प्रस्तावना
आधी बरेच यत्न करून मी कंबोडिया देशाचा ई-व्हिसा मिळवलेला असल्याने मी चटकन इमिग्रेशन काउंटर्स कडे जातो आहे. विमानातले माझे बहुतेक सहप्रवासी, आगमनानंतर मिळणारा व्हिसा काढण्याची तजवीज करण्यात गुंतलेले असल्याने मला रांगेत उभे न राहता पुढे जायला मिळाले आहे. विमानतळावरचा कर्मचारी व अधिकारी वर्ग बघून मात्र एकंदरीत भारताची आठवण होते आहे. तशीच संशयी व उर्मट मनोवृत्ती या मंडळींचीही दिसते आहे. मात्र विमानतळाची अंतर्गत व्यवस्था व सोई या सर्व प्रवाशांना सुखकर वाटतील अशाच आहेत. मी माझी बॅग घेऊन विमानतळाच्या बाहेर येतो. सियाम रीप शहरात आमची सर्व व्यवस्था बघणार आहेत ते श्री बुनला, समोरच माझ्या नावाची पाटी हातात घेऊन माझी वाट पहात उभे आहेत. मी त्यांना हात हलवून अभिवादन करतो. ते लगेचच माझ्याजवळ येऊन औपचारिक गप्पागोष्टी करत आहेत. इतक्यात शेजारच्या कोपर्यात उभ्या केलेल्या एका मानवी आकाराच्या मूर्तीकडे माझे लक्ष जाते. मूर्तीचा चेहरा व डोक्यावरची पगडी हे जरा निराळेच वाटतात. मात्र त्या मूर्तीला असलेले चार हस्त व त्यापैकी दोन हातात् असलेल्या शंख व व चक्र या वस्तू त्या मूर्तीची लगेच मला ओळख पटवतात. ही मूर्ती नक्की विष्णूचीच आहे यात शंकाच नाही. म्हणजे देवांच्या सहवासातले माझे दिवस अगदी विमानतळापासूनच आता सुरू झाले आहेत.
अनुक्रमणिका
सियाम रीप च्या विमानतळावर माझे विमान थोडेसे उशिरानेच उतरते आहे. सिल्क एअर सारख्या वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध विमान कंपनीच्या उड्डाणांना उशीर सहसा होत नसल्याने आजचा उशीर थोडासा आश्चर्यकारकच आहे. विमानात माझ्याशेजारी बसलेल्या जर्मन जोडप्याला भारताविषयी खूप कुतुहल असल्याने सबंध प्रवासात त्यांनी माझ्याबरोबर खूप गप्पा मारलेल्या आहेत. समोर दिसणारा विमानतळ स्वच्छ व नीटनेटका वाटतो आहे. विमानतळाच्या इमारतीचे स्थापत्य मोठे वैशिष्ट्यपूर्ण वाटते आहे. आगमन, निर्गमन हे सगळे एकाच पातळीवर आहे. कौलारू छप्पराची असावी अशी दिसणारी ही इमारत आहे. मी ‘आगमन‘ अशी पाटी लावलेल्या प्रवेशद्वारामधून आत शिरतो आहे. समोरच हत्तीच्या पाठीवर बसलेल्या एका मूर्तीचा शुभ्र रंगाचा एक मोठा पुतळा उभा आहे. माझ्या पुढे जाण्याच्या घाईगडबडीत, मी ती मूर्ती बुद्धाची आहे असे समजतो. बर्याच नंतर, इतर अनेक मूर्ती बघितल्यावर व हत्तीच्या पाठीवर बसलेली बुद्धाची मूर्ती दुसरीकडे कोठेच न बघितल्याने, ती मूर्ती बुद्धाची असणे शक्य नाही हे माझ्या लक्षात आले आहे.
आधी बरेच यत्न करून मी कंबोडिया देशाचा ई-व्हिसा मिळवलेला असल्याने मी चटकन इमिग्रेशन काउंटर्स कडे जातो आहे. विमानातले माझे बहुतेक सहप्रवासी, आगमनानंतर मिळणारा व्हिसा काढण्याची तजवीज करण्यात गुंतलेले असल्याने मला रांगेत उभे न राहता पुढे जायला मिळाले आहे. विमानतळावरचा कर्मचारी व अधिकारी वर्ग बघून मात्र एकंदरीत भारताची आठवण होते आहे. तशीच संशयी व उर्मट मनोवृत्ती या मंडळींचीही दिसते आहे. मात्र विमानतळाची अंतर्गत व्यवस्था व सोई या सर्व प्रवाशांना सुखकर वाटतील अशाच आहेत. मी माझी बॅग घेऊन विमानतळाच्या बाहेर येतो. सियाम रीप शहरात आमची सर्व व्यवस्था बघणार आहेत ते श्री बुनला, समोरच माझ्या नावाची पाटी हातात घेऊन माझी वाट पहात उभे आहेत. मी त्यांना हात हलवून अभिवादन करतो. ते लगेचच माझ्याजवळ येऊन औपचारिक गप्पागोष्टी करत आहेत. इतक्यात शेजारच्या कोपर्यात उभ्या केलेल्या एका मानवी आकाराच्या मूर्तीकडे माझे लक्ष जाते. मूर्तीचा चेहरा व डोक्यावरची पगडी हे जरा निराळेच वाटतात. मात्र त्या मूर्तीला असलेले चार हस्त व त्यापैकी दोन हातात् असलेल्या शंख व व चक्र या वस्तू त्या मूर्तीची लगेच मला ओळख पटवतात. ही मूर्ती नक्की विष्णूचीच आहे यात शंकाच नाही. म्हणजे देवांच्या सहवासातले माझे दिवस अगदी विमानतळापासूनच आता सुरू झाले आहेत.
माझे हॉटेल सियाम रीप शहराच्या अगदी मध्यवर्ती भागातच आहे. हॉटेलच्या खोल्या नीटनेटक्या, आरामदायी व स्वच्छ आहेत. फारशा ऐषारामी दिसत नाहीत. मी बरोबरच आणलेले भोजन पटकन उरकतो व देवांच्या भेटीला जायला लवकर तयार होतो. सियाम रीप हे शहर कंबोडिया देशाच्या मध्यवर्ती भागात पण पश्चिमेला आहे. सियाम रीप हे या गावाचे असलेले नावही मोठे विचित्र आणि गंमतीदार आहे. सियाम रीप चा ख्मेर भाषेतला अर्थ होतो सयामचा पराभव. अमृतसरला ‘पाकिस्तानचा पराभव‘ किंवा पेशावरला ‘अफगाणिस्तानचा पराभव‘ अशा नावाने ओळखण्यासारखेच हे नाव आहे. संस्कृतमधल्या रिपू शब्दावरूनच रीप हा शब्द आलेला आहे. कंबोडिया मधले लोक स्वत:ला ख्मेर असे म्हणतात. कंबोडियामधली एक मोठी नदी ‘टोनले साप‘ या नदीच्या जवळच असलेल्या या गावाजवळचा भाग अगदी पुरातन कालापासून या देशाच्या राजधानीचा भाग होता. ई.स.नंतरच्या ८व्या किंवा ९ व्या शतकात, इथल्या ख्मेर राजांनी आपली राजधानी या भागात प्रथम स्थापन केली. कंबोडिया हे या देशाचे नाव कुंबोज किंवा संस्कृतमधल्या कुंभ या शब्दावरून आलेले आहे. पंधराव्या शतकात, पश्चिम सीमेकडून होणार्या सततच्या सयामी किंवा थायलंडच्या आक्रमणांमुळे ही राजधानी ख्मेर राजांनी पूर्वेला नॉम पेन येथे हलवली व ती आजमितीपर्यंत तेथेच आहे.
ख्मेर संस्कृती व धर्म हे भारताशी नेहमीच जोडलेले किंवा संलग्न राहिलेले आहेत. इथल्या पुरातन राजांनी हिंदू नावे नेहमीच स्वत: धारण केलेली आहेत व हिंदू किंवा बौद्ध हेच धर्म या देशात गेली 1500 वर्षे प्रचलित राहिलेले आहेत. ख्मेर राजे स्वत: हिंदू किंवा बौद्ध धर्मांचे पालन करत व धर्मशास्त्रांप्रमाणे सर्व रूढ्या व विधींचे मन:पूर्वक पालन करत असत. आजही या देशातले 90% टक्क्याहून जास्त नागरिक हे स्थविर पंथाचे बौद्ध धर्मीय आहेत. दुसरी एक गोष्ट मला महत्वाची वाटली या देशावर इतिहासात कधीच इस्लामपंथियांची आक्रमणे झालेली नाहीत. त्यामुळेच बहुदा गेली 800 किंवा 900 वर्षे या देशातील देवळे व मूर्ती टिकून राहिल्या असाव्या.
ख्मेर भाषेत अंगकोर हा शब्द संस्कृत नगरी या शदावरून आलेला आहे व त्याचा अर्थ नगर किंवा शहर असा होतो. सियाम रीप जवळचे सर्वात मोठे असलेले व ख्मेर राजांनी स्थापना केलेले ‘अंगकोर थॉम‘ या नगराला भेट देण्यासाठी मी आता निघालो आहे. ख्मेर मधे थॉम या शब्दाचा अर्थ सर्वात मोठे असाच होतो. त्यामुळे या नगराच्या नावापासूनच त्याचा मोठेपणा दिसतो आहे. माझी गाडी थांबते व मी खाली उतरतो. समोर दिसणारे दृष्य़ मनाला थक्क व स्तिमित करणारे आहे हे मात्र नक्की. अंदाजे 25 फूट उंचीची एक भक्कम व लालसर रंगाची दगडी भिंत मला जरा लांबवर दिसते आहे व या भिंतीने, तिच्या वर दिसणारी उंच व घनदाट झाडी सोडली तर पलीकडचे बाकी सर्व दृष्य़ पडदा टाकल्यासारखे बंद केले आहे. ही भिंत आणि मी उभा आहे ती जागा यामधे निदान 325 फूट रूंद असलेला व डावी बाजू पाण्याने पूर्ण भरलेला असा एक खंदक दिसतो आहे. पाण्यावर मधून मधून विकसित झालेली कमल पुष्पे डोकावत आहेत. या खंदकावरून पलीकडे जाण्यासाठी दगडांपासून बनवलेला एक पूल माझ्या नजरेसमोर दिसतो आहे. या पुलाच्या टोकाला व खंदकाच्या पलीकडच्या काठावर एक भव्य गोपुर उभे आहे. या गोपुराच्या शिखरावर दगडात कोरलेले तीन भव्य चेहेरे दिसत आहेत. दगडी पुलाच्या कठड्याकडे माझे लक्ष जाते. हा दगडी कठडा(Railing) एखाद्या अंगावर खवले असलेल्या सर्पासारखा दिसणारा बनवलेला आहे. माझ्या डाव्या हाताला या सर्पाची हवेत वक्राकार वर जाणारी शेपूट मला दिसते आहे तर उजव्या बाजूच्या कठड्याच्या टोकाला मला याच पंचमुखी सर्पाने उंचावलेली त्याची निदान 5/6 फूट उंच अशी फणा दिसते आहे. डाव्या बाजूच्या कठड्याला 54 आधार आहेत हे सर्व आधार(Baluster) मानवी उर्ध्व शरीराच्या आकाराचे आहेत व त्यांचे चेहरे शांत व सौम्य भासत आहेत. उजव्या बाजूच्या कठड्याचे तसेच 54 आधार तशाच मानवी उर्ध्व शरिराचे आहेत परंतु त्यांचे चेहरे मात्र दुष्ट भाव असलेले दिसत आहेत. दोन्ही बाजूंच्या चेहर्यांची केशरचनाही अलग प्रकारची आहे. दोन्ही बाजूंच्या पुतळ्यांनी हातातील सर्प मात्र घट्ट पकडलेला आहे.
अंगकोर थॉमचे दक्षिण प्रवेशद्वार
असुरांच्या उर्ध्व शरीराच्या आकाराचे कठड्याचे आधार
माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो. माझ्या समोर देव आणि दानव यांनी पुराणात वर्णन केलेल्या समुद्रमंथनाचे दृष्य साकारले आहे. माझ्या डाव्या बाजूचे देव आहेत तर उजव्या बाजूचे दानव. दोघांच्याही हातात वासुकी सर्प आहे व ते त्याला घट्ट पकडून समुद्र मंथन करत आहेत. मी समुद्र मंथनाची काल्पनिक चित्रे वर्षानुवर्षे बघत आलो आहे पण एवढ्या भव्य प्रमाणातले व त्रिमितीतले समुद्र मंथन या पुलाच्या कठड्यांच्या द्वारे साकार करण्याची ख्मेर स्थापत्य विशारदांची कल्पना मात्र अवर्णनीय आहे.
