अच्युत गोडबोले आणि आम्ही एनाराय्

नुकताच वाचलेला हा एक लेख :

http://www.loksatta.com/daily/20071223/lr01.htm .

बर्‍याच दिवसांनी असे, prejudiced लिखाण वाचले. अनिवासी भारतीयांबद्दल इतका द्वेष असणारे काहीतरी क्वचित् वाचायला मिळते. अनिवासी भारतीयांबद्द्लचा द्वेष आणि त्याला अहंमन्यतेची फोडणी. स्वतःच्या पदवीचा , कॉर्पोरेट् रेझ्युमेचा देदीप्यमान् असा उल्लेख , ओवाळलेल्या आरत्या ... अहाहा. पदार्थ इतका सुरेख जमलाय् तुम्हाला सांगतो मित्रानो ! वाचा आणि धन्य व्हा !

लेखनविषय: दुवे:

Comments

:-)

गंमत आहे.

सध्या फॅशन आहे. चालू दे!!!

सध्या?

सध्या फॅशन आहे. चालू दे!!!

सध्या?

मला वाटते मी खालील किस्सा आधी पण येथे कुठल्यातरी चर्चेत दिला होता...

९४ साली प्रथमच अमेरिकेतून भारतात आलो होतो. कुठे काही ओळख देताना "मी अमेरिकेत असतो" वगैरे म्हणत नव्हतो. एक अशीच नातेवाइकांच्या ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटली. कुठे असतो असे विचारल्यावर सांगीतले की बॉस्टनला. लगेच चेहेर्‍यावर काही तरी चावल्याचा अथवा दुर्गंधी अनुभवल्याचा भाव आला, "छ्या! अमेरिकेत? अरेरे, आपला देश सोडून? आम्ही कसे येथे भारताची सेवा करतो..."

जाता जाता एक कोडे: ही व्यक्ती कुठल्या गावची असावी आणि प्रसंग कुठल्या गावातला असावा?:)

पुण्यनगरी ?

ही व्यक्ती कुठल्या गावची असावी आणि प्रसंग कुठल्या गावातला असावा?

पुण्यनगरी तर नव्हे?

बापरे! पुन्हा एक नवा वाद सुरू व्हायचा!!

पुण्यनगरीच

अहो पुण्यनगरीच असणार. पण त्याचे स्वरुप आता झपाट्याने बदलते आहे. ग्लोकलाईझड होते आहे. (क्षमा वैश्विक होते आहे)
प्रकाश घाटपांडे

अच्यत गोडबोले- एक अजब रसायन

आम्ही अच्युत गोडबोले प्रत्यक्ष ऐकलेले आहेत. वसंत व्याख्यानमालेत तसेच इतरही अनेक व्याख्यानात. ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. लेखात त्यातील एक आयाम आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. आदिवासी व अल्पभूधारक यांच्या चळवळीत त्यांनी काम केले पण स्वतःला झोकून देउ शकले नाहीत याची खंत ते व्यक्त करतात. सोलापुरहून आय आय टी पवई नंतर चळवळ, नंतर आय टी सेक्टर . संगीतप्रेमी असलेले गोडबोले संगीतावर कानसेनी लेख लिहितात. एकदा सुधीर गाडगीळांनी घेतलेली त्यांची मुलाखत होती त्यात या "झोकून्" काम करण्याचे रहस्यभेद करताना "झोक" गेलेल्या गोष्टी पण सांगितल्या .
"रुळा"वर आलेल्या गोष्टी पण सांगितल्या. स्वतःला घडवताना ते आयाअयटीचे ऋण मानतात. सहकारी तरूण तंत्रज्ञांचे ऋण मानतात.मला वाटत लोकसत्तेतल्या लेखात काही वर्ग दुखावला जाणार हे त्यांना अभिप्रेतच असाव. किंवा त्यांचा हेतु तोच असावा.
ते काहीही असो त्यानिमित्त आत्मपरिक्षण होते हे ही नसे थोडके.
प्रकाश घाटपांडे

व्यक्तिगत टीका आणि मूळ मुद्दे

घाटपांडे काका,
गोडबोल्यानी सोलापूरास आणि अल्पभूधारकांसाठी झोकून देऊन - झोके-झटके देत देत काय केले काय नाही, किंवा आपल्या गरळ ओकलेल्या लिखाणात उल्लेखिलेल्या कंपन्यांमधे काय केले , आय् टी क्षेत्रात जिकडे तिकडे त्यांची काय (कु)प्रसिद्धी आहे ही घाण चिवडण्यात कुणालाही रस नाही आहे.

मुद्दा सोपा आहे. तो हा की , गोडबोल्याना एनाराय् लोकांची कावीळ आहे आणि ही कावीळ ते मिरवतात. असा पराकोटीचा पूर्वग्रह, निर्बुद्ध वाटेल असा द्वेष आणि स्वतःच्या बर्‍यावाईट करीयरबद्द्लचा अफाट, गैरवाजवी अहंकार हे एक अतिशय मनोरंजक असे मिश्रण आहे. ("भिकार"अमेरिकन भाषेत ज्याला "डेडली कॉंबीनेशन्" म्हणता येईल :-) ) लक्षावधी परदेशस्थ भारतीय वंशाच्या लोकांबद्दल ते एकदम घाउक प्रमाणात विखारी विधाने करतात. गोडबोल्यांच्या लिखाणातील मनोरंजनाच्या मूल्याबद्दल ऋणनिर्देश करण्याकरता येथे त्यांच्या लेखाचा उल्लेख केला ..हाहाहाहा.

चालू द्या

परदेशस्थ भारतीय, विशीतली तरूण पिढी आणि माहिती तंत्रज्ञान किंवा टेलिकॉममध्ये काम करणारे लोक यांना दूषणं दिलेली नाहीत असं कुठे वाचायला मिळणं हे केतकरांच्या अग्रलेखात एकदाही सोनिया गांधींचा उल्लेख न येण्याइतके दुर्मिळ आहे. (तिन्ही वर्तुळांत सामायिक असलेल्या आम्हां पामरांना असं काही वाचलं नाही, तर चुकल्यासारखं वाटतं.)

एकतर परदेशस्थ भारतीय, भारताबाहेर राहूनसुद्धा संस्कृती जपत आहेत असा गरज नसताना, कंटाळा येईस्तव जप करायचा नाहीतर मग असलं सरसकट सामान्यीकरण. नरेश शाह यांनी या लेखाचा लोकसत्तेतच केलेला प्रतिवाद येथे वाचता येईल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

वा!

वा! मुक्तसुनीत...
मोजक्या शब्दात उत्तम समिक्षा!

लेख वाचला...
आय आय टी (केमिकल इंजि.) नंतर २६ वर्ष आपल्या भलत्याच क्षेत्रात काम आणि १० वीला बोर्डात १६व येण्याचे कौतुक... : )
असे लोक एल अँड टी च्या मुख्यपदी असावेत या पेक्षा काय ते दुर्दैव असणार...?
(इतक्य र्‍हस्व दृष्टीने असलेले लोक कसे काय कंपन्या चालवता काय माहीत बॉ! किंवा कदाचित त्यामुळेच चालत असाव्यात...)

