पद्मविभुषण २००८

२००८ साली दिल्या गेलेल्या पुरस्कारांत पद्मविभुषण हा सर्वोच्च पुरस्कार होता. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती ह्या आपापल्या क्षेत्रात निश्चितच अतिशय उच्च स्थानी आहेत. या चर्चाप्रस्तावाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा आपण घेऊ शकतो. या चर्चेच्या निमित्ताने त्यांच्याबद्दलच्या कथा, परिचय इ. वर उपक्रमी प्रकाश टाकतील अशी अपेक्षा आहे.

२००८ पद्मविभुषण विजेते व त्यांचा मोजक्या शब्दांत परिचय :

१) सचिन तेंडुलकर : जगप्रसिद्ध सन्माननीय क्रिकेटपटू [महाराष्ट्र]
२) विश्वनाथन आनंद : जगज्जेता भारतीय बुद्धिबळपटू [तमिळनाडू]
३) नारायण मूर्ती: इंन्फोसिसचे संस्थापक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यावसायिक [कर्नाटक]
४) आर. के पचौरी: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरणतज्ञ (नोबेल विजेत्या टीमचे सभासद) [अनिवासी]
५) इ. श्रीधरन : कोंकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रोचे जनक [दिल्ली]
६) लक्ष्मी मित्तल : जागतिक ख्यातीचे पोलाद व्यावसायिक , ब्रिटिश नागरिक [लंडन]
७) न्यायाधीश (डॉ.)ए.एस. आनंद: भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश [दिल्ली]
८) श्री पी. एन्. धर :  धडाडीचे केंद्रीय शासकीय अधिकारी, सिमला कराराबाबतच्या घडामोडींत सहभाग [दिल्ली]
९) पी आर एस्. ओबेरॉय : ओबेरॉय ग्रुपचे संस्थापक [अनिवासी]
१०) आशा भोसले: भारतीय लोकप्रिय सदाबहार गायिका [महाराष्ट्र]
११) सर एडमंड हिलरी: पहिले एव्हरेस्टवीर, हिमालयात शेर्पांसाठी समाजसेवी कार्य, न्यूझीलंडचे नागरिक [ऑकलंड]
१२) रतन टाटा: टाटा ग्रुपचे संस्थापक आणि जगप्रसिद्ध व्यावसायिक [महाराष्ट्र]
१३) प्रणव मुखर्जी: भारतीय राज्यसभेतील बुजुर्ग संसदपटू, मंत्री. [प. बंगाल]

आपणाला यातील बर्‍याचश्या व्यक्तींबद्दल जी माहिती असेल ती कृपया इथे द्यावी. ज्यांच्या बद्दल नाही त्यांच्या बद्दल मिळावी आणि ज्यांबद्दल आहे त्यांच्या बद्दल वाढावी हा या चर्चेमागील प्रामाणिक उद्देश.

कृपया या व्यक्तींबाबत टिप्पणी करते वेळी शक्य असल्यास संदर्भाचा दुवा असल्यास द्यावा. जेणेकरून उत्सुक मंडळी तिथे जाऊन तपशील वाचतील. पण केवळ दुवा न देता त्यातील तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटलेला भाग इथे मराठीत द्यावा ही विनंती

संदर्भ वरील नावे विकिपिडिया वरून घेतलेली आहेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

अवांतर

१) माझ्या माहितीप्रमाणे लक्ष्मी मित्तल यांचे नागरीकत्व भारतीयच आहे, जरी ते इंग्लंडमध्ये राहत असले तरी.
चुभुद्याघ्या.

२) एडमंड हिलरी यांचे नुकतेच निधन झाले तेव्हा त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर दिला गेला (तो आधी दिला गेला असता तर बरे झाले असते).

३) प्रणव मुखर्जी यांना नक्की कोणत्या आधारावर हा पुरस्कार दिला गेला हे समजणे कठीण!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

काही माहीती...

सर्वप्रथम चर्चेसाठी चांगला विषय!

