शिक्षणाचे माध्यम मराठी असावे की इंग्रजी

'मराठी शाळा शोधताहेत विद्यार्थी' ही बातमी सकाळमध्ये वाचली. त्या अनुषंगाने हा चर्चेचा प्रस्ताव मांडत आहे.माझ्या मते शिक्षणाचे माध्यम मराठी असावे .
भारतात इंग्रजी माध्यम हे प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून पाहिले जाते, अंगभूत गुणांमुळे नाही. हा सामजिक प्रश्न झालेला आहे. वरचा वर्ग इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातो मग मध्यम वर्गाला वाटते मराठी माध्यमात 'खालच्या वर्गाचे लोक' जातात. आपले मूल त्या वातावरणात नको. खरे तर लोकांनी इंग्रजीचा बागुलबुवा करून ठेवलाय. लोक काय म्हणतील ही भिती, भाषिक न्यूनगंड, इंग्रजीची सामाजिक दर्जाशी घातलेली सांगड यामुळे लोक इंग्रजी माध्यामकडे वळतात.
कित्येक शिक्षणतज्ञांचे मत आहे की शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे. इंग्रजी माध्यमातून शिकताना, लहानपणी अभ्यास कमी आणि सोपा असतो तोवर जमते सगळे. पाठांतर करून बरेच जण निभावून नेतात पण ९, १० वी नंतर अवघड जाऊ लागते. विषयांचा आवाका वाढतो तसे पाठांतर अवघड बनते. विषयांचे आकलन न झाल्यामुळे बऱ्याच अडचणी येतात. मराठी माध्यमातून शिकले तर लहाणपणीपासुन सगळे विषय मातृभाषेत असल्याने समजत जातात. आणि विषय समजुन घ्यायची सवय लागते. पुढे माध्यम बदलले तरी ही सवय कायम रहाते. जीवनविषयक आणि संस्कृती विषयक बाबी मातृभाषेतूनच शिकल्या पाहिजेत.
इंग्रजी काळाची गरज आहे हेही खरेच. पण त्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण हाच एक पर्याय आहे असे नव्हे. आज कित्येक लोक मराठी माध्यमाच्या शाळांत शिकून वेगवेगळ्या क्षेत्रांत यशस्वी ठरलेले आहेत. यशस्वी होणारे लोक त्यांच्या अंगच्या इतर गुणांमुळे यशस्वी होतात तर अयशस्वी लोकांपैकी काही लोक खापर फोडायला भाषेची सबब पुढे करतात.
मराठी माध्यमाच्या शाळांत इंग्रजी संवाद कौशल्य शिकवले तर इंग्रजी सहज बोलता येईल. पहिलीपासून इंग्रजी ही एक चांगली योजना आहे. ती परिणामकारकरीत्या राबवली पाहिजे. इंग्रजीच्या तासाला शिक्षक आणि विद्यार्थी संवाद इंग्रजीतून व्हायला हवा. इंग्रजी संवाद कौशल्यासाठी काही सामजिक संस्था काम करत आहेत, त्यांची मदत घेता येईल.
वरील सर्व गोष्टींचा पालकांनी आणि मराठी शाळाचालकांनी विचार केला पाहिजे.

अनिकेत केदारी.

लेखनविषय: दुवे:

Comments

शक्य आहे

माझे स्वतःचे शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले (आणि विषय बर्‍यापैकी समजले). पण त्यामुळे वैज्ञानिक लेखन करताना विचार करायची भाषा आता इंग्रजी आहे. मराठीत घरगुती विचार, कौटुंबिक जिव्हाळ्याचे विचार, आपोआप होतात (तसेच बे-वीस चे पाढे मराटीतच येतात). पण गुंतागुंतीचे विचार आपोआप इंग्रजीत होतात. त्यामुळे मराठी वैचारिक लेखन-वाचनाची नाळ थोडी मुरडल्याची खंत वाटते.

मराठी माध्यमाचा फायदा मराठी भाषेच्या भरभराटीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. गुंतागुंतीचे विचार मराठीत सहजगत्या करणारे लोक अशा विषयांचे मराठीत लेखन, वाचन करतील.

द्वैभाषिकत्व, त्रैभाषिकत्व हे त्या मानाने सोपे आहे. केवळ इंग्रजी, हिंदी, कन्नड/तेलुगू यांचे सकस शिक्षण मराठी माध्यमिक शाळांत उपलब्ध असणे अपरिहार्य आहे.

