छायाचित्र टीका २१

पुढील फोटो कॅननचा एस. डी. ८५० आय. एस. हा ८ मेगापिक्सेलवाला डिजिकॅम वापरून काढले आहेत. मला फोटोग्राफीतलं ओ की ठो कळत नसतानाही हे फोटोज काढून पाहिले आहेत. त्यामुळे त्यात अनेक त्रुटी असतील. त्यावेळचे सेटिंग्ज आता आठवत नाही आहेत. पण काय सेटिंग्ज केले असते, तर हे फोटोज अधिक सुंदर झाले असते, ते जाणून घ्यायला आवडेल.

भिंतीतल्या नक्षीकामातील भोकातून पलिकडे दिसणाऱ्या यमुनेच्या प्रवाहाचा व तिच्या काठच्या प्रदेशाचा हा फोटो काढला आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

अहो...

किती मोठी चित्रे.... मल दिसतच नाहीयेत. एक चित्र बघताना ३-४ वेळा मॉनीटर वरुन चित्र हलवावे लागत आहे.
कृपया छोट्या आकारात चित्र चढवा, अथवा उपक्रमरावांना सांगा म्हणजे ते तरी आकार कमी करतील.
-
ध्रुव

हो

खरंय. आकार लहान कसा करायचा? ही चित्रे एवढी मोठी होतील असं वाटलं नव्हतं.
राधिका

सुंदर

सुंदर चित्रे. उत्तम कल्पना.

हिरवे फुलपाखरू छानच आहे. रंगसंगतीच्या दृष्टीने पिवळ्या फुलांवर नको होते, पण ते फुलपाखरू काय पैसे दिलेल्या मॉडेलसारखे आपल्या मर्जीने वागते का? फुलपाखराच्या चित्रात फोकस थोडा गंडला आहे. फुलपाखराच्या पायाखालचे फूलही फोकसमध्ये असायला हवे होते. बाकी सर्व पाने धूसर फोकसमध्ये हवी होती. पाने हिरवी असली तरी "टेक्श्चर"मुळे फुलपाखरू उठून दिसले असते.

खिडकीतले चित्र चारही बाजूंनी कातरून चांदणीची आकृती बरोबर तितकीच ठेवायला हवी होती. "बंदिवाशास छोट्याशा खिडकीतून दिसणारे अथांग स्वातंत्र्य" ही कल्पना सध्या त्या बाजूच्या धूसर चॉकलेटी-लाल रंगाने झाकोळली जात आहे. जे दिसते आहे ते "वेड्यावाकड्या भोकातून बाहेर दिसणारे बारीकसारीक काहीबाही" अशी रटाळ कथा सांगते.

तुम्ही काढलेले चित्र एखाच्या चित्रफितीतली पहिली फ्रेम जरूर असू शकती, आणि शॉट झूम करत करत कॅमेरा यमुनेपाशी पोचला असता, मग कट्! तसे असते तर ही वरचीच सुरुवातीची प्रतिमा म्हणून "वाहावा" म्हणवून गेली असती.

धन्यवाद

सुचवण्यांबद्दल धन्यवाद. फोकसमधे असणे म्हणजे काय? एखादी वस्तू फोकसमधे आणण्यासाठी काय करावे? (माफ करा फारच बालबुद्धीचे प्रश्न आहेत.) :)
राधिका

अहो...

अहो, बालबुद्धी नाही. आपण तर या क्षेत्रात बालच आहोत. असेच प्रश्न आणि त्यांची उत्तरे अपेक्षीत आहेत.

ऑटोफोकस

तुमचा कॅमेरा "ऑटोफोकस" आहे. तुमच्या कॅमेर्‍यात आपल्याला हवे ते (मॅन्युअली) काही फोकस करता येत नाही. त्यातून फोटो 'क्लिक' करण्यापूर्वी ९ छोट्या चौकटी दिसतात. बटन अर्धवट दाबले, की कुठल्या चौकटीतल्या वस्तूवर "फोकस" केंद्रित केला जाईल, ते दिसते. "क्लिक" न करता बटण सोडून पुन्हा दाबले, तर कॅमेरामधला संगणक असे समजतो, की त्याने निर्णय केलेला बिंदू तुम्हाला रोचक नाही. ९पैकी दुसरा कुठला बिंदू निवडेल... वगैरे. तुम्हाला रोचक असलेला बिंदू कॅमेर्‍याने "ऑटोमॅटिक" निवडला की क्लिक पूर्ण करायचे.