बाकी नरेश शहा यांनी उत्तम हजेरी घेतली आहेच असे दिसतेच.

आपला
गुंडोपंत

फडतूस काम

लेखकाला अमेरिकेत कोणत्याही कामाला फडतूस समजले जात नाही याची जाणीव नाही की १००-१५० वेळांतील काही वेळा अमेरिकेत फेर्‍या मारूनही डोक्यात प्रकाश पडला नाही. असे असताना, तेथील इतिहास आणि संस्कृतीचा इतरांना गंध नाही हा शंख हे कसे काय करतात बॉ?

रिजॉइंडर

हेही वाचा, विशेषतः 'आणि त्याला अहंमन्यतेची फोडणी. स्वतःच्या पदवीचा , कॉर्पोरेट् रेझ्युमेचा देदीप्यमान् असा उल्लेख , ओवाळलेल्या आरत्या ...' ह्याच्या संदर्भातः

http://www.loksatta.com/daily/20080203/lr04.htm

हम्म्म्म

बापरे , गोडबोले भलतेच नरमले की. :-) अर्थात, अंधःकारात चाचपडणार्‍या एनाराय् ना "विचार तरी करायला लावणारा" आपला लेख आहे अशी स्वत:ची भलामण करणारी पुस्ती ते जोडतातच ! असो.

मस्त

गोडबोलेसाहेबांची माणसांची वर्गवारी करण्याची तर्‍हा बघून धन्य झालो. मुक्तसुनीत यांनी म्हटल्याप्रमाणे असे लिखाण क्वचितच वाचायला मिळते. एकूणात क्रायटेरिया सोपा दिसतो. नोबेल/ऑस्कर, गेलाबाजार पुलित्झर/भटनागर असेल तर आत या नाहीतर तुमचे आमचे जमणार नाही. मी परदेशात म्याकडोनाल्डमध्ये वेटरची नोकरी करत असेन आणि मला गोडबोलेसाहेब भेटले तर ते माझ्याशी बोलतील का? आणि मी आपल्या देशात वेटर असलो तर थोडे पापक्षालन होऊ शकेल का?

लेख परत वाचल्यावर अजून एक वैशिष्ट्य लक्षात आले. गोडबोलेसाहेबांनी 'नेम ड्रॉपिंग' या प्रकाराला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. प्रचलित पद्धतीप्रमाणे नेम ड्रॉपिंग प्रसिद्ध व्यक्तींची नावे सहजरीत्या संभाषणात आणून सूचकपणे केले जाते. इथे मात्र मी यांना, यांना आणि त्यांनाही ओळखतो अशी यादीच देउन गोडबोलेसाहेबांनी एक नवा पायंडा पाडला आहे. (मराठी पाउल पडते पुढे?)
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

नाजूक विषय

परदेशात राहणे, जाणे, मायदेश सोडणे/न सोडणे हा विषय माझ्या मते इतका नाजूक आणि व्यक्तिगत आहे की त्याचे एवढे सार्वत्रिकीकरण करू नये.

परदेशात मी अनेक प्रकारची माणसे पाह्यली आहेत - आनंदाने राहणारी, दु:खात राहणारी. हौशीने आलेली, मारून मुटकून ( म्हणजे खरेच नाही, पण दबावाने) आलेली. खरोखरच दिवे लावलेली, आणि सामान्य. भारताशी नाळ जोडून राहिलेली, न राहिलेली. जातीयवादी, अजातीयवादी. अमेरिका ज्यांना पचली अशी आणि न पचली अशी.

भारतातही अनेक प्रकारची माणसे पाहिली आहेत. आनंदी, कष्टी. हौशीने सर्व एंजॉय करणारी, सतत आजूबाजूच्या जगाला नावे ठेवणारी. पराक्रम केलेली, न केलेली. भारताशी नाळ जोडून असलेली, बाहेर कधी पडतोय याची घाई असलेली. जातीयवादी,आजातीयवादी. भारत पचवलेली, आणि न पचवलेली.

परदेशात असलेले आपले लोक म्हणजे मूळचे भारतातले. जे शेतात पिकते तेच बाजारात येते. असे असताना केवळ परदेशातील लोकांना ते केवळ तिथे राहतात म्हणून नावे ठेवणे योग्य नाही असे वाटते. तसेच प्रत्येकाचे भारताशी भावनिक संबंध असतातच/असले पाहिजेतच असे नाही हेही न पचणारे पण सत्य आहे. त्यामुळे ज्यांना बाहेर जायचे आहे त्यांना जाऊ द्यावे, ते बाहेर गेले म्हणून ब्रेन ड्रेन होतो हे समजण्याची गरज नाही.

अवांतरः अच्युत गोडबोले घाईगडबडीत असतात की काय असे वाटले. त्यांनी लेख जरा घाईत लिहीला असावा~! कारण नंतरचे त्यांनी दिलेले स्पष्टीकरणही तितकेच घाईत लिहीलेले दिसते! गोडबोल्यांना असे वाटत असले की त्यांच्या लेखाने काही परदेशस्थ लोकांवर परिणाम व्हावा, त्यांच्या ज्ञानाचा फायदा भारताला व्हावा तर त्यांनी लेख जरा वेगळ्या पद्धतीने लिहायला हवा होता. एखाद्या माणसाला तू करतोस ती चूक आहे असे सांगितले तर बर्‍याचदा तेच करण्याकडे कल वाढतो असा माझा अनुभव आहे. (याचा अर्थ मी परदेशात राहणे चुकीचे समजते असा कोणी घेऊ नये, मी परदेशातच आहे :-)) सांगण्याची पद्धत, वेळ इत्यादी सर्व महत्त्वाचे असते. जर पुरेसा पैसा, संधी असल्या तर अनेकजण परतही फिरतील हेही सध्याचे सत्य आहे. काहींना ज्यांना बाहेरच राहायचे असेल, जगाचे नागरिक बनायचे असेल त्यांनी ते केले म्हणूनही काही बिघडत नाही. त्यांनी बाहेरून येऊन आगाऊपणा केला, व्यवस्थेला नावे ठेवली तर त्यांना ती व्यवस्था बदलायला सक्रिय सहभाग घ्यायला आवाहन करावे. आणि ते होत नसल्यास गप्प बसवावे. बर्‍याचदा व्यवस्थेला जे लोक नावे ठेवतात, त्यांना ती बदलण्यासाठी लागणारा वेळ, पैसा किंवा इच्छा नसते. भारतातील काहींना यामुळे परदेशी राहण्याचा टेंभा मिरवत परदेशी राहणार्‍या आणि भारताला नुसतीच नावे ठेवणार्‍या भारतीय लोकांचा राग येत असतो हेही पाहिले आहे. पण तो राग येऊन उपयोग नाही. एकतर व्यवस्था बदला किंवा जे असे बोलत आहेत त्यांच्याकडून सक्रिय सहभाग मागा (वेळ पडली तर त्यांच्या कामाचा थोडाफार मोबदला देऊन). नुसती नावे ठेवून किंवा तुम्ही परदेशात राहता म्हणजे चूक करता असे सांगून उपयोग नाही.

