मी की आम्ही?

उद्या (५ जून रोजी) जागतिक पर्यावरण दिन आहे. नेहमी प्रमाणे हा दिवस येईल आणि जाईल. ज्या वेगाने पर्यावरणाचा र्‍हास होत आहे ते पाहता, तो आता केवळ चर्चा करण्याचा नाही तर प्रत्यक्ष कृती करण्याचा विषय झाला आहे. आपण बरेचदा चर्चा करतो. आपल्याला कळकळही वाटत असते, परंतु अनेकदा कळत नकळत किंवा नाईलाजाने आपल्या कडून पर्यावरणाचा र्‍हास होत असतो. मी एकट्याने प्रयत्न करुन काय असा मोठा फरक पडणार आहे, असे म्हणून आपण विषय सोडून देतो. पर्यावरण वाचविणे ही केवळ समुहाची कृती नसून, व्यक्ति म्हणून आपणही हे कर्तव्य बजावू शकतो. म्हणूनच जाणीवपुर्वक मी इथे अशा कृती सांगितल्या आहेत ज्या कोणाही सामान्य माणसाला एकट्याने प्रत्यक्ष कृतीत आणणं शक्य आहे. आपण आपला अनुभव व माहिती प्रमाणे यामध्ये भर घालावी ही विनंती. अट मात्र एकच, ती म्हणजे सूचवलेला उपाय अथवा कृती आदर्शवादी नसावी. व्यावहारिक व सहज आचरणात आणण्यासारखी असावी. नंतर सर्व सूचना संकलित करून आपण आपल्या ओळखीच्या व्यक्तींना ईमेल करुया. (खाली सूचविलेल्या उपायांमध्ये आवश्यक तेथे दुरूस्ती करावी)

१) नेहमीच्या बल्ब ऐवजी सीएफ़एल दिव्यांचा वापर करावा. जिथे शक्य व उपलब्ध असल्यास एलईडी दिव्यांचा वापर करावा. हे दिवे सीएफ़एल दिव्यांपेक्षाही मोठ्या प्रमाणात वीज वाचवितात. उदा. देव्हार्‍यात किंवा बेडरुममध्ये नाईट लॅम्प म्हणून वापरण्यात येणार्‍या (ज्याला बरेच लोक 'झिरोचा बल्ब' म्हणून संबोधतात) नेहमीच्या १० वॅटच्या दिव्याऐवजी १ ते २ वॅटचा एलईडी दिवा पुरेसा आहे. बाथरूममध्ये ८ किंवा ११ वॅटचा आणि टॉयलेटमध्ये ५ वॅटचा सीएफएल दिवा पुरेसा प्रकाश देतो. तसेच हॉल/लिव्हिंग रूमच्या अर्ध्या भागात एक व दुसर्‍या अर्ध्या भागात एक दिवा आणि शक्य असल्यास बैठकीच्या (सोफा व तत्सम आसनाच्या) वर अजून एक दिवा बसवून घेतल्यास आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या दिव्यांचा वापर करून वीज वाचविता येईल.

२) घरातील खिडक्यांच्या काचांवर आवश्यकता नसल्यास सनफिल्म लावू नये. पारदर्शी काचांमूळे दिवेलावणीचा वेळ लांबविता येतो.

३) टिव्ही तसेच अन्य वीजेवर चालणारी उपकरणे रिमोटने बंद न करता स्वीच बोर्ड वरील बटनाने बंद करावीत. मोबाईल चार्जर वापरात नसताना बंद करावा. नवीन वीजेवर चालणारे उपकरण विकत घेताना उर्जा बचत करणारे उपकरण घ्यावे. एनर्जी स्टार पाहून घ्यावा.

४) दीड टनाचे वातानुकूलीत यंत्र ३३ मिनिटाला १ युनिट वीजेचा वापर करते तर ३६ इंची पंखा १ युनिट विजेचा वापर करुन १६ तास ४० मिनिटे फिरतो. त्यामूळे वातानुकूलीत यंत्राचा वापर जपून करावा. त्याचे तापमान २४ ते २६ डिग्री सेल्सियस दरम्यान नियंत्रित ठेवावे. खोलीतून बाहेर पडण्याआधी अर्धा तास यंत्र बंद करावे. नियमित निगा राखलेले वातानुकूलीत यंत्र १५ ते ४० % वीज वाचविते.