देवाचा चेहरा (मागे खंदक दिसतो आहे)
असुराचा चेहरा
देवाचा चेहरा
मी पुलावरून दोन्ही बाजूला असलेल्या देव व दानव यांच्या मूर्तींकडे दृष्टीक्षेप टाकत पुढे जातो आहे. पुलाच्या टोकाला असलेले गोपुर, सत्तर, पंचाहत्तर फूट तरी उंच आहे. शहरात प्रवेश करणार्या प्रत्येकाला, या गोपुराखालूनच जाणे आवश्यक असल्याने, इथल्या स्थापत्यकारांनी हे गोपुर अतिशय भव्य व देखणे बांधले आहे. अंगकोर थॉम मधे प्रवेश करण्यासाठी एकूण 5 मार्ग आहेत. यातल्या प्रत्येक मार्गावर असेच एक गोपुर बांधलेले आहे. या गोपुरावर भव्य आकाराचे चार चेहरे कोरलेले आहेत.हे चेहरे सातवा जयवर्मन किंवा अवलोकितेश्वर या राजाचे आहेत असे मानले जाते. या अंगकोर थॉम नगरात प्रवेश करू इच्छिणार्यांना हे चेहेरे सुखकर प्रवासासाठी अभयच प्रदान करत आहेत असे मला वाटते. गोपुराच्या दोन्ही बाजूंना तीन मस्तके असलेला व या समुद्र मंथनातूनच बाहेर आलेल्या ऐरावत हत्तीचे शिल्प आहे व या हत्तीवर हातात वज्र घेतलेली इंद्रदेवाची स्वारी आरूढ झालेली दिसते आहे. द्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांची शिल्पे कोरलेली आहेत व वरच्या बाजूला इंद्रदेवाला साथ देण्यासाठी गंधर्व आहेत. इंद्राचे शिल्प बघितल्यावर समुद्र मंथनाचे शिल्प आता पूर्ण झाल्यासारखे वाटते आहे.
3 मस्तके असलेल्या ऐरावतावर बसलेल्या इंद्राची मूर्ती (मधल्या मस्तकाची सोंड नष्ट झालेली दिसते.)
सातवा जयवर्मन राजाची 4 मुखे असलेले प्रवेश गोपुर
गोपुरामधल्या प्रवेशद्वाराची कॉरबेल प्रकारची कमान
या गोपुराच्या मधे असलेल्या प्रवेशद्वारामधून मी आत शिरतो. आत शिरताना सहज वर बघितले. नेहमीची कमान येथे दिसली नाही. कदाचित कमान बांधण्याचे कौशल्य त्या वेळी या शिल्पकाराना प्राप्त झालेले नसावे. भिंतीचे दगड थोडे थोडे पुढे बसवून (Corbel arch) कमानीसदृष्य आकार या ठिकाणे निर्माण केला गेला आहे. माझी गाडी पलीकडच्या बाजूस उभी आहे. समुद्र मंथनाचे हे शिल्प व त्याचे निर्माते यांच्या सृजनशीलतेबद्दलचे अपार कौतुक माझ्या मनात दाटत असतानाच मी गाडीत बसतो आहे व गाडी या नगराच्या भौमितिक केंद्रबिंदूवर असलेल्या बायॉन(Bayon) या देवळाकडे निघाली आहे.
15 नोव्हेंबर 2010
अंगकोर थॉम हे शहर, ख्मेर राजा सातवा जयवर्मन याने आपल्या राज्यकालात म्हणजे 1181 ते 1220 या वर्षांमधे बांधले होते. या शहराचा आकार अचूक चौरस आकाराचा आहे. या चौरसाची प्रत्येक बाजू 3 किलोमीटर एवढ्या लांबीची आहे. या शहराच्या परिमितीवर, 8 मीटर उंच अशी भक्कम दगडी भिंत बांधलेली आहे व आत प्रवेश करण्यासाठी उत्तर, दक्षिण व पश्चिम या दिशांना प्रत्येकी एक व पूर्व दिशेला दोन अशी 5 प्रवेशद्वारे आहेत. मी ज्या दक्षिणेकडच्या प्रवेशद्वारामधून आत आलो होतो तशीच गोपुरे व त्यातील प्रवेशद्वारे प्रत्येक दिशेला आहेत. दगडी भिंतीच्या बाजूला 100 मीटर रूंद असा खोल खंदक खणून त्यात पाणी सोडलेले असल्याने या नगरीच्या संरक्षणाची उत्तम व्यवस्था केलेली होती असे म्हणता येते. या शहराचे एकूण क्षेत्रफळ 145.8 हेक्टर किंवा 360 एकर एवढे आहे. शहराच्या भौमितिक मध्यावर, एक भव्य बुद्ध मंदीर, जयवर्मन राजाने उभारले होते. या मंदिराचे नाव आहे बायॉन(Bayon) व तेच बघण्यासाठी मी आता निघालो आहे. झाऊ डागुआन (Zhou Daguan) हा चिनी राजदूत त्यावेळी जयवर्मन राजाच्या दरबारात होता. त्याने त्या कालातील अंगकोर थॉम शहर कसे दिसत असे याचे बारकाईने केलेले वर्णन लिहून ठेवले आहे. त्या काळातल्या बायॉन मंदिरावर असलेल्या मधल्या मनोर्यावर सोन्याचा पत्रा चढवलेला होता. याच प्रमाणे मंदिराच्या पूर्व दिशेला असलेला खंदकावरचा पूल व त्याच्या बाजूला असलेल्या दोन सिंह मूर्ती यावरही सोन्याचा पत्रा चढवलेला होता.
Magnificence of Bayon Temple
दक्षिण प्रवेश द्वारापासून 1.5 किलोमीटरवर बायॉन देवळाचा परिसर नजरेसमोर दिसू लागला. माझ्या गाडीने डावीकडे वळण घेतले व एका प्रशस्त अशा चौथर्यासमोर गाडी उभी राहिली. समोर दिसणारे देऊळ भव्य दिसत असले तरी एकूण दृष्य गोंधळात टाकणारे वाटत होते. मी चौथर्याच्या पायर्या चढून वर गेलो व तसाच पुढे चालत मंदिराच्या जरा जवळ जाउन थांबतो आहे. मध्यभागी एक उंच मनोरा दिसतो आहे व त्याच्या भोवती 54 जरा कमी उंचीचे मनोरे दिसत आहेत. जरा आणखी जवळ जाऊन बघितल्यावर लक्षात आले की यातल्या प्रत्येक मनोर्यावर, मी आधी दक्षिण गोपुरावर बघितले होते त्याच प्रमाणे , प्रत्येक दिशेला एक, असे चार चेहेरे दगडात बनवलेले आहेत. मला प्रथम कसली आठवण होते ती जॉर्ज ऑरवेल या सुप्रसिद्ध इंग्रजी लेखकाच्या ‘ Big Brother is watching you’ या वाक्याची. पण बायॉनच्या देवळावर दिसणारे चेहेरे ऑरवेलच्या बिग ब्रदर सारखे संशयी व लोकांच्यावर लक्ष ठेवणारे नाहीत तर ते सतत स्मित करत आहेत. ते लोकांचे हित व्हावे अशीच इच्छा करत आहेत. हे चेहेरे राजा जयवर्मन किंवा अवलोकितेश्वर याचे आहेत असे समजतात. ख्मेर राजांची नावे त्यांच्या निधनानंतर बदलण्यात येत असत. या पद्धतीनुसार सातवा जयवर्मन राजा परलोकवासी झाल्यावर त्याचे जयवर्मन हे नाव बदलून त्याला अवलोकितेश्वर असे म्हटले जाऊ लागले होते.
अंगकोरचे हास्य
बायॉन मंदिराची रचना तशी साधी सरळ व तिमजली आहे. थोड्या पायर्या चढून गेले की पहिल्या मजल्यावर असलेल्या व गाभार्याच्या चारी बाजूला असलेल्या, व्हरांड्यासारख्या गॅलरीज आपल्याला दिसतात. यामधे असणार्या कोणत्याही प्रवेशद्वारामधून आत गेले की पायर्या चढून दुसर्या मजल्यावर जाता येते. दुसर्या मजल्याची रचना जरा गुंतागुंतीची आहे यात अनेक कमी अधिक उंचीवर असलेल्या कक्षांमुळे आपण नक्की कोठे आहोत हे समजेनासे होते. मी 3/4 वेळा तरी येथे गोंधळून रस्ता चुकलो आहे. प्रत्येक वेळी परत पहिल्या मजल्यावर जाऊन परत पायर्या चढून वर जाणे एवढाच मार्ग मला दिसतो आहे. दुसर्या मजल्यावर परत तशाच, चारी बाजूने असलेल्या गॅलरीज दिसतात. या मजल्याच्या डोक्यावर मंदिराचा मुख्य गाभारा व त्याच्या चहुबाजूंनी चेहरे कोरलेले मनोरे उभे राहिलेले आहेत. बायॉनच्या वास्तूचा एकूण आवाका लक्षात आल्यावर या वास्तूचे वर्णन करण्यासाठी माझ्याजवळ शब्दच नाहीत असे मला वाटू लागले आहे. इंग्रजी भाषेतला Magnificence हाच शब्द फक्त बायॉनचे वर्णन करण्यासाठी माझ्या मनात रुंजी घालतो आहे.
खंदकातल्या पाण्यात मंदिराचे प्रतिबिंब
बायॉन मंदिराच्या पहिल्या व दुसर्या मजल्यावर असलेल्या गॅलरीजच्या भिंतीच्यावर अतिशय उत्कृष्ट दर्जाची भित्तिशिल्पे दगडात कोरलेली आहेत.ती बघण्यासाठी मी आता परत पहिल्या मजल्यावर आलो आहे. ख्मेर राजांची त्यांच्या शत्रूंबरोबर(Chams) झालेली जमिनीवरची व पाण्यावरची युद्धे, सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यातले प्रसंग, कोंबड्यांची झुंज, पशुपक्षी, प्रासाद, देवळे सर्व काही या शिल्पांच्यात कोरलेले सापडते आहे. बायॉन बुद्ध मंदीर असले तरी विष्णू, शंकर हे हिंदू देव अनेक ठिकाणी कोरलेले आहेत. आणि या सर्वांबरोबर स्वर्गलोकातल्या अप्सरा तर ठायी ठायी दिसत आहेत.
शत्रू सैनिक (चिनी वंशाचे, छोटी दाढी व डोक्यावरची पगडी तसे दर्शवते)
सैन्ये पोटावर चालतात (ख्मेर सैन्यासाठी अन्न घेउन जाणारी गाडी व बकर्या)
ख्मेर सैनिक व शत्रू यांच्यातील हातघाईची लढाई
बैलाची शिकार
वराह शिजवणे
वाघाला घाबरून झाडावर चढून बसलेला साधू
संगीताच्या तालावर नाचणार्या अप्सरा
शिव व त्याचे भक्तगण
शिव त्याच्या स्वर्गातील मंदिरात
गरुडावर आरूढ झालेल्या विष्णूचे राक्षसांशी युद्ध
पहिल्या व दुसर्या मजल्यावरच्या गॅलरीज बघताना मधेच माझे घड्याळाकडे लक्ष जाते. या मंदिरात मी गेले 2 तास मंत्रमुग्ध होऊन ही शिल्पकला बघत राहलो आहे व या पद्धतीने आज बाकी काहीच बघून होणार नाही या जाणिवेने मी बायॉन मंदिरामधून पाय काढता घेतो. मंदिराच्या पश्चिम द्वाराजवळ जुन्या खंदकाच्या भागात पाणी साठलेले आहे त्यात दिसणारे बायॉनचे प्रतिबिंब बघण्यासाठी मी थोडा थबकतो. माझ्या समोरच्या पाण्याच्या पृष्ठभागावरून, सरसर पाणी कापत जाणारा एक हंसांचा थवा मला दिसतो. कॅमेर्यात त्यांची छबी बंदिस्त करण्यापुरताच वेळ ते मला देतात व नाहीसे होतात.
बायॉन मंदिरासमोर जलक्रीडा करणारे हंस
काहीशा जड अंत:करणाने मी बायॉन परिसरातून निघून, उत्तरेला अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या बाफुऑन(Baphuon) या मंदिराकडे निघालो आहे. दुसरा उदयादित्यवर्मन या ख्मेर राजाने 1060च्या सुमारास हे शिवमंदिर बांधले होते. या मंदिराची बरीच पडझड झाल्याने याच्या पुनर्बांधणीचे कार्य 1970 मधे हातात घेण्यात आले होते. या मंदिराचे सर्व दगड क्रमांक घालून सुटे केले गेले होते. परंतु या सुमारास कंबोडिया मधे यादवी युद्ध सुरू झाले व हे कार्य सोडून द्यावे लागले. परिस्थिती शांत झाल्यावर 1995 मधे परत हे काम हातात घेण्यात आले. त्यावेळी असे लक्षात आले की ख्मेर रूज या कम्युनिस्ट पक्षाने सत्ता ताब्यात घेतल्यावर या मंदिराचे आराखडे नष्ट करून टाकलेले आहेत. त्यामुळे खचून न जाता संगणकाच्या मदतीने व जपानी सहकार्याने हे मंदिर परत बांधण्याचे काम हातात घेण्यात आले. मला आता समोर एक मोठा चौथरा दिसतो आहे. यावर चढून गेल्यावर पश्चिम दिशेला निदान 200 मीटर लांबीचा एक पूल दिसतो आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना हजारो पांढरे क्रमांक घातलेले दगड मला दिसत आहेत. हे सगळे दगड अजून त्यांच्या मंदिरातील योग्य जागी बसवायचे आहेत. या पुलाच्या पलीकडे बाफुऑनची भव्य वास्तू मला दिसते आहे. हा पूल पार करून मी शेवटपर्यंत जातो. मात्र पलीकडे मंदिराचे प्रवेशद्वार एक अडथळा टाकून द्वार बंद करण्यात आलेले आहे. सध्या जा मंदिराला भेट देणे शक्य होणार नाही असे दिसते. मी मंदिराचा एक फोटो काढतो व परत फिरतो.