मध्यममार्ग

तसेही महाराष्ट्रात पहिलीपासून इंग्रजी शिकवले जाते त्यामुळे इंग्रजीची भीती मुलांना राहणार नाही. (राहिलीच तर इतर विषयांइतकीच राहील). अकरावीपासून पुढचे शिक्षण इंग्रजीत होतेच आणि हा बदल (मराठीतून इंग्रजी) त्यावेळी तितकासा अवघड राहत नाही. ज्यांना अधिकच काळजी वाटते त्यांनी आपल्या मुलांना आठवी पासून गणित आणि विज्ञान इंग्रजी माध्यमातून शिकवावे. अश्याने मराठी संस्कृतीशी नाळही टिकून राहील आणि व्यवहारात काही तोटाही होणार नाही.

मराठी माध्यमाचा फायदा मराठी भाषेच्या भरभराटीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. गुंतागुंतीचे विचार मराठीत सहजगत्या करणारे लोक अशा विषयांचे मराठीत लेखन, वाचन करतील.

सहमत आहे.

बरोबर्

सहसा मराठी माध्यमातुन येणारे विद्यार्थी अकरावी मध्ये घाबरलेले असतात.
इंग्लिशची त्यांची तोडकि-मोडकी ओळ्ख असते.
सेमी इंग्लिश हा मार्ग योग्य वाटतो.

पूका.

सेमी इंग्रजी

माझे स्वतःचे शिक्षण सेमी इंग्लिश मधे झाले आहे. त्यामुळे मला तरी खूप फायदा झाला. तांत्रिक/वैचारीक विषयांवर मी मराठीतुन तसेच इंग्रजीतुनही विचार करतो/करू शकतो.
पूर्ण मराठी माध्यमांतील माझे काहि मित्र, इंग्रजी बोलतना मराठीत केलेले विचार इंग्रजीत भाषांतरीत करत आहेत असे बर्‍याचदा जाणवायचे / (काहिंच्या बाबतीत) अजूनही जाणवते.

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे

मातृभाषा माध्यम

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
शैक्षणिक माध्यमाच्या संदर्भात श्री.अनिकेत केदारी यांनी आपले विचार मोजक्या शब्दांत पण प्रभावीपणे मांडले आहेत. त्यांच्या सर्व विचारांशी मी सहमत आहे.प्राथमिक तसेच माध्यमिक शालेय शिक्षणासाठी मातृभाषा माध्यम असणे अगदी योग्य आहे.मुलांना विषयाचे आकलन मातृभाषेतून अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. नाहीतर श्री. अनिकेत म्हणतात त्याप्रमाणे मुलें अर्थ न समजता पाठांतर करू लागतात.मराठी पालकांना हे जेव्हा उमजेल तो सुदिन.

सहमत

ज्याला आपली मायबोली नीट लिहिता, बोलता येत नाही तो परकी भाषा तरी कशी नीट बोलणार.
अलीकडे दूरचित्रवाणी वाहिनीवरील मराठी बातम्या पाहिल्या की मन विषण्ण होते.

+१

अलीकडे दूरचित्रवाणी वाहिनीवरील मराठी बातम्या पाहिल्या की मन विषण्ण होते.

+१

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

सेमी इंग्रजी

प्रतिसादाबाबत धन्यवाद
"सहसा मराठी माध्यमातुन येणारे विद्यार्थी अकरावी मध्ये घाबरलेले असतात.
इंग्लिशची त्यांची तोडकि-मोडकी ओळ्ख असते.
सेमी इंग्लिश हा मार्ग योग्य वाटतो.
सहसा मराठी माध्यमातुन येणारे विद्यार्थी अकरावी मध्ये घाबरलेले असतात.
ही गोष्ट काही प्रमाणात खरी आहे. मराठी माध्यमातुन शिकताना इंग्रजी श्रवण आणि संभाषण कौशल्य विकसित न झाल्याने थोडा न्यूनगंड निर्माण होतो.
परंतु मराठीतुन शिकत आल्याने त्यांची आकनलनशक्ती चांगली असते. इंग्रजीच्या समस्येवर मात करणे फार अवघड नसते. विचार करताना इंग्रजीतुन केला की बोलणे सहज जमते असा स्वानुभव आहे.
दुसरा मुद्दा असा की आज सर्व पालकांना त्यांचा पाल्य डॉक्टर इंजीनीअर व्हावा असे वाटते. पण ८वीमध्ये असतानाच आपला मुलगा विज्ञान शाखेत जाईल असा निर्णय घेणे थोडे चुकीचे वाटते.
इथे बरेच समविचारी लोक आहेत हे पाहुन आनंद झाला.
मराठी शाळांकडे पालकांना वळवण्यासाठी आज संघटीत प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. "मराठी-भाषा-संरक्षण-व-विकास-संस्था" (http://marathi-vikas.blogspot.com/2008/04/blog-post.html), यांसारख्या संस्था असे काम करत आहेतच. द्वारकानाथ कलंत्रीसारखे वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणारे ही कित्येकजण आहेत.
आपण मराठी प्रेमींनी एकत्र येउन प्रयत्न करणे गरजेचे वाटते. याबाबतीत कोणाकडे काही कल्पना असतील , मराठी माध्यमांच्या शाळांत इंग्रजी संवाद कौशल्य शिकवणार्या सामाजिक संस्था उपक्रमांची महिती असेल तर ती इथे द्यावी.
आपण वैयक्तिकरित्या आपल्या जवळच्या मराठी शाळांत जाऊन तिथे इंग्रजी श्रवण आणि संभाषण कौशल्य शिकवण्यास् मदत् केली तरी मोठे काम होइल असे वाटते.
त्यामुळे मराठी माध्यमातुन शिकणार्या मुलांत न्यूनगंड राहणार नाही आणि मराठी शाळा पण टिकतील.

