उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी
वेमीत्८५
May 4, 2008 - 11:22 am
मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी उपक्रम वर हजेरी लावने आवश्यक आहे.
बरोबर आहे का ? असल्यास का ? नसल्यास का नाही ?
मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी इतर पर्याय काय ते सुचवा
मराठीत लिहा , मराठीत बोला
दुवे:
Comments
या पेक्षा जास्त हवे,
उपक्रम हा आपला विरंगुळा आहे, मराठी भाषा वर्धिष्णु व्हावी असे वाटत असेल तर मराठी शाळा परत फुलाव्या हाच एक कलमी कार्यक्रम राबवायला हवा.
कशी काय?
मराठी शाळा परत फुलून मराठी कशी काय जीवंत राहणार बॉ? जरा स्पष्ट कराल का? तसेच इंग्रजी शाळा का फुलत आहेत याचे सुद्धा उत्तर दिलेत तर बरे होईल.
यथायोग्य उत्तर.
मराठी शाळा जर परत फुलत गेल्या तर त्यातील मुले आपली मातृभाषा नक्कीच त्यांच्या कारकिर्दीपर्यंत समजा पूढील ५०/६० वर्ष जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करतील. कोणास ठाऊक यात एखादा शिवाजी,सावरकर, विनोबा, साने गुरुजी, वि वा शिरवाडकर जन्मेल आणि मराठी भाषा परत परमोच्चस्थानी घेऊन जाईलही कदाचित...
आता माझ्या मताप्रमाणे इंग्रजी शाळा का फोफावत आहे? मराठी लोकांची पराकोटीची परदास्यता, मध्यम आणि उच्चमध्यमवर्गीयांची मराठीची उपेक्षा, शासनाचे चुकीचे धोरण, शिक्षणसम्राटांनी केलेले मराठीचे अडवणूक इत्यादी इत्यादी. सर्वसामान्य लोकांना असे वाटते की इंग्रजी माध्यमाचा आश्रय घेतला की पूढे रोजगार अथवा चांगल्या नौकरीची हमी इत्यादी इत्यादी.
असो आपले काय मत आहे हेही मांडावे आणि मराठीला वैभवाच्या साठी काय करायला हवे हेही सांगावे.
माझे मत आणि प्रश्न
काही प्रश्न:
मराठी शाळा जर परत फुलत गेल्या तर त्यातील मुले आपली मातृभाषा नक्कीच त्यांच्या कारकिर्दीपर्यंत समजा पूढील ५०/६० वर्ष जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करतील.
मराठी भाषा फक्त शा़ळेतच फुलते का?
सगळेच मराठी लोक जे महाराष्ट्रात मराठी बोलतात ते शाळेत जातात का? गेले आहेत का?
मराठी मरते आहे म्हणजे नक्की काय होते आहे? त्याचा आणि शाळेचा काय संबंध?
पालक आपल्या पाल्यांना शाळेत का घालतात? (हे सगळे प्रश्न कदाचित विषयला धरून वाटणार नाहीत. पण तरी सुद्धा उत्तरे दिलीत तर चर्चा योग्य प्रकारे पुढे जाण्यास सोपे होईल.) थोडक्यात शिक्षणाचा मुख्य हेतु काय?
मराठी भाषा परमोच्चस्थानी जाणे म्हणजे नक्की काय? तसेच मराठीची उपेक्षा म्हणजे काय आणि मराठीला वैभव प्राप्त होणे म्हणजे काय?
या आणि अशा प्रश्नांवर आपण चर्चा करू. चर्चा करताना माझी मते आणि उपाय आपोआपच मांडता येतील.
आपल्या उत्तरांच्या प्रतिक्षेत.
परत एकदा...
मराठी भाषा फक्त शा़ळेतच फुलते का?
हो. मराठी भाषेचा कस आणि स्त्रोत हा मराठी शाळा आहे. प्राथमिक आणि उच्चमाध्यमिक शाळांचे माध्यम मराठी असले तर आपली भाषा ही कायमस्वरुपी राहण्याची आशा आहे.
मराठी मरते आहे म्हणजे नक्की काय होते आहे? त्याचा आणि शाळेचा काय संबंध?
मराठी भाषा ही बाहेर कमी प्रमाणात बोलली जाते, आपण बाहेर रस्त्यावर उभे राहिले आणि काही संवाद ऐकले तर हे आपल्या लक्षात येईलच. मी माझ्या कामानिमित्त्य बराच फिरत असतो, शहराच्या बाहेर आलो म्हणजे तरुणाच्या बोलण्यात हे लगेच जाणवते. इंग्रजाळलेले मुले आणि मराठीमाध्यमाची मुले यातुन हा भेद दिसतो.
थोडक्यात शिक्षणाचा मुख्य हेतु काय?
सध्या सर्वसामान्य लोकांच्या मते शिक्षणाने रोजगार / नौकरीच्या संधी / परदेशगमनाच्या संधी इत्यादी इत्यादी. यात बरेच पैलु आहेत.
माझी एक विचारणा, आपण मराठी वृत्तपत्रे वाचत असालाच्, प्रत्येक वर्षी अमूक अमूक मराठी शाळा बंद पडल्या, अमूक अमूक मराठी विभाग बंद झाले असे मी वाचत असतो.
अनुत्तरीत प्रश्न
आपण सर्व प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत अजुन :)
महत्वाची वाटली त्याची उत्तरे दिली आहेत.
मला जी प्रश्न महत्वाची वाटली त्याची उत्तरे दिली आहेत, अजूनही काही प्रश्न बाकी असतील तर विचारावी.
माफ करा
माफ करा पण आपण चर्चा खुंटवत आहात. हे म्हणजे गांधीजींसारखं झालं. येथे व्यक्तिला महत्व नाही तर विषयाला महत्व आहे. येथे आपण व्यक्तिसापेक्ष चर्चा नाही करत आहोत. आपण मराठी न मरण्यासाठी चर्चा करत आहोत. सगळेच प्रश्न तेवढ्याच महत्वाचे आहेत. कृपया उत्तरे द्यावीत. मराठीचे मरण हा गंभीर विषय आहे हे आपल्या दोघांचे/तसेच सर्व मराठी भाषिकांचे सामायिक मत आहे. त्यात दुमत नाही. त्यामुळे मराठीसाठीचे सगळेच प्रश्न सारख्या महत्वाचे आहेत. हि चर्चा पुढे नेण्यास आपल्यास स्वारस्य नसल्यास स्पष्ट करावे. मग आपण थांबू शकतो.
प्रश्न स्वारस्याचा नसून माझ्या क्षमतेचा आहे.
प्रिय चाणक्य,
आपले म्हणणे मला मान्य आहे. मला जितके मुद्दे मांडता आले आणि जितक्या प्रश्नांची उत्तरे देता आली ती देण्याचा यथायोग्य प्रयत्न केला. आता आपला हा प्रतिसाद वाचल्यानंतर असे वाटते की माझ्यातील काही क्षमता कमी असाव्यात.
