डॉक्टर्सः पूर्वीचे आणि हल्लीचे

गेले काहि दिवस मी आजारी होतो. त्यामुळे मी सोडून बाकी सगळ्यांनी बोलण्याची इच्छा अगदी पुर्ण करून घेतली ;) अश्याच रंगात आलेल्या गप्पांतील हा काही भागः

"तरी तुला सांगत होते नको त्या डॉ. अ कडे जाऊस. काही येत नाहि त्याला. हल्ली कुठे ६-७ वर्ष झालीयेत दवाखाना टाकून.", इति तीर्थरूप.
तीर्थरुपच असं बोलल्यावर मातोश्री कशाला मागे राहतील!
"नाहि तर काय, गेल्यावेळी काय साधा ताप भरला होता तर ही टेस्ट कर, ती टेस्ट कर, मग ह्या गोळ्या घेऊन बघ! याचा उपयोग नाहि झाला तर मग ह्या घे! अरे आम्ही काय गिनिपिग आहोत काय प्रयोग करायला"
" अगदी खरय तु म्हणतेयस ते, हल्लीच्या डॉक्टरांना "परिक्षा" नावाचा प्रकारच रहिलेला नाहि. तुसते प्रयोग करत बसतात आणि एकावर एक टेस्ट करायला लावतात. शेवटी औषधांना गुण काय तर शुन्य!! इतक्या वेळात होमियोपथिक औषधांना पण गुण येईल म्हणावं.
"अहो! आपले डॉ. ब कीती वेगळे होते. पुर्वीचे डॉक्टर्स केवळ नाडी, ताप बघून, स्टेथस्कोप वापरून आणि फारतर फार ब्लडप्रेशर तपासून लगेच काय ते ओळखत आणि २-३ डोसात माणूस बरा झालाच पाहिजे. त्यांना बरं नव्हत्या लागत इतक्या टेस्टस करायला? त्या समोरच्या सुमेच्या बाळाला जरा जुलाब होत होते तिचा डॉक्टर म्हणाला हे बहुतांशी जुलाबच आहेत पण याशिवाय ३-४ प्रकार असु शकतात तुम्ही ह्या तीन टेस्ट करा. त्या बाळाला सुया टोचताना पाहवत नव्हतं हो!!!"
"अगं, आज काल काय औषधे देणाराच जास्त घाबरतो.. पेशंट चुकुन बरा झाला तर माझ्या पोटापाण्याचं काय?"
हा हा हा.. दोघही मनसोक्त हसले

असो.
तर त्यांच्या मतांमधील काहिसा अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी "पूर्वीच्या" (म्हणजे नक्की किती पुर्वीच्या हे मात्र सांगता येणार नाही :) ) आणि "हल्लीच्या" डॉक्टरांच्यात पुढील बाबतीत इतका फरक का?:

१. निदानास लागणारा वेळ?
२. निदानासाठी आवश्यक पॅरामिटर्स?
३. निदानातील अचुकता (असे हल्ली बर्‍याचदा दिसते की टेस्टस करूनही डॉक्टरांना पेशंटला नक्की काय झालंय हे कळतच नाहि तो एलिमिनेशन मेथडने एकेक शक्यता कमी करतो)
४. औषधातील परिणामकारकता

एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक क्लिष्ट आजारावर प्रभुत्व मिळत असताना छोट्या छोट्या रोजच्या आजारातील एक्पर्ट डॉक्टर्स खरच कमी होऊ लागले आहेत का?

चर्चा ऍलोपथी ची निंदा करणे या उद्देशाने सुरू केलेली नाहीच नाही. तसेच कोणत्याही डॉक्टरच्या भावना दुखावण्याचा हेतू नाहि. पण हल्ली वरील संवाद मला बर्‍याचदा ऐकु येत आहे म्हंणून उहापोह करण्याचा प्रयत्न

लेखनविषय: दुवे:

Comments

अरे!

फार कामाचा विषय काढलास
पैसे काढण्याचे नेटवर्क उभारतात हे लोक.
हे कसले डॉक्टर्स? हे तर कसाईच असे वाटते एक एक किस्से ऐकल्यावर.

मागे आमच्या नाशिक च्या शाम आष्टेकर आणि ध्रुव मंकड या दोन डॉक्टर्सनी या विरुद्ध आवाज उठवला होता, तर चक्क नाशिक मेडिकल असोसिएशन या बॉडीनेच त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. हे दोघेही निष्कलंक आणि पैशांसाठी काम न करता लोक सेवेला वाहून घेतलेले...
असो,
त्यांनी असे म्हणणे मांडले होते की बहुतेक सगळेच एम बी बी एस आणि एमडी डॉक्टर्स आता चेन प्रॅक्टीस करातात. आणि पेशंट्स ना लुबाडतात. निष्कारण टेस्ट्स घ्यायला लावतात आणि एकमेकांकडे पेशंट्स पाठवण्यासाठी कमीत कमी ४०% फी उकळली जाते!
ही फी अर्थात पेशंट्स देतात.
याला बहुतेक डॉक्टर्स मान्यताही देतात. त्याला कारण देतात की आम्ही किती फी भरतो मेडिकल ला मग आम्ही का त्याचे पैसे 'वसूल' करू नयेत?

तेंव्हा कोणत्याही डॉक्टर कडे जाण्या आधी किमान १० लोकांकडे चौकशी करा असे मी म्हणेन.
मगच स्वतःला त्यांच्या स्वधीन करा... कारण पैसे नसले तर लावलेले सलाईनही काढून घेतलेले डॉक्टर्स मी डोळ्यांनी पाहिले आहेत.