वाईट्ट वाटते....

पालकांची इंग्रजी माध्यमाबद्दल पराभूत आणि परदास्याची मनोवृत्ती खरोखर चीड आणणारी आहे त्यापेक्षाही त्यांच्या दास्यत्वाचे वाईट वाटते.

परवा तेरवाच आमच्या एका नातेवाईकाशी भेट घडली. त्यांनी त्यांच्या मुलांना ICSE आकृतीबंधात शिक्षण देण्याचे ठरविले. सूरवातीला बराच उत्साह होता पण आता ( मुली ८वी त गेल्या) आणि शिकवणीची फी, शाळेच्या वेगवेगळ्या फिया, वेगवेगळा खर्च आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एखाद्या गुलामाला सुद्धा काहीतरी विश्रांती मिळत असेल पण या मुली सकाळी ८ पासून ते रात्री ८ पर्यंत वेगवेगळे घडे भरीत असतात. मुली १० वी झाल्यानंतर काय करणार असे विचारल्यावर चेहर्‍यावर मख्ख असे भाव होते.

त्यांना माझ्या मुलाचा ७ वीचा मराठी माध्यमाचा अनुभव सांगितला, खेळणे, वेळ मिळाला तर अभ्यास तरी ८२ % आसपास गुणश्रेणी. सर्वात महत्वाचे म्हणजे शाळेतर्फे "तारे जमीन वर" या चित्रपटात त्यांना काही कामही मिळाले असे सांगितल्यावर काय भाव बघितले हे मात्र विचारु नका.

आपण इंग्रजीच्या मोहापायी महाराष्ट्राची एक पीढी गारद करण्याचे पुण्य प्राप्त करीत आहोत हे मात्र खरे.

मातृभाषा आणि माध्यम

मातृभाषा हे प्राथमिक आणि पूर्वमाध्यमिक शिक्षणाचे माध्यम असावे ही एक बहुधा कधीच पूर्ण न होणारी अपेक्षा असते. अशी मुले फारच थोडी. बहुसंख्य मुले घरात जी बोली बोलतात त्या बोलीतून शिक्षण घेत नाहीत, आणि त्यांचे जगात काहीही अडत नाही. वर्षानुवर्षे अमेरिकेत राहिलेले इटालियन आणि चिनी, तसेच पंजाबी, बंगाली, गुजराथी, बंगाली आणि दक्षिणी भारतीय आपली संस्कृती आणि भाषा टिकवून असतात. अपवाद फक्त मराठी माणसांचा. ते महाराष्ट्रातही आपली भाषा बोलू शकत नाहीत!
त्यामुळे माध्यम कुठलेही असो, त्याचा शिक्षणाच्या दर्जाशी आणि समजण्याशी फारसा संबंध नसतो. माझ्या नात्यांतली असंख्य इंग्रजी -हिंदी माध्यमातून शिकलेली मुले उत्तम मराठी बोलतात, वाचतात, लिहितात आणि शब्दकोडी सोडवतात. त्यांना अनेक जुन्या मराठी कविता पुस्तकांतून वाचून माहीत असतात, आणि त्यांना मराठी तसेच बहुभाषी समाजात वावरायला कसलाही न्यूनगंड वाटत नाही.
ते नोकरीच्या निमित्ताने दुसर्‍या प्रांतात गेले की तिथली भाषा बोलायला शिकतात. भाषा टिकवून ठेवणे हे माणसांच्या रक्तात भिनायला लागते.
पु.लंच्या "जावे त्याच्या देशा"तील हे वर्णन वाचा.--वाचक्‍नवी