आपण म्हटल्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या स्वारस्याचा विषय असल्यामूळे आणि आपला अभ्यास असल्यास आपण काही कृती योजना सांगावी. मराठीचा विकास अथवा उत्कर्ष होणार असल्यास आपली सर्व मते, उपाय मला पूर्णत: मान्य असतील असे मी सांगू इच्छितो.
आपला,
द्वारकानाथ
क्षमता
तुमची क्षमता ओळखण्या एवढा मी मोठा नाही आणि आपण एकमेकांच्या क्षमते बद्दल बोलण्या इतपत एकमेकांना ओळखत ही नाही. त्यामुळे क्षमता असा विषय आल्याने वेगळेच वळण लागेल. कटुता टाळण्यासाठी मी हा विषय येथे माझ्या तर्फे थांबतवत आहे.
मला स्वतःला मराठी भाषा आवडते, ती माझी मातृभाषा आहे. मराठी भाषा मरते आहे का? हा माझा मुख्य मुद्दा आहे. मातृभाषेत शिकणे सर्वात सोपे. पण जागतिकीकरणाने खेडे झालेल्या या पृथ्वीवर मराठी भाषा आणि मराठी माणून हे अल्पसंख्यांक आहेत. भारतात अल्पसंख्यांकांची कौतुके होतात तेवढी जगात कोठे होत असल्यास माहिती नाही. साहित्य क्षेत्रात मराठीप्रेम मला पुर्णपणे मान्य आहे. पण त्यासाठी मराठी शाळा हा एक कलमी कार्यक्रम हास्यास्पद आहे.
बाकी मुद्दे सविस्तर आणि वेळे मिळेल तसे लिहायचा विचार आहे. पण थोडक्यात सांगायचे तर मराठी शाळेपेक्षा महाराष्ट्रातल्या सर्व भाषांच्या शाळेत मराठीचा कसा प्रसार करता येईल असा विचार केल्यास मराठी जास्त वाढेल. माझ्या शब्दांमुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व.
अवांतरः या चर्चेत आपल्या व्यतिरिक्त फारच थोड्या लोकांनी प्रतिसाद दिले आहेत. ते प्रतिसाद वाढवण्यासाठी काही कृती योजना हवी का? की उपक्रम सदस्यांना मराठीच्या जीवन मरणाचे काही देणे घेणे नाही? की अशा चर्चांमध्ये कोणालाच स्वारस्य नाही?
थांबवू नका
मराठी असा एक विषय असणे आणि सर्व विषय मराठीतून शिकवणारी (मराठी माध्यमाची) शाळा असणे यात बराच फरक आहे. माझा खालील प्रतिसाद पाहावा. मराठी फक्त एक भाषा म्हणून शिकली तर तिचीही अवस्था शाळेत शिकवल्या जाणार्या संस्कृत, जर्मन सारखी होईल. मराठी प्रचारात राहण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा टिकणे आवश्यक आहे हे थोडा विचार केला तर कोणालाही पटेल.
तुम्हाला 'मान्य' आहे म्हणजे? असो. माझ्या खाली दिलेल्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे
शाळेत जर्मन/संस्कृत शिकणार्यांपैकी किती विद्यार्थी त्या भाषांमधील साहित्य वाचू शकतात? त्या भाषांमधील उच्च दर्जाचे साहित्य समजण्याची पात्रता त्यांच्यापैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांमध्ये येतच नाही.
मराठी टिकण्यासाठी मराठी शाळा असणे हा उपलब्ध उपायांपैकी सर्वात प्रभावी उपाय आहे असे वाटते. तुम्हाला हास्यास्पद वाटतो तर ते तुमचे मत. दुसर्याच्या मताला आम्ही हास्यास्पद म्हणणार नाही.
मराठी टिकवण्यासाठीचे व्यवहार्य उपाय यावर तुमची बहुमूल्य मते दिल्याशिवाय विषय संपवू नका. कटुतेचे काय हो, आम्ही सहन करू.
बर नाही थांबवत
बर नाही थांबवत. मग माझी कुवत नाही असं म्हणलं तर कस? :)
भाषा - साहित्य - अर्थार्जन आणि विरंगुळा या बद्दल आपले मत काय आहे?
जगातल्या जास्तीत जास्त लोकांची व्यवहाराची भाषा इंग्रजी आहे. जागतिकी करणात टिकाव लागण्या करिता इंग्रजी येणे गरजेचे आहे. विरंगुळ्यासाठी नव्हे.
बर मला एका प्रश्नाचे उत्तर द्या. शालेय शिक्षणा नंतर सर्वच शाखांचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम मराठीमध्ये का नाहीत? काहींचे आहेत. पण मग बाकीच्या शाखांनी काय घोडं मारलय?
कोणती भाषा शिकावी आणि त्या भाषेचा कसा वापर करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. बहुभाषिक असल्याने झाला तर फायदाच होईल. आणि हो, शाळेत जर्मन/संस्कृत शिकून त्या त्या भाषांमधले उच्च दर्जाचे साहित्य वाचणारे शोधले तर नक्कीच सापडतील.
या उलट, इंग्रजी, हिंदी या प्रथम भाषा नसताना सुद्धा अनेक मराठी भाषक/वाचक या भाषांमधले उच्च दर्जाचे साहित्य वाचातात असे निरिक्षण आहे.
कुवत, प्रश्न आणि उपाय
असंबद्ध प्रश्नांना उत्तर देण्याच्या कुवतीबद्दल ते बोलत असावेत. (संदर्भ : हे सगळे प्रश्न कदाचित विषयला धरून वाटणार नाहीत. पण तरी सुद्धा उत्तरे दिलीत तर चर्चा योग्य प्रकारे पुढे जाण्यास सोपे होईल. http://mr.upakram.org/node/1215#comment-20051 )
ही वाक्ये बर्याच अंशी खरी आहेत. "चीनी भाषेत अमुक इतकी मूळाक्षरे आहेत", "जर्मन भाषेत अमुक इतके स्वर आहेत" यासारखीच. पण याचा सदर विषयाशी काय संबंध आहे कळत नाही.
या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असावीत. विज्ञान/तंत्रज्ञानाच्या आधुनिक विषयांचे मराठीकरण झाले/होऊ शकले नाही हेच कारण. अनेक देशात अजून आधुनिक विज्ञानदेखील त्यांच्या भाषेत शिकतात. तसे भारताचे झाले असते. पण तसे होऊ शकले नाही ही वस्तुस्थिती आहे. जे मराठीत नाही ते मराठीत आणण्याचा प्रयत्न करावा असे कोणी म्हणत नाही. आहे ते टिकवले तरी पुरेसे आहे.
नक्कीच सापडतील, पण किती? एकूण विद्यार्थीसंख्येच्या मानाने अगदी कमी.
असो तुम्ही प्रश्नच विचारता बुवा. आता अधिक वेळ न दवडता मराठी टिकवण्यासाठीचे व्यवहार्य उपाय यावर तुमची बहुमूल्य मते यावर कृपया लिहावे.
प्रश्न
त्या प्रश्नांचा या विषयांशी अप्रत्यक्ष संबंध नक्कीच आहे. म्हणुनच तुम्ही माझेच परत दिलेले वाक्य आहे ते मी लिहिले आहे.