५) कार्यालयात किंवा घरी चालू स्थिती मधील संगणक ३० मिनिटांपेक्षा अधिक काळ वापरायचा नसल्यास किमान मॉनिटर तरी बंद करून ठेवावा. (उदा. लंच टाईम किंवा बैठकीच्या वेळी) नवीन संगणक घेताना शक्य असल्यास सीआरटी ऐवजी एलसीडी/टीएफटी मॉनिटर घ्यावा.

६) कागदांचा पुरेपूर वापर करावा. जिथे शक्य आहे तिथे एका बाजूस छापलेले कागद पुन्हा प्रिंट काढण्यास उपयोगात आणावेत. आवश्यक असेल तरच प्रिंट काढावी.

७) शक्य तेथे जवळचे अंतर पायी चालत जावे. सार्वजनिक वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य द्यावे. आपल्या वाहनांची नियमित निगा राखावी. कार पुलिंगचा प्रयोग करून पहावा.

८) साबणाचा वा डिटर्जंटचा अनावश्यक वापर टाळावा. उदा. जर तुम्ही बशीत वा थाळीमध्ये चिकट नसलेला सुका पदार्थ घेतला असेल तर ती बशी नुसत्या पाण्यानेही स्वच्छ होऊ शकते.

९) स्वच्छतागहात ड्यूअल फ्लश बसवून घ्यावा.

१०) स्वयंपाकाची पुर्वतयारी झाल्यावरच गॅस पेटवावा. डाळ, भात शिजविण्यापूर्वी थोडा वेळ धुवून पाण्यात भिजवून ठेवा. भिजलेले धान्य लवकर शिजते. फ्रिज मधील पदार्थ थोडा वेळ बाहेर ठेऊनच तापविण्यास ठेवावेत. पाणी, दूध किंवा तत्सम द्रवरूप पदार्थांना उकळी फुटल्यावर गॅसची ज्योत मंद करावी. गॅसची ज्योत भांड्याच्या बाहेर जाऊ देऊ नका, अशाने ऊर्जा वाया जाते.

११) जेवताना सर्व अन्न एकदम जास्त प्रमाणात न घेता थोड्या पदार्थांपासून सुरूवात करुन आवश्यकते नुसार अन्य खाद्यपदार्थ घ्यावेत, जेणे करून अन्न वाया जाणार नाही.

१२) घराच्या / इमारतीच्या आवारात स्थानिक प्रजातीची झाडं लावावीत. जेणे करून पशु पक्ष्यांना आश्रय मिळेल. झाडांवरील फळे, फुले पक्षी व किटकांसाठी राखून ठेवावीत. आवाराचे संपूर्ण काँक्रिटीकरण न करता पाणी जमिनीत मुरण्यासाठी काही ठिकाणी मातीचा भाग ठेवून द्यावा.

१३) सार्वजनिक ठिकाणी पर्यावरणाला हानीकारक कृत्य होताना दिसल्यास, संबंधित प्रशासकीय यंत्रणेला किंवा पोलिसांना कळविणे. योग्य प्रतिसाद न मिळाल्यास प्रसारमाध्यमांना फोन करावा अथवा एक ईमेल तरी लिहावा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे वस्तूंचा कमीत कमी वापर आणि शक्य तिथे पुन:वापर करणे, ज्याने आपण पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करू शकतो.

- जयेश

लेखनविषय: दुवे:

Comments

संस्थाचालकांना,सोसायट्यांना

एक गोष्ट करता येइल.
ते म्हणजे संस्थेच्या आवारात,(रस्त्यावरच्या दिव्यांऐवजी) सौर दिवे वापरावेत.
माझ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात हे करण्यात आलं आहे.