आपला
गुंडोपंत

परिसंवाद

पुण्यात आडकर फौंडेशनने यावर पत्रकारभवन येथे मागच्या वर्षी परिसंवाद घेतला होता. त्यात अनेक बाजुंवर चर्चा झाली. वैद्यकिय बोधकथा हे डॉ. अमोल अन्नदाते यांच्या लोकसत्ता तील मालिकेचे आता पुस्तक झाले आहे. मनोविकास प्रकाशन ने ते काढले आहे. त्यात अशा अनेक वास्तववादी कथांचा समावेश आहे.
माझ्या मते आरोग्य हे आता सेवाक्षेत्र राहिले नसुन इंडस्ट्री झाली आहे. पुर्वी डॉक्टरला देव मानत असत. आजही खेड्यात अपवादात्मक उदाहरणे पहायला मिळतात.
पुण्यात डॉ अनंत फडके या विषयावर अनेक वर्ष काम करतात. लोकविज्ञान संघटनेचे ते काम करतात. http://www.lokvidnyan.org/aboutus.htm
प्रकाश घाटपांडे

सरकारी दवाखाने.

नागपुरला मागे असाच एक परिसंवाद झाला होता.

त्यात भाग घेणार्‍या एका डॉक्टरानी सांगितले होते, " कि मी माझ्या बायकोला असे सांगितले आहे कि मी जर आजारी पडलो आणि स्व:तचा निर्णय घेण्यास अकार्यक्षम असेल तर्, मला नजिकच्या सरकारी दवाखान्यात घेऊन जा, तिथे जे काही उपचार करतील ते घे. पण कोणत्याही स्थितीत मला खाजगी दवाखान्यात नेऊ नको." (कारण, तेथे उपचाराऐवजी पैसे कसे उकळाविता येईल हा एक कलमी कार्यक्रम असेल.)

एकदा अश्याच एका खाजगी दवाखान्याने आपला रुग्ण काही तासाचाच सोबती आहे, त्याला घेऊन जा असे सांगितले. आता घरी कसे न्यायचे असा विचार नातेवाईकांच्या मनात आला. त्यानी त्याला सरकारी दवाखान्यात नेले. १०/१५ दिवस उपचार घेतल्यानंतर आजही तो रुग्ण जिवंत आहे.

अनेक ठिकाणी अश्याही तक्रारी कानावर आल्या आहेत रुग्ण मृतही झाल्यानंतर सलाईन इत्यादी चा देखावा करुन २/३ दिवसाचे अतिरिक्त मुल्य लावले जाते.

आपण सरकारी दवाखान्याचे पुनर्जिवन केले पाहिजे.

डॉक्टर तुम्हीसुद्धा?

असा प्रश्न काही वर्षांपूर्वी विचारला गेला होता... आता "डॉक्टर, तुम्ही नाही?" असा प्रश्न विचारायची पाळी आली आहे.

डॉक्टर 'हिप्पोक्रॅटिक ओथ' घेतात. पण ते स्वतः हायपोक्राईटस् झाले आहेत असे म्हणावेसे वाटते.

"शहाण्याने दवाखान्याची पायरी चढू नये." - एक नवी म्हण.

ऋषिकेश, आजारी होतात? काय झाले होते? आता बरे आहात ना?

:)

ऋषिकेश, आजारी होतात? काय झाले होते? आता बरे आहात ना?

आपुलकीने विचारपूस केल्याचं पाहून बरं वाटलं :)
जरा ताप आला होता (जरा म्हणस्जे चांगलाच :)) आता ताप/सर्दी/डोकेदुखी बंद झाली आहे .. खोकला आहेच :(

बाकी मी ३ डोसात बरा झालो असलो तरी आईच्या मते गवती चहाच्या काढ्याने, बाबांच्या मते अमृतारिष्टामुळे तर काकांच्या मते ते ऍक्युप्रेशरचे पाँईंटस दाबल्याने खरा उपयोग झाला आहे ;)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

हम्म

चांगला विषय आहे. याला अर्थातच दोन्ही बाजू आहेत. बरेचदा डॉक्टरांना पुरावे असल्याशिवाय निदान करणे कठीण जात असावे. त्याचबरोबर आता हा व्यवसाय एक बिझनेस झाला असल्याने कमिशनसाठी उगीच टेस्ट करणे नक्कीच वाढले आहे. या संबंधात दोन्ही बाजूंच्या अनेक रोचक हकिकती कानावर आल्या आहेत.
यावर उपाय काय? मला वाटते एक मार्ग म्हणजे कुठल्याही नवीन डॉक्टर/स्पेशालिस्टकडे जाण्याआधी मित्रपरिवार/सहकारी यांना त्यांच्या डॉक्टरांविषयी विचारणा करावी. माझ्या माहितीप्रमाणे माउथ-टू-माउथ पब्लिसिटी असलेल्या बहुतेक डॉक्टरांचा अनुभव चांगला आहे. या व्यवसायत जसे पैसे कमावणारे लोक आहेत त्याचप्रमाणे रूग्णाचे योग्य निदान करणारे निष्णात लोकही आहेत. फक्त आपल्याला योग्य माणूस मिळायला हवा.
उपक्रमींमध्ये कुणी डॉक्टर असल्यास यावर अधिक प्रकाश पाडू शकतील.

