मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने

मराठी भाषेत शेकडो शब्द आणि वचने दैनंदिन वापराची झाली आहेत. ती इतकी सरावाची आहेत की त्यांचा उगम बहुधा विस्मृतीत जातो. असे काही शब्द आणि वचने खाली देऊन त्यांचे उगम शोधण्याचा प्रयत्न मी केला आहे. प्रस्तुत लिखाणात असे २० शब्द आणि वचने आहेत. पाळीपाळीने आणखी अनेक शब्द आणि वचने मी सदस्यांपुढे ठेवणार आहे.

प्रथम शब्द अथवा वचन, नंतर त्याचा उगम आणि शेवटी सरल अनुवाद असे ह्याचे स्वरूप आहे.

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग १.

मराठी भाषेत शेकडो शब्द आणि वचने दैनंदिन वापराची झाली आहेत. ती इतकी सरावाची आहेत की त्यांचा उगम बहुधा विस्मृतीत जातो. असे काही शब्द आणि वचने खाली देऊन त्यांचे उगम शोधण्याचा प्रयत्न मी केला आहे. प्रस्तुत लिखाणात असे २० शब्द आणि वचने आहेत. पाळीपाळीने आणखी अनेक शब्द आणि वचने मी सदस्यांपुढे ठेवणार आहे.

प्रथम शब्द अथवा वचन, नंतर त्याचा उगम आणि शेवटी सरल अनुवाद असे ह्याचे स्वरूप आहे.

१) नभ:स्पृशं दीप्तम्। (भारतीय वायुसेनेचे ध्येयवाक्य. भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् ह्यांनी हे सुचविले असे वाचल्याचे स्मरते.)

नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं
व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा
धृतिं न विन्दामि शमं च विष्णो॥
गीता ११.२४

(हे विष्णो, आकाशस्पर्शी ज्योतीसारख्या आणि अनेकवर्णयुक्त, उघडया मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्रांच्या तुला पाहून भयभीत झालेल्या मजमध्ये धैर्य आणि शांति नाहीसे झाले आहेत.)

२) मरणं प्रकृतिः शरीरिणाम्।

मरणं प्रकृतिः शरीरिणां विकृतिर्जीवितमुच्यते बुधैः।
क्षणमप्यवतिष्ठते श्वसन्यदि जन्तुर्ननु लाभवानसौ॥
रघुवंश ८.८७

(मरण ही शरीरधारकांची प्रवृत्ति आणि जीवन ही विकृति आहे असे ज्ञानी म्हणतात. एखादा जीव श्वास घेऊन एक क्षणभर जगला तरी तो त्याचा लाभच आहे.)

३) बलमार्तभयोपशान्तये।

बलमार्तभयोपशान्तये विदुषां सत्कृतये बहु श्रुतम्।
वसु तस्य विभोर्न केवलं गुणवत्तापि परप्रयोजना॥
रघुवंश ८.३१

(त्या राजाचे बल दुःखितांचे भय घालविण्यासाठी आणि मिळविलेले ज्ञान विद्वानांचा सत्कार करण्यासाठी होते. त्याची संपत्तीच नाही तर गुणहि दुसर्‍यांच्या उपयोगासाठी होते.)

४) नामूलं लिख्यते किञ्चित्।

इहान्वयमुखेनैव सर्वं व्याख्यायते मया।
नामूलं लिख्यते किञ्चिन्नानपेक्षितमुच्यते॥
मल्लिनाथ संजीविनीटीका प्रस्तावना

(येथे मी सर्व व्याख्या अन्वयमार्गाने केली आहे. आधार नसलेले काहीहि लिहिलेले नाही आणि ज्याची आवश्यकता नाही असे काहीहि म्हटलेले नाही.)

५) विनाशकाले विपरीतबुद्धिः।

न भूतपूर्वो न च केन दृष्टो हेम्नः कुरङ्गो न कदापि वार्ता।
तथापि तृष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीतबुद्धिः॥
सुभाषित

(सोन्याचा हरिण पूर्वी कधी झाला नाही आणि कोणी पाहिला नाही. त्याची काहीहि वार्ता नाही. तरीहि रामाला त्याचा लोभ पडला. विनाशकाळी बुद्धि उलटी फिरते.)

६) बलीयसी केवलमीश्वरेच्छा।

स्वयं महेश: श्वशुरो नगेश: सखा धनेशस्तनयो गणेशः।
तथापि भिक्षाटनमेव शम्भोर्बलीयसी केवलमीश्वरेच्छा॥
सुभाषित

(स्वत: महेश, सासरा पर्वतामधील प्रमुख, मित्र धनेश कुबेर, मुलगा गणांचा नेता. असे असूनहि शंकराला भिक्षेसाठी हिंडावे लागते कारण ईश्वरेच्छा सर्वशक्तिमान् आहे.)

७) सुखं च मे शयनं च मे।

अभयं च मे सुखं च मे शयनं च मे
सूषा च मे सुदिनं च मे॥
चमक रुद्रप्रश्न

(मला भीतिपासून मुक्ति मिळो, मला सुख मिळो, चांगली निद्रा, चांगली पहाट आणि चांगला दिवस मिळो...)

८) विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुख:।

शिरः शार्वं स्वर्गात्पशुपतिशिरस्तः क्षितिधरं
महीन्द्रादुत्तुङ्गातदवनिमवनेश्चापि जलधिम्।
अधोधो गङ्गेयं पदमुपगता स्तोकमधुना
विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुख:॥
भर्तृहरि

(स्वर्गातून शंकराच्या मस्तकावर, तेथून हिमालय पर्वतावर, तेथून भूमीवर आणि तेथूनही समुद्रामध्ये. अशी गंगा खालच्याखालच्या पदाकडे जाते. विवेकभ्रष्टांचा नाश शंभर मार्गांनी होतो.)

९) न भूतो न भविष्यति।

कृपणेन समो दाता न भूतो न भविष्यति।
अस्पृशन्नेव वित्तानि यः परेभ्यः प्रयच्छति॥
सुभाषित

कृपणासमान दाता झाला नाही आणि होणार नाही, जो आपल्या संपत्तीला हातहि न लावता दुसर्‍यांना देऊन टाकतो.)

वेङ्कटाद्रिसमं स्थानं ब्रह्माण्डे नास्ति किञ्चन।
वेङ्कटेशसमो देवो न भूतो न भविष्यति॥
वेङ्कटेशस्तोत्र

(वेंकटपर्वतासारखे स्थान विश्वामध्ये नाही. वेंकटेशासारखा देव झाला नाही आणि होणार नाही.)

१०) शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।

अपि क्रियार्थं सुलभं समित्कुशं जलान्यपि स्नानविधिक्षमाणि ते।
अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्॥
कुमारसंभव ५.३३

(तुला विधींसाठी समिधा आणि कुशदर्भ सहजतेने मिळतात ना? स्नानास योग्य पाणी आहे ना? तप करायला तू आपल्या शक्तीने बसली आहेस ना? खरोखर, धर्मसाधनेसाठी पहिली गोष्ट म्हणजे शरीर. - कपटवेषधारी शंकर त्याच्या प्राप्तीसाठी तपश्चरणाला बसलेल्या पार्वतीला हे तिची परीक्षा घेण्यासाठी हे प्रश्न विचारतो.)

११) अद्वातद्वा - यद्वा तद्वा।

यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मिश्रितम्।
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति॥
सुभाषित

(कॊठल्यातरी झाडाचे मूळ कशाततरी मिसळून कोणालातरी द्यावे. परिणाम कोणताहि होईल!)

१२) बादरायणसम्बन्ध.

अस्माकं बदरीचक्रं युष्माकं बदरीतरुः।
बादरायणसम्बन्धात् यूयं यूयं वयं वयम॥
सुभाषित

(आमचे चाक बदरीच्या म्हणजे बोरीच्या लाकडाचे आहे आणि ती बोरी तुमची आहे. असे तुमचे आणि आमचे बादरायण नाते आहे.
बादरायण संबंध ही तत्त्वज्ञानातील पारिभाषिक संज्ञा आहे.)

१३) अजागळ.

धर्मार्थकाममोक्षाणां यस्यैकोऽपि न विद्यते।
अजागलस्तनस्येव तस्य जन्म निरर्थकम्॥
चाणक्यनीति

(ज्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्यापैकी काहीहि मिळालेले नाही त्याचा जन्म बोकडाच्या गळ्याखाली लोंबणार्‍या स्तनांसारखा निरर्थक आहे.)

१४) वा न वा। (वानवा)

शतेषु जायते शूर: सहस्रेषु च पण्डित:।
वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा॥
सुभाषित

(शंभरामधे एकजण शूर निपजतो, सहस्रांमध्ये एक पण्डित, दशसहस्रामध्ये एक वक्ता. देणारा दाता मात्र होतो किंवा होत नाही.)

१५) लाङ्गूलचालन.

लाङ्गूलचालनमधश्चरणावपातं
भूमौ निपत्य वदनोदरदर्शनं च।
श्वा पिण्डदस्य कुरुते गजपुङ्गवस्तु
धीरं विलोकयति चाटुशतैश्च भुङ्क्ते॥
भर्तृहरि नीतिशतक

(शेपूट हालविणे, पायांवर लोळण घेणे, भूमीवर पडून तोंड आणि पोट दाखविणे - खायला देणार्‍यापुढे कुत्रा हे सर्व करतो. गजेन्द्र मात्र त्याच्याकडे शांतपणे पाहतो आणि शंभर आर्जवे केली म्हणजेच खातो.)

१६) यथा राजा तथा प्रजाः।

राज्ञि धर्मिणि धर्मिष्ठाः पापे पापाः समे समाः।
लोकास्तमनुवर्तन्ते यथा राजा तथा प्रजाः॥
भोजप्रबन्ध

(राजा धार्मिक तर प्रजा धार्मिक, राजा पापी तर प्रजा पापी, राजा मध्यम तर प्रजा मध्यम. प्रजा त्याच्यासारखी वागते. जसा राजा तशी त्याची प्रजा.)

१७) राजा कालस्य कारणम्।

कालो वा कारणं राज्ञः राजा वा कालकारणम्।
इति ते संशयो माऽभूत् राजा कालस्य कारणम्॥
महाभारत उद्योगपर्व

(काळामुळे राजा निर्माण होतो की राजा काळ बनवितो ह्याविषयी संशय बाळगू नकोस. राजाच काळ बनवितो.)

१८) नाटयं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम्।

देवानामिदमामनन्ति मुनयः कान्तं क्रतुं चाक्षुषम्।
रुद्रेणेदमुमाकृतव्यतिकरे स्वाङ्गे विभक्तं द्विधा।
त्रैगुण्योद्भवमत्र लोकचरितं नानारसं दृश्यते।
नाटयं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम्॥
कालिदास मालविकाग्निमित्र

(ऋषि ह्याला देवांचा नेत्रग्राह्य यज्ञ मानतात. अर्धनारीनटेश्वर शंकराने जणू हा आपल्या शरीराचा केलेला अर्धा भाग आहे. सत्त्व, रज आणि तम ह्या त्रिगुणांतून निर्माण झालेली नाना रसांनी पूर्ण अशी जगरहाटी येथे दिसते. वेगळ्या वेगळ्या आवडीनिवडीच्या लोकांना मनोरंजन देणारी नाटय ही एकच गोष्ट आहे.)

