ड - डोनेशनचा

शाळांची प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू आहेत काहि शाळांमधून पूर्णपण झाल्या असतील. प्रवेशप्रक्रिया वेळी पालकांना धास्ती असते ती 'डोनेशन' ची. पालकांना आपल्या पाल्यांच्या शाळेची ओळख ही 'डोनेशन' मुळे अडवणूकीच्या भावनेने होते.

शिक्षणसंस्थाना यात मी पूर्णपणे दोषी मानणार नाही. शिक्षणसंस्थाना नवीन कामांसाठी निधीची आवश्यकता असते आणि त्यासाठी त्यांना नवीन प्रवेश घेणारे पाल्य हा एक स्त्रोत असते.

यावर उपाय म्हणून एक पर्याय सुचतो, तो म्हणजे, शाळेला दिलेल्या देणग्यांना आयकरात सवलत देणे. आयकरात व सर्व करांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी ३% एवढा वेगळा कर आकारला जातो. तो सरकारी "सर्व शिक्षा अभियाना" साठी वापरण्यात येतो.

पाल्याची "शैक्षणिक शुल्क व सत्र शुल्क" व "शैक्षणिक कर्जावरील व्याज" ८०सी खाली करमाफ असते. या सवलतीचा उपयोग उच्च शिक्षण घेणार्‍यांसाठी होतो.

जर फक्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी शिक्षणसंस्थाना दिलेली देणगी जर करमुक्त केली तर त्याचा फायदा पालकांना व शिक्षणसंस्थाना दोघांना होईल. ह्या साठी एक कलम ८०सी मध्ये न वाढवता, ८०जी सारखे एखादे कलम ६-अ मध्ये वाढवावे. ८०जी सारखी देणगीच्या ५०%, १०% रक्कमेची करमाफी न करता पूर्ण करमाफी द्यावी.

यामुळे देणगीदारांना होणारे फायदे

  1. देणगीदारांना आयकरात सवलत
  2. शिक्षणसंस्थानी प्रवेशासाठी अडवणूक केल्याची भावना राहणार नाही
  3. आपण शिक्षण घेतलेल्या शाळेला देणगी देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी.
  4. वैवाहिक जीवन सुरू होण्याआधीही शैक्षणिक देणगी द्वारे आयकरात सवलत

शिक्षणसंस्थाना होणारे फायदे

  1. देणगी फक्त प्रवेशाच्यावेळी न मिळता, पालकांकडून प्रत्येक वर्षी मिळू शकते. पालकांना प्रवेशावेळची देणगी रक्कम कमी भरावी लागून ही जास्त निधी मिळू शकेल.
  2. फक्त पालकांकडून देणगी मिळण्याऐवजी माजी विद्यार्थ्यांकडून, आयकर सवलत हवी असणार्‍या देणगीदारांकडून ही देणगी मिळू शकते
  3. विना अनुदानित संस्थाना निधी मि़ळण्यासाठी एक सुकर मार्ग होईल

ह्या पर्यायावर आपले मत काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

असहमत.

आजकालच्या युगात शिक्षणसंस्था या आर्थिक शोषणाचा मार्ग झालेला आहे. त्यामुळे आयकरातुन माफी या सम्राटांना लुटण्याचा राजमार्गच करुन देईल,

लेखकाने डोनेशन या शब्दाचा वापर करुन अप्रत्यक्षपणे एका हक्काची जाणीव करुन दिलेली आहे. देणगी मध्ये देणार्‍याचे दातृत्व दिसते. डोनेशनमध्ये हट्ट, मागणीच दिसते. असो.

राज्यकर्ते आणि शिक्षणसम्राट एकत्र आल्यामुळे यात काही आशा आहे असे किंचितही वाटत नाही.

खुलेपणा

आयकरात सवलतीमुळे शिक्षण संस्थाना मिळणार्‍या देणग्यांची रीतसर नोंद होईल व त्यामुळे खुलेपणा येईल. या खुलेपणाचा पुढेे फायदा होईल.
शिक्षण संस्थांना प्रवेश घेणारे पालक हाच एकमेव निधी संकलनाचा मार्ग न राहता, इतरही पर्याय निर्माण होतील.