बाफुऑन मंदिर
उत्तर दिशेने आणखी थोडे पुढे गेल्यावर एक प्रशस्त व निदान 6/7 फूट उंचीचा चौथरा मला दिसतो आहे. या चौथर्याच्या दर्शनीय भागावर अनेक हत्तींची शिल्पे कोरलेली दिसत आहेत. काही ठिकाणी तीन मस्तके असलेला ऐरावत व बर्याच ठिकाणी विष्णूचे वाहन असलेला गरूड सुद्धा दिसतो आहे. राजा सातवा जयवर्मन याने हा चौथरा आपल्याला सैन्याचे निरिक्षण करता यावे व सभा समारंभात जनतेबरोबर सहभागी होता व्हावे म्हणून बांधला होता. हा चौथरा तीन चार पायर्यांचा आहे व यावर राजासाठी एक लाकडी वास्तू उभारलेली होती असे सांगतात. लहानपणी मी हॉलीवूडचे बेन हर किंवा क्लिओपात्रा हे सिनेमे बघितल्याचे मला स्मरते. त्या सिनेमात असेच भव्य चौथरे व त्यावर उभा राहिलेला राजा दाखवलेले होते. त्या प्रकारचा एखादा खराखुरा चौथरा मला प्रत्यक्षात बघता येईल असे मला स्वप्नात सुद्धा कधी वाटले नसेल. या चौथर्याला Terrace of the Elephants असे नाव आहे व तो 1000 फूट तरी लांब आहे.
हत्तींचा चौथरा
हत्ती चौथर्यावरील गरूड शिल्पे
या हत्ती चौथर्याच्या पूर्वेला आणखी एक चौथरा आहे याला महारोगी राजाचा चौथरा, Terrace of the Leper King, असे नाव आहे. या चौथर्याला हे नाव का पडले यासंबंधी विश्वासार्ह माहिती नाही. परंतु आता असे समजले जाते की हा चौथरा म्हणजे ख्मेर राजांची स्मशानभूमी असली पाहिजे. या चौथर्यावर एक भव्य पुतळा होता (तो आता नॉम पेन्ह च्या वस्तूसंग्रहालयात ठेवलेला आहे.) हा पुतळा यमराजांचा आहे असे आता मानतात. या चौथर्याच्या दर्शनी भागावर जी भित्तिशिल्पे कोरलेली आहेत त्यात सर्व सामान्य नागरिक आहेत, सैनिक आहेत अक्षरश: हजारो मनुष्याकृती या चौथर्यावर आहेत. त्या बघताना मला एक गोष्ट जाणवली. या हजारो मूर्तींपैकी एकाही मूर्तीचा चेहरा हसरा नाही. सर्व चेहरे गंभीर किंवा दु:खी दिसत आहेत. या चौथर्यावर जर ख्मेर राजांच्यावर अग्नीसंस्कार केला जात असला तर त्यावरच्या शिल्पातले चेहरे गंभीर असणे स्वाभाविकच आहे असे मला वाटते. या दोन्ही चौथर्यांच्या समोरच्या बाजूला मला दोन भग्न इमारती दिसत आहेत. या इमारती क्लिन्ग्ज (Kleangs) या नावाने ओळखल्या जातात. ही गोदामे होती असे मानले जाते. या इमारतींच्या अलिकडेच कार पार्क मधे माझी गाडी माझी वाट पहाताना आता मला दिसते. एव्हांना सूर्य मावळायलाच आला आहे आणि पाय पण बर्यापैकी बोलू लागले आहेत. मी निमूटपणे गाडीत बसतो व गाडी हॉटेलकडे जायला निघते. वाटेत परत एकदा बायॉनच्या वास्तूचे क्षणभर दर्शन होते. ते मनात साठवत मी हॉटेलवर परततो.
क्लीन्ग्ज
उद्या लवकर उठायचे आहे कारण धार्मिक उपयोगासाठी म्हणून बांधलेले जगातील सर्वात मोठे स्थापत्य ज्याला म्हणतात ते अंगकोर वाट हे मंदिर उद्या मला बघायचे आहे.
17 नोव्हेंबर 2010
लिफ्ट मधून हॉटेल लॉबीकडे जाण्यासाठी उतरत असताना हातावरच्या घड्याळाकडे माझे सहज लक्ष जाते. घड्याळ पहाटेचे 5 वाजल्याचे दाखवत आहे. लॉबीमधे श्री. बुनला माझी वाटच बघत आहेत. मी गाडीत बसतो व अंगकोर वाट च्या दिशेने गाडी भरधाव निघते. एवढ्या पहाटे घाईघाईने निघण्याचे कारण अर्थातच अंगकोर वाट देवळाच्या मागून उगवत असलेला सूर्य बघणे हेच आहे. ख्मेर भाषेमधला वाट हा शब्द थाई भाषेतून आला आहे व त्याचा अर्थ देऊळ असा आहे. गाडीतून जात असताना हे दोन्ही शब्द संस्कृतमधील वाटिका या शब्दावरून आले असले पाहिजेत हे माझ्या लक्षात येते. ‘अंगकोर वाट‘ मंदिर, ख्मेर राजा दुसरा सूर्यवर्मन याच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे 1113 ते 1130 या वर्षांत बांधलेले आहे. हे मंदिर बांधायला 30 वर्षे लागली होती. म्हणजेच हे मंदिर सूर्यवर्मनच्या पश्चातच पूर्ण केले गेले होते. ‘परमविष्णूलोक‘ या सूर्यवर्मनच्या मृत्यूनंतरच्या नावाचा उल्लेख, देवळाच्या पहिल्या पातळीवरील भित्तिशिल्पातील एका छोट्या शिलालेखात सापडल्याने या गोष्टीचा स्पष्ट पुरावा मिळतो. असे म्हणतात की या मंदिराचा आराखडा सूर्यवर्मनचा एक ब्राम्हण मंत्री दिवाकर पंडित याने बनवला होता. या दिवाकर पंडिताला दैवी शक्ती प्राप्त होती अशी आख्यायिका आहे. मात्र सर्वसाधारण ख्मेर लोक असेच मानतात की हे मंदिर देवांचा स्थापत्य विशारद ‘विश्वकर्मा‘ यानेच बांधले आहे. अंगकोर वाट हे विष्णूचे देऊळ म्हणून बांधले गेले की सूर्यवर्मन राजाची समाधी म्हणून ही वास्तू बांधली गेली याबद्दल सुद्धा तज्ञांच्या मतात एकमत नाही.या गोष्टी तज्ञांवरच सोडलेल्या बर्या! असा सूज्ञ विचार करून मी मनातील विचारांना बाजूला सारतो.
चहूबाजूंनी असलेल्या काळ्या कुट्ट अंधारातच माझी गाडी एकदम थांबते. सर्व बाजूंना अंधाराचे साम्राज्य असले तरी मागून सतत येणार्या गाड्यांच्या दिव्यांचे प्रकाशझोत मात्र मला माझ्या मागे पुढे दिसत आहेत. त्या प्रकाश झोतांच्या उजेडात मी खाली उतरतो. समोर एक मोठा चौथरा दिसतो आहे. त्याच्या पायर्या चढून मी जातो आणि मी बरोबर आणलेल्या बॅटरीच्या प्रकाशात व इतर लोक जात आहेत त्यांच्या पाठोपाठ जाण्याचा प्रयत्न करतो. सुरक्षा रक्षकांची एक साखळी आम्हाला अडवते व मंदिर परिसरात 5.30 नंतरच जाणे शक्य होईल हे आमच्या निदर्शनास आणते. आहे तिथेच उभे राहून समोर अंधारात बघण्याशिवाय काहीही करणे मला शक्य नाही. माझ्या हे लक्षात येते आहे की मी उभा असलेला चौथरा, हळूहळू लोकांनी भरत चालला आहे व त्या सर्वांच्या हातात जगभरच्या नामांकित उत्पादकांनी बनवलेले अतिशय महागडे असे कॅमेरे आहेत. मी माझा साधासुधा कॅमेरा शक्य तितक्या माझ्या हातात लपवितो व समोर बघत राहतो. बरोबर 5.30 वाजता सुरक्षा रक्षकांची साखळी तुटते व लोक पुढे जायला सुरुवात करतात. भोवतीच्या अंधुक प्रकाशात, हे लोक एका मोठ्या पुलावरून पुढे जात आहेत हे मला दिसते. पुलाखाली अतिशय रुंद असा व पाण्याने पूर्ण भरलेला एक खंदक मला दिसतो आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतके लोक आजूबाजूला असून सुद्धा मला फक्त इंजिनवर चालणार्या एका पंपाच्या आवाजाखेरीज दुसरा कसलाही आवाज ऐकू येत नाही.भारतात जरा चार लोक जमले की त्यांचा गोंगाट लगेच सुरू होतो हे मला आठवल्याशिवाय रहात नाही. मी पुढे जाण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही कारण या चौथर्यावरूनच सूर्योदय छान दिसतो असे मला कोणीतरी सांगितलेले स्मरते आहे.
अंगकोर वाटचे पहाटेचे पहिले दर्शन
आणखी 15 मिनिटे जातात. समोरचे काळेभोर दिसणारे आकाश आता किंचित जांभळट झाल्यासारखे वाटते आहे व माझ्या नजरेसमोर अस्पष्ट अशा आडव्या काळसर रेषा दिसत आहेत. आणखी काही मिनिटे जातात. आकाशाचा रंग गडद निळा झाल्यासारखा वाटतो आहे. माझ्या समोर असलेला पूल व पाण्याने भरलेला खंदक मला आता दिसू लागला आहे. हा खंदक 200 मीटर (625 फूट) रूंद आहे व याचा परिघ 5.5 किमी तरी आहे असे वाचल्याचे मला स्मरते. खंदकावरचा पूल 12 मीटर (39 फूट) रूंद आहे व तो 250 मीटरपर्यंत पुढे जातो आहे. मी उभा आहे त्या चोथर्याच्या दोन्ही बाजूंना असलेले दगडी सिंह आता मला स्पष्ट दिसू लागले आहेत आणि समोर पूल संपतो आहे तिथे एक डोळ्यांच्या दोन्ही कोपर्यापर्यंत लांबलेली एक बैठी व्हरांडावजा गॅलरी मला दिसते आहे. या गॅलरीच्या छताच्या आधारासाठी बसवलेल्या चौकोनी दगडी खांबांची एक ओळ आता दिसते आहे. या गॅलरीच्या मध्यभागी असलेले एक व दोन बाजूंना काही अंतरावर असलेली दोन अशी मिळून एकंदर 3 गोपुरे मला दिसू लागली आहेत. या गोपुरांच्या कळसांची मात्र पडझड झालेली दिसते आहे. प्रकाश जसजसा वाढतो तसतसे हे लक्षात येते आहे की समोर दिसणारे स्थापत्य हे मंदिर नसून बाहेरची तटबंदी ओलांडून मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यासाठी व मंदिराचे दृष्य समोरून अतिशय भव्य वाटावे यासाठी उभारलेल्या एका प्रवेशवास्तूचा (Facade)भाग आहे.पूर्व दिशेचे क्षितिज आणखी उजाळते. आता मला या प्रवेशवास्तूच्या खूपच मागे आणि लांबवर 5 उंच शिखरे दिसत आहेत. ही शिखरे अंगकोर वाट मंदिराचे कळस आहेत. मला समोर दिसणार्या दृष्यातल्या, डाव्या व उजव्या बाजूंमधला सारखेपणा, एकूणच आकारबद्धता , सर्व वास्तूंची एकमेकाशी असलेली प्रमाणबद्धता व सुसंगती हे सर्व अवर्णनीयच वाटत आहेत. अगदी सत्य सांगायचे तर हे वर्णन करण्यासाठी लागणारे शब्दच माझ्याजवळ नाहीत. अंगकोर वाट मंदिराला मी महाशिल्प एवढेच नाव देऊ शकतो. या मंदिराचे दृष्य बघत असताना मला फक्त ताज महाल बघितल्यावर जसे वाटले होते त्याचीच आठवण फक्त होते आहे. बाकी कशाचीही या मंदिराची तुलना करणे सुद्धा शक्य नाही.
उष:कालचे अंगकोर वाट दर्शन
मी हातातल्या घड्याळाकडे बघतो. घड्याळात तर 6 वाजलेले आहेत. सूर्योदय 5.54 ला होणार होता ना! मग या सूर्यमहाराजांनी दगा कसा दिला? मग माझ्या लक्षात येते की पूर्व क्षितिज काळ्या जांभळ्या मेघांनी गच्च भरलेले आहे. सूर्य महाराज दिसणार कोठून? नाही म्हणायला एका कोपर्यात थोडीशी गुलाबी, नारिंगी छटा तेवढी मला दिसते आहे. सूर्योदय बघण्याची सर्व आशा मी सोडून देतो व गाडीत बसून हॉटेलवर परत येतो. आजचा दिवस बराच कष्टप्रद असणार आहे या जाणिवेने मजबूत ब्रेकफास्ट करतो व परत एकदा अंगकोर वाटचा रस्ता धरतो. या वेळी सकाळचे 8 वाजले आहेत.