एक व्यक्ती म्हणुन :-
ई-पत्राची आवश्यक असेल तरच आणि आवश्यक आहे तितक्याच छापील प्रती(प्रिंट आउटस्) घ्याव्यात.
होळी साजरी करताना शक्य असल्यास प्रातिनिधिक किंवा शास्त्रापुरती साजरी करावी;
जेणेलकरुन बहुमोल लाकुड वाचेल्.(की वाचील?)
इतरांनाही हे करण्यास उद्युक्त,प्रवृत्त,प्रोत्साहित करावं.
दिवाळीला "फटाके" ह्या प्रकाराला शक्य असल्यास फाटा द्यावा.(मी स्वतः मागील ७ वर्षांपासुन दिवाळी
साजरी करतो ती केवळ दीप लावुन, घरी प्रसादाचं/फराळाचं केलेलं गोडधोड खाउन. फटाक्यानं नाही. )
आणि केवळ दिवाळीच नाही, इतरही वेळेस आतिषबाजी करताना, विवेक वापरल्यास उत्तम.

जन सामान्यांचे मन

फारच छान

संपूर्ण लेखन आणि त्यातील सूचना आवडल्या. अर्थातच त्या योग्य पण आहेत.

काही अजून सुचलेल्या गोष्टी - काही भारतातील भारतीय करू शकतात तर काही सिस्टीम म्हणून इतर देशां (विशेष करून अमेरिके) पुरत्या मर्यादीत असतीलः

रिसायक्लींग करा - नगरपालीकेची व्यवस्था असल्यास रीसायक्लेबल गोष्टी कचरर्‍यात टाकू नका. - पेपर्स, काचेच्या बाटल्या, कॅन्स इत्यादी.
रेन बॅरल - रेन वॉटर हार्वेस्टींग - पन्हाळ्यातून येणारे पाणी साठवून त्याचा उपयोग गार्डनिंग साठी करणे
केमिकल्स चा कमी वापर करा - क्लिनिंग अथवा इतर गोष्टींसाठी आपण जेव्हढी केमिकल्स वापरतो तितकी लागत नाहीत असा एक अनुभव आहे (माझा स्वतःचाच :-))
काँपोस्टींग - गांडूळ खत - अमेरिकेत काँपोस्टबीन मिळते ते वापरून परसदाराचा झाडांचा कचरा (यार्डवेस्ट) आणि उरलेले अन्न (फूड वेस्ट) वापरून चांगले खत तयार करता येते, भारतात तेच गांडूळ खता साठी. त्याने कचरा कमी होतो आणि सदूपयोग होतो ती गोष्ट वेगळीच!
छपरांवर वेली अथवा छोटी (चालू शकणारी) रोपटी असल्यास त्यामुळे उन्हाळ्यातील दाहकता कमी होते.

रेन बॅरल
काँपोस्टबीन
घरगुती केमिकल्स
Green Roof

सुंदर समयोचित लेख, विचार आणि उपाय

वा जयेश!
इतक्या सुंदर लेखाबद्द्ल अभिनंदन आणि अनेक आभार. यातील काहि गोष्टी मी पाळत असलो तरी अनेक नवे उपाय/ कृती लक्षात आल्या.
अजून काहि भर घालण्याचा प्रयत्न:
वैयक्तीक / कौटुंबिक
१) घरात सर्व कुटुंबियांनी शक्य असेल तितके एका खोलीतच जमावे. ज्याने वीजेची बचत तर होतेच पण कौटुंबिक सलोखा वाढतो. तसेच एकाच वेळी जेवायला बसण्याचा प्रयत्न करावा. याने जेवण ताजे तर मिळतेच शिवाय एकदाम गरम केले जाते.
२) वॉशिंग मशीनचा ड्रायर उन्हाळ्यात चालवू नये.
३) जितका शक्य असेल तितका सायकलचा वापर करावा. हे आरोग्यदायकही आहे.
४) दाढीसाठी इलेक्ट्रीक रेझर न वापरता ब्लेड्स वापरावी. (परंतू दाढी करताना नळ चालु रहाणार नाहि ना याची काळजी घ्यावी)
५) दिव्यांनाही पंख्यासारखे रेग्युलेटर बसवावेत. जितक्या प्रकाशाची गरज आहे तितक्या प्रमाणातचे दिवे वापरावेत. दिव्यांची बटणे बेड, सोफा यांच्या जवळपासही बसवावीत (यामुळे केवळ उठायचा कंटाळा म्हणून दिवे चालु राहतात त्याला आळा बसतो)

