दहावीची परीक्षा ऐच्छिक असावी?

नुकतीच राष्ट्रीय शिक्षण संशोधन परिषदेने दहावीची बोर्डाची परीक्षा ऐच्छिक करण्याची शिफारस केली आहे आणि त्यासाठी शालांतर्गत परीक्षेचा पर्याय दिला आहे. (संदर्भ : 'सकाळ', दिनांक १० मार्च २००८). याचे कारण बोर्डाच्या परीक्षेमुळे मुलांच्या मनावर ताण पडतो म्हणे.

तसे झाल्यास शालांत वर्षांत मुले व शाळा शालेय अभ्यासांक्डे फारसे लक्ष न देण्याची शक्यता आहे.

त्याशिवाय इतर काही समस्याही निर्माण होतील. सध्याच्या स्थितींत दहावीची परीक्षा पास असणे ही काही स्तरावरच्या रोजगारासाठी पूर्वअट असते. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन शिक्षणाच्या प्रवेशासाठी ती स्पर्धा परीक्षाही असते. ती ऐच्छिक ठेवल्यास महाविद्यालयीन प्रवेशासाठी बोर्डाची परीक्षा पास झालेले व बोर्डाच्या परीक्षेला न बसता शाळेची परीक्षा पास होऊन आलेले यांची गुणवत्तेनुसार सामायिक यादी करणे कठीण जाईल. कारण शाळेने घेतलेल्या परीक्षेच्या मार्कांवर प्रवेश दिला जातो हे कळल्यावर काही शाळा आपले दुकान नीट चालावे म्हणून शिक्षणाचा दर्जा न वाढवता आपल्या मुलांवर मार्कांची खैरात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणजे महाविद्यालयांसठी प्रवेश परीक्षा ठेवणे. पण त्यामुळे मुलांवर प्रवेश परीक्षेचा ताण पडणार नाही का? शिवाय दहावी नंतर जी मुले नोकरीच्या शोधांत जातील त्यांपैकी बोर्डाची परीक्षा पास झालेल्यांना कळत-नकळत झुकते माप दिले जाण्याची शक्यता आहे. मग, 'हा बोर्डाच्या परीक्षेला न बसणार्‍यांवर अन्याय आहे' अशी ओरड सुरू होईल.

दहावीच्या परीक्षेचे अनन्यसाधारण महत्त्व नाकारण्यांत अर्थ नाही. प्रत्येक प्रगतिशील माणसाच्या आयुष्यांत अनेक वेळा स्पर्धात्मक परीक्षेची घडी येत असते. दहावीच्या परीक्षेच्या निमित्ताने त्याची सुरवात होत असेल व त्यासाठी आयुष्यांतील एक वर्ष ताणाखाली व कडक शिस्तींत घालवावे लागत असेल तर त्यांत मुलांची कीव करण्यासारखे काही नाही.

आपल्या राज्यकर्त्यांना हिताचे निर्णय घेण्याऐवजी अनुनयी निर्णय घेण्याची संवय आहे. आपणांस काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

ऐच्छिक विषय असावे.

परीक्षा ऐच्छिक असण्या ऐवजी काही विषय ऐच्छिक असावेत. पण काहीही केले तर घोळ कमी होण्याऐवजी वाढतच जाणार असे दिसते.

असहमत

दहावीच्या परीक्षेच्या निमित्ताने त्याची सुरवात होत असेल व त्यासाठी आयुष्यांतील एक वर्ष ताणाखाली व कडक शिस्तींत घालवावे लागत असेल तर त्यांत मुलांची कीव करण्यासारखे काही नाही.
एका मर्यादेपर्यंत हे ठीक आहे. पण या निमित्ताने टोकाची उदाहरणेही बघायला मिळाली आहेत. वर्षभर प्रत्येक दिवशी, प्रत्येक तासाला मुलाला हे वर्ष दहावीचे आहे अशी आठवण करून द्यायलाच हवी असे वाटत नाही. ९४% मार्क पडले तरी बोर्डात आला नाही म्हणून सुतकी चेहेरा करून बसणेही योग्य नाही. (इथे परत ताजप आठवतो!)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका, विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

सहमत

९४% मार्क पडले तरी बोर्डात आला नाही म्हणून सुतकी चेहेरा करून बसणेही योग्य नाही.

करियर च्या दृष्टीने ह्या दहावीला काहीच महत्व नसते.
१२वीची परिक्षा मात्र एका अर्थाने आयुष्याची दिशा ठरवते तरीही ह्या १०वी चा बाऊ का ते कळत नाही.

बारावीची?

बारावीच्या परीक्षेला आताआता महत्त्व आले आहे. ती परीक्षा कॉलेजातली. किती मुले कॉलेजात जातात? त्यामुळे जिला पूर्वी मॅट्रिक्युलेशनची परीक्षा म्हणत, ती दहावीची परीक्षा अजूनही महत्त्वाची. ही परीक्षा पूर्वी मुंबई विद्यापीठ घेत असे. कमी पगाराच्या बहुतेक सर्व नोकर्‍यांसाठी हे किमान शिक्षण.--वाचक्‍नवी

होय

किती मुले कॉलेजात जातात?

तसेही ४० टाक्केच्या वर जनता निरक्षर असल्याने मुळात शाळेत देखिल किती जातात? असो...

माझ्या मते ज्यांच्या घरुन ९४% पेक्षा अधिक गुण मिळवण्याची / बोर्डात येण्याची पालक अपेक्षा ठेवतात त्यातील ८०-९०% तरी कॉलेजात जात असावीत. माझा बाऊ करण्याचा प्रतिसाद हा ह्या लोकांशी संबंधीत होता. ९४%/बोर्डात येणे हे स्तोम अजुनही (बदललेल्या काळात )दहावीच्या परीक्षेत का?

 
^ वर