विश्वजालावरील देवाण-घेवाण : श्रेयस आणि प्रेयस

अलिकडच्या काही दिवसांमधे मराठी संस्थळांवर वाचन करताना या संस्थळांवरील विचारांच्या देवाणघेवाणीबद्दलच चर्चा करणारे १-२ लेख वाचले. "उपक्रमा"वरील एक सदस्य तर आपल्या व्यंगात्म शैलीमधे, येथील देवाणघेवाणीतून काहीही निष्पन्न होत नाही , असे , "क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे" या धाटणीची विधाने करताना आढळतात. याच्या पार्श्वभूमीवर हा विषय सुरू करावा असे वाटले.

मला या देवाणघेवाणीतून काय मिळते ?, लौकिकार्थाने ज्याला उपयोग म्हणता येईल असा या देवाणघेवाणीचा काय म्हणता येईल ? यासारख्या प्रश्नांची माझ्या परीने उत्तरे देऊन विषयाला सुरवात करतो आहे.

माझा स्वतःचा असा अनुभव आहे की, नवनवीन माहिती आणि नवनवे दृष्टीकोन यांची ओळख करून देण्याइतपतच येथील वावराचा उपयोग मला होतो असे नव्हे (आणि खरे सांगायचे हा एकमेव उपयोगसुद्धा फार फार मोठा आहे !). माझ्या आठवणीतून मी नक्की अशी (मोजकी का होईना , पण) उदाहरणे माझ्या वैयक्तिक आयुष्यातून देऊ शकेन ज्यात मला अशा स्थळांकडून अशा कार्याची ओळख झाली आणि अशा कार्याकडे मी माझ्या खारीपेक्षा छोटे योगदान दिले. दुसरे उदाहरण माझ्या एका ओळखीच्या व्यक्तिचे आहे. अमेरिकेत रहाणार्‍या या व्यक्तिच्या मुलाला "ऑटीझम्" आहे. संस्थळावरच भेटलेल्या दुसर्‍या एका व्यक्तिने त्याला "चाईल्ड् फाईंड्" या स्थानिक पातळीवरच्या कार्यक्रमाची तोंडी ओळख करून दिली. आणि त्याच्या परिणामस्वरूप , एक छोट्या मुलाच्या आयुष्यात कदाचित मोठा फरक पुढेमागे पडेल.

मला असे म्हणायचे नाही की संस्थळांवरील चर्चेशिवाय वरील गोष्टी घडल्याच नसत्या. पुढेमागे जरूर घडल्याच असत्या. ज्याला काही करायची इच्छा आहे, किंवा ज्याला एखादी गोष्ट माहिती करून घ्यायचीच आहे तो माणूस त्या त्या गोष्टी माहिती करून घेईलच. पण अशा प्रकारची संस्थळे एक उत्तम "चेंज् एजंट्" म्हणून काम करू शकतातच.

प्रत्यक्ष आयुष्यातील उपयुक्तता, समविचारी माणसांचा (अप्रत्यक्ष का होईना, ) सहवास, नवनवे दृष्टीकोन, माहिती, असे अनेक "उपयोग" मला इथे दिसतात. तुमचे अनुभव जरूर लिहा.

Comments

नवीन प्रकारचे दळणवळण

जाळ्यावर लेखन-वाचनामुळे मला जालापूर्वी जमले होते त्यापेक्षा मोठे, दूरदूरचे मित्रमंडळ प्राप्त झाले आहे. यामुळे माझे जीवन बदलले आहे हे नक्की.

कदाचित त्यामुळे आमोरासमोर जीवश्चकंठश्च वैयक्तिक मैत्रीसाठी कमी वेळ देऊ शकतो, हा संभाव्य तोटा आहे. (केवळ जालावरचे ओळखीचे असे कोणीही इतके जवळ होऊ शकले नाही - पण प्रथम भेट जालावर, मग प्रत्यक्ष भेट अशी खरी मैत्री झालेली आहे.)

प्रत्यक्ष आयुष्यातील उपयुक्तता, समविचारी माणसांचा (अप्रत्यक्ष का होईना, ) सहवास, नवनवे दृष्टीकोन, माहिती, असे अनेक "उपयोग" मला इथे दिसतात.

सर्वथा सहमत.

+१

अगदी.

यातील अनेकांशी अजून प्रत्यक्ष भेट होऊ शकली नसली तरी जाळ्यावरच्या प्रतिसादांमधून विचारांचे विविध पैलू कळतात - आपण करीत असलेले विचार एकांगी असू शकतात याचीही जाणीव होते असे अनेक फायदे लक्षात आले आहेत.

तोटे नाहीत असे नाही - मुख्यत्वे कधीकधी प्रतिसाद लिहीण्यात वेळ कसा जातो ते कळत नाही (वादविवाद चालू असल्यास तर अधिकच). पण जाळ्यावर येण्यास-जाण्यास शिस्त ठेवली तर या जाळ्यावरचा वावर हा खूपच उपयुक्त होऊ शकतो यात वाद नाही.

व्यक्तिगत प्रत्यक्ष फायदा मला असा झाला की मध्यंतरी विविध व्यापांमुळे मागे पडलेले माझे फावल्या वेळेतील वाचन जाळ्यावर आल्यावरच पुन्हा जोमाने सुरू झाले. बाकीच्यांच्या वाचनाचा पल्ला पाहून परत वाचन वाढवण्याची इच्छा निर्माण झाली.

लाख मोलाचा प्रश्र

>>वेळ कसा जातो ते कळत नाही (वादविवाद चालू असल्यास तर अधिकच). ..जाळ्यावर येण्यास-जाण्यास शिस्त ठेवली ....

हे कसे जमवायचे, कोणी सांगु शकेल का?

बाकी मुळ लेख व प्रतिसाद यात आल्याप्रमाणे / अजुनही येतील त्या प्रमाणे फायदे अनेक. अनेक समविचारी तसेच खुप ज्ञानी लोक भेटली. याचे मोल, अनमोल.