आर. के पचौरी: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरणतज्ञ (नोबेल विजेत्या टीमचे सभासद) [अनिवासी]

माझ्या माहीती प्रमाणे ते दिल्लीचे आहेत (TERI दिल्लीत आहे). ज्या टिमचे ते प्रमुख आहेत ती, संयुक्त राष्ट्रसंघाचा भाग आहे "Intergovernmental Panel on Climate Change (IPCC)"

इ. श्रीधरन : कोंकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रोचे जनक [दिल्ली]

कोकण रेल्वेचे खरे जनक मधू दंडवते. ७७ साली जनता राज्यात ते रेल्वेमंत्री असताना सुरवात केली पण त्यानंतर सरकार पडले. मग मराठी रेल्वे मंत्री कधी झालाच नाही आणि परीणामी ती गाडी पुढे गेली नाही. नंतर चंद्रशेखरांच्या काळात (की व्ही.पि.सिंगच्या लक्षात नाही). जॉर्ज फर्नांडीस रेल्वे मंत्री झाले. त्यांनी आश्वासन दिले की हे सरकार टिको अथवा न टिको, मी अशी तरतूद करीन की कोकण रेल्वे होईल. आणि त्यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन स्थापली जीचा कारभार रेल्वेमंत्रालयाच्या अखत्यारीच्या बाहेर ठेवला. त्याचे मुख्य (चु.भू.द्या.घ्या.) हे इ. श्रीधरन झाले ज्यांनी कोकण रेल्वे चालू होण्याची अंतीम तारीख (परत जॉर्जसाहेबांच्या हट्टामुळे) ठरवली आणि मग उलट स्केड्ज्युलींग (सीपीएम - मह्णजे क्रिटीकल पाथ मेथड, कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट नाही!)तयार करून सर्व घडवून आणले आणि ते त्यांचे कर्तुत्व नक्कीच बक्षीसपात्र आहे.

आशा भोसले: भारतीय लोकप्रिय सदाबहार गायिका [महाराष्ट्र]

यासंदर्भात मी इतरत्र प्रतिक्रीया देऊन झाली आहे. पण परतः आशाला (वास्तवीक एकेरी लिहीणे योग्य नाही पण त्यातच अनादर नसून जास्त आत्मियता वाटते) आजपर्यंत कुठलेच पद्म पुरस्कार दिला गेला नाही असे समजले आणि अत्यंत खेद वाटला. निदान सत्तरीच्या घरात का होईना तो न्याय मिळाला हे ही नसे थोडके.

लक्षी मित्तलच्या बाबतीत वर सुनील यांनी म्हणल्याप्रमाणे ते भारतीय नागरीकच आहेत.

प्रणव मुखर्जींना तमाम वर्षे नेहरू-गांधी घराण्याची चाकरी केल्याबद्दल गळ्यात लॉकेट घातले असावे, बाकी कारण काही असू शकेल असे वाटत नाही...त्यांना बुजुर्ग संसदपटू वगैरे म्हणणे म्हणजे जरा अतीच वाटते. त्यांनी केलेल्या कुठल्याही ठळक कामगिरीचा आढावा घेता आला तर तसे म्हणू. न पेक्षा मधु लिमये (नेहरू म्हणायचे की एकमेव संसदीय व्यक्ती जीने संसद ग्रंथालयाचा पुरेपूर उपयोग केला), मधू दंडवते, प्रमिला दंडवते, नरसिंहराव, वाजपेयी, अडवाणी, सोमनाथ चॅटर्जी, चंद्रशेखर, जॉर्ज फर्नांडीस असे अनेक (प्रत्येकात चांगले वाईट शोधता आले तरी) खर्‍या अर्थाने संसदपटू होते/आहेत. त्यात काँग्रेसच्या लोकांची नावे मिळत नाहीत कारण वडाच्या झाडाखाली खुरटलेली रोपटी जशी असतात तसे काँग्रेसमन्स एका मोठ्या नेतृत्वाखाली तयार करायची सवयच लागली. अपवाद अर्थात राव यांचा. पण म्हणूनच त्यांना नंतर "मरणांतानी वैराणी" म्हणतपण योग्य आदर दिला गेला नाही..