सहमत, अवांतर

प्रतिसादातील "अनेक माणसे.." भागाशी अक्षरशः सहमत आहे.

अवांतर - ब्रेनड्रेन या नावाने ओळखली जाणारी प्रक्रिया माझ्यामते भारताच्या आणि भारतीयांच्या (देशस्थ आणि परदेशस्थ दोन्हीही) फायद्याचीच आहे असे मला वाटते. जे कोणी परदेशात नोकरी मिळवतात ते भारतात एक 'जागा' रिकामी करतात जिथे दुसर्‍या भारतीयाची वर्णी लागते. (भारतात अजूनही मागणीच्या मानाने पुरवठा भरपूर आहे) आणि समजा अश्या व्यक्तीने परदेशात न जाता भारतातच नोकरी करण्याचा निर्णय घेतला तर परदेशातली जागा दुसरा कोणीतरी (इतरदेशीय) घेईलच.

एक आंधळा आणि सात हत्ती

गोडबोल्यांचा लेख वाचल्यावर "एक आंधळा सात हत्तींना" एकच हत्ती समजून बोलतोय अशी खात्री पटली.

गोडबोले "आपली आप करे स्त्रुती" करत, ती पण स्वतःचे कर्तुत्व हे कुठल्यातरी दुसर्‍यांच्या कंपन्यांमधे भले एम डी म्हणून असेल पण नोकरीच करताना, त्यांच्याच पैशाने परदेशभ्रमण करत, त्या कंपन्यांचे धंदे आणि आर्थिक हितसंबंध टिकवण्यासाठी भारतीय लोकांना भारताबाहेर कसे पाठवले हे सांगताहेत. पुढे नरेन शहा यांच्या प्रतिसादाला "पडलो तरी नाक वर" या अर्थी उत्तर देताना काहीजण भारतीय कंपन्यांना कसे "डिच" करतात ते लिहीतात. सगळेच काही शहाणे असतात अथवा कृतज्ञ असतात असे नाही पण ज्या कंपन्या पाठवतात त्याही वेठबिगारी सारखी या लोकांची अवस्था करतात ही पण बर्‍याचदा वस्तुस्थिती असते. एच वन वर आणायचे आणि नंतर "बेंच"वर बसवायचे असली संज्ञा ही भारतीय कंपन्यांमुळेच चालू झाली असावी अशी अवस्था आहे. गोडबोले "बी-१" आणि "एल-१" चा पण उल्लेख करतात ज्यावर खरे म्हणजे प्रॉजेक्टवर काम करायला पाठवणे हे बेकायदेशीर आहे पण ते देखील भारतीय कंपन्या स्वतःच्या स्वार्थासाठी (भारताच्या स्वार्थासाठी नाही) सर्रास करतात हे त्यांच्या प्रतिक्रीयेतून कळते. मग जेंव्हा संधी मिळाल्यावर अशी भले अमेरिकेत राहायला अस्सुसलेली असतील पण माणसेच अशा कंपन्यांना आणि त्यांच्या मुकादमांना धडा शिकवून निघून जातात तेंव्हा त्यात बरोबर कोण आणि चूक कोण हा एक भला मोठा प्रश्नच आहे! मला वाटते हा सर्व गिव्ह ऍन्ड टेक चा धंदा आहे. गोडबोल्यांना मात्र तो एकमार्गी हवा आहे... असो.

गोडबोले अर्थातच हे सर्व विशेष करून लिहीतात ते आय टी च्या चलती मधे जे कोण आले आणि जे येथे - अमेरिकेत अथवा भारताबाहेर अनेक ठिकाणी आल्यामुळे भारतीय कंपन्यांचे आणि गोडबोल्यांसारख्या त्यातील वरीष्ठांचे फावले त्यांच्या बद्दल ते लिहीत आहेत. अप्रत्यक्ष ते अर्थातच सर्व भारतीयांबद्दल बोलत असले तरी. विचार करा उद्या या सर्व आय टी प्रोफेशनल्सनी भारतात येयेचे ठरवले तर गोडबोले काय लिहीतील ते!

आता मी जरा माझ्या स्वानुभाववर लिहीतो. मी १९९१ साली आलो, आलो ते पर्यावरण विषयात शिकायला आलो आणि त्याच विषयात कधी झगडत पण (चांगल्या) हेतूपूर्वक काम करत राहीलो. (थोडक्यात मी आय टी मधला नाही हे केवळ गोडबोल्यांच्या लेखा संदर्भात लिहीत आहे). पण येथे येण्याआधी विशेष करून १०वी नंतर जेंव्हा व्यक्तिगत संबंधातून अथवा इतर काही कारणामुळे त्या आधीच्या पिढीतील लोकं जी अमेरिकेत गेलेली पाहीली होती आणि त्यांचे भारतात आल्यावर जो काही उगाच "शो ऑफ" असायचा तो पाहीला की कधी न्यूनगंड आला नाही, पण हे काय प्रकरण आहे असे नक्कीच वाटायचे. यात अर्थातच भरणा हा आयआयटीचा असायचा. मग आय आय टित जाणारे कसे पहील्या वर्षापासून टोफेल जीआरई करतात, इंजिनियरींग फिजिक्समधले विद्यार्थी कसे आयआयटीला माहेर म्हणतात (कारण अमेरिका हे सासर या अर्थी), आय आय टी म्हणजे कशी क्रीम ऑफ द सोसायटी आहेत वगैरे बोललेले ऐकायचो. अर्थात काही इतर विद्यापिठातीलपण असायचे आणि त्यांचे पण भारतात आल्यावर शो ऑफ दिसायचा.

१९९१ सालचे जे काही चित्र होते त्यात अनेकदा अनेक अमेरिकेतील भारतीय नवीन आलेल्या भारतीयांना आम्ही अमेरिकेतील असे दाखवायचे. ऍक्सेंट मारणे हा प्रकार चालायचा पण तो काही प्रत्येकजण तेंव्हापण करायचा नाही आणि आत्तापण करत नाही. माझ्या भारतीय ऍक्सेंटचा मला आजतागायत त्रास झाला नाही. अर्थात काही काही शब्दोच्चार बदलावे लागतात: उ.दा. शेड्यूल म्हणायच्या ऐवजी स्केज्यूल वगैरे. पण एकंदरीत त्यावेळेस "एन आर आय" हा प्रकार "गार्डेड" होता कारण सो कॉल्ड उच्चशिक्षीत अथवा त्या उद्देशाने लोकं येत होती. पण गोडबोले हे त्या विशिष्ठ काळाबद्दल बोलण्या ऐवजी नंतरच्या काळात जे आय टी प्रोएफेशनल्स आले त्यांच्या बद्दल लिहीतात आणि ते ही तुच्छपणे हे नक्कीच खटकले. यात एन आर आयज् , "बरोबर का चूक" वगैरेचा प्रश्न नाही पण गोडबोल्यांच्या दृष्टीत नवजातीयवाद दिसतो असे कुठेतरी वाटते. हा नवजातीय वाद म्हणजे जी गोष्ट "क्रीम ऑफ द सोसायटी" साठी "राखीव" होती ती सर्वांना मोकळी झाली असे कुठेतरी त्यांना वाटते की काय असे वाटले.