इमारत/सुंकुल/सार्वजनिक
१) एक कॉमन टीव्ही घ्यावा. व महत्वाच्या मॅचेस, मालिका तिथे चालु ठेवाव्यात. लोकांना जर त्या मालिका अथवा/मॅचेस बघायच्या असतील तर एकत्र जमावे
२) सौर दिवे, सौर पंप वापरावेत (आमच्या संकुलात वापरतात व त्यास महापालिकेचे अनुदानही आहे)
३) ओला कचरा - सुक कचरा वेगळा करून ओल कचर्‍याचे खत बनवावे
४) सगळ्यांची मान्यता असल्यास केवळ प्यायचे पाणी २४ तास ठेवावे.

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे

सहमत आहे

सुंदर समयोचित लेख, विचार आणि उपाय
वा जयेश!
इतक्या सुंदर लेखाबद्द्ल अभिनंदन आणि अनेक आभार.

सहमत आहे!

जयेश यांचे आभार तसेच मन, विकास, ऋषिकेश, चित्रा या सर्वांचेच माहितीत भर घातल्याबद्दल आभार!

चांगल्या सूचना

सूचना चांगल्या आहेत. एक छोटी (मराठीच्या दॄष्टीने) सुधारणा - "कार पूलिंग" म्हणजे एका वेळी एकापेक्षा अधिक व्यक्तींनी एका गाडीचा वापर करणे, मित्र-नातेवाइकांना एकाच भागात जायचे असले तर दोन वेगवेगळ्या गाड्या घेऊन न जाता एकाच गाडीने जाणे. यामुळे इंधनाचा वापर आणि त्यावरील एका व्यक्तीचा खर्चही कमी होतो.

काही अजून -
१. घरातील सर्वांना, अधिक करून मुलांना घरातल्या खोलीतून बाहेर जाण्याआधी कोणी त्या खोलीत नसल्यास पंखे बंद करायला सांगावे. दिव्यांचा वापरही शक्यतो कमी किंवा गरजेपुरता करावा.
२. दात घासताना गरज नसताना पाणी सोडून ठेवण्याची अनेकांना सवय असते, तेव्हा पाण्याचा वापर जरूरीचा नसल्यास पाण्याचा नळ बंद करण्याची आठवण करावी.
३. जेवण झाल्यानंतर घासायची भांडी स्वयंपाकघराच्या सिंकमध्ये ठेवताना तशीच ठेवल्यास त्यांना चिकटलेले अन्नपदार्थ सुकून जातात आणि ते काढण्यासाठी अधिक पाणी वापरावे लागते. यासाठी भांडी नंतर घासायची असल्यास साठलेल्या भांङ्यांवर थोडे पाणी ओतून तेवढ्या पाण्यातच हातानेच साफ करून ठेवावीत. यामुळे नंतर भांडी घासायला वेळ लागला तरी ती कमी पाण्यात पटकन स्वच्छ निघतात.

( हे लिहीताना ताईंचा सल्ला अशा सदरासाठी लिहील्यासारखे वाटले!)

मुक्त विद्यापीठाकडून पर्यावरणाचे जागतिक धडे

चांगली बातमी

.....
' ग्लोबल रिलिज फॉर नोबल कॉज' साधू पाहणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या 'ज्ञानगंगोत्री' या मुख्यालयात गुरुवारी या संचाचे प्रकाशन होणार आहे. सायंकाळी पाचपासून हा संच कोणालाही डाऊनलोड करून घेता येईल. संच www.ycmouvirtuallearning.org या वेबसाईटवर उपलब्ध असेल.
......