सहमत

ही कल्पना नक्कीच चांगली आहे. आपण म्हणता ते सर्वच मुद्दे मान्य होण्यासारखे आहेत (खुलेपणा सहीत).
द्वारकानाथांनी म्हणल्याप्रमाणे (वाटमारीचा) राजमार्ग होत नाही हे पहाणे महत्वाचे ठरू शकते.

अमेरिकेत जरी पब्लीक स्कूल्स मधे पैसे द्यावे लागत नसले तरी आफ्टरस्कूल प्रोग्रॅम्स, पेरेंट-टिचर असोसिएशन्स वगैरे पैसे घेतात अथवा द्यावे लागतात (आफ्टरस्कूल प्रोग्रॅम मधे तुमचे मूल (मुलगा/मुलगी) जात असेल तर त्याला पैसे द्यावे लागतातच). पण त्यात काही कर सवलत मिळते.

स्पॉन्सर्स

हं! सुचना स्वगतार्ह आहे. पण याने डोनेशन पालकांना द्यावेच लागते हा काहि उपाय वाटत नाहि. छप्पर नाहि म्हनून टोपि तर टोपी असा प्रकार वाटतो ;)
यामनि निमित्ताने माझ्या डोक्यात बर्‍याच काळापासून जी कल्पना रेंगाळते आहे ती मांडतो.
कल्पना अशी की शाळेने "स्पॉन्सर्स" मिळवायचे. हे शाळेच्या साध्या वातावरणाला धक्का लावणारे आहे,. पण अगदी मुलांना अपायकारक गोष्टींच्या कंपन्यांच्या नाहि पण उपकारक / हानी न पोहोचवणार्‍या वस्तुंच्या कंपन्यांकडून स्पॉसन्सरशिप घेतली तर.?!?
उदा. "नवनीत" अथवा खेळण्यांच्या कंपन्या इ. मंडळी यात आनंदाने सहभागी होतील (तसंही मुलांना एखादी गोष्ट हवी म्हटली की खरेदी होतेच् ;) ) या मुळे शाळांना "डोनेशन्स" मागत बसावे लागणार नाहि. आणि हि योजना "डोळस" पणे राबवल्यास शाळेत जाहिरातींचा अतिरेक होणार नाहि.
या विचारावर दोन्ही बाजूला सक्षम मुद्दे आहेत याची पूर्ण कल्पना आहे. तरी यातील धोके लक्षात घेऊनहि हि योजना "फायद्याची" वाटते. तुम्हाला काय वाटते?

-ऋषिकेश

नको

शालेय शिक्षणासाठी होणारा खर्च मुलांच्या फीमधून आणि सरकारी अनुदानातून चालवणे शक्य आहे. एकदा स्पॉन्सर्सशिप आली की आधीच असलेल्या शाळांच्या नफेखोरीत आणखी एक वाटेकरी निर्माण होणार. जाहिरात देऊन आपला फायदा किती वाढेल हे अर्थातच कोणतीही कंपनी प्रामुख्याने पाहणार. शाळा हे संस्काराचे आणि शिक्षणाचे माध्यम न राहता जाहिरातीचे माध्यम होईल. मग नवनीत ने प्रायोजित केलेल्या शाळेमध्ये यापूर्वी उदा. ब्ल्यू बर्ड ने प्रायोजित केलेल्या विद्यार्थ्यांनी शिकणे अवघड होऊ
शकते.

शाळा आणि शिक्षण हा फायदे-तोटे या दृष्टीने विचार करण्याचा विषय आहे का यावर गंभीर विचार करणे आवश्यक आहे.