प्रसिद्ध इंग्लिश लेखक सॉमरसेट मॉम याने 1959 साली अंगकोर वाट ला भेट दिली होती. या भेटीनंतर झालेल्या एका सभेत, थरथरत्या ओठांनी केलेले त्याचे एक वाक्य मी वाचले व ते मला फार भावले आहे. त्याच्याच शब्दात सांगायचे तर तो म्हणतो की ” कोणीही! म्हणजे अगदी कोणीही, अंगकोरचे मंदिर बघितल्याशिवाय मरणाचा विचार सुद्धा करू नये.” या लेखकाचे हे उद्गार वाचल्यावर या मंदिराचे दृष्य, दर्शकाच्या मनावर केवढा मोठा परिणाम करते याची कोणालाही सहज कल्पना यावी. अंगकोर वाट चा आराखडा हिंदू पुराणांमधे केलेल्या जगाच्या वर्णनाचे सांकेतिक प्रतिनिधित्व करतो असे म्हणता येते. मध्यभागी असलेली 5 शिखरे ही मेरू पर्वताची शिखरे मानली तर अगदी बाहेर असलेली तटबंदी ही जगाच्या अंताला असलेली पर्वत शिखरे असे मानता येते. त्या पलीकडे असलेला खंदक व त्यातील पाणी हे जगाच्या बाहेर असलेले काळेभोर, खोली मोजता न येणारे व अज्ञात असे जल मानता येते.
माझी गाडी पुन्हा एकदा मला अंगकोर वाट मंदिरासमोर सोडते. मी खंदकावरचा पूल पार करून दुसर्या बाजूला असलेल्या प्रवेशवास्तूमधील द्वारामधून आत शिरतो आहे. काही पायर्या चढल्यावर गोपुराच्या अंतर्भागात मी शिरतो माझ्या समोर दुसरा एक पूल मला दिसतो आहे. या पुलाची उंची काही फार नाही मात्र त्याची रुंदी अंदाजे 9 फूट तरी असावी. हा पूल सुमारे 350 मीटर तरी लांब असावा. या पुलाच्या पलीकडच्या टोकाला मला आता अंगकोर वाटचे मंदिर स्पष्ट दिसते आहे. त्याची भव्यता शब्दात सांगणे मला तरी शक्य नाही. मी मंदिराकडे न जाता उजवीकडे वळतो व प्रवेशवास्तूमधे असलेल्या पॅसेजमधून पुढे जातो. पुढे मला भगवान बुद्धाची एक मूर्ती दिसते आहे. जवळून बघितल्यावर या मूर्तीला 8 हात आहेत हे लक्षात येते आहे तसेच मूर्तीचे मस्तकही प्रमाणशीर वाटत नाही. ही मूर्ती आधी विष्णूची होती. नंतर त्याला बुद्ध बनवण्यात आले होते. अंगावरची कोरलेली आभूषणे, वस्त्रे व मूळचा सोनेरी रंग मधून मधून डोकावतो आहे. त्या मूर्तीच्या पुढे जात जात मे प्रवेशवास्तूच्या टोकाला जातो व तेथून बाहेर पडून त्या कोपर्यातून दिसणारा मंदिराचा देखावा डोळ्यात साठविण्याचा प्रयत्न करतो आहे.
विष्णूचा मानवनिर्मित बुद्ध अवतार
प्रवेशवास्तूच्या कोपर्यातून दिसणारे अंगकोर मंदिर
प्रवेश वास्तूच्या मंदिरासमोरच्या भिंतीवर अप्सरांची अनेक कोरलेली भित्तिशिल्पे मला आता दिसत आहेत. यातल्या काही अप्सरा जोडीने आहेत तर काही एकट्या. प्रत्येक अप्सरेच्या हातात, गळ्यात, कानात विविध प्रकारची आभूषणे मला दिसत आहेत. मी चालत मधल्या पुलापर्यंत येतो व पायर्या चढून मंदिराचा रस्ता धरतो आहे. मंदिराच्या दर्शनीय भागावर काही दुरुस्तीचे काम चालू असल्याने थोड्या बाजूला असलेल्या प्रतिध्वनी कक्षामधून मी देवळात प्रवेश करतो आहे.
प्रवेशवास्तूची मंदिरासमोरची भिंत
भिंतीवरच्या कोरलेल्या खिडक्या व त्यांचे गज
वृषभावरील योद्धा
धनुर्धारी योद्धा
हे देऊळ सुद्धा बायॉन देवळाच्या धर्तीवर म्हणजे तीन पातळ्यांवरच बांधलेले आहे. पहिल्या पातळीवरच्या गॅलरीज 215 मीटर लांब व 187 मीटर रूंद आहेत. दुसर्या पातळीवरच्या गॅलरीज 115 मीटर लांब व 100 मीटर रूंद आहेत. या गॅलरीज पहिल्या पातळीच्या गॅलर्यांच्या चौकोनाच्या मध्यभागी बांधलेल्या आहेत. या दुसर्या पातळीच्या गॅलर्यांच्या चौकोमाच्या मध्यभागी तिसर्या पातळीवरच्या 60 मीटर चौरस आकाराच्या गॅलर्या बांधलेल्या आहेत. ही तिसरी पातळी, दुसर्या पातळीच्या उंचीपेक्षा, कल्पना करता येणार नाही अशा उंचीवर, म्हणजे 40 मीटरवर बांधलेली आहे. तिसर्या पातळीवर मंदिराची शिखरे किंवा कळस बांधलेले आहेत. मंदिराची एकूण उंची तब्बल 65 मीटर किंवा 213 फूट आहे. कागदावर हे आकडे वाचून फारसे काही लक्षात येत नाही पण वर चढण्याचा प्रयत्न करू पाहणार्याला मात्र हे आकडे भेडसावल्याशिवाय रहात नाहीत.
अगदी थोडक्यात सांगायचे तर इजिप्तमधले पिरॅमिड जसे जमिनीपासून बांधत वर नेले आहेत तशीच काहीशी ही बांधणी मला वाटते आहे. अर्थात त्या वेळी छताची स्लॅब वगैरे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळे एवढे मोठे स्थापत्य एकावर एक असे मजले चढवून बांधणे शक्यच नव्हते. त्यामुळेच कदाचित ख्मेर स्थापत्य विशारदांनी एखादा डोंगर रचावा त्या पद्धतीने या मंदिराची रचना केली आहे.
मी असे वाचले होते की मंदिर दोन पद्धतीने बघता येते. एकतर पहिल्यांदा पहिल्या पातळीवरच्या भित्तिशिल्पांसून सुरुवात करायची किंवा नाहीतर प्रथम वर तिसर्या पातळीपर्यंत चढून जायचे व नंतर मंदिर बघत खाली यायचे व पहिली पातळी गाठायचा. मी हाच मार्ग अवलंबवावा असे ठरवतो व वर जायच्या पायर्या चढायला सुरुवात करतो.
20 नोव्हेंबर 2010
अंगकोर वाट मंदिराच्या पहिल्या पातळीवरून दुसर्या पातळीकडे जाण्यासाठी ज्या मूळ दगडी पायर्या बनवलेल्या आहेत त्या चढायला कठिण असल्यामुळे त्याच्यावर आता लाकडी पायर्या बसवण्यात आलेल्या आहेत. या पायर्यांवरून चढत जाणे मला बरेच सुलभ वाटते आहे. जिन्याच्या बाजूला असलेल्या चौकोनी खांबांच्यावर तसेच लिंटेल्सवर सुरेख नक्षीकाम कोरलेले दिसते आहे.
" alt=""> |
दुसर्या पातळीकडे नेणार्या पायर्या
मधल्या एका जागेवरून बाहेर डोकावून बघता येते आहे. तेथून दुसर्या पातळीवरच्या गॅलरीजच्या भिंतीची बाहेरची बाजू मला दिसते आहे. मात्र या भिंतीवर कसलेच कोरीव काम नाही. असे का केले असावे याचा विचार करताना मला या भिंतीवर अनेक बारीक भोके पाडलेली दिसली. कदाचित या संबंध भिंतीवर ब्रॉन्झचा पत्रा लाकडी ठोकळ्यांवर ठोकलेला असावा. हे लाकडी ठोकळे बसवण्यासाठी ही भोके भिंतीवर पाडलेली असावीत. या भोकांचे दुसरे काही प्रयोजन मला तरी सुचत नाही. थोडे आणखी वर गेल्यावर एक प्रवेश द्वार दिसते आहे. यामधून आत गेल्यावर दुसर्या पातळीवरच्या गॅलर्यांच्या पलीकडे म्हणजे तिसर्या पातळीचे मंदिर ज्या पायावर उभे केलेले दिसते आहे तिथपर्यंत मी पोचतो आहे. अर्थातच माझ्या चहूबाजूंना, दुसर्या पातळीवरच्या गॅलर्यांच्या भिंतींची, तिसर्या पातळीच्या समोर येणार्या बाजू आल्या आहेत. अर्थातच वर निळेभोर आकाश दिसते आहे. मला दिसणार्या चारी बाजूंच्या या भिंतींवर मला अप्सरांची चित्रे कोरलेली दिसत आहेत. काही अप्सरा एकट्याच उभ्या आहेत तर काही जोडीने. चार किंवा पाच अप्सरांचा घोळकाही काही ठिकाणी दिसत आहे. तेच तेच शिल्प परत परत कोरण्यात काय प्रयोजन असावे असा विचार करत मी ही शिल्पे लक्षपूर्वक बघतो. यातली प्रत्येक अप्सरा जरी वरकरणी बघितल्यास एकसारखी दिसत असली तरी प्रत्येक शिल्पात अनेक फरक केलेले दिसत आहेत. अप्सरांनी गळ्यात, कानात घातलेले दागिने, डोक्यावर परिधान केलेले मुगुट, हातात धरलेल्या वस्तू आणि चेहर्यावरचे भाव हे सर्व निरनिराळे आहे. म्हणजेच एकच पोझ घेऊन जरी या अप्सरा उभ्या असल्या तरी एकाच प्रकारची वेशभूषा केलेल्या अनेक अप्सरांच्या एका घोळक्याचे शिल्प निर्माण करण्याचा शिल्पकारांचा बहुदा हा प्रयत्न आहे.
अप्सरांचा एक घोळका (दुसरी पातळी)
ख्मेर राजांचे व लोकांचे हे अप्सरा प्रेम कोठून आले असावे? याची बरीच कारणे दिली जातात. आजही अंगकोर मंदिराचे व्यवस्थापन करणारी संस्था स्वत:ला अप्सरा कॉर्पोरेशन म्हणूनच म्हणवून घेते. सियाम रीप मधे अप्सरा हा शब्द नावात असलेली अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व मसाज पार्लर्स आहेत. सियाम रीपच्या एका चौकामधे तर अंगकोरच्या अप्सरेची एक मोठी प्रतिकृती मध्यभागी उभारलेली मी बघितली. ख्मेर लोकांच्या सध्याच्या अप्सरा प्रेमाचे कारण बहुदा व्यापार-धंदा वृद्धिंगत करण्यासाठी योजलेली एक युक्ती हेच असावे. परंतु ख्मेर राजांच्या कालातले हे अप्सरा प्रेम, राजा हा ईश्वरी अंश असतो या समजुतीमुळे निर्माण झाले असावे असे मानले जाते. ही संकल्पना मुळात भारतीय उपखंडातली आहे. ती ख्मेर राजांनी आपलीशी केल्याने ख्मेर राजे हे ईश्वरी अंशाचेच आहेत असे मानले जाऊ लागले. देव हे अप्सरांच्या सान्निध्यात असतात ही अशीच एक मुळातून भारतीय असलेली संकल्पनाही ख्मेर लोकांनी उचलली व सर्व मंदिरांच्यावर अप्सरांची शिल्पे बसवणे अनिवार्य बनले. अंगकोर मधल्या कोणत्याही मंदिरात देवांचे कोणतेही शिल्प वरच्या बाजूला एक दोन उडणार्या अप्सरा असल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. अंगकोर वाट मंदिराच्या दुसर्या पातळीवर राजा व त्याचे वरिष्ठ अधिकारी यांनाच जाता येत होते. राजा हा एक ईश्वरी अंश असल्याने, त्याच्या आवतीभोवती अप्सरांचे सान्निध्य असलेच पाहिजे या कल्पनेने बहुदा या दुसर्या पातळीवर कोरलेल्या शिल्पांमधे फक्त अप्सराच आहेत. याशिवाय याच समजुतीमुळे सर्व ख्मेर राजांनी मोठ्या संख्येने अंगवस्त्रेही बाळगली होती असेही वाचल्याचे मला स्मरते आहे. अप्सरांची विविध रूपे बघत मी आता पूर्व बाजूला पोचलो आहे. समोर तिसर्या पातळीवर जाता यावे म्हणून मुद्दाम बनवलेल्या लाकडी पायर्या व लोखंडी कठडे मला दिसतात. माझ्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट आहे कारण मूळ दगडी पायर्या अतिशय अरूंद व आधार नसलेला बनवलेल्या असल्याने आपण वर कसे जायचे या चिंतेतच मी होतो.