१९) खटाटोप - फटाटोप.

निर्विषेणापि सर्पेण कर्तव्या महती फटा।
विषमस्तु न चाप्यस्तु फटाटोपो भयङ्करः॥
पंचतंत्र १-२२५

(खटाटोप ह्या शब्दाचा हा उगम आहे: बिनविषारी सापानेही मोठी फणा काढावी. विष असो वा नसो - फटाटोप भीतिकारकच असतो.)

२०) योजकस्तत्र दुर्लभः।

अमन्त्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्।
अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः॥
सुभाषित

(ज्यात मन्त्रशक्ति नाही असे एकहि अक्षर नाही. ज्याला औषधी गुण नाही असे मूळ नाही. पूर्णतः निरुपयोगी असा माणूस नाही. ह्यांना कामाला लावणारा दुर्मिळ असतो.)

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग २.

१) हातचा मळ.

माझ्या समजुतीनुसार सहजप्राप्य, totally under control, अशा अर्थाचा जो ’करतलामलकवत्’ (करतल+आमलक+वत्) हा शब्दसमूह आहे त्याचे हे अपभ्रंशरूप आहे. ’करतलामलकवत्’ म्हण्जे हाताच्या तळव्यावरील आवळ्याइतके कह्यात असलेले. विद्यारण्यस्वामीकृत ’ब्रह्मविद्-आशीर्वाद’ येथे ’असंभावनाविपरीतभावनारहितत्वेन करतलामलकवत् अहं ब्रह्मास्मीति अप्रतिबद्धापरोक्षब्रह्मसाक्षात्कारो दृढीभूयात्’ (संक्षिप्त भाषान्तर ’ब्रह्मसाक्षात्कार हा करतलामलकवत् अडसर नसलेला आणि प्रत्यक्ष असावा’) असा ह्या संस्कृत शब्दसमूहाचा वापर आढळला. मूळ शब्दाची जाणीव विसरल्यामुळे करतलातून हात आणि आमलकातून मळ असे बदल करून ’हातचा मळ’ हा त्याच अर्थाचा मराठी शब्दसमूह निर्माण झाला असावा.

२) जितं मया.

महाभारताच्या सभापर्वात युधिष्ठिराकडून द्यूतामध्ये एकेक गोष्ट जिंकल्यावर प्रत्येक वेळी शकुनि उन्मादाने ’जितं’ असे ओरडतो. त्यावरून विजयाच्या स्वैर उन्मादाचे वर्णन म्हणून ’जितं मया’ ह्या शब्दसमूहाचा वापर होतो असे वाटते.

३) बाष्कळ.

ऋग्वेदसंहितेच्या शाकलशाखेसारखेच ऋग्वेदसंहितेचे अन्य एक रूप अशी बाष्कलशाखा आहे. बाष्कलशाखेमध्ये सूक्तांची संख्या थोडी कमी आहे आणि त्यांचा क्रमहि काहीसा वेगळा आहे. शाकलशाखेचे वैदिक बाष्कलशाखेला हीन आणि अग्राह्य मानतात. ह्यावरून बाष्कळपणा. बाष्कळ बडबड असा बाष्कळ ह्या शब्दाचा हीनत्वदर्शक वापर सुरू झाला. जुन्या मराठीतील ह्या शब्दाच्या अशा अर्थाच्या वापराचे उदाहरण म्हणून तुळपुळे-फेल्डहाउस कोशामध्ये ’पुराणे सकळिक बाष्कळिक’ असा ज्ञानेश्वर अभंगातील उतारा दिला आहे.

४) सव्यापसव्य.

श्रावणीच्या आणि श्राद्धाच्या वेळी अनेक वेळा जानवे डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर आणि पुनः उलटे असे करावे लागते. ’सव्य’ म्हणजे डावा आणि ’अपसव्य’ म्हणजे उजवा. (’सव्यसाची’ म्हणजे डाव्या हातानेहि प्रत्यंचा ओढून बाण मारू शकणारा ambidextrous धनुर्धारी.) ह्यावरून ’सव्यापसव्य’ ’निष्कारण वेळखाऊ उद्योग’ असा शब्द प्रसारात आला. (असाच 'hocus pocus' निरर्थक मंत्रतंत्र अशा अर्थाचा इंग्रजी वाक्प्रचार कॅथलिक यूखरिस्टमधील ’hoc est corpus meum’ ’हे माझे (ख्रिस्ताचे) शरीर’ ह्यावरून निर्माण झाला.)

५) पंचपंच उषःकाली.

(पंचपंच उषःकाली रविचक्र निघो आले - ’घनश्याम सुंदरा’ भूपाळी). भारतीय ज्योतिषानुसार एक दिवस म्हणजे ६० घटिका आणि दोन घटिकांचा एक मुहूर्त. घटिका आजच्या सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत मोजतात. दिवसाच्या तीस मुहूर्तांना स्वतंत्र नावे आहेत आणि काही मुहूर्त शुभ आणि काही अशुभ अशीहि विभागणी आहे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे २९वा मुहूर्त आणि हा सर्वोत्तम मानला आहे. हा मुहूर्त ५७व्या घटिकेपासून सुरू होतो. त्यामध्ये काही ईश्वरप्रार्थनेसारखे काही पुण्यकार्य करावयाचे असल्यास ५६व्या घटिकेमध्ये किंवा ५५ घटिका झाल्यानंतर झोपेतून उठावयास हवे. ५५ म्हणजे ’पञ्चपञ्चाशत’. ह्यातील ’शत’ हा तुकडा गळून पडून ’पंचपंच’ एव्हढेच उरले असा माझा तर्क आहे.

६) छप्पन्न.

’तुझ्यासारखे छप्पन्न शहाणे पाहिलेले आहेत’ हे वितंडवादातले नेहमीचे वाक्य आहे. ’षट्प्रज्ञ’ म्हणजे ’सहा शास्त्रे जाणणारा विद्वान’. त्याचेच साध्या मराठीत रूपान्तर ’छप्पन्न’!

७) षट्कर्णी होणे. (सगळीकडे पसरणे.)

षट्कर्णो भिद्यते मन्त्रः चतुष्कर्णः स्थिरो भवेत्।
द्विकर्णस्य च मन्त्रस्य ब्रह्माप्यन्तं न गच्छति॥
काश्मीरी कवि वल्लभदेवाने केलेला संग्रह ’सुभाषितावलि’.

सहा कानांमध्ये गुप्त गोष्ट फुटते, चार कानात ती गुप्त राहते, आणि दोन कानातच असली तर ब्रह्मदेवहि ती शोधू शकत नाही.

षट्कर्णो भिद्यते मन्त्रश्चतुष्कर्णः स्थिरो भवेत्।
तस्मात् सर्वप्रयत्नेन षट्कर्णं वर्जयेत्सुधीः॥
पंचतंत्र १.१०८

सहा कानांमध्ये गुप्त गोष्ट फुटते, चार कानात ती गुप्त राहते. म्हणून शहाण्या माणसाने सर्व प्रयत्न करून गोष्ट सहा कानांपर्यंत पोहोचणार नाही असे पहावे.

८) वचने किं दरिद्रता.

हस्तादपि न दातव्यं गृहादपि न दीयते ।
परोपकारणार्थाय वचने किं दरिद्रता ॥
शार्ङ्गधरपद्धति.

परोपकार करतांना याचकाला हातानेहि काही द्यायचे नाही आहे आणि घरातूनहि काही द्यायचे नाही आहे. अशा स्थितीत तोंडापुरते बोलण्यामध्ये दारिद्र्य दाखविण्याची काय आवश्यकता?

९) महाजनो येन गत: स पन्थाः.

श्रुतिर्विभिन्ना स्मृतयश्च भिन्ना नैको मुनिर्यस्य वच: प्रमाणम्।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गत: स पन्थाः॥
सुभाषित

श्रुति वेगळेवेगळे सांगत आहेत, स्मृतीहि वेगळेवेगळे सांगत आहेत. असा एकहि मुनि नाही की ज्याची शिकवण सर्वमान्य आहे. धर्माचे गूढ गुहेत लपल्यासारखे आहे. अशा स्थितीत आदरणीय व्यक्ति ज्या मार्गाने गेल्या तो मार्ग चोखाळावा.

१०) युद्धस्य कथा रम्याः.

दूरतः पर्वता रम्या वेश्याश्च मुखमण्डने।
युद्धस्य च कथा रम्यास्त्रीणि रम्यानि दूरतः॥
सुभाषित.

दुरून डोंगर साजरे, मुखप्रसाधनानंतर वेश्या चांगल्या दिसतात, युद्धाच्या गोष्टी मनोरंजक असतात. ह्या तीनहि गोष्टी दुरून चांगल्या वाटतात.

११) समानशीलव्यसनेषु सख्यम्.

मृगा मृगैः सङ्गमनुव्रजन्तिगावश्च गोभिस्तुरगास्तुरङ्गैः।
मूर्खाश्च मूर्खै: सुधियः सुधीभिः समानशीलव्यसनेषु सख्यम्॥
पंचतंत्र लब्धप्रणाश.

हरिण हरणांसह, गाई गाईंसह, घोडे घोडयांसह. मूर्ख मूर्खांसह आणि शहाणे शहाण्य़ांसह असतात. ज्यांच्यात स्वभाव आणि सवयी जुळतात त्याच्यात मैत्री होते.

१२) मौनं सर्वार्थसाधनम्.

आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः।
बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम्॥
पंचतंत्र लब्धप्रणाश.

आपल्या तोंडाळपणामुळे पोपट आणि सारिका पिंजर्‍यात पडतात. (न बोलणारे) बगळे मोकळे राहतात. मौनामुळे सर्व घडून येते.

१३) अव्यापारेषु व्यापार.

अव्यापारेषु व्यापारं यो नरः कर्तुमिच्छति।
स एव निधनं याति कीलोत्पाटीव वानरः॥
पंचतंत्र मित्रभेद.

संबंध नसलेल्या बाबीत जो मनुष्य लुडबुड करतो तो पाचर उपसून काढणार्‍या माकडाप्रमाणे मृत्युमुखी पडतो. (लाकूडतोडया दूर गेला आहे असे पाहून एक अतिचौकस माकड झाडावरून उतरून लाकडावर बसून पाचर उपसून काढण्याचा प्रयत्न करतो. पाचर निघाल्यामुळे लाकूड पुनः सांधले जाऊन माकडाचे वृषण त्यात सापडून तो मरतो.)

१४) मनःपूतं समाचरेत्.

दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेज्जलम्।
सत्यपूतं वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत्॥
मनुस्मृति ६-४६.

डोळ्यांनी पाहून पाय टाकावा, वस्त्राने गाळून पाणी प्यावे, सत्याची कसोटी लावून बोलावे आणि मनाला (विवेकाला) पटेल तेच करावे.

१५) जीवो जीवस्य जीवनम्.

अहस्तानि सहस्तानामपदानि चतुष्पदाम्।
फल्गूनि तत्र महतां जीवो जीवस्य जीवनम्॥
भागवत १.१३.४६

हात असलेले हात नसलेल्यांवर, चार पायाचे पाय नसलेल्यांवर आणि मोठे लहानांवर पारध करतात. एक जीव दुसर्‍याचे जगण्याचे साधन असतो.