+१

यातील अनेकांशी अजून प्रत्यक्ष भेट होऊ शकली नसली तरी जाळ्यावरच्या प्रतिसादांमधून विचारांचे विविध पैलू कळतात - आपण करीत असलेले विचार एकांगी असू शकतात याचीही जाणीव होते असे अनेक फायदे लक्षात आले आहेत.

पूर्ण सहमत.
सतत एकांगी लेखन करणार्‍यांना मात्र ही जाणीव का होत नाही ह्याची खंत वाटत राहते.

सहमत

सहमत आहे. बाकी प्रतिसादांमधूनही बरेच मुद्दे मांडले आहेत. मला वाटते इथे येण्यात असे बरेच फायदे आहेत. फक्त चित्रा म्हणतात त्याप्रमाणे कधीकधी स्वतःला थोडी शिस्त लावण्याची गरज वाटते. (अर्थात हे फक्त उपक्रमच नव्हे, तर आंतरजालावरील वावर, चित्रपट किंवा सिड मेयरचा सिव्हिलायझेशन या सर्वांच्या बाबतीत खरे आहे!)

----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx

उपयुक्त

ही चर्चा नक्कीच चांगली आहे. आधी नजरे खालून घातली तेंव्हा त्याचा अर्थ नवीन विषय येथे लिहावेत इतकाच मर्यादीत घातला त्यामुळे जरा गोंधळलो ;)

अशा संकेतस्थळावर अनेक नवीन विचार, माहीती समजते , पुस्तके, तत्वज्ञान, बरेच समजत जाते आणि तो मोठा फायदा वाटतो. आणि या जालाच्या जाळ्यात कधी नव्हे ते अडकलो! अनेकांत एकता (म्हणजे अनेक लोकांत समविचार या अर्थी) जसे दिसून येते तसेच एकात अनेकता (अंतरीच्या नाना कळा या अर्थी) पण दिसतात :-)

असेच पण.........

मराठी संस्थळावर विचाराच्या देवाण-घेवाणीत अनेक फायदे झाले आहेत. मित्रमंडळ मिळाले ,गुजगोष्टी करता आल्या, विचाराच्या कक्षा रुंदावल्या, खरे तर याचेही एक मुक्त मनोगत लिहिता येईल.


"उपक्रमा"वरील एक सदस्य तर आपल्या व्यंगात्म शैलीमधे, येथील देवाणघेवाणीतून काहीही निष्पन्न होत नाही , असे , "क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे" या धाटणीची विधाने करताना आढळतात

आपल्याच चर्चेतील वरील विधाने सार्वजनिक संस्थळावर करण्याची आवश्यकता असते का ? आपण काय साधत असतो कोणास ठाऊक ? वेगवेगळ्या स्वभावाची माणसे इथे एकत्र येतात तेव्हा सर्वांकडून शिस्तीत विचाराची देवाण-घेवाण होणे हे अपेक्षीत जरी असले तरी ते शक्य नसावे असे वाटते.

जालावर व्यर्थ बडबड करणारा
-प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत..

आपल्याच चर्चेतील वरील विधाने सार्वजनिक संस्थळावर करण्याची आवश्यकता असते का ?

हा हा हा! बिरुटेशेठ, हा प्रश्न बाकी उत्तम विचारलात बरं का!:)

वेगवेगळ्या स्वभावाची माणसे इथे एकत्र येतात तेव्हा सर्वांकडून शिस्तीत विचाराची देवाण-घेवाण होणे हे अपेक्षीत जरी असले तरी ते शक्य नसावे असे वाटते.

सहमत आहे! एखादे संस्थळ म्हणजे,

"मुलांनो आता सगळ्यांनी संस्कृतची पुस्तके काढा पाहू!"

किंवा.

"मुलांनो आता सगळ्यांनी दहा दहा ओळींचं शुद्धलेखन लिहा पाहू!"

किंवा,

"अरे गंप्या, तुझा गणवेष कुठाय? जा पालकांची चिठ्ठी आण पाहू! :)"

किंवा,

"मुलांनो, हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसा पाहू!"

अशी मास्तरी नियमावली सांगणारी शाळा नसावी! नाहीतर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांवर बघावं तेव्हा वर्गाच्या बाहेरच उभं रहायची वेळ यायची! :)

आता मुक्तरावांच्या चर्चाप्रस्तावावर माझं व्यक्तिगत मत -

मी मराठी संस्थळांवर केवळ अन् केवळ टाईमपास, वायफळ गप्पा, टवाळक्या, मित्रमैत्रिणी जोडण्याकरता येतो. माझी जी काही लेखनाची थोडीफार हौस आहे ती भागवण्याकरता येतो. इतरांचं ललित लेखन वाचण्याकरता येतो. माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारे लेख मी सहसा वाचत नाही, कुठलीही माहिती हवी असल्यास ती मिळवण्याकरता मला आंतरजालाची जराही गरज भासत नाही! तसेच अल्पबुद्धी असल्यामुळे आंतरजालावरचे इतरही कुठले वैचारिक वगैरे लेख वाचण्याच्या फंदात मी सहसा पडत नाही..

असो...

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

अपवाद..

कुठलीही माहिती हवी असल्यास ती मिळवण्याकरता मला आंतरजालाची जराही गरज भासत नाही!

ह्याला अपवाद फक्त शेअर बाजाराशी निगडित माहितीचा! कारण तो माझ्या पोटापाण्याचा प्रश्न आहे!

असो..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

छान उदाहरण

शेअरबाजाराबद्दल लेख बहुतेक वेळा ललित नसतात. एखाद्या दिवशी तुम्ही शेअरबाजारावर नेमकी माहिती देणारी ललित गझल लिहालही. एखाद्या दलालाची तशी प्रतिभा असते. पण रोज असे शेअरबद्दल शेर-लेखन करणे कठिण जाईल.

रोजचा शेअरबाजारावरचा लेख घ्या. लालित्य पूर्णपणे घालवलेलेच असते जणू. पण हे लेख अर्थाच्या दृष्टीने नेमके असतात. याचा तुम्हाला फायदा होतो.

पुढे तुम्ही विचारता : "लालित्य घालवलेच पाहिजे का?" तुमच्याच उदाहरणाचा दाखला घ्या. तुम्हीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्या.