अनेक कारणांमुळे पण मुख्य म्हणजे कुठल्यान् कुठल्यातरी "लष्कराच्या भाकर्‍या" भाजत राहील्याने मी गोडबोल्यांसारखे केवळ त्यांनी पाठवलेले भारतीयच पाहीले नाहीत तर किमान पाच भारतीय पिढ्या जवळून पाहील्यात / अनुभवल्यात असे म्हणू शकतो - त्यात १९६०-७० च्या दशकातील भारतीय आहेत, १९८०च्या दशकातील भारतीय आहेत, १९९० च्या दशकातील सुरवातीचे (माझ्या वेळ्चे) भारतीय आणि नंतर आयटी क्रांतीमुळे आलेले भारतीय असे आहेत आणि त्याच्या पुढच्या येथे जन्माला आलेल्या अथवा वाढत असलेल्या पिढ्या म्हणजे प्रार्थमिक शाळेतील, माध्यमिक शाळेतील, कॉलेजातील आणि विद्यापिठातील भारतीय असे अनेक आहेत. प्रत्येकातील चांगले -वाईट- तृटी लिहीण्यास वेगळा लेख लागेल. पण "सब घोडे बारा टक्के " म्हणजे अतीच झाले.

येथील भारतीयांचे दुर्दैव असे की अमेरिकन्स भारताचे आणि भारतीयांचे "वन पॉइंट एक्स्ट्रापोलेशन" (वाईट गोष्टींसाठी) करणार आणि मग आम्हाला "ते कसे योग्य नाही", हे सांगत राहावे लागणार. तसेच भारतातील भारतीय त्यांना आलेल्या काही अनुभवांवरून तसेच "वन पॉइंट एक्स्ट्रापोलेशन" (वाईट गोष्टींसाठी) करणार. मला पण सुरवातीस असे अनुभव आले तेंव्हा वाटायचे की येथील सर्व भारतीय चुकताहेत - स्वतःला शहाणे समजतात, फरक इतकाच की डोळस अनुभव घेत गेल्यावर त्या विश्लेषणात बदल करण्याची लाज वाटली नाही. गोडबोल्यांसारखा सव्वीस वर्षे अनुभव घेतल्यानंतर अनेक डेटा पॉईंट्स घेऊन अजून पण तत्कालीन निष्कर्ष काढीन पण "वन पॉइंट एक्स्ट्रापोलेशन" मात्र करणार नाही. उ.दा. बॉस्टनमधे पहील्यांदा सबवे मधून प्रवास करताना एक भारतीय मध्यमवयीन बाई दिसली, मला वाटले की ती "स्माईल" करेल ("हसेल " म्हणले तर अर्थ वेगळा झाला असता!) पण तसे काही झाले नाही. अर्थातच आमचे वन पॉईंट एक्स्ट्रापोलेशन झाले की भारतीय भलतेच आगाउ! नंतर कळले की येथे सततच बरेच भारतीय दिसतात. जर मुंबईत प्रत्येक माणूस एकमेकांकडे बघून ओळख नसताना हसायला लागला तर काय होईल. तितके नाही तरी तशीच येथे अवस्था...

पण हीच मंडळी - अर्थात ज्यांना इच्छा असते-गरज वाटते ती (तेच कुठेही असते म्हणा!) त्यांना योग्य वाटते अशा कारणासाठी एकत्र येऊन काहीना काही भारतीयांसाठी करतात आणि ते आजही करत असतात. याची मोठी जंत्री देता येईल. उदाहरणा दाखल दोन दिवसांपुर्वीच कळलेले एक देतो ज्यांच्यावरून गोडबोल्यांसारख्या यशस्वी लोकांनी काही तरी घ्यावे... सिकॅमोर (scmr) या कंपनीचे देश देशपांडे (अथवा गुरूराज देशपांडे) - आधी कुणाला विशेष माहीत नव्हते. त्यांची कंपनी जेंव्हा तेजीत होती (वॉल स्ट्रीटवर पहील्या दिवशी रेकॉर्ड केला होता) तेंव्हा त्यांनी वैभव कमावले आणि जिकडे तिकडे त्यांचे नाव आणि भारतीय समारंभात अध्यक्षपद दिसू लागले. पण अर्थात ह्या माणसाने कधी पायाखालची जमीन सोडली नाही. इतर अनेक प्रथितयश भारतीयांबरोबर "TIE - The Indus Entrpreneurs" ही संस्था चालू करून अनेक उद्यमशील लोकांना ते आजही मदत करत असतातच. भारतात त्यांनी त्यांच्या आय आय टी मद्रास ला १ मिलीयन डॉलर्स संशोधन केंद्र तयार करायला दिले तर बॉस्टनमध्ये मला वाटते ५० मिलीयन डॉलर्स देऊन जिथे शिकले त्या एम आयटी मधे देशपांडे सेंटर काढले. अशी नवीन उद्योगांना मदत करायच्या एक पायरी पुढे जाऊन दोन दिवसांपूर्वी कळल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या राज्यात म्हणजे कर्नाटकात सामाजीक कामे करणार्‍यांसाठी "देशपांडे फेलोज्" तयार करून त्यांना मदत करत "सामाजीक उद्यमशिलतेस" चालना देण्याचे काम ते करत आहेत...ना धड भारताला नावे ठेवत आहेत, ना अमेरीकेस ना तिथल्या इथल्या-लोकांना पण जेथे जेथे सामाजीक ऋण म्हणून फेडता येत असेल तेथे ते ते फेडताहेत.

पण असल्या (अनेक सांगता येतील अशा) चांगल्या गोष्टीपण (नुसतीच वांझोटी टिका करण्याच्या ऐवजी) लिहील्या तर त्यातून आपल्याला प्रसिद्धी कशी मिळणार! मग सगळ्यात सोपे म्हणजे काढा एन आर आयज् ना झोडपून.. आपल्याला प्रसिद्धीपण मिळणार आणि सुमार केतकरांच्या सुरात सूर मिसळल्याने स्तंभलेखनासाठी जागा पण मिळणार!