१५) कामातुराणां न भयं न लज्जा.

अर्थातुराणां न गुरुर्न बन्धुः कामातुराणां न भयं न लज्जा।
विद्यातुराणां न सुखं न निद्रा क्षुधातुराणां न रुचिर्न वेला॥
विक्रमचरित(?) हस्तलिखित.

पैशासाठी लोभी असलेल्यांना कोणी मोठा नसतो आणि कोणी नातेवाईक नसतो. कामेच्छेच्या अधीन झालेल्यांना भीति नसते आणि लाजहि नसते. विद्याप्राप्तीसाठी झटणारे सुख आणि निद्रेची पर्वा करीत नाहीत. भुकेलेल्यांना चव नसते आणि मर्यादाहि नसते.

१७) छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति.

एकस्य दुःखस्य न यावदन्तं गच्छाम्यहं पारमिवार्णवस्य।
तावद्द्वितीयं समुपस्थितं मे छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति॥
हितोपदेश १९३.

समुद्र पार केल्यासारखा मी एका दुःखातून बाहेर पडतो तोंच दुसरे माझ्यापुढे उभे राहते. एकदा छिद्र निर्माण झाले की त्यातून संकटे गुणित होऊ लागतात.

१८) सन्तोष एव पुरुषस्य परं निधानम्.

सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते।
शुष्कैस्तृणैर्वनगजा बलिनो भवन्ति।
कन्दैः फलैर्मुनिवरा गमयन्ति कालम्।
सन्तोष एव पुरुषस्य परं निधानम्
पंचतंत्र मित्रसम्प्राप्ति १५९.

साप वारा पिऊन जगतात पण ते दुर्बल नसतात. सुके गवत खाऊन अरण्यातले हत्ती बलवान् होतात. ऋषिमुनि कन्दफळांवर दिवस काढतात. आनंदी वृत्ति हाच माणसाचा सर्वोत्कृष्ट ठेवा आहे.

१९) अरसिकेषु कवित्वनिवेदनम्.

इतरतापशतानि यदृच्छया वितर तानि सहे चतुरानन।
अरसिकेषु कवित्वनिवेदनं शिरसि मा लिख मा लिख मा लिख॥
सुभाषित.

हे ब्रह्मदेवा, अन्य शंभर त्रास माझ्या मागे लाव, मी ते सहन करीन. पण अरसिकापुढे काव्यवाचन एव्हढे मात्र माझ्या कपाळावर लिहू नकोस.

२०) बालादपि सुभाषितम्.

विषादप्यमृतं ग्राह्यममेध्यादपि काञ्चनम्।
अमित्रादपि सद्वृत्तं बालादपि सुभाषितम॥

विषामधून अमृत घ्यावे, अपवित्र गोष्टींमधून सोने घ्यावे, शत्रूपासून चांगली वर्तणूक घ्यावी आणि लहानापासून योग्य बोललेले घ्यावे.

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ३.

(भाग १ आणि भाग २ अनुक्रमे येथे आणि येथे उपलब्ध आहेत.)

१) नाकी नऊ येणे.

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्॥
भगवद्गीता ५.१३

इंद्रिये आणि विकारांवर ताबा मिळविलेला आत्मा काही कार्य न करता अथवा करविता नऊ द्वारांच्या नगरामध्ये (नऊ रन्ध्रे असलेल्या शरीरामध्ये) आनंदाने राहतो.

शरीराची नऊ रन्ध्रे म्हणजे दोन कान, दोन डोळे, दोन नासिका, मुख, गुदद्वार आणि मूत्रद्वार. भारतीय कल्पनेनुसार प्रत्येक रन्ध्राशी एक प्राण संबद्ध आहे आणि सर्वसामान्य व्यक्तीच्या मृत्युक्षणी अन्य सर्व रन्ध्रे बंद होऊन सर्व प्राण नाकातून बाहेर जातात. ’नाकी नऊ येणे’ म्हणजे मृत्युसमयासारखा अत्यवस्थाप्रसंग निर्माण होणे. हिंदीमधील ’नाकमे दम आना’ ह्या म्हणीमध्ये हा अर्थ आणखी स्पष्ट दिसतो.

२. अकटोविकट.

(’विकटोपशास्त्री’ ह्याचा उगम काय असा प्रश्न ’ऐसीअक्षरे’ येथे ह्या जागी विचारण्यात आला आहे. त्यावरून सुचलेले विचार येथे मांडत आहे.)

विकट म्हणजे भयानक, कुरूप इत्यादि. त्यावरूनच गणपतीचे एक नाव ’विकट’ असे आहे (’बिकट वाट वहिवाट नसावी’ हा फटका, विकटकवि हा palindrome, तेनालि रामाला मिळालेली ’विकटकवि’ ही पदवी, विकटनितंबा ही संस्कृतमधे लिहिणारी कवयित्री ह्या सर्वांची येथे आठवण येते.) ’अकटविकट’ किंवा ’अकटोविकट’ हे त्यामधून द्वित्त्वाने सिद्ध झालेले रूप. तोच अर्थ अधिक जोराने सांगण्यासाठी अकारयुक्त द्वित्त्व असलेला नवा शब्द निर्माण करणे ही एक मराठी - आणि हिंदीचीहि - प्रवृत्ति दिसते. तिची अन्य उदाहरणे म्हणजे अक्राळविक्राळ, अल्याडपल्याड, ऐलपैल, आरपार, आसपास, अडोसपडोस, ऐरागैरा, अघळपघळ, अचकटविचकट, अलाबला, अरगशागरगशा, आटपाट, अबरचबर, अरबटचरबट असे शब्द. (अकटचिकट म्हणजे फार बारकाव्यात जाणार, न सोडणारा असाहि शब्द मोल्सवर्थमध्ये दिला आहे पण तो सध्याच्या वापरात आहे असे दिसत नाही.)

३) सूर्यापोटी शनैश्वर.

शनि ग्रहाला संपूर्ण तारामण्डलातून एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास सुमारे ३० वर्षे लागतात आणि भारतीय ज्योतिषाला माहीत असलेल्या ग्रहांमध्ये त्याची चाल सर्वात मंद आहे. ह्यावरून त्याला शनैश्चर (शनैः चरति - सावकाश चालतो) असे एक अभिधान आहे. त्याचा अपभ्रंश शनैश्वर.

४) डुड्ढाचार्य.

कन्नडमध्ये ’दोड्ड’ म्हणजे ’मोठा’ असा अर्थ आहे असे वाटते. दोड्ड+आचार्य ह्यावरून स्वत:ला शहाणा समजणार्‍या माणसाला डुड्ढाचार्य असे नाव पडले.

५) दुःखं न्यासस्य रक्षणम्.

सुखमर्थो भवेद्दातुं सुखं प्राणाः सुखं यशः।
सुखमन्यद्भवेत्सर्वं दुःखं न्यासस्य रक्षणम्॥

स्वप्नवासवदत्त १.१०

६) नीरक्षीरविवेक.

हंसः श्वेतो बकः श्वेतः को भेदो बकहंसयोः।
नीरक्षीरविवेके तु हंसो हंसो बको बकः॥

हंस शुभ्र दिसतो आणि बगळाहि. हंस आणि बगळा ह्यांमध्ये काय फरक? दूध आणि पाणी वेगवेगळे करण्यावरून हंस हा हंस ठरतो आणि बगळा तो बगळा राहतो.

७) अहो रूपमहो ध्वनिः.

उष्ट्राणां लग्नवेलायां गर्दभा मन्त्रपाठकाः।
परस्परं प्रशसन्ति अहो रूपमहो ध्वनिः॥
सुभाषित.

उंटांच्या विवाहात मन्त्र म्हणायला गाढवे होती. एकमेकांची ते प्रशंसा करीत होते - काय सुंदर रूप आणि काय मधुर आवाज!

८) यथा काष्ठं च काष्ठं च.

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ।
समेत्य च व्यपेयातां तथा भूतसमागमः॥
महाभारत शान्तिपर्व १६८.१५

(नियतीमुळे) समुद्रामध्ये दोन ओंडके एकत्र भेटतात आणि भेटल्यावर दूर होतात. मनुष्यांचे मीलनहि असेच होते.

९) स्वयमपि लिखितं स्वयं न वाचयति.

चतुरः सखि मे भर्ता यलिखितं तत्परो न वाचयति।
न वाचयति परलिखितं स्वयमपि लिखितं स्वयं न वाचयति॥

(तीन नवोढा आपापल्या नवर्‍यांचे गुणगान करीत आहेत.) ’सखे, माझा नवरा इतका हुशार आहे की त्याने लिहिलेले दुसरा कोणी वाचू शकत नाहीत.’ दुसरी म्हणते, ’माझा नवरा इतका हुशार आहे की दुसर्‍याने लिखिलेले वाचायची त्याला आवश्यकता नाही.’ तिसरी म्हणते, ’माझा नवरा तर इतका हुशार आहे की त्याने स्वतः लिहिलेले तो स्वतःच वाचू शकत नाही!’

१०) सेवाधर्मः परमगहनो योगिनामप्यगम्यः.

मौनान्मूकः प्रवचनपटुर्वातुलो जल्पको वा
धृष्टः पार्श्वे भवति च वसन् दूरतश्चाप्रगल्भः।
क्षान्त्या भीरुर्यदि न सहते प्रायशो नाभिजातः
सेवाधर्मः परमगहनो योगिनामप्यगम्यः॥
भर्तृहरि नीतिशतक.

(सेवक) मितभाषी असला तर मुका ठरतो, बोलका असला तर वेडा किंवा बडबडया ठरतो, सहनशील असला तर भित्रा आणि सहन न करणारा असला तर बहुतांशी नीच पातळीचा ठरतो. सेवकाचा धर्म कळायला अवघड आणि ज्ञात्यांच्याहि समजुतीपलीकडचा आहे.

११) अति सर्वत्र वर्जयेत्. अति तेथे माती.

अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात्सुयोधनः
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्॥
शार्ङ्गधरपद्धति

अतिदानामुळे बळिराजा बांधला गेला. अति गर्वामुळे सुयोधन पराभूत झाला. अति मोहामुळे रावणाचा नाश झाला. म्हणून कोठल्याहि गोष्टीचा अतिरेक करू नये.

१२) अतिपरिचयादवज्ञा.

अतिपरिचयादवज्ञा सन्ततगमनादनादरो भवति।
मलये भिल्लपुरन्ध्री चन्दनतरुकाष्ठमिन्धनं कुरुते॥
(लोकः प्रयागवासी कूपे स्नानं समाचरति॥)
शार्ङ्गधरपद्धति.

अति घसटीतून अवज्ञा होते आणि सारखे गेल्याने आदरभाव नष्ट होतो. उदा. मलयपर्वतावर राहणारी भिल्ल स्त्री चंदनाच्या लाकडाचे जळण करते. (संगमाच्या क्षेत्री राहणारे लोक विहिरीवर स्नान करतात.)

१३) यावज्जीवं सुखं जीवेत्.

