा महाराष्ट्रातील दिवाळीचा अविभाज्य घटक. अनेक नवीन जुन्या लेखक-कवी-चित्रकार-छायाचित्रकार मंडळींच्या प्रतिभेचा अपूर्व सोहळा. या निमित्ताने अनेक नवे लेख, मुलाखती, कथा, कविता यांचबरोबर चित्रे, व्यंगचित्रे, छायाचित्रे, प्रवासवर्णने, रांगोळ्या, मेहंद्या, इतर कलांमधील उलाढालीचा आढावा या विविध वार्षिक अंकांतून घेतला जातो.
तुम्हीही विविध अंक वाचत असालच.. आजपासून दिवाळी सुरु होते आहे. पुढील महिनाभरात तुम्ही वेगवेगळे अंक वाचाल.. त्यातील बरेच लेखन तुम्हाला आवडेल, एखादे लेखन मनाचा ठाव घेईल तर एखादे लेखन बेरंग करेल. तुम्ही जे वाचताय त्यावर खचितच तुम्हाला एकमेकांबरोबर चर्चा करायला आवडेल.
तेव्हा सांगा पाहु,
तुम्ही सध्या कोणता अंक वाचताय?
- त्यातलं काय वाचनीय आहे? काय आवर्जून वाचलेच पाहिजे या सदरात येतं
- तो अंक आवडला नसल्यास का?
- अंकाचं वैशिष्ट्य काय?
- एखादा लेखन-लेखिका-कवी-कवयित्रि, इतर कलाकार यात काहि विषेश आवडले का?
- अंकाचे मुखपृष्ठ कसे आहे?
अश्या चर्चेतून या अंकाच्या पसार्यात नेमके चांगले वाचायला मदत तर होईलच पण जे आपण सहसा न वाचताच राहून जातं त्याची शक्यता कमी असेल.
सांगा तर मग तुम्ही सध्या कोणता अंक वाचताय?.........
उपक्रमपंत आणि सर्व वाचकांना दिवाळीच्या वाचनीय शुभेच्छा!
Comments
आवाज!
आज सकाळी लायब्ररी उघडायच्या अर्धा तास आधी गेलो तरी ६वा नंबर होता :(. दरवर्षी जरा उशीरा गेलं तरी गाळ हातात पडत असे.आज मात्र सुरवातीलाच "आवाज" हातात आला आहे. :)
असो.
मुखपृष्ठावर खास "आवाज" ला शोभेलशी वात्रट खिडकी आहे.. ;) ती मस्त आहे.. त्यामानाने आतील खिडक्यांचे प्रयोग मात्र ठिक. अंक नुकताच चाळला आहे. डिट्टेलवार मत वाचल्यावर इथेच देतो :)
----
आवाज मधील बर्याचशा गोष्टी वाचून झाल्या.. एकूण अंक कसा आहे विचाराल तर "ठिक आहे" असे सांगेन. काहि कथा जसे सौ. मंगला गोडबोल्यांची "पेज थ्री" अथवा अवधूत परळकरांचा सिंदबाद नग्न लोकांच्या देशात जातो ती "सिंदबादची साठावी सफर" छान वाटली. बाकी गंगाराम गवाणकरांची "लेटमार्क"ही आवडली. इतरही काहि गोष्टी चांगल्या होत्या....
मात्र
कोणतीही गोष्ट वाचून खळाळून हसलो नाहि, ह.ह.पु.वा. करणारे कोणतेहि गद्य लिखाण नव्हते.
खिडक्यांबद्दल बोलायचे तर मुखपृष्ठावरील खिडकी मस्त. बाकी आहेत म्हणून आहेत.
चित्रमालिका, व्यंगचित्रे यात मात्र बरेचसे खास टोले आहेत. त्यात विकास सबनीस, विवेक मेहेत्रे, एस्. व्ही कंदिलकटला इ. व्यंगचित्रकारांनी मात्र अंकात जान आणली आहे :) काहि चित्रे तर जहबहर्या आहेत.
माझे गुणांकन: ६/१०
-(चिकित्सक) ऋषिकेश
अरे ऋषी,
अशोक पाटोळ्यांची 'महागायक' आणि अशोक जैन यांचे 'पहिले मराठी विश्व काव्य सम्मेलन' खुसखुशीत आहेत.
बाकी 'आवाज' ला शोभणा-या वात्रट खिडक्या तितक्या 'वात्रट' वाटल्या नाहीत :(
बाकी व्यंगचित्रही झकास आहेत. अजून 'आवाज' बराच वाचायचा आहे, तुर्तास इतकेच !!!
