संस्कृत भाषेतील शिव्या..
राम राम मंडळी,
संस्कृत भाषेत फारश्या शिव्या नाहीतच, आणि असल्याच तर त्यात फारसा जोर नाही असे आम्ही ऐकून आहोत. समोरचा माणूस शिवी दिल्यावर जर अस्वस्थ झाला नाही तर त्या शिवीत फारसा जोर नव्हता, असे मानले जाते.
एखाद्याला ही चर्चा म्हणजे केवळ 'तात्याचा वायफळ टाईमपास आहे' असं वाटू शकेल. पण आम्ही अत्यंत गंभीरपणे आमच्या काही शंकांचं समाधान करून घेण्याकरता ही चर्चा येथे मांडत आहोत. शिवी, किंवा शिवी देणे हे सभ्यतेला धरून नाही असं म्हणतात. परंतु त्याचबरोबर प्रत्येक भाषेमध्ये अगदी भरपूर शिव्या असतात ही वस्तुस्थितीदेखील नाकारता येत नाही! आमच्या काही पंजाबी, तमिळ, मारवाडी, गुजराथी आणि बंगाली मित्रांकडून आम्ही त्या त्या भाषेतल्या जोरदार शिव्या ऐकल्या आहेत. त्यांचे अर्थही त्यांच्याकडून समजावून घेतले आहेत. एवढंच कशाला, उर्दू भाषेतही फार डौलदार शिव्या आहेत, असंही आम्ही ऐकून आहोत! मराठी भाषेचा विचार करता त्यातल्या शिव्यांचा आमचा बर्यापैकी अभ्यास आहे, असं आम्ही म्हणू शकतो!
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृत भाषेतही शिव्या असतील/असल्या पाहिजेत असा आमचा अंदाज आहे. पण याबद्दल आम्हाला तपशीलात काहीच माहीत नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे संस्कृत भाषेतील अत्यंत किचकट वाटणार्या व्याकरणामुळे आमच्याकरता ती भाषा नेहमीच अनाकर्षित राहिली!
आता आमच्या काही शंका/प्रश्न -
१) आधी मुळात संस्कृत भाषेमध्ये शिव्या आहेत का, हा आमचा मूळ प्रश्न आहे.
२) नसतील तर त्यामुळेच संस्कृत भाषा मागे पडत चालली आहे/पडली आहे, असं आम्हाला वाटतं. आपल्याला काय वाटतं?
३) आज संस्कृत भाषा ही काही आम पब्लिकची भाषा नव्हे. आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस तिच्यापासून चार हात दूरच असून ती ठराविक एका वर्गाचीच मक्तेदारी आहे. या भाषेत जर शिव्यांची रेलचेल असती तर ह्या भाषेबद्दल आम पब्लिकमध्येही आकर्षण निर्माण झालं असतं, असं आम्हाला वाटतं. आपल्याला काय वाटतं?
आपल्यापैकी कुणी आमच्या वरील प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल का?
आता अवांतर -
एखादी भाषा शिकायची असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकाव्यात, असं जाणकार सांगतात. आम्हालाही संस्कृत भाषा शिकायची इच्छा आहे. त्यामुळे प्रथम संस्कृत भाषेमधल्या शिव्या शिकणं, हे क्रमप्राप्त आहे!
सबब, येथील संस्कृतविद्वांनांना आणि महापंडितांना अशी विनंती की त्यांनी या भाषेतल्या एकापेक्षा एक वरचढ अश्या शिव्या (असल्यास!) आणि त्यांचे मराठीतून अर्थ आम्हाला व्य नि ने कळवावेत. म्हणजे आम्हालाही या भाषेबद्दल गोडी उत्पन्न होईल आणि आम्ही ती लवकर आत्मसात करू!
धन्यवाद...
आपला नम्र,*
तात्या अभ्यंकर.
*सदर विषय शिव्यांसंदर्भात असला तरी आम्ही नम्रतेलाही तितकेच महत्व देतो! ;)
Comments
सर्कीटराव,
प्राकृत, म्हणजे प्रकृती - निसर्ग - ह्यातून तयार झालेली भाषा, आणि त्यातून तयार झालेल्या इतर भाषा, ह्यात निसर्गनियमानुसार शिव्या आहेत.