दुसर्या पातळीवरून दिसणारा अग्नेय दिशेकडचा मंदिर कळस
दुसर्या पातळीवरून दिसणार्या तिसर्या पातळीच्या गॅलरीज
तिसर्या पातळीवर जाण्यासाठी बनवलेला लाकडी जिना
मी आता तिसर्या पातळीवरच्या गॅलरीमधे पोचलो आहे. या गॅलरीमधे भिंतींच्यावर कोणतीच शिल्पे नाहीत. काही अप्सरा शिल्पे मला कोपर्यांत दिसत आहेत. या पातळीवर ख्मेर राजा व त्याचा धर्मगुरू यांनाच जाण्याची परवानगी असे. त्यामुळे या सर्व भिंतींवर सोन्याचे किंवा चांदीचे पत्रे ठोकलेले असावेत. मध्यवर्ती गाभार्याचा कळस या पातळीच्या आणखी 17 मीटर उंच आहे. गाभार्यात विष्णूची मूर्ती ज्या स्थानावर उभी असणार तो मध्यवर्ती भाग विटांची भिंत बांधून बंद करण्यात आलेला आहे. या स्थानावर फ्रेंच उत्खनशास्त्रज्ञांनी केलेल्या उत्खननात त्यांना 27 मीटर खोल अशी एक विहिर आढळून आलेली होती व त्या विहिरीच्या तळाशी सूर्यवर्मन राजाच्या वैयक्तिक उपयोगातील अनेक सुवर्ण वस्तू व पात्रे त्यांना सापडली होती. परत कोणी असले उद्योग येथे करू नये म्हणून कदाचित हा भाग बंद केलेला असावा. या भिंतीच्या चारी बाजूंना बुद्धमूर्तींची प्रतिष्ठापना करून त्या मूर्तींची पूजा बुद्ध भिक्कू येथे करत असले पाहिजेत असे दिसते आहे. मी या गॅलरीवरून चारी बाजूंचा देखावा बघतो. ख्मेर राजांच्या डोळ्यांनाच दिसणारे दृष्य़ आता माझ्यासारखा कोणीही सर्वसामान्य बघू शकतो आहे. मी थोडे फोटो काढतो व खाली उतरण्यास सुरवात करतो.
तिसर्या पातळीवरच्या मध्यवर्ती गाभार्यावरचा कळस
तिसर्या पातळीवरून दिसणारे पश्चिम प्रवेश द्वाराचे विहंगम दृष्य
दुसर्या पातळीवरच्या गॅलर्यांच्या आत, बर्याच मोडक्या तोडक्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. तिथे मी क्षणभर विसावतो व नंतर अंगकोर वाट मंदिराचे सर्वात महत्वाचे आकर्षण असलेली पहिल्या पातळीवरच्या चारी बाजूंच्या गॅलर्यांमधली भित्तिशिल्पे बघण्यासाठी खाली येतो.
भित्तिशिल्पांची पहिल्या पातळीवरची पश्चिमेकडची गॅलरी
पहिल्या पातळीवरच्या गॅलर्या पूर्व पश्चिम या दिशांना 215 मीटर एवढ्या लांब आहेत तर उत्तर व दक्षिण दिशांना त्यांची लांबी 187 मीटर एवढी आहे. प्रत्येक बाजूला मध्यभागी, मंदिराच्या अंतर्गत भागात प्रवेश करण्यासाठी, एक गोपुर बांधलेले आहे. या गोपुरामुळे प्रत्येक गॅलरीचे दोन भाग पडतात. यातल्या प्रत्येक भागावर एका विशिष्ट कथेवर आधारित असे सबंध भित्तिशिल्प कोरलेले आहे. या शिवाय चारी कोपर्यांच्यात निराळीच भित्तिशिल्पे आहेत. या कलाकृतीचा एकूण आवाका लक्षात घेतला की मन आश्चर्याने थक्क झाल्याशिवाय रहात नाही. गॅलर्यांच्यातली शिल्पे 3 मीटर उंचीची आहेत. म्हणजे प्रत्येक शिल्प अंदाजे 100 मीटर लांब व 3 मीटर उंच आहे. एवढ्या मोठ्या आकारात जरी ही शिल्पे असली तरी त्यातली प्रमाणबद्धता, बारकावे हे इतके अचूक आहेत की कोणत्याही अचूक मोजमापे करणार्या उपकरणाशिवाय या लोकांनी एवढ्या मोठ्या आकाराची ही शिल्पे कशी बनवली असतील? असा प्रश्न माझ्या मनाला पडला आहे.
मी पश्चिमेकडच्या भित्तिशिल्पापासून सुरूवात करायची ठरवतो. या भित्तिचित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या शिल्पांतून सांगितली जाणारी कथा डावीकडून उजवीकडे चित्रित केलेली आहे. म्हणजेच कथेचा अंत किंवा परमोच्च बिंदू हा डाव्या कोपर्यात येतो. अंगकोर वाट हे मंदिर नसून सूर्यवर्मन राजाची समाधी आहे याचे हे एक कारण म्हणून दिले जाते. पश्चिमेला असलेल्या भित्तिशिल्पात महाभारताचे युद्ध साकारलेले आहे. अगदी खालच्या बाजूला सामान्य योद्धे दाखवलेले आहेत. घोड्यावर किंवा हतीवर बसलेले सेनानी त्यांच्या जरा वर दिसतात तर राजकुमार व महत्वाच्या व्यक्ती सर्वात वर आहेत. सबंध शिल्पात कोरलेले बारकावे इतके प्रभावी आहेत की आपल्या नजरेसमोर एक तुंबळ युद्ध सुरू आहे असा भास झाल्याशिवाय रहात नाही. अगदी डाव्या कोपर्यात, बाणांच्या शय्येवर पडलेल्या भीष्माचार्यांना पाणी हवे असल्याने जमिनीवर शर संधान करणारा अर्जून बाण सोडत आहे, या दृष्याने या भित्तीशिल्पाची सांगता होते. दक्षिणेकडच्या गॅलरीमधल्या भित्तीशिल्पात, सूर्यवर्मन राजा लढाई करताना दाखवला आहे. या ठिकाणीच त्याचे मृत्यूच्या पश्चात असलेले नाव कोरलेले आहे. त्याच्या पलीकडे असलेली यमराजांची रेड्यावर बसलेली मूर्ती व पापी आत्मांना चित्रगुप्त एका काठीने जमिनीत असलेल्या एका गवाक्षातून पाताळात किंवा नरकात ढकलत आहे अशी शिल्पे आहेत. ही चित्रे त्यांच्या कल्पनाविलामुळे मला फार आवडतात.
महाभारतातील तुंबळ युद्ध
शरशय्येवर पहुडलेल्या भीष्मांना पाणी पाजण्यासाठी जमिनीवर शरसंधान करण्याच्या तयारीत अर्जुन
रेड्यावर स्वार झालेले यमराज
चित्रगुप्त पापी आत्म्यांना तळातील दरवाजामधून काठीने नरकात लोटत आहे. खालच्या बाजूस रौरव नरक
. पूर्वेकडच्या गॅलरीमधल्या भित्तिशिल्पात, समुद्रमंथनाचा देखावा कोरलेला आहे. परंतु वासुकीच्या विषारी श्वासोच्छवासांना शंकर कसे सहन करतो आहे एवढेच चित्र मला बघता येते आहे. शंकराच्या अंगाची होणारी दाही मोठ्या कल्पकतेने दाखवली आहे. या बाजूची पुढची शिल्पे, दुरूस्ती कामामुळे मला बघता येत नाहीत. या नंतर उत्तर बाजूच्या गॅलरीमधे, श्रीकृष्णाचे दानवांबरोबरचे युद्ध आणि राम रावण युद्ध या सारखे प्रसंग माझ्या नजरेसमोर उलगडत जात आहेत.
वासुकीच्या विषारी उश्वासांमुळे थरथर कापणारा शंकर
गरुडाच्या पाठीवर स्वार विष्णूचे दानवांशी युद्ध
राम रावणावर शरसंधान करत आहे. खालील बाजूस द्रोणागिरी हातावर घेतलेला हनुमान
रामाबरोबर युद्ध करणारा रावण
हनुमानाचे इंद्रजित बरोबरचे युद्ध
रथात बसलेला राजा श्रीराम, खालील बाजूस वानरसेना
पहिल्या पातळीवरच्या गॅलर्यांची फेरी पूर्ण झाल्यावर मी घड्याळाकडे बघतो. दुपारचा 1 वाजत आला आहे. म्हणजे साडेचार तास तरी मी या मंदिरात अक्षरश: वणवण फिरतो आहे. पायांना थकवा जाणवत असला तरी काहीतरी फार दुर्मिळ असे या डोळ्यांनी बघता आल्याचा आनंदापुढे थकवा केंव्हाच पळून जातो आहे.पश्चिम बाजूच्या पॅसेजवरून मी आता मंदिरातून काढता पाय घेतो. परत जाताना अनेक वेळा मी मागे वळून अंगकोर वाट मंदिराचे एक अखेरचे दर्शन घेतो आहे.
परत फिरताना वळून घेतलेले अंगकोर वाटच्या शिखरांचे छायाचित्र
आज दुपारच्या जेवणासाठी खास ख्मेर पद्धतीचे जेवण घेण्याचे मी ठरवतो. हे जेवण नारळाच्या दुधात शिजवले जाते. चव माझ्या आवडीच्या थाई जेवणासारखीच असल्याने एकूण मजा येते जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून मी साबुदाण्याच्या लापशीसारखा लागणारी एक डिश घेतो.
दक्षिण मध्य एशिया मधे असलेल्या सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवराकडे मी आता निघालो आहे. ‘टोनले साप‘ या नदीच्या पात्रातच हे सरोवर दर वर्षी निर्माण होते. ही नदी नॉम पेन्ह जवळ मेकॉ न्ग या महानदाला जाऊन मिळते. वर्षातले सात आठ महिने, टोनले साप या नदीचे पाणी पुढे मेकॉन्ग मधून वहात जाऊन व्हिएटनामच्या किनार्याजवळ साउथ चायना सी ला मिळते. मात्र सप्टेंबर ऑक्टोबर मधे मेकॉन्ग नदीच्या पाण्यात तिबेट मधल्या पर्वतरांगांच्या मधला बर्फ वितळण्याने व मॉंन्सून या दोन्ही कारणांमुळे प्रचंड वाढ होते. प्रवाहात झालेल्या या प्रचंड वाढीमुळे ऑक्टोबर महिन्यात टोनले साप नदीचा प्रवाह काही काळ चक्क स्थिर होतो व नंतर उलटा म्हणजे मेकॉन्गचे पाणी टोनले साप नदी मधे येणे, अशा प्रकारे वाहू लागतो. या आत येणार्या पाण्याने टोनले साप नदीच्या पात्रात एक विशाल सरोवर निर्माण होते. या कालात पाण्याची उंची 10 मीटरने वाढते. य़ा प्रकारामुळे मेकॉन्ग नदीतले मासे विपुल संख्येने टोनले साप मधे येतात. कंबोडियाच्या पिढ्या न पिढ्या या मत्स्य अन्नावर पोसल्या गेल्या आहेत. नदीकाठी पोचल्यावर मी एक बोट भाड्याने घेऊन फेरफटका मारण्याचे ठरवतो. या सरोवरावर असलेली तरंगणारी खेडेगावे, शाळा ही बघायला खूप रोचक आहेत हे मात्र खरे. मात्र मला सर्वात गंमतीची गोष्ट वाटते ती म्हणजे पाण्यावर असलेली एक दिशा मार्गाची पाटी. शहरातल्या रस्त्यांवर आपण पहात असलेली ही पाटी सरोवराच्या पाण्यावर बघायला मिळेल असे मला स्वप्नातसुद्धा कधी वाटले नसेल.
टोनले साप वरची तरंगती शाळा
नदीवरची एक दिशा मार्गाची पाटी
टोनले साप वर होडी काय कशालाही म्हणता येते
परतीच्या प्रवासात मी इथल्या सरकारने नवोदित कलाकारांना, कंबोडिया मधले, वैशिष्ट्यपूर्ण पाषाण व लाकूड यावरचे कोरीवकाम, रेशमी वस्त्रांवरची चित्रकला वगैरेसारख्या कलांचे शिक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या एका संस्थेला भेट देतो. आपण आपल्या दिवाणखान्यांच्यात वगैरे ठिकाणी ज्यांना स्थान देतो त्या कलाकुसरीच्या वस्तूंना कारागीर कसा जन्म देतात हे बघायला मोठी मजा वाटते.