यावज्जीवेत्सुखं जीवेदृणं कृत्वा घृतं पिबेत्।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः॥
सर्वदर्शनसंग्रह चार्वाकदर्शन

आयुष्य आहे तोंवर सुखाने जगावे, कर्ज काढून तूप प्यावे. देह भस्मसात् झाल्यावर तो परत कोठून येईल?

(हा श्लोक सर्वदर्शनसंग्रहातच असाहि दर्शविला आहे:

यावज्जीवेत्सुखं जीवेन्नास्ति मृत्योरगोचरः।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः॥

आयुष्य आहे तोंवर सुखाने जगावे, मृत्यु ज्याला शोधणार नाही असा कोणीहि नाही. देह भस्मसात् झाल्यावर तो परत कोठून येईल?

सर्वदर्शनसंग्रहात चर्चेच्या प्रारंभी हा श्लोक असा देऊन अखेरीस चार्वाकदर्शनाचा सारांश दाखवितांना प्रथम दाखविलेल्या रूपान्तरात तो दिला आहे. ग्रंथकर्ते विद्यारण्यस्वामी हे अस्तिक परंपराभिमानी असल्याने त्यांनी हा बदल केल्याचे दिसते आणि जनमानसाची पकड ह्या रूपान्तरानेच घेतली आहे.)

१४) खल्वाटो निर्धनः क्वचित्.

क्वचित्काणो भवेत्साधुः क्वचिद्गानी पतिव्रता।
दन्तहीनो क्वचिन्मूर्खः खल्वाटो निर्धनः क्वचित्॥
सुभाषित.

काणा माणूस क्वचितच सज्जन असतो, गाणेबजावणे करणारी स्त्री क्वचितच पतिव्रता असते, तोंडाचे बोळके झालेला माणूस क्वचितच मूर्ख असतो आणि टक्कलवाला क्वचितच निर्धन असतो.

१५) कालाय तस्मै नमः.

सा रम्या नगरी महान्स नृपतिः सामन्तचक्रं च तत्।
पार्श्वे सा च विदग्धराजपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः।
सर्वं यस्य वशादयात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः॥
भर्तृहरि नीतिशतक.

ती रमणीय नगरी, तो महान् राजा, ते मन्त्रिमंडळ, पार्श्वभूमीवर ती विद्वानांची सभा, त्या चन्द्रमुखी युवती, तो उच्छृंखल राजपुत्रांचा घोळका, ते भाटचारण, त्या गोष्टी....हे सगळे ज्याच्यामुळे स्मृतिशेष झाले त्या काळाला नमस्कार असो.

१६) दुःखं न्यासस्य रक्षणम्.

सुखमर्थो भवेद्दातुं सुखं प्राणाः सुखं यशः।
सुखमन्यद्भवेत्सर्वं दुःखं न्यासस्य रक्षणम्॥
स्वप्नवासवदत्त १.१०

धनाचे, प्राणांचे आणि यशाचे दान करणे सोपे आहे. बाकी सर्व सोपे आहे. (विश्वासाने सोपविलेल्या) ठेव्याचे रक्षण करणे कष्टदायक आहे.

१७) न स्त्रीः स्वातन्त्र्यमर्हति.

पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
पुत्रो रक्षति वार्धक्ये न स्त्रीः स्वातन्त्र्यमर्हति॥
मनुस्मृति ९.३

कुमारवयात पिता, तरुणवयात पति आणि वार्धक्यात पुत्र स्त्रीला सांभाळतो. स्त्री स्वतन्त्र राहू शकत नाही.

१८) यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रियाः॥
मनुस्मृति ३.५६

जेथे स्त्रियांना आदर दिला जातो तेथे देवांचा निवास असतो. जेथे त्यांना आदर दिला जात नाही तेथील सर्व कार्ये निष्फल असतात.

१९) स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्यं देवो न जानाति कुतो मनुष्यः.

राष्ट्रस्य चित्तं कृपणस्य वित्तं मनोरथं दुर्जनमानुषाणाम्।
स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्यं देवो न जानाति कुतो मनुष्यः ॥
सुभाषित.

राष्ट्राचे मन, कृपणाचे धन, दुष्टांचे कल्पनाविलास, स्त्रीचे चारित्र्य आणि पुरुषाचे दैव हे देवालाहि माहीत नसतात तर मग माणसाचे काय?

२०) हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार.

रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्
भास्वानुदेष्यति हसिष्यति पङ्कजश्रीः।
इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार॥
अप्पय्यदीक्षितकृत कुवलयानन्द.

(दैवाचा कल्पनेत नसलेला हस्तक्षेप.) रात्र संपेल, सकाळ होईल, सूर्य उगवेल, कमळ फुलेल - कमळाच्या कोशात अडकलेला भुंगा असा विचार करीत असतांनाच अरेरे, हत्तीने कमळाची वेलच उपटली.

’नरो वा कुञ्जरो वा’ किंवा ’अश्वत्थामा हतो नरो वा कुञ्जरो वा’ ह्या आणि ’अधिकस्याधिकं फलम्' अशा दोन सुप्रसिद्ध वचनांचा मूलस्रोत अनेक प्रयत्न करूनहि मला मिळालेला नाही. कोणास माहीत असल्यास प्रतिसादामधून अवश्य कळवावे.

पहिल्या वचनामागची गोष्ट द्रोणपर्वामध्ये ७-८ श्लोकांमध्ये दिली आहे ती अशी. द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी कृष्ण असे सुचवितो की त्यांना निःशस्त्र केल्याशिवाय ते होणे अशक्य आहे. म्हणून अश्वत्थामा नावाचा एक हत्ती मारावा आणि द्रोणाचार्यांपर्यंत पर्यंत ही वार्ता पोहोचवावी. तदनुसार भीमाने हत्ती मारून तसे द्रोणाचार्यांना कळविले. तो आपला पुत्र अश्वत्थामा किंवा कसे ह्याची निश्चिति करण्यासाठी द्रोणाचार्यांनी सत्यवचनी युधिष्ठिराला ते विचारले. त्यावेळी त्याने अश्वत्थामा मारला गेला असे उच्च आवाजात सांगून ’हत्ती किंवा मनुष्य’ हे शब्द आपल्याशीच उच्चारले. आपला पुत्र मारला गेला असे वाटून द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली टाकले आणि हे पाहून धृष्टद्युम्नाने रथावर चढून त्यांचा वध केला.

महाभारतातील ह्याविषयीचा श्लोक असा आहे:

तमतथ्यभये मग्नो जये सक्तो युधिष्ठिर:।
अव्यक्तमब्रवीद्राजन् हतः कुञ्जर इत्युत॥ ७.१६५.१०६.

वेणीसंहार नाटकामध्ये ह्याच प्रसंगाचे वर्णन असे आहे (अंक ३):

अश्वत्थामा हत इति पृथासूनुना स्पष्टमुक्त्वा
स्वैरं शेषे गज इति किल व्याहृतं सत्यवाचा।
तच्छ्रुत्वासौ दयिततनयः प्रत्त्ययात्तस्य राज्ञः
शस्त्राण्याजौ नयनसलिलं चापि तुल्यं मुमोच॥

’नरो वा कुञ्जरो वा’ किंवा ’अश्वत्थामा हतो नरो वा कुञ्जरो वा’ हे शब्द महाभारतात वा अन्य कोठल्याच प्रसिद्ध रचनेत सापडत नाहीत आणि तरीहि सर्व भारतीय भाषांमध्ये हे वचन सरावाचे आहे. तर मग ते आले कोठून? पुनः ते गद्यात आहे, कोठल्याच वृत्तात बसत नाही. सर्व संस्कृत रचना जवळजवळ ९९% काव्यबद्ध असतात, हेहि गूढ आहेच.

ते वृत्तात बसविण्याचा एक प्रयत्न मला सापडला. ’अश्वत्थामा हतो ब्रह्मन् नरो वा कुञ्जरोऽथवा’ असा तो प्रयत्न आहे पण ही कोणाचीतरी नंतरची रचना दिसते कारण कारण सर्वप्रसिद्ध वाक्य ’नरो वा कुञ्जरो वा’ किंवा ’अश्वत्थामा हतो नरो वा कुञ्जरो वा’ असेच आहे.

अशीच दुसरी अडचण ’अधिकस्याधिकं फलम्’ ह्या वाक्याच्या स्रोताबाबतची. एका ठिकाणी मला हे वाक्य नारदस्मृतीत आहे असा उल्लेख मिळाला. पैतृक संपत्तीचे वाटप करतांना कुटुंबासाठी जॊ जास्ती झटतो त्याला अधिक वाटा मिळावा अशा अर्थाने ते वचन नारदस्मृतीमध्ये आहे असे म्हटले होते. मी सर्व नारदस्मृति चाळली. मजसमोरील आवृत्तीत मला हे वाक्य दिसले नाही.

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ४.

, , आणि येथे ह्यापूर्वीचे भाग पहावेत.

१) सत्यमेव जयते.
मुंडकोपनिषत् ३.१.६.

सत्यमेव जयते नानृतमं सत्येन पन्था विततो देवयानः।
येनाक्रमन्त्यृषयो ह्यात्मकामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्॥

सत्याचा विजय होतो, असत्याचा नाही. आत्मसुखी ऋषि अंतिम सत्याकडे जाण्यासाठी चोखाळतात तो देवमान्य मार्ग सत्यातून जातो.

२) चराति चरतो भगः.

आस्ते भग आसीनस्य ऊर्ध्वस्तिष्ठति तिष्ठतः।
शेते निपद्यमानस्य चराति चरतो भगः॥ चरैवेति चरैवेति...
ऐतरेय ब्राह्मण ७.१५.

बसलेल्याचे नशीब बसून असते, उभा राहिलेल्याचे उभे असते, झोपलेल्याचे झोपते आणि चालणार्‍याचे चालत राहते. म्हणून तू चालत रहा, चालत रहा...

३) बहुरत्ना वसुन्धरा.

पदे पदे च रत्नानि योजने रसकूपिका।
भाग्यहीना न पश्यन्ति बहुरत्ना वसुन्धरा॥
वृद्धचाणक्यशतकम्.

पावलोपावली रत्ने आणि प्रत्येक योजनावर भरलेली विहीर अशी ही पृथ्वी बहुरत्ना आहे पण भाग्यहीनांना ते दिसत नाही.

४) काकणभर सरस.

(’हातच्या कांकणाला आरसा कशाला’ ह्या म्हणीचा अर्थ लगेच उमगतो पण ’अमुक गोष्ट दुसरीहून काकणभर सरस आहे’ म्हणजे काय?) ’काकिणी’ हे प्राचीन भारतातील एका जुन्या नाण्याचे नाव आहे. १ निष्क = १६ द्रम्म = २५६ पण = १०२४ काकिणी = २०४८० वराटक असे कोष्टक भास्कराचार्याच्या लीलावतीमध्ये दिलेले आहे. अन्य ठिकाणी १ काकिणी = २० वराटक ह्याऐवजी १ काकिणी = २० कपर्द (कवडया) असाहि उल्लेख मिळतो. ह्यावरून दिसते की काकिणी हे एक फार छोटया मूल्याचे मान होते. ’काकणभर सरस’ म्हणजे अगदी थोडया फरकाने वरचढ. (कवडयादेखील बाजारात चालत असत ह्याचा पुरावा ’कवडीमोल’, ’कवडीचुंबक’ अशा शब्दांमध्ये टिकून आहे.)