अच्छा!
पण संस्कृत ही संस्कारित, म्हणजे मुद्दामून बनवलेली (क्रुत्रिम) भाषा.
अहो पण ती तर देववाणी आहे असं आम्ही ऐकून आहोत. देव कशाला कृत्रीम भाषा वापरतील?
आपला,
(अकृत्रीम!) तात्या.
हा हा
सर्किट या व्यक्तीचे मत हे बरोबर किंवा योग्य किंवा दोन्ही किंवा दोन्हीपैकी एक किंवा यापेक्षा वेगळे आहे असे मान्य करण्यास काहीही प्रत्यवाय नसावा.
(शासकीय!) योगेश
अवांतरः सरकारला"शासन" असे नाव सुचवणार्या व्यक्तीच्या विनोदबुद्धीचे कौतुक किंवा हेवा किंवा दोन्ही किंवा दोन्हीपैकी एक वाटते.
संस्कृत
मोहन पाठक
शिव्या नसायला काय झालंय
आपल्याला क्ळायला ह्व्यात ना
(ही उगाच मामूगिरी)
वेगळा विषय
फारच वेगळा विषय आहे हा!
वाचायाला बर वाटल!
पंकज....तु लिहिलेले शब्द छान आहेत ..... पण त्या शिव्या नाहित!
आबा....
शिव्या नकोत
हा विभाग संस्कृतातील दमदार आणि उत्कृष्ठ साहित्य उपलब्ध व्हावे या हेतूने तयार केला आहे. येथे शक्य झाल्यास चांगलं आणि वाचनीय साहित्य द्यावं. शिव्या टाळता आल्या तर बरं वाटेल.
पल्लवी
पल्लवीजी,
शिव्या टाळता आल्या तर बरं वाटेल.
आपण चर्चाविषय नीट वाचलेला दिसत नाही. शिव्या देणं किंवा शिव्या देत रहाणं हा या चर्चेचा हेतू नक्कीच नाही..
तात्या.
आम्हाला आवडेल
आम्हाला संस्कृतमधील शिव्या (असल्यास) त्या शिकायला आवडतील.
शिव्या देणे न देणे हा व्यक्तिगत आयुष्यातील भाग आहे.
पण आमची ज्ञानपिपासा मोठी असल्यामुळे आम्ही नवीन नवीन गोष्टी शिकण्यात धन्यता मानीत असतो.
आपला,
(शिवराळ) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
सुसंस्कृत
सुसंस्कृत भाषेला शिव्यांची गरज भासली नसावी.
~ तो ~
शिव्या नाहीत?
च्या मारी !!
संस्कृतमध्ये शिव्या नाहीत?
संस्कृतला तर मी परिपूर्ण भाषा समजत होतो !
मनुष्य जातीचं सोडून द्या पण देवांना सुद्धा या कृत्रीम भाषेत दोन चार कृत्रीम शिव्या टाकून या मध्ये योगदान करता आले नाही हे ऐकून फार वाईट वाटले !
एक काम करा तात्या, तुम्हीच योगदान करा आणि या देववाणीत दोन चार सुसंस्कृत शिव्याची भर धाला.
(असंस्कृत शिव्यापिपासू) रम्या.
उपक्रमच्या व्यवस्थापकांना नम्र विनंती
उपक्रम हे मराठीतील एक सुंदर संकेतस्थळ आहे. मला वाटते की उपक्रम सुरू करतांना मराठीत एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे हा मुख्य उद्देश होता. संस्कृत भाषेतील शिव्या हा विषय या व्यासपीठावर चर्चेला येणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. उपक्रमच्या वाचकांमध्ये अनेक भगिनीही आहेत आणि कितीही तीव्र भावना व्यक्त असल्या तरी बहिणीसमोर आपण अपशब्द वापरू शकत नाही.