-दिलीप बिरुटे
हं
अशोक पाटोळ्यांची 'महागायक' मस्त आहेच.. पण नवीन नसे काहि नाहि.. यंदा तर सारेगमप सारख्या कार्यक्रमावरच दोन लेख आहेत :)
'पहिले मराठी विश्व काव्य सम्मेलन' मला फार बोअर/बालीश वाटले.. ओढूनताणून विनोद ;) (पष्ट मताने वाईट वाटले असल्यास स्वारी :) )
व्यंगचित्रे झकास आहेतच :)
बाकी अजून एक : खिडक्या वात्रट नसल्या तरी एक कथेसाठीचे चित्र जरा जास्तच "उघडे" वाटले ;)
(छिद्रान्वेशी)ऋषिकेश
बकवास...
आवाजचा दिवाळी अंक कधीच आवडला नव्हता. यावेळेसच्या खिडक्या कंटाळवाण्या वाटल्या. (नेहमी तशाच असतात.);-) व्यंगचित्रे मात्र नेहमी प्रमाणे सदाबहार!
कथा वगैरे तर वाचायचेही श्रम घेववत नाहीत.
व्यंगचित्रांना ८/१०
खिडक्या ५/१०
कथा वाचून झाल्यावर्......
आणि प्रतिसाद देताना अंकाला रेटिंग देणे आवश्यकच आहे का ऋषिकेश?
दुसरा अंक 'नवल' आणला आहे. त्याचं मत वाचून झाल्यावर.....
-सौरभ.
आवश्यक नाहि
अजिबात नाहि :) फक्त मता बरोबर हे रेटिंग दिले की ज्याला घाईत धावता आढावा घ्यायचा आहे त्याला सोयीचे जाते हा उद्देश होता.
प्रा. डॉ.,
खाली वेड्या मुलाने लिहिल्याप्रमाणे जालावरील दिवाळी अंकांचेही परिक्षण असावे असाच उद्देश होता.. कारणे तेहि निर्विवादपणे महत्त्वाचे अंक आहेत
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
चांगली चर्चा
भारतातील सदस्यांनी येथे दिवाळी अंकांचे परीक्षण/माहिती/ टिका इ. इ. दिले/ केले तर आम्हाला दूर बसून दिवाळी अंकांची मजा लुटता येईल.
अवांतरः खळाळून हसू न येण्याचे कारण कोणते वाटते? विनोदांत नावीन्य नाही की दृकश्राव्य माध्यमांमुळे वाचनातील विनोद सपक वाटू लागले आहेत?
विनोद
अवांतरः
विनोदी किस्से हे मुख्यतः त्यांच्या शेवटी विषयाला कशी कलाटणी दिली आहे यावर हसू/आसू आणतात. वुई एक्स्पेक्ट समथिंग अनएक्स्पेक्टेड. कदाचित आधी ज्या गोष्टी अकल्पित वाटायच्या त्या आता वाटत नाहीत.
दुसरे एकः एकूण संवादापैकी शब्द हे केवळ ७ % उपयोगी पडतात. उरलेले ९३ टक्के संभाषण आपला टोन(आवाजातील चढ-औतार्य ?) आणि चेहर्यावरचे-शरीराचे हावभाव यातून चालते.
हे पहा. किंवा हे.
अभिजित...
ता. कर्हाड जि. सातारा.
कारण
विनोदांत नावीन्य नाही की दृकश्राव्य माध्यमांमुळे वाचनातील विनोद सपक वाटू लागले आहेत?
बहुधा पहिले कारण असावे. बर्याच तथाकथित विनोदी हिंदी-मराठी मालिकांमध्ये प्रत्येक वाक्याला खोटा हशा दिलेला पाहिला की हसू येण्याऐवजी अपार करूणा मनात दाटून येते. :)
----
संस्थळावरील अंकावरही चर्चा करावी का ?
मला मायबोलीची दिवाळी अंकाची सजावट खूप आवडली. संस्थळाच्या दिवाळी अंकात सजावटीत नंबर एकवर वाटते आहे,
लेखन अजून वाचले नाही. उपक्रमचे संपादकीय , मायबोलीचे संपादकीय जालीय अंकाला शोभणारे आहेत. नमोगताचे संपादकीय जरा निराशेचा सूर काढत आहे . विचार उजळून जावे असा आशावादाचा अभाव त्यात दिसतो. नमोगताच्या दिवाळी अंकातील सहा-सात कथांपैकी 'श्री गणेश खानावळ' कथा जबरदस्त वाटली, 'तु नसतांना' ही मस्तच आहे. बाकीच्या कथा लांबलचक असल्यामुळे जरा आस्वाद घ्यायचा कंटाळा येतो, ज्यात 'संशोधन, सुकाळसौदा, मि. ईस्टवूडचे साहस तरी पुनर्वाचन करुन पाहतो, म्हणजे त्याचाही आनंद घेता येईल असे वाटते, अर्थात कथांचा आनंद व्यक्तीसापेक्ष असल्यामुळे कथेच्या आवडी-निवडीबाबत मतभेद असू शकतात.