फोकस म्हणजे कुठल्या अंतरावरचा प्रकाश सर्वात स्पष्ट केंद्रित होतो, ते अंतर. कॅमेर्‍याच्या भिंगातले घटक मागेपुढे करून हे अंतर बदलता येते. तुमच्या कॅमेर्‍यात २ सेमी (मॅक्रो) ते इन्फिनिटी या दरम्यान कुठल्याही अंतरावर फोकस करता येते. पण ही भिंगे हाताने मागे-पुढे करायचा स्क्रू तुमच्या कॅमेर्‍यात नाही. (तसे असल्यास कॅमेर्‍याला "मॅन्युअल फोकस" म्हणतात.)

माझ्या कॅमेर्‍याला मॅन्युअल/ऑटोमॅटिक फोकस असा पर्याय आहे. मी स्वतः अत्यंत आळशीपणे नेहमी ऑटो.-फोकसच वापरतो. भरमसाठ चित्रे काढतो, आणि फोकस गंडलेली चित्रे कॅमेर्‍यातून खोडून टाकतो. ३५ मिमि चित्रफितीच्या काळात मला फोटोचा नाद भयंकर महाग गेला असता. ;-)

त्या काळातल्या माझ्या याशिका कॅमेर्‍यात नेमके काय फोकस झाले आहे ते दाखवणारी एक मोठी कल्पक "पॅरॅलॅक्स" यंत्रणा होती. कॅमेर्‍याला बॅटरीची मुळीच गरज नव्हती. भिंगच हाताने गोल फिरवून फोकस मागेपुढे करणे भाग होते. फोकस अगदी हवा तसा तपासूनच फोटो काढीत असे. आहाहा.. तो काळ गेला.. वगैरे. माझ्यासारख्या आळशी बेशिस्त माणसाला आजकालचा 'सबकुछ आटोम्याटीक' काळच आवडतो.

अच्छा

इतके दिवस ते हिरवे चौकोन कशासाठी येतात, ते कळले नव्हते. ते आता कळले. धन्यवाद. :)
राधिका

सहमत

धनंजयांच्या सुचवण्यांशी सहमत आहे.
पुढील चित्रांसाठी शुभेच्छा !
--लिखाळ.

सुचवणी

फुलपाखराचा फोटॉ कॅमेरा मॅक्रो मोड वर ठेवुन काढायला हवा होता. (की मॅक्रो वापरुनच काढला आहे?) फोकस फुलपाखरावर न राहता फुलपाखराच्या मागच्या कळीवर गेला आहे असे वाटते.
दुसर्‍या चित्रात भोक फारच लहान ठेवले आहे. भोकावरील नक्षी देखिल फोकस मध्ये घेतली असती तर वेगळा परिणाम साधला गेला असता.

मॅक्रो

आता नक्की आठवत नाही, पण फुलपाखराचा फोटो काढताना बहुधा मॅक्रो मोडच वापरला आहे. दुसर्‍या चित्राच्यावेळी तुम्ही म्हणता तसे करायचा प्रयत्न मी केला परंतू नक्षी नीट यायला कॅमेरा मॅक्रोमोडमधे ठेवायला लागला असता, व तसे केले असते, तर पलिकडचा परिसर धूसर आला असता. म्हणून कॅमेरा इन्फिनिटी मोडमधे ठेवला.

सुचवण्यांबद्दल धन्यवाद.

राधिका

कॅमेरा सेटिंग्स

आपले कॅमेरा सेटिंग्स लक्षात ठेवण्याची काहीच गरज नसते. आपल्या फोटोबरोबर ते सर्व सुरक्षित राहिलेले असते.

त्याला EXIF data म्हणतात. JPEG फाइलचा EXIF वाचण्यासाठी अनेक संचेतने उपलब्ध आहेत. (EXIFवर गुगल करा).
तुमच्या फुलपाखराच्या फोटोतुन "Exiftool" नावाचे संचेतन वापरुन तुमच्या फोटोतुन ही माहीती मिळली

हो! तुम्ही मॅक्रो वापरला होता!!

--भालचंद्र

बा.......प रे बाप!

इथे तर त्या फोटोची अख्खी कुंडली मांडली आहे! इतक्या सगळ्या गोष्टी बदलता येऊ शकतात, व त्यांच्या बदलानुसार फोटोत फरक पडतो? बाकी 'Circle Of Confusion' वगैरे 'पारिभाषिक' शब्द वाचून मजा वाटली.

बाकी आज सकाळीच मला शोध लागला, की कॅननच्या कॅमेर्‍याबरोबर आलेल्या सॉफ्टवेअरमधून हे फोटो उघडले, तर सेटिंग्ज कळतात.

धन्यवाद. :)
राधिका

एक्सिफ

ही माहिती तुम्हाला फोटोवर माऊसचे उजवे बटन दाबुन आलेल्या फाईल प्रॉपर्टीज्स् मध्येही असते.
-
ध्रुव

 
^ वर