शाळा भाषा शिकवताना गोडी शिकवत नाही. शाळा भाषेचे सर्वसामान्य स्वरूप शिकवते. ते शिकून त्याचा वापर कसा करायाचा प्रश्न विद्यार्थ्यांचा. मग ती मुळाक्षरे असोत वा स्वर, शाळेत शिक्षण दिले जाते ते व्यवहारी जगातले ज्ञान मिळवण्यासाठी. मी शाळा मराठी माध्यमातून शिकलो. पण रोजचे काम करायला मला मराठी पेक्षा इंग्रजी भाषेचा जास्त उपयोग होतो.
प्रश्नांची उत्तरे मला माहित आहेतच. विचारले आहेत ते आत्मपरिक्षण करण्यासाठी. मराठी बद्दलचे प्रेम असण्यात गैर नक्कीच नाही. पण अतिरेकी प्रेम काय कामाचे? मराठी भाषा वर्धिष्णु व्हावी असा नारा लावायचा आणि मराठी बद्दलच खास करून शुद्धलेखन, व्याकरण हा जो भाषेचा साचा असतो, (थोडक्यात भाषेचे सुद्धा नियम असतात) त्यालाच, मराठीतच शिव्या घालणार्यांना कृतज्ञता पत्रे द्यायची?
पण सापडतील ना?
विज्ञान/तंत्रज्ञानाचे मराठीकरण झाले नाही हे कारण सर्वांना माहित आहे. आपण जे विज्ञान/तंत्रज्ञान म्हणतो आहे त्याचा मुळ अभ्यास आंग्ल भाषेत उपलब्ध आहे. तो मराठीत नाही. तो समजून घेण्याकरता मराठीचा उपयोग शून्य आहे. अगदी सामन्य उदाहरण द्यायचे झाले तर जाउन एखाद्या डॉक्टरला सांगा माझ्या धमन्यांना थोडा त्रास आहे, चेतातंतू पण काम करत नाहीत अन मज्जातंतू सुद्धा बिघडले आहेत. तो सांगेल मला नक्की काय होतयं ते सांगा. तो सुद्धा हे शिकताना मराठी भाषेत शिकत नाही. दुसरे उदाहरण सर्वसामान्य माणसाचे, शालेय शिक्षण न घेतलेल्या माणसाचे, कामवालीला सांगा कि एवढा जाद्याच काम करून जा. ती सांगते - टेम/टाइम नाय माझ्याकड.
मी मराठीतुन शिक्षण घेण्याचा तिरस्कार करत नाही. पण मराठीच्या वाढीसाठी फक्त मराठीतुन शिक्षणाचा पुरस्कार नक्कीच करणार नाही. आता पालक पाल्यांना मराठी माध्यमातुन शिकवण्याचा विचार करताना दिसत नाहीत याचे कारण शोधायचे झाले तर काही कारणे अशी दिसतात की, पालकांना स्वतःला अमराठी व्यक्ती (अमराठी म्हणजे मग कन्नड अथवा जर्मन अथवा इंग्रज कोणी ही) सोबत प्रत्यक्ष संभाषण करताना (मुलाखत, चर्चासत्रे इत्यादी) असणारा इंग्रजी भाषेबद्दलचा न्युनगंड, जो ते त्यांच्या पुढच्या पिढीत पाहू इच्छित नाहीत. तसेच, जर एखादा मराठी माणूस अर्थार्जनसाठी महाराष्ट्रा बाहेर राहात असेल आणि राहण्याचे ठिकाण (भारतात अथवा भारता बाहेर) सारखे बदलत असेल तर आंग्ल माध्यमात मुलांना शिकवणे त्यांच्यासाठी तसेच मुलांच्या भवितव्यासाठी सोयिस्कर ठरते. अशा वेळी मराठीचे संस्कार घरात होऊ शकतात नव्हे, होत असतातच.
मराठीचा वापर वाढण्यासाठी ती माहिती असणे गरजेचे आहे. पुर्ण शालेय शिक्षण मराठीत गरजेचे नाही. व्यवहार्य उपाय आपण सर्वांनी मिळून शोधायचे आहेत. दुसर्याच्या अंगावर जबाबदारी टाकली की झालं का?
मराठी टिकवण्यासाठीचे व्यवहार्य उपाय यावर माझी बहुमूल्य (?) मते :
मी स्वतः ज्या अमराठी लोकांच्या संपर्कात येतो त्यांना थोडे मराठी शिकवतोच. यामध्ये परत भारतीय आणि अभारतीयांचा समावेश आहे. मते मांडतानाच स्वतः पासून सुरुवात योग्य. नाही का? तरच मतांना किंमत आहे. नाहितर मग एका क्षुल्लक गोष्टीसाठी अनेक दुर्गुण दुर्लक्षीत करून कृतज्ञता वक्त करण्याचा नसता प्रकार होतो.
मराठी माध्यम | न्यूनगंड | घरात मराठीचे संस्कार
मराठी माध्यमातून शिक्षण दिले नाही तर महायुद्ध, तह (इतिहास), सौरमाला, कक्षा, सूर्यग्रहण (भूगोल), त्रिकोण, आयत, अंश (भूमिती), वेग, विस्थापन, बल, वजन (भौतिकशास्त्र) मूलद्रव्य, संज्ञा, संयुजा, आवर्तसारणी, रसायन (रसायनशास्त्र), पेशी, केंद्रक, द्विदल-एकदल (जीवशास्त्र) इ. इ. अनेक शब्द मुलांच्या वाचनात (शाळेचा अभ्यास, शिकवण्या, खेळ, टिव्ही, सिनेमा, व्हिडिओ गेम इ. करून त्यांना अवांतर मराठी पुस्तके वाचायला वेळ मिळतो असे मानले तर!) येण्याची शक्यता फारच कमी. असे शब्द माहीत नसतील तर त्यांच्या वापरात येणार नाहीत आणि कालांतराने विस्मरणात जातील. "ट्रँगलच्या सगळ्या अँगल्स ची सम वनएटी असते." असे मराठीचे स्वरूप बनून जाईल. 'टाइम', 'टेबल', 'बूट' असे रोजच्या वापरात रुळलेले अनेक परभाषीय शब्द आहेत. इंग्रजी असतील, फारसी असतील, उर्दू असतील किंवा पोर्तुगीझ असतील. कोणत्याही भाषेसाठी हे अगदी स्वाभाविक आहे.
न्यूनगंड असणे/नसणे हे त्या त्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्याचे लक्षण आहे. कोणत्या माध्यमात शिक्षण झाले याने आत्मविश्वास/न्यूनगंड यावर थेट परिणाम होतो असा काही अभ्यास झाल्याचे माझ्या वाचनात नाही.