वेड्या मुलाशी सहमत
सहमत आहे.
आपला,
(शहाणा मुलगा) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
नमोगत म्हणजे काय?
नमोगत हे कोणते संकेतस्थळ आहे? त्यांचा दिवाळी अंक कोठे पाहायला मिळेल?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
साप्ताहिक सकाळ
आवाज नंतर "साप्ताहिक सकाळ" हातात आला आहे. याचे मला वाटलेले सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अनिल अवचटांचा लेख. :) त्यांचं नाव वाचलं आणि अंक हातात पडल्या पडल्या वाचायला घेतला. अपेक्षेप्रमाणे अतिशय सुंदर लेख. "मॉरिशसचा धडा" या लेखात त्यांच्या मॉरिशस भ्रमणाचे वर्णन आहे. पण अनिल अवचट पर्यटनाला गेले नसून एका निसर्गाला वाचवू पहाणार्यांचे काम पहायला गेले आहेत. मॉरीशसमधील पक्षी, वनस्पती वगैरे वाचवणार्यांची माहिती देणारा उत्कृष्ट लेख. शेवटही खास शैलीतला..अस्वस्थ करणारा.. विचारात टाकणारा..
या नितांतसुंदर लेखाशिवायही या अंकात वाचनीय असे भरपूर आहे. म्हणजे भरपूर लेख नसले तरी लेख अतिशय विस्तृत आहेत. काहि लेख अगदी ३०-३० पानांचे आहेत. पण काहि अपवाद वगळता सगळेच माहितीपूर्ण आहेत. सुहास कुलकर्णींचा "लोकशाहि जिंदाबाद" हा भारतीय लोकशाहीचा आढावा घेणारा व जगातील विविध लोकशाहींबरोबर तुलना करताना भारतीय वेगळेपण अधोरेखीत करणारा लेख उल्लेखनीय आहे. शिल्पा शिवलकरांचा "जगण्याविषयी बोलू काहि" हा वृद्धांसाठी लिहिलेला बराचसा तर्कशुद्ध लेख, मिलिंद बोकील यांचा ऑस्ट्रेलियातील आदिवास्यांवरचा लेख, "शब्द पाखरांचे" हा पक्षांच्या विविध आवाजांवरील श्रीकांत इंगळहळीकर यांचा रोचक लेख, धनंजय कुलकर्णींनी तटस्थ नजरेतून सांगितलेला "तेलंगाणाचा तिढा" व त्यानिमित्ताने दिसून आलेला टोकाचा प्रांतवाद ही या अंकाची आणखी काहि ठळक वैशिष्ट्ये
त्यातील कथा मात्र ठिक वाटल्या. (तसेहि सानियांच्या कथा मला आवडत नाहि त्यामुळे पुर्वग्रहदुषित दृष्टी असण्याची शक्यता आहे)
मुखपृष्ठावर "भार्गवी चिरमुले" यांचे सोज्वळ प्रसन्न टाईपचे छायाचित्र आहे. :-)
एकूणच भरपूर लेख देऊन त्यात चांगले शोधायला लावणार्या आवाजच्या तुलनेत कमी पानांच्या या अंकात बरेच दर्जेदार लेखन वाचायला मिळाल्याने हा अंक आवडला. जरूर वाचावा असा. (माझे भविष्यहि चांगले दिल्याने खूपच आवडला ;) )
(माझे सर्वसाधारण गुणांकनः ८/१०)
ऋषिकेश
दिवाळी अंक २००८ - काय वाचाल?
सालाबादाप्रमाणे या वर्षीही लिखित स्वरुपातील दिवाळी अंकांचा सुकाळ आहे. सगळे अंक वाचणे केवळ अशक्य आहे, त्यामुळे त्यातले आपल्याला आवडलेले काय हे इथे मांडल्यास तेवढेच, किंवा ते ते अंक वाचणे शक्य होईल, म्हणून हा चर्चा प्रस्ताव.
