मोबाईल फोनसाठी मराठी शब्द

बरेच दिवसांनी उपक्रमावर आलो आहे, तो सुद्धा एक बोरिंग विषय घेऊन पण तरीही जमलं तर वाचा...

तर मोबाईल फोनला मराठीत काय नाव द्यावं हा प्रश्न माझ्या मनात होता. आपलं नशीब आहे की अजून कुठलाही शब्द प्रचलित नाहीये, आणि आपण चक्क आपल्या मायबोलीच्या शब्दकोशात भर घालू शकतो. तर उपक्रमवर एक शब्द बरेचदा "भ्रमण ध्वनि" हा शब्द ऐकतो पण त्या ऐवजी उपक्रमींना मोबाईल फोनसाठी "चल्वाक" हा शब्द कसा वाटतो? चला + वाक्‌ अशा मूळ शब्दांवरून हा शब्द येतो. अर्थात हा शब्द संस्कृताधारित असल्यामुळे इतर भारतीय भाषांतही वापरला जाऊ शकेल असे वाटते.

हा आवडल्यास ह्या शब्दाचा आवश्य (वाक्‌) प्रचार करावा ही विनंती.

खिरे

आणि हो - मी आता पुण्यात स्थायिक झालो आहे, पुन्हा आपल्या मात्रुभूमीत आल्यावर मला इथे जरी "चला कल्पतरूंचे आरव" नाही दिसले तरी "चल्वाकांचे आरव" नक्कीच दिसले आहेत म्हणून ही प्रेरणा.

लेखनविषय: दुवे:

Comments

भ्रमण ध्वनी


'भ्रमणध्वनी' हाच शब्द शुद्ध मराठी वाटतो आणि 'मोबाईल' हा शब्द बोलीभाषेतला. (खेड्या-पाड्यातला लोकप्रिय शब्द ) तर आपण सुचवलेला संस्कृत वाटतो, पण त्याची व्युत्तपत्ती व्यवस्थित होत असेल तर ?

चल्वाक

अर्थात हा शब्द संस्कृताधारित असल्यामुळे इतर भारतीय भाषांतही वापरला जाऊ शकेल असे वाटते.

चल्वाक हा शब्द् बराच संस्कृत वाटतो. बहुसंख्य लोकांना संस्कृतापेक्षा इंग्रजी जवळची वाटते त्यामुळे हा शब्द प्रचलीत होईल असे वाटत नाही. त्यापेक्षा रूढ झालेला मोबाईलच मराठीत बाणवावा.

तसेच, मोबाईल हा शब्द नेमका मोबाईल फोन असे सांगत नाही पण सवयीने त्यातून मोबाईल फोन हाच अर्थ निघतो, तर मराठीत मोबाईलला चक्क भटक्या का म्हणू नये?

भटक्या...

भटक्या हा शब्द चांगली सूचवण आहे.

कोणताही शब्द हा जाणीवपूर्वक रुजवावा लागतो हेही लक्षात ठेवले पाहिजे.

मोबू

मला यासाठी मोबू हा शब्द आवडतो. शब्द वापरला जाईल की नाही हे लोकांना तो किती आवडतो आणि सोपा वाटतो यावर अवलंबून असते असे वाटते. हा निकष धरल्यास मला मोबू किंवा दुसरा पर्याय म्हणजे भटक्या वापरायला आवडतील. चल्वाक शब्द नेहेमी आठवेल की नाही सांगता येत नाही.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

मोबू

'मोबाईल 'वापरात आहेच. 'भ्रमणध्वनी 'पुरेसा रूढ झाला आहे. 'मोबू' फारच चांगला आहे. जितका शब्द छोटा तितका रूढ व्हायला सोपा. संस्कृतमधून बनवून घेतला तर व्युत्पती योग्य आहे की नाही ते पहायला लागेल. आमचा भटक्या हरवलाय, म्हणजे नवरा, मुलगा , भाऊ, कुत्रा की मोबू, समजणार नाही. 'मोबू'त हा संभ्रम नाही. अर्थात चल्वाकसुद्धा चांगला आहे. एका इंग्रजी शब्दाला मराठीत एकापेक्षा अधिक प्रतिशब्द शब्द असावेत, जो सर्वात जास्त आणि अधिकाधिक लोकांना पसंत पडेल तो आपोआपच रूढ होईल. सर्व्हायव्हल ऑफ़ द फ़िटेस्ट ! बाकीचे शब्दकोशात राहतीलच.--वाचक्‍नवी

एक विनोदी पर्याय

"बोंबाईल" कसा वाटतो ? (ह.घ्या. !!)

(हा माझ्या डोक्यातला शब्द नव्हे. कुठल्याशा अड्ड्यावर कधीतरी ऐकलेला ...)

