प्राण्याविषयीची सुभाषिते...

आमच्याच शाळेतील हिंदी विषयाचे शिक्षक मिश्राजी यांच्याशी एकदा मी डुक्कर ह्या प्राण्याविषयी बोलत होतो. तेव्हा त्यांनी सांगितले की सुव्वर हा शब्द मूळ संस्कृत शब्द सूकर ह्यावरून आला आहे. त्यापाठोपाठ त्यांनी एक श्लोक व त्यापाठची कथा सारांश रुपाने सांगितली. ती इथे देत आहे.

सिंह व डुक्कर

एक डुक्कर असते त्याला जिथे तिथे नाक खुपसायची सवय असते. डुकराच्या नादी का लागा असे सुज्ञ लोक विचार करून त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे डुकराला स्वत:च्या शक्तीबद्दल भलताच गैरसमज झालेला असतो. त्यानंतर तो सिंहाला त्रास द्यायला सुरुवात करतो. १-२ वेळा सिंह डुकराकडे लक्ष देत नाही. पण एकदाच जोराची गर्जना करतो.

हे आव्हान डुकराला अजिबात पेलवत नाही. तो युक्ती काढतो आणि सांडपाण्यात जाऊन उभा राहतो. त्याला ठाऊक असते की मांजरवर्गातील प्राण्यांना चिखलात, सांडपाण्यात जायला मुळीच आवडत नाही. ते पाहून सिंह मागे फिरतो. सिंह मागे पडलेला पाहताच डुक्कर मी जिंकलो, मी जिंकलो असे ओरडायला लागतो.

त्यावर सिंह म्हणतो -

भद्र सूकर, गच्छ त्वं ब्रूहि सिंहो मया जित: ।
पण्डिता एव जानन्ति सिंहसूकरयोर्बलम् ।।

मित्रा डुकरा, जा, (जगाला ओरडून) सांग की सिंह माझ्याकडून जिंकला गेला आहे. मात्र पंडित असतात ते सिंह व डुक्कर ह्या दोघांचेही बळ जाणतात.

किंबहुना म्हणूनच सिंह एकटा फिरतो आणि डुकरं कळपानं फिरतात.

तसा मी खाली जाऊन कोणाच्याही वैयक्तिक पातळीवर टीका करीत नाही. हे सहज लिहिले हे मी गीतेची शपथ घेऊन सांगत आहे. त्यामुळे गैरसमज नसावा. त्यातूनही कोणी दुखावले जाणार असेल तर मी आधीच माफी मागतो. असो.

आपल्याला जर प्राण्यांविषयी अशी सुभाषिते माहित असतील तर शक्यतो ती अर्थाविना इथे नक्की द्यावीत. एक मञ्जुषा म्हणून त्यांचे अर्थ शोधायचा आपण सगळे करू.

लेखनविषय: दुवे:

Comments

हाहाहाहा

मित्रा डुकरा, जा, (जगाला ओरडून) सांग की सिंह माझ्याकडून जिंकला गेला आहे. मात्र पंडित असतात ते सिंह व डुक्कर ह्या दोघांचेही बळ जाणतात.

सुभाषित फार आवडले.

आपला,
(बोधकथाप्रेमी) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पूर्वरंगातील पाठभेद्

याच सुभाषिताचा पाठभेद पूर्वरंगमध्ये पुलंनी वापरला आहे - गच्छ सूकर भद्रं ते असा.
(संदर्भ - मलेशियात यजमानाशी भारतावरून झालेले मतभेद आणि उकडीचे मोदक :). विषयांतराबद्दल क्षमस्व.)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

पञ्चतन्त्र

पञ्चतन्त्रामध्ये वाचलेले हे सुभाषित आठवत आहे.

न हि तद्विद्यते किंचिद्यदर्थेन न सिद्ध्यति ।

यत्‍नेन मतिमांस्तस्मादर्थमेकं प्रसाधयेत ॥

हे सुभाषित फारच व्यवहारज्ञान देणारे आहे असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

यापुढील सुभाषित

यस्यार्थास्तस्य मित्राणि यस्यार्थास्तस्य बान्धवा:|
यस्यार्था: स पुम्माल्लोके यस्यार्था: स च पण्डित: ||

हे देखील व्यावहारिक आहे. पण यात प्राणी कोणते बरे!! मनुष्य हाच सर्वात मोठा प्राणी असावा. ;-) ज्याच्याकडे पैसा असतो तोच पंडित गणला जातो हे अंतिम सत्य.

आता मूळ लेखाबाबत -

सिंह देखील डुकराप्रमाणे कळपानेच राहतात. शक्ती अधिक असल्याने एकेकट्याने शिकार करणे सिंहाला शक्य असते. प्रत्यक्षात सिंह हा शिकारीसाठी जागेवरून सहसा उठतही नाही. ते काम सिंहिणीचे. या उदाहरणात डुकराने सांडपाण्यात उभे राहून युक्ती केली आहे ती तशी प्रशंसनीयही आहे, सांडपाण्यापेक्षा जीव महत्त्वाचा. आता, सांडपाण्याचे जनक कोण हे शोधणे वेगळी गोष्ट. प्रत्येक प्राण्यात गुण दोष असतात. कधीतरी सिंह डुकराचे आणि डुक्कर सिंहाचे कातडे पांघरणे सहज शक्य आहे. वनात एकमेकांसमवेत राहणे सयुक्तिक आहे की मी सिंह तू डुक्कर अशी विभागणी करत गटबाजी करण्यात हे प्रत्येक प्राण्याने ठरवणे महत्त्वाचे आहे. आपल्याला एखादी गोष्ट पसंत नसेल तर त्याकडे एक-दोनदा गर्जना करून झाल्यावर दुर्लक्ष करणे उत्तम. दुर्लक्ष करायचे नसल्यास समोरासमोर शिकार करावी आणि प्रश्नाची वासलात लावावी. नुसत्या गर्जना करणार्‍या सिंहाला एके दिवशी ससेही घाबरेनासे होतील.

असो.

ऋजु, संस्कृत पाठ्यावरील आपल्या लेखांची प्रतिक्षा आहे. ते तालिकास्वरुपातील तक्ते केवळ प्रतिसादांत न घालता वेगळ्या लेखानिशी मांडावेत. अनेकांना त्याचा उपयोग होईल.

