मारिच-२

महिन्याभरात राजपाठक पुन्हा आलेले कैवल्यला दिसले. त्यांची सकाळची साधना झाल्यावर कैवल्य मुद्दाम त्यांना भेटायला आला. "मंगल प्रभात, राजपाठक साहेब. काय म्हणताय?"
थोड्याशा नाराज सुरात ते म्हणाले " धंद्याची धावपळ. महिनाभर परदेशात होतो. आश्रमाचं दर्शन नाही त्यामुळं बेचैनी आली. बापू इथंच आहेत की परदेशदौरा?"
"इथंच आहेत.... बसा, दूध घ्या."
"कैवल्य, तुम्हाला सांगतो. खूप अस्वस्थ झालं. तशी रोजची साधना तर होती चालू, पण या जागेचं म्हणून जे मार्दव, जी ऊब आहे, ती वेगळीच. मी तर शेवटी ठरवलं... याच शहरात माझं ऑफिस उघडतोय."
"काय सांगताय? कुठं?"
"मेहेर पार्क एरिया. एक-दोन दिवसांत कामं संपवून उद्घाटन. उद्घाटनाला नक्की या."
कैवल्यच्या मनात आलं, हा इतक्या वरच्या दर्जाचा माणूस आहे.... ऐरागैरा मनुष्य इतक्या उच्चभ्रू वस्तीत ऑफिसचं स्वप्नही पाहू शकला नसता.
"चौबळ... आहेत का?" राजपाठकांनी विचारलं
"येतीलच... बापूंबरोबरच बसलेत. तुम्हाला भेटायचंय का?"
"हां... बापूंच्या कृपेनं त्यांच्या वास्तव्याच्या - आश्रमाच्या गावात ऑफिस झालंय. त्यानिमित्त आश्रमाला फूल ना फुलाची पाकळी देण्याचं डोक्यात आलं." राजपाठक खरोखर सद्गदित झाले होते. कैवल्य काही न बोलता त्यांच्याजवळ बसून राहिला.

दहा मिनिटात चौबळ आलेच. कैवल्यला काही अंदाजच लागेना. कारण या वेळी राजपाठक मिशनच्या कॉलेजसाठी दोन लाख घेऊन आले होते. काही मॉडर्न सॉफ्टवेअर आणि बरेचसे संगणक लागणार होतेच. त्यासाठी हे पैसे पुष्कळच कामाला येणार होते.
पावती घेऊन राजपाठक उठले, तेंव्हा कैवल्य दारापर्यंत त्यांना सोडायला आला.दारावर अचानक राजपाठकांनी कैवल्यच्या खांद्यावर हात ठेवला.
"कैवल्य, बापूंबरोबर सत्संगासाठी त्यांचा व्यक्तिगत वेळ मिळेल का... एक पंधरा मिनिटं फक्त."
कैवल्यला खरंच वाईट वाटलं; पण बापूंनीच सांगितलेली शिस्तही पाळणं आवश्यक होतं "राग मानू नका, सर.... पण साधकांशी व्यक्तिगत संपर्क अलीकडे बापूंनी खूप कमी केलाय. खूप म्हणजे खूप. माझी-त्यांचीही गाठभेट नाही दोन महिन्यात. तरी एक काम करु. तुम्ही आश्रमकार्याला एवढी आपुलकी दाखवता... मी निदान विचारुन पहातो. या लवकर परत."

राजपाठकांचं ऑफिस सुरुही झालं. बरंचसं काम ते तिथूनच बघत. त्यामुळे आपसूकच त्यांची आश्रमसाधना वाढली. पुढच्या दोन महिन्यात राजपाठकांची पुढची देणगी पुन्हा आली. चार लाख. न रहावून कैवल्यनं त्यांना तेंव्हा विचारलं.... "सर, मला तुमची ऍक्टिव्हिटी एकदा समजावून सांगा ना... मला कळेल, मीही इंजिनिअरिंगचा डिग्री होल्डर आहे." कारण त्यांची ओळख आतापर्यंत चांगली वाढली होती. पण कुठलीच व्यावसायिक चर्चा त्यांना आश्रमात नको असायची. त्याला अडवून ते म्हणाले, "तो प्रश्न नाही. नॉट हिअर इन द डिव्हाईन प्रिमाईस.... यंग मॅन, तू ऑफिसवरही आला नाहियेस.... तिकडे ये. मग बोलू."

पुढच्या महिन्यात राजपाठकांनी कमालच केली. त्यांना कुठलंसं आंतरराष्ट्रीय इंफ्रास्ट्रक्चरल कॉंट्रॅक्ट मिळाल्याप्रित्यर्थ आणखिन चार लाखाची देणगी त्यांनी आश्रमाकडे सुपूर्त केली. कैवल्यला तेंव्हा मात्र वाटलं, की बापूंची आणि यांची भेट आता व्हायलाच हवी. नाही म्हटलं तरी राजपाठक, बापूंचे या शहरातले, कदाचित राज्यातलेही सर्वात मोठे देणगीदार ठरत होते.
सगळी हकीकत ऐकल्यावर बापूंचे हात आपसूक जोडले गेले. "हरी की क्रिपा... कैवल्य! कुठले आहेत हे साधक मूळ?" कैवल्यनं मग त्यांना सगळंच सांगितलं. आश्रमाला जवळ राहून साधनेची त्यांची खटपट, काही प्रमाणात त्यांच्या धंद्याचं थोडंसं गूढ राहिलेलं तांत्रिक स्वरुप, सगळंच.

"खूप दिवस झाले, बापू.... आपसे मिलने की बिनती कर रहे हैं. बापू, मलाही वाटतं, तुमची कृपा त्यांच्यावर व्हावी. द्याल का त्यांन एक दहा मिनिटं?"
बापू मृदू हसले. "ठीक आहे, कैवल्य. इतकं केलेल्या साधकाचा तेवढा अधिकार निश्चितच आहे, बुला लो!"
"आज्ञा प्रमाण, बापू!"

दुसऱ्या दिवशीच तो राजपाठकांच्या मेहेरपार्क ऑफिसला पोचला. ऑफिसच्या रचनेत त्यातली समृद्धी कळत होती. भपका कुठंही नव्हता. प्रथमदर्शनी बापूंची एक मोठी तसबीर. चार पाच केबिन्स.... पूर्ण ऑफिस सेंट्रली एअरकंडिशंड, पाचसहा स्टाफ.... प्रत्येकाला संगणक. राजपाठकांचा बातमी ऐकल्यानंतरचा आनंद कैवल्यला अपेक्षित होताच. दुपारी चारची वेळ ठरली होती. बातमी ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
(क्रमश:)

 
^ वर