वरील प्रतिसादाला अवांतरः स्वदेस पुस्तक चांगले आहे. त्यातील एक जोडपे जवळचे कौटूंबिक मित्र आहे. अजून पण एकाशी ओळख झाली आहे. त्यांचे (पुस्तकातील सर्व लेखकांचे) निर्णय, त्यांचे वागणे, पुस्तक आणि गोडबोल्यांचे अनिवासी भारतीयांवरील लिखाण याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही.

वा!

भारी आहे हा प्रतिसाद!
आवडला...

आपला
ङूम्दॉप्आम्टा

हीच प्रतिक्रिया

हीच प्रतिक्रिया लोकसत्तात आली पाहिजे. कारण लोकसत्त्ताचा वाचक वर्ग हा प्रिंट मिडीया तील आहे. तो हे वाचणार नाही. प्रतिक्रिया ही केवळ लेखक किंवा लेखाला नसते ती वाचकालाहि असते. ती वेळीच दिली नाही तर त्याच्या मनातील अपसमजांचे निराकरण कसे होणार?
अवांतर- कालच सत्याग्रही मासिकाच्या ( डॉ.कुमार सप्तर्षी युक्रांद) च्या १७ व्या वर्धापन दिनाला गेलो होतो. दलित मुक्ती चळवळ विशेषांक काढला होता. खासदार रामदास् येणार होते पण आले नाहीत. प्रा. प्रज्ञा दया पवार (दया पवारांची मुलगी) आल्या होत्या. त्या भावनिक गोचीवर बोलल्या. अध्यक्ष व राज्यशास्राचे प्रा. डॉ राजेंद्र व्होरा बोलले. चळवळीचा सद्यस्थितीचा महाराष्ट्रातला आढावा घेताना ते म्हणाले , " साडेतीन टक्के ब्राह्मणांना ! करेक्शन आता (प्रेक्षकातून दोन टक्के) [ दीड ट्क्का आता अमेरिकेत गेले नाही का?]लोकांना सॉफ्ट टार्गेट करणे सोपे आहे. मूळ मुद्याला हात घालण्यापेक्षा ते केव्हाही सोपे. " याची आठवण आली.
प्रकाश घाटपांडे

विनोदी लेख

नुसते कोडींग/टेस्टींग करणारी, हाफ चड्ड्या घालून मॉलातल्या गाड्या ढकलणारी, मराठी शब्दांसाठी चाचपडणारी, अमेरिकन ऍक्सेंट मारणारी जनता (माझ्या मते) अमेरिकेपेक्षा आजकाल भारतातच जास्त दिसेल. गोडबोल्यांच्या मते ह्या सर्वांनी 'ग्रेट' होण्यासाठी कमीतकमी एक ते १५० परदेश वार्‍या करून भारतात परत जावे का?

-कोलबेर

सहमत

१०० टक्के सहमत , कोलबेर ह्यांच्या मताशी.
अशी जनता मुंबईत तर माझ्या लहानपणा पासून पाहात आहे, पुण्यात असे लोक दिसले तरी ते मूळचे मुंबईकर असण्याची शक्यता जास्त.

सुमीत, नावा प्रमाणेच असलेला "चांगला मित्र"

सहमत

कोलबेर व सुमीत यांच्याशी १०० ट्क्के सहमत. अश्यांना आता एन आय आर ( नॉन इंडियन रेसिडंट्स्) अशी संज्ञा प्राप्त झाली आहे. पुण्यात असे लोक खुप दिसतात. मराठीला "घाटी" लॅन्गवेज म्हणणारे. बाटलेलेच अधिक कट्टर असतात अशा एका उक्तीची उगीचच आठवण येते.(कृ.ह.घ्या.)
प्रकाश घाटपांडे

मूळ मुद्दा

गोडबोलेंच्या लेखातला विखार झोंबणारा आहे, निश्चितच. आणि त्याने त्यांचा (त्यांनीच त्यांच्या शहांना दिलेल्या प्रतिसादात उल्लेखिलेला) हेतू साध्य होणार नाही, हे चित्रा ह्यांनी अगदी बरोबर लिहीले आहे. परदेशात राहून आपणाला सर्वांनाच अप्रियही गोष्टी अत्यंत सुचिहीत तसेच स्निग्धपणे ऐकण्याची संवय झालेली असते, तेव्हा असे हे 'भारतीय' व त्यातून 'खास मर्हाठी' बाण्याचे उद्धट लिखाण आपल्याल न रुचले तर त्यात नवल नाही. पंण ते थोडे 'डिस्काउंट' करून त्यांनी उल्लेखिलेल्या एका महत्वाच्या मुद्याला वरील कोठल्याही प्रतिसादात स्पर्शही झालेला नाही. तो मुद्दा म्हणजे 'सब्सिडाईझ्ड' शिक्षण घेउन माणसे लगोलग परदेशात जातात, तेथेच स्थाइक होतात, हे अनफेयर आहे, हा.

माझ्यापासूनच सुरू करणे इष्ट. मी शिक्षण संपवल्यानंतर १६ वर्षे भारतात नोकरी केली, व नंतर परदेशात गेलो. त्यामुळे निदान माझ्या बाबतीत तरी हा मुद्दा लागू नाही असे समजायला हरकत नसावी. आताही येथे मी माझ्या क्षेत्रामध्ये कसलेही दिवे लावत नाही आहे. तेव्हा आता तुम्ही तेथे काय करताय? ह्याला उत्तर असे की इतक्या वर्षांनंतरच्या येथील वास्तव्यात येथील चटपटीत व अत्यंत शिस्तीच्या कामाची संवय लागली आहे. हे माझ्या जीवनाच्या सर्वच बाबतीत लागू आहे. 'आज ८:२३ची फेरी सुटणार का नाही?','सुटलीच तर ती कुठल्या पीयरवरून सुटणार?" असे एकाअर्थी नगण्य समजावेत असे प्रश्न इथे नाहीत. पण तेव्हढेच नव्हे, कामाच्या संदर्भातही जी शिस्त, टापटीप, जो चोखपणा इथे अगदी रूटीन झालाय, त्याबाबत भारतात किमान माझ्या कामाच्या क्षेत्राततरी टणठणाट आहे, हे मला अगदी नक्की माहिती आहे. तेव्हा (वैयक्तिक प्रश्न सोडले तर) तिथे परतायला इंसेंटिव्ह काय आहे?

आपंण देश सोडून गेल्यावर नाळ तुटली तर ते (माझ्या मते) फारच वाईट. पण उपक्रमासारख्या संकेतस्थळावर येणार्‍या सर्वांचीच ती तशी तुटलेली नाही, हे उघड आहे (नाहीतर ते इथे कशाला येतील?). परदेशात राहूनही आपल्या समाजाबद्दलची आस्था ठेवणे, व आपल्याला शक्य होईल तशी त्या समाजाला मदत करत रहाणे हे करणे अगदीच काही वाईट आहे, असे मलातरी वाटात नाही. अगदी परदेशात गेले व देशाला दुरावले हे झाले एक टोक. आणि परतून येऊन काही उल्लेखनीय कार्य करत राहिले (त्या सर्वांचे मला मनापासून कौतूक करावेसे वाटते) हे झाले दुसरे टोक. सर्वांनाच हे दुसरे टोक गाठणे अगदी मनात आले, तरी सहजसाध्य असेलच असे नाही.