बोंबाईल

ह का घ्या? मी तर बोंबाईल सर्रस वापरतो :)... भारतात तार स्वरात 'बोंबल'णार्‍या लोकांना पाहिलं की शब्द अतिशय यथार्थ वाटतो :)

(बोंबाईलधारक) ऋषिकेश

बोंबाईल

हा वस्तुस्थिती दाखवणारा यथोचित शब्द आहे. हा उचलून धरता येईल. बोंबाईल मॅनर्स.
प्रकाश घाटपांडे

सुकर्ण

काही ठीकाणी सुकर्ण हा शब्द वापरतात.
मोबाईल आले पण मोबाईल मॅनर्स हा भाग आला नाही. तो स्थलकाल सापेक्ष असावा. सार्वजनिक जीवनात इथे तरी त्याचे प्रबोधन वा प्रशिक्षण झाले नाही. पुण्यात अनेक समारंभात सभागृहात मोबाईल चे अस्तित्व रसभंग करते.
माझ्या खालील गोष्टी निदर्शनास आल्या आहेत.
१) अनेक लोकांना सभागृहात (विशेष करुन ज्येष्ठ नागरिकांना) आपला मोबाईल सायलेंट मोड मध्ये टाकता येत नाही . बंद करता येत नाही.त्यांना फक्त बोलायचे असेल तर अमुक बटन बंद करायचे असेल तर् अमुक बटन एवढेच माहित असते. (त्यांच्या मुलाने त्यांना तेवढेच सांगितले असते)
२) सभागृहात असताना मोबाईलवर बोलताना कुजबज केली तरी इतरांचे लक्ष वेधले जाते व रसभंग होतो
३) काही महाभाग असे असतात कि त्यांना एकदम मोठ्या मोठयाने बोलू लागतात. आपण कुठे आहोत त्याचे भानच रहात नाहि.
४) काही लोक मोबाईलवर बोलताना विलक्षण हातवारे करतात. असे करताना त्यांच्या डोळ्यात वेडाची झाक आहे कि काय असे बघावेसे वाटते.
५) दुचाकी चालवत असताना डावा वा उजवा खांदा व कान या चिमटित मोबाईल पकडून बोलत मार्गक्रमणा करणे.
६) एका हातात मोबाईल व एका हातात दुचाकी चे हँडल ( ऍक्सिलेटरवर उजवा हात) असे धरुन गाडी चालवणे
उपयोजित तंत्रज्ञान आले पण ते सुयोग्य वापरण्यासाठी जर मानसिकता रुजली नाही तर काय उपयोग?
प्रकाश घाटपांडे

चलं ध्वनी कसा वाटतो?

टेलीफोन - दूरध्वनी
मोबाईल फोन - चलं ध्वनी
(चल - मोबाईल)

मोबली

आमचे काही मित्र प्रेमात पडल्यापासून मोबाईललाही प्रेमाने 'मोबली' म्हणू लागले आहेत.

अभिजित...

मोबी

'मोबी 'शब्द चांगला आहे, तो आम्ही बर्‍याचदा वापरतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोबली किंवा मोबू

'मोबली' किंवा 'मोबू' हे शब्द आम्हीही ( मी आणि माझ्या गावची दोस्तमंडळी ) खूपच सर्रासपणे वापरतो मोबाईलसाठी .. प्रेमात न पडताही ! :-)

वेदश्री.

सोस

संवादसोबती: कोणाशीही संवाद साधण्यासाठी सोबती. किंवा
सोबत संवादी: याचा आयटी पद्धतीने "सोस" असे लघुरूप. एकूण मोबाईलचा "सोस" वाढला आहे.

१) अनेक लोकांना सभागृहात (विशेष करुन ज्येष्ठ नागरिकांना) आपला मोबाईल सायलेंट मोड मध्ये टाकता येत नाही . बंद करता येत नाही.त्यांना फक्त बोलायचे असेल तर अमुक बटन बंद करायचे असेल तर् अमुक बटन एवढेच माहित असते. (त्यांच्या मुलाने त्यांना तेवढेच सांगितले असते)

ज्येष्ठ नागरिकांसाठी काही नवीन रचना व्हाव्यात. जसे रेडिओ ऐकण्यासाठी एकच बटणात काम होते. तसे.

ह्या शब्दांचा विचार करावयास प्रत्यवाय नसावा.

भ्रमणध्वनि - (महाराष्ट्रात सध्या प्रचलित शब्द)
संचारध्वनि (तेलुगु भाषेत सध्या प्रचलित शब्द)
पयणत्तोलैप्पेसि (तमिळ् भाषेत सध्या प्रचलित शब्द. ध्वन्यर्थः प्रयाणदूरभाष.)
प्रवासध्वनि (कर्नाटकात अप्रमाण - परंतु काही जणांच्या वापरातला शब्द.)
भ्रमणभाष् (केरळा)

चलितध्वनि / चलभाष् / संचारभाष्

ह्या शब्दांचा विचार करावयास प्रत्यवाय नसावा.

हैयो हैयैयो!

चांगला विचार.

सर्व भारतीय भाषेमध्ये काय चालले आहे याचे प्रतिबिंब या लेखातून झाल्यासारखे वाटते.

आपला या विचारावर अभ्यास असेल तर असाच लेख लिहावा.

 
^ वर