अवांतर : हा चर्चाविषय (बहुधा चुकुन) भाषा विभागात गेला आहे.
----
"मै तेजा हूं. मार्क इधर है"

मनातलं बोललास

उपक्रमींमध्ये कुणी डॉक्टर असल्यास यावर अधिक प्रकाश पाडू शकतील.

अगदी मनातलं बोललास! डॉक्टरांनो इतके सगळे बोलताहेत तुम्हीही बोला :)
बाकी माउथ-टू-माउथ पब्लिसिटी असलेल्या बहुतेक डॉक्टरांचा अनुभव चांगला आहे याच्याशी सहमत.

अवांतर : हा चर्चाविषय (बहुधा चुकुन) भाषा विभागात गेला आहे.

हो चुकुन आणि आळशीपणामुळे देखील (डिफॉल्ट आहे बहुदा ;) )

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

काळ बदलतो आहे

घाटपांडे साहेब म्हणाले तसे पुर्वी वैद्यकिय सेवा असायची ती आता वैद्यकिय पेशात बदलली आहे.

निदानातील अचुकता, लागणारा वेळ आदी बाबी -

नवे नवे विकार, नवी औषधे, प्रदुषण व रुग्णाकडून पुरेसे पथ्य वेळा न पाळले जाणे ह्याचा परिणाम होऊ शकतो. कदाचित आधी जास्त माहीती नसल्याने, उपकरणे नसल्याने पुर्वीचे डॉक्टर त्या चाचण्या करायला सांगत नसत ज्या आता कराव्या लागतात. कदाचित आजच्या डॉक्टरांना असेच भरपुर चाचण्या करायला शिकवले जात असेल. तसेच प्रदुषण, आहारातील फरक, कमी व्यायाम यामुळे पुर्वी पेक्षा आता लोक जास्त/ वारंवार आजारी पडत असतील.

डॉक्टर म्हणजे देव हे समीकरण संपले आहे. अर्थात जगात इतर व्यवहारात देवत्व जाउन मनुष्यत्व आले आहे त्याच प्रमाणात वैद्यकिय क्षेत्रात देखील अनिष्ट गोष्टी होत आहेत त्यामुळे ह्यात केवळ "डॉक्टर"ला दोष देण्यात अर्थ नाही.

प्रदुषण, आपली जीवनशैली व त्यामुळे होणारे विकार, औषधकंपन्या, पेटंट/कॉपीराईट, खर्च व भाव, डॉक्टरांवर वाढते हल्ले, नवीन कायदे इ. सर्वांचा एकत्रित परिणाम नविन उपचार पद्धती [अनेक टेस्ट] व मुल्य [वाढते] यावर होणे अपरिहार्य आहे.

जर तुम्ही तंदुरुस्त राहीलात तर उत्तम, पण तब्येत बिघडली तर नाईलाज या अवस्थेत सध्या आहोत. आता हळुहळु वैद्यकिय विमा योजना अपरिहार्य होणार. शेवटी पैशाचा विचार करता विमा योजनेत कमी पैसे जाणार हा विचार करुन ही योजना रुळणारच जशी परदेशात रुळली आहे.

आता फक्त सरकार ने गरिबांना रास्त दरात व इतरांना संतुलीत बाजारभावाप्रमाणे ही सेवा मिळते आहे ना ह्याकडे लक्ष देणे इतकेच.

हं

कदाचित आजच्या डॉक्टरांना असेच भरपुर चाचण्या करायला शिकवले जात असेल.

हं हे असेल बॉ!

बाकी

डॉक्टर म्हणजे देव हे समीकरण संपले आहे

१००% सहमत

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

पुर्वी फॅमिली डॉक्टर.

ही संकल्पना अस्तित्त्वात होती (आताही असेल् पण कदाचित दुर्मिळ).. माझ्या आजीला एकेरी नावाने हाक मारणार्‍या डॉक्टरांनी मलाही लहानपणी तपासलं आहे.

त्या डॉक्टर ला त्या खानदानाची सगळी मेडिकल (इमोशनल.. हेही महत्त्वाचं आहे) हिस्ट्री माहित असायची..
त्यामुळे सामान्य दुखण्याला वेगवेगळ्या टेस्ट करण्याची गरजा भासली नसेल. आजही तुम्ही एकाच डॉक्टरकडे वारंवार गेलात तोही तुमचं झटक्यात निदान करू शकेल्.

पण एकदम नवीन डॉक्टरकडे गेल्यावर तुमची हिस्ट्री माहित करून् घ्यायला त्याला या टेस्ट कराव्या लागत असतील्.

उ.दा. मला ऍलर्जीवर गुणकारी ठरणारी गोळी सरसकट एका प्रेग्नंट बाईला किंवा काच बिंदू झालेल्या वयस्कर माणसाला देता येत् नाही. ह्या गोष्टी घरातल्या जुन्या डॉक्टर ला माहिती असतात किंवा नवीन डॉक्टर टेस्ट करून् माहिती करून् घेतो.. तसच..एखादयाला मानसिक त्रासाने जर अपचन होत असेल् तर जुना फॅमिली डॉक्टर त्या माणसाशी शांतपणे बोलून कदाचित त्याला एखादी प्लॅसिबो सारखी गोळी देवून् घरी पाठवतो

डॉक्टरांचे प्रतिसाद हवेत

उपक्रम परिवारात एकसुद्धा डॉक्टर नाही कां?