सुरुवात करतो लोकप्रभाच्या दिवाळी अंकापासून. कुपोषित आणि ऍनिमिक दिसणार्या कतरीना कैफच्या मुखपृष्ठावरुन जाऊ नका. हा अंक खरोखर सुरेख आहे. 'स्वेटर' हे प्रवीण टोकेकरांचे संपादकीय वाचावे. रुढार्थाने ते संपादकीय वाटावे असे नाही, जेमतेम एक पानभर लिहिलेल्या या हळव्या लेखात या 'ब्रिटिश नंदी'ने मजा आणली आहे. 'दिवाळीचे सोळा दिवस' हा काडीमास्तराचा लेखही धमाल आहे.वसंत पवार या गुणी पण शापित संगीतकाराविषयीचा विश्वास पाटील यांचा आणि तेंडुलकरांवरचा राजू परुळेकरांचा लेखही उत्तम. गुणी कलाकारांची सुगी संपली की त्यांची अवस्था दयनीय होते, हे बर्याच लोकांनी सांगून झालं आहे. पण आजही ही परिस्थिती तशीच आहे आणि कालपरवा तर वयोवृद्ध तपस्वी संगीतकार श्रीनिवास खळे यांना या वयात शासनदरबारी हेलपाटे घालावे लागले हे वाचून अत्यंत यातना झाल्या. परुळेकरांनी बाकी जरा जास्तच 'मी-मी' केले आहे. एखाद्या प्रसिद्ध माणसाविषयी लिहिताना लोकांना 'त्यांची माझी किती घट्ट ओळख होती आणि त्यांचे माझ्यावर कित्ती किती प्रेम होते आणि माझ्या आईच्या हातच्या सुरळीच्या वड्या खाताना ते म्हणत की...' हे सांगितल्याशिवाय का रहावत नाही कुणास ठाऊक. (अगदी एका विशिष्ट विषयाला वाहिलेल्या एका जालांकातला एक सुंदर लेखही या शापातून सुटलेला नाही! बाकी जालावरील इतर सुमार व्यक्तिचित्रांविषयी तर न बोलणेच बरे! अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर...असो.)
'लैलाची चित्तरकथा ' हा लेख टाळून पुढे गेलो आणि इब्राहिम अफगाणच्या 'फराज' यांचा परिचय करुन देणार्या 'शोला हूं, जल बुझा हूं...' या अप्रतिम लेखात गुंतून पडलो.
'अब के बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिले
जिस तरह सूखे हुए फूल किताबोंमें मिलें'
किंवा
कठीन है राहगुजर थोडी दूर साथ चलो
बहोत कडा है सफर थोडी दूर साथ चलो
आणि 'रंजीश ही सही' हे लिहिणारा शायर एवढीच अहमद फराज यांची (मला) असलेली ओळख. फराज यांच्या आयुष्याचे आणि शायरीचे विविध पैलू अफगाण यांनी असे पेश केले आहेत, की ज्याचे नाव ते.
'बंदगी हमने छोड दी है 'फराज'
क्या करे जब लोग खुदा हो जाये'
व्वा! शायरीची ताकद म्हणतात ती हीच असावी. हा लेख मुळातून वाचाच, पण यातला एक शेर बाकी इथे देण्याचा मोह होतो:
आज हम दार पे खींचे गये जिन बातोंसे
क्या अजब कल वो जमाने के निसाबों मे मिले
(आज मला ज्या गोष्टीसाठी फासावर चढवण्यात येत आहे, त्याच गोष्टी उद्या (भविष्यकाळात) पाठ्यपुस्तकात सापडतील)
'सपनेमें मिलती है' हा द्वारकानाथ संझगिरींचा लेख समस्त पुरुषांना आपल्या आयुष्यातील सोळा ते बावीस वर्षे या अत्यंत स्वप्नाळू, हुरहुरणार्या पण मूर्ख कालखंडाची आठवण करुन देणारा आहे. (स्त्रियांनी त्यांचे काय ते बघून घ्यावे!) रुपेरी पडद्यावरील गेल्या जमानातल्या नट्यांची त्यांनी अशी उफहाय आठवण काढली आहे की जी वाचून सई परांजपेच्या शब्दांत लिहायचे तर ' उस बीती हुई जवानी की कसम, हमनें भी एक ठंडी आह भर ली!' या लेखात द्वारकानाथ ( हे नाव असूनही!) बरेच धीट आणि सडेतोड झाले आहेत. उदाहरणार्थ आशा पारेखविषयी त्यांनी म्हटले आहे की... जाऊ दे, त्यांनी म्हटले म्हणून मी इथे म्हणणे योग्य नाही. पण आशा पारेख म्हटल्यावर जे आठवते, तेच संझगिरींनाही आठवले आहे, एवढेच सांगतो. आता जिज्ञासू मुळातून वाचतीलच. मराठी लेखणी अशी जरा पडद्यातून बाहेर यायला हवी. उगीच 'मी योगिता बालीचे चित्रपट तिच्या सहजसुंदर अभिनयाच्या मोहात पडून झपाटल्यासारखे बघितले. पुढे हाच कित्ता किमी काटकरने गिरवला. मल्लिका म्हणजे तर काय प्रश्नच नाही. मीनाकुमारीनंतर...' असली सारवासारवी नको.