ठीक,

ठीक आहे, एकवेळ लालित्यपूर्ण नसेल परंतु लेखन रंजक तरी हवे ना? गप्पा मारल्यासारखे हवे ना? बोजड आणि नीरस भाषा काय कामाची? की वैचारिक लेखन हे नेहमी बोजड आणि नीरस भाषेतच असायला हवे असे तुमचे म्हणणे आहे?

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

नेमकेपणा, रंजकता महत्त्वाची: वाचक कोण ते ठरवणे सर्वात महत्त्वाचे

जेव्हा नेमकेपणा महत्त्वाचा, तेव्हा तांत्रिक शब्द वापरावे लागतात. शिवाय सर्व अपवाद, विशेष प्रसंग सांगावे लागतात. हे सर्व सांभाळल्यानंतर रंजक असणे महत्त्वाचे.

ज्यांना त्या विषयात फार रस नाही त्यांना तांत्रिक शब्द बोजड वाटतील. अर्व अपवाद, विशेष प्रसंग वाचणे बोजड वाटेल.
ज्यांना त्या विषयात रस आहे, त्यांना तेच तांत्रिक शब्द सामान्य वाटतील. अर्थ संदिग्ध नसल्यामुळे सुटसुटीतपणा वाटेल.

कोणता वाचक आपले लक्ष्य आहे, हे लेखकाने ठरवावे. रंजकतेने त्या गटाचा लक्ष्यवेध करावा.

छापील वर्तमानपत्रासाठी लेखन करायचे असेल समजा. तर वाचकवर्ग खूप मोठा अपेक्षित असतो. त्यांना अतिशय नेमकेपणाची अपेक्षा नसते. अशा परिस्थितीत रंजकता त्या वाचकाच्या वेध घेऊन आणावी.

विषयाची विशेष आवड असणार्‍यांकरिता लेखन करायचे आहे समजा. प्राथमिक ज्ञान त्यांना आधीच आहे. मग त्या ठिकाणी नेमकेपणा सांभाळून, तांत्रिक शब्द वापरले तर चांगले. त्या वाचकाला ते रंजक वाटतात.

तुमच्या दृष्टीनेच बघा. शेअरबाजारावरचा एखादा रंजक माहितीपूर्ण लेख घ्या. माहिती तुम्हासारख्या जाणकारालाही नवीन असावी! तुमच्यासारखी पक्की जाण नसलेल्या सुशिक्षित माणसाला तो वाचून दाखवा. त्या माणसाला बोजड आणि नीरस वाटेल. त्याला शब्द आवडणार नाहीत. वाक्ये आवडणार नाहीत.

वाचक कोण ते ठरवल्यानंतर त्या वाचकासाठी लेखन रंजक करणे महत्त्वाचे. याबाबत तुमच्याशी सहमत.

बहुतेक गोष्टींशी सहमत

मी मराठी संस्थळांवर टाइमपास, वायफळ गप्पा, टवाळक्या, मित्रमैत्रिणी जोडण्याकरता येतो. त्याचबरोबर माझी जी काही लेखनाची थोडीफार हौस आहे ती भागवण्याकरता येतो. इतरांचं ललित लेखन वाचण्याकरता येतो. माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारे लेख देखील मी वाचतो, कुठलीही माहिती हवी असल्यास ती मिळवण्याकरता मला आंतरजालाचीच मदत होते! तसेच अल्पबुद्धी असल्यामुळे इथल्या अनेक सदस्यांची मदत मला फार महत्त्वाची वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पोटापाण्यासाठी..

पोटापाण्यासाठी आम्हाला जालावर यावे लागत नाही. आंही येतो ते भरल्यापोटी, त्यामुळे जे असणारच अशा मतभेदांचे कुठलेही बंध आम्हाला जालापासून दूर ठेवू शकत नाहीत. अर्थात तात्या काही म्हणोत, ते जालावर नुसती हौस म्हणून लिहीत नाहीत. ते आणि त्यांच्यासारखे इतर काही आहेत, म्हणून अनुदिन्या वाचणे अधिक सुखावह होते.--वाचक्‍नवी

धन्यवाद,

अर्थात तात्या काही म्हणोत, ते जालावर नुसती हौस म्हणून लिहीत नाहीत. ते आणि त्यांच्यासारखे इतर काही आहेत, म्हणून अनुदिन्या वाचणे अधिक सुखावह होते

हे कौतुक सपात्री आहे किंवा नाही हे माहिती नाही, तरीही कौतुकाच्या या दोन शब्दांबद्दल मी आपले व्यक्तिगतरित्या आभार मानतो!

धन्यवाद.. :)

आपला,
(सद्गदीत!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

सद्गदीत तात्यांना :)

मराठी संकेतस्थळांवर संशोधना व्यतिरिक्त, प्रोजेक्ट शिवाय,विद्वत्तेशिवाय, किंवा कृतीशिवाय येणा-यांसाठी मराठी संकेतस्थळांवर चर्चा,माहितीची देवाणघेवाण,इत्यादी इत्यादी करु नये असे कोणीही म्हटलेले नसले तरी येथील काही तथाकथीत विचारवंताचा सूर तसाच आहे, असावा असे वाटते. कधी तरी विज्ञानाच्या परिषदाला बसलोय असे वाटते.किंवा आता इतर ग्रहावरुन एखादा ग्रह पृथ्वीवर येऊन आदळणार आहे, तेव्हा त्याच्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे असे चिंताक्रांत चेहरे पाहिले की आमच्यासारख्या सामान्य माणसाचे फार हाल होतात.सततचे गंभीर चेहरे, जड लेखन हा तर काही दिवसापासून या संस्थळाचा अविभाज्य भाग बनला आहे, नवीन सदस्य येतो येथील वैचारिक वातावरण पाहतो आणि त्याची घुसमट त्याला केवळ प्रेक्षागृहात बसवायला लावतो ही आमची चिंता आहे. आणि आम्ही अपेक्षा करतो की, मराठी संस्थळावरील सदस्यांची संख्या वाढली पाहिजे, नवनवविचारांनी हे विचारपीठ गजबजून गेले पाहिजेत.आपल्याही मताची नोंद होते याचा त्याला आनंद वाटला पाहिजे. त्याला भरभरुन दाद दिली पाहिजे असे असतांना शिस्तीची अपेक्षा म्हणजे कु-हाडीचा दांडा गोत्यास काळ म्हणतात ते उगीच नाही. असो.......अशात आम्हीही जरा संकेतस्थळावर काय असावे,या बाबतीत जरा इमोशनल झाल्यासारखे वाटतो.तेव्हा पुढील काही दिवस (लिहिण्याची खाज येईपर्यंत ) प्रेक्षागृहात बसणे पसंद करु म्हणतो !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत आहे..