बदलता काळ

बदलत्या काळा सोबत संदर्भ बदलत जातात. जसे ससा कासवाची नवी व्यवस्थापनाचे धडे देणारी गोष्ट असते. दोन्ही बाजू समजून घेणे कधीही चांगलेच. डुकराने युक्ति केली ठिक आहे. पण सिंहाला/सिहिंणीला डुक्कर हे एकमेव शिकार नाही कोणत्याही वनात. तसेच आपण वृती बद्दल सुद्धा विचार करु शकतो. डुकराला सांडपाणी स्वर्ग असेल तर सिंहाला वर्ज्य. यामुळे डुकराची युक्ति कदाचित त्या काळा पुरती श्रेष्ठ असेल सुद्धा पण वृत्ती हि डुकराचीच राहते. तसेच आपण म्हणता त्या प्रमाणे दोन्ही प्राणी कळपाने राहात असतील पण डुकरांचा कळप आणि सिहांचा कळप हि तुलना पटत नाही. माझ्या माहिती प्रमाणे सिंह/सिंहिण भुकेच्या गरजेसाठीच शिकार करतात. उगाच त्रास नको म्हणून नाही. सिंहाला डुकराची शिकार अवघड नसावी. कदाचित डुकराचे नशीब जास्त चांगले असावे की सिंह भुकेने चवताळलेला नसावा. आणि सिंह- डुक्कर अशी विभाणी करुन गटबाजी होते हे ही पटत नाही. गटबाजी हा प्रत्येक प्राण्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे. अनेकदा गट बनवणे आपण असुरक्षित आहोत या भावनेने सुरु होते. मग गट डुक्करांचा असो, की सिहांचा, की माकडांचा कि हत्तींचा. वनात एकमेकांसमवेत राहणे सयुक्तिक आहे की नाही हा मुद्दा सुद्धा थोडा चर्चेचा आहे. वनाचा समतोल असण्यासाठी सगळेच प्राणी असणे गरजेचे आहे. वनाचे चक्र असते हे आपल्याला माहित आहेच. वनाचे चक्र बिघडले की निसर्गाचे चक्र बिघडले आहे असे म्हणतात. अथावा उलटे. असो. हे आपले तात्विक मुद्दे. बाकी असा उपक्रम सुरु राहावा असे वाटते.

माझ्याकडून ही एक

जेव्हा मी काल दुपारी मागील लेखातील काही प्रतिसाद पहात होते तेव्हा एक सुभाषित राहून राहून मनात येत होते. योगायोगाने ते पण प्राण्यावरच होते. आपल्या सांगण्यानुसार अर्थाविनाच ते इथे देत आहे.

भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

सुज्ञांना अधिक अर्थ सांगणे न लगे.

_______________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।

तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

प्रियालीजी,

मनुष्य हाच सर्वात मोठा प्राणी असावा.

सर्व प्रथम उशीरा प्रतिसाद देत असल्याबाबत मी आपली जाहिर माफी मागतो. खरे तर खरडवहीतून हा संदेश दिला पाहिजे पण आपण माझे संदेश तिथे वाचतच नाही. माझ्यावर माया पातळ केली का?

आता तुमच्या उत्तराकडे जाऊ. तुमच्या इतकी माझी ज्ञानक्षमता नाही. पण म्हणून माझ्या बोलण्याचा राग धरू नये.

माझे म्हणणे इतकेच की माणूस हा प्राण्यांपेक्षासुद्धा हीन आहे असे काही सुभाषिते म्हणतात. कारण प्राणी गरजेपुरते अन्न खातात आणि माणसाची भूक मात्र अपरंपार आहे, वाघ पोट भरले असले तर समोरून हरिण गेले तरी त्याच्याकडे पहात नाही मात्र माणूस विनाकारण इतरांना त्रास देतो. म्हणून माझी विनंती की प्राणी ह्या शब्दाचा अर्थ पशु, जनावर ह्या अर्थी घ्यावा. नाहीतर माणसावरच इतकी सुभाषिते असतील की पूर्ण उपक्रम भरून जाईल.

या उदाहरणात डुकराने सांडपाण्यात उभे राहून युक्ती केली आहे ती तशी प्रशंसनीयही आहे, सांडपाण्यापेक्षा जीव महत्त्वाचा.

ही युक्ती म्हणण्यापेक्षा खरेतर डुकराचा सहजस्वभाव आहे. सिंह पाठी लागला नसतानासुद्धा डुकरे सांडपाणीच जवळ करतात. मिश्राजींनी कथेत युक्ती शब्द वापरला म्हणून मी सुद्धा वापरला.

आता, सांडपाण्याचे जनक कोण हे शोधणे वेगळी गोष्ट.

जनक शोधायची गरजच काय? ह्या कथेत तो उल्लेख अप्रस्तुत ठरेल. उगाच कथेला लांबण लागेल.

प्रत्येक प्राण्यात गुण दोष असतात. कधीतरी सिंह डुकराचे आणि डुक्कर सिंहाचे कातडे पांघरणे सहज शक्य आहे.

मी पूर्ण पंचतंत्र वाचले पण पशु आपले गुण सोडून इतरांचे गुण घेतात असे कुठेही आढळले नाही. प्रत्येक जण स्व-भावाशी प्रामाणिक असतो.

वनात एकमेकांसमवेत राहणे सयुक्तिक आहे की मी सिंह तू डुक्कर अशी विभागणी करत गटबाजी करण्यात हे प्रत्येक प्राण्याने ठरवणे महत्त्वाचे आहे. आपल्याला एखादी गोष्ट पसंत नसेल तर त्याकडे एक-दोनदा गर्जना करून झाल्यावर दुर्लक्ष करणे उत्तम. दुर्लक्ष करायचे नसल्यास समोरासमोर शिकार करावी आणि प्रश्नाची वासलात लावावी. नुसत्या गर्जना करणार्‍या सिंहाला एके दिवशी ससेही घाबरेनासे होतील.

अहो, ही बोधकथा आहे. इतर वेळी सिंह जर डुकराच्या पाठी लागला तर डुक्कराची काय बिशाद मी जिंकलो ओरडायची. जीव खाऊन तो पळतच सुटेल, सिंह कुठे आहे हे पाठी वळून पाहणार सुद्धा नाही. डिस्कव्हरीवर २-३ कार्यक्रम मी नेहेमी पाहतो. त्यात सिंह पाठी लागला तर हत्ती पण जीव खाऊन पळतात. डुकराचे काय घेऊन बसलात.

असो. ऋजु, संस्कृत पाठ्यावरील आपल्या लेखांची प्रतिक्षा आहे. ते तालिकास्वरुपातील तक्ते केवळ प्रतिसादांत न घालता वेगळ्या लेखानिशी मांडावेत. अनेकांना त्याचा उपयोग होईल.

जो हुकुम मेरे आका । आपका हुक्म सिर आंखों पर । (गेले काही वर्षात हिंदी पट्ट्यात राहिल्याचा परिणाम)

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

आपले सुभाषित बहुदा

म्हणते -

अर्थाने सिद्ध होत नाही अशी कुठलीही गोष्ट नाही. प्रयत्नाने धीमान् त्यातून एखादा तरी अर्थ काढतोच.

तद्विद्यते = तद् + विद्यते (विद् - ४ आ.प. वर्त. तृ.पु.ए.व.)
किंचिद्यदर्थेन =किञ्चित् + यद् + अर्थेन (अर्थ - अकारान्त पु. तृ. ए.व.)
सिद्ध्यति =धनंजयदादा, हा सिध् ४ प.प. वर्त. तृ.पु. ए.व. आहे का? तसे असेल तर तो सिध्यति होईल.
यत्‍नेन = (यत्न - अकारान्त पु. तृ. ए.व.) मूळ धातु यत् १ आ.प.
मतिमांस्तस्मादर्थमेकं =मतिमान् + तस्मात् + अर्थम् + एकम्
प्रसाधयेत =प्र + साध् ५ प.प. मात्र रुप कुठले ते लक्षात येत नाहीये. बहुदा १० आ.प. विध्यर्थ तृ.पु.ए.व.
________________________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।

तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

नाही!