उपक्रमसारखे संकेतस्थळ उभारतांना बरीच मेहेनत करावी लागते. एखाद्या व्यक्तीने सुंदर ग्रंथ लिहिण्यासाठी उच्च दर्जाचा कागद आणि शाई उपलब्ध करून दिल्यावर त्या कागदाचा लेखनाऐवजी भेळ खाण्यासाठी वापर होणे अनुचित आहे. तसेच कुठल्याही प्रवर्तकांसाठी नाऊमेद करणारे आहे. अर्थात, हे माझे वैयक्तिक आणि नम्र मत आहे.
कृपया ही चर्चा उपक्रमवरून उडवावी. अशा प्रकारच्या विषयावर चर्चा करायचीच असल्यास ती अनुदिनीवर केल्या जाऊ शकते. येथे कुणावरही वैयक्तिक रोख नाही. ही केवळ एक कळकळीची विनंती आहे.
(उद्विग्न) शैलेश
आदरणीय!
शैलेशराव हे एक व्यक्ती म्हणून नेहमीच आम्हाला आदरणीय ठरले आहेत. त्यांच्या विचारांतूनही खूप काही शिकण्यासारखं असतं. त्यांच्यासारखी विचारवंत, आचारशील व्यक्ती जेव्हा सदर चर्चा पाहून उद्विग्न होते ते पाहता हा चर्चाविषय आम्ही येथे मांडायला नको होता, असे आता आम्हाला वाटू लागले आहे.
चर्चाप्रवर्तक म्हणून आम्हीही उपक्रमाला अशी नम्र विनंती करतो, की त्यांनी शैलेशरावांच्या विनंतीला मान देऊन सदर चर्चाविषय येथून हटवावा.
आपला,
(खजील!) तात्या अभ्यंकर.
चर्चा उडवू नये.
या चर्चेत कुणीही (तथाकथित) आक्षेपार्ह/बेकायदेशीर/धमकीवजा शब्द वापरल्याचे दिसत नाही. या चर्चेवर आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे.
जर उपक्रमींना ही चर्चा नको असेल तर त्याकडे ते दुर्लक्ष करतीलच. मात्र अशी चर्चाच इथे नको हे म्हणणे चुकीचे आहे.
शैलेशराव हे एक व्यक्ती म्हणून नेहमी आम्हालाही आदरणीय आहेत. येथे कोणताही वैयक्तिक रोख नाही हे सांगणे नलगे.
(लोकशाहीवादी) योगेश
धन्यवाद
तात्या, योगेश, मिलिंद,
आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांसाठी आभारी आहे. काही विषयांवर आपली मते भिन्न असली तरी त्यांचा आदर आहे.
स्नेहांकित,
शैलेश
खरेतर शिव्या हा कोणत्याही भाषेपेक्षा मनोवृत्तीचे कारक आहे.
खरेतर शिव्या हा कोणत्याही भाषेपेक्षा मनोवृत्तीचे कारक आहे.
संस्कृतमध्ये " ताडयेत् ", "नतद्रष्ट" , "भो अभद्र वा अभद्रम्" अशा प्रकारचे अतिशय सभ्य भाषेतील शब्द वापरुन शिव्या दिल्याचे मी काही ठिकाणी पाहीले आहे. पण कोणत्याही प्रकारच्या अर्वाच्य शिव्या न वापरताही संस्कृत भाषेत सर्व प्रकारचे भाव व्यक्त होतात यातच या देवभाषेची ब्युटी आहे असे मला वाटते.
(संस्कृतभक्त) सागर
तमिळ, मल्ल्याळी बोलणारे देवही असतीलच की! ;)
यातच या देवभाषेची ब्युटी आहे असे मला वाटते.
मग इतर भाषा देव बोलत नव्हते का? की देवांना इतर भाषा माहीत नव्हत्या की येत नव्हत्या?
राम तर हिंदीही फार झकास बोलायचा असं आम्ही ऐकून आहोत. किसनदेव बृजभाषेत बोलायचा असे आम्ही ऐकून आहोत! शिवात तमिळ, मल्ल्याळी बोलणारे देवही असतीलच की! मग फक्त संस्कृतलाच देवांची भाषा वगैरे संबोधून फुकटचा मोठेपणा दिल्यासारखे नाही काय?