शिरीष कणेकरांचे लेखन म्हणजे एरवी कुरकुरीत चकली सायीसकटच्या दह्यात बुडवून खावी तसे असते. 'गेले ते दिन गेले' या लेखात बाकी ही भाजणी जरा बिघडली आहे. आणि इथेही जरा मी - माझे असे जाणवतेच. 'वैजयंतीमाला मला एकदा असे म्हणाली, जूही चावला एकदा माझ्या कार्यक्रमाला आली होती...' असेलही, पण त्याचा अतिरेक झाला की या लेखकाच्या कल्पनाशक्तीच्या स्वैर भरार्या आहेत की काय असे वाटू लागते. 'दिल को बहलाने के लिये गालिब ये खयाल अच्छा है' या (चुकीच्या लिहिलेल्या ) शेराने या लेखाचा शेवट होतो, तेंव्हा दोन गोष्टींबद्दल आनंद होतो. चुकीचा लिहिलेला का असेना, एक चांगला शेर आठवला म्हणून, आणि लेख (एकदाचा) संपला म्हणून. यात काय समजायचं ते समजा.
बाकी अंकात विशेष असं काही नाही. (नाही म्हणायला माझ्या राशीचं भविष्य चांगलं दिलं आहे. ) पण वर लिहिलेल्या काही गोष्टींसाठी हा अंक मुद्दाम वाचावा असा आहे. जरुर वाचा.
या वर्षीचे इतर कोणते दिवाळी अंक तुम्ही वाचले? तुम्हाला त्यातलं काय आवडलं?
धन्यवाद
"लोकप्रभा"चा अंक मागवला नाही याबाबत आता थोडी रुखरुख वाटते. एखाद्या वाचलेल्या गोष्टीचा रसास्वाद कसा घ्यावा याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे वरील अभिप्राय.
ऑनलाईन आहे
कत्रीनाच्या रोगट आणि ऍनिमिक मुखपृष्ठासह हा अंक ऑनलाईन उपलब्ध आहे.
आपला,
(सुदृढ) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
आभार
सुंदर रसग्रहणाबद्दल आभार. शिरीष कणेकरांचा 'फॉर्म' हल्ली हरवल्यासारखा वाटतो. संझगिरी छानच लिहीतात.
आणखी अंक वाचल्यावर त्याविषयीही लिहावे ही विनंती.
----
संझगिरी
संझगिरी हे आम्हाला प्रामुख्याने क्रिकेटवर लिहीणारे म्हणून माहिती होते. "कोर्ट मार्शल" नावाचा एक कॉलम ते वर्षानुवर्षे "षटकार" मधे लिहायचे. माझा असा कयास आहे की , संझगिरींचा फिल्मविषयक लेख हा थोडा आत्मचरित्रातल्या एका छोट्या भागासारखा असावा ...
अवांतर : आशा पारेख यांचा उल्लेख काही वर्तुळांमधे दीदारगंज यक्षी असा झालेला मी ऐकलेले आहे. ह.घ्या.
आठवला
"कोर्ट मार्शल" नावाचा एक कॉलम ते वर्षानुवर्षे "षटकार" मधे लिहायचे.
या निमित्ताने एकच षटकार (आणि संदीप पाटील) बरेच वर्षांनी आठवला! यातच दिलीप प्रभावळकरांचे गुगलीही येत असे.
----
प्रश्न
या अनुषंगाने विचारायचे होते : चंदेरी आणि षटकार ही प्रकाशने बंद झाली काय ? ( माझ्या अंधुक आठवणीप्रमाणे , अक्षर प्रकाशनाच्या छत्रीखाली ती यायची ...) एकेकाळाची ही लोकप्रिय प्रकाशने बंद झाली असल्यास मराठी वाचकसंस्कृतीबद्दलचे ते (आणखी) एक लक्षण मानायला हवे. चंदेरीचा दिवाळी अंकही निघायचा. वयोपरत्वे आता कदाचित चंदेरी आणि षटकार यांच्याबद्दल मला चांदोबा/किशोर बद्दल जे वाटते तेच वाटले असते ; पण शाळकरी वयात/कॉलेजच्या सुरवातीच्या वर्षात ही प्रकाशने "स्टेपल् डाएट्" होती. आजच्या पीढीतल्या युवावर्गाकरता ती उपलब्ध नसावीत /किंवा त्या वर्गाला ती आवडत नसावीत आणि म्हणून ती बंद पडावीत ही बाब रोचक आहे.