-- आजानुकर्ण

नफेखोरी

शाळांच्या नफेखोरीत

यावरून मूळ मुद्दयापासून सुरवात कराविशी वाटली. सगळ्याच शाळा खरेच नफेखोर आहेत का? (म्हणजे अशा बर्‍याच शाळा आहेत ज्या निव्वळ व्यवसाय म्हनून शिक्षण न देता व्रत असल्यासारख्या चालतात) का त्यांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि शाळा चालवण्यासाठी (जसे विज, पाणी इ. पासून ते शिक्षकांचे पगार, इमारतीची डागडुजी, शाळेचा विस्तार इ. साठी) मुलांकडून मिळणारी फी पुरेशी आहे का? माझ्यामते नाही!
तेव्हा शाळांकडे कोणते पर्याय उरतात?
१. अतिशय भरमसाठ फी: परंतू यामुळे जास्त विद्यार्थी मिळणे कठीण
२. भरपूर डोनेशनः हा मार्ग सर्रास अवलंबिला जातो
३. शाळेचे मैदाने, हॉल लग्न कार्यांना देणे: मला हा पर्याय आवडत नाहि . मैदान आणि हॉल हे मुलांच्या शारिरिक आणि वैचारिक शिक्षणासाठीच असावेत असे वाटते(वैयक्तिक मत). तरीही या पर्यायाचीही बर्‍याच ठिकाणी अंमलबजावणी होतेच

आता माझ्या मनातील स्पॉन्सरशिपचे स्वरूप सांगतो. काहि उदा:
१. कॅटिनसारख्या जागा ह्या कंपन्या बांधलतील आणि चालवतील. शिवाय शाळेला भरभक्कम वार्षिक अनुदान देतील त्याबदल्यात कँटीनमधे जाहिराती लाऊ शकतात.
२. शाळांच्या टिमसच्या पोशाखावर लोगोसाठी पैसे
३. शाळांच्या गॅदरिंग्स/क्रिडामहोत्सव आदिंच्यावेळी जाहिराती
इ. इ. इ.

शाळेच्या रोजच्या कामकाजात नाहि पण अश्या अशालेय वेळी जाहिराती मिळवून जर डोनेशन/भरमसाठ फी कमी होणार असेल तर काय हरकत आहे?

-ऋषिकेश

डोळे पांढरे होणे.

येथील सर्व उपक्रमींचा प्रतिसाद हा प्रामाणिक असला तरी त्यात भाबडेपणा जाणवतो.

१. देणग्या देण्यासाठी पालक हे रांगेत उभे असतात. याची कोणतीही रितसर पावती देण्यात येत नाही. मी स्वत अशी देणगी दिलेली आहे.
२. बराचश्या संस्थेमध्ये मुख्यध्यापकांना नाममात्र आधिकार असतात. किंबहुना जास्तीत जास्त अवैध देणगी देणारे पालक हुडकणे आणि त्यांना संस्थाचालकांकडे पाठविणे हेच त्यांचे कार्य असते.
३. आजकाल पुण्यात बालवाडीसारख्या शाळा अंदाजे ३२ हजार रुपयांचे अधिकृतपणे शुल्क आकारतात. सातवीच्या शाळेचा खर्च माझा एक मित्र ८०/८५ हजार पर्यंत करत असतो.
४. मी प्रत्येक वर्षी माझ्या पाल्यांचे १.५ / २ हजार रुपये हे संगणक शुल्क म्हणून भरत असतो. ( ५० विद्यार्थी * १.५ हजार = ७५ हजार प्रत्येक तुकडीचे).
५. अनेक संस्था अभ्यासाच्या साहित्याची खरेदी त्यांच्याच शाळेतून करीत असतात, तेही छापील किमंतीत. ( १५ ते २० % फायदा संस्थाचालकांच्या सरळ खिशात).
६. काही शाळा जातीवर, व्यवसाय नैपुण्यावरच ( डॉक्टरांचीच मुले) इत्यादी वर चालत असतात.
७. पुण्यात कन्नड शाळा आहे तेथे मी माझ्या मुलीच्या प्रवेशासंबधी गेलो होतो. तेथे त्यांनी सर्व पालकांना बसविले आणि सरळ सरळ सांगितले की जे ३० हजार देऊ शकतील त्यांनीच प्रवेशाची विचारणा करावी.
८. आमच्या कंपनीने जिल्हापरीषदेच्या शाळेला पुस्तके, बांधकामाच्या रुपात देणगी दिली होती. नंतर कळले की त्याचे मुख्यध्यापकांनी व्यवस्थितपणे बिल बनवुन जिल्हा परीषदेकडून पैसे घेण्यात आले. आता बोला...