५) प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत्.

लालयेत्पञ्च वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत्।
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत्॥
भागवतपुराण १०-११४.

५ वर्षे लाड करावे, नंतर दहा वर्षे धाकात ठेवावे. मात्र मुलगा सोळा वर्षाचा झाला की त्याला मित्रासारखे वागवावे. (ह्याच श्लोकाचा पहिला चरण नीतिसारामधे ’राजवत्पञ्चवर्षाणि दशवर्षाणि दासवत्’ असाहि सापडतो.)

६) दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्.

सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम्।
दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्॥
वेणीसंहार, अंक ३.

मी सूत असेन, सूतपुत्र असेन वा अन्य कोणी असेन. कुळामध्ये जन्म दैवाने मिळतो पण माझा पराक्रम मी मिळविलेला आहे.

७) मिष्टान्नमितरे जना:.

कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम्।
बान्धवा: कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरे जना:॥
नैषधचरित १०.१(?)

विवाहामध्ये कन्या रूपाची अपेक्षा करते, आई सुबत्तेची, वडील अभ्यासाची आणि नातेवाईक चांगल्या कुळाची अपेक्षा करतात, उरलेले सर्व सुग्रास भोजनाची अपेक्षा करतात.

८) स्त्रीरत्नं दुष्कुलादपि.

श्रद्दधान: शुभां विद्यामाददीतावरादपि।
अन्त्यादपि परं धर्मं स्त्रीरत्नं दुष्कुलादपि॥
मनु?

श्रद्धाळू व्यक्तीने धाकटयाकडूनहि विद्या उचलावी, अन्त्यजाकडूनहि धर्म आणि नीच कुटुंबामधूनहि स्त्रीरत्न उचलावे.

९) चारैः पश्यन्ति राजानः.

गावो गन्धेन पश्यन्ति वेदैः पश्यन्ति वै द्विजाः।
चारैः पश्यन्ति राजानः चक्षुर्भ्यामितरे जनाः॥
महाभारत उद्योगपर्व ३४.३२.

गाई गंधाने, विद्वान् ब्राह्मण वेदांमुळे आणि राजे हेरांमुळे जग जाणतात. उरलेले सर्व डोळ्यांनी जग पाहतात.

१०) बहुजनहिताय बहुजनसुखाय.
महापरिनिब्बान सुत्त ३८, जच्‍चन्धवग्गो इ. (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि आकाशवाणी ह्यांचे बोधवाक्य).

’evaj vutte ayasma anando bhagavantaj etad avoca: 'titthatu bhante bhagava kappaj titthatu sugato kappaj bahujana-hitaya bahujana-sukhaya lokanukampaya atthaya hitaya sukhaya deva-manussanan' ti 'alaj dani ananda ma tathagataj yaci akalo dani ananda tathagataj yacanayati' महापरिनिब्बान सुत्त ३८ येथून. (मला पालीचे ज्ञान नसल्याने रोमन अक्षरात जसे मिळाले तसे येथे दाखविले आहे.)

येथे तेच शब्द अन्य बौद्ध लिखाणात आणि देवनागरीत पहा. अर्थ अंदाजाने कळतो.

’एवम्पि खो आयस्मा आनन्दो भगवता ओळारिके निमित्ते कयिरमाने, ओळारिके ओभासे कयिरमाने, नासक्खि पटिविज्झितुं; न भगवन्तं याचि – ‘‘तिट्ठतु, भन्ते, भगवा कप्पं; तिट्ठतु सुगतो कप्पं बहुजनहिताय बहुजनसुखाय लोकानुकम्पाय अत्थाय हिताय सुखाय देवमनुस्सान’’न्ति, यथा तं मारेन परियुट्ठितचित्तो । दुतियम्पि खो…पे॰… ततियम्पि खो भगवा आयस्मन्तं आनन्दं आमन्तेसि।’ (जच्‍चन्धवग्गो आयुसङ्खारोस्सज्‍जनसुत्तं.)

अभिजात संस्कृत वाङ्मयात हा शब्दप्रयोग कोठेच आढळत नाही. बौद्ध धर्म भारतात मागे पडल्यानंतर अलीकडच्या स्वातन्त्र्योत्तर काळातच त्याचा पुन:प्रसार झालेला दिसतो. अभिजात संस्कृत वाङ्मय वाचणार्‍या-लिहिणार्‍यांच्या विचारविश्वात बहुजनहित आणि बहुजनसुख ह्याला महत्त्वाचे स्थान नव्हते ह्याचे हे द्योतक आहे असे मला वाटते. सामाजिक विचाराच्या दृष्टिकोणातून पाहिल्यास ही गोष्ट लक्षात येण्याजोगी आहे.

११) निर्वीरमुर्वीतलम्.

तत्तद्विक्रमदोहदेन विलसद्दोर्दण्डदम्भोलिना
विद्वेषिव्ययकर्मठेन दिशता निर्वीरमुर्वीतलम् ।
किं ब्रूमश्चतुरब्धिसीमभुवनं राजन्वदातन्वता
येनाभूर्विजिगीषुणा विदधिरे दिक्पालशेषा दिशः॥
उमापतिधर (श्रीधरदाससंकलित ’सदुक्तिकर्णामृत’ येथून).

निरनिराळ्या पराक्रमांनी शोभणार्‍या हस्तरूपी वज्राने शत्रुविनाशकार्यात कठोर असा तू जेव्हा उर्वीतल निर्वीर करतोस, पृथ्वी जिंकणारा तू जेव्हा सर्व दिशांमध्ये केवळ दिक्पाल शिल्लक ठेवतोस आणि चार सागरांपर्यंत तू जेव्हा आपली सीमा नेऊन पोहोचवतोस तेव्हा, आम्हाला सांग, आम्ही त्याचे वर्णन करावे तरी कसे?

आद्वीपात्परतोऽप्यमी नृपतयः सर्वे समभ्यागता:
कन्येयं कलधौतकोमलरुचि: कीर्तेश्च लाभास्पदम्।
नाकृष्टं न च टंकृतं न नमितं स्थानाच्च नोच्चालितम्।
केनापीदमहो महद्धनुरिदं निर्वीरमुर्वीतलम्।।
सीतास्वयंवर नावाची अज्ञात कृति.

जंबुद्वीप आणि त्याच्या पलीकडून सर्व राजे येथे आलेले आहेत. सुवर्णाप्रमाणे कांति असलेली आणि कीर्तीचे निवासस्थान अशी ही कन्या आहे. तथापि कोणीहि हे प्रचंड धनुष्य ओढण्यास, त्याच्या प्रत्यंचेचा टणत्कार करण्यास, त्याला वाकवण्यास अथवा त्याला उचलण्यास समर्थ दिसत नाही. उर्वीतल निर्वीर झाले आहे असे दिसते.

जालावर बराच शोध घेतल्यावर मला हे obscure म्हणता येतील असे दोन स्रोत मिळाले. ह्यापैकी कोठलाहि एक हा खरा मूलस्रोत आहे असे खात्रीने म्हणवत नाही.

१२) जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥
सुभाषित.

लक्ष्मणा, लंका स्वर्णमय असली तरी मला ती नको. माता आणि मातृभूमि स्वर्गाहूनहि श्रेष्ठ आहेत.

हा श्लोक रामायण युद्धकांडातील आहे अशी सार्वत्रिक समजूत असली तरी रामायणाच्या कोठल्याहि पाठात तो मिळत नाही. त्यामधील ’जन्मभूमि’ आणि तिचे ’पावित्र्य’ ह्या संकल्पना तर अगदी आधुनिक दिसतात. बंकिमचंद्रांच्या ’आनंदमठ’ ह्या कादंबरीत त्याचे मूळ आहे, पं. मदन मोहन मालवीयांच्या लिखाणात त्याचा उगम आहे ह्याहि समजुती टिकत नाहीत. गेल्या शंभरदीडशे वर्षात हा श्लोकार्ध निर्माण होऊन त्याने जनमानसाची पकड घेतली आहे, ती इतकी की आपल्या ’सत्यमेव जयते’सारखा हा श्लोकार्ध नेपाळच्या राष्ट्रीय चिह्नावरती लिहिण्यात आला आहे. ह्या सर्व बाबींची विस्तृत चर्चा येथे उपलब्ध आहे.

१३) मरणान्तानि वैराणि.

मरणान्तानि वैराणि निवृत्तं नः प्रयोजनम्।
क्रियतामस्य संस्कारो ममाप्येष यथा तव॥
रामायण युद्धकाण्ड १०९.२५.

(रावणवधानंतर राम बिभीषणास म्हणतो...) वैर मरणाबरोबरच संपते. आमचे कार्य आता झालेले आहे. ह्याचा अन्त्यसंस्कार कर. हा जसा तुझा आहे तसाच माझाहि आहे.

१४) अर्धचन्द्र.

चतुर्थः श्यामलको यावन्न याति तावद् अर्धचन्द्रप्रदानेन निष्कासित:।
पंचतन्त्र लब्धप्रणाश (महाधनेश्वरनाम भाण्डपति कथा).

महाधनेश्वर नावाच्या व्यापार्‍याकडे त्याचे चार जावई मुक्कामाला आले आणि ते परत जायचे नावच काढत नव्हते. अखेर त्यांपैकी पहिल्या तिघांना युक्तिप्रयुक्तीने रस्ता दाखविला. चौथा कशालाच बधेना म्हणून त्याला मानेमागे हाताचा अर्धचन्द्र लावून बाहेर काढले अशी कथा.

१५) चक्रम.

अतिलोभो न कर्तव्यो लोभं नैव परित्यजेत् ।
अतिलोभाभिभूतस्य चक्रं भ्रमति मस्तके॥
पंचतंत्र अपरीक्षितकारक २२.

(चार ब्राह्मण धनाच्या शोधासाठी निघाले. तिघे पुरेसे धन मिळाल्यावर थांबले. चौथ्याने अतिलोभामुळे आणि दुसर्‍यांचा हितकारक सल्ला न ऐकल्याने डोक्यावर फिरणारे चक्र मागे लावून घेतले.) अतिलोभ करू नये आणि लोभाचा पूर्ण त्यागहि करू नये. अतिलोभात फसलेल्याच्या डोक्यावर चक्र फिरू लागते.

१६) वसुधैव कुटुम्बकम्.

अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥
पंचतंत्र अपरीक्षितकारक ३८.

हा माझा किंवा परका असा विचार कोत्या मनाचे करतात. ज्यांचे वागणे औदार्यपूर्ण आहे त्यांना सर्व पृथ्वी आपल्या कुटुंबासारखी वाटते.

१७) अशिक्षितपाटव.

स्त्रीणामशिक्षितपटुत्वमानुषीषु संदृश्यते किमुत याः प्रतिबोधवत्यः।
प्रागन्तरिक्षगमनात्स्वमपत्यजातमन्यैर्द्विजै: परभृता: खलु पालयन्ति॥
शाकुन्तल ५.२२.

(शापामुळे विस्मृति झालेल्या दुष्यन्ताला ओळख पटविण्यासाठी शकुन्तला त्याने पूर्वी तिजपाशी ठेवलेली त्याची आंगठी दाखविते तेव्हा तो म्हणतो...)