स्तुत्य उपक्रम | हायकोर्टाचा आदेश?

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. ३० सीडींचा संच बनवण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली असावी.

बातमीत पुढे

हायकोर्टाच्या आदेशामुळे कॉलेजांमध्ये पर्यावरण हा विषय सक्तीचा झाला असला....

असे म्हटले आहे. या हायकोर्टाच्या आदेशाविषयी कोणाला अधिक माहिती आहे का?

स्तुत्य आहे -

सांगितले गेलेले सर्व उपाय आम्ही करतो. (जिथे शक्य आहे तिथे सल्लेसुद्धा देतो. )

पण - मुळात पर्यावरण केवळ सर्वसामान्य घरगुती वर्तनामुळे नाश पावत आहे असे मला तरी वाटत नाही. औद्योगीकरण हा या हानीचा प्रमुख भाग आहे.
संघटित औद्योगिक क्षेत्रात आता पर्यावरणविषयक जाणीव मूळ धरू लागली आहे. (आयएसओ १४०००, हरित इमारती वगैरे..)परंतु असंघटित क्षेत्रात अजूनही ही जाणीव नाही. आपल्यातले बरेच जण अशा क्षेत्रात काम करत असतील किंवा असे लोक त्यांना माहित असतील. त्यांनाही काय करता येईल याच्या काही सूचना / उपाय असतील तर तेही कळवावेत. (उदा.
वेल्डिंग सुरू नसताना ट्रान्सफॉर्मरचे मेन स्विच बंद करावे. नाहीतर प्रायमरीमध्ये विद्युतप्रवाह खेळत राहून विजेची नासाडी होते.
सोल्डरिंग करताना नको असेल तेंव्हा सोल्डरिंग आयर्न बंद ठेवावी.
जेवायच्या सुटीच्यावेळी कामाच्या ठिकाणचे पंखे/ दिवे बंद करावेत.
यंत्रांचे ढिले पडलेले पट्टे वेळेवर बदलावेत.
वापरात नसलेली यंत्रे/वाहने बंद करावी.
सर्व यंत्रांना वेळच्या वेळी दुरुस्त करावे / योग्य वेळेस वंगण घालावे.
औद्योगिक वापरातले पाणी वाहून जाऊ देऊ नये. ते बागकाम अथवा तत्सम उपयोगात आणून जमिनीत मुरवावे.)

अशी सूची अगोदरच प्रसिद्ध झाली असेल तर ती कोठे मिळेल?

खारीचा वाटा

पण - मुळात पर्यावरण केवळ सर्वसामान्य घरगुती वर्तनामुळे नाश पावत आहे असे मला तरी वाटत नाही. औद्योगीकरण हा या हानीचा प्रमुख भाग आहे.

आपले म्हणणे अगदी रास्त आहे. लेखाचा उद्देश एवढाच आहे की पर्यावरण संवर्धनाच्या मोठ्या लढाईत 'मी' सुद्धा खारीचा वाटा उचलू शकतो ही जाणीव आपल्या मध्ये निर्माण व्हावी. कदाचित आपल्यापैकी अनेकजण उद्या मोठ्या कंपन्या काढतील तेंव्हा ते पर्यावरणा बद्दल नक्कीच जागरूक असतील.

बाकी, आपण सूचविलेले सर्वच उपाय कोणाही व्यक्तिला सहज जमण्यासारखेच आहेत. (किमान हे उपाय आपण संबंधित व्यक्तींपर्यंत तरी नक्किच पोहचवू शकतो) माहितीबद्दल धन्यवाद. आपण सर्वांनी आपापल्या क्षेत्रातील अनुभव व ज्ञान इथे शेअर केल्यास माहितीत भर पडेल. उदा. चाणक्य वाहन विषयातला तज्ञ आहे. तो इंधन कशा प्रकारे वाचवू शकता येईल हे सांगू शकेल.

जयेश

अरे बाप रे

जयेश, लोकांना जागे करायचे चांगले काम करतो आहे. :) मी तज्ञ वगैरे काही नाही रे. पण मला जेवढं वाटतं तेवढं नक्कीच सांगेन.