स्वत:च्या हातांनी देवांच्या मूर्ती घडवण्याचे शिक्षण देणारी शाळा
संध्याकाळचे भोजन घेण्याआधी मी माझ्या हॉटेलच्या जवळच असणार्या एका रेस्टॉरंटमधे, कंबोडियाच्या नृत्यकलेचा एक कार्यक्रम बघायला चाललो आहे. या नृत्य कार्यक्रमात लोकनृत्यांचा जरी समावेश असला तरी हा कार्यक्रम मुख्यत्वे अप्सरा नाच म्हणूनच ओळखला जातो. या अप्सरा नृत्याची परंपरा, ख्मेर राजांच्या कालापासून म्हणजे गेल्या हजार वर्षांची आहे. ख्मेर राजांच्या कालात हे नृत्य फक्त राजा व वरिष्ठ अधिकारी बघू शकत असत. कंबोडिया मधल्या यादवी युद्धात, ही नृत्य परंपरा जवळ जवळ नष्ट झाली होती. आता नॉम पेन्ह मधल्या स्कूल ऑफ फाइन आर्टस या संस्थेत या नृत्याचे परत धडे दिले जातात. या नृत्यप्रकारात 3500 च्या वर एक विशिष्ट अर्थ असलेल्या डान्स मूव्हमेंट्स आहेत. या नृत्यप्रकाराद्वारे सांगितली जाणारी कथा ख्मेर लोकांचे मूळ किंवा ओरिजिन या बद्दल असते. काम्पू नावाचा एक ऋषी व मेरा नावाची एक अप्सरा यांच्या मीलनाची ही कथा असते. या दोघांपासूनच ख्मेर लोकांचा जन्म झाला असे मानले जाते. मला आपल्या पुराणांतल्या विश्वामित्र-मेनका या गोष्टीशी या कथेचे असलेले साधर्म्य बघून गंमत वाटल्याशिवाय रहात नाही. जग किती छोटे आहे याची ही आणखी एक चुणूक.
अप्सरा नृत्य
नृत्यातील प्रमुख अप्सरा
नृत्याचा कार्यक्रम तासभर तरी चालला आहे. नर्तिकांनी परिधान केलेले कपडे, वेशभूषा, दागिने आणि मुगुट हे ख्मेर मंदिरांच्यामधे कोरलेल्या अप्सरांच्या सारखेच आहेत. कोणत्याही अभिजात कलाप्रदर्शनाच्या दर्शनाने मनाला जसा एक हळूवार सुखदपणा जाणवत राहतो तसाच या नृत्यप्रकाराने मला जाणवतो आहे.
आजचा दिवस फारच मोठा होता असे निद्रादेवीची आराधना करताना मला वाटते आहे. उद्या सियाम रीप पासून 30 किमी वर असलेल्या व अंगकोरचे सर्वात सुंदर मंदिर म्हणून ज्याची ख्याती आहे त्या बांते स्राय या मंदिराला भेट द्यायला मला जायचे आहे.
22 नोव्हेंबर 2010
मी अंगकोर मधल्या प्रसिद्ध, बांते स्राय(Banteay Srei) या मंदिराला भेट देण्यासाठी निघालो आहे. हे मंदिर ‘अंगकोर आर्किऑलॉजिकल पार्क मधल्या मंदिरांच्या पैकी एक गणले जात नाही. ते सियाम रीप पासून अंदाजे 25 ते 30 किमी अंतरावर तरी आहे. अंगकोर मधल्या कोणत्याही मंदिराला जरी भेट द्यायची असली तरी प्रथम सियाम रीप जवळच उभारलेल्या एका चेकनाक्यावर जाऊन तुमचा पास दाखवल्यावर पुढे जाता येते. कंबोडिया मधल्या या देवळांची सर्व व्यवस्था, सुरक्षा व निगराणी अप्सरा कॉर्पोरशन ही एक स्वायत्त संस्था करते. या संस्थेनेच हा चेकनाका उभारलेला आहे. हा नाका चुकवून जर एखादे वाहन पळाले तर वायरलेस मेसेज लगेच पाठवला जातो व त्या वाहनाला पुढे कोठेतरी थांबवून त्यातील प्रवाशांकडून प्रत्येकी 200 अमेरिकन डॉलर व चालकाकडून 100 डॉलर दंड वसूल केला जातो. या मुळे मंदिरांना भेट देण्याची परवानगी देणारा पास घेतल्याशिवाय या मंदिरांना भेट द्यायचा प्रयत्न कोणी पर्यटक करताना दिसत नाहीत. माझी गाडी या चेकनाक्यावर थांबते मी माझा पास दाखवतो व आम्ही पुढे निघतो. वाटेल एक मोठे सरोवर मला दिसते. परत येताना इथे थांबले पाहिजे असे मी मनात ठरवतो. या रस्त्यावरून जाताना मला दक्षिण भारतातल्या रस्त्यांची आठवण येते आहे. दोन्ही बाजूंना नजर पोचू शकेल तिथपर्यंत भातशेती दिसते आहे. या भागाला ईस्ट बराये (East Baray)या नावाने ओळखतात. हे नाव याच ठिकाणी ख्मेर राजांनी बांधलेल्या एका विस्तीर्ण जलाशयाच्या नावामुळे रूढ झाले आहे. आम्ही जातो आहोत त्या भागातच हे जलाशय होते व त्या जलाशयाच्या पाण्यावर आजूबाजूचे शेतकरी वर्षाला तीन पिके घेत असत. आज इथली जमीन जरी अत्यंत सुपीक असली तरी फक्त मॉन्सूनच्या कालातच शेतीला पाणी पुरवणे शक्य होते. या शिवाय चांगल्या प्रतीच्या बी-बियाणांची व खतांची असलेली अनुपलब्धतता हे ही कारण आहेच. या सर्व कारणांमुळे आता या भागातले शेतकरी वर्षाला फक्त एकच भाताचे पीक घेतात व पिकवला जाणारा तांदूळही फारसा उच्च प्रतीचा नसतो. असे असले तरी रस्त्याने जाताना, बाजूला दिसणारी खेडेगावे मात्र सधन वाटत होती. याचे प्रमुख कारण या भागाला भेट देणारे पर्यटक आहेत. विश्वास बसणार नाही पण सियाम रीपला दरवर्षी 20 लाख पर्यटक भेट देतात व त्यातले 90 % तरी मी चाललो आहे त्या बांते स्राय मंदिराला भेट देतातच. माझी गाडी आता एका वळणावर डावीकडे वळते आहे. थोड्याच वेळात एका छान विकसित केलेल्या गाडीतळावर आम्ही थांबतो. समोरच मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. हा परिसर पर्यटकांना मदत होईल अशा तर्हेने विकसित केलेला दिसतो आहे. पर्यटकांना विश्रांती घेण्यासाठी जागा, स्वच्छता गृहे वगैरे सर्व आंतर्राष्ट्रीय दर्जाचे आहे. परत एकदा माझा पास मी दाखवतो व मंदिराकडे जाण्यासाठी पुढे निघतो.
बांते स्राय म्हणजे स्त्रियांची गढी ( Citadel of Women). बांते या शब्दाचा अर्थ गढी असा होतो. स्स्राय हा शब्द अर्थातच संस्कृत स्त्री या शब्दापासून आलेला असणार आहे. आता या ठिकाणाला हे नाव का पडले असावे हे कळत नाही. कदाचित या मंदिराला असलेल्या 3 तटबंद्या, याला गढी असे म्हणण्याचे कारण असू शकते. तसेच या मंदिरावरील नाजूक कलाकुसर बघून याला स्त्रियांचे असे नाव मिळाले असावे. या मंदिराचे मूळ नाव त्रिभुवनमहेश्वर होते. तसेच हा भाग ईश्वरपूर या नावाने ओळखला जात असे. या नावांचे बांते स्राय कधी झाले हे कोणालाच सांगता येत नाही. हे मंदिर जरी राजेन्द्रवर्मन (944-968) व पाचवा जयवर्मन (969-1001) या ख्मेर राजांच्या कालात बांधले गेले असले तरी ते कोणत्याच राजाने बांधलेले नाही. हे मंदिर या राजाच्या यज्ञवराह या नावाच्या एका ब्राम्हण प्रधानाने बांधलेले आहे. हा यज्ञवराह ब्राम्हण असला तरी राजाच्या वंशातीलच होता असेही मी एका पुस्तकात वाचले.
बांते स्राय मंदिर, समोर पूर्वेचे मुख्य प्रवेशद्वार दिसते आहे.
मी या मंदिराकडे जाणार्या रस्त्याने पुढे निघालो आहे. एक वळण घेतल्यावर मंदिर समोर दिसते आहे. मंदिराचे प्रथम दर्शन, बायॉन व अंगकोर वाट बघून आलेल्या माझ्या डोळ्यांना, कुठे रस्ता तर चुकलो नाहीना? असे भासते आहे. बांते स्रायचे देऊळ एकदम छोटेखानी आहे. आपल्याकडे जशी देवळे असतात साधारण त्याच मोजमापाचे. सर्व देऊळ एकाच पातळीवर आहे व मागच्या बाजूला असलेले देवळाचे 3 कळस पाहून हे मंदिर दक्षिण भारतात कोठेतरी असावे असा भास मला होतो आहे. मंदिराला हे छोटेखानी स्वरूप कदाचित मुद्दाम दिलेले असावे. हे मंदिर राजाने बांधलेले नसल्याने त्याचा आकार जर राजाने बांधलेल्या मंदिराच्या आकारापेक्षा मोठा असला तर तो त्याचा अपमान झाल्यासारखा होईल म्हणून हे मंदिर छोटेखानी बांधलेले असावे. मी मंदिरात प्रवेश करताना प्रथम एका छोट्या गोपुरातून जातो. याला गोपुर म्हणणे धाडसाचेच आहे कारण सध्या याच्या दरवाजाचा फक्त सांगाडा उभा आहे. यातून पुढे जाण्यासाठी एक पॅसेज आहे व त्याच्या दोन्ही बाजूंना छतांची मोडतोड झालेल्या काही इमारती दिसत आहेत. या इमारतींपाशी येथे भेट देण्यासारखे काहीतरी आहे असे निदर्शनास आणून देणार्या पाट्या आहेत पण परत येताना त्या इमारतींना भेट द्यायची असे ठरवून मी पुढे जातो. पुढे मंदिरात प्रवेश करण्याचे मुख्य गोपुर व त्याच्या दोन्ही बाजूंना गुलाबी लाल रंगाच्या दगडातून बनवलेली तटबंदी दिसते आहे. या तटबंदीच्या भोवती असलेल्या खंदकात थोडेफार पाणी अजुनही दिसते आहे. गोपुराच्या वर असलेल्या दर्शनीय त्रिकोणी पॅनेलकडे (Fronton) माझे लक्ष जाते व आश्चर्याने स्तिमित होऊन मी जागेवरच क्षणभर स्तब्ध होतो. या संपूर्ण पॅनेलवर अनेक देवता, पशु-पक्षी, फुले व वेलबुट्टी असलेले अत्यंत सुंदर, नाजूक व बारीक कोरीवकाम केलेले आहे. बांते स्राय या मंदिराला अंगकोरचे सर्वात सुंदर मंदिर का म्हणतात? हे क्षणार्धात माझ्या लक्षात येते आहे. मी या गोपुरातून पुढे जातो समोर एक नंदीचे एक भग्न शिल्प आहे. त्याचे खूर व शरीराचा थोडाच भाग आता राहिला आहे. मी आणखी थोडा पुढे जातो. गुलाबी, लालसर रंगाचा एक समुद्रच माझ्या नजरेसमोर आहे असा भास मला क्षणभर होतो. बांते स्राय मंदिर संपूर्णपणे या गुलाबी लालसर दिसणार्या एका सॅण्ड स्टोन या दगडामधून बांधलेले असल्याने त्याचा रंग असा लोभसवाणा दिसतो आहे. असे म्हणतात की या दगडाला चंदनासारखा सुवास देखिल येतो. या दगडाचे दुसरे वैशिष्ट्य असे आहे की यावर कारागिराची हत्यारे लाकडावर चालावी तशी चालतात. इथल्या भित्तिशिल्पांचा दर्जा इतका उच्च का आहे याचे हेही एक कारण आहे.