स्त्रियांचे अशिक्षितपटुत्व मानवी नसलेल्या प्राण्यांमध्येहि दिसते, तर मग बुद्धि असलेल्या स्त्रियांविषयी काय बोलावे? आकाशात जाण्याअगोदर कोकिळा अन्य पक्ष्यांकडून आपली पिले वाढवतात.

१८) दीर्घसूत्री.

अनागतविधाता च प्रत्युत्पन्नमतिश्च यः।
द्वावेतौ सुखमेधेते दीर्घसूत्री विनश्यति॥
महाभारत शान्तिपर्व १३७.२०.

जे येणार आहे त्याची तयारी ठेवणारा आणि शीघ्र विचार करणारा अशा दोघांची भरभराट होते. दीर्घसूत्री नष्ट होतो.

१९) योगक्षेमं वहाम्यहम्.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥
भगवद्गीता ९-२२ (आयुर्विमा महामंडळाचे बोधवाक्य).

माझे चिंतन करीत अनन्यभावाने जे मला भजतात त्यांची काळजी मी बाळगतो.

२०) सत्यं शिवं सुन्दरम्.

१९७८ साली पडद्यावर आलेला ह्या नावाचा चित्रपट आणि ह्याच शब्दांवरचे त्यातील गीत आपल्या परिचयाचे आहे. मात्र हे प्रसिद्ध वचन कोठे प्रथम निर्माण झाले हा प्रश्न अनुत्तरित आहे. एक तर्क पुढीलप्रमाणे:

’भक्तामल’ नावाची कृति नभदास नावाच्या लेखकाने १५८३ ते १६३९ ह्या काळात केव्हातरी रचली. तिच्यावर ’भक्तिरसमोहिनी’ नावाची टीका प्रियदास नावाच्या टीकाकाराने १७१२ साली लिहिली. तिच्यामधे तुलसीदासाच्या ’रामचरितमानसा’विषयी पुढील गोष्ट सांगितलेली आहे. रामचरित मानस देशी भाषेत असल्यामुळे काशीस्थित पंडित तिच्याकडे उपेक्षेने पाहात होते. अखेर एका रात्री काशीविश्वनाथाच्या गाभार्‍यात रामचरितमानस आणि वेदांसारखे अन्य ग्रंथे ठेऊन देण्यात आले. सकाळी गाभारा उघडल्यावर असे दिसले की रामचरितमानस अन्य ग्रंथांच्या वर होते आणि त्यावर ’सत्यं शिवं सुन्दरम्’ असे शब्द उमटलेले होते.

हा ’चमत्कार’ आपण आज मान्य करणार नाही परंतु नभदासाच्या टीकेत चमत्काराचे वर्णन देतांना जर हे शब्द असले तर त्यांचे मूळ १७१२पर्यंत निश्चितच जाते, मग ते नभदासाचे स्वतःचे असोत वा त्याच्या आधीचे अन्य कोणाचेतरी असोत.

’प्रथमग्रासेन मक्षिकापातः’ ह्या प्रसिद्ध उक्तीचा - किंवा तिच्यासारख्या दुसर्‍या उक्तीचा स्रोत बरेच प्रयत्न करूनहि मला मिळाला नाही. तीच गोष्ट ’व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्’ ह्या दुसर्‍या उक्तीची. कोणास ठाऊक असल्यास प्रतिसादमार्गे अवश्य कळवावा.

भाग २ मध्ये ’षट्कर्णी होणे’ ह्यासाठी दाखविलेल्या दोन स्रोतांहून अधिक जुना वाटतो असा स्रोत म्हणजे चाणक्याच्या नावाने प्रसृत असलेली चाणक्यसूत्रे. ह्यांमध्ये क्र. ३४ वर ’षट्कर्णाद्भिद्यते मन्त्र:’ असा सूत्ररूपाने हाच विचार सांगितला आहे.

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ५.

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ५.

, , आणि येथे ह्यापूर्वीचे भाग पहावेत.

१) परोपदेशे पाण्डित्यम्.

परोपदेशे पाण्डित्यं सर्वेषां सुकरं नृणाम्।
धर्मे स्वीये त्वनुष्ठानं कस्यचित्तु महात्मनः॥
हितोपदेश १.१७.

दुसर्‍यांना उपदेश करण्याचे पांडित्य सर्वांना सहज येते. आपल्या धर्माचे पालन करणे हे मात्र एखाद्याच महात्म्याला जमते.

२) कळ काढणे.

अष्टादश निमेषास्तु काष्ठा त्रिंशत्तु ता: कला।
तास्तु त्रिंशत्क्षणस्ते तु मुहूर्तो द्वादशास्त्रियाम्॥
ते तु त्रिंशदहोरात्रः...
अमरकोष कालवर्ग ११-१२.

’कळ सोसणे’ म्हणजे वेदना सोसणे. ’कळ काढणे’ म्हणजे स्वल्पकाल वाट पाहणे. ’कला’ हे कालमापनाचे एक परिमाण (आधुनिक ८ सेकंदाइतके) अमरकोशामध्ये दाखविले आहे ते असे: अहोरात्र = (२४ तास) = ३० मुहूर्त = ३६० क्षण = १०,८०० कला = ३,२४,००० काष्ठा = ५८,७२,००० निमेष. अर्थात् १ क्षण = ४ मि. आणि १ कला = ८ से.

३) चर्वितचर्वण.

’चर्वितचर्वण’ (शब्दशः - चावलेले चघळणे) म्हणजे एकदा मांडलेला विचार पुनःपुनः मांडत राहणे. मोनिअर-विल्यम्स संस्कृत शब्दकोषानुसार पाणिनि ३.१.१५ आणि सिद्धान्तकौमुदी येथे हा शब्द भेटतो. माझा पाणिनीच्या व्याकरणाचा अभ्यास नाही. विद्वान् मित्राने कळविल्यानुसार ’सूत्र ३.१.१५ कर्मणः रोमन्थतपोभ्यां वर्तिचरोः’ ह्याचे स्पष्टीकरण ’रोमान्थतपोभ्यां कर्मभ्यां क्रमेण वर्तनायां चरणे चार्थे क्यङ् स्यात्। रोमन्थं वर्तयति रोमन्थायते॥ हनुचलन इति वक्तव्यम्॥ चर्वितस्याकृष्य पुनश्चर्वण इत्यर्थ:।’ असे आहे. रोमन्थ म्हणजे रवंथ ह्या शब्दाविषयी हे सूत्र आहे.

४) पिष्टपेषण.

पिष्टपेषण (शब्दश:- पीठ दळणे) म्हणजे एकदा बोललेले वा सांगितलेले पुन:पुन: घोळत राहणे. मोनिअर-विल्यम्स संस्कृत शब्दकोषानुसार हा शब्द आपस्तंब गृह्यसूत्रांमध्ये वापरण्यात आला आहे. तेथे मी पाहू शकलो नाही पण विद्वान् मित्राच्या सांगण्यानुसार आपस्तंब गृह्यसूत्रांवरील हरदत्त नामक टीकाकाराच्या ’पुंसुवनं व्यक्ते गर्भे तिष्येण॥ १४.९’ ह्या सूत्रावरील टीकेत हा शब्द पुढीलप्रमाणे दाखविला आहे:
"केचित्-तृतीयवच्चतुर्थेऽपि सीमन्तात्पूर्वं निमित्तस्य पूर्वत्वादिति ।
इदमपि सीमन्तवत्प्रथमगर्भ एव, न तु प्रतिगर्भम्; पिष्टपेषणन्यायादेव।"

५) अर्थो हो कन्या परकीय एव.

अर्थो हो कन्या परकीय एव
तामद्य सम्प्रेष्य परिग्रहीतुः।
जातो ममायं विशद: प्रकामं
प्रत्यर्पितन्यास इवान्तरात्मा॥
अभिज्ञानशाकुन्तल ४.२२.

कन्या हे परक्याचे धन असते. तिच्याशी विवाह करणार्‍याकडे तिला पाठविल्यावर ठेव परत करणार्‍याप्रमाणे माझे मन आता स्वच्छ आणि शांत झाले आहे.

६) शिवास्ते पन्थानः सन्तु.

’शुभास्ते पन्थानः सन्तु’ असेहि ह्या प्रसिद्ध वचनाचे एक रूपान्तर दिसते. शाकुन्तलाच्या चौथ्या अंकात पतिगृही जायला निघालेल्या शकुन्तलेला उद्देशून काश्यपमुनि हा आशीर्वाद देतात. ह्याचा अर्थ ’तुझा मार्ग शुभ असो’.

७) अजापुत्रं बलिं दद्यात्.

अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च।
अजापुत्रं बलिं दद्याद्देवो दुर्बलघातक:।।
सुभाषित.

घोडयाचा नाही, हत्तीचा नाही, वाघाचा तर नाहीच नाही. शेळीच्या पिलाचा बळी द्यावा. देवहि दुर्बलांच्या मुळावर उठतो.

(अशाच अर्थाचा अन्य एक प्रसिद्ध श्लोक:

वनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुतः।
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम्॥
पंचतंत्र काकोलूकीय ५७.

वारा हा वन जाळणार्‍या अग्नीचे साहाय्य करतो आणि तोच वारा दिवटी विझवतो. दुर्बळाची कोण मैत्री करतो?)

८) एरण्डोऽपि द्रुमायते.

यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि।
निरस्तपादपे देश एरंडोऽपि द्रुमायते॥
हितोपदेश १.६३

जेथे विद्वान व्यक्ति नाही तेथे कमी बुद्धीच्याचीहि चलती असते. ज्या देशातील वृक्ष नाहीसे झालेले आहेत तेथे एरंडालाहि वृक्ष ही पदवी मिळते

९) येन केन प्रकारेण.

घटं भिन्द्यात्पटं छिन्द्यात्कुर्याद्रासभरोहणम्।
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्॥
शार्ङ्गधरपद्धति १.१४६८.

घडा फोडावा, कपडे फाडावेत, गाढवावर स्वारी करावी. कोठल्यातरी मार्गाने माणसाने प्रसिद्धि मिळवावी.

१०) विद्वान्सर्वत्र पूज्यते.

विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन।
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान्सर्वत्र पूज्यते॥
वल्लभदेवकृत सुभाषितावलि.

विद्वत्ता आणि राजेपणा हे केव्हाहि बरोबरीचे नसतात. राजाला आपल्या देशात मान मिळतो. विद्वानाला सर्वत्र मान मिळतो.

११) भारवाही.

तुकारामाच्या 'फोडिले भांडार, धन्याचा तो माल, मी तो हमाल, भारवाही' ह्या अभंगामुळे ’भारवाही’ ह्या शब्दाला ’काही न समजता केवळ घोकंपट्टी करणारा’ असा कुचेष्टेखोर अर्थ मिळालेला आहे. त्याचे मूळ पुढील श्लोकात आहे:

यथा खरश्चन्दनभारवाही भारस्य नेता न तु चन्दनस्य।
एवं हि शास्त्राणि बहून्यधीत्य अर्थेषु मूढा: खरवद्वहन्ति॥
सुश्रुतसंहिता १.१९.