आवडीने आपल्या मुलांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न करणारे पालक (चिकाटीला असलेल्या मर्यादा आणि वेळेची कमतरता यांचा विचार करून) आणि मराठी शिकणे ज्यांना आवडते अशी मुले (भाषा आणि तिचे महत्त्व वगैरे कळण्याचे वय नसताना) यांची संख्या एकूण पालक-मुलांच्या तुलनेत नगण्य असेल. आणि आता इंग्रजी माध्यमात शिकून पुढे पालक झालेल्यांना मुळात मराठी आपल्या मुलांना शिकवावी असे वाटेल का आणि वाटले तरी ते शिकवण्याची पात्रता त्यांच्यात असेल का? या प्रश्नांची उत्तरे नकारात्मकच द्यावी लागतील. त्यामुळे "संस्कार घरात होऊ शकतात" हे स्वप्नरंजन किंवा भाबडा आशावाद प्रकारचे आहे.
हा तुमचा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे पण याने मराठीचा वापर वाढण्यास कशी मदत होईल ते कळले नाही. तुम्ही अश्या लोकांना काय काय शिकवता? ते मराठीतून किती वाक्ये बोलू शकतात? वगैरे माहिती दिली तर सर्वांनाच या पद्धतीचा अवलंब करणे शक्य होईल.
हे डोक्यावरून गेले. याचा या चर्चेशी काय संबंध आहे?
थोडे विवेचन असायला हवे होते.
मराठीतच शिव्या घालणार्यांना कृतज्ञता पत्रे द्यायची?
नाहितर मग एका क्षुल्लक गोष्टीसाठी अनेक दुर्गुण दुर्लक्षीत करून कृतज्ञता वक्त करण्याचा नसता प्रकार होतो.
श्री. चाणक्यांनी यावर थोडे विवेचन केले असते तर बरे झाले असते म्हणजे पूढील वेळेस योग्य ती काळजी घेता आली असती.
http://www.misalpav.com/node/1574
यावर आपल्याला या उपक्रमाविषयी योग्य ती माहिती मिळेल अशी आशा आहे.
थोडी माहिती : या वर्षापासून आपण मराठीसाठी कार्यमग्न / कृतीगट करणार्या लोकांना कृत़ज्ञता पत्र आणि आवश्यक असेल तर रोख रक्कम असे स्वरुप ठेवले आहे. हा उपक्रम प्रत्येक चैत्र पाडव्याला करण्याचा मानस आहे. यात आपल्या सारख्या सर्वच मराठी प्रेमीची मदत लागणार आहे. असो. बाकी खरडवहीत
मराठी प्रेम
आमच्या सारखे मराठी प्रेमी नक्कीच मदतीसाठी धावून येतील. पण.... त्या लेखातल्या दुव्यातली (पीडीफ) मते ही आपली वैयक्तिक मते आहेत असा आमचा आजवरचा समज आहे आणि तेथे तसे आपण स्पष्ट सुद्धा केले आहे. त्यामुळे त्यावर जाहिर भाष्य करणे टाळले आहे. तसेच करू इच्छित नाही. या उपक्रमा सोबतच येथे एक लोकमित्र मंडळाचा अत्यंत सुंदर उपक्रम सुरु झाला आहे. मराठी भाषेतल्या अनेक संकेतस्थळांच्या निर्मीतीसाठी अनेक मराठीजन कार्यरत आहेत. मी त्याला मराठीची चौफेर घौडदौड समजतो. मराठी मरते आहे या वाक्याला या आणि अशा अनेक प्रयत्नांमुळे अर्थ उरत नाही. उलट मराठी वाढते आहे. सर्व क्षेत्रात, सर्व वयोगटात. नाही का?
आशावाद
मराठी शालेय शिक्षणाने मराठीचा सर्वांगीण विकास होईल हा आशावाद होऊ शकतो तर संस्कार घरात होऊ शकतात हा आशावाद भाबडा असेल बॉ. पुढे काय बोलणार मग?
मराठीच्या सर्वांगीण विकासा करता कृतज्ञता पत्रे देणे हा एक उपाय आहे असे आढळून आले आहे. त्यामुळे त्याचा चर्चेशी नक्कीच संबंध आहे. असो.
शाळेत न जाता जुजबी पासून ते चांगले मराठी शिकवणे हि कला असू शकते. निदान माझे तरी मत असेच आहे. एखाद्या जर्मन माणसाने माझ्या सोबत बोलताना काही वाक्ये जरी मराठीत न चुकता बोलली तरी मला त्याचे समाधान आहे. त्यांनी मराठी साहित्य वाचावे ही अपेक्षा मी तरी करणार नाही (माझ्या सोबत रोज काही वाक्ये बोलुन त्यांना मराठीमध्ये रस वाटला आणि त्यांनी मराठीसाहित्य वाचले तर आनंदच आहे.) किंवा मी थोडेफार मराठी शिकवल्याने मराठीला एखादा शिवाजी,सावरकर, विनोबा, साने गुरुजी, वि वा शिरवाडकर जन्मेल आणि मराठी भाषा परत परमोच्चस्थानी घेऊन जाईलही अशी अपेक्षा करणार नाही.
आपण म्हणत आहात ते मराठी शब्द फक्त मराठी शाळेतच वाचायला मिळतात हे मत मला मान्य नाही. ठरवले तर सुवर्णमध्य साधुन मराठी सोबत नाळ जोडली जाऊ शकते. शेवटी भाषा हि अनेकदा गरज बनते. फ्रान्स, जर्मनीला जाउन मी मराठीच काय तर आंग्ल भाषेत सुद्धा बोलणे चुकीचे बनुन जाते. मग फ्रेंच/जर्मन भाषा ही गरज बनते आणि शिकली जाते. त्यासाठी त्यामाध्यमांचे शालेय शिक्षण घेण्याची गरज नाही पडत.
मराठी सोबतच जगात सर्वाधिक वापरली जाणारी भाषा इंग्रजी येणे हि काळाची गरज आहे. पण जर ही गरज बहुजनांना वाटत असेल तर ते सगळे वेडे आहेत आणि फक्त मराठी शालेय शिक्षणच जास्त योग्य आहे हे पटत नाही.
जर मराठी शाळा आठव्या इयत्ते नंतर सेमी इंग्लीशचा पुरस्कार करत असतील तर आपण पाठपुरावा करून इंग्लीश शाळेत खालच्या इयत्तेपासून मराठी शिकवण्याचा आग्रह का धरू शकत नाही? त्या शाळांमध्ये मराठीची आवड वाढवण्याकरीता काय करता येऊ शकेल असा विचार का नाही करू शकत? तिथे हि हसत खेळत मराठी शिकवली जाऊ शकेल असे वाटते.
मराठी शाळा आणि रस्त्यावरील मराठी
मराठी भाषेच्या भविष्याशी मराठी शाळा आणि मराठी माध्यमाचा घनिष्ठ संबंध स्वयंस्पष्ट आहे. तो समजून घेण्यासाठी एवढा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. मराठी शाळा नसतील आणि मराठी माध्यमातून शिक्षण बंद झाले तर मराठीची शेवटची घरघर सुरू झाली असे समजण्यास हरकत नाही. कारण तसे झाले तर मराठी शिकण्याची आवश्यकता उरणार नाही आणि गरज नसलेल्या गोष्टीचे माणूस (विशेषतः सध्याचा भारतीय माणूस) काय करतो हे माहीतच आहे.