एक अवांतर प्रश्न -
देव जर संस्कृत भाषेत बोलत असतील तर दानव कोणत्या भाषेत बोलत असतील बरे? ;)
कृपया खुलासा करावा अशी सागरसाहेबांसकट सर्वांना विनंती!
तात्या.
देव वि. दानव
देव जर संस्कृत भाषेत बोलत असतील तर दानव कोणत्या भाषेत बोलत असतील बरे? ;)
त्या सर्वांना संस्कृत भाषा येत असावी परंतु ते एकमेकांशी बोलताना प्राकृत भाषेचा वापर करत असावे.
दानवांबद्दल म्हणाल तर रावण या दशग्रंथी ब्राह्मण राक्षसराजाला संस्कृताचे ज्ञान (म्हणजे संस्कृत तेव्हा असेल तर) उत्तम असावे.
तसे दानव आणि राक्षस यांत थोडा फरक असावा. दानव हे कश्यप कुलोत्त्पन्न, दनु या पत्नीपासून झालेली मुले. त्यांना संस्कृत का येऊ नये?
तमिळनाडूमधील देवांना तमिळ कळणे आवश्यक आहे.
जर देवांना तमिळ कळत नसेल तर त्यांना तमिळनाडूमध्ये राहण्याचा अधिकार नाही असे खडसावणारे तमिळ मंत्री महोदय तेथे आहेत.
देवनागरी ही भाषा असते का?
ही भाषा असते का? सदर लेखिकेने तसे लिहिले आहे. मला ती अद्यापावेतो फक्त लिपी वाटत होती.
दुवा बाकी मजेशीर.
देवभाषेवर थोडासा खुलासा (माझ्या अल्पमतीप्रमाणे)
तात्या,
संस्कृत ही देवभाषा का समजली जाते यावर थोडासा माझ्यापरीने खुलासा करण्याचा प्रयत्न करतो
वेद , उपनिषदे, पुराणे , आरण्यके, ब्राह्मणग्रंथ व असेच अनेक प्राचीन भारतीय ग्रंथ हे मुळातूनच संस्कृत भाषेतच लिहिले गेलेले आहेत.
आणि वेद-उपनिषदे ह्यांची निर्मिती अमानवीय समजली जाते. (म्हणजेच त्यांची निर्मिती देवांकडून झाली आहे असे मानले जाते)
यामुळेच संस्कृत भाषेस देवभाषा म्हणण्याचा प्रघात पडलेला असावा.
शांकरभाष्य , कालिदास-भास प्रभृतींची नाटके व अनेक शेकडो-हजारो ग्रंथ आहेत की जे मुळातच संस्कृत भाषेत लिहिले गेले.
देवांनी दिलेले हे ज्ञान मनुष्याने मुखोद्गत् केले आणि व्यासांनी ते वेदांच्या माध्यमातून ग्रथित केले.
असो.
ही चर्चा चांगलीच रंगत चालली आहे. असाच लोभ ठेवावा ही सर्वांना विनंती
धन्यवाद
(संस्कृती आणि संस्कृत भक्त) सागर
दानव
दानवही असतील संस्कृत वापरत. त्यांचा देवांशी वाद भाषेवरून थोडीच होता? ;)
देहबोलीभाषा
कुठलीही भाषा न वापरता देखिल केवळ देहबोलीतून (ही देखिल बोली भाषाच) शिव्या व्यक्त करता येतात. लैंगिक छळामध्ये याचा समावेश आहे.
प्रकाश घाटपांडे
सहमत.
कथ्थ्क नृत्यात,आणि कितीतरी नृत्यप्रकारात चेह-यांच्या,डोळ्यांच्या हालचालींमधून,किंवा हातवारे करुन,विविध भाव जसे व्यक्त होतात.तसे देहबोलीतून तर शिव्या व्यक्त होत नसतील काय सांगता येत नाही ? पण विचाराला जागा आहे !
दिल्या देवे श्या पुत्रे न ऐकल्या
"दास्या: पुत्र" आणि "दासीपुत्र" या जोडीत पहिली शिवी आणि दुसरा सामान्य (अर्थवाही) शब्द वगैरे नियम संस्कृत व्याकरणात आपण शिकतोच.