चंदनाचा बोजा वाहून नेणार्‍या गाढवाला केवळ बोजा जाणवतो. तो चंदनाचा आहे हे त्याला कळत नाही. त्याचप्रमाणे अर्थ न कळता शास्त्रे शिकणारे हे केवळ गाढवाप्रमाणे ती शास्त्रे वाहतात.

१२) कर्तुमकर्तुम्.

’असीमित सत्ता’ अशा अर्थाचा हा शब्दप्रयोग संस्कृत शास्त्रचर्चेमध्ये ’कर्तुमकर्तुमन्यथा कर्तुम् (’कर्तुं अकर्तुं अन्यथा कर्तुम’ म्हणजेच ’काही करणे, न करणे किंवा दुसरे काही करणे’) अशा स्वरूपात अनेक जागी भेटतो. अशी एक जागा म्हणजे शंकराचार्यांचे ब्रह्मसूत्रावरील भाष्य. त्यात एके ठिकाणी ते म्हणतात:
ध्यानं यद्यपि मानसं तथाऽपि पुरुषेण कर्तुमकर्तुमन्यथा वा कर्तुं शक्यं, पुरुषतन्त्रत्वात्, ज्ञानं तु प्रमाणजन्यम्। प्रमाणं च यथाभूतवस्तुविषयम्। अतो ज्ञानं कर्तुमकर्तुमन्यथा कर्तुमशक्यम्। (ब्रह्मसूत्र शांकरभाष्य अध्याय १ पा १ सू ४).

१३) सत्यं ब्रूयात्प्रियं ब्रूयात्.

सत्यं ब्रूयात्प्रियं ब्रूयान्न ब्रूयात्सत्यमप्रियम्।
प्रियं च नानृतं ब्रूयादेष धर्मः सनातनः॥
मनुस्मृति ४.१३८.

खरे बोलावे, गोड बोलावे, कटु सत्य बोलू नये, गोड असत्य बोलू नये. हा सनातन धर्म आहे.

१४) चर्पटपंजरी.

अनावश्यक चर्‍हाट अशा अर्थाचा हा शब्द. शंकराचार्यकृत ’मोहमुद्गर’ नावाची अनेक श्लोक असलेली प्रसिद्ध रचना आहे. तिला ’चर्पटपञ्जरिकास्तोत्र’ असेहि म्हणतात. त्यावरून हा शब्द प्रचारात आला. त्यातील एक प्रसिद्ध श्लोक:

भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते।
प्राप्ते सन्निहिते मरणे न हि न हि रक्षति डुकृञ् करणे॥

(भज रे हरिला भज रे हरिला भज रे मूढा श्रीहरिला।
कृतान्त संनिध उभा ठाकता गम् गच्छति नच रक्षि तुला॥
अच्युत बळवंत कोल्हटकर - अप्रकाशित)

१५) इतो भ्रष्टस्ततो भ्रष्टः.

इतो भ्रष्टस्ततो भ्रष्टः परमेकान्तिवेषभाक्।
न संसारसुखं तस्य नैव मुक्तिसुखं भवेत्।।
सुभाषित.

नावापुरता यतिवेष धारण करणारा हेहि गमावतो आणि तेहि गमावतो. त्याला संसारसुखहि मिळत नाही आणि मुक्तिसुखहि मिळत नाही.

१६) गतानुगतिक.

एकस्य कर्म संवीक्ष्य करोत्यन्योपि गर्हितम् ।
गतानुगतिको लोको न लोकः पारमार्थिकः ।।
पंचतंत्र मित्रभेद ३७३.

एकाचे वाईट कृत्य पाहून दुसराहि तेच करतो. मनुष्य गतानुगतिक असतो. परमार्थाचा विचार तो करीत नाही.

१७) त्राहि त्राहि करणे.

महाबले महोत्साहे महाभयविनाशिनि|
त्राहि मां देवि दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनि||
मार्कंडेय पुराण, देवीकवच १८.

संस्कृत स्तोत्रवाङ्मयामध्ये आराध्यदेवतेला उद्देशून ’त्राहि माम्’, ’त्राहि भगवन्/भगवति’ (ईश्वरा, माझे रक्षण कर) असे शब्द बरेच जागी भेटतात. त्याचेच एक उदाहरण वर दिले आहे. त्यावरून ’त्राहि त्राहि करणे’ म्हणजे मोठया संकटात अथवा बिकट अवस्थेत पडणे अशा अर्थाचा वाक्प्रचार निर्माण झाला.

१८) तारांबळ.

तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव।
विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि॥

(विवाहात मुहूर्ताची घटिका जवळ येऊ लागली की ती साधण्यासाठी भटजींची मंत्र म्हणण्याची घाई होते. तशा मंत्रांपैकी वरील मंत्रातील ’ताराबलं’वरून ’तारांबळ’ शब्द साधला आहे.) शुभसमय, शुभदिन, ताराबल, चंद्रबल, विद्याबल आणि दैवबल एकाच वेळी आहेत. हे लक्ष्मीपति, मी तुझ्या पदांचे स्मरण करतो.

१९) खटपट.

नलगे व्याकरणाची न्यायाची घटपटादि खटपट ती।
वैकुंठपेठ मोठी नावावरि हीनदीन खटपटती॥
मोरोपंत?

भारतीय तत्त्वाज्ञानातील षट्शास्त्रांच्या चर्चेत उदाहरणासाठी ’अयं घटः अयं पट:’ (हा घडा, हा कपडा) अशा प्रकारचे शब्दोपयोग वारंवार भेटतात. त्यातील ’घटपटादि’चे ’खटपट’ हे अपभ्रष्ट रूप.

२०) इतिकर्तव्यता.

एवं सर्वं विधायेदमितिकर्तव्यमात्मन:
युक्तश्चैवाप्रमत्तश्च परिरक्षेदिमाः प्रजाः॥
मनुस्मृति ७.१४२

(राजाची कर्तव्ये सांगून झाल्यावर मनु म्हणतो...) आपले असे इतिकर्तव्य पार पाडून कार्यप्रवण आणि प्रमादरहित राहून राजाने प्रजेचे रक्षण करावे.

भाग २ मध्ये ’छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति’ ह्या वचनाचा उगम पंचतंत्रात असल्याचे म्हटले होते. पण शूद्रकलिखित ’मृच्छकटिक’ नाटकात चारुदत्ताच्या तोंडी पुढील श्लोक आढळला. हा पंचतंत्राच्या पूर्वीचा आहे.

यथैव पुष्पं प्रथमे विकासे समेत्य पातुं मधुपाः पतन्ति ।
एवं मनुष्यस्य विपत्तिकाले छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति ।।
(मृच्छकटिकम् ९.२६)

फूल उमलत आहे असे पाहून भुंगे त्यावर तुटून पडतात. तसेच मनुष्याच्या संकटकाली एका अडचणीतून अनेक अडचणी निर्माण होतात.

’वरं जनहितं ध्येयम्’ (पुणे महानगरपालिकेचे बोधवाक्य) हे वचन आणि ’चंचुप्रवेश’ (चञ्चुप्रवेशे मुसलप्रवेश:) ह्यांचा उगम मला सापडलेला नाही.

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ६ आणि अखेरचा.

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ६ आणि अखेरचा.

, , , आणि येथे ह्यापूर्वीचे भाग पहावेत.

१) य: क्रियावान्स पण्डितः.

पठका: पाठकाश्चैव ये चान्ये शास्त्रचिन्तकाः।
सर्वे व्यसनिनो मूर्खा यः क्रियावान्स पण्डितः॥
महाभारत वनपर्व (यक्षप्रश्न) ३१४.११२

शिकणारे, शिकवणारे आणि शास्त्रांचे अन्य अभ्यासक जर वाईट सवयी बाळगत असले तर तेहि अज्ञ जनातच गणले पाहिजेत. तोच खरा पंडित जो शिकलेले आचरणात आणतो.

२) धर्मो रक्षति रक्षितः.

धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।
तस्माद्धर्मं न त्यजामि मा नो धर्मो हतोऽवधीत् ।।
महाभारत वनपर्व (यक्षप्रश्न) ३१४.१३१

विनाश केलेली सुव्यवस्था विनाश करणार्‍याचा नाश करते. संरक्षण केलेली सुव्यवस्था संरक्षणकर्त्याचे रक्षण करते. अतएव, मी सुव्यवस्था टाकत नाही, अशासाठी की असंरक्षित व्यवस्था आमचा विनाश न करो.

३) परदु:खं शीतलम्.

महदपि परदु:खं शीतलं सम्यगाहु:
प्रणयमगणयित्वा यन्ममापद्गतस्य।
अधरमिव मदान्धा पातुमेषा प्रवृत्ता
फलमभिनवपाकं राजजम्बूद्रुमस्य॥
विक्रमोर्वशीय ४.२७

दुसर्‍याचे दु:ख मोठे असले तरी शीतल असते असे म्हणतात ते योग्य आहे. ही मदान्ध (कोकिळा) संकटात पडलेल्या माझ्या मनधरणीला दाद न देता नव्याने पिकलेल्या जांभळीच्या फळाचा चुंबन घ्यावे तसा आस्वाद घेण्य़ात गुंतली आहे. (उर्वशीचा शोध घेणारा विक्रम कोकिळेला तो प्रश्न विचारतो आणि उत्तर न मिळाल्याने हे उद्गार काढतो.)

मॅनवेरिंगनिर्मित मराठी म्हणींच्या संग्रहात क्र. ५४८ येथे ’आपदुःख भारी आणि परदुःख शीतळ’ अशी म्हण दिली आहे.

४) गजस्तत्र न हन्यते.

शूरश्च कृतविद्यश्च दर्शनीयोऽसि पुत्रक।
यस्मिन्कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते॥
पंचतंत्र लब्धप्रणाश ४०.

एका सिंहिणीने कोल्ह्याच्या मुलाला वाढविले पण हत्तीची शिकार त्याच्या शक्तीपलीकडची आहे हे ती जाणते म्हणून त्याला ती सांगते...) ’बाळा, तू शूर आहेस, शिकलेला आहेस, दिसायलाहि चांगला आहेस. तरीपण ज्या कुळात तुझा जन्म झाला तेथे हत्तीची शिकार होत नाही.’

५) सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डितः.

सर्वनाशे समुत्पन्ने ह्यर्धं त्यजति पण्डितः।
अर्धेन कुरुते कार्यं सर्वनाशस्तु दुःसहः॥
पंचतंत्र अपरीक्षितकारक ४२.

सगळ्याचाच नाश होण्याऐवजी शहाणा माणूस अर्धे सोडून देतो आणि अर्ध्यावर भागवितो. सगळ्याचाच नाश होणे दु:खकारक असते.

६) निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु.

किं कूर्मस्य भरव्यथा न वपुषि क्ष्मां न क्षिपत्येष यत्
किं वा नास्ति परिश्रमो दिनपतेरास्ते न यन्निश्चलः |
किंत्वङ्गीकृतमुत्सृजन्कृपणवत् श्लाघ्यो जनो लज्जते
निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु सतामेतद्धि गोत्रव्रतम् ||
भर्तृहरि नीतिशतक ११७.