रस्त्यावर किंवा घरात मराठी बोलणे पुरेसे नाही कारण रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणार्या शब्दांची संख्या एकूण मराठी शब्दांच्या संख्येच्या मानाने अतिशय कमी आहे. मराठी माध्यमातून (दहावीपर्यंत किमान आठवीपर्यंत) शिक्षण बंद झाले तर विज्ञान, गणित, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल इ. विषयाशी संबंधित अनेक शब्द फक्त वापरात नसल्याने विस्मरणात जातील. तसेच सोपे, करमणूकपर साहित्य वगळता इतर प्रकारच्या साहित्याची निर्मिती आणि वाचन कमी होत जाईल कारण थोड्या वरच्या दर्जाचे मराठी समजण्याची पात्रता राहणार नाही.
‘मराठी शाळा वाचवायच्या कशाला ? कशा?’
‘मराठी शाळा वाचवायच्या कशाला ? कशा?’
‘राजकीय पक्षांनी मराठी शाळांसाठी काय केले आणि काय करणार आहेत?’
येथे वाचा
विजय
१००% सहमत
द्वारकानाथ १००% सहमत
हे काय चालंलय बुवा?
चर्चा सुरू करणारा गायब आहे, मग हे सगळे चर्चा तरी कोणाशी करतात?
कॉल् मी क्रेझी बट् ...
चाणक्य आणि नवीन यांची चर्चा खरोखरच आवडली. दोघानीही आपली मते तीव्रतेने मांडली आहेत आणि तरीही कुठेही व्यक्तिगत मुद्द्यांवर कुणी घसरलेले नाही ! अभिनंदन.
आता "कॉल् मी क्रेझी ..." भाग. असे म्हणतात की युद्धात म्हणा , खेळाच्या सामन्यात म्हणा , जेव्हा विरुद्ध पक्षाचा सामना करायचा असतो तेव्हा , विरुद्ध पक्षाच्या डोक्यात काय चाललेले आहे, त्याची बाजू तो कसा उभी करेल/मांडेल किंवा प्रतिपक्षाचा दृष्टीकोन काय असेल हे समजून घेणे श्रेयस्कर असते; त्यातूनही काही शिकता येते. मराठी भाषेवर , मराठी भाषा बोलणार्यांवर हे जे काही मळभ आल्यासारखे लोक बोलतात, भाषेला 'जिवंत ठेवण्या'बद्दल चर्चा करतात, तेव्हा एक विचार मनात आला : या भाषेच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण करणार्या अनेकानेक कारणांमधे , आपण अमराठी लोकांच्या आर्थिक वर्चस्वालासुद्धा मोजतो. गुजराथी, मारवाडी, सिंधी , उत्तरप्रांतातील लोक मुंबईत आले आणि त्यांनी कमविलेल्या पैशाच्या जोरावर असे चित्र निर्माण झाले की, मुंबईमधे मराठी लोक अल्पसंख्य होऊन राहतील की काय.
तर , या गुजराथी, मारवाडी, सिंधी, उत्तरप्रांतीय लोकांना आपापल्या भाषेबद्दल , तिच्या अस्तित्वाबद्दल नक्की काय वाटत असेल ? त्यांना हे प्रश्न पडत असतील काय ? का भाषेच्या अस्तित्वापेक्षा, लोकांच्या अस्तित्त्वाला त्यांनी महत्त्वाचे मानले असेल ? हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने तिच्या (कृत्रिम रीतीने का होईना पण) जिवंत रहाण्याबद्दल कुणी चिंता एक वेळ करत नसेल. पण बाकीच्या भाषांचे काय ? सिंध तर आख्खा प्रांतच पाकिस्तानात गेला. त्या भाषेची आजची अवस्था (माझ्या जुजबी माहितीनुसार) मृतवत् असल्यागत जमा आहे. मारवाडी समाजाची जी काय भाषा आहे ती ज्ञानभाषा बनवण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न चालले आहेत किंवा कसे हे मला माहीत नाही. गुजराथी भाषेने स्वयंपूर्ण बनावे, ज्ञानभाषा म्हणून तिची वाढ व्हावी म्हणून प्रयत्न चालले आहेत , किंबहुना तिच्या अस्तित्त्वाबद्दलच काही एक चर्चाविमर्श होत असेल किंवा कसे , याची मला कल्पना नाही. पण मी असे धरून चालतो की बहुदा त्या आघाडीवर , गुजराथी समाजामधे बर्यापैकी शांतता असावी.
मी वर जे म्हण्टले याचा अर्थ, आपण भाषेकरता काही करू नये , ही चर्चा व्यर्थ आहे असे मला म्हणायचे नाही. जरा आपल्या भाषेच्या पलिकडे काय चालू आहे याचा कानोसा घेण्याचा हा प्रयत्न आहे, इतकेच.
तुम्हाला या संदर्भात काय वाटते ? कांचनाच्या मागे जाण्याच्या "सर्वे गुणा:" च्या बाबतीतीली गोष्ट भाषेच्या बाबतीतही खरी , असे समजावे काय ? आर्थिक वर्चस्व मिळवा , मग भाषेच्या अस्तित्वाची चिंता बाळगायचे कारण राहणार नाही असे तर या मंडळींचे म्हणणे नाही ?
मुद्दा पटला
तुमचा मुद्दा पटला. मुळात माणसाचे अस्तित्व महत्वाचे आहे मग भाषा. खरेतर जागतिक लोकसंख्येचा विचार करता अशा अनेक भाषिकांना आपल्या भाषेची चिंता आहे. पण त्या चिंते मागचे मूळ कारण काय? याचा शोध घेणे जास्त गरजेचे आहे. मी माझ्या सुरूवातीच्या प्रतिसादांमध्ये जे प्रश्न विचारले त्यामागे मूळ हेतू तोच होता. पण कदाचित मी ते वेगळ्या प्रकारे मांडायला हवे होते.
चर्चेतील विषय आणि इतर विषयांचे महत्त्व
अर्थकारण, इंग्रजी ही ज्ञानभाषा, मुळात माणूस टिकला पाहिजे इ. इ. सर्व गोष्टी आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत. पण "मराठी टिकवण्यासाठी काय काय करता येईल" या चर्चेत 'इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे', 'इंग्रजी शाळेत शिकणे फायद्याचे आहे', 'शाळेत कशासाठी जायचे' वगैरे विचार मांडणे (हे विचार आपापल्या ठिकाणी योग्य आहेत असे मानले तरी) तर्कसुसंगत नाही, अप्रस्तुत/असंबद्ध आहे. प्रस्तुत विषयापेक्षा अधिक महत्त्वाचे विषय नेहमीच असणार आहेत. उदा. 'एवढे शेतकरी आत्महत्या करत असताना, महागाई वाढलेली असताना चांद्रयान सारख्या प्रकल्पांवर कोट्यवधी रूपये का खर्च केले जातात?', 'रस्ते आणि पूल बांधण्यावर खर्च करण्यापेक्षा गरीबांना घरे द्यायला हवीत', 'प्रकाशझोतात क्रिकेट सामने खेळवण्याऐवजी ती वीज लोकांना द्यायला हवी' यासारखी अनेक उदाहरणे सापडतील. इतर गोष्टींचा विचार तात्पुरता थांबवून केवळ प्रस्तुत विषयाशी संबंधित विचार करण्याची क्षमता माणसांमध्ये असते/असावी.