मराठी संकेतस्थळांवर संशोधना व्यतिरिक्त, प्रोजेक्ट शिवाय,विद्वत्तेशिवाय, किंवा कृतीशिवाय येणा-यांसाठी मराठी संकेतस्थळांवर चर्चा,माहितीची देवाणघेवाण,इत्यादी इत्यादी करु नये असे कोणीही म्हटलेले नसले तरी येथील काही तथाकथीत विचारवंताचा सूर तसाच आहे, असावा असे वाटते.

चलता है! विचारवंतांपुढे आपली काय बी बोलियाची टाप नाय बा! ;)

कधी तरी विज्ञानाच्या परिषदाला बसलोय असे वाटते.किंवा आता इतर ग्रहावरुन एखादा ग्रह पृथ्वीवर येऊन आदळणार आहे, तेव्हा त्याच्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे असे चिंताक्रांत चेहरे पाहिले की आमच्यासारख्या सामान्य माणसाचे फार हाल होतात.

हा हा हा! सहमत आहे.. :)

सततचे गंभीर चेहरे, जड लेखन हा तर काही दिवसापासून या संस्थळाचा अविभाज्य भाग बनला आहे, नवीन सदस्य येतो येथील वैचारिक वातावरण पाहतो आणि त्याची घुसमट त्याला केवळ प्रेक्षागृहात बसवायला लावतो ही आमची चिंता आहे.

खरं आहे! विद्वत्ता की काय ते म्हणतात ते आणि वैचारिक देवाणघेवाण की काय म्हणतात, ते प्रकरण खरंच इतकं बोजड आणि कंटाळवाणं असतं का हो? वैचारिक लेखन हे अत्यंत नीरस आणि लालित्याचा संपूर्ण अभाव असलेलंच असायला पाहिजे का हो? नाही, आता मुक्तरावांनी अनायसे विश्वजालावरील लेखनासंबंधी चर्चाप्रस्ताव टाकलाच आहे म्हणून मी लगे हाथ हे काही प्रश्न विचारून घेतले आहेत, इतकंच!

त्यामुळे बिरुटेशेठ, आपण म्हणता ते खरं आहे! आम्हीही इथे येऊन अनेकदा चुपचाप ग्यॅल्लरीत पंख्याजवळची जागा पकडूनच बसतो. वैचारिक लेख आणि माहिती व विचारांची देवाणघेवाण वाचता वाचता अगदी झकासपैकी डोळा लागून जातो! ;)

असो,

बिरुटेशेठ, आपला प्रतिसाद तेवढा वैचारिक वाटला नाही, तरीही आवडला! ;)

आपलाच,
(वैचारिक!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

फार वाईट वाटून घेऊ नये

आपण सर्वच सामान्य माणसे (जे स्वतःला असामान्य मानतात, त्यांना सोडूया आपल्यामधून.)

सामान्यच लोक वेगवेगळ्या प्रकारे बोलतात. एकच सामान्य माणूस वेळप्रसंगी वेगळ्या वेगळ्या प्रकारे बोलतो.

काही बोलणे आपल्याला आवडते, काही आवडत नाही. काही रसाळ वाटते, काही वाटत नाही. याबद्दल वाईट वाटून घेऊ नये.

संकेतस्थळे फुकट आहेत. म्हणून रसाळ न लिहिणारे लिहू तरी शकतात. लेख छापून विकावे लागले म्हणा. तर फक्त रसाळ लिहिणारेच लिहू शकतील. बाकीच्यांची लेखणी बंद होईल. यातही तोटा आहे.

माफ करा,

लहान तोंडी मोठा घास घेते आहे. आपल्याला दुखावण्याचा किंवा आपले म्हणणे चुकीचे आहे असे म्हणण्याचा माझा हेतू नाही. परंतू माहितीपूर्ण लेखन करून माहितीची देवाणघेवाण करणे हेच ज्या संस्थळाचे उद्दिष्ट असेल, तेथे अशाच प्रकाराचे लेखन वाचायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये. कपड्यांच्या दुकानात विद्युत उपकरणे मिळणार नाहीत व विद्युत उपकरणांच्या दुकानात कपडे मिळणार नाहीत. (अंडर वन रुफ छापाचे मॉल सोडल्यास) याच कारणाने इथे ललित लेखनाला बंदी घातली गेली ना!

शिवाय, (हा दुसरा आणखी मोठा घास) एखाद्या व्यक्तीची कामातून विरंगुळ्याबद्दलची जी संकल्पना असेल, तीच इतरांचीही असेल असे नव्हे. त्यामुळे एखादी व्यक्ती जर फक्त चेष्टामस्करीत रमत असेल, तर इतरांनीही फक्त त्यातच रमावे असे नाही. इतरांना आणखी वेगळ्या गोष्टींवरही चर्चा करण्यातून विरंगुळा मिळू शकतो. त्यामुळे चर्चाबहाद्दरांनी चेष्टामस्करीसाठी निर्मिलेल्या स्थळावर जाऊन 'इथे वैचारिक लेखन होत नाही' असे म्हणण्यात काही अर्थ नाही व चेष्टामस्करी करू इच्छिणार्‍यांनी वैचारिक संस्थळावर जाऊन 'इथे चेष्टामस्करी करायला वाव नाही' असेही म्हणण्यात अर्थ नाही. अर्थात चर्चाबहाद्दरांनी फक्त चर्चाच करावी आणि इतरांनी फक्त चेष्टामस्करी करावी असे माझे म्हणणे नाही. आहार कसा संतुलित हवा, वैचारिक गप्पाही हव्यात, आणि चेष्टामस्करीही. पण आपल्या आहारात प्राबल्य कशाचं असावं हे ठरवण्याचा अधिकार ज्याचा त्याला आहे. त्यासाठी आपल्या आवडीनुसार थोडं हे संस्थळ थोडं ते संस्थळ असं करून बघावं. एकाच संकेतस्थळावर 'चौरस आहार' मिळेल अशी अपेक्षा करणे हे फायद्याचे ठरेल असे वाटत नाही.