मुख्य प्रवेशद्वार
पश्चिमेच्या बाजूस असलेले तीन मुख्य गाभारे, कोरलेली खोटी द्वारे दिसत आहेत
देवळाच्या तटाच्या आत असणार्या भागात, कडेने चार किंवा पाच, छोट्या व अरूंद अशा हॉलवजा इमारती मला दिसत आहेत. परंतु या इमारतींची छते केंव्हाच नष्ट झाली आहेत व फक्त त्यांच्या भिंती आज अस्तित्वात आहेत. भग्न इमारतींच्या आतल्या बाजूस आणखी एक तट आहे व देवळाचा अंतर्भाग या तटाच्या आत आहे. हा तट ओलांडून पलीकडे जाण्यास पर्यटकांना परवानगी नाही. परंतु हा तट काही फूटच फक्त उंच असल्याने व देवळाचा अंतर्भाग तसा छोटेखानीच असल्याने. आतील सर्व बारकावे सहजपणे बघणे शक्य आहे. आत पश्चिमेच्या बाजूस तीन चौकोनी गाभारे आहेत. यातील मधला गाभारा (शिव मंदिराचा) आयताकृती आहे. बाजूच्या दोन गाभार्यांच्या पूर्वेच्या बाजूस आणखी दोन छोट्या खोल्या आहेत. त्यांना लायब्ररी असे म्हटले जाते. या खोल्यांना बहुदा दुसरे काहीच नाव देता आल्याने हे नाव दिले गेले असावे. या सर्व गाभार्यांच्या बाहेरील बाजूस प्राण्यांची मुखे असलेल्या मानवी मूर्ती रक्षक म्हणून बसवलेल्या आहेत. या मूळ मूर्ती आता नॉम पेन्हच्या वस्तु संग्रहालयात सुरक्षित ठेवल्या गेल्या असून येथे बसवलेल्या मूर्ती बनावट आहेत असे मला समजले. सर्व गाभारे व खोल्या यांच्या चारी बाजूंना खिडक्या किंवा दरवाजे यांच्या आकाराचे कोरीवकाम केलेले आहे. खरे दरवाजे फक्त पूर्व दिशेकडेच आहेत व काही खिडक्याच खर्या आहेत. हे सर्व खरे-खोटे दरवाजे किंवा खिडक्या या सर्वांच्यावर असलेल्या लिंटेल्सवर अप्रतिम भित्तिशिपे कोरलेली आहेत. ही भित्तिशिल्पे बघताना माझे मन खरोखरच आश्चर्याने भरून गेले आहे. या आधी बायॉन व अंगकोर वाटच्या मंदिरातील भव्य भित्तिशिल्पे मी बघितली आहेत. त्या भित्तिशिल्पामधे दगडात कोरीव काम करून एक चित्र आपल्या नजरेसमोर उभे केले आहे असे जाणवते. अंगकोर वाट मधे कोरीव कामाची खोली 3 किंवा 4 पायर्यात करून थोडा फार त्रिमितीचा भास देण्याचा प्रयत्नही दिसतो.या ठिकाणी मात्र सलग त्रिमितीमधली शिल्पकला आहे. फुले, शंखासारखे आकार तर बाहेर तयार करून दगडावर चिकटवले आहेत असे वाटू लागते. मी अशा प्रकारची त्रिमिती भित्तिशिल्पे कधी बघितल्याचे मला आठवत नाही. एका ठिकाणी शंकर पार्वती बसलेले हिमालयाचे एक पर्वत शिखर, रावण आपल्या सामर्थ्याने हलवतो आहे तर दुसर्या एका शिल्पात कृष्ण आपला मामा कंस याच्याशी त्याच्याच प्रासादात कुस्ती खेळताना दाखवला आहे. ऐरवतावर आरूढ झालेला इंद्र, एका शिल्पात मानव, पशु-पक्षी यांच्या अंगावर दैवी पावसाचा वर्षाव करताना दिसतो. या शिल्पात पावसाचे किरण तिरप्या रेषांनी अतिशय सुंदर रित्या दाखवले आहेत. मला सगळ्यात आवडलेले शिल्प शंकरावर मदन किंवा कामदेव फुलांचे बाण सोडतो आहे व पलीकडे पार्वती बसलेली आहे हे आहे. यात शंकराचा तिसरा डोळा इतक्या बारकाईने दाखवलेला आहे की या कलाकारांच्या कौशल्याची कमाल वाटते. या शिवाय सर्व गाभार्यांच्या द्वाराजवळ असलेल्या अप्सरांची शिल्पे इतक्या बारकाव्यांसह कोरलेली आहेत की हे देऊळ बघतच बघावे असे वाटत राहते.
विष्णू
वेलबुट्टी
त्रिमिती
खंदकाच्या पाण्यातले देवळाचे प्रतिबिंब
मी मग मंदिराच्या तटाच्या बाहेरील बाजूस असलेल्या खंदकाच्या बाजूने एक चक्कर मारतो. एक दोन ठिकाणी मंदिराचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब सुरेख दिसते आहे. परतताना बाजूच्या भग्न हॉल्समधे एक दृष्टीक्षेप टाकायला मी विसरत नाही. या ठिकाणी नृसिंह हिरण्यकश्यपूची छाती फोडतानाचे एक सुंदर पॅनेल मला बघायला मिळते. बांते स्राय्च्या अप्रतिम भित्तिशिल्पांमुळे या मंदिरातील मूर्ती व शिल्पे लुटण्याचे सर्वात जास्त प्रकार झालेले आहेत. Andre Malraux या प्रसिद्ध फ्रेंच लेखकाने इथल्या चार देवतांच्या मूर्ती चोरण्याचा प्रयत्न केला होता व त्या बद्दल त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. या मंदिरातील शिल्पांचा दर्जा एवढा श्रेष्ठ आहे की मूळ शिल्प संग्रहालयात ठेवून त्या जागी ठेवलेली बनावट शिल्पे सुद्धा चोरण्याचेही प्रयत्न होताना दिसतात. मंदिराच्या बाजूला, या मंदिराचा शोध व बाजूचे उत्खनन, याबद्दल माहिती देणारे एक छोटे प्रदर्शन आहे ते मी बघतो व थोड्याशा अनिच्छेनेच परतीचा रस्ता धरतो आहे.
अंकावर पार्वती बसलेल्या शंकराला रावण गदागदा हलवत आहे.
कृष्ण व कंस यांची कुस्ती
नृसिंह अवतार, खालच्या बाजूस हिरण्यकश्यपू
ऐरावतावर आरूढ इंद्र दैवी पावसाचा वर्षाव मानव, पशू, पक्षी यांच्यावर करत आहे.
वाली आणि सुग्रीव यांच्यातील युद्ध डाव्या बाजूस बाण सोडण्याच्या तयारीत राम
उजव्या बाजूला असलेल्या पार्वतीकडे शंकराने बघावे म्हणून त्याच्यावर आपला फुलाचा बाण सोडण्याच्या तयारीत असलेला कामदेव
परतीच्या मार्गावर असलेल्या प्रेह रूप (Preah Rup)या देवळाजवळ गाडी थांबते. हे मंदिर दुसरा राजेंद्रवर्मन (944-968)या राजाने बांधले होते. माझ्या कार्यक्रमात मी बघत असलेले हे सर्वात जुने देऊळ असल्याने मला त्यात खास रुची आहे. अंगकोर वाटच्या 175 वर्षे आधी हे मंदिर बनवले गेले होते. या देवळाचा आराखडा अंगकोर वाट प्रमाणेच, तीन पातळ्यांचा मंदिर-पर्वत असाच आहे. किंवा असे म्हणता येते की या मंदिरावरून अंगकोर वाट चा मूळ आराखडा केला असावा. सर्वात वरच्या पातळीवर तीन गाभारे आहेत. या गाभार्यांचे सर्व बांधकाम एका नैसर्गिक डिंकाच्या सहाय्याने चिकटवलेल्या विटांचे आहे. हजार वर्षांनंतरही हे वीटकाम अजून टिकून आहे हे एक आश्चर्यच म्हणायचे. मंदिर चढायला मात्र बरेच कष्टप्रद वाटते आहे. वर गेल्यावर काही सुंदर लिंटेल्स बघायला मिळाली. अर्थात ही शिल्पकला अंगकोर वाट पेक्षा आणखी 200 वर्षे जुनी आहे हे ही शिल्पे बघताना जाणवते आहे.
प्रेह रुप मंदिर, गाभारे वीटकाम करून बांधलेले आहेत
प्रेह रुप मधले लिंटेल. 10व्या शतकातले कोरीवकाम
प्रेह रूप वरून खाली उतरल्यावर आता थोड्याफार विश्रांतीची गरज आहे हे जाणवू लागले आहे. एव्हांना माझी गाडी जाताना लागलेल्या मोठ्या सरोवराजवळ पोचलेली आहे. या सरोवराच्या काठावर ख्मेर पद्धतीचे भोजन देणारी बरीच रेस्टॉरंट्स मला दिसतात. मी येथेच थांबून भोजन घ्यायचे व थोडी विश्रांती घ्यायची असे ठरवतो.
25 नोव्हेंबर 2010
चविष्ट ख्मेर भोजनाचा आस्वाद घेऊन मी रेस्टॉरंटच्या बाहेर येतो. समोरच्याच बाजूला असलेला हा जलाशय जगातील सर्वात मोठा पोहण्याचा तलाव म्हणून ओळखला जातो. याचे नाव आहे स्रा स्रान्ग(Sra Srang). या नावाचा अर्थ होतो शाही स्नानगृह. सातवा जयवर्मन या राजाने स्वत:च्या स्नानासाठी व ध्यानधारणेसाठी शांत जागा पाहिजे म्हणून याची निर्मिती केली होती. या जलाशयात आजही भरपूर पाणी दिसते आहे. तलावाच्या मध्यभागी एक छोटेसे बेट ठेवून तेथे एक छोटी झोपडी बांधली होती. त्या झोपडीत राजा ध्यानधारणा करत असे. तलावाच्या एका बाजूला स्नानाची जागा म्हणून घाट बांधलेला आहे. त्यावरची कलाकुसर अजुनही बर्याच प्रमाणात टिकून आहे. या तलावामुळे हा भाग मोठा रमणीय झाला आहे हे मात्र खरे! त्याच्या काठावर ख्मेर जेवण देणारी बरीच रेस्टॉरंट्स दिसतात. एकूणच स्पॉट मस्त आहे.
स्रा स्रॉन्ग जलाशय, जगातील सर्वात मोठा पोहण्याचा तलाव |
शाही स्नानगृह |
भोजन झाल्यावर आता मी माझ्या ठरवलेल्या कार्यक्रमापैकीचे शेवटचे देऊळ बघायला चाललो आहे. ता प्रॉम (Ta Prohm.) या नावाने ओळखल्या जाणार्या या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य आहे. या मंदिरावर, मधल्या काळात(इ.स.1400 ते 1800) आजुबाजुला वाढणार्या जंगलाच्या आक्रमणामुळे जो विध्वंस झाला तो बर्याचशा प्रमाणात तसाच जतन करून ठेवण्यात आलेला आहे. निसर्ग जसा पृथ्वीचे वर्धन करत असतो तसाच तो आक्रमण करून मानवनिर्मित बांधलेल्या सर्व कृत्रिम वस्तू नष्टही करत असतो. मानवाने बांधलेली मंदिरे ही कितीही भव्य व विशाल असली तरी शेवटी कृत्रिमच म्हणावी लागतात. त्यांची देखभाल बंद झाल्याबरोबर निसर्गाने ही कृत्रिम मंदिरे कशा पद्धतीने उध्वस्त करण्यास आरंभ केला होता हे येथे छान जपून ठेवण्यात आले आहे.
ता प्रॉम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भारत-कंबोडिया एकत्रित प्रकल्प |
माझी गाडी मंदिराच्या पूर्व प्रवेश द्वाराजवळ मला सोडते. प्रवेशद्वारावरचे गोपुर आता जवळपास नष्ट झाल्यासारखे आहे. द्वाराजवळ लावलेल्या एका बोर्डवर भारताच्या ध्वजाचे चित्र बघितल्याने जवळ जाऊन मी तो बोर्ड मुद्दाम बघतो. भारत सरकार व कंबोडियाचे सरकार यांनी ता प्रॉम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम एकत्रित हातात घेतलेले आहे असे हा बोर्ड सांगतो आहे. या साठी भारत सरकार आर्थिक मदत करते आहे. मला हा बोर्ड बघून मनातून बरे वाटते. भारतीय संस्कृतीचे पुरातन वैभव काय होते याची जपणूक करणार्या या अंगकोरच्या परिसराचे जतन करण्यात भारत सरकारचा कुठे तरी हातभार लागतो आहे ही माझ्या दृष्टीने खरोखर आनंदाची बाब आहे.
या द्वारातून प्रवेश करून मी पुढे जातो आहे. मोठमोठ्या वृक्षांच्या घनदाट छाया असलेल्या एका रस्त्यावरुन पुढे गेल्यावर, समोरचे दृष्य बघून माझी पाय एकदम थबकतातच. समोर एक पडकी वास्तू दिसते आहे. हे बहुदा मंदिराचे प्रवेश गोपुर असावे. या वास्तूच्या डोक्यावर एक मोठे झाड चक्क उगवल्यासारखे दिसते आहे. फोटो काढायला शिकणारे शिकाऊ उमेदवार, जसे समोरच्या माणसाच्या डोक्यातून उगवलेला एखादा खांब किंवा नारळाचे झाड या सारखे फोटो काढतात, तसेच हे समोरचे दृष्य आहे. जर मी याचा नुसता फोटो बघितला असता तर ही काहीतरी फोटोग्राफीची ट्रिक आहे असे समजून त्यावर कधीच विश्वास ठेवला नसता. आता समोर हे दृश्य दिसतच असल्याने त्यावर विश्वास ठेवणे भागच आहे.