"मुळात माणसाचे अस्तित्व महत्वाचे आहे मग भाषा" यामध्ये भाषेच्या जागी काहीही टाकून कोणालाही गार करता येईल.
>> भाषेच्या पलिकडे काय चालू आहे याचा कानोसा घेण्याचा हा प्रयत्न आहे
भाषेच्या पलिकडे बरेच काही चालू आहे आणि त्या त्या ठिकाणी आपण त्या त्या गोष्टींचा कानोसा घेतच असतो. भाषेच्या पलिकडे चालू असणार्या गोष्टींना, किंवा त्यांच्या महत्त्वाला इथे कोणी नाकारले नाही.
मराठी किंवा कोणतीही भाषा टिकवण्याची प्रेरणा भावनिक आहे. या प्रेरणेचे आर्थिक जस्टिफिकेशन देता येणार नाही. निव्वळ आर्थिकदृष्ट्या पाहिले तर आपण अनेक गोष्टी चुकीच्या करत असतो. उदा. निवृत्त आईवडिलांचा काही आर्थिक उपयोग नसताना (वैद्यकीय व इतर असे अधिक खर्च होताना) घरी ठेवणे याला चांगला आर्थिक निर्णय म्हणता येणार नाही पण भावनिक संबंधांमुळे बरेच लोक आपल्या वृद्ध आईवडिलांना आपल्या बरोबर ठेवतात.
सहमत आहे
नवीनरावांशी सहमत आहे. मातृभाषेतून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दिल्याने तो विषय समजणे अधिक सोपे होते. आफ्रिकेतील देशांबाबतचा उदा हा रिपोर्ट बघा. माणूस टिकणे वगैरे गोष्टीही कोणत्याही विषयाशी असलेली समज याच्याशीच निगडित आहेत. इंग्लिशचे महत्त्व कोणीही नाकारत नाही. पण मराठीकडे दुर्लक्ष करून केवळ इंग्लिशचीच कास धरल्याने माणूस टिकणार आहे का?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
दुर्लक्ष
येथे गोष्ट दुर्लक्षाची नाहिये. मराठी परत फुलण्यासाठी (आम्ही तरी ती कोमेजली आहे असे मानत नाही) मराठी माध्यमांच्या शाळांचे पुनरूत्जीवन हा एक कलमी कार्यक्रम हवा या अतिरेकी मुद्याची गोष्ट आहे. मुद्दा अतिरेकी वाटतो आणि त्याचे खंडन एवढेच येथे चालले आहे. पण त्यानुषंगाने इतर विषय येत आहेत.
वरच्या प्रतिसादात एक विषय आला आहे. दुर्दैवाने आईवडिलांचा विचार आणि भाषा यांचा ही अतिरेकी ताळमेळ दिसतो आहे. माणूस मुका बहिरा असेल तरी सुद्धा त्यांची सांकेतीक भाषा असते. कुटुंबातील अशा व्यक्तिचा आर्थिक विचार करून त्याला घरी न ठेवणे असा कोणी (बहुजन) विचार करत असेल असे वाटत नाही. तरी ही मुद्दा मांडायचाच म्हणला तर पाश्चात्य देशात एका ठराविक वया नंतर वेगळे राहणारे पालक आणि पाल्य आहेत. (आता लगेच म्हणू नका पाश्चात्यांचेच उदाहरण कशाला?) तर हिंदू संस्कृतीत वानप्रस्थाश्रम सुद्धा होता/आहे. असो. कदाचित हा मुद्दा हे नक्कीच दर्शवून देतो की या चर्चेतले कोणतेच मुद्दे असंबंद्ध नव्हते.
भारतात एखादे सर्वेक्षण आजच्या घडीला केले तर मराठी सोबतच व्यवहारात जास्त उपयोग होणार्या भाषेचे ज्ञान सुद्धा तेवढेच अथवा थोडे जास्त गरजेचे आहे असा रिपोर्ट वाचनात आल्यास आणि त्याचा दुवा येथे कोणी दिल्यास नवल नाही.
या चर्चेत मराठीला मरू द्या आणि इंग्रजीला पोसा असे कोणीच म्हटले नाहीये. पण काहिंचा सुर असा दिसून येतो आहे. तसेच आणखी एक मुद्दा हा ही आहे की इंग्रज आले नसते. आमच्यावर कोणीच राज्य केले नसते. तर मराठीचे काय झाले असते? मराठीजन आज सुद्धा बलुतेदारी करत बसले असते का? असो, हे आणि असे सर्व मुद्दे असंबंद्ध आहेत. नाही का? तेंव्हा येथेच थांबणे बरे.
हममम....
यू मिस्ड इट कंप्लीटली. चर्चेचा विषय "मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी" असा आहे. पुन्हा एकदा पाहा बरे. "मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी इतर पर्याय काय ते सुचवा" असे प्रस्तावकाने लिहिले आहे. त्यावर द्वारकानाथांनी 'त्यांच्यामते' असलेला एक उपाय सांगितला. तो तुम्हाला पटला नाही तर तसे व्यक्त करून मूळ विषयाकडे वळायला हरकत नव्हती. मराठी शाळा परत फुलल्या तर मराठी भाषा टिकण्यात मदत होईल असे कोणाला वाटत असेल आणि त्या दिशेने कोणी प्रयत्न करत असेल आणि याने कोणाला काही उपद्रवही होणार नसेल तर हा मुद्दा 'अतिरेकी' वगैरे कसा होतो? बरे, त्या मुद्द्याचे खंडन वगैरे चालले आहे असे म्हणता पण असे खंडन करणारा (म्हणजे "मराठी शाळांचा मराठीशी, मराठीच्या भविष्याशी काहीही संबंध नाही" हे सिद्ध करणारा) काही तर्क/युक्तिवाद तुमच्या प्रतिसादांतून कुठे दिसला नाही.
"निव्वळ आर्थिकदृष्ट्या पाहिले तर आपण अनेक गोष्टी चुकीच्या करत असतो." याचे ते फक्त उदाहरण होते हे कोणाच्याही ध्यानात येईल. त्यात भाषेचा आणि या विचाराचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न आणि तोही (पुन्हा) 'अतिरेकी' दिसतो तर कमाल आहे! प्रतिवाद करायचा असेल तर उदाहरणामागील विचारांचा करायचा असतो, उदाहरणाचा नाही हे चर्चेतील मूलभूत गोष्टींपैकी असावे.
हाहाहा! हाणा गाडी!