पैशाने साध्य होणारे जगात असे काहीही नाही. म्हणून बुद्धिवंताने प्रयत्‍न करून फक्त पैसाच मिळवण्याचा प्रयत्न करावा.
असा अर्थ असावा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सिद्ध्यति/सिध्यति

ही वैकल्पिक रूपे आहेत.
(पाणिनीचे सूत्र ८.४.४७ - अनचि च ।)
मी स्वतः दुहेरी उच्चारच करतो असे माझ्या लक्षात आले आहे - म्हणजे "सिद्ध्यति" असा. संस्कृतात उच्चारानुसारी लेखन करण्याची प्रथा असल्यामुळे बहुधा मी "सिद्ध्यति" असेच लिहितो. पण "सिध्यति" हे वैकल्पिक रूपही लिहिणे तितकेच योग्य. तुमच्या सोयीनुसार लिहावे.

- - - अवांतर पाल्हाळ- - -
यामुळे मागे माझी एकदा उपक्रमावरच गडबड झाली होती. संस्कृतात उच्चारानुसारी "अस्तित्व/अस्तित्त्व" अशी दोन्ही रूपे बोलता आणि लिहिता येतात. मराठीत मात्र उच्चारताना कित्येक लोक "अस्तित्त्व" असा उच्चार करतात, पण "अस्तित्व" असे एकच रूप लिहिण्यास योग्य मानले जाते. मराठीतली ही प्रथाही तशी सोयीचीच आहे. उच्चारानुसारी लिहायची लेखकाची सोय, की प्रत्येक शब्दाचे एकच रूप वाचायची वाचकाची सोय, कुठली सोय जास्त महत्त्वाची? याचे उत्तर प्रत्येक भाषेच्या परंपरेतून येते. त्यामुळे मराठी प्रथा मराठी वाचन-लेखनासाठी ठीक आहे, संस्कृत प्रथा संस्कृत वाचन-लेखनासाठी.

मराठीत शक्यतोवर "अस्तित्व" असे लिहावे - त्यामुळे अस्तित्व/अस्तित्त्व/अस्स्तित्व/अस्स्तित्त्व हे चार वेगवेगळे (पण योग्य) उच्चार वेगवेगळे शब्द म्हणून वाचण्याचा घोटाळा टळतो. पण आपल्या उच्चारावेगळे कुठले रूप "ऑफिशियल" आहे, हे मुद्दामून लक्षात ठेवण्याचा त्रास लेखकाला सहन करावा लागतो. संस्कृतात सिध्यति/सिद्ध्यति असे स्वतःच्या उच्चारानुसारी लिहावे - त्यामुळे उच्चारावेगळे लेखन कुठले अशी घोकंपट्टी लेखकाला करावी लागत नाही. पण व्यक्तिसापेक्ष कोणी "सिध्यति" लिहील, कोणी "सिद्ध्यति" लिहील, वाचताना वाचकाला ही गैरसोय सहन करावी लागते.

अस्मादिकच!

>>यामुळे मागे माझी एकदा उपक्रमावरच गडबड झाली होती. संस्कृतात उच्चारानुसारी "अस्तित्व/अस्तित्त्व" अशी दोन्ही रूपे बोलता आणि लिहिता येतात. << ह्या गडबडीला बहुधा अस्मादिकच कारणीभूत झाले असावेत. श्री. धनंजयांच्या 'अस्तित्‍त्वा'ने मला धक्काच बसला होता. तत्पूर्वी आर्य्य, कर्त्‍ता, मद्‌ध्वाचार्य असले शब्द फक्त हिंदीभाषक पंडितांनाच लिहायला परवानगी आहे अशी माझी कल्पना होती. मराठीतले संस्कृत लेखक असे द्वित्त असलेले संस्कृत शब्द वापरताना कधीच आढळत नाहीत. (हे लेखक मराठी बोलताना मात्र द्वित्त करतात. आत्ता, बत्तासा, कध्धी, पप्पी वगैरे.)
एक शंका: पाणिनीच्या अचो रहाभ्यां द्वे, अनचि च, आणि दीर्घादाचार्याणाम्‌(८.४.४६, ४७ आणि ५२) या सूत्रांत असे द्वित्त करणे ऐच्छिक आहे असे नेमके कोणत्या शब्दांत म्हटले आहे?--वाचक्‍नवी

प्रसाधयेत्

प्रसाधयेत =प्र + साध् ५ प.प. मात्र रुप कुठले ते लक्षात येत नाहीये. बहुदा १० आ.प. विध्यर्थ तृ.पु.ए.व.

जसे लिहिले तसे १० आ.प. विध्यर्थ तृ.पु.ए.व.आहे
पण येथे वृत्त पाळण्यासाठी "प्रसाधयेत्" असे हवे. म्हणजे १० प.प. विध्यर्थ तृ.पु.ए.व.

हे धातूचे प्रयोजक रूप आहे. ही भाषा बोली भाषा होती तेव्हा अर्थानुसार ही रूपे परस्मैपदी किंवा अत्मनेपदी वापरली जात असत. अर्थाप्रमाणे येथे अत्मनेपदी रूप यावे. पण येथे परस्मैपदी रूप आहे. संस्कृत जशी पाठशाळेत(च) शिकलेली भाषा झाली, तसे सूक्ष्म अर्थभेद हे शब्दरूपांच्या कक्षेच्या बाहेर गेलेत.

बोलीभाषा होती, तेव्हा तिचे नाव "संस्कृत" नव्हते. तिला "भाषा" म्हणत. बोलली जाते ती "भाषा" (याला आपण आजकाल संस्कृत म्हणतो), गायला जातो तो "छन्द" (यला आपण आजकाल वैदिक भाषा म्हणतो). पतंजली म्हणतात, की व्याकरण मुळीच न शिकता योग्य रीतीने भाषा बोलता येते. (वेद मात्र योग्य पाठांतराने शिकावे लागतात.) त्यामुळे त्या काळात फक्त ऐकूनही शिकण्यासारखी ही भाषा होती (म्हणजे आजकालच्या आपल्या मराठीसारखी - खास करून व्याकरण शिकण्याची मुळीच गरज नसते). पाणिनींच्या भाषावर्णनात उच्चारांच्या वर्णनाला खूप महत्त्व आहे, आणि बारीकसारीक स्थानिक फरक वर्णन करून दिलेले आहेत. शिवाय अनेक नियम आपण दिले असले तरीही प्रमाण "लोक आहेत", असे पाणिनी सांगतात. असे फक्त प्रचलित भाषेबद्दल म्हणता येते.

पुढे बोलली जाणारी भाषा बदलली तेव्हा "नैसर्गिक"="प्रकृतीने येणार्‍या" भाषांना "प्राकृत" म्हणत, संस्कारित (शिक्षणातून कळणार्‍या) भाषेला "संस्कृत" म्हणत. आजकाल "प्राकृत" शब्दाचा शब्दार्थही कालबाह्य झाला आहे. विशिष्ट काळात बोलल्या जाणार्‍या भारतीय भाषांना "प्राकृत" म्हणतात - त्याही आता "नैसर्गिक" राहिलेल्या नाहीत.