(येथे "दासी" म्हणजे वेश्या.)
शिवी म्हणून वापरताना तथ्याची सत्यता पडताळायची नसते - रागाने शिवी हासडली तर समोरच्या व्यक्तीच्या आईचा खरोखरचा कामधंदा गौण असतो.
पाणिनीच्या काळात ती भाषा बोलीभाषा होती (तिला त्या काळात "संस्कृत" म्हणत नव्हते, तिला कुठलेच नाव नव्हते). संपूर्ण शब्दानुशासन लिहिण्याची पाणीनीची मनीषा होती. जेव्हा जेव्हा शिव्या देताना व्याकरणाच्या नियमांना अपवाद होत, ते ते अपवाद पाणिनीने नमूद केलेले आहेत. नाहीतर ग्रंथांमध्ये मुद्दमून शिव्या लिहिण्याची वेळ क्वचितच येणार. पाणिनीच्या काळातल्या सणसणीत पण व्याकरणशुद्ध शिव्या हरवल्याच म्हणायच्या.
तरी जातिवाचक "चांडाल", लैंगिक अर्थाचे "षंढ", बाकी तिरस्काराचे "जाल्म", "वृषल" वगैरे अधूनमधून वाचायला मिळतात.
महाराष्ट्राबाहेरच पूर्ण आयुष्य काढल्यामुळे केवळ आईवडलांकडून मराठी शिकल्यामुळे जसे माझे झाले आहे, तसेच शिव्यांच्या बाबतीत अवघ्या भारताचे संस्कृत भाषेच्या संदर्भात झाले आहे.
सुंदर आणि माहितीपूर्ण..
धन्यवाद धनंजयराव!
सुंदर आणि माहितीपूर्ण प्रतिसाद..
तात्या.
चांगली माहीती..
पाणिनीच्या काळात ती भाषा बोलीभाषा होती (तिला त्या काळात "संस्कृत" म्हणत नव्हते, तिला कुठलेच नाव नव्हते). संपूर्ण शब्दानुशासन लिहिण्याची पाणीनीची मनीषा होती. जेव्हा जेव्हा शिव्या देताना व्याकरणाच्या नियमांना अपवाद होत, ते ते अपवाद पाणिनीने नमूद केलेले आहेत. नाहीतर ग्रंथांमध्ये मुद्दमून शिव्या लिहिण्याची वेळ क्वचितच येणार. पाणिनीच्या काळातल्या सणसणीत पण व्याकरणशुद्ध शिव्या हरवल्याच म्हणायच्या.
खूप चांगली माहीती आहे.
यावरून पु. लं. चे बिग्री ते मॅट्रीक आठवले: यकृत, प्लिहा, स्वादूपिंड इत्यादी मला संस्कृत भाषेतील शिव्या वाटतात!
विषयांतर!
एका मराठी चित्रपटात (नाव आठवत नाही), दिलीप प्रभावळकर नायक होते. (प्रभाकर तामणे यांच्या कथेवर आधारित) त्यातल्या नायिकेच्या वडिलांना चांगला भांडखोर, शिव्या बिव्या देणारा असाच जावई हवा असतो. नायिका प्रभावळकरांवना सांगते की, तू चांगला कडकडून भांड, माझ्या बाबांशी. नायकाने मराठी साहित्यात पी.एच्. डी केलेले आहे. तो भांडताना ज्या शिव्या देतो त्या नमुनेदार.-"केवलप्रयोगी अव्यय कुठचा! तुला दामाडूचा पंचाडू करुन टाकीन्!(याचा अर्थ कळला नाही), अरे जा रे उभयान्वयी!
स्वाती
छ्क्के पंजे
असे त्या चित्रपटाचे नाव आहे.
अशोक सराफ, मच्छिंद्र कांबळी, श्रीराम लागू, आत्माराम भेंडे हे त्यातील इतर कलाकार.
(माहितीपूर्ण) आजानुकर्ण
शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.
बरोबर!
बरोबर आहे. धन्यवाद!
स्वाती