राधिका

सहमत आहे.

व्यक्ती तितक्या प्रकृती.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मुद्दे

तात्या हे एक शैलीदार लेखक आहेत आणि आपल्या शैलीत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यातील कोपरखळ्यांचा आस्वाद घेतला तरी चर्चेकरता त्या थोड्या बाजूला ठेवून त्यानी मांडलेल्या मुद्द्यांचा परामर्श घेणे इष्ट.

मी मराठी संस्थळांवर केवळ अन् केवळ टाईमपास, वायफळ गप्पा, टवाळक्या, मित्रमैत्रिणी जोडण्याकरता येतो. माझी जी काही लेखनाची थोडीफार हौस आहे ती भागवण्याकरता येतो. इतरांचं ललित लेखन वाचण्याकरता येतो. माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारे लेख मी सहसा वाचत नाही, कुठलीही माहिती हवी असल्यास ती मिळवण्याकरता मला आंतरजालाची जराही गरज भासत नाही! तसेच अल्पबुद्धी असल्यामुळे आंतरजालावरचे इतरही कुठले वैचारिक वगैरे लेख वाचण्याच्या फंदात मी सहसा पडत नाही..

जाळावरच्या - विशेष करून मराठी संस्थळांवरच्या - वावराकडे बघण्याचा हा एक नजरीया आहे. "ललित लिखाण" , "साहित्य" , यांचे जसे एक स्थान आहे, तसेच एक स्थान विचारांच्या देवाणघेवाणीचे आहेच. तात्या जेव्हा शास्त्रीय संगीतावर लेखमाला लिहितात तेव्हा त्यातील लालित्याबरोबर त्यातील माहितीचेही संप्रेषण होतच असते. वेश्याव्यवसायाबद्दलच्या आपल्या अनुभवांबद्दल जेव्हा ते लिहितात तेव्हा , त्या लिखाणाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम म्हणून "वेश्याव्यवसायाची नैतिकता" या विषयावर एक फार मार्मिक चर्चा होते. (आणि तात्या त्या चर्चेत स्वतःची मते मांडतात. )
थोडक्यात , ललित-लिखाण आणि त्याबद्दलची तत्वचर्चा , विडंबने आणि ती करण्यामागची साधक-बाधक चर्चा या सर्व गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या करणे कठीण आहे. तात्पर्य , एखाद्यास आवडो न आवडो, पटो न पटो , आपण सर्व जण "वैचारिकतेच्या" पाण्यामधे ओले होतोच :-)

श्रेयस आणि प्रेयसही !

जालावरील लेखन-वाचनामुळे असलेले दोस्तमंडळ सुदृढ होण्यास तर त्यात आणिक नविन दोस्तांची भर पडण्यास अत्यंत मदत झाली. कित्येक दोस्त प्रत्यक्ष आयुष्यात आहेत तर जालावर नाहीत, काही दोस्त दोन्हीकडे आहेत तर काही जालावर आहेत तर प्रत्यक्ष आयुष्यात नाहीत ! सुरूवातीला मी फक्त प्रत्यक्ष आयुष्यात दोस्त जोडायचे, मग केवळ जालावरच्याच दोस्तजोडणीत मश्गूल झाले आणि आता.. आता दोन्हीकडचे दोस्त संभाळायचा प्रयत्न करून दोन्हीकडे दोस्तमंडळ विस्तारतेय. :-) आयुष्यातले निरनिराळे रंग खुलवण्यात साहजिकच यामुळे भरपूर मदत झाली, होतेय आणि होतही राहील.

लेखनावर आधी असलेला माझा भर कमी होऊन काहीसे वाचनाभिमुख करण्यात जालावरचा वावर उपयुक्त ठरला आणि त्यामुळेच की काय इथे झालेल्या विचारा-भावनांच्या आदानप्रदानातून 'प्रत्यक्ष' आयुष्यात जास्त लक्ष देण्याची गरज लक्षात आली. या आभासी जगात काही करण्याची धडपड करण्यापेक्षा प्रत्यक्ष आयुष्यात काही करणे कसे जास्त उपयुक्त आहे हे पटले आणि अनुकरता आले. प्रत्यक्ष आयुष्याशी झालेल्या या पुनर्भेटीने जगण्याचा दृष्टीकोन चांगल्या अर्थाने भरपूरच बदलला आहे.

एकूणात काय तर जालाचा उपयोग मी साधन म्हणून बर्‍यापैकी चांगला करून माझे जीवन सर्वार्थाने समृद्ध करु शकण्यात यशस्वी होते आहे !

अगदी मान्य आहे

मुक्तसुनीत यांचे हे विचार पूर्णपणे पटले.
यामुळे माझे जीवन बदलले आहे हे नक्की. हे धनंजयांचे वाक्य तंतोतंत पटते.

आपल्या वाचनाची मर्यादा, आपल्या ज्ञानाचा तोकडेपणा कळण्याबरोबरच इतरांचे विचार कसे आहेत हे 'दिलखुलास' पणे कळते.
एक नवे मैत्र निर्माण झाले आहे. नाहीतर या वयात आणि राहत्या ठिकाणी नवे 'समान शील आणि व्यसन' असणारे मित्र मिळणे दुरापास्त झाले असते.