विकासांनीही वर सविस्तर उत्तर दिलेले आहे. मी हे माझ्यापुरते थोडक्यात सांगितले. मुक्तसुनित व इतरांनीही 'त्या' मुद्याला धरून कृपया टिप्पणी करावी.

[मी हे 'कॅट अमॉंग्स्ट पिजन्स' धाटणीचे लिखाण केले आहे, त्याबद्दल संबंधितांची माफी मागतो].

मुद्दे (आणि गुद्दे ) :-)

प्रदीप यानी आपल्या सौम्य, सौजन्यशील व्यक्तित्वाला साजेसा अभिप्राय नोंदवला आहे. गोडबोल्यांच्या उर्मट लिखाणाच्या बाबतीत हे असे सौजन्य विशेष जाणवते. (बाय् द वे, गोडबोल्यांच्या शैलीत "अस्सल मर्‍हाटी बाणा" वगैरे काहीच नाही. विशेष विचार न करता वापरलेल्या लिखित मराठीचा तो उत्तम नमुना आहे. असो. )

आता प्रदीप यानी ज्याकडे लक्ष वेधले तो मुद्दा : 'सब्सिडाईझ्ड' शिक्षण घेउन माणसे लगोलग परदेशात जातात, तेथेच स्थाइक होतात, "ब्रेन् ड्रेन्" वगैरे वगैरे.

१.परदेशात स्थायिक झालेल्या लोकानी पाठवलेल्या धनामुळे गंगाजळी वाढते. १९९१च्या आर्थिक संकटापासून आतापर्यंत जी परिस्थिती बदलली त्यात या "पाठवलेल्या" पैशांचा हातभार आहे. हे सर्व फंड्स् भारतातल्या अर्थव्यवस्थेला पोषक होतात.

२. पटणी, सिंटेल या नावाचा जो बडेजाव गोडबोले मिरवतात आणि त्याच अनुषंगाने , परत न येणार्‍यांच्या नावाने ते बोटे मोडतात. मी स्वतः यापैकी एका कंपनीमधे होतो. या कंपन्या जे करतात त्याला पिळवणूक असे म्हणणे योग्य होईल. ही कंपनी मला जो पगार द्यायची त्याच्या सुमारे तिप्पट पगार मला आता मिळतो. का सोडू नये मी माझी "मायदेशीची" कंपनी ? माझी मायदेशीची कंपनी जी हेल्थ् बेनिफिट्स् इथे द्यायची त्याच्या भरवशावर मी माझ्या मुलाबाळाना आयुष्यभर ठेवले तर थंडीवार्‍यात कसल्याही कांबळ्याशिवाय त्याना ठेवण्यासारखे आहे.
थोडक्यात जो पैसा "भारतमातेकडे" परत यायचा तो जातो या रक्तशोषकांकडे.

३. मी इथे आलो. काही वर्षांनंतर घर घेतले. मुलाबाळाना इथल्या घराची वातावरणाची सवय झाली आहे. गोडबोले ज्या "दुय्यम नागरिकत्वाची" भीती आम्हाला दाखवतात त्याचा अनुभव अजून तरी आला नाही. हां , मी काही "स्वाती दांडेकर" नाही बनू शकणार. पण अगदीच पोटार्थी गुलाम सुद्धा नाहीच.

४. आता जे सांगतो ते आत्मप्रौढीचे होणार. पण त्याला इलाज नाही. भारतात असल्यापासूनच मी प्रबोधनात्मक आणि सेवाभावी काम करणार्‍या संस्थांशी संबंधित होतो. येथे आलो तरी (किंवा येथे आलो म्हणून) हे नाते सुटले नाही. एक कार्यकर्ता म्हणून काम करायच्या ऐवजी मी एक देणगीदार म्हणून काम करतो, ज्यातून कदाचित ५-१० कार्यकर्त्याना मदत होत असेल. असे करणारा मी एकटा बिलकुल नाही. आणि असे करणार्‍यांच्या श्रेणीत मी खूप खूप छोटा आहे. थोडक्यात, एनाराय् लोकांनी भारतात संस्थाना पाठविलेल्या निधीचा मुद्दा अगदीच नगण्य नाही.

५. माझ्या ओळखीचे कमीत कमी असे ५ लोक आहेत ज्यानी कंपन्या उघडल्या आणि जे आपले काम पुण्या-मुंबईमधे "आउट्-सोर्स्" करतात. होय, हे लोक डॉलर्स कमावतात , पण पुण्यातल्या काही लोकाना त्यातून रोजगार मिळालाय्. अशी उदाहरणे खूप असतील हा मुद्दा मान्य व्हावा.

आणखीदेखील लिहिता येईलच. प्रत्येक गुंतागुंतीच्या गोष्टीला अनेक बाजू असतात. या "अनेक बाजू असण्याबद्दलच्या" अभावामुळे मग गोडबोल्यांसारखे लोक एकांगी विधाने करून मोकळे होतात. थोडक्यात, त्यांचा उर्मट अहंभाव वगळता जे उरते त्याच्याशी संबंधित - पूरक किंवा प्रतिवादात्मक - असे बोलण्यासारखे बरेच आहे की.

सब्सिडाईझ्ड

तो मुद्दा म्हणजे 'सब्सिडाईझ्ड' शिक्षण घेउन माणसे लगोलग परदेशात जातात, तेथेच स्थाइक होतात, हे अनफेयर आहे, हा.

ह्या मुद्द्यावरूनही लिहावे असे वाटले होते, पण तो गोडबोल्यांच्या मूळ लेखात दिसला नाही म्हणून काही लिहीले नाही.
सब्सिडाइज्ड शिक्षणाचे मोल मोठे आहे, विशेषतः मुलींच्या बाबतीत हे माहितीच आहे. पण गोडबोल्यांच्या मूळ लेखात त्यांनी हे लिहीले नाही, ही पश्चातबुद्धी का?
या मुद्द्याला पचायला अवघड असे तिखट उत्तर मागे मी मनोगत का कुठेसे वाचले होते असे आठवते- त्या लेखकाच्या मते जर भारतातील अनेक लोक टॅक्स भरत नाहीत किंवा चोरतात. याचा अर्थ जे नियमित टॅक्स भरतात ते टॅक्स न भरणार्‍यांच्या मुलांनाही त्या टॅक्सच्या रूपाने शिकवतात. ह्याचा अर्थ त्यांच्या मुलांना दिसताना शिक्षण मोफत मिळालेले दिसत असले तरी त्यांनी द्यायचा पैसा दिलेला असतो, त्यामुळे त्यांच्या मुलांनी असा विचार करायची गरज नाही. हे विधान मला पटले आहे असे नाही (आणि त्याहूनही असे म्हटल्याने समाजापासून जो तुटकपणा येतो, आता माझा तुमच्याशी काय संबंध असे हात झटकणे येते ते मला मान्य नाही.). पण बघायचा काहींचा हाही दृष्टीकोन असू शकतो हेही खरे आहे, आणि समाजाने अपराधीपणा (गिल्ट कॉम्प्लेक्स )लादला तर हे जास्तच शक्य आहे. म्हणूनच म्हटले की गोडबोले जे काही चांगले साध्य करू पाहत असतील, त्याचा नेमका उलटा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मीडिऑकर

गोडबोल्यांचा सारा जळफळाट दिसतो आहे तो मीडिऑकर मंडळींबद्दल. "भव्यदिव्य" क्लब अमेरिकेत असो वा भारतात गोडबोल्यांच्या (सध्यातरी) गूड् बूक्स् दिसतो आहे.

