मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ३.

(भाग १ आणि भाग २ अनुक्रमे येथे आणि येथे उपलब्ध आहेत.)

१) नाकी नऊ येणे.

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्॥
भगवद्गीता ५.१३

इंद्रिये आणि विकारांवर ताबा मिळविलेला आत्मा काही कार्य न करता अथवा करविता नऊ द्वारांच्या नगरामध्ये (नऊ रन्ध्रे असलेल्या शरीरामध्ये) आनंदाने राहतो.

शरीराची नऊ रन्ध्रे म्हणजे दोन कान, दोन डोळे, दोन नासिका, मुख, गुदद्वार आणि मूत्रद्वार. भारतीय कल्पनेनुसार प्रत्येक रन्ध्राशी एक प्राण संबद्ध आहे आणि सर्वसामान्य व्यक्तीच्या मृत्युक्षणी अन्य सर्व रन्ध्रे बंद होऊन सर्व प्राण नाकातून बाहेर जातात. ’नाकी नऊ येणे’ म्हणजे मृत्युसमयासारखा अत्यवस्थाप्रसंग निर्माण होणे. हिंदीमधील ’नाकमे दम आना’ ह्या म्हणीमध्ये हा अर्थ आणखी स्पष्ट दिसतो.

२. अकटोविकट.

(’विकटोपशास्त्री’ ह्याचा उगम काय असा प्रश्न ’ऐसीअक्षरे’ येथे ह्या जागी विचारण्यात आला आहे. त्यावरून सुचलेले विचार येथे मांडत आहे.)

विकट म्हणजे भयानक, कुरूप इत्यादि. त्यावरूनच गणपतीचे एक नाव ’विकट’ असे आहे (’बिकट वाट वहिवाट नसावी’ हा फटका, विकटकवि हा palindrome, तेनालि रामाला मिळालेली ’विकटकवि’ ही पदवी, विकटनितंबा ही संस्कृतमधे लिहिणारी कवयित्री ह्या सर्वांची येथे आठवण येते.) ’अकटविकट’ किंवा ’अकटोविकट’ हे त्यामधून द्वित्त्वाने सिद्ध झालेले रूप. तोच अर्थ अधिक जोराने सांगण्यासाठी अकारयुक्त द्वित्त्व असलेला नवा शब्द निर्माण करणे ही एक मराठी - आणि हिंदीचीहि - प्रवृत्ति दिसते. तिची अन्य उदाहरणे म्हणजे अक्राळविक्राळ, अल्याडपल्याड, ऐलपैल, आरपार, आसपास, अडोसपडोस, ऐरागैरा, अघळपघळ, अचकटविचकट, अलाबला, अरगशागरगशा, आटपाट, अबरचबर, अरबटचरबट असे शब्द. (अकटचिकट म्हणजे फार बारकाव्यात जाणार, न सोडणारा असाहि शब्द मोल्सवर्थमध्ये दिला आहे पण तो सध्याच्या वापरात आहे असे दिसत नाही.)

३) सूर्यापोटी शनैश्वर.

शनि ग्रहाला संपूर्ण तारामण्डलातून एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास सुमारे ३० वर्षे लागतात आणि भारतीय ज्योतिषाला माहीत असलेल्या ग्रहांमध्ये त्याची चाल सर्वात मंद आहे. ह्यावरून त्याला शनैश्चर (शनैः चरति - सावकाश चालतो) असे एक अभिधान आहे. त्याचा अपभ्रंश शनैश्वर.

४) डुड्ढाचार्य.

कन्नडमध्ये ’दोड्ड’ म्हणजे ’मोठा’ असा अर्थ आहे असे वाटते. दोड्ड+आचार्य ह्यावरून स्वत:ला शहाणा समजणार्‍या माणसाला डुड्ढाचार्य असे नाव पडले.

५) दुःखं न्यासस्य रक्षणम्.

सुखमर्थो भवेद्दातुं सुखं प्राणाः सुखं यशः।
सुखमन्यद्भवेत्सर्वं दुःखं न्यासस्य रक्षणम्॥

स्वप्नवासवदत्त १.१०

६) नीरक्षीरविवेक.

हंसः श्वेतो बकः श्वेतः को भेदो बकहंसयोः।
नीरक्षीरविवेके तु हंसो हंसो बको बकः॥

हंस शुभ्र दिसतो आणि बगळाहि. हंस आणि बगळा ह्यांमध्ये काय फरक? दूध आणि पाणी वेगवेगळे करण्यावरून हंस हा हंस ठरतो आणि बगळा तो बगळा राहतो.

७) अहो रूपमहो ध्वनिः.

उष्ट्राणां लग्नवेलायां गर्दभा मन्त्रपाठकाः।
परस्परं प्रशसन्ति अहो रूपमहो ध्वनिः॥
सुभाषित.

उंटांच्या विवाहात मन्त्र म्हणायला गाढवे होती. एकमेकांची ते प्रशंसा करीत होते - काय सुंदर रूप आणि काय मधुर आवाज!

८) यथा काष्ठं च काष्ठं च.

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ।
समेत्य च व्यपेयातां तथा भूतसमागमः॥
महाभारत शान्तिपर्व १६८.१५

(नियतीमुळे) समुद्रामध्ये दोन ओंडके एकत्र भेटतात आणि भेटल्यावर दूर होतात. मनुष्यांचे मीलनहि असेच होते.

९) स्वयमपि लिखितं स्वयं न वाचयति.

चतुरः सखि मे भर्ता यलिखितं तत्परो न वाचयति।
न वाचयति परलिखितं स्वयमपि लिखितं स्वयं न वाचयति॥

(तीन नवोढा आपापल्या नवर्‍यांचे गुणगान करीत आहेत.) ’सखे, माझा नवरा इतका हुशार आहे की त्याने लिहिलेले दुसरा कोणी वाचू शकत नाहीत.’ दुसरी म्हणते, ’माझा नवरा इतका हुशार आहे की दुसर्‍याने लिखिलेले वाचायची त्याला आवश्यकता नाही.’ तिसरी म्हणते, ’माझा नवरा तर इतका हुशार आहे की त्याने स्वतः लिहिलेले तो स्वतःच वाचू शकत नाही!’

१०) सेवाधर्मः परमगहनो योगिनामप्यगम्यः.

मौनान्मूकः प्रवचनपटुर्वातुलो जल्पको वा
धृष्टः पार्श्वे भवति च वसन् दूरतश्चाप्रगल्भः।
क