बहुधा
चंदेरीचे काही वर्षे जुने अंक पाहिले आहेत पण षटकार पाहून युगे लोटली. हल्लीच्या पिढीला काय आवडते (म्हणजे मराठी काय आवडते) कल्पना नाही. मला काका म्हणणार्या बच्चेकंपनीवरून निष्कर्ष काढायचा म्हटला तर आयपॉड, करीना आणि शाहिद यांच्यापुढे बाकी कसली उणीव जाणवत नाही.
चांदोबा अजूनही निघतो पण ती मजा येत नाही. बहुधा "Nostalgia is not what it used to be" हेच खरे!
----
वाईट बातमी: 'चंदेरी' याच वर्षीपासून बंद
वाईट बातमी: 'चंदेरी' याच वर्षीपासून बंद झाला.
अंक वरवर चाळताना मिळालेले काही जबरदस्त लिखाण:
१) 'घेवपाठ' ही कथा - शब्द
२) नाटक करताना होणारी घुसमट या विषयावर अतुल पेठेंनी संपादित केलेला आणि मनस्विनी लता रवींद्र, धर्मकीर्ती सुमंत, इरावती कर्णिक, मोहित टाकळकर या नव्या दमाच्या नाट्यकर्मींनी लिहिलेला विभाग - साधना
३) तेंडुलकरांवर मेघना पेठेंनी लिहिलेला लेख - शब्द
४) 'रस्की' हे रसिका जोशी या अभिनेत्रीचं सुप्रिया मतकरींनी लिहिलेलं व्यक्तिचित्र - अक्षर
५) 'बोंबील आणि बॅरल' ही विलास सारंगांची त्यांनीच भाषांतरित केलेली कथा - शब्द (ही काहीशी अपुरी वाटली. पण तरीही वाचायलाच हवी अशी वेगळी.)
मुखपृष्ठे
दिवाळी अंकांचा वाचक म्हणून अनेक अंक आपण पहातो , वाचतो. अंकाच्या आतमधे काय असेल याबद्दल उत्सुक असतोच ; पण एकेका अंकाकडून काय काय मिळेल याचा आपाल्याला काहीसा अंदाजही असतो. याची सुरवातच होते मुखपृष्ठापासून. २००८ चे काही अंक मी चाळलेत. त्याबद्दलचा सांगोपांग विचार ते वाचून होईल तसा आपण मांडूच. सध्या थोडे मुखपृष्ठांविषयी .
काही अंकांवर खिडक्या असतात. ज्याला आपण चावट म्हणू अशा प्रकारची व्यंगचित्रे. "आवाज" ने बहुदा हा प्रकार आणला असावा. ज्ञानेश सोनार ही चित्रे काढत असत. गेल्या एक् दोन वर्षाचे आवाज चे अंक पाहता , सध्या सोनार त्यात दिसत नाहीत. खिडक्या मात्र आहेत. सोनारांच्या चित्राबद्दल मला आता थोडे कुतुहल वाटते. मीदेखील कधी काळी पौगंडावस्थेतला होतो. त्याकाळात त्या वयाला अनुरूप असा हा खिडक्यांचा ऐवज मी देखील एंजॉय केला आहे ; पण काहीकाही चित्रे आठवून आता असे वाटते की , विनोद , आंबटशौक आणि ज्याला "सॉफ्ट् पोर्न्" असे म्हणतात त्याच्या सीमारेषा अतिशय धूसर वाटाव्यात असा हा प्रकार इतर दिवाळी अंकांच्या जोडीने अगदी राजरोस बसायचा. दिवाळी अंकाच्या पहिल्या दिवशी या अंकावर उड्या पडायच्या - अर्थातच पुरुषांच्या. या प्रकारात काही विसंगत आहे याची जाणीवही कुणाला असायची नाही. लैन्गिकतेच्या बाबतीत एरवी विलक्षण सोवळेपणा असणार्या समाजात , खिडक्यांच्या आडून स्तनानितंबांच्या लार्जर-दॅन-लाईफ अशा ऑब्जेक्टिफिकेशनबद्दल कधी चर्चा झाली की नाही ?