(आपण अगदीच बीलो मीडिऑकर काम करतो आहोत असे अधूनमधून स्वतःविषयी वाटत राहावे... तब्येतीला बरे असते. असो!)

मीडिऑकर मंडळी सगळीकडेच खच्चून भरली आहेत. उगाच बोटे दाखविण्यात काही अर्थ नाही. मीडिऑकर मंडळींना भारताऐवजी अमेरिकेत फालतू कामे करण्याने पैसे मिळत असतील तर मिळू देत. भारतात कदाचित (हम्म्म्म्@) त्यांना संधी मिळणार नाहीत. नेट इफेक्ट पाहिला तर भारतीय कुटुंबांना (अमेरिकेतील आणि भारतातीलही) हातभारच लागतो.
दुसरी गोष्ट माझ्या मते मीडिऑकर मंडळी परत न आली तर भारताचे फारसे नुकसान होणार नाही. राहू देत जेथे आहेत तेथे.
====================
अवांतरः +१ सिन्ड्रोमचा उल्लेख आवडला. "आर" या "पार" वाल्यांचा प्रश्न कधीच नसतो. गोची असते ती त्रिशंकूंची. @@

सहमत

सहमत आहे. माणसाचा रेझुमे बघून त्याच्याविषयी मत बनवणे नोकरीच्या संदर्भात योग्य असते, पण जर तुम्ही काही भव्यदिव्य केले नाही तर काही अर्थ नाही असे म्हणणे पोरकटपणाचे वाटते.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

किमयागार- दै.सकाळ बातमी

ही बघा दैनिक सकाळ दि.५ फेब्रुवारी २००८ ची बातमी-
"किमयागार'चा दुसरा भाग लवकरच - डॉ. अच्युत गोडबोले

पुणे, ता. ४ - "बेस्ट सेलर' म्हणून गाजत असणाऱ्या "किमयागार'चा दुसरा भाग लवकरच वाचकांच्या हाती पडणार असल्याची माहिती प्रसिद्ध लेखक, संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी आज दिली.
"आशय सांस्कृतिक' आणि "परांजपे स्कीम्स' आयोजित "पुलोत्सवा'त गोडबोले यांच्याशी विनिता आपटे यांनी संवाद साधला. तेव्हा आपले बालपण, कलाप्रेमी वातावरण, मान्यवरांचा सहवास, वाचनप्रेम, शिक्षणातील प्रगती, लेखनाची सुरवात... अशा अनेक पैलूंविषयी गोडबोले भरभरून बोलले.

ते म्हणाले, ""माझे बालपण सोलापूरमधील कलाप्रेमी कुटुंबात गेले. श्रीराम पुजारी यांच्यामुळे पं. भीमसेनजी, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे असे दिग्गज कलाकार घरी येत असत. प्रसंगी ते आमच्याकडे राहतही असत. त्यामुळे त्यांचा सहवास खूप मिळाला. सारी जडणघडण त्यांच्या गप्पा, गायन, किस्से यातून झाली. अभ्यासात मी हुशार होतोच. गुणवत्तायादीत आल्यावर मी अभियांत्रिकीची पदवी मिळवली. वाचनाचा छंद तर सुरवातीपासून होता. तो वयाबरोबर वाढतच गेला.''

""पदवी मिळवल्यावर काही मित्रांसह शहाद्याजवळच्या आदिवासींमध्ये काही काळ काम केले आणि आयबीएम कंपनीत नोकरी मिळाली. संगणक क्षेत्रातले ज्ञान मी फार नंतर मिळवले. मध्यंतरीचा एक काळ "व्यसनाधीनते'चाही होता; पण त्यातून मी बाहेर पडू शकलो. माझ्या मुलाचा जन्म आणि त्याला असणारा "आत्ममग्नते'चा आजार हा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग होता. दरम्यान माझे "ऑपरेटिंग सिस्टिम' हे पुस्तक प्रसिद्ध झाले. स्वतः नारायण मूर्ती यांनी या पुस्तकाचा "कॉम्प्युटर क्षेत्रातील आशियातील सर्वोत्कृष्ट पुस्तक' असा गौरव केला. त्यातून लेखनाकडे अधिक गांभीर्याने वळलो. मुलाच्या निमित्ताने मला एक वेगळा सामाजिक दृष्टिकोन मिळाला. आत्ममग्न मुलांसाठी आम्ही मित्रांच्या मदतीने अंधेरीला एक शाळा सुरू केली आहे. या कामाची व्याप्ती वाढवण्याचा विचार आहे,'' असे त्यांनी सांगितले.

""दरम्यान माझे "किमयागार' हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि वाचकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. आता "किमयागार'चा दुसरा भागही वाचकांच्या हाती पडणार आहे. तसेच "अर्थशास्त्र' या विषयावरही मी मराठीत लेखन करीत आहे. जे काम स्वीकारले त्यात बुडून जाण्याची माझी वृत्ती आहे आणि त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान गाठण्याची माझी क्षमता आहे. मुळात कलाप्रेमी असल्याने संगीताचा आनंद घेताना "नादवेध'सारखे लेखनही झाले. संगीतातील "शास्त्रा'पेक्षाही संगीताचे मनाला भिडणे मला अधिक महत्त्वाचे वाटते,'' असेही गोडबोले म्हणाले.
------------------------------------
""माझ्या मुलाचा जन्म आणि त्याला असणारा "आत्ममग्नते'चा आजार हा माझ्या आयुष्यातील कलाटणी देणारा प्रसंग होता. मुलाच्या निमित्ताने मला एक वेगळा सामाजिक दृष्टिकोन मिळाला...''
------------------------------------

प्रकाश घाटपांडे

आत्ममग्नता

म्हणजे 'ऑटिझम' का?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

हम्म..

