"नो कंट्री फॉर् ओल्ड् मेन्"च्या निमित्ताने

काल रात्री "नो कंट्री फॉर् ओल्ड् मेन्"हा यंदाचा ऑस्करविजेता सिनेमा पाहिला. चित्रपट परिणामकारक वाटला असे सांगितले तर आश्चर्य वाटायला नकोच. (उलट "यात तुम्ही काय नवीन सांगताय् राव ! " अशी कुणी खिल्ली उडवेल ; आणि ती योग्यच ठरेल ! असो. )

थोडी चित्रपटाची ओळख करून देतो. पुढील परिच्छेदामधे आणि त्यानंतरच्या विवेचनामधे कथानक आणि त्याचे प्रमुख धागेदोरे उघड करत आहे. ज्याना हा चित्रपट पहायचा असेल आणि पहाताना रसभंग होऊ द्यायचा नसेल त्यानी वाचू नये.

चित्रपट १९८० सालातील पश्चिम टेक्सास मधे घडतो. अमली पदार्थाच्या व्यापारातील एका मेक्सिकन गॅंगमधे एका व्यवहारामधे भीषण हिंसा घडलेली आहे. लुआलिन् मॉस् या नावाचा , एकेकाळच्या व्हिएतनाम युद्धात भाग घेतलेला , पण आता अगदी दरिद्री परिस्थितीमधे रहाणारा एक टेक्सास-कर (!) माणूस शिकार करत असताना हा घटनाप्रसंग घडून गेल्यावर घटनास्थळी पोचतो. मेलेल्या अवस्थेतल्या माणसांच्या आणि त्यांच्या गाड्यांच्या सान्निध्यात त्याला मिळते एक काळी बॅग्, ज्यात २० लाख डॉलर्स आहेत. त्याच ठिकाणी त्याला या घटनेतला शेवटचा बळी आचके देताना दिसतो. अर्थातच , मॉस ती बॅग उचलतो , जखमी माणासाची पर्वा न करता तडक घरी येतो.

कथानकाच्या दुसर्‍या धाग्यात अन्त्वान् चिरग् या नावाच्या , एका थंड रक्ताच्या हिंस्त्र खुनी मारेकर्‍याची ओळख प्रेक्षकाना दोन प्रसंगातून करून दिली जाते. हा सैतान एका पोलीस अधिकार्‍याचा आणि वाटेतल्या एका निरपराध वाहनचालकाचा निर्घृण खून करतो.

इकडे मॉसभाऊ आपल्या घरी २० लाखांच्या शेजेवर झोपलेले असताना अचानक त्याना पापक्षालनाचा झटका येतो. आचके देत असलेल्या जखमी माणसाकरता पाणी घेऊन महाशय घटनास्थळी पोचतात. रात्रीच्या अंधारात त्याला दिसते की तो शेवटचा माणूस मेलाय्. आणि नेमके तेव्हाच घटनास्थळी गॅंगचे इतर सभासद २० लाख डॉलर्सचा छडा लावायला आलेले असतात. अन्त्वान् चिरगवर २०लाख डॉलर्सचा छडा लावायची कामगिरी गॅंगकडून दिली गेलेली असते. मॉसवर हल्ला होतो, त्याचा पाठलाग केला जातो. यातून तो सुटतो आणि पळायला लागतो. चिरग् त्याच्या मागेमागे. साक्षात् मृत्युरूपी असे चिरग साहेब आपल्या मालकांवरही प्राणाघातक हल्ला करून त्याना यमसदनास धाडतात. मॉस आणि चिरग् यांचा पाठलागाचा एक प्रमुख धागा.

या चित्रपटातला तिसरा आणि आणखी एक महत्त्वाचा धागा म्हणजे पोलिसांचा म्होरक्या, शेरीफ एड् टॉम् बेल्. फौजदार वास काढत काढत या पाठलागाचा मागोवा घेत रहातो ; आणि एकूण अमली पदार्थातील भीषण हिंसेने, विशेषतः चिरगने केलेल्या कत्तलीने दिड्.मूढ होत रहातो. पण पाठलाग करतच रहातो.

वाटेतल्या प्रत्येकाला मारत मारत चिरग् शेवटी एका अपघातामधे जखमी होतो. पण पोलिसाना न सापडता सहीसलामत सुटतो. मॉस गॅंगच्या इतर सभासदाकडून मारला जातो. शेरीफ आपल्या कर्तुम्-अकर्तुमच्या मानसिक तिढ्यामधे शेवटी निवृत्त होतो. चित्रपट संपतो.