सगळे डॉक्टर सरसकट फक्त पोटभरूच झाले असतील तर रोग्यांना बरे कोण करतो?
आज सरासरी वयोमान पूर्वीच्या पिढीच्या मानाने उंचावले आहे ते कशामुळे?
अनेक लोकांचा आरोग्यविमा असतो आणि अधिक चाचण्यांचा खर्च त्यांच्यावर पडत नाही हेसुद्धा त्या वाढण्यामागील एक कारण असू शकते.
महानगरांमध्ये फॅमिली डॉक्टरची उणीव जाणवते, पण लहान गांवात अजूनही डॉक्टर आणि रुग्ण यांच्यादरम्यान स्नेहसंबंध असलेले दिसतात. ते प्रस्थापित झाल्यास फसवणूक, अडवणूक आणि त्याचा संशय वगैरेचे प्रमाण आपोआप कमी होईल.

डॉ.प्रकाश आमटे, डॉ.राणी बंग यांची कोणालाही आठवण आली नाही.

माझे मत

विषय चांगला आहे आणि किचकट सुद्धा. पुर्वीचे डॉक्टर आणि आजचे डॉक्टर हा विषय चर्चेला घेताना एक विषय या विषयातच दडलेला आहे. पुर्वी डॉक्टर कोण बनायचं आणि आत्ता कोण बनतं? माझ्या शालेय मित्रांमध्ये बरेचजण अभियंते झाले आणि बरेचजण डोक्टर. जे डॉक्टर झाले ते मुख्यत्वे डॉक्टरांचे सुपुत्र अथवा सुपुत्री आहेत. आज सुद्धा या वर्षीचे बारावी नंतरचे विज्ञान शाखेचे प्रवेश पाहिले तर डॉक्टर बनणार्‍यांची संख्या रोडावली आहे हे लगेच कळून येते. सगळ्यांना अभियंता बनायच आहे. का बरे? सरळ आहे. पैसा कमवायचा आहे. हाच अभियंता डॉक्टर बद्दल म्हणतो की डॉक्टर आता पुर्वी सारखे नाही राहिले.
आता आपण असा विचार करू की चांगल्या इस्पितळात जाऊन औषधोपचार का करायचे? तर तज्ञ डॉक्टर, सेवा वर्ग, तंत्रज्ञान, स्वच्छता हे सगळं एका छताखाली मिळतं. अरे, पण हे जे देतात त्यांना गुंतवणूक करावी लागते ना? ती कुठून येणार? कर्ज घ्यावे तर लागणार ना? ते फेडायचे कसे? कोणी? सरकारने? कि जरा काही झाले की हे सरकारने केले पाहिजे, सरकारचा अंकुश हवा? हल्ली जरा काही खुट्ट झाली प्रत्येकाला त्या त्या क्षेत्रातला तज्ञ डॉक्टर हवा असतो. एम बी बी एस म्हणजे एकदम फालतू समजला जातो. ३० वर्षाचा अभियंता आजच्या घडीला स्वतःचे घर करून, जगातले काही देश आणि संस्कृती पाहून स्थिरस्थावर झालेला असतो. पण त्याचा डॉक्टर मित्र वयाच्या ३० पर्यंत एक तर शिकतो नाही तर दवाखाना उभा करून रुग्ण मिळवण्यासाठी इतर डॉक्टरचे उंबरे झिजवतो.
हे झाले काही मुद्दे, हे सगळं करण्यात त्याच स्वतःच कौटुंबीक सौख्य तर कुठेच नसतं. त्याच्या वयाचे इतर पदवीधर आणि डॉक्टर यांचा कर्तुत्वाचा संघर्ष तुलना करण्या योग्य तरी आहे का? हे मुद्दे सांगितलं की काही लोकं म्हणतातच, आम्ही बनायला सांगितलं होतं डॉक्टर? मग जर एखाद्या डॉक्टरप्रती समाजाची अथवा समाजातल्या काही जणांचे विचार असे असतील, तर डॉक्टरने व्यवसाय करताना कोणाचे जीव वाचवण्याचे पुण्यकर्म केले तर काय बिघडले?

वर सरकारी इस्पितळांचा एक मुद्दा आला आहे. असे अनेक डॉक्टर दाखवता येतील जे सरकारी दवाखान्यातुन रुग्णांना माझ्या दवाखान्या मध्ये उपचारासाठी या म्हणून सांगतात.

चर्चेतले सगळेच मुद्दे चुकीचे नाहीत. पण या विषयात असे अनेक मुद्दे आहेत जे आपण सोयिस्कररित्या बाजूला ठेवतो आहोत.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आज अशी अनेक उपकरणे बाजारात मिळतात जी आपण स्वतः घरी वापरून काही तपासण्या करू शकतो. ठराविक कालावधीने स्वतःच्याच तपासण्या करून घेतल्या डॉ़टरची पायरी अगदीच गरजेच्या वेळी चढावी लागते आणि आरोग्यावर आपलाच अंकुश देखील ठेवता येतो.





माहिती हवी - भारता बाहेर उपचार

भारताबाहेरच्या उपक्रमींनो,
भारताबाहेर जर तुम्हाला औषधोपचार करावे लागले असतील तर ते कसे केले आहेत? अथवा आपला काही ऐकीव अनुभव आहे का? तेथे तुम्ही डॉक्टरकडून काय अपेक्षा ठेवता? भारतातले उपचार आणि भारताबाहेर यांची तुलना केल्यास आपल्याला कोणते चांगले/वाईट मुद्दे लक्षात येतात?