अर्थातच ही कोंडी फोडली पाहिजे हेही माझे मत आहे. यासाठी सर्व मदत करण्यास मी तयार आहे.

यावरून आठवले

आमच्या कंपनीच्या एका साहेबांची मुले पुण्यातल्या कोणत्या शाळेत जातात माहिती नाही. पण त्यांनी सहज सांगितले की एक मुलगा केजी मध्ये आणि दुसरा पहिलीत आहे. दोघांच्या केवळ शाळेच्या फीचा एकत्रित खर्च सुमारे ४ लाख रुपये आहे. :० काय शिकवत असतील शाळेत याचा विचार करून डोके जड झाले.

-- आजानुकर्ण

प्रकाटाआ

अनावश्यक प्रतिसाद हटवला आहे.

मनातले बोललात.

शाळा आणि शिक्षण हा फायदे-तोटे या दृष्टीने विचार करण्याचा विषय आहे का यावर गंभीर विचार करणे आवश्यक आहे. आजानुकर्ण.

आजानुकर्णांनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. खरेतर अशी चर्चा प्रत्येक किमान दहा वर्षानंतर झालीच पाहिजे. यात प्रामुख्याने पालक, शिक्षक, शासन, शिक्षणतज्ज्ञ, माजी विद्यार्थी, उद्योग व्यावसायिक, परदेशाच्या शिक्षणप्रणालीची माहिती असणारे यांचा सहभाग पाहिजे. नव्हे तर, प्रत्येक राजकिय पक्षाच्या निवडणुक जाहिरनाम्यात याचा उल्लेख आला पाहिजे.

माझ्यामते आपले पुरके साहेब यांची अश्याप्रकारच्या पुढाकाराची इच्छा दिसते परंतु राजकिय पांठीब्याशिवाय आणि थोड्याफार अरेरावी मनोवृत्तीमुळे ते त्यांच्या विचारांचा पाठपूरावा ते करु शकत नाही हे आपले दुर्दवच आहे.

असो.

नफेखोरी


मुलांकडून मिळणारी फी पुरेशी आहे का? माझ्यामते नाही!
तेव्हा शाळांकडे कोणते पर्याय उरतात?


जिथे मोफत शिक्षण आहे त्या सरकारी शाळांमधून शिकवायला पालक तयार नाहीत. निधीसाठी बिगर सरकारी शाळांकडे पर्याय नाहीत.

त्यामुळे बिगर सरकारी शाळांकडे "शाळा आणि शिक्षण हा फायदे-तोटे या दृष्टीने विचार" करण्याची गरज आहे असे वाटते.

पालकांच्या शाळांबद्द्ल काही प्रातिनीधिक तक्रारी असतात (द्वारकानाथ यांनी त्या सविस्तर मांडल्या आहेतही)

१. शाळा निधी मागते, वेगवेगळ्या कारणांसाठी

२. भरमसाठ विद्यार्थी एकाच वर्गात असतात त्यामुळे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे शिक्षकांना शक्य होत नाही

त्याचवेळी अनेक पालक मलांना खाजगी शिकवण्यांना पाठवत असतात. अगदी केजी पासून! ८-१० साठी तर "स्पेशल बॅचेस". त्यासाठी खाजगी शिकवण्यांना भरमसाठ पैसे मोजायला तयार असतात. तिथेही विद्यार्थी संख्या शाळेच्या वर्गांएवढीच असते.

शाळांविरुध्द ओरड आणि नफेखोरी करणार्‍या खाजगी शिकवण्यांसाठी पैसे मोजायचे हा विरोधाभास का?

 
^ वर