आत्मने/परस्मै-पद

(हा सर्व अति-अवांतर प्रकार आहे. यापेक्षा अधिक उपप्रतिसाद येणार असतील, तर आपण वेगळी चर्चा सुरू करूया. - सध्या तरी माझी स्वतंत्र लेख लिहायची इच्छा नाही.)

तुम्ही वर दिलेले अर्थाचे स्पष्टीकरण बरोबरच आहे. ढोबळ मानाने तरी.

तर धातूने वर्णिलेल्या क्रियेचे फल कोणाला मिळते, कर्त्याला की इतरांना, अर्थात कर्ता ती क्रिया स्वतःच्या लाभासाठी (आत्मने) करतो की इतरांच्या (परस्मै), यावर कोणते रूप वापरायचे ते ठरत असे.

पण आपल्याला जिथवर सांगता येते, तिथवर काही धातू परस्मैपदातच वापरतात, काही धातू आत्मनेपदातच वापरले जातात - फळ कोणाला का मिळेना.

त्यामुळे "स्वतःच्या की इतरांच्या लाभासाठी" हा अर्थाने फरक करून फक्त उभयपदी धातूंचेच रूप बदलते.

बाकी तुम्ही "सत्याच्या विजयाने दुसर्‍या कोणाचा फायदा होणार नाही" अशा प्रकारे खोलात या शब्दरूपाचा विचार करू नये. व्याकरणातील "कुठले रूप निवडावे" प्रश्नाचा शक्यतोवर थेटच विचार करावा. सामान्यपणे दिलेले उदाहरण असे (यज् धातू उभयपदी आहे) :
देवदत्तः यजते । देवदत्तो यजमान:, ऋत्विग् यज्ञदत्तः, यज्ञदत्तो यजति
देवदत्त यजमान असेल आणि यज्ञदत्त त्याच्या फायद्यासाठी यजन करतो = "यजति", देवदत्त स्वतःच्या फायद्यासाठी यजन करतो = "यजते".

आत्मनेपदाचे आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे कर्मणि प्रयोग, आणि कर्मकर्तृप्रक्रिया. तिथे कोणाचा फायदा होतो, हा विचार केलाच जात नाही.
कर्तरि/कर्मणि उदाहरण:
कर्तरि :
यजमानः याजकाय दानं ददाति
(यजमानाचा फायदा नाही. या प्रसंगात दान=भीक हा बोलणार्‍याचा मथितार्थ अधोरेखित होतो.)
यजमानः याजकाय दानं दत्ते
(यजमानाचा फायदा आहे. या प्रसंगात दान=पुण्यकर्म हा बोलणार्‍याचा मथितार्थ अधोरेखित होतो.)
कर्मणि :
यजमानेन याजकाय दानं दीयते
आता दान दिले जाते आहे ते यजमानाच्या फायद्यासाठी, की याजकाच्या फायद्यासाठी - आत्मनेपदच वापरले जाणार.

कर्मकर्तृप्रक्रिया :
भिद्यते काष्ठं स्वयमेव ।
लाकूड आपोआप मोडते. (कोणाचा फायदा हा विचार येत नाही - नेहमीच आत्मनेपद)

- - - -
"सत्यमेव जयते" हे वचन या विवेचनात चांगले उदाहरण नाही.

जि-धातू फायदा कोणाचाही असला तरी नित्य परस्मैपदी वापरला जातो. "सत्यमेव जयते" हा आर्ष प्रयोग मानावा. "जयते" असा प्रयोग अन्यत्र कुठे दिसून येत नाही. बहुतेक प्रसंगांत जिंकणारा स्वत:च्या फायद्यासाठीच जिंकत असतो. तरी सर्वत्र "जयति" असाच प्रयोग दिसून येतो (हा अपवाद सोडून). शंकराचार्यांनीही त्या वाक्याच्या संदर्भात "जयते - जयति इत्यर्थः" असा थोडक्यात अर्थ दिला आहे.

- - -
"गीर्वाण" म्हणजे "देव". संस्कृत भाषेला "देव"भाषा म्हणायची प्रथा केव्हा उद्भवली हे माहीत नाही. जुन्या ग्रंथांत असा उल्लेख दिसत नाही.

अगदी खरे !

>>व्याकरण मुळीच न शिकता योग्य रीतीने भाषा बोलता येते. त्यामुळे त्या काळात फक्त ऐकूनही शिकण्यासारखी ही भाषा होती (म्हणजे आजकालच्या आपल्या मराठीसारखी - खास करून व्याकरण शिकण्याची मुळीच गरज नसते). << इंग्रजीतले स्पेलिंग पाठ न करता जसे इंग्रजी बरोब्बर लिहिता येते, तसेच शब्द-धातुरूपे पाठ न करता संस्कृत येते. मला संस्कृतची जी थोडीफार जाण आहे तिच्यात पाठान्तराला अजिबात स्थान नाही. इंग्रजीतल्या पिक्चर या शब्दाचे स्पेलिंग मी दिवसभर पाठ करीत होतो. त्यानंतर वडिलांनी सांगितले की अशी स्पेलिंगे पाठ करायची फारशी गरज नसते; छापलेल्या शब्दाकडे एकदोन वेळा पाहिले की स्पेलिंग आपोआप डोक्यात फिट्ट बसते. या 'पिक्चर'नंतर पुढील आयुष्यात एकाही इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग मला घोकावे लागले नाही ! --वाचक्‍नवी

पाली सुभाषित

धम्मपदातले हे वचन हल्लीच आठवले होते :

दन्तं नयन्ति समितिं दन्तं राजाऽभिरूहति ।
दन्तो सेट्ठो मनुस्सेसु योऽतिवाक्यं तितिक्खति ॥ ३२१ (नागवग्ग)

पाली मला फारसे येत नसल्यामुळे अर्थ येथेच दिला आहे. :
(युद्धात संयमी न्यावा, राजास गज संयमी ।
संयमी मानव श्रेष्ठ, दुर्लक्षे अपशब्द जो ॥)
(मूळ अर्थ : दन्त=दमन केलेला (प्राण्याबाबत पाळीव, मनुष्याबाबत इंद्रिय-मन-दमन केलेला संयमी व्यक्ती); "संयमी" शब्द वृत्त राखण्यासाठी घाईत निवडला आहे.)

सुभाषित म्हणून मला आवडते, पण मधूनच विचार येतो, जो हत्ती दमन करवू देत नाही, त्याला राजाच्या शोभायात्रेत नेत नाहीत, पण तसेच युद्धात मरायलाही नेत नाहीत... हत्तीने थोडे स्वातंत्र्य राखलेलेच बरे. इतकेच काय, "शुकान्योक्ती"मध्ये कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी पाळीव पोपटाची याच कारणासाठी टिंगल केली आहे.

प्राण्यांचे दृष्टांत जेव्हा माणसाचे वागणे बदलण्यासाठी दिले जातात, तेव्हा ते बहुधा स्पष्ट नसतात. उलट-सुलट दोन्ही बाजूंनी तर्क जाऊ शकतात. (प्रियाली यांनी वर डुकराच्या सुभाषिताचा तर्क उलटवून दाखवलाच आहे.)

अशा सुभाषितांना फक्त "कलेसाठी कला" (किंवा "सुंदर चमत्कृती") याच निकषावर पारखावे, अर्थपूर्णतेच्या निकषावर नव्हे, असे मला वाटते.