सहजसोपे / वीजबचतीचे सरकारी प्रयत्न

जयेश या समयोचित लेखाबद्दल धन्यवाद! सुचवलेले उपायही सहजसोपे आणि तरीही परिणामकारक आहेत.

"वीज वाचवा" असा संदेश देणार्‍या मस्त जाहिराती टिव्हीवर आणि वर्तमानपत्रात येतात त्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी ( Bureau of Energy Efficiency) तर्फे दाखवल्या जातात. त्यांच्या संकेतस्थळावर (http://www.bee-india.nic.in) बरीच इंटरेस्टिंग माहिती उपलब्ध आहे.

छान

छान उत्तम आणि वेगळे लेखन. वाचून बरे वाटले!
सी एफ एल चे दिवे वापरणे हा विजेसाठी चांगला पर्याय आहे.

परंतु या दिव्यांमध्ये पारा असतो आणि अर्थात हे दिवे फुटले तर तो पारा विषारी प्रदुषण करतो असे ऐकले आहे.
आशा आहे की आपल्याकडेही कचर्‍याचे याचे वर्गिकरण करण्याची पद्धती कधी तरी येईल.
तसे झाले तरच हा प्रश्न सुटेल. आताच्या पद्धती नुसार डंपींग ग्रांउंडची पद्धती सुरु राहीली तर अजून अनावस्था ओढवेल अशी भीती मागे व्यक्त झाली आहे.

यावर कुणी काही सांगु शकेल काय?

आपला
गुंडोपंत

अजून काही.

-फ्रिज जरा पुढे ओढून मागे हवा खेळती राहेल असे पहावे. नियमितपणे डिफ्रॉस्ट् करण्याची सवय लावून घ्यावी. बाहेरगावी जाताना फ्रीजमधील अन्नपदार्थांची विल्हेवाट लावून स्वीच बंद करुन जावे.
-घरातील ओला कचरा बागेत, कुंड्यात जिरवण्याचा प्रयत्न करावा. बाग नसेल तर केवळ कुंड्यांमध्ये ओला कचरा बारीक चिरुन टाकला तरी आपोआप खत होते. (उपक्रमावर यासंबंधीचा एक समुदाय सुरु करेन म्हणतो.)
-पाणी वाचवण्यासाठी गाडी न धुता पुसुन घ्यावी. कव्हर असेल तर आळशीपणा न करता, न चुकता घालावे.
-आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे ठराविक किलोमीटर नंतर तेलपाणी करुन घ्यावे. पेट्रोल, शहराबाहेर गेल्यावर येतायेता भरुन घ्यावे, स्वस्त पडते.
-आजकाल विविध उपकरणांत रिचार्जेबल सेल वापरले जातात. असे सेल दर काही दिवसांनंतर पूर्ण रिकामे करण्यासाठी छोटी बॅटरी किंवा जुन्या वॉकमनमध्ये घालून पूर्ण ड्राय करुन पुन्हा पूर्ण चार्ज करावेत. जेणेकरुन त्यांचे आयुष्य वाढेल.

-सौरभदा.

लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले.

.

उत्तम

उत्तम लेख आणि चर्चा. या निमित्ताने ही चित्रफीतही बघावी.

----

गाड्या आणि आपण

आपल्यातले बरेच जण हमखास दुचाक्या वापरतो आणि काहीजण चारचाक्या सुद्धा. येथे अनेकांनी गाड्यांची काळजी घ्यावी हा मुद्दा मांडला आहेच. मी काही मुद्दे सांगतो.

आपण शक्यतो गाडी बंद पडली अथवा गाडी पंक्चर झाल्यावरच निगा ठेवण्याचा विचार करतो. पण नियमीत निगा ठेवल्यास, आपले भले (गाडी चांगली राहिल्याने, खिसा सांभाळल्याने) आणि पर्यावरणाचे भले करू शकतो.