काल अक्षरचा २००८ दिवाळी अंक हातात घेतला. मुखपृष्ठावर षांताराम पवार यांची , आता परिचित असणार्या शैलीमधली कॅलीग्राफि आहे. त्यातील मजकूर आणि शैली या गोष्टी"अक्षर" च्या प्रकृतीशी एकदम मिळत्याजुळत्या आहेत. जळजळीत वास्तवाबद्दलचे भाष्य करणार्या "अक्षरच्या" ख्यातीशी हे मेळ खाते. कलावादी प्रकृतीशी त्याची फारकत दाखवते.
"मौजे"चा अंक उपरोक्त कलावादी परंपरांशी आपले घट्ट् नाते सांगणारा. वरील चित्र पॉल क्ली चे आहे (की प्रभाकर कोलत्यांचे , क्ली शैलीतले ? पाहून सांगावे लागेल :-) )
लोकसत्ता आणि लोकप्रभा यांची मुखपृष्ठे त्यांच्या परंपरेनुरूप. नट्यांची चित्रे. एकदा पहावे ; मग फारसा विचार न करण्यायोग्य. साप्ताहिक सकाळच्या मुखपृष्ठाबद्दलही तेच.
इतर अंकांच्या मुखपृष्ठांबद्दल थोडे पुढील पोस्ट मधे. जमल्यास काही छायाचित्रेही पोस्ट करेन म्हणतो.
काही छायाचित्र...
इतर अंकांच्या मुखपृष्ठांबद्दल थोडे पुढील पोस्ट मधे. जमल्यास काही छायाचित्रेही पोस्ट करेन म्हणतो.
त्याचबरोबर, अंकातील वाचावे असे, त्याच्याही नोंदी देता आल्या तर आमच्या सारख्या ( आळशी ) वाचकांची सोय होईल म्हणतो :)
+१
असेच म्हणतो
(आळशी)ऋषिकेश
प्रियांका चोप्रा
प्रियांकाचे मुख पृष्ठावर छान दिसत आहे. ;)
आपले दिवाळी अंकवाले या चित्रांबद्दल रॉयल्टी वगैरे देतात का?
भविष्यात काही ऑनलाईन दिवाळी अंकांवर अनुष्का या नटीचे चित्र दिसेल असे आमचे भाकित आहे ;) ;)
आपला
(ज्योतिर्विद) आजानुकर्ण घाटपांडे
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
:)
अनुष्काचे असेल की आणि कोणाचे? जर अनुष्काचे असेल तर तो अंक एकाच प्रकारच्या पण वेगवेगळ्या व्यक्तिरेखा असलेला. तसेच या व्यक्तिरेखा लिहिणारा एकच लेखक पण वेगवेगळी नावे असलेला असेल. :)
हा प्रतिसाद तसा कोठेही कोणाचाही व्यक्तिगत उल्लेख असलेला नाही. तरीही संपादकांना उडवायचा असेल तर माझी हरकत नाही. :)
मौज
मौज दिवाळी अंक म्हणजे साहित्याभिरुचीच्या मंडळींसाठी आनंदाची पर्वणी ठरावी. जीवन, संस्कृती,कला आणि विज्ञानाचा वेध घेणारा दिवाळी अंक.
कविता, लेख, आणि ललित लेखांसाठी हा अंक जरुर वाचला पाहिजे.
मला आवडलेल्या वेगवेगळ्या आशयाच्या कविता या प्रमाणे -
चिमणी ( मंगेश पाडगावकर) , एकलेपण ( हेमकिरण पत्की) , हॉस्पीटलमधील संध्याभिषेक( ग्रेस) , हाक ( पुरुषोत्तम पाटील ), सारंच हरवण्याच्या ह्या दिवसात ( नीरजा) ,
स्वातंत्र्य ( प्रज्ञा दया पवार), आग ( यशवंत मनोहर) , गर्भात झोपलेल्या सुखैनव बाळा ( दासू वैद्य ) आणि इ.इ.