खरे जनक

कोकण रेल्वेचे खरे जनक मधू दंडवते! हे मात्र १००% खरे.
शिवाय जॉर्ज.

योग्य महितीचा तुकडा दिलात.

आपला
गुंडोपंत

मुखर्जी

सुनील आणि विकास माहितीवद्दल धन्यवाद.
लक्ष्मी मित्तलच्या बाबतीत वर म्हणल्याप्रमाणे ते भारतीय नागरीकच आहेत. विकीवरील तक्त्यावरून गैरसमज झाला होता. क्षमस्व!

प्रणव मुखर्जींना तमाम वर्षे नेहरू-गांधी घराण्याची चाकरी केल्याबद्दल गळ्यात लॉकेट घातले असावे, बाकी कारण काही असू शकेल असे वाटत नाही...
हे मला वैयक्तीकरित्या खरं वाटतं :) तरी विकीपिडियावर त्यांच्याबद्दल बरीच माहिती आहे. त्याचा गोषवारा असा:
१९६९ साली काँग्रेसमधे आल्यानंतर २००४ पर्यंत ते एकहि निवडणूक जिंकू शकले नाहित. केवळ गांधी घराण्याच्या चाकरीच्या जोरावर ते सतत राज्यसभेत मात्र होते आणि त्यांनी या वरिष्ठ सभागृहाद्वारे अनेक पदे भुषविली. शेवटी २००४ मधे जंगीपूर सारख्या सुरक्षित मतदार संघातून ते १४व्या लोकसभेवर निवडून आले आणि सद्ध्या ते भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत.
त्यांना पद्मविषुभण द्यावे असे त्यांचे कर्तुत्व काय हा प्रश्न जरी मलाहि पडलेला असला तरी काहि ठळक सफलता पुढिल प्रमाणे:

  • १९८२ व १९८४ चे वित्त मंत्री
  • १९८४ मधे युरोमनी ह्या मासिकाच्या पहाणी नूसार जगातील ५ सर्वोत्तम वित्तमंत्र्यांपैकी एक
  • इंटरनॅशनल मॉनेटरी फंडकडून कर्जाचा १.१ बिलियनचा भाग न घेण्यावबद्दल त्यांची कारकिर्द गाजली
  • १९९५ मधील सार्क देशांच्या परराष्ट्रमंत्र्याच्या परिषदेचे अध्यक्ष
  • १९९७ मधे सर्वोत्कुष्ट संसदपटु म्हणून मतदानाद्वारे निवड

असो.

बाकी आशा भोसले यांना निदान सत्तरीच्या घरात का होईना तो न्याय मिळाला हे ही नसे थोडके.
सहमत!

याशिवाय यातील न्यायाधीश (डॉ.)ए.एस. आनंद, श्री पी. एन्. धर व पी आर एस्. ओबेरॉय यांच्याबद्दल कोणी सांगु शकेल काय?

-ऋषिकेश

श्री पी. एन्. धर

पी एन धर हे धडाडीचे होते म्हणणे कदाचीत योग्य असेल पण त्यांची प्रमुख धडाडी ही आणिबाणिच्या काळातील पंतप्रधान इंदीरा गांधींचे सचिव (पीएम सेक्रेटरी) म्हणून ज्ञात आहे. त्यांना प्दमविभूषण देण्याइतके त्यांचे कार्य इतर पुरस्कृत व्यक्तिंशी तुलना करता (प्रणव मुखर्जी सोडून) काय आहे हा संशोधनाचा विषय आहे. अर्थातच ते काँग्रेसमन आणि तेही आणिबाणीकाळात "वन ऑफ द डिसिजन/पॉलीसी मेकर". आश्चर्य म्हणजे त्यावर कोणत्याही विरोधीपक्षाने आवाज उठवलेला दिसला नाही!

आशाताई

काही गायिकांना एक्कावन्न कविता म्हटल्याबद्दल मिळणारे पद्मश्री पाहता आशाताईंना हा पुरस्कार किती उशीरा मिळाला याचा अर्थ समजून येतो

-- आजानुकर्ण

 
^ वर