वा... चांगला उपक्रम

आपल्याला जर प्राण्यांविषयी अशी सुभाषिते माहित असतील तर शक्यतो ती अर्थाविना इथे नक्की द्यावीत. एक मञ्जुषा म्हणून त्यांचे अर्थ शोधायचा आपण सगळे करू.

हा एक चांगला उपक्रम होईल येथे. छायाचित्र टिका प्रमाणे असाच सुभाषितांवर एखादा उपक्रम करता येईल. बाकी सुभाषित आणि अर्थ खुप आवडले. :)

+१

हेच म्हणतो.

आपल्या सर्वांचा कृपाभिलाषी,
ऋजु

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

सुविचार

येथे अनेक सुविचार सुवाच्य हस्ताक्षरात वाचायला मिळतील.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चित्र का दिसत नाही?

काही तांत्रिक बिघाडामुळे का?

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

ही थोडिशी

शरद
प्राण्यांविषयी सुभाषिते
संस्कृतमधील प्राण्यांविषयीची सुभाषिते ही बहुदा अन्योक्ती किंवा स्वभावोक्ती यांची उदाहरणे म्हणूनच येतात. त्यामुळे ती कोषामध्ये निरनिराळ्या विभागात दिलेली असतात. गेला बाजार ५०-६० तर मीही देऊ शकेन. पण खरेच इतकी द्यावित का ? मी सुरवात म्हणून आज ५ लिहित आहे. श्री.ऋजू किंवा चाणक्य यांनी कंटाळा आला की अवश्य कळवावे. नाहीतर उपक्रम ही संस्कृत पत्रिकाच होऊन जाईल. सुभाषित रत्न भांडागारम, वरदा प्रकाशने प्रकाशित केलेले [१००,२००,..३०० सुभाषिते असे ६ भाग], श्री. ल.गो.विंझे याचा संस्कृत-मराठी सुभाषित कोश असे अनेक कोश आज सहज उपलब्ध आहेत. असो.

[१]मार्जारो लभते न पन्जरशुकालापेन कौतूहलम्
कस्तूरीहरिणस्य सौरभतया व्याघ्रो न संतुष्यति
प्रीतिर्नास्ति मयूरतांडवविधौ व्याधस्य, दुष्टात्मभि-
र्व्याप् तायां भुवि सन्ति केsपि विरला ; सन्तो गुणग्राहका: !!

[२] तक्षकस्य विषं दन्ते मक्षिकाया विषं शिर:
वृश्चिकस्य विषं पुच्छम् सर्वांगं दुजनो विषम् !!

[३] शुन; पुच्छमिव व्यर्थं जीवितं विद्ययाविना
न गुह्यगोपने शक्तं न च दंशनिवारणॆ !!

[४] स्वल्पं स्नायुवसावशेषमलिनं निर्मांसमप्यस्थि गो:
श्वा लब्ध्वा परितोषमेति, न तु तत्तस्य क्षुधाशान्तये
सिंहो जम्बुकमङ्कमागतमपि त्यक्त्वा निहन्ति द्विपं
सर्व: कृच्छ्गतोsपि वाञ्छति जन; सत्त्वानुरुपं फ़लम् !!

[५] सिंह: शिशुरपि निपतति मदमलिनकपोलभित्तिषु गजेषु
प्रकृतिरियं सत्त्ववतां , न खलु वयस्तेजसो हेतु: !!
शरद

अर्थ

देववाणीतील् सुभाषितांचा अर्थ मायमराठीतूनही द्यावा ही विनंती.

अवांतरः शाळेत संस्कृत शिकवणार्‍या शिक्षिकेच्या शिकवणीला न गेल्याने कधीही त्यांनी ६० च्या वर गुण दिले नाहीत. (८, ९, १० वी तीनही वर्षी). त्यामुळे या विषयाबद्दल थोडी अनास्थाच झाली. संस्कृत थोडंफार समजलं तरी पूर्ण अवगत नाही झालं.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

असेच

देववाणीतील् सुभाषितांचा अर्थ मायमराठीतूनही द्यावा ही विनंती.

असेच म्हणतो.

अवांतर : (धार्मिक नसूनही) संस्कृत मंत्रोच्चार ऐकायला छान वाटते. एक उदाहरण इथे.

----

सहमत आहे

उपक्रम हे मराठी संकेतस्थळ आहे याची आठवण सर्वांना असावी. या सुभाषितांचा अर्थ मराठीतून येणार असेल तर हे लेख इथे असणे सयुक्तिक वाटते. इथे संस्कृताचे जाणकार जितके आहेत त्यापेक्षा संस्कृत न जाणणारे अधिक असावेत असेही वाटते.

रोख

आपल्या प्रतिसादाचा रोख कळला नाही. उपक्रम हे कन्नड/उर्दू/इतर अमराठी सुद्धा नाही. सदर लेख हा मराठीमध्येच दिसतो आहे. माझे निरिक्षण चुक असल्यास माफ करा. सुभाषितांचे मराठीमध्ये अर्थ द्यावेत ही मागणी रास्त आहे. माझी अवस्था सुद्धा अभिजीत प्रमाणेच आहे. पण एकदम आठवण वगैरे? उपक्रमाचा इतिहास पाहता येथे असे उपक्रम झालेले आहेत. उपक्रमावरचे २ सन्माननीय सदस्य या उपक्रमांचे जनक होते. त्यावेळी अशी कोणी आठवण करुन दिलेली स्मरत नाही. आठवण करुन देण्यासारखे अनेक दाखले शोधून सापडतील. पण त्याने विषयांतर होईल. मला वाटत माहितीची देवाण घेवाण हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे आणि संस्कृतच्या जाणकारांना सुभाषितांचे अर्थ मराठीमध्ये देण्यास विनंती केल्यास ते नक्कीच देतील. त्यासाठी विनंती गरजेची आहे आणि ती येथे सदस्यांनी केलेली आहे.
मला वाटते सुभाषितांचा उपक्रम असा असावा:

संस्कृत सुभाषितः
मराठीमध्ये अर्थ:
अधिक माहिती:

संस्कृत सुभाषिते नक्कीच फार जुनी असणार आहेत. त्यातली काही आजच्या काळात हास्यास्पद वाटतील. म्हणून त्याचा अर्थ इतरांना कळू नये असे कुठे आहे? माहितीच्या देवाण घेवाणीला भाषेची कुंपणे घालु नयेत असे वाटते. जाता जाता, येथे संस्कृतचे काणकार नक्कीच कमी आहेत. पण जेवढे सदस्य आहेत त्यांना अर्थ नाही कळला तरी वाचता नक्कीच येईल. देवनागरी लिपीचा महिमा म्हणा हवंतर. तेच इतर भारतीय भाषांना लागू होईलच असे नाही.

रोख स्पष्ट आहे

सदर लेखात सुभाषिते अर्थाविना द्यावी असे म्हटले आहे आणि अनेक प्रतिसादींनी तसे केले आहे पण अर्थाविना जर दिली तर ती इतरांना समजणार कशी? तेव्हा उपक्रम हे मराठी संकेतस्थळ आहे याची आठवण करून देण्यात मला गैर वाटत नाही. मूळ लेखक जेव्हा अर्थाविना सुभाषिते द्या सांगतो त्यावेळी त्याचे अर्थ देण्याचीही तसदी त्याने घ्यावी नाहीतर शरद यांनी म्हटल्याप्रमाणे शे पाचशे प्राण्यांवरील सुभाषिते येथे येतील.