(कविकल्पनेत बोलायचं तर स्वमताच्या भिंतीत चिणून गेलेल्या संकुचित मनाला नव्या ज्ञानाचे धुमारे फुटले. पायाभोवती गोळा झालेलं क्षितिज हळूहळू दूरवर पसरू लागलं. आकाशात दाटून आलेलं एकटेपणाचं मळभ दूर होऊन मनाच्या पंखांना पुन्हा उभारी आली. वगैरे...)

उपयोग

मला वैयक्तिक पातळीवर अशा संस्थळांचे बरेच फायदे झाले. वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळाली, असे म्हणणे माझ्या बाबतीत तितकेसे खरे ठरणार नाही; कारण माझ्या स्वभावानुसार मी केवळ माझ्या आवडीच्या विषयांवरचेच लेख वाचते, बाकीचे लेख वाचत नाही. (होम्सप्रेमींनी होम्सने त्याला खगोलशास्त्र न येण्याबाबतची कारणे सांगितली होती ती आठवावीत व मला मोठ्या मनाने माफ करावे. :) ) माझ्या विषयावरचे लेख वाचण्यासाठी व माझ्या विषयाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी मला अशा संस्थळांच प्रचंड उपयोग झाला. अगदी माझ्या शिक्षकांनीही माझ्या विषयातले जे मला शिकवले नव्हते, ते इथले काही लेख व प्रतिसाद वाचून मला शिकायला मिळाले.

शिवाय समविचारी माणसे भेटली, त्यातल्या काही जणांशी खूप जवळची नाती निर्माण झाली. संस्थळावरच्या बर्‍याच जणांशी माहितीच्या व्यतिरिक्त इतरही अनेक उपयोगी गोष्टींची देवाणघेवाण झाली. जसे इथे भेटलेल्या काहींशी मी पुस्तकांची देवाणघेवाण केली, काहींशी कामातल्या मदतीची देवाणघेवाण केली. थोडे खोलात जाऊन सांगायचे झाले तर अशा संस्थळांवरल्या एका सदस्याने मला निर्माण करावयाच्या असलेल्या एका संस्थळाची पूर्ण तांत्रिक बाजू सांभाळली, तीही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता. दुसर्‍या एका सदस्याने, माझ्या क्षेत्रात निर्माण होणार्‍या अर्थार्जनाच्या संधींची माहिती दिली.

याही खेरीज आणखी एक तिसरा उपयोग म्हणजे, या संस्थळांच्या माध्यमातून मला जगातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या माणसांची ओळख झाली. थोडे चुकत माकत माणसांना कसे ओळखावे, वेगवेगळ्या माणसांशी कसे डील करावे वगैरे वगैरे बरेच शिकता आले. हा उपयोगही महत्त्वाचा आहे.

राधिका

सामाजीक स्थान, वैयक्तीक जबाबदारी आणि जालाची मिती

ज्यांना अब्राहम म्यास्लो हे ठाउक असेल तर विवंचन्नंची उतरंड या विषयी माहीती द्यायला नको.
पण अन्य लोकांनी विषय समजण्या करता खालील साईट वर् जाऊन पहावे.
http://en.wikipedia.org/wiki/Image:Maslow%27s_hierarchy_of_needs.svg#file

जालावर वेळ देणारे व चर्चा करणारे लोक सर्वात वरच्या स्तरातील् विवंचना असणारे लोक् आहेत.

चर्चेतून वैयक्तीक उत्कर्ष किती होतो याचा विचार आपण करीत आहोत ते या श्रेयस् आणि प्रेयस चर्चेतून.
पण जग इथे संपत नाही. मेस्लोच्या सर्व "विवंचनां गटां"च्या कौंबीनेशन मधे जग जगते आहे.

१.या जालाचा वांझोटी चेतना निर्माण करण्यास होत राहील.
२. विश्वजाला मधील चर्चांची उपयुक्तता अक्षरांना भुललेलो आपण पुर्णत्वास नेउ शकत नाही.
३. आपल्या पैकी (माहीत नसलेले सन्माननीय अपवाद सोडून) बहुतेकांना, माझ्या सकट , कुठलेही सामजीक धेय नाही. असु शकत नाही. आपले मेस्लो कौम्बीनेशन स्वयंकेंद्रीत आहे.
४. ध्येय वेड्या लोकांना वेळच अपुरा असतो.
ते आपल्या सारख्या समाजापासून ४ हात दूर राहून आपले काम अक्षरांचा कमीत कमी
वापर करून पूर्णत्वास नेत असतात.
आपण त्यांचे गुण गान करणे, त्यांच्या बद्दल चर्चा करणे , ही कामे करीत असतो.
अर्थात असे लोक आपल्या पेक्षा श्रेष्ठ असतात.
५.जालाची मिती ( डायमेंशन ) अश्या श्रेष्ठ लोकांना सामवून घेण्यास तोकडी राहील . कारण..आपण सर्व जणांचे मेस्लो कौम्बीनेशन हे पोटार्थी व ढेकरानंदी आहोत... अर्थात् .. आपण त्रुप्त आहोत आणि आपली संख्या धेय वेड्यां पेक्षा लाखो पट अधीक आहे.

मला दे़खील हे माहीत झाल्याचे कारण ही चर्चा आहे.
मुक्तसुनित धन्यवादास पात्र !

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

उलटा अर्थ

मास्लोच्या पिरॅमिडचा इतका उलटा अर्थ प्रथमच बघायला मिळाला. जर तुम्ही सर्वात वरच्या थरात असला आणि तुमच्याच प्रतिसादानुसार उपक्रमी सर्वात वरच्या थरात आहेत तर याचा अर्थ उपक्रमींमध्ये खालील गुण आहेत.
Maslow writes the following of self-actualizing people:
* They embrace the facts and realities of the world (including themselves) rather than denying or avoiding them.
* They are spontaneous in their ideas and actions.
* They are creative.
* They are interested in solving problems; this often includes the problems of others. Solving these problems is often a key focus in their lives.
* They feel a closeness to other people, and generally appreciate life.
* They have a system of morality that is fully internalized and independent of external authority.
* They have discernment and are able to view all things in an objective manner.