बरं
चुकलं आमचं. या पुढे एका वाक्यात/थोडक्यात उत्तरे लिहा. उत्तरचा संबंध फक्त मुळचर्चा प्रस्वावाशी असावा. प्रतिसादाशी संबंध हा असंबद्ध असेल असे मानुन चर्चा करू/आणि प्रतिसाद लिहू. शक्य असल्यास संपादक मंडळाला सुद्धा विनंती करू की असा काही प्रकार दिसल्यास कारवाई करा म्हणून.
गाडी पुढे हाणणे शक्य नाही कारण येथे गाडी फक्त हमरस्त्यावरूनच चालवावी असे दिसते आहे. :) आणि त्यानुसार मार्ग चुकला आहे. :)
कमाल आहे! | अवश्य लिहावे
कमाल आहे! तुम्ही असे गमतीने म्हणत आहात ना? कारण माझ्या प्रतिसादातून 'लॉजिकली' असा निष्कर्ष निघत नाही. असो. मूळ चर्चेचा फोकस न हरवता प्रतिसादाशी संबंधित काही लिहिले तर कोणाची हरकत नाही. त्या विषयावर तुम्ही लिहू नये असे वाटत असते तर खालील प्रश्न आलेच नसते.
१. मराठी शाळा परत फुलल्या तर मराठी भाषा टिकण्यात मदत होईल असे कोणाला वाटत असेल आणि त्या दिशेने कोणी प्रयत्न करत असेल आणि याने कोणाला काही उपद्रवही होणार नसेल तर हा मुद्दा 'अतिरेकी' वगैरे कसा होतो?
२. या मुद्द्याचे खंडन करणारा (म्हणजे "मराठी शाळांचा मराठीशी, मराठीच्या भविष्याशी काहीही संबंध नाही" हे सिद्ध करणारा) काही तर्क/युक्तिवाद तुमच्या प्रतिसादांतून कुठे दिसला नाही. (आमच्या पाहण्यात चूक झाली असेल तर संक्षेपाने आपले मत पुन्हा लिहावे.)
यावर तुम्ही अवश्य लिहावे असे आम्हाला वाटते. हे लिहिताना काही प्रश्न उपस्थित करावेसे वाटले तर यांची तुम्हाला अपेक्षित उत्तरेही कृपया त्यातच लिहावीत म्हणजे पुन्हा अधिक वेळ आणि प्रतिसाद वाया जाणार नाहीत.
"वेगळे राहणारे पालक आणि पाल्य", "हिंदू संस्कृतीतील वानप्रस्थाश्रम", "इंग्रज आले नसते तर मराठीचे काय झाले असते" वगैरे साठी सवडीने इतर चर्चा सुरू कराव्यात.
सहमत - अनुभव
मातृभाषेतून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दिल्याने तो विषय समजणे अधिक सोपे होते.
आमची मुलगी वर्षाचीपण नसताना तीच्या डॉक्टरांच्या पहील्या काही महीन्यातील भेटीत या (गोर्या) डॉक्टरने विचारले की तुम्ही घरात कुठल्या भाषेत बोलता. तीला थोडीफार माहीती होती की भारतात बर्याच भाषा आहेत वगैरे. मग तीला उत्सुकता दाखवल्याने मराठी, महाराष्ट्र ज्याची मुंबई ही राजधानी आहे वगैरे संदर्भ देऊन सांगीतले. तीने नंतर आम्हाला सांगीतले की तुमच्या मुलीला इंग्रजी शिकवायची घाई करू नका, ती ते शिकणारच आहे, पण तुम्ही पहीली तीनएक वर्षे केवळ तुमच्याच भाषेत तिच्याशी अकृत्रिम संवाद केलात तर त्याचा फायदा होईल.
आम्ही तिच्याशी मराठीतच बोललो असतो, पण डॉक्टरने सांगितले, थोडेफार शास्त्रीय पद्धतीने सांगितल्यामुळे असेल पण तिच्या इंग्रजीचे काय होईल अशी काळजी करत घाई केली नाही. लहान असूनही आज तिला दोन्ही भाषा चांगल्या येतात. पण मुख्य म्हणजे न्युनगंड नाही. दोन्ही भाषा बोलता येणे हा प्रकार भारतात पण ज्यांची मुले इंग्रजी माध्यमात असतात अथवा अमराठी प्रांतात असतात त्यांच्या संदर्भात होत असतोच. त्यातील स्वतःच्या भाषेबद्दल कुठलाही गंड न येता ती येणे आणि त्याची किमान आवड लागणे महत्वाचे वाटते.
त्याही पेक्षा जास्त.
मुक्तसुनित आपली टिपण्णी ( नवीन आणि चाणक्यांचा संयत प्रतिवादाचे निरीक्षण) आणि आपला प्रतिसाद अनेकानेक मुद्द्याच्या अनुषंगाने आवडला.
भाषा हा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ज्ञानेश्वरापासून ते एकनाथ यांनी संस्कृताच्या विरोधात प्राकृताचे महत्व प्रतिपादन केले आणि मराठी भाषेला तत्वज्ञान आणि साहित्य प्रदान केले. माझ्या अल्पमतीप्रमाणे इतर भाषक यांना त्यांची भाषा या जागतिकीकरणाच्या रेट्यात नष्ट होत आहे याची जाणिवही नसेल. त्यामुळे याला आर्थिक पैलु असेल असे मला वाटत नाही. दुसरे एक कारण हेही असावे की मराठी भाषकात जितके वैविध्य आहे उदा. एक तारखेची वाट बघणारा पगारदार चाकरमान्या ते एखादे ध्येयं ठरविल्यानंतर त्यासाठी वाटेल ते करणारा, पराकोटीची उदासिनता असणारा ते प्रचंड न्युनगंड असणारा, लाळघोट्या ते प्रसंगी रस्त्यावर उतरुन राडा करु शकणारा, प्रसंगी स्वत:च्या खिशातुन समाजसेवा करणारा असे वैविघ्य कदाचितच आणि क्वचितच गुजराती, मारवाडी आणि इतर भारतीय लोकात असेल. त्यामुळे मराठीच्या अस्तित्वाने कासाविस होणारा मराठी हेही आगळे आणि वेगळे उदाहरण असावे आणि त्याचबरोबर आपल्या मुलाशी लाडेलाडे बाटग्या इंग्रजीत बोलणारे मराठी कुटुंब ( मम्मी, डॅडी, पप्पा) असेही अनेक उदाहरणे आपल्याला नित्य दिसत असतात.
मी मराठीच्या अस्तित्वाच्या दिशेने होणार्या प्रयत्नाकडे, आपण राष्ट्राकडे हा लढा ( इंग्रजी वि. मराठी आणि हिंदी वि मराठी ) जिंकुन वेगळा मापदंड निर्माण करत आहोत अश्या प्रकारेही विचार करत असतो.
आज नाही तरउद्या या सर्व प्रादेशिक लोकांना मराठीच्या यशाकडे पाहावे लागेलच अशी मला आशा आहे.
अजून एक दुवा.