सदर लेखकाला वारंवार विनंती केली आहे की त्यांनी संस्कृताचे पाठ येथे द्यावेत. ते देण्याची इच्छा त्यांचीच पण ते न देता अर्थाविना सुभाषिते लिहा असे ते केवळ म्हणत असतील तर आठवण करून देणे मला योग्य वाटते.

आठवण करून देण्यात काहीही गैर नाही. ती तंबी नाही. एखाद्याला एखाद्या गोष्टीचा विसर तर नाही ना पडलेला हे दाखवून देण्याचा तो प्रयत्न आहे.

येथे संस्कृतचे काणकार नक्कीच कमी आहेत. पण जेवढे सदस्य आहेत त्यांना अर्थ नाही कळला तरी वाचता नक्कीच येईल. देवनागरी लिपीचा महिमा म्हणा हवंतर. तेच इतर भारतीय भाषांना लागू होईलच असे नाही.

अनेकांना इतर लिपीही वाचता येतात. वाचता येणे म्हणजे अर्थ कळणे नाही. अनेक युरोपीय भाषा या रोमन फाँटमध्ये असतात. म्हणजे लोकांना अर्थाशिवाय स्पॅनिश, इटालियन कळेल असे नाही. सुभाषित घातले तर अर्थ द्यावा. लेखकाच्या मागणीनुसार अर्थाविना प्रतिसादी ते घालत असतील तर लेखकाने अर्थ देण्यास सुरुवात करावी.

उपक्रमाचा इतिहास पाहता येथे असे उपक्रम झालेले आहेत. उपक्रमावरचे २ सन्माननीय सदस्य या उपक्रमांचे जनक होते.

ही मला करून दिलेली आठवण असावी. अशा आठवणी आपण एक दुसर्‍यांना सतत करत असतो. असे उपक्रम करू नका असे मी कोठेही म्हटलेले नाही पण उपक्रम करता तेव्हा इतरही सामील होतील याचा विचार करायला हरकत नाही ही आठवण करून दिलेली आहे.

असो, पुरेसा खुलासा झालेला आहे. या चर्चेत अधिक विषयांतर करण्याची गरज नाही. अधिक खुलासा हवा असल्यास माझी खरडवही आहेच.

खुलासा विनंती

हो, खुलासा झाला आहे नक्कीच. बाकि खरडवही आहेच. तसेच लेखकांना विनंती की त्यांनी इतर सदस्यांच्या विनंतीला मान द्यावा आणि सुधारणा करावी. नाहीतर नुसतीच सुभाषिते लिहून ज्यांना त्याचा अर्थ हवा आहे त्यांच्या हाती काहीच लागणार नाही. म्हणजेच लेखकाचे लेखन लेखका पुरतेच मर्यादित राहून माहितीची देवाण घेवाण होणार नाहीच.
आता शेवटची विनंती, उपक्रमपंत/संपादकांना , वारंवार सांगून सुद्धा जर काही सदस्य समजून घ्याच्या मनस्थितीत नसतील अथवा उपक्रमाचा वापर वेगळ्या गोष्टींसाठीच करत असतील तर दखल घ्यावी.
अर्थात ही विनंती वैयक्तिक आहे. दखल घेतली, नाही घेतली (उपक्रम व्यवस्थापन तसेच सदस्य दोहोंनी ही) तरी मला वैयक्तिकरित्या काही फरक पडत नाही.

थांबा, थांबा गैरसमज नकोत.

मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे सुभाषिते अर्थाविना द्यावीत आणि इतरांनी ती एक प्रश्न मंजुषा आहे असे समजून सोडवावीत. मात्र इथे प्रत्येकाने एकावेळी एकच सुभाषित द्यावे (जसे आजानुकर्ण ह्यांनी एक सुभाषित लिहिले आणि सृष्टीलावण्या ह्यांनी ते सोडवायचा प्रयत्न केला).

माझी विसुनाना, यनावाला, धनंजय, राधिकाताई, राजेंद्र, प्राणेश, वाचन्कवी व इतर संस्कृत जाणकारांना जाहिर विनंती की आपण आपापल्यापरीने ही एक एक सुभाषिते लोकांना समजवावीत.

मी पण ह्या सुभाषितांवर जरुर लिहिन. हे म्हणजे थोडेसे जिगसॉ सारखे कोडे असेल जे सर्व एकत्र येऊन सोडवतील.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

सुभाषितपञ्चकम्

काक: कृष्ण: पिक: कृष्ण: को भेद: पिककाकयो: |
वसंतसमये प्राप्ते काक: काक: पिक: पिक: ||१||

हंस: श्वेतो बक: श्वेत: को भेदो बकहंसयो: |
नीरक्षीरविभेदे तु हंसो हंसो बको बक: ||२||

सारमेयस्य च अश्वस्य रासभस्य विशेषत: |
मुहूर्तात्परतो न स्यात् प्रहारजनिता व्यथा ||३||

अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च |
अजापुत्रो बलिं दद्यात् देवो दुर्बलघातक: || ४||

तक्षकस्य विषं दन्ते मक्षिकायाश्च मस्तके |
वृश्चिकस्य विषं पुच्छे सर्वांगे दुर्जनस्य तत् ||५||

जिंकलो....

मा मनो मधुपो मेघो मद्यपि मर्कटो मरुत्
मक्षिका मत्कुणो मत्स्यो मकारा दश चंचला:|

यात भुंगा, माकड, माशी, ढेकूण आणि मासा असे पाच प्राणी एकत्र आलेले आहेत. :-)

आणि ते गाढव आणि उंटाचे सुभाषित पण कुणीतरी द्या रे! मला ते जाम आवडते!
परस्परं प्रशंसति अहो रुपम् अहो ध्वनी|

सौरभदा-

अहो रुपम अहो ध्वनि:

उष्ट्राणां च गृहे लग्नं गर्दभा: शांतीपाठका: ।
परस्परं प्रशंसती अहो रुपम अहो ध्वनि: ॥

अर्थात हे सुभाषित फक्त गाढव आणि उंटांनाच लागू आहे असे नाही. माणसांनाही लागू आहे. :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

खराय

खरं आहे. मराठी संकेतस्थळांवर याचा प्रत्यय येतो बर्‍याचदा.

या उपक्रमातून संस्कृतमधून टोमणे मारायला चांगलं मटेरीअल मिळेल. ह घ्या**

प्राण्यांचे संदर्भ बहुतेकवेळा दुसरा कसा तुच्छ आहे हे सांगण्यासाठीच येतो. काक, पिक, गर्दभ, सिंह, उंट, कोल्हा , बैल, कुत्रा वगैरे वगैरे..


**अवांतरः (हलकेच घ्या किंवा टेक लाईट किंवा दिवा घ्या हे संस्कृताच कसं लिहिलं जातं? की संस्कृतात काही हलक्याने घ्यायचं नसतं.)


अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

महाशय

या उपक्रमातून संस्कृतमधून टोमणे मारायला चांगलं मटेरीअल मिळेल.
ह. घ्या** प्राण्यांचे संदर्भ बहुतेकवेळा दुसरा कसा तुच्छ आहे हे सांगण्यासाठीच येतो.

ह्यात हशा घेण्याजोगे मला एकच दिसते ते तुमची पूर्वग्रहदूषित वैचारिकता. संस्कृत साहित्यात प्राण्यांवर सुभाषिते आहेत ती इतरांना तुच्छ लेखण्यासाठी नाहीत तर प्राण्यांचे स्वभाव दाखवून त्याद्वारे बोध घेण्यासाठी.

मात्र त्यासाठी आपल्याला पंचतंत्रजन्माची कथा जाणून घ्यावी लागेल.

______________________________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।

तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

थोडे अवांतर

थोड्याफार सुभाषितांतून प्राण्यांचे कौतुक केले तरी एकंदरीत माणसाच्या त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन(/ण) दूषितच आहे असं माझं म्हणणं आहे.

गाढवासारखा राबतोय

बैल आहे नुसता

आला कुत्रा शेपटी हालवत, कुत्ते कमीने..? कुत्रा तर इमानी असतो ना? कमीना पण?

लब्बाड कोल्हा/ कोल्ह्याला द्राक्षे आंबट

धूर्त मांजर

काळा कावळा कितीही साबण लावा काही फरक पडत नाही.

अग ए म्हशे? उठ की आता..सुर्य डोक्यावर आला..

आला का उकिरडे फुंकुन(डुक्कर)

हे तर झालं उपयोगी पडणार्‍या प्राण्यांचं जे उपयोगी पडत नाहीत त्यांना तर माणूस मारूनच टाकतो. काही प्राणी तर मरूनही उपयोगी पडतात.

एखादा वॉचमन इमानदारीने प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्याला कोणी "अगदी कुत्रा आहे हो आमचा वॉचमन" असं म्हणत नाही.

आता ह्याच्या उलट पहा.."कामाला वाघ आहे हो पोरगा". वाघाचा आणि कामाचा जास्त संबंध आहे के बैल-गाढवाचा? ज्या माणसाने शेतीचा शोधला लावला आणि बैलाम्हशींच्या जीवावर चरितार्थ केला त्याने या उपकाराची अशी परतफेड केली.

प्राण्याप्राण्यातही हीनत्व निर्माण केले. कुत्रा करतो तसे गाढव करायला गेला म्हणून त्याने धोपाटे खाल्ले. अशा गोष्टी सांगीतल्यावर कोणाला गाढवाबद्दल काही आदर वाटेल. पण कुंभाराची सगळी कामे गाढवानेच केली. काम झालं की दिलं गावभर सोडून ..खा मिळेल ते बापड्यांनो.

ही फक्त निरीक्षणे आहेत यावरून निष्कर्ष काढण्यापूर्वी अजून उदाहरणे अभ्यासावी लागतील.

मनुष्यजातीच्या अप्पलपोटेपणाला सीमा नाही. काही जण यालाच सर्वायवल ऑफ द फिट्टेस्ट म्हणतात.

***प्रतिसाद थोडा अवांतर आहेच..उपक्रमरावांनी उडवला तरी चालेल.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

चांगली उदाहरणे

शोधलीत तर चांगली उदाहरणे सुद्धा सापडतील.

तु येथे दिलेली उदाहरणे आहेत ती फक्त अवगुणासाठीच वापरली जातात की तुलनात्मक बोलायला हा सुद्धा एक मुद्दा आहे. उदा: गाढवाच्या कष्टाबद्दल कोणीच आक्षेप नाही घेणार. पण बुद्धीचे काय? शक्ति आणि युक्तिचा ताळमेळ घालणे योग्य समजले जाते, निदान मनुष्य या प्राण्यासाठी तरी. मनुष्यप्राण्याने काही प्रमाणात इतर प्राण्यांवर मात केली आहे म्हणूनच त्याला प्रगत प्राणी मानत असावेत. नाहीतर नासाच्या अथवा इतर कोणत्याही संशोधन केंद्रात अथवा कोणत्याही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपनी मध्ये माणसा सोबत गाढव/बैल/कुत्रा/कोल्हा/डुक्कर/मांजर/म्हैस यांना दोन वेळच्या खाण्याच्या मोबदल्यात रोजगार द्यायला माझी तरी ना नाही. जर ते कमी मोबदल्यात चांगले काम करणार असतील तर तेच बरे नाहीत का?

काय माहित? उद्या मनेका गांधी प्राण्याना मनुष्या सारखीच वागणुक/सवलती मिळाव्यात म्हणून आंदोलन करतील. मग प्राण्यासाठी राखीव जागा/आरक्षण सगळे आलेच. इथे आम्ही धर्म जाती वरुन भांडतोय, त्याला काही अर्थच राहाणार नाही. एखादा वाघ/सिंह आमचा मॅनेजर झाला तर? अरे रे.. विचार शक्तिला मर्यादा येत आहेत आता. मी विचार करतो आहे. माझ्या शेजारच्या क्युबिकलमधे एक डुक्कर आहे. त्याला कामाचा चांगला मुड यावा म्हणून व्यवस्थापनाने सांडपाणी, कचरा याची सोय करुन ठेवली आहे. मनुष्यांना सुचना दिल्या आहेत की तुम्हाला विधी करायचे असतील तर त्याच्या क्युबिकलचा वापर करा. त्याला कामाचा हुरुप येईल. मी त्यामुळे हैराण होऊन काम करु शकलो नाही आणि एक हत्ती माझा मॅनेजर आहे. काम झाले नाही म्हणून चिडून त्याने मला सोंडेत पकडून भिरकावून दिले आणि मी अशाच एका डुकराच्या क्युबिकलमध्ये जाउन पडलो. मी नोकरी सोडू शकत नाही कारण आधी मनुष्य प्राण्यांची स्पर्धा होती फक्त त्यावेळी कशीबशी टिकवली. आता तर समस्त सजीव/सस्तन प्राण्यांशी स्पर्धा आहे. नोकरी गेली तर माझे कुटुंबीय रस्त्यावर/जंगलात येतील या काळजीने सगळे सहन करतोय पण नोकरी सोडायचा विचार मनात सुद्धा येऊ देत नाही.

हा हा.

अभिजित, मस्त उदाहरणे दिली आहेत.

"कामाला वाघ आहे हो पोरगा". वाघाचा आणि कामाचा जास्त संबंध आहे के बैल-गाढवाचा?

हा हा. म्हणजे आता "काय गाढव आहे!" ही स्तुती आणि "वाघासारखा आहे" हा उपहास म्हणायचा का? ;)

चला आमचे नावही आता प्रतिष्ठित होईल.

आपला,
(आजानुकर्ण) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

:-)

म्हणायला पाहिजे /नको असं म्हणत नाही मी. वस्तुस्थिती सांगितली. वैचारिकतेच्या बैलाच्या नावाने शिमग्यात बोंब ठोकतात तशी ठोकायची होती म्हणून उदाहरणे दिली.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

सिंहावरून अजून एक...