तुम्ही क्रमांक १ ते ५ मध्ये दिलेले गुण याच्या उलट आहेत. त्यामुळे तुम्हाला नेमके काय म्हणायचे हे आहे ते कळाले नाही. उपक्रमी १ ते ५ गुण असणारे आहेत असे म्हणायचे असेल तर ते मास्लोच्या सर्वात वरच्या थरात आहेत असे तरी म्हणू नका. (टीप : मास्लोच्या वरच्या थरामध्ये असणारे लोक दुर्मिळ असतात, ते सहजासहजी बघायला मिळत नाहीत असे वाटते.)

शेवटी माझ्या एका मित्राचे पेटंट वाक्य आठवले. चर्चा अशा थराला पोचली की तो कापरासारखा पेटून उठे आणि विचारत असे, "यार, तेरा लाइफ में प्रॉब्लेम क्या है?"

----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

बरचसा सहमत!

पण जग इथे संपत नाही. मेस्लोच्या सर्व "विवंचनां गटां"च्या कौंबीनेशन मधे जग जगते आहे.

सहमत आहे..

ध्येय वेड्या लोकांना वेळच अपुरा असतो. ते आपल्या सारख्या समाजापासून ४ हात दूर राहून आपले काम अक्षरांचा कमीत कमी वापर करून पूर्णत्वास नेत असतात.

सहमत आहे. अशी काही माणसं मला माहिती आहेत. 'अबक' नावाचे एक पंचावन्न वयाचे गृहस्थ. त्यांचा स्वत:चा अमेरिकेत एक बर्‍यापैकी मोठा उद्योग व्यवसाय होता, त्यांची स्वत:ची वैयक्तिक संपत्तीही अगदी भरपूर होती. ती सर्व संपत्ती त्यांनी आपल्या तीनही मुलांत आणि बायकोला समान वाटली, उद्योगव्यवसायाची योग्य ती वासलात लावली आणि स्वत:ला भारतात केवळ दोन वेळच्या जेवणाकरता पैसा पुरेल इतकाच पैसा घेऊन हा इसम भारतात परतला. आयुष्यभर अमेरीकेमध्ये अत्यंत संपन्न, वैभवशाली जीवन जगलेला हा माणूस आता भारतात अगदी कनिष्ठ मध्यमवर्गीय अवस्थेत राहतो आणि सर्व वेळ वनवासी कल्याण आश्रमातल्या मुलांना सातवीपर्यंतचं गणीत शिकवतो! अत्यंत कृतार्थ भावनेने 'आता हेच आयुष्याचं ध्येय आहे असं मानतो!

अर्थातच, कुठलीही वैचारिक चर्चा वगैरे न करता!! :)

टीप - अबक हे या माणसाचे खरे नांव नाही. त्यांचे खरे नांव वेगळेच असून ते मी त्यांच्या परवानगीशिवाय येथे देऊ शकत नाही.

असो, परंतु सांगायचा मुद्दा इतकाच की परमाणू यांनी म्हटल्याप्रमाणे,

ते आपल्या सारख्या समाजापासून ४ हात दूर राहून आपले काम अक्षरांचा कमीत कमी वापर करून पूर्णत्वास नेत असतात.

हे अगदी पटण्यासारखे आहे! आज वनवासी कल्याण आश्रम म्हणा, आनंदवन म्हणा, मुक्तांगण म्हणा, मतिमंद मुलांची शाळा म्हणा, या सारख्या संस्थांतून अशी अनेक माणसं कुठलीही वाच्यता, वैचारिक वगैरे चर्चा (!) न करता झडझडून काम करतांना मी पाहिली आहेत, पाहतो आहे! (यापैकी काही मंडळींना मी खूप जवळून ओळखतो, सवडीनुसार येथे किंवा अन्य संस्थळांवर त्यांचा विस्तृत परिचय करून देण्याचाही मी प्रयत्न करीन!)

माझ्या मते गाडगेबाबा हे तर याचं अगदी आदर्श उदाहरण! रस्ता कसा झाडावा, कुठल्या पद्धतीने झाडावा, कुठून सुरवात करावी, कुठला झाडू वापरावा वगैरे वैचारिक चर्चा करत संगणकाचा कळफलक बडवत न बसता या माणसाने हातात झाडू घेऊन काम करून दाखवलं! आजच्या कळफलक बडवत संगणकाच्या छोट्याश्या पडद्यावर वैचारिक वगैरे चर्चा करण्याच्या युगात (माझ्यासकट) आपल्यापैकी किती जण ग्राऊंड लेव्हलला उतरून झडझडून काम करताहेत हा मला तरी प्रश्नच आहे!!

सबब परमाणूंच,

ध्येय वेड्या लोकांना वेळच अपुरा असतो. ते आपल्या सारख्या समाजापासून ४ हात दूर राहून आपले काम अक्षरांचा कमीत कमी वापर करून पूर्णत्वास नेत असतात.

हे विधान वास्तवाला धरून आहे, पटण्याजोगे आहे. पोटभर जेवून वातानुकुलीत खोलीत बसून संगणकावर चार वैचारिक अक्षरं बरबटावयाला फारसे कष्ट लागत नाहीत असं माझं मत आणि व्यक्तिगत अनुभव आहे! ;)

आपण त्यांचे गुण गान करणे, त्यांच्या बद्दल चर्चा करणे , ही कामे करीत असतो.

अगदी खरं! मीही त्यापैकीच एक! असं प्रांजळपणे सांगू इच्छितो! :)

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

हम्म! विधान पटण्याजोगं/विचार करण्याजोगं वाटतं आहे. यावर एक वेगळी वैचारिक चर्चा घडवता येईल! ;)

अवांतर -

१) 'वांझोटी चेतना' आणि 'ढेकरानंदी' हे शब्द खूप आवडले. विशेष करून 'ढेकरानंदी' हा शब्द तर मस्तच वाटला! ;)

२) 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे' हे वचन बदलून, 'क्रियेवीण वैचारिक चर्चा व्यर्थ आहे' असे असावे असे मला वाटते!

सामाजिक कार्यासंदर्भातल्या पुष्कळश्या चर्चा या वांझोट्याच ठरतात असे माझे व्यक्तिगत मत माझ्या सामाजिक अनुभवाअंती झाले आहे!