दुर्दैवाने हा सामाजिक दृष्टीकोन गोडबोलेसाहेबांच्या लेखात कुठेच दिसत नाही. दुसरे म्हणजे इथेही मी पहिला आलो किंवा आमच्याकडे कोणकोण येत असे याचा उल्लेख आवश्यक होता का? (यावरून ऋषिकेशच्या लेखांमधील 'तसा मी हुशारच' म्हणणारा छोट्या आठवला.)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

रोचक

या पार्श्वभूमीवर ही बातमी रोचक ठरावी. छोट्या रूजुलचा ऍक्सेंट अमेरिकन आहे की भारतीय याबाबत माहिती मिळू शकली नाही.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

इंडीकोअर

छोट्या रूजुलच्या बातमीवरून काही वर्षांपुर्वी पाहीलेले इंडीकोअरचे प्रभावित करणारे प्रेझेंटेशन आठवले. इथे (अमेरिकेत) जन्मलेल्या वाढलेल्या भावंडांनीत्यांच्या आइवडीलांच्या मदतीने ही संस्था चालू केली. अनेक तरूण "नेक्स्ट जनरेशन" भारतीय आपले शिक्षण झाल्यावर ३ महीने ते १-२ वर्षे भारतात जाऊन झोपटपट्ट्यांपासून ते वनवासी भागात कामे करतात किंवा इतर समाजोपयोगी कामे करतात. मग आल्यावर परत शिकतात (लॉयर्स, डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि बिझिनेस) निवड प्रक्रीया कडक आहे आणि या (भारतात असतानाच्या) काळात त्यांना काम सोडून नातेवाइकांकडे उगाच अथवा सणासुदीसाठी, लग्नकार्यासाठी पण न जाण्याची अट असते. हा प्रोजेक्ट जास्त गाजावाजा न करता आजतागायत चालू आहे त्याचे भागभांडवल त्यांनी (भावंडांनी) स्वखर्चाने मिळवले आहे...(खालची क्लिप नीट चिकटवता येत् नाही आहे, पण नीट दिसत आहे)

" alt="">

एक उपाय

अच्युत गोडबोलेंच्या ह्या लेखाची प्रिंट काढून त्याच्या प्रती मुंबईतल्या भैय्या लोकांमध्ये वाटाव्यात. परमुलुखात टॅक्सी चालवणे भाजी विकणे असली दुय्यम दर्जाची कामं करणार्‍या भैय्यांना ते वाचून घोर पश्चाताप होइल आणि ते आपसुक मुंबईतुन निघून जातील.

ह्यातुन होणारे फायदे :

१) अभिमन्यू चक्रव्युहातुन सही सलामत बाहेर पडेल (मग तो अभिमन्यू राहील का? ह्याकडे जरा दुर्लक्ष करावे.. )
२) घरा बाहेर पडलेल्या मद्याच्या बाटल्या गोळा करुन अमिताभ शांतपणे त्याचा अस्वाद घेऊ शकेल
३) समस्त मराठी स्थळे आणि ब्लॉग्सवर रवंथलेल्या अगणित चर्चा कधी नव्हे ते एकाच फटक्यात संपतील!

-कोलबेर

हाहाहा

.... मान गये उस्ताद !

+१

अप्रतिम. या चर्चेतील सर्वोत्कृष्ट प्रतिसाद.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

वा वा

झकास उपाय :)))))

भारि उपाय

आमच्या एका मित्राच्या म्हणण्यानुसार आमच्या कडे असे विंग्रजी फाडणारे लोक जर तेव्हा असते तर 'आमच्या मातृभाषेचा हा अवमान" असे म्हणुन तात्काळ चालते झाले असते. येवढे आंदोलन आन क्रांती करत बसावी लागलि नसती.
प्रकाश घाटपांडे

हे पुस्तक परिक्षण नाहीच

मी उपक्रम् ह्या "उपलक्रमात" पहिल्यान्दा सहभागी होत आहे. त्या मुळे लिखाणात काही कमी-जास्ती झाले तर चुक-भूल द्यावी-घ्यावी.

गोड्बोल्यान्च्या लेखावर बर्याच प्रतिक्रिया वाचल्या. त्या सगळ्या प्रतीक्रियान बरोबर अजून दोन नवीन मुद्दे माणडावेसे वाटतात ते असे:
१. गोड्बोल्यानी पुस्तक परिक्षण कर्ण्याच काम हाती घेउन ते पार पाडलच् नाहीय. पुस्तक परिक्षणाचा spring board सार्खा वापर करून अनिवासी भार्तियान्वर ताशेरे झाडून घेतले आहेत. हे एक अतिशय वाईट लिहलेल्या पुस्तक परिक्षणाच उदाहरण आहे.

२. गोड्बोल्याच्या मते अमेरिकेमधे आलेल्या प्रत्येक् भारतीयाने काहीतरी दैदीप्यमान करून दाखवल पाहीजे. त्यान्नी सामान्य म्हणून् जगता कामा नये. पण दूसर्याच्या जीवनाच मुल्यमापन कराइचा अधीकार गोड्बोल्याना कोणी दिला????

प्रतिशब्द

काय पाय ओढून राहिलात, सर्किटराव - तुम्हाला आम्ही प्रतिशब्द सांगणार...

तरी एक गंमत् म्हणून (वेगवेगळे प्रतिशब्द दिले आहेत, त्यांत अर्थच्छटांचा फरक आहे, किंवा मराठमोळा/क्लिष्ट असा फरक आहे.)

"फॉर अस ऑर अगेन्स्ट अस" (हे वाक्य असेच ठेवावे, कारण ते इंग्रजीतलेच कुप्रसिद्ध आहे. तरी -)
ये आमच्यात नाहीतर आहेस विरोधात.
जे आमच्यात नाहीत ते आमच्या विरोधात आहेत.
नसशील पित्तू तर असशील शत्रू.
जर तुम्ही आमच्या बाजूने नाही, तर आमच्या विरोधात आहात (हे तुमचे ठीकच वाटते.)

असे म्हणणे ... आता ऍक्सेप्टेबल झाले आहे.
असे म्हटले तर ... लोक मानून घेतात.
असे म्हणणे ... लोकमान्य झाले आहे.
असे म्हणणे ... चालवून घेतले जाते.
असे म्हणणे ... शिष्टसंमत झाले आहे.

थोडे जरी रीसर्च केले असते
थोडे जरी संशोधन केले असते
थोडा जरी शोध घेतला असता
थोडी जरी विचारपूस केली असती
थोडी जरी माहिती मिळवली असती

त्याला हा फियास्को टाळता आला असता
त्याला असा तोंडघाशी पडणे टाळता आले असते
त्याला हा विचका/विस्कोट/गदारोळ/फसगत/राडा (फियास्को यापैकी कुठल्याही अर्थाने वावरतात) टाळता आला असता
(...असे खूपच वाक्प्रचार आहेत...)

तोंडघाशी?

तोंडघाशी की तोंडघशी?

(तोंडाळ) आजानुकर्ण

तोंडघशी

पडलो!

 
^ वर