(स.प.महाविद्यालयाचे बोधवाक्य) कूर्म हा पाठीवरून पृथ्वीचे ओझं ढकलून देत नाही म्हणजे काय ते त्याला जड वाटत नसेल? सूर्य कधीच थांबत नाही तर त्याला काय थकवा येत नसेल? एकदा सुरु केलेले काम क्षुद्रपणे मधेच सोडून द्यायला थोर लोकांना संकोच वाटतो. हाती घेतले ते तडीस नेणे हे थोरांचे कुलव्रतच असते.

७) आन्तरः कोऽपि हेतु:.

व्यतिषजति पदार्थानान्तर: कोऽपि हेतुः
न खलु बहिरुपाधीन्प्रीतय: संश्रयन्ते।
विकसति हि पतङ्गस्योदये पुण्डरीकं
द्रवति व हिमश्मावुद्गते चन्द्रकान्त:॥
मालतीमाधव १.१५

स्त्रीपुरुषांना आतील कोठलातरी धागा एकमेकांकडे आकृष्ट करतो. प्रीति बाह्य गोष्टींवर अवलंबून नसते. सूर्य उगवल्यावरच कमळ फुलते आणि चंद्र उगवल्यावरच चंद्रकान्तमणि पाझरू लागतो.

८) कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी.

ये नाम केचिदिह न: प्रथयन्त्यवज्ञां
जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्न:।
उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी॥
मालतीमाधव १.७.

आज जे माझी उपेक्षा करीत आहेत त्यांना काहीहि वाटो, माझा हा प्रयत्न त्यांच्यासाठी नाही. आगेमागे केव्हातरी माझा समानधर्मा जन्माला येईलच कारण काल अनंत आहे आणि पृथ्वी खूप मोठी आहे.

९) अवडंबर.

संस्कृतमध्ये ’आडम्बर’ म्हणजे ’मोठा नगारा’. त्याचा अपभ्रंश म्हणजे मराठी ’अवडंबर’ म्हणजे ’खोटा देखावा, निरर्थक आवाज’.

१०) अष्टसात्त्विकभाव.

’विठ्ठलाच्या दर्शनाने वारकर्‍यांचे अष्टसात्त्विकभाव जागृत झाले.’ हे अष्टसात्त्विकभाव म्हणजे ’स्तम्भ, प्रलय, रोमांच, स्वेद, वैवर्ण्य, वेपथु, अश्रु आणि वैस्वर्य’ म्हणजेच अनुक्रमे स्तब्धता, मूर्छा येणे, अंगावर काटा उभा राहणे, घाम, कंप, अश्रुपात आणि आवाजात बदल.

११) होरा.

मराठीत ’होरा’ म्हणजे भविष्याची कल्पना किंवा तर्क, ज्यावरून ज्योतिषांना आदरपूर्वक ’होराभूषण’ असे संबोधले जाते. मूळचा खाल्डियन भाषेतील ’दिवसाचा २४ वा भाग अशा अर्थाचा हा शब्द ग्रीक भाषेमध्ये ώρα असा बदलून तेथून भारतीय ज्योतिषात त्याच अर्थाने प्रचलित झाला. (इंग्रजी hour हा शब्दहि त्याच उगमाचा.) भारतीय ज्योतिषात दिवसाच्या २४ तासांना क्रमाने एकेक ग्रह ’होरेश’ मानला जातो आणि त्यांचा क्रम पृथ्वीभोवतीच्या त्यांच्या प्रदक्षिणाकालाच्या उतरत्या क्रमाने शनि, गुरु, मंगळ, रवि, शुक्र, बुध आणि चंद्र (सोम) असा असतो. आजच्या दिवसाचा पहिला होरेश शनि असला तर आजचा वार शनिवार. उतरत्या क्रमाने तीन आवर्तनांनंतर आजचा शेवटचा होरेश मंगळ आणि उद्याचा पहिला होरेश रवि म्हणून उद्याचा दिवस रविवार आणि ह्याच क्रमाने सोमवार, मंगळवार इत्यादि निर्माण होतात. ’होरा’ शब्दाच्या मूळ अर्थाची विस्मृति होऊन त्याला ’भविष्य’ हा अर्थ चिकटला.

ह्याविषयी श्लोक:

मन्दादध: क्रमेण स्युश्चतुर्था दिवसाधिपा:।
होरेशा: सूर्यतनयादधोधः क्रमशस्तथा॥
सूर्यसिद्धान्त भूगोलाध्याय.

(सूर्यपुत्र शनिपासून खालच्या क्रमाने होरेश होऊन चौथे ग्रह ओळीने दिवसाधिप होतात.)

१२) पंचत्वास जाणे.

पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश. मृत्यूनंतर मृतदेह पुन: पंचमहाभूतामध्ये समाविष्ट होतो म्हणून मृत्यु पावणे म्हणजे पंचत्वास जाणे.

१३) यक्षप्रश्न.

वनवास भोगतांना नकुल एका सरोवरावर पाणी आणण्यास जातो तेथील रक्षक यक्ष त्याला बेशुद्ध करतो. क्रमाक्रमाने अन्य सर्व पांडवांचेहि तेच होते. अखेरीस यक्षाच्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन धर्मराज यक्षाला प्रसन्न करतो ह्या महाभारतकथेवरून ’अवघड प्रश्न’ अशा अर्थी ’यक्षप्रश्न’ हा शब्द रूढ झाला.

'यादवी युद्ध' हा वाक्प्रचारहि कलियुगाच्या प्रारंभी आणि कृष्णाच्या निजधामास जाण्याचा प्रसंगी यादवांनी एकमेकात लढून द्वारका बुडविली त्यावरून निर्माण झाला आहे.

१४) हितं मनोहारि च दुर्लभं वचः.

क्रियासु युक्तैर्नृप चारचक्षुषो न वञ्चनीयाः प्रभवोनुजीविभिः।
अतोऽर्हसि क्षन्तुमसाधु साधु वा हितं मनोहारि च दुर्लभं वच:॥
किरातार्जुनीय १.४.

कार्यावर नेमलेल्या सेवकांनी हेर हेच डोळे असलेल्या राजांची दिशाभूल करू नये. अतएव माझे बोलणे प्रिय वा अप्रिय असले तरी तू त्याला क्षमा करावीस कारण हितकर आणि तरीहि मनाला रिझवणारे बोलणे दुर्मिळ असते.

१५) अहिंसा परमो धर्म:.

अहिंसा परमो धर्मस्तथाऽहिंसा परं तप:।
अहिंसा परमं सत्यं यतो धर्मः प्रवर्तते॥
अनुशासनपर्व ११५.२३

अहिंसा हा श्रेष्ठ धर्म, तप आणि सत्य आहे. अहिंसेतून धर्म उत्पन्न होतो.

१६) शठं प्रति शाठयम्.

हिते प्रतिहितं कुर्यात् हिंसिते प्रतिहिंसितम्।
तत्र दोषं न पश्यामि शठे शाठयं समाचरेत्॥
पंचतंत्र अपरीक्षितकारक ८५.

चांगल्याला चांगल्य़ाने आणि हिंसेला हिंसेने उत्तर द्यावे. गुंडाला गुंडगिरीने उत्तर द्यावे. मला ह्यात काहीहि वावगे दिसत नाही.

(अशाच अर्थाचा आणि रूपाचा आणखी एक श्लोक:

कृते प्रतिकृतिं कुर्याद्धिंसिते प्रतिहिंसितम्।
तत्र दोषं न पश्यामि दुष्टे दुष्टं समाचरेत्॥)

’शठं प्रति शाठयम्’ हे वचन लोकमान्य टिळकांच्या लिखाणातून लोकप्रिय झाले असे वाटते. तत्पूर्वी तसेच्या तसे ते कोठे आढळत नाही.

१७) द्रव्येण सर्वे वशाः.

निर्द्रव्यः पुरुषो विपल्लवतरुः सर्वत्र मन्दादरो
नित्यं लोकविनापराधकुपितो दुष्टं च सम्भाषणम्।
भार्या रूपवती च मन्दमनसा स्नेहान्न चालिङ्गते
तस्माद्द्रव्यमुपार्जय श्रुणु सखे द्रव्येण सर्वे वशा:॥
सुभाषित.

द्रव्यहीन मनुष्य निष्पर्ण झाडासारखा असतो. त्याला कोठेहि मानाची वागणूक मिळत नाही. लोक त्याची चूक नसतांनाहि त्याला रागावतात आणि त्याच्याशी दुराव्याने बोलतात. सुंदर पत्नीहि त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि त्याला प्रेमाने आलिंगन देत नाही. म्हणून मित्रा ऐक, पैसा मिळव, सगळे पैशामागे येतात.

१८) भार्या रूपवती शत्रुः.

भार्या रूपवती शत्रुः पुत्रः शत्रुरपण्डितः।
ऋणकर्ता पिता शत्रुर्माता च व्यभिचारिणी॥
सुभाषित.

सुस्वरूप भार्या, अशिक्षित पुत्र, कर्ज करून ठेवणारा बाप आणि वाईट चालीची आई हे शत्रु होत.

१९) दारिद्र्यान्मरणं वरम्.

उत्तिष्ठ क्षणमेकमुद्वह सखे दारिद्र्यभारं मम
श्रान्तस्तावदिदं चिरान्मरणजं सेवे त्वदीयं सुखम्।
इत्युक्तं धनवर्जितस्य वचनं श्रुत्वा श्मशाने शवम्
दारिद्यान्मरणं वरं वरमिति ज्ञात्वैव तूष्णीं स्थितम्॥
पंचतंत्र?

’काही काळ ऊठ आणि माझा दारिद्र्यभार आपल्यावर घे, खूप काळापासून दमलेला असा मी तेव्हढया वेळात तुझे मरणामधले सुख भोगतो’. श्मशानातील शवाने दरिद्री माणसाचे हे बोलणे ऐकले आणि दारिद्र्यापेक्षा मरण बरे हे ओळखून काही उत्तर दिले नाही.

२०) चक्रनेमिक्रमेण.

नन्वात्मानं बहु विगणयन्नात्मनैवावलम्बे
तत्कल्याणि त्वमपि नितरां मा गमः कातरत्वम्।
कस्यात्यन्तं सुखमुपगतं दु:खमेकान्ततो वा
नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण॥
मेघदूत उत्तरमेध ४८.

(यक्षाने मेघाबरोबर पाठविलेल्या संदेशाचा एक भाग...) उर्वरित दिवसांचा आपल्याशीच हिशोब करत मी स्वतः स्वतःला सांभाळून आहे आणि म्हणून हे कल्याणि, तूहि फार विकल होऊ नकोस. सर्वच सुख अथवा सर्वच दु:ख कोणाला भोगावे लागते? भाग्य हे चाकाच्या आर्‍यांप्रमाणे खाली जाते आणि वरहि येते.

भाग २ मध्ये थोडया फरकाने पुढील श्लोक ’महाजनो येन गतः स पन्था:’ ह्या उक्तीसाठी दाखविला होता पण त्याचा मूलस्रोत तेथे दिला नव्हता. हा श्लोक महाभारतातील यक्षप्रश्नाचा एक भाग आहे असे थोडे शोधल्यावर कळले.

तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना
नैको मुनिर्यस्य मतं प्रमाणम्।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां
महाजनो येन गतः स पन्था: ।।
महाभारत वनपर्व (यक्षप्रश्न) ३१४.११९.