अशक्य कोटीतील ता प्रॉम |
ता प्रॉम मंदिराचा सर्व परिसर या असल्या अजस्त्र व अवाढव्य वृक्षांच्या छायेखाली सतत झाकलेला असल्याने अगदी टळटळीत दुपारी सुद्धा इथली हवा थंड व हवेशीर असते. या पडक्या गोपुरातून प्रवेश करून मी आतल्या बाजूला जातो. समोरचे दृश्य फक्त ‘इंडियाना जोन्स‘ किंवा त्या सारख्या तत्सम चित्रपटातच फक्त शोभणारे आहे. मी समोरून बघितलेल्या झाडाने आपली मुळे या वास्तूच्या सर्व बाजूंनी पसरवून अगदी आवळत आणली आहेत. हॉलीवूडच्या अनेक चित्रपटात ता प्रोम मंदिरातील ही गळा आवळणारी झाडे दाखवलेली आहेत. ऍन्जेलिना जोली या सुप्रसिद्ध नटीने लारा क्रॉफ्ट ही व्यक्तीरेखा सादर केलेल्या ‘टूम्ब रेडर‘ या चित्रपटातील काही भागाचे चित्रीकरण या ठिकाणीच केले गेले होते. मी लहान असताना 20000 Leagues under the Sea.या नावाचा एक चित्रपट बघितला होता. त्या चित्रपटात दाखवलेल्या एका महाकाय ऑक्टोपसची, मला ही झाडाची मुळे बघून आठवण होते आहे.
गळा आवळणारी मुळे |
पुस्तके आणि गाइड्स यात दाखवलेल्या आराखड्याप्रमाणे ता प्रॉम बघताच येत नाही. ही महाकाय झाडे इतकी वेडीवाकडी आणि कशीही वाढलेली आहेत की त्यांच्यातून मार्ग काढतच मंदिर बघावे लागते. मंदिर व्यवस्थापनाने यासाठी एक मार्ग आखून दिला आहे त्यावरूनच चालावे लागते. हा मार्ग इतका वेडावाकडा आहे की माझे दिशांचे सर्व ज्ञान आता नष्ट झाले आहे. पूर्णपणे गोंधळलेल्या स्थितीत मी दिलेल्या मार्गावरून चालतो आहे.
हत्तीचा पाय?
नर्तकी कक्षाची चालू असलेली देखभाल |
ता प्रॉम मंदिर सातवा जयवर्मन (1181-1220)या राजाने आपल्या आईच्या स्मृतीसाठी बांधले असे शिलालेखावरून समजते. हे बुद्धाचे मंदिर आहे असे समजले जाते. पण काही तज्ञ हे मंदिर देवांचा जन्मदाता ब्रह्मा याचेच हे मंदिर आहे असे मानतात. माझ्या मार्गावर एका वास्तूची देखभाल करणारे लोक मला दिसतात. एक मोठी क्रेनही उभारलेली दिसते आहे. ही वास्तू नर्तकी हॉल म्हणून ओळखली जाते. काही काळापूर्वी शेजारील एक मोठे झाड, वीज कोसळल्याने या वास्तूवर पडले व त्याची मोडतोड झाली. आता भारतीय व कंबोडियाचे तज्ञ ही वास्तू पुन्हा ठीकठाक करत आहेत. माझ्या मार्गावर मला अगदी अंधार्या बोळकंड्यांतून सुद्धा जावे लागते आहे. जवळच्या भिंतींना मोठमोठे तडे गेलेले दिसत आहेत. त्यामधून पावसाचे पाणी झिरपल्यामुळे सर्वत्र हिरवे शेवाळे वाढले आहे. तरीही कुठेतरी मधूनच, कानाकोपर्यातून, सुंदर भित्तिशिल्पे डोकावताना दिसत आहेत. एक ब्रम्हा-विष्णू-महेश यांचे शिल्प मला दिसते. डोक्यावर नर्तकी नाच करत आहेत, खालच्या बाजूस भक्तगण आहेत. दुर्दैवाने मधली विष्णूची मूर्ती कोणीतरी चोरून नेलेली आहे. या मंदिरातून जाताना मधेच अगदी रहस्यमय किंवा भीतिदायक वाटू लागते . तेथून जरा पुढे गेले की अचानक एखादी सुंदर अप्सरा तुम्हाला दिसते.
मंदिराचा एक कळस |
ब्रह्मा- विष्णू – महेश, वर अप्सरा, खालच्या बाजूस भक्तगण ( शिव मूर्ती चोरीस गेलेली आहे.) |
भित्तिशिल्पाचा एक नमुना, प्रत्येक वर्तुळातील डिझाईन निराळेच आहे.
ता प्रॉम मधली एक अप्सरा
मंदिराच्या अंतर्भागातील शेवाळे चढलेल्या भिंती
ता प्रॉम हे एकेकाळी अत्यंत सधन आणि श्रीमंत असे संस्थान होते. येथे सापडलेल्या एका संस्कृत शिलालेखाप्रमाणे, या मंदिराच्या मालकीची 79365 लोक रहात असलेली 3140 गावे होती. 500 किलोहून जास्त वजन असलेली सोन्याची पात्रे, 35 हिरे, 40620 मोती, 4540 रत्ने, 876 रेशमी अवगुंठने, 5121 रेशमी पलंगपोस आणि 523 रेशमी छत्रे एवढी संपत्ती या मंदिराच्या मालकीची होती. त्या काळातले हे एक तिरूपती मंदिरच हे होते असे म्हणले तरी चालेल.
पश्चिम प्रवेश द्वाराकडून दिसणारे ता प्रॉम मंदिर
मी मंदिराच्या पश्चिम द्वारामधून बाहेर पडतो. या द्वाराजवळ जीर्णोद्धाराचे बरेच काम चालू दिसते. अगदी बाहेरच्या तटाजवळ, बायॉन मंदिरावर बघितलेले जयवर्मन राजाचे चार चेहरे मला परत एकदा दर्शन देतात.आज मला हे चेहेरे “परत नक्की या हं!” असेच सांगत आहेत असा भास होतो.
पश्चिमेकडचे प्रवेश गोपुर
सातव्या जयवर्मन राजाचा चेहरा
माझी गाडी परतीच्या मार्गावर निघाली आहे. माझ्या मनाला मात्र काहीतरी अपूर्णता जाणवते आहे. गेले तीन दिवस मी एवढी भव्य व विशाल मंदिरे बघितली तरी कोठेतरी काहीतरी राहिले आहे, Missing आहे असे मला सारखे सारखे वाटते आहे. हे असे वाटण्याचे कारण माझ्या एकदम लक्षात येते. ही सर्व मंदिरे मी बघितली आहेत खरी! पण ती सर्व एखाद्या पोकळ शिंपल्यासारखी आहेत. ती मंदिरे आहेत असे मानले तर ज्या देवांसाठी किंवा बुद्धासाठी ती बांधली त्या मूर्तीच कोठे दिसल्या नाहीत. जर या वास्तू, राजांच्या समाधी आहेत असे मानले तर निदान त्या राजांच्या मूर्ती किंवा समाधी तरी तिथे आवश्यक होत्या. एखाद्या उत्सवाचा मांडव बघावा पण त्यात उत्सवमूर्तीच असू नये असा काहीसा प्रकार येथे होतो आहे.
एके काळी या मूर्ती तिथे नक्कीच होत्या. परंतु लोभ या मानवी दुर्गुणामुळे, अंगकोरच्या मंदिरातील मूर्ती व भित्तिशिल्पे यांची अनेक शतके चोरी होत राहिलेली आहे. शेवटी उरलेल्या सर्व मूर्ती या मंदिरातून उचलून संग्रहालयात सुरक्षित जागी ठेवण्यात आलेल्या आहेत. हा सगळा खुलासा ठीक आहे हो! पण माझ्या मनाला जी अपूर्णता वाटते आहे त्याचे काय करायचे असा माझ्यापुढे आता खरा प्रश्न आहे.
माझ्या मनाला आलेली ही अपूर्णतेची भावना घालवण्यासाठी, मी आता अंगकोर राष्ट्रीय संग्रहालयाला भेट देण्याचे ठरवतो. या म्युझियमचे नाव जरी राष्ट्रीय संग्रहालय असले तरी प्रत्यक्षात ते बॅन्कॉक मधील एक ट्रस्ट, Vilailuck International Holdings यांच्या मालकीचे व एक कमर्शियल संस्था म्हणून चालवले जाणारे संग्रहालय आहे. या प्रदर्शनातील सर्व एक्झिबिट्स, नॉम पेन्हचे राष्ट्रीय संग्रहालय व कंबोडियन सरकारच्या आता ताब्यात असलेली एक मूळ फ्रेंच संस्था Ecole Française d’Extrème Orient (French School of Asian Studies) यांच्याकडून भाडेतत्वावर आणलेली असल्याने, सर्व एक्झिबिट्स मात्र अस्सल किंवा ओरिजिनल आहेत. सियाम रीप मधले हे म्युझियम, नॉम पेन्ह मधल्या मुझियमपेक्षा बरेच लहान आहे असे म्हणतात. परंतु हे म्युझियम फक्त अंगकोर बद्दलच असल्याने मला तरी ते पुरेसे वाटते आहे. म्युझियम मधल्या पहिल्या हॉल मधे बुद्धाच्या 1000 मूर्ती आहेत पण या प्रकारच्या बुद्धमूर्तींचे दालन मी बर्याच ठिकाणी बघितले आहे. सिंगापूर मधल्या राष्ट्रीय संग्रहालयात अशा बुद्धाच्या मूर्ती आहेत किंवा भारतात कर्नाटकमधल्या कूर्ग जिल्ह्यातल्या बायलाकुप्पे या गावाजवळ एक मोठा तिबेटी मठ आहे त्यातही बुद्धाच्या अनेक मूर्तीं आहेत. अंगकोर संग्रहालयाच्या पुढच्या सात दालनांत मात्र मला अपेक्षित असलेली बहुतेक एक्झिबिट्स मोठ्या आकर्षक पद्धतीने मांडून ठेवलेली मला दिसत आहेत. ख्मेर राजांचे अर्ध पुतळे, त्यांचा इतिहास, त्यांच्या लढाया व त्यांनी बांधलेली मंदिरे या संबंधी सर्व माहिती येथे मिळते आहे. अंगकोरची मंदिरे ज्या देवांच्या मूर्तींसाठी बांधली गेली त्या विष्णू , ब्रह्मा, शंकर यांच्या मूर्ती व शिवलिंगे ही येथे बघता येत आहेत. पुढच्या एका दालनात अंगकोर मधले सापडलेले अनेक शिला लेख ठेवलेले आहेत. या ठिकाणी काही शिला लेख संस्कृतमधे आहेत असे खालची पाटी वाचल्याने, ते शिलालेख मी वाचण्याचा निष्फळ प्रयत्न करतो. मात्र माझी निराशाच होते कारण भाषा संस्कृत असली तरी लिपी पाली किंवा ख्मेर आहे. ही लिपी खूपशी थाई लिपी सारखीच दिसते. नंतरच्या दालनात अनेक अप्सरांचे मस्तक विरहित पुतळे आहेत. त्यांच्या अंगावरचे अलंकार किंवा कपडे हे त्या काळातल्या परिधान केल्या जात असलेल्या अलंकार किंवा कपडे यासारखे हुबेहूब असल्याने त्या वेळची वेशभूषा, कपडे या संबंधीची माहिती येथे दिसते आहे.
सातवा जयवर्मन राजा (फोटो पॅरिस म्युझियम)
म्युझियम मधून बाहेर पडल्यावर माझ्या लक्षात येते आहे की माझ्या मनाला वाटणारी अपूर्णता आता पार नाहीशी झाली आहे. अंगकोरची माझी भेट पूर्ण झाली आहे.
अंगकोर मधे हजार वर्षापूर्वीची भारतीय संस्कृती व धर्म (हिंदू व बुद्ध) यांची ही गौरवशाली परंपरा बघितल्यावर प्रत्यक्ष भारतात त्या काली ही संस्कृती किती वैभवशाली असली पाहिजे असे माझ्या मनात येते आहे. भारतापासून 2000 मैलावरचा हा एक देश, आपल्या देशातील लोकांचा मूळ पुरुष भारतीय आहे असे नाते अजून सांगतो. भारतीय धार्मिक परंपरा काय होत्या हे आपल्या देशातील पुरातन मंदिरे, संग्रहालये यातून जतन करतो आहे व या परंपरांबद्दल अजून अभिमान बाळगतो आहे. सियाम रीप मधले गाईड्स त्यांच्या रोजच्या कामात हजारो नव्हे लाखो जगभरच्या लोकांना भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगताना ऐकून त्यावर काय बोलणार असे मनात येते आहे. मात्र या देशाबरोबरचे भारताचे संबंध मैत्रीचे असले तरी जिव्हाळ्याचे नाहीत. भारतीय पर्यटकांना सियाम रीप बद्दल पुरेशी माहितीच नाही. भारतातून थेट विमान सेवा सुद्धा सियाम रीपला नाही. या सगळ्या गोष्टी झाल्या तर भारतीय पर्यटकांचा ओघ अंगकोरकडे सुरू झाल्याशिवाय रहाणार नाही हे नक्की.
सातवा जयवर्मन राजा (फोटो पॅरिस म्युझियम)
सॉमरसेट मॉम या लेखकाचे एक वाक्य मी आधी उध्द्रुत केले होते. तो म्हणतो की “अंगकोर वाट बघितल्या शिवाय कोणी मरणाचा विचार सुद्धा करू नये.” मी या विधानात थोडासा बदल करून एवढेच म्हणेन की भारतीय वंशाच्या प्रत्येकाने अंगकोर वाट मंदिराला आवर्जून भेट दिलीच पाहिजे.
28 नोव्हेंबर 2010