नाभिषेको न संस्कारःसिंहस्य क्रियते वने
विक्रमार्जित सत्वस्य स्वयमेव मृगेंद्रता

राज्याभिषेकाच्या संस्काराने नाही तर स्वकर्तुत्वाने सिंह हा जंगलचा राजा ठरतो.

अवांतरः ऐकीव माहीती प्रमाणे - प्रियालीने वर सिंहाबद्दल् सांगीतले , "प्रत्यक्षात सिंह हा शिकारीसाठी जागेवरून सहसा उठतही नाही. ते काम सिंहिणीचे." या वास्तवा प्रमाणे सिंह आळशी असतो. म्हणून भारताचा राष्ट्रीय प्राणी आधी सिंह होता पण नंतर त्याची जागा वाघाने घेतली!

बाकी वेळे अभावी जास्त नाही, पण वर चर्चेत आल्याप्रमाणे, शब्दार्थ आणि भावार्थ समजला तर अधिक उत्तम.

अजून दोन श्लोक सांगतो:

खाली हरणाला सामान्य समजून मनुष्याला सुनावले आहे: (आठवतो त्या प्रमाणे म्हणून व्याकरणासंदर्भात क्षमस्व!)

एशां न विद्या, न तपो न दानम्
ज्ञानम् न शिलम् न गुणो न धर्मः
ते मृत्यूलोके भूविभार भूतः
मनुष्य रुपेण मृगाश्चरंती ||

पोपट, कोकीळा, आणि बगळ्यावरील प्रसिद्ध श्लोकः

आत्मनो मुख दोषेण बद्ध्यंते शुकसारीका:
बकः तत्र न बध्यंते, मौनं सर्वार्थ साधनम्

सहज सुचलं म्हणून ....

खाली हरणाला सामान्य समजून मनुष्याला सुनावले आहे:

मला वाटतं दिलेल्या श्लोकांत 'मृग' या शब्दाला हरीण असा विशिष्ट अर्थ नसून कुठलाही पशू असा अर्थ आहे. याचे दुसरे उदाहरण म्हणजे सिंहाला मृगेंद्र असेही म्हणतात. ते हरिणांचा राजा या अर्थाने नाही तर प्राण्यांचा (पशूंचा) राजा या अर्थाने.

"न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा:" यांतही 'मृग'चा अर्थ 'सिंहाचे खाद्य होऊ शकेल असा कुठलाही पशू' असा असावा.

(चू. भू. द्यावी घ्यावी).

ता. क. (मेंदूला व्यायाम) : "खग" म्हणजे आकाशमार्गे गमन करणारा, ('ख' म्हणजे आकाश; 'ग' म्हणजे गमन करणारा) म्हणजे पक्षी. "मृग" या शब्दाचीही अशीच काही व्युत्पत्ति सांगता येईल काय?

बरोबर आहे.

मला वाटतं दिलेल्या श्लोकांत 'मृग' या शब्दाला हरीण असा विशिष्ट अर्थ नसून कुठलाही पशू असा अर्थ आहे.

एकदम पटणारे आहे!

धनंजयने मी दिलेल्या सुभाषितात दुरूस्त्या सुचवल्या होत्या त्या येथे देत आहे.

येषां न विद्या, न तपो न दानम्
ज्ञानं न शिलं न गुणो न धर्मः
ते मृत्युलोके भुवि भारभूता:
मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति ||

आत्मनो मुखदोषेण बद्ध्यन्ते शुकसारिका:
बकास्तत्र न बध्यन्ते, मौनं सर्वार्थसाधनम्

सिंहाचे अजून एक सुभाषित....

उद्योग केल्यानेच कामे साध्य होतात केवळ मनोरथ केल्याने नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरीण स्वत:हून प्रवेश करत नाही अशा अर्थाचे एक सुभाषित आहे. उद्यमेन हि सिध्यन्ति..... अशी त्याची काही सुरुवात आहे. कुणी दिले तर बरे होईल.

-सौरभदा

हरीण की हत्ती?

उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः । न हि सिंहस्य सुप्तस्य प्रविशन्ति मुखे गजाः

असे सुभाषित आहे ते. पण हत्तीला सिंहाच्या तोंडात शिरण्यासाठी, सिंहाने अंमळ झोपेसारखे पडून राहणे आवश्यक आहे असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सुभाषित असे आहे......

सौरभदा,
आपण विचारलेले सुभाषित असे आहे :

उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथै: |
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा: ||

धन्यवाद!

शरद कोर्डे, हे सुभाषित दिल्याबद्दल धन्यवाद.
अजानुकर्ण, सुभाषितातला प्राणी हत्ती नाहीये, हरीणच आहे.

-सौरभदा.

एक इंग्रजी सुभाषित

Never wrestle with a pig—you get dirty and the pig likes it

हे सुभाषित अतिशय मार्गदर्शक आहे. कोणतेही विधायक कार्य करू इच्छिणार्‍यांनी निंदा/विरोध याकडे दुर्लक्ष करून किंबहुना त्यातून अधिक स्फूर्ति घेऊन आपले कार्य करत राहावे!

अजून एक

Never wrestle with a pig—you get dirty and the pig likes it

हे सुभाषित अतिशय मार्गदर्शक आहे. कोणतेही विधायक कार्य करू इच्छिणार्‍यांनी निंदा/विरोध याकडे दुर्लक्ष करून किंबहुना त्यातून अधिक स्फूर्ति घेऊन आपले कार्य करत राहावे!

एकदम मान्य! थोडेफार् याच अर्थी पण अजून कडवट...

उपदेशो हि मुर्खानां प्रकोपाय न शांतये पय: पानं भुजंगानां केवलं विषवर्धनम

+३

मीनः स्नानरतः फणी पवनभुक् मेषस्तु पर्णाशने नीराशी खलु चातकः प्रतिदिनं शेते बिले मूषकः ।
भस्मोद्धूलनतत्परो ननु खरो ध्यानाधिरूढो बकः सर्वे किं न हि यान्ति मोक्षपदवीं भक्तिप्रधानं तपः ॥

मासळी सतत पाण्यात स्नान करते, साप वायू भक्षण करून राहतो, बकरा पाने खाऊन राहतो, चातक तहानलेला राहतो, उंदिर बिळात राहतो, गाढव अंगाला राख फासतो, बगळा डोळे बंद करून बसतो म्हणजेच ध्यान करतो; परंतु ह्यांच्यातील कोणालाही 'तप' करूनही मोक्ष मिळत नाही. कारण तपात भक्ति प्रधान आहे.

_____

क्वस्त्वं? लोहितलोचनास्य चरणयो: हंस: कुतो? मानसात्
किं तत्रास्ति? सुवर्णपंकजवनां अम्भ: सुधासन्धिभं |
रत्नानां निचय: प्रवाललतिका वैदूर्योरोहि क्वचित
शम्बूक:? न हि सन्ति नेति च बकै : आकर्ण्य ही ही क्रुतं ||

रात्रं गमिष्यति भविष्यति सुप्रभातं
भास्वानुदेष्यति हसिस्यति पंकजश्री |
इत्थं विचिन्त्ययति कोषगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनिं गज उज्जहार ||

ही दोन सुभाषिते मला खूपच आवडतात. अर्थ आपल्यापैकी अनेकांना माहितच असेल.

 
^ वर