आई
प्रेषक मृदुला (मंगळ, 04/10/2007 - 10:39)
मराठीतील आई शब्दाचे मूळ काय? बहुसंख्य भाषांमध्ये मातेला संबोधणारा शब्द म ने सुरू होतो किंवा संपतो. मराठीत नाही. असे का असावे?
शिवाय माझ्या एका अल्जीरियन मैत्रिणीने सांगितले कि तिच्या कबिल भाषेत (तिच्या बर्बर जमातीची उत्तर आफ्रिकन भाषा) मातेला आई म्हणतात! आणि चीनी मैत्रिणीने सांगितले की त्यांच्याकडे धाकट्या मावशीला एइ म्हणतात. त्यामुळे आपला आई (!) कुठून आला आहे (आणि कुठे कुठे गेला आहे) असे कुतूहल निर्माण झाले आहे.
»
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा

शक्यता
संस्कृतमध्ये अंबा म्हणजे आई, माता. ह्या अंबापासून अम्मा हा शब्द आला असावा. अक्कासारखा आई हा बहुधा दक्षिणेतून असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेचमाई हा शब्द सगळीकडे प्रचलित आहे. प्रसादाचे पसाय झाले तसे माताचे माई होणे अशक्य नाही.
शक्यता २
मला हे कोठे तरी वाचल्यासारखे वाटते पण नक्की आठवत नाही त्यामुळे फार विश्वासार्ह मानू नये. परंतु आई या शब्दाचा उगम द्रविड भाषांतून झाला आहे, तो संस्कृतोद्भव नाही. (उदा. तमिळ) लहान मूल सर्वात प्रथम "म" अक्षर उच्चारते कारण तोंड न उघडता बंद तोंडातून म सहजगत्या बाहेर येतो. त्यामुळेच बहुतांश भाषांत आई शब्दाची सुरुवात म वरून होते.
चू. भू. द्या. घ्या.
तमिळ
मराठी भाषा ही संस्कृतपेक्षा तमिळ भाषेला अधिक जवळची आहे असा पुसटसा उल्लेख "अडगुळं मडगुळं" नावाच्या पुस्तकाबाबत वाचल्याचे स्मरते.
चू.भू.दे.घे.
आसामी
मराठीप्रमाणेच आसामी भाषेत आईसाठी 'आई' हाच शब्द आहे, असे दिसते.
आपल्या 'जय महाराष्ट्र'सारखीच तिथे 'जय आई अहोम' ('जय आई आसाम' अशा अर्थी) अशी एक लोकप्रिय घोषणा आहे, असे ऐकिवात आहे. (अधिक माहिती मिळू शकली नाही.)
जय आई अहोम
"जय आई अहोम!" मधील 'आई' चा अर्थ 'माझा' आहे असे समजते. ('(जय) जय महाराष्ट्र माझा'च्या धर्तीवर?)
~ तो ~
आसामी आई
माझ्या ऐकीव माहितीनुसार 'जय आई अहोम'मधल्या 'आई'चा अर्थ आई असाच आहे. परंतु माझी माहिती ऐकीवच असल्याकारणाने चुकीची असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. अधिक तपास चालू आहे. नक्की माहिती मिळाल्यास कळवीनच.
अवांतर: अनेक वर्षांपूर्वी दूरदर्शनवरून प्रसारित होत असणार्या (बहुधा) फिल्म डिव्हिजनच्या राष्ट्रीय एकात्मतेवरील माहितीपटात, पार्शवभूमीवर भारताचा नकाशा आणि साउंडट्रॅकवर [मराठी? ध्वनिफीत??] भारतातल्या वेगवेगळ्या भागातले लोक त्याला आपापल्या भाषांतून 'आई' असे संबोधतानाचा आवाज आणि त्याबरोबर नकाशावर त्या-त्या भागावर 'आई'साठी त्या-त्या भाषेतील शब्द उमटतानाचे दृश्य पाहिल्याचे आठवते. त्यात आसामीत 'आई' हाच शब्द पाहिल्याचे आणि आसामच्या आजूबाजूच्या कोणत्याही भाषांत असा शब्द नसताना आसामी आणि मराठीत या शब्दात साम्य असल्याबद्दल तेव्हा आश्चर्यही वाटल्याचे अंधुकसे आठवते. चूभूद्याघ्या.
गूगल
गूगलात 'joi aai assam' शोधले असता 'hail mother assam' असा अर्थ सापडला. म्हणजे भारतात आणखी एका राज्यात आई आहे! अश्या दूरदूरच्या ठिकाणी असे मूलभूत शब्द कसे एकसारखे? दोन्ही एकाच मुळापासून आले असावेत काय? (मग कबिल आईचे काय?)
मराठी
आई शब्दाचे मूळ संस्कृत "अयि" शब्दात. हा शब्द अगं ह्या अर्थी संस्कृत भाषेत वापरला जातो आणि आईचे नाते अगं-तुगं करण्याच्या पातळीचे असते. हिंदीसारखे बहुमानार्थी नसते.