कथानक भाग संपूर्ण

काही ठळक बाबी :

हा एका अर्थाने "पीरीयड् मूव्ही" - एका ऐतिहासिक कालखंडामधे घडाणारा चित्रपट आहे. फक्त हा कालखंड केवळ २५ वर्षे जुना आहे. (कलादिग्दर्शकाने ही एक थोडी बाब काहीशी आव्हानत्मक आहे असे म्हण्टले आहे. ऐतिहसिक चित्रपट बनवण्याची तंत्रे , आडाखे ठरलेले असतात. केवळ २५ वर्षे जुना कालखंड चितारताना म्हण्टले तर "सेट्स्" आणि कृत्रिम "प्रॉप्स्" चा वापर करायला नको ; पण हवासुद्धा ! ८०च्या काळाच्या गाड्या, वेषभूषा या सगळ्या गोष्टी अर्थातच अत्यंत विश्वसनीय रीत्या चितारल्या गेल्यात.)

कथानकाच्या एकंदर सारांशावरून हा एक निव्वळ ठराविक अंगाने जाणारा पाठलागाचा आणि हिंसेचा पट आहे असे कुणालाही वाटेल. आणि या चित्रपटाचे हे दोन प्रमुख घटक आहेतही. पण या व्यतिरिक्त चित्रपट नियती, जगण्या-मरण्याचे स्वातंत्र्य , योगायोग , भागधेय, मनुष्यस्वभाव, नीतीमूल्ये , कर्तुमकर्तुम् यांच्यातला संदेह या गोष्टीना स्पर्श करतो.

चिरगचे पात्र दहशत वाटावे असे झाले आहेच. पण त्याच्याबद्दल निव्वळ घृणा वाटावी अशा एकजिनसी काळ्या रंगात तो रंगविला गेलेला नाही. एका अर्थाने त्याला मृत्यूचे प्रतीक या अर्थाने पहाता येईल. मृत्यूइतक्याच अटळपणे तो आपल्या रस्त्यात येणार्‍याना टिपतो. क्वचित् कधीतरी तो आपल्या सावजाला नाणेफेक करून जगण्या-मरण्याची संधी देतो.

एकूणच , दिग्दर्शकाचा सगळा हेतू मुळी एक निर्णायक असा शेवट चितारण्याकडे नाहीच, हे अगदी स्पष्ट आहे. असल्या टोकाच्या परिस्थितीमधे माणासातल्या आदिम प्रवृत्ती कशा कार्यरत होतात हे त्याना दाखवायचे होते. स्थलकालाचे चित्रण, घटना आणि पात्रे यांच्या अत्यंत घट्ट अशा वीणीतून दिग्दर्शकद्वय नीतीमूल्यांची रिलेटिव्हीटी (मराठी शब्द) , मनुष्यस्वभाव आणि नियती यांच्यातील नाट्य चितारतात.

लेखनविषय: दुवे:

Comments

नितीमूल्यांची सापेक्षता

अशाच प्रकारचे प्रसंग भुकंप वा तत्सम नैसर्गिक आपत्तीत घडतात. अपघातात मरायला टेकलेल्यांना तसेच सोडून देउन त्यांच्या सामानाची उचलेगिरी करतात. हा तर गचकणार आहे , आपण नाही उचलले तर न जाणो नंतर येणारा उचलेल.
ते अमेरिकेत कंच झाल्त हो चक्रीवादळ? तव्हा बी असच झाल्त म्हंत्यात खरं हाय का ते?
प्रकाश घाटपांडे

काही उत्तरे

>>>>>ते अमेरिकेत कंच झाल्त हो चक्रीवादळ?
तुम्हाला "कट्रीना" म्हणायचे असावे.

>>>>तव्हा बी असच झाल्त म्हंत्यात खरं हाय का ते?
ठाव् न्हाय् बा !

चांगले परिक्षण

परिक्षणाशी असहमत असलो तरी तुम्ही छानच लिहिले आहे हे नक्की. मला हा चित्रपट आवडला/झेपला नाही. शेवट पर्यंत उत्कंठा ताणून धरुन तिथेच संपवला जातो. उगीचच प्रेक्षकांची उत्कंठा ताणून धरुन शेवटी 'शेवट निर्णायक चितारायचाच नाही' हे काही झेपले नाही. तसेच टॉमी ली जोन्सचा ग्रामीण टेक्सस ऍक्सेंट अर्ध्याच्यावर डोक्यावरुन जातो.

चिरगचे पात्र दहशत वाटावे असे झाले आहेच. पण त्याच्याबद्दल निव्वळ घृणा वाटावी अशा एकजिनसी काळ्या रंगात तो रंगविला गेलेला नाही.

ह्याच्याशी देखिल असहमती. इतक्या गडद गडद काळ्या रंगात रंगवलेले पात्र क्वचितच पहायला मिळते. ह्याच्या माथेफिरु कत्तली पाहून भितीयुक्त घॄणा वाटत राहते.

अर्थातच ह्या चित्रपटाने अनेक उत्तम परिक्षणे आणि आता ऑस्कर देखिल मिळवले आहे. त्यामूळे माझे मत फारसे गंभीर न घेता सर्वांनी हा चित्रपट पाहावा.

तुमचे मुद्दे

>> उगीचच प्रेक्षकांची उत्कंठा ताणून धरुन शेवटी 'शेवट निर्णायक चितारायचाच नाही' हे काही झेपले नाही.