मराठी शाळेत आपल्या मुलांना टाकतांना आणि तेथे असलेल्या सेमी इंग्रजी माध्यमावर झालेल्या चर्चेचा दुवा, वाद विवाद आणि संवाद इतरही पैलु सांगेन.
http://www.manogat.com/node/13602
मला राहुन राहुन एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की इंग्रजांनी १५० वर्षापेक्षा या देशात राज्य केले पण कधीही या देशाच्या भाषा आणि परंपरा नष्ट केल्या नाहीत. मग आज असे काय घडत आहे की वैश्विकिकरणाच्या नावाखाली आपण मराठीचा गळा घोटत आहोत.
लिहायचा विचार होता
या प्रतिसादावर प्रतिसाद लिहायचा होता पण एक माननीय उपक्रम सदस्य म्हणतात की फक्त चर्चा प्रस्तावावरच लिहा. त्यामुळे माझ्या सर्व मुद्यांप्रमाणेच हा मुद्दा/प्रतिसाद असंबद्ध होतो आहे. त्यामुळे माफ करा. आपण या प्रतिसादा ऐवजी एक नवीन चर्चा विषय सुरु करा. तिथे लिहितो प्रतिसाद.
अहो असे काय करत आहात?
तुम्हाला जे काही योग्य वाटेल आणि ज्याच्या कारणाने मराठीभाषा वाढीस लागेल ते बेलाशक लिहा. माझ्या मुद्द्याचा प्रतिवाद झाला तरी चालेल. उलट मला आपले आणि नवीनचे विशेष कौतुक वाटते. अनेक मुद्दे हे चिंतनीय आहेत.
अनेक वेळेस आपल्या विचारामधे विस्कळितपणा असतो तो अश्या चर्चेने जातोच जातो.
मला तुमचा प्रतिसाद वाचायला नक्कीच आवडेल, तर लिहा बरे लवकर...
कृपया चर्चा चालु ठेवा.
मी स्वतःच या बाबतीत कनफ्युज्ड असल्याने काही लिहित नाहिये.
पण चर्चेतुन येणारे नवीन मुद्दे वाचायला बरं वाटतय.
जन सामान्यांचे मन
मराठी शाळांबाबत
मराठी शाळांबाबत हा लेखही वाचनीय आहे
चर्चा चांगली चालू आहे. अजून (वाट्टेल ते) मुद्दे येऊ द्या. काहीही हरकत नाही. प्रत्येक मुद्द्याचा प्रतिवाद करता येईल.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मुद्दे व प्रतिसाद
नवीन यांचे म्हणणे :
"मुळात माणसाचे अस्तित्व महत्वाचे आहे मग भाषा" यामध्ये भाषेच्या जागी काहीही टाकून कोणालाही गार करता येईल.
........
........
भाषेच्या पलिकडे बरेच काही चालू आहे आणि त्या त्या ठिकाणी आपण त्या त्या गोष्टींचा कानोसा घेतच असतो. भाषेच्या पलिकडे चालू असणार्या गोष्टींना, किंवा त्यांच्या महत्त्वाला इथे कोणी नाकारले नाही.
सर्वात प्रथम, एकच अतिसर्वसामान्य मुद्दा घेऊन गार करण्याचा माझा हेतू नव्हताच. चर्चेच्या ओघाने गोष्टी येणार. एकमेकांशी इतक्या घट्टपणे निगडीत असणार्या मुद्द्यांना केवळ अकॅडमिक कारणांसाठी आपण चर्चाबाह्य ठरवू शकत नाही इतकेच माझे म्हणणे.
म्हणजे शेवटी भाषेकडे आपण कसे पहातो या मुदद्द्याकडे आपल्याला यावे लागते. संस्कृत भाषेबद्दलच्या चर्चेमधे मी जे म्हण्टले तेच इथेही म्हणतो , की शेवटी भाषा आहे माध्यम - समाजातील लोकांमधे देवाणघेवाणीचे. जर एका विशिष्ट समाजाच्या भाषेच्या रक्षणाबद्द्ल , संवर्धनाबद्दल चर्चा होत असेल तर त्या समाजाच्या उन्नयनाबद्दल विचार हा शेवटी येणारच. त्यामुळे चर्चेला फाटे फुटतात म्हणून ते थांबवायच्या ऐवजी, आपण "ग्रेटर् गुड्" च्या कदाचित जास्त जवळ आहोत असेही म्हणता येईल.
गुजराथी/मारवाडी/सिंधी भाषेबद्दल मी मागे लिहीलेच आहे. या भाषेच्या भाषकांकडे उद्यमशीलता किंवा जास्त योग्य शब्द वापरायचा तर धंदेवाईक वृती जास्त प्रमाणात आहे असे मानले जाते आणि मुंबईपुरते बोलायचे तर जास्त करून गेल्या पन्नास-साठ वर्षांत आलेल्या या समाजांच्या लोकांकडे (ढोबळ मानाने बोलायचे तर) मराठी भाषिकांपेक्षा संपन्नता आहे असे म्हणता येईल. मात्र आपापल्या भाषेच्या भविष्याबद्दल त्यांच्यात फार मोठे विचारमंथन चालले आहे असे दिसत नाही. हे झाले भारतीय भाषांच्याबद्दल.
मला असे वाटते की एक अतिसामान्य तत्व म्हणून मराठी भाषिकांना - आणि पर्यायाने मराठी भाषेला - आत्मोन्नतीकरता "थिंक् लोकली , ऍक्ट् ग्लोबली" या तत्वाचा विचार करायला हवा. असे म्हणताना माझ्या डोळ्यासमोर विचार येतो जपान, रशिया, जर्मनी, फ्रान्स, चीन सारख्या देशांचा. या देशांमधे इंग्रजी भाषेला आदर देऊनही , त्या भाषेचा बडिवार माजवला आहे असे मला वाटत नाही. वरीलपैकी प्रत्येक देश आपापल्या क्षमतेनुसार एक अर्थसत्ता आहे हे मान्य व्हावे. जपानी लोकांनी जे साध्य केले ते ते मराठी लोकांनीही करणे अपेक्षित आहे असे माझे म्हणणे नाही. पण त्यांचे उदाहरण समोर बाळगायला काय हरकत आहे ? महाराष्ट्रामधल्या शहरी आणि ग्रामीण , दोन्ही भागांमधे मराठी शाळांना संजीवनी मिळवून द्यायचे प्रयत्न व्हावेत. त्याकरता इंग्रजी भाषेतले ज्ञान , तंत्रज्ञान , येथे येण्याला अत्यावश्यकतेचे महत्त्व देण्यात यावे. व्यावसायिक शिक्षण आणि उद्यमशीलततेचे धडे या मराठी शाळांमधून दिले जावेत. मराठी शाळा ज्ञानाची सदावर्ते बनावीत. महाराष्ट्रातला प्रशासनातला व्यवहार मराठीमधेच व्हावा ; अमराठी लोकांच्या सोयीकरता प्रशासनामधे इंग्रजीमधून देवाणघेवाणीची सोय असणे यालाही "अत्यावश्यकतेचे" महत्त्व देण्यात यावे.
आपल्या मित्रांना पटते मग आपल्याला का नाही ?
आपल्या मित्रांना पटते मग आपल्याला का नाही ?
येथे वाचा