आपल्या मनात काय चाललेले असते त्याबद्दल जर्मन संशोधकांच्या निष्कर्षावरचा एक उत्तम लेख ; जाणीव-नेणीवेचा खेळ. लेखक डॉ. आनंद जोशी, सुबोध जावडेकर
अंकाबद्दल खूप काही सांगण्यासारखे आहे असो, आपली साहित्यभिरुचीची उंची जोखण्यासाठी असे दिवाळी अंक मदत करतात असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
सांगा की
मग सांगा की.. तुमच्या शब्दांत वाचायला आवडेल
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
ऑनलाईन दिवाळी अंक
ऑनलाईन दिवाळी अंकांपैकी मनोगताचा दिवाळी अंक सध्या वाचत आहे.आतापर्यंत अनुराधा कुलकर्णी ह्यांचा 'नेहमी सारखा धडपडता दिवस' हा ललित लेख, नंदन ह्यांचे कॅचर आणि कोसला विवेचन, संपादकीय (शैलीवरुन संजोव रावांचे वाटते), पेठकरांचा पडू आजारी वाटे मौज भारी हे लेखन वाचले. उल्लेखलेले सर्व लेख अतीशय वाचनीय वाटले. कॅचर आणि कोसला दोन्ही वाचलेले असल्याने नंदन ह्यांचा लेख फारच आवडला. दोन्ही कादंबर्यांमधील अनेक बारकावे आणि तपशील अतीशय अभ्यासपूर्ण पद्धतीने टिपलेले आहेत. अनुराधा कुलकर्णी ह्यांचा लेख नेहमीप्रमाणेच खुसखुशीत झाला आहे. पेठकर काकांनी देखिल वातवरण निर्मिती मस्त केली आहे आणि सहज ओघवते लिहिल्याने सलग वाचायला मस्त वाटले.संपादकीय देखिल संयमी मार्मिक उतरले आहे. सजावटीमध्ये मलातरी मनोगताचा आणि उपक्रमाचा दिवाळी अंक मायबोलीपेक्षा सरस वाटला. मनोगतचे (संकेतस्थळ) नवे रुप आणि रंगसंगती फारशी आवडली नसली तरी दिवाळी अंकाचे रुप मात्र आवडले.
ऑनलाईन अंकांबद्दल
ऑनलाईन अंकांबद्दल बरेच लिहीता येइल. चटकन सुचलेला एक विचार : मुक्त बाजारपेठेत व्हरायटी असली तर अंतिम विजय ग्राहकाचा होतो या सूत्राची आठवण होते. सध्या माझ्या माहितीप्रमाणे ५ ऑनलाईन अंक आहेत :
मनोगत
मायबोली
उपक्रम
रेषेवरची अक्षरे
सुरेश भट
पाचही स्थळांची प्रकृती वेगळी. यांच्या एकत्र मिलाफातून एक अतिशय संपृक्त असा ऑनलाईन मराठी वाचनाचा अनुभव आपल्याला मिळतो. "देता किती देशील दोहो कराने" अशी परिस्थिती. एक छोटे उदाहरण घेऊ. उपक्रमावर कसलेही ललित साहित्य नाही आणि रेषेवरची अक्षरे मधे ललित साहित्याखेरीज काहीही नाही ( त्यांनी कष्टपूर्वक , प्रयत्नपूर्वक रीतीने दर्जेदार असला तरी माहितवजा/वैचारिक असा मजकूर गाळला आहे.) दोन्ही एकत्र करा. वाचकराजा झिंदाबाद ! :-)
+१
जालावरच्या आवडत्या इतक्या सार्या मान्यवर लेखक कवींनी इतके भरभरुन लिहिल्याने काय वाचू आणि काय नको असे झाले आहे.
वाचकराजा झिंदाबाद ! :-)
सहमत आहे.
सहमत आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
'जत्रा' दिवाळी अंक
जत्रा दिवाळी अंकात दमदार विनोदी कथा आहेत. पैठणीचा खेळ( खेळ खंडोबा ) मंगला गोडबोले, यांची कथा सुंदर आहे, पैठणीची आवड असलेल्या स्त्रीचे वेड, लग्नसमारंभात, स्वागत समारोहात, पैठणीची भाषा बोलणा-या , मैत्रीणीमधे सतत काठापदराच्याच चर्चा आणि पैठणीचा तिटकारा करणा-या गृहस्थाच्या वेदनेची मजा येते, शेवट वाचून तर हसून हसून पुरेवाट होते.
'मात्रा' ही भा.ल.महाबळ यांची कथाही अशीच सुंदर आहे. सतत दुस-या बायकांचे गूण-गाण करणा-या एका नवरोबाला वठणीवर आनणा-या उमद्या स्त्रीची कोणती ''मात्रा'' लागू होते वाचलेच पाहिजे.
प्रेमाचा सोक्षमोक्ष ( शशिकांत कोनवार ) महागाई विरुद्ध लढा (डॊ. सुभाश भेण्डे) रोम मिनिष्टर ( वसंत जोशी ) याही कथा वाचकांचे उत्तम मनोरंजन करतील.
व्यंगचित्रे चेह-यावर हसू फुलवणारे आहेत. जयवंत काकडे, अजय सावजी याचा त्याबाबतीत उल्लेख केलाच पाहिजे. बाकी खिडक्या ब-या आहेत. एकूण काय 'आवाज'दिवाळी अंकापेक्षा अधिक गूण जत्रा दिवाळी अंकाला टाकेन !!!
-दिलीप बिरुटे