कोलबेर यांच्या निरीक्षणाशी मी सहमत आहे. चित्रपट संपल्यानंतर माझी देखील तंतोतंत हीच प्रतिक्रिया झाली. माझ्या लेखाचे शीर्षकच मुळी "या चित्रपटाच्या निमित्ताने " असे आहे. उपक्रमासारख्या ठिकाणी हे लिहायचे कारणच मुळी एखादी गोष्ट चर्चेच्या निमित्ताने जास्त चांगली समजून घ्यावी असे असते.

या दिग्दर्शकद्वयाचा "फार्गो" हा आणखी एक ऑस्करविजेता चित्रपट मागे मी पाहिला होता. त्याच्यातील एकूण थीम (मराठी शब्द ) वरील चित्रपटासारखाच आहे. कथावस्तूचे रेखाटन त्यातला काळा विनोद, पात्रांच्या प्रदेशसापेक्ष लकबी , बोलण्याचा ढंग यांची विश्वसनीयता या बाबी त्यातही होत्याच. पण सुष्टांनी दुष्टांचा लावलेला छडा असा शेवट असल्याने हा चित्रपट एक संपूर्णत्वाची जाणीव देणारा ठरतो. "नो कट्री.." चे असे होत नाही. "सायलेन्स् ऑफ द लॅम्ब्स्" याआणखी एका चित्रपटाची इथे आठवण येणेही साहजिक आहे.

तर मग या निमित्ताने पडलेले प्रश्न :

"दुष्टांचे पारिपत्य" हा जो एक "कॅथार्टिक एलिमेंट्" आहे ; किंवा "निसर्गातल्या बर्‍या-वाईट घटकांचा कुठेतरी समतोल साधला जातो" यासारखी गृहितके किंवा , "अंतिमतः कृष्णकृत्ये करणारेच जिंकतात" यासारखी निराश विधाने यापैकी कशा न कशावर तरी आपल्यासारख्या सामान्य प्रेक्षकांची भूमिका ठरलेली असते. किंवा असे म्हणू की, यापैकी एका तरी किनार्‍यावर अशा प्रकारच्या चित्रपटांचे तारु लागावे अशी अपेक्षा असते. अर्थातच प्रस्तुत चित्रपट त्या पूर्ण करत नाही. तर प्रश्न असा की ,

- अशा प्रकारचा ठोस, निर्णायक शेवट आपल्याला हवा असण्याचे कारण काय असते ? माझ्या जुजबी माहिती प्रमाणे ऍरिस्टॉटलने आपल्या साहित्यविषयीच्या मूलभूत ग्रंथामधे "कॅथार्सिस्" (म्हणजे भावभावनांचा निचरा) हे साहित्यनिर्मितीचे अतिमहत्त्वाचे तत्व आहे असे विशद केले आहे. "नो कंट्री..." सारख्जे चित्रपट या तत्वाला तडा देतात म्हणून आपल्या वर्षानुवर्षीच्या "कंडीशन्ड्" (मराठी शब्द) मनाला पटत नाहीत ही शक्यता असेल का ?
- असा शेवट न करून चित्रपटाने निराशा केली काय ?
-असा शेवट न दाखविणे हे सत्याच्या जवळ जाणारे असू शकेल काय ? पर्यायाने ते कलादृष्ट्या जास्त योग्य ठरू शकेल काय ?

शेवट

अशा प्रकारचा ठोस, निर्णायक शेवट आपल्याला हवा असण्याचे कारण काय असते ?

माझ्या मते प्रत्येक चित्रपटाला हे लागू नसावे. चित्रपटा कोणत्या प्रकारचा (Genre ) त्यावर हे अवंलबुन असावे. उदा. 'जुनो'किंवा 'लिट्ल मिस् सनशाईन' कींवा (माझा अत्यंत आवडता) 'साईडवेज' ह्या सारखे चित्रपट. इथे कोणताही ठोस निर्णायक शेवट आपल्याला अपेक्षीत नसतो. आपल्यातीलच सामान्य माणसांच्या जीवनतील छोट्या मोठ्या गोष्टी आणि नाते संबध आपण बघत असतो.

पण जेव्हा एखादा चित्रपट थरारक/रहस्यमरय ह्या जान्रातील असतो तेव्हा साहजीकच ठोस, निर्णायक शेवट अपेक्षीत असतो. नाहीतर, शेवटी उपाशीच घरी पाठवायचे होते तर इतक्या चचमीत गप्पा तरी कश्याला केल्यात? असे काहीसे (नो कंट्री फॉर ओल्ड मॅन सारखे) वाटते.

मस्त!

परीक्षण आवडले. चित्रपट पाहण्याची उत्सुकता यामुळे आणखीनच वाढली. गेल्या काही वर्षात असे वेगळ्या ढंगाचे (टिपिकल हॉलिवूडपटांपेक्षा वेगळे) सिनेमे ऑस्कर मध्ये बाजी मारून जातात असे जाणवले.

 
^ वर