अपवादत्मक परिस्थिती

वाचक्‍नवी यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. पुलंचा लेखही समर्पक आहे. आज अगदी पुण्यातही आपल्या मुलांशी इंग्रजीत संवाद साधणारे पालक पाहण्यात येतात. आणि हे प्रमाण वाढतेच आहे :(
परदेशस्थांना शिक्षणाच्या माध्यमाबाबत पर्याय उपलब्ध नसतील त्यामुळे त्यांनी घरीच मुलांना मराठी शिकवणे गरजेची आहे.पण जिथे मराठीचा पर्याय उपलब्ध आहे तिथे परभाषेतुन का शिकावे.
आफ्रिकी देशांबाबतचा हा लेख वाचा
लोकसत्ता दैनिकातला लेख

मात्र भारतातल्या इतर भाषिक समाजाची स्थिती वेगळी आहे असे वाटत नाही. इतर भाषिक समाजही हळुहळु आपपल्या भाषा विसरत चालल्याचे दिसते. विषेशतः मारवाडी, गुजराथी, कानडी समाज.

कानडी सक्तीची

दिनांक २-७-२००८ ची बेंगलोरची ही बातमी पहा:

कन्‍नड सक्ती करण्यास नकार


(य़ूएन्‌‌आय)विनाअनुदानित प्राथमिक शाळांमध्ये कन्‍नड शिक्षण सक्तीने करण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने आज फेटाळला. कन्‍नड भाषेत शिक्षण घेण्याचा निर्णय हा घटनाविरोधी आहे. त्यामुळे कन्‍नड अथवा अन्य कोणतीही भाषा कोणावरही लादता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
---
एकूण काय, कुठल्याही भाषेची सक्ती करता येणार नाही. या बाबतीत अमेरिकेत काय करतात ते जाणून घेणे आपल्या हिताचे आहे. अमेरिकेत असंख्य भाषा. अनेक आफ्रिकन, अति पूर्वेच्या, मध्य आशियाच्या, युरोपीय आणि दक्षिण अमेरिकेच्या. घरी असल्या भाषा बोलणारी मुले शाळेत कशी शिकत असतील? त्यांच्यापैकी प्रत्येक मुलासाठी, अगदी खेड्यातसुद्धा, त्यांची मातृबोली जाणणारा स्वतंत्र शिक्षक शोधतात. कित्येकदा तो त्या मुलाचा पालकही असू शकतो . तो शाळेत दाखल झालेल्या त्या मुलाला १५ किंवा कमी दिवसांत जुजबी प्रमाण अमेरिकन इंग्रजी शिकवतो. आणि पुढे मुलगा स्वतंत्र होतो. आयुष्यभर त्याला अमेरिकन शिक्षण घेताना भाषेची कसलीही अडचण राहात नाही.
फक्त आपल्याकडेच प्रमाण मराठी शिकवण्यास तथाकथित विद्वानांचा विरोध आहे. --वाचक्‍नवी

चुकीचे भाषांतर

ही बातमी आपण कुठे वाचलीत हे कृपया सांगाल का?

ही बातमी म्हणजे मराठी वर्तमानपत्रे चुकीची किंवा सोयीस्कर(!) भाषांतरे कशी करतात त्याचे ढळढळीत उदाहरण आहे.

न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, सरकारी मदत न घेणार्‍या शाळांमध्ये कन्नड भाषा हीच शिक्षणाचे एकमेव माध्यम करणे हे नागरिकाच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे आहे.

मात्र
१. गैरसरकारी शाळांमध्ये कन्नड भाषा हा एक भाषाविषय म्हणून शिकविणे हे सरकारच्या धोरणात बसत असेल तर ते सक्तीचे करता येईल.
२. सरकारी व निमसरकारी शाळांमध्ये फक्त कन्नड हेच शिक्षणाचे माध्यम सक्तीचे करता येईल कारण अशा शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे कोणतेही बंधन कर्नाटकातील नागरिकांवर नाही.

न्यायालयाचा निर्णय हा गैरसरकारी शाळांमध्ये कन्नड भाषा हीच एकमेव माध्यम म्हणून वापरण्याच्या विरोधी आहे. एक भाषाविषय म्हणून ती सक्तीने शिकवणे न्यायालयाला मान्य आहे. शिवाय सरकारी-निमसरकारी शाळांमध्ये माध्यम म्हणूनही कन्नडची सक्ती करणे न्यायालयाला मान्य आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चुकीचे भाषान्तर असू शकेल पण...