गाडीच्या चाकांमधली हवा हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. योग्य दाबाची हवा नसल्यास गाडीच्या इंधन क्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. हवा कमी असल्यास इंधन जास्त जळते. त्यामुळे योग्य दाबाची हवा भरा. हल्ली बाजारात घरी हवा भरायचे पंप मिळतात. तसेच चार चाक्यांसाठी महत्वाचा मुद्दा म्हणजे हवा योग्य दाबाची हवीच पण चाकांचे परिवर्तन होणे गरजेचे आहे. म्हणजे सर्व टायरची झीज सम प्रमाणात होते आणि टायरचे, पर्यायाने इंजिनचे आयुर्मान वाढते. हवेचा दाब तपासताना शक्यतो चाके थंड असताना तपासा. जर कोणी ट्युबलेस टायर वापरत असेल तर चाकात नायट्रोजन भरा.

पेट्रोल इंजिनच्या बाबतीत ठराविक कालावधीने कार्बोरेटर तपासून घ्या. तसेच ऐअर फिल्टर सुद्धा. इंधन आणि हवेचे जेवढे चांगले मिश्रण तेवढे कमी प्रदूषण.

तसेच गाडीत इंधन भरताना ते विश्वासार्ह पंपावरच भरा. भेसळयुक्त इंधन आपली गाडी आणि पर्यावरण सगळ्यांसाठीच धोकादायक आहे.

गाडीची नियमीत (ठराविक कालावधीने) तपासणी नेहमीच उत्तम ठरते. ती सुद्धा, शक्यतो योग्य म्हणजेच कंपनीच्या सेवादात्याकडूनच करावी.

लेख आणि प्रतिसादही

माहितीपूर्ण आहेत !!!

(महाविद्यालयांमधे गेल्या वर्षापासून पदवीच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण हा आवश्यक विषय करण्यात आलेला आहे. )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१ - निवासी संकुलाच्या गच्चीवर

आणि बाहेरच्या भिंतींवर वाघनखीसारखे वेल वाढवण्याने घराच्या आतील तपमानात लक्षणीय फरक पडतो. घराच्या आसपास उंच झाडे वाढविण्यानेही घरात पंखे/कूलर्स लागणे कमी होते.
२ - निवासी इमारतीच्या मुख्य पाण्याच्या टाकीतून जोड घेऊन संपूर्ण इमारतीसाठी सौरबंब बसवून पाणी तापविण्याची यंत्रणा बसवून घेतली तर सर्वांना ५५ ते ६० डि.सें.चे पाणी पावसाळ्याचे २-३ महिने सोडता वर्षभर मिळू शकते
पाणी तापविण्याच्या खर्चात खूप बचत होते.
३ - वाळ्याचे पडदे हे आता कालबाह्य होत चालले आहेत पण बैठकीच्या खोलीच्या खिडकीत सोडलेला ओला वाळ्याचा पडदा हा सुखद अनुभव घेऊन पहावा असाच असतो. सुवासिक हवेसह भरपूर ऊर्जा बचत.
४ - चहा/कॉफी - सर्वसामान्यपणे सर्व घरातून घेतली जाते. ज्यांच्याकडे भरपूर गरम पेये दिवसभरात होतात त्यांनी थर्मासचा वापर करुन कोरा चहा/कॉफी भरुन ठेवावी गरजेप्रमाणे वापरता येते. सतत गॅस वापरला जात नाही ऊर्जेत बचत.
५ - घरापासून एकाच दिशेने प्रवास करुन होणारी कामे एकत्र करुन त्यांचे नियोजन केले तर खूपच वेळ, इंधन, दगदग, मनस्ताप (प्रदूषणाचा त्रास) इ. वाचतो. (ह्यात विशेष काय असे वाटण्याची शक्यता आहे पण कित्येक वेळा आठवतील तशी कामे करत गेल्यामुळे धावपळीच्या मानाने कामे निपटली जात नसल्याचा अनुभव आपल्या सर्वांना कधी ना कधी आलेला असतो. थोड्या नियोजनाने त्यात किती बदल घडतो ते आश्चर्यकारकरित्या कळून येईल.)

चतुरंग

 
^ वर