आणखी काहि

सगळ्यांच्या प्रतिक्रियांवरून असा साधारण भाव दिसतो की काही (काही अधिक) डॉक्टर केवळ पैशासाठी टेस्ट करायला लावतात.
ही चर्चा पुढे चालेलच दरम्यान काहि आणखी मुद्दे डोक्यात आले तेही देतो:

  • पैशाचा मुद्दा महत्वाचा आहेच पण ह्या टेस्टस करूनही बर्‍याचदा त्यांचे निदान चुकते याचे कारण काय असावे?
  • सेकंड ओपिनियन घेऊन बघावा.. कधीकधी निदान पूर्णपणे दुसर्‍या टोकाला गेलेले आढळते.. याचे कारण काय असावे?
  • डॉक्टर्सच्याचुकीच्या निदानामुळे होणारे दुष्परिणाम भोगणार्‍यांना ग्राहक कोर्टात दाद मागता येते का? (आपले निदान चुकल्याममेरिकेत डॉक्टरला कोर्टात खेचता येते त्यामेळे शक्यतो अमेरिकेतील डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन्स द्यायला टाळतात असे ऐकून आहे)
  • हल्ली जी औषधे दिली जातात ती मुद्दाम सौम्य असतात का की ज्यामुळे आजार काही काळात पुन्हा बळावेल (व पुन्हा पैसा :) )

ऋषिकेश
------------------
जर डॉक्टरा-डॉक्टरांमधे निदान इतके चुकत असेल तर ज्योतिषांना कशाला बोला? ;) (यावर कृपया इथे चर्चा नको.. इथे ह्. घ्या ;) )

वैद्य आणि यम!

एका संस्कृत श्लोकानुसार वैद्य अथवा डॉक्टर आणि यम हे एकमेकांचे सहोदर म्हणजेच भाऊ आहेत. त्यातला एक भाऊ(यम) फक्त प्राणहरण करतो तर दुसरा (वैद्य अथवा डॉक्टर) प्राणहरण तर करतोच पण त्याच बरोबर द्रव्यहरणही करतो असे म्हटलेले आहे.
तेव्हा चांगले आणि वाईट...मग ते काहीही असो....इथे डॉक्टर... हे पूर्वापार चालत आलेले आहे. प्रमाण कमी-जास्त असेल इतकेच.
चिमणरावाच्या गुंड्याभाऊचा किस्सा तर कितीतरी जुना आहे... भरमसाठ तपासण्या केल्यावर डॉक्टर म्हणाले की तुम्हाला काहीही झालेले नाहीये....आहे ना लक्षात.
तस्मात...हल्लीचे आणि पूर्वीचे असे काही नसते. ज्याची सदसद्विवेकबुद्धी शाबूत आहेत ते आजही नेकीने वागतात..बाकीच्यांबद्दल काय बोलावे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

खरे आहे

सर्व काळी माणसे सारखीच असणार. पण त्यांच्या चांगले-वाईटपणाच्या पातळीत फरक असणार असे वाटते. ते सप्पेक्ष आहे .. ते असू दे.

आताच्या काळात सुद्धा ज्यांना फॅमिली डॉक्टर लाभले आहेत ते भाग्यवान. पण जनरल प्रॅक्टिस करणार्‍या एखाद्या डॉक्टरला सर्व कुटूंबियांनी जर घरुन ठेवले तर लवकरच स्नेह वाढतो असा अनुभव आहे.

परदेशात आपण नवा रुग्ण म्हणून वैद्याकडे जातो. त्यामुळे त्याला आपल्याबद्दलची काहिच माहिती नसते. तो अनेकदा सर्व तपासण्या करायला लाव्तो. बहुधा इथेले वैद्य यंत्रांवरच जास्त अवलंबुन असतात असे दिसते. हे सर्व आसपासच्यांच्या अनुभवावरुन. सुदैवाने मला तरी वैद्याकडे जायचा प्रसम्ग अजून आला नाहिये.

--लिखाळ.

तंत्रज्ञानात आणि अर्थकारणात फरक, माणसात नाही

मी खुद्द वैद्यकाच्या पेशात (प्रॅक्टिसमध्ये) फार थोडा काळ, आणि कित्येक वर्षांपूर्वी होतो, त्यामुळे येथील माझी मते डॉक्टर म्हणून नव्हेत. परंतु वैद्यकाच्या बाबत संशोधन असल्यामुळे माझा वावर अजून डॉक्टरांच्याबरोबर आहे, त्यामुळे काही निरीक्षण त्या दृष्टिकोनातून मला करता येते. रुग्णाच्या दृष्टिकोनातून मात्र चित्र खूप वेगळे असते. कधी स्वतः रुग्ण व्हायची वेळ आली अशा काही डॉक्टरांनी पुस्तके लिहिली आहेत, त्यात या वेगळ्या दृष्टिकोनाचा साक्षात्कार झाल्याचे त्यांनी लिहिलेले आहे.

चर्चेत दोन वेगवेगळे मुद्दे आलेले आहेत :
१. वैद्यकाच्या व्यासायिक मनोवृत्तीत बदल झाला आहे का? (ऋषिकेश यांच्या आप्तांचा करुण/तिखट विनोद म्हणजे "पेशंट चुकुन बरा झाला तर माझ्या पोटापाण्याचं काय"म्हणणारा डॉक्टर.)
२. वैद्यकाचा प्रयोग वेगळा झाला आहे का?

माझ्यामते दोन्ही प्रश्नांची उत्तरे मनुष्यस्वभाव काय? या दृष्टीने विचार करता "बदल नाही" अशीच द्यावी लागतील.
१. वर प्रमोद देव यांनी सांगितल्याप्रमाणे, पूर्वीच्या काळीसुद्धा कधीकधी "वैद्याचे व्यावसायिक उद्दिष्ट्य धन आहे" याबद्दल वाईट वाटणारे लोक होते. (म्हणजे आजच्यासारखेच त्या काळातही काही सेवाभावी वैद्य असतील, आणि काही धनलोभी अस्तील.)
२. अगदी ढोबळ मानाने वैद्यकाचा प्रयोग म्हणजे निदान+चिकित्सा असाच पूर्वीही होता, आताही आहे.

पण इतके ढोबळ उत्तर फारसे कामाचे नाही. ते देण्याचे कारण इतकेच की "कलियुग आहे/जगबुडी येते आहे/मनुष्यजात अवघीच रसातळाला जात आहे" या टोकाच्या भूमिकांपासून दूर हटता यावे.

१. व्यवसाय हा अर्थातच खूप बदलला आहे, कारण अर्थकारणाची घडी बदललेली आहे. रुग्णांच्या बाजूने बदललेला समाज असा - लोक आजकाल संयुक्त कुटुंबात राहात नाहीत, एका गावात राहात नाहीत. त्यामुळे आज्याचा आणि नातीचा डॉक्टर एकच असण्याची शक्यता फरच कमी होते आहे. डॉक्टराच्या बाजूने विचार करायचा तर डॉक्टरकीत होणार्‍या जमाखर्चाचे स्रोत बदलत आहेत. खर्च म्हणजे शिक्षण आणि (खाजगी प्रॅक्टिसमध्ये) दवाखान्याचा रोजखर्च, (इस्पितळात) खाजगी प्रॅक्टिसपेक्षा कमी उत्पन्न मिळते, हा कार्यशक्तीचा स्वस्त व्यय (ऑपर्च्यूनिटी कॉस्ट). हे सर्व खर्च पूर्वीपेक्षा आता अधिक प्रमाणात आहेत. जमा म्हणजे पूर्वी थेट रुग्णाकडून मिळणारे सेवाशुल्क होते, आता काही प्रमाणात विम्यातून डॉक्टराला शुल्क मिळते. (इस्पितळातले डॉक्टर आजही पूर्वीसारखेच पगारी आहेत.)

असे आर्थिक बदल होत असताना एखाद्या सेवेच्या मुक्त बाजारपेठेमुळे नवीन कार्यक्षमता मिळू शकली असती. पण वैद्यकाच्या बाबतीत हे घडत नाही. वैद्यकाच्या सेवेची तपशीलवार गरज काय? त्याचे मूल्य किती ठरवावे हे गिर्‍हाइकाला स्वतःहून तोलमोल करायचे ज्ञान नसते. त्यामुळे मागणी-पुरवठा-किंमत यांचा सर्वात कार्यक्षम बिंदू ग्राहक-विक्रेत्यांच्या दुहेरी डोळस स्वार्थामुळे प्राप्त होत नाही. त्यामुळे सेवाशुल्क किती असावे, सरकारी डॉक्टरचा पगार किती असावा, वगैरे आर्थिक निकषांबाबत दुमत असणारच. सरकारी डॉक्टरच्या मते पगार कमी असतो, आणि बिगर-डॉक्टरांच्या दृष्टीने तो पुरेसा असतो. (वर उदाहरण दिलेले आहे, की सरकारी इस्पितळातले डॉक्टर लोकांना आपल्या खाजगी दवाखान्यात यायला सांगतात. पगार पुरेसा असला तर हे अर्थात चुकीचे आहे. पगार फार कमी असला, तर हे उदरनिर्वाहासाठी अनिवार्य आहे. पण पुरेसा की कमी याचे मोजमाप काय आहे?)

वैद्यकाचे अर्थकारण हे "मार्केट फेल्युअर" (बाजारपेठ फसवणारे) आहे, याबाबत अर्थतज्ज्ञ चर्चा करतात. अशा परिस्थितीत समाजचे (किंवा सरकारचे) बजारपेठेवर नियंत्रण लागते - पण ते नियंत्रण करण्यासाठी कुथले तत्त्व वापरायचे याबाबत एकमत नाही. आर्थिक घडी बदलते आहे, तर या अनियंत्रित फसलेल्या बाजाराचे दुष्परिणाम दिसणे अपरिहार्य आहे.

२. वैद्यकाचा प्रयोगही खूपच बदलला आहे. मुख्य म्हणजे संशोधनामुळे उपचारपद्धती खूप बदलल्या आहेत. गर्भ राहिला तर तो आजकाल बहुधा बाळ जिवंत जन्मते, सिझेरिनने का होईना - पूर्वी मूल अडले की परिस्थितीत शिशु-माता दोघे मरत. गेल्या ५० वर्षांत लसींचा आणि प्रतिजैविकांचा शोध हा फार महत्त्वाचा म्हणावा लागेल. १९००-१९५० काळातले आकडे बघता अमेरिकेत न्युमोनिया आणि सेप्टिक ही मृत्यूच्या प्राथमिक कारणांपैकी होती. हृदयरोग आणि कर्करोग हे मध्यवयाचे-म्हातारपणाचे रोग उद्भवाचे दुर्दैव नव्हते कारण त्या वयापर्यंत तगायचे बहुतेक लोकांचे सुदैव नव्हते. १९५५-६० मध्ये भारतात जन्मलेले मूल सरासरी ४२-४४ वर्षे जगेल अशी अपेक्षा केली जाऊ शकायची. २००५ साली भारतात जन्मलेले मूल ६४-६६ वर्षे जगेल अशी सरासरी अपेक्षा केली जाऊ शकते. यात सर्व श्रेय वैद्यकाचे खचित नाही - आर्थिक प्रगतीमुळे लोकांचे पोषण सुधारले याचा वाटा प्राथमिक आहे.

हे सर्व नवे उपचार बघता वैद्यकाचा आवाका आज पूर्वीपेक्षा वाढलेला आहे, आणि एका डॉक्टराच्या प्रशिक्षणाच्या पलीकडे गेला आहे. पूर्वीचा जनरल प्रॅक्टिशनर बाळंतपणे करे, बारीकसारीक शल्यचिकित्सा करे, औषधोपचार करे. पण सिझेरिन करेल, बारीक छेद देऊन नळकांडीतून ऍपेंडिक्स काढेल, विकोपाला गेलेल्या मधुमेहावर विशेष औषधोपचार योजेल, हे सर्व प्रशिक्षण एका व्यक्तीला आता शक्य नाही. विशेषकरून वय वाढले की अनेक विशेषज्ञांकडे जावे लागते. (हे विशेषज्ञ एका टीमप्रमाणे एकत्रित काम करत नाहित, त्यांचे उपचार कधीकधी एकमेकांना काटणारे असतात, वृद्ध रुग्णांना डझनावारी गोळ्या-कॅप्स्यूल घेणे त्रासदायक, गोंधळ उत्पन्न करणारे असते, ही एक मोठीच समस्या होऊन बसली आहे.)

पूर्वीचे डॉक्टर सगळे सुषेण होते का? (मुळात सुषेणच धन्वंतरी होता का? हा प्रश्न विचारण्यासारखा आहे - आयुर्वेदातील निदानग्रंथांत "अमुक-अमुक लक्षण दिसल्यास रोगी मरणार, वैद्याने उपचार सोडून द्यावा", अशी लक्षणे प्रत्येक रोगाच्या बाबतीत देत. ती लक्षणे वाचता, आजकाल तेवढ्यावर उपचार थांबवणे हे मुळीच योग्य वाटत नाही.) पण त्या काळात रुग्णाला अपेक्षाही कमी होत्या. माझे आजोबा ७५व्या वर्षी दोन ह्र्दयविकराचे झटके येऊन वारले. त्या दोन झतक्यांच्या दरम्यान जे १ वर्ष गेले, त्या काळात त्यांची काळजी घेणार्‍या डॉक्टरांबद्दल आमच्या कुटुंबात आदरयुक्त आठवणी आहेत. आज माझ्या मते ७५ वर्षी हृदयविकराच्या झटक्यातून वाचलेला माणूस अधिक जगावा अशी अपेक्षा आहे. मला वाटते डॉक्टरांना काय शक्य आहे, याबाबत रुग्णांचा दृष्टिकोन बदलला आहे (योग्यच), त्यामुळे अपेक्षाभंग होण्यचे प्रसंगही वाढले असतील.

या अघळपघळ प्रस्तावनेनंतर ऋषिकेश यांचे मूळ प्रश्न बघू :

१. निदानास लागणारा वेळ?

कमीजास्त असतो. बहुतेक डॉक्टरांना अमेरिकेत प्रत्येक रुग्णासाठी १०-२० मिनिटेच देता येतात. तेवढ्या वेळात ते जे काय निदान करू शकतात. (रुग्णाचा मात्र अर्धा दिवस वेटिंगरूममध्ये खलास होतो.) पुण्यात सरकारी इस्पितळात मी रुग्णाला ५ मिनिटे फक्त देऊ शके. (बाहेर रुग्णांची रांग तासंतास ताटकळत असताना अधिक वेळ देणे शक्य नव्हते.) हे अर्थातच पुरेसे नाही. ते मी जे काय करत असे ते निव्वळ साधा/गंभीर असे वर्गीकरण होते. साधा, स्वतःहून बरा होणारा आजार असेल, तर काहीतरी जुजबी औषध द्यावे, थोडासा गंभीर असेल तर संध्याकाळी पुन्हा ये म्हणून बोलवावे, अणखी गंभीर असेल तर भरती करून घ्यावे. म्हणजे "साध्या"च्य निदनाला ५ मिनिटे, "थोडा गंभीर"च्या निदानाला १-२-किती दिवस? खूप गंभीरच्या निदानाला काही तास. जुनट व्याधीच्या निदानाला किती वेळ ते सांगता येत नाही - म्हणूनच तर अशा व्याधींना "जुनाट" म्हणतात, आणि पूर्वीही म्हणायचे.

२. निदानासाठी आवश्यक पॅरामिटर्स?

हे वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळे असतात. काही रोगांसाठी अधिक माहिती लागते, काही रोगांसाठी थोड्याच चाचण्यांनी/ केवळ शारिरिक निरीक्षणांनी निदान करता येते.

३. निदानातील अचुकता (असे हल्ली बर्‍याचदा दिसते की टेस्टस करूनही डॉक्टरांना पेशंटला नक्की काय झालंय हे कळतच नाहि तो एलिमिनेशन मेथडने एकेक शक्यता कमी करतो)

हे पूर्वीही असेच होते. "डाय्ग्नोसिस", "निदान" हे सर्व पूर्वीपासून एलिमिनेशनचेच ठोकताळे होते, अजून आहेत. जुनाट रोगांबद्दल तेव्हाही नेमके निदन होऊ शकत नसे, आताही नाही. परंतु जशाजशा टेस्ट सूक्ष्म होत जात आहेत, तसे पूर्वी एका नावाखाली येणारे काही रोग वेगवेगळ्या कारणांनी उत्पन्न झाल्याचे दिसून येते. तसे त्यांचे उपचारही वेगळे असतात. पूर्वी पिवळी कातडी-पिवळे डोळे बघितले की "कावीळ " असे निदान देऊन मोकळे होता येत असे, आणि "आराम" हा उपचार. आता कुठल्या प्रकरची कावीळ हे जाणणे निदानाचाच भाग असतो, आणि त्यामुळे अधिक चाचण्या आणि तपशील लागतात.

४. औषधातील परिणामकारकता

बहुधा पूर्वीपेक्षा अधिक असावी. वरील आकडेवारी बघावी. हृदयविकराच्या झटक्यानंतर आजकाल काही लोकांचा मृत्यू कित्येक वर्षे लांबतो, पूर्वी सर्वांनाच मृत्यू लवकर येत असे. वगैरे, वगैरे.

मस्त प्रतिसाद बहुतांशी पटला... पण तरीही...

वा! याला म्हणतात विस्तृत प्रतिसाद :) अनेक आभार!

आता मुळ मुद्द्यांकडे वळुयात

वैद्यकाचा प्रयोगही खूपच बदलला आहे. मुख्य म्हणजे संशोधनामुळे उपचारपद्धती खूप बदलल्या आहेत. गर्भ राहिला तर तो आजकाल बहुधा बाळ जिवंत जन्मते, ..........

यात तुम्ही म्हणता ते निसंशय बरोबर आहे. वैद्यक शास्त्राने अचाट प्रगती केली आहेच या बद्दल दुमत नाही. पण इतके मोठे आजार बरे होत असताना साधे साधे आजार दूर करण्यास पुर्वीच्या डॉक्टरांची परिणामकारकता हल्लीच्या डॉक्टरांना का नाही? बाळंतरोग, हृदयरोग आदींवर उपचार करू शकणारे वैद्यकशास्त्र हाताशी असताना ताप, डोकेदुखी, सर्दी, खोकला या साध्या साध्या आजारांपुढे हल्लीचे डॉक्टर का नमतात? टि.बी. सारख्या रोगावर खात्रीचा इलाज सांगणारे डॉक्टर इतक्या चाचण्या करूनही ही पोटदुखी कशामुळे हे ठरवु का शकत नाहीत?

हे वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळे असतात. काही रोगांसाठी अधिक माहिती लागते, काही रोगांसाठी थोड्याच चाचण्यांनी/ केवळ शारिरिक निरीक्षणांनी निदान करता येते

माझा मुद्दा ह्याच आजारांबद्द्ल आहे जे पुर्वीचे डॉक्टर्स केवळ निरिक्षणांमुळे करू शकत असत त्याच आजारांना हल्ली टेस्ट वर टेस्ट सांगितल्या जातात असे का? (आजार तोच लक्षणे तीच फक्त डॉक्टरांचा काळ वेगळा)

औषधातील परिणामकारकता बहुधा पूर्वीपेक्षा अधिक असावी. वरील आकडेवारी बघावी. हृदयविकराच्या झटक्यानंतर आजकाल काही लोकांचा मृत्यू कित्येक वर्षे लांबतो, पूर्वी सर्वांनाच मृत्यू लवकर येत असे. वगैरे, वगैरे.

नाही ना इथेच तर गोम आहे. जीवघेणे आजार नक्कीच कमी झाले आहेत व त्यावरील औषधांची परिणामकारकता वाढली आहे!... मात्र् असे रोग जे अजिबात जीवघेणे नाहित (एका मर्यादेपर्यंत अर्थात) त्यांचं काय?.... पुर्वी एका डोसात बर्‍या होणार्‍या गोष्टींसाठी आता आठवडा जाऊ लागला आहे. हल्ली डॉक्टर (साईड इफेक्ट टाळण्यासाठी आणि काहि प्रमाणात व्यावसायिक दृष्टीकोनातून) कमी तिव्रतेची औषधे देतात त्यामुळे असेल का?

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

गणेश वैद्य.

नाशिकला सराफ गल्लीत एका वैद्यांचा दवाखाना आहे. तेथे ( अंदाजे) १०० वर्षापूर्वीची पाटी १५ वर्षापूर्वीही वाचल्याचे आठवते. ( आता आहे की नाही माहित नाही.). ***

" येथे गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत औषध दिली जातील, गणेश वैद्य".

डॉक्टर्स असूनही सेवाभावी वृत्तीचे अनिल अवचट, त्यांची मुलगी, डॉक्टर बंग दाम्पंत्य, आमटे कुटुंबिय यांचा सादर उल्लेख केला पाहिजे.

***
त्याकाळी माझे डोके कपाळाला थोडीही थंड हवा लागली की असह्य दुखत असे. काही डॉक्टर्सना दाखविले असता कपाळात पू / घाण जमली आहे आणि शस्त्रक्रिया ( ५००० हजार रुपये खर्च) करून बरी होईल असे सांगितले.

मी विचारमग्न - मित्राची भेट- सायनसचा त्रास असावा असे त्याचे निदान ( एखादा आजार झाला तर कोणीही अर्धा डॉक्टर होतोच होतो) - त्याने या वैद्याचा पत्ता सांगितला- एका दिवसात बरा झालो- आजही तेथे संध्याकाळी बरीच गर्दी असते असे ऐकतो. आता बोला....

 
^ वर