मी दिलेली बातमी ३-७-२००८ च्या पुणे सकाळच्या पहिल्या पानावर पहिल्या स्तंभात होती. बातमी टंकताना मी जशीच्या तशी टंकली. आपण म्हणता तशी भाषान्तरात चूक असू शकेल, पण छापलेल्या मजकुराबद्दल शंका नसावी.--वाचक्नवी

किती कौतुक करावे !!!

फक्त आपल्याकडेच प्रमाण मराठी शिकवण्यास तथाकथित विद्वानांचा विरोध आहे.

अशा विद्वानांचे, त्यांच्या दृष्टीचे आम्हाला कौतुक वाटते !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन्ही लेख..

दोन्ही लेख वाचले. आफ्रिकेतील संशोधन धक्कादायक आहे. तरीसुद्धा मला वाटते की, मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी ती भाषा माध्यम होण्याइतकी प्रगत असावी लागते. तिच्यात जर शब्दसंपत्ती आणि वाक्यरचनांची कमतरता असेल तर ती भाषा शिक्षणमाध्यम म्हणून योग्य नाही हे उघड आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इत्यादी विषय मातृभाषेतून लिहितावाचता येतील आणि तसे ते शिकावेतही. गणित आणि शास्त्रे मात्र मातृभाषेतून शिकावीत परंतु जरूर तिथे इंग्रजीचा वापर करून सोप्या पद्धतीने लिहावीत. असे केल्याने अवघड आणि क्लिष्ट पारिभाषिक शब्द लक्षात ठेवण्याचा ससेमिरा चुकतो. इंग्रजी भाषेची रोमन लिपी गणित आणि शास्त्रे शिकायला आदर्श आहे, तिचा वापर करून शिकणे, एका विशिष्ट पायरीनंतर मातृभाषेतून शिकण्यापेक्षा सोपे जाते हे नक्की. उर्दूतून उच्च गणित शिकता येईल यावर माझातरी विश्वास नाही. -वाचक्‍नवी

वस्तुस्थिती आणि समज.

उर्दूतून उच्च गणित शिकता येईल यावर माझातरी विश्वास नाही.....

निझामाने १९२० च्या सुमारास पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे उर्दु भाषेत देण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न / उपक्रम बर्‍याच वर्षापर्यंत चालु होता.

अरबी लोक हे उत्तम गणितज्ञ म्हणून प्रसिद्ध होते असे वाचल्याचेही आठवते.

एक लक्षात घ्या भाषा हे माध्यम आहे.

सहमत

वाचक्‍नवींच्या वरच्या प्रतिसादाशी अगदी सहमत आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि एका विशिष्ठ पातळीपर्यंत गणित आणि शास्त्रे मातृभाषेतून शिकता येतील. मात्र मला
फक्त आपल्याकडेच प्रमाण मराठी शिकवण्यास तथाकथित विद्वानांचा विरोध आहे.
अशा विद्वानांचे, त्यांच्या दृष्टीचे आम्हाला कौतुक वाटते !!!
ही दोन्ही विधाने फारशी समजली नाहीत.
आज जगात इंग्रजी संभाषण कौशल्य आवश्यक आहे याबाबत कोणाचेही दुमत नाही. पण त्यासाठी मायबोलीला टाळुन इंग्रजीतुन शिकणे हा योग्य पर्यायं नाही. पण मराठी माध्यमाच्या शाळांत इंग्रजी संभाषण कौशल्य शिकवले जात नसल्याने लोक इंग्रजी माध्यमाकडे वळतात. मुंबईला विलेपार्ले येथे मिनल परांजपे यांनी Functional English असा ६ वर्षांचा कोर्स विकसित केला आहे. 'मित्र मराठी शाळांचे' या नावाची संघटना पण काहीसे अशाच स्वरुपाचे काम करत असल्याचे कळते.
अशा प्रकरच्या व्यक्ती किंवा संघटना माहित असल्यासे क्रुपया कळवावे. मराठी माध्यमाच्या शाळांत इंग्रजी संभाषण कौशल्य शिकवण्यासाठी अशी उत्तम व्यवस्था असणे गरजेचे आहे. ज्यामुळे सुयोग्य आकलन आणि उत्तम इंग्रजी असा समतोल साधता येइल.

 
^ वर