शेवटी काय, 'केल्याने होत आहे आधी केलेचि पाहिजे' हेच खरं!

आपला,
(ढेकरानंदी!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

ज्यास्त ब्लॉगिंग

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

अगदी खरे आहे. म्हणतात ना, मणभर उक्तीपेक्षा कणभर कृति श्रेष्ठ आहे.

परंतु

काहीच न करण्यापेक्षा ब्लॉगिंग करणे चांगले. - इति अस्मादिक.

समजले नाही.

या चर्चेत परमाणु यांचा असा निराशावादी प्रतिसाद का आला ते समजले नाही.
स्वतः मुक्तसुनित यांनी जालावरील त्यांच्या वावराचा (लहान का होईना) समाजिक फायदा नमूद केला आहेच.
त्यामुळे हा प्रतिसाद वाचून असे म्हणावेसे वाटले-
१.या जालाचा वांझोटी चेतना निर्माण करण्यास होत राहील.
-जगात अनेक आंतरराष्ट्रीय चळवळी जालाच्या मदतीवर सुरू आहेत. या चळवळींसाठी लागणारी संसाधने उपलब्ध करून देण्यामागे जालावरील अनेक चर्चागट कार्यरत आहेत. मग ही चेतना वांझोटी कशी?
२. विश्वजाला मधील चर्चांची उपयुक्तता अक्षरांना भुललेलो आपण पुर्णत्वास नेउ शकत नाही.
-कळले नाही. चर्चांची उपयुक्तता पूर्णत्वास नेणे म्हणजे नक्की काय? चर्चेतून ज्याला जे पाहिजे ते मिळाले की झाले.
३. आपल्या पैकी (माहीत नसलेले सन्माननीय अपवाद सोडून) बहुतेकांना, माझ्या सकट , कुठलेही सामजीक धेय नाही. असु शकत नाही. आपले मेस्लो कौम्बीनेशन स्वयंकेंद्रीत आहे.
- प्रत्येकाला काही सामाजिक ध्येय असायलाच हवे असा कोणताही नियम नाही. परंतु ते बहुतेकांचे नसेलच याची खात्री कशी द्यावी? येथे मास्लोचा दाखला कशासाठी?
४. ध्येय वेड्या लोकांना वेळच अपुरा असतो.....आपण त्यांचे गुण गान करणे, त्यांच्या बद्दल चर्चा करणे , ही कामे करीत असतो.
अर्थात असे लोक आपल्या पेक्षा श्रेष्ठ असतात.
- येथे लिहिणारे अनेकजण स्वतः ध्येयवेडे आहेत, सर्व सामान्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. तरीही 'शहाणे करुनि सोडावे सकळजन' ही उक्ती अनुसरून आपल्या ज्ञानाचे भांडार येथे खुले करतात. ती त्यांची चूक आहे काय? त्यांना कामेधंदे नाहीत असे म्हणायचे आहे काय?
५.जालाची मिती ( डायमेंशन ) अश्या श्रेष्ठ लोकांना सामवून घेण्यास तोकडी राहील...आपण सर्व जणांचे मेस्लो कौम्बीनेशन हे पोटार्थी व ढेकरानंदी आहोत
- जालाचा आवाका आणि वाढत जाणारी लोकप्रियता पहाता ते कधी तोकडे पडेल असे वाटत नाही. उलट जसजसे जास्त लोक जाल वापरू लागतील, माहिती आणि विचारांचे आदानप्रदान करतील येतील तितके हे जग समृद्ध आणि सुखी होईल. (मुळात दु:खाचे कारण अज्ञान आहे असे अनेक प्रेषितांनी म्हटले आहे. मी तर वाळका पाला!)
पुढे होणारी कोणतीही वैचारिक क्रांती जालाच्या माध्यमातूनच होईल हे निश्चित!
आपण केवळ पोटार्थी आणि ढेकरानंदी असतो तर येथे लिहिणे, वाचणे, चर्चा करणे हे सारे न करता काही 'इतर' स्वरुपाच्या संस्थळांना भेटी देऊन मनोरंजन करत राहिलो असतो.

मास्लोचे मत तर पटतेच. त्यात काही वादच नाही. किंबहुना मास्लोपेक्षा खूपच पूर्वी गौतमाने पोट न भरलेल्या माणसाला धर्म न सांगण्याचा निर्णय घेतला होता. गरजांच्या सर्वात खालच्या पायरीवर उभ्या असलेल्या मानवाला तो कसा कळणार? आणि कळाला तरी त्याप्रमाणे वागणे अशक्य!

वैचारिक प्रवाह

मला एक वेगळे अनुभव विश्व पहायला मिळाले. वाद-संवाद हे प्रत्येकाला हवे असतात. वास्तव-आभासी जगात वावरताना अनेक नवीन माहिती मिळाली. आपल्याला काही देता आलं, इतरांच घेता आल. काही मर्यादा व काही भान ठेवाव लागलं. पण एकंदरीत मानसिक आरोग्य चांगले राखण्यात अशा संकेतस्थळांचा हातभार आहे.
जालावर असो कि वास्तवात आपण प्रवाहात राहिलो नाही तर बाजूला फेकले जातो. जालावर आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड ही प्रवाहात टिकण्याची धडपड आहे. आलात तर तुमच्या सह नाही आलात तर तुमच्या शिवाय . (वाहत राहू असे प्रवाह सांगतो)
प्रकाश घाटपांडे

झकास

काय विधान केलेत प्रकाशराव्!
आलात तर तुमच्या सह नाही आलात तर तुमच्या शिवाय .

आपला
येणारा... किमान प्रयत्न तरी करणारा...
गुंडोपंत

तेच म्हणतो!

>>जालावर आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड ही प्रवाहात टिकण्याची धडपड आहे. आलात तर तुमच्या सह नाही आलात तर तुमच्या >>शिवाय . (वाहत राहू असे प्रवाह सांगतो)

आपलेच प्रवाहगामी(की प्रवाह पतित?)
जन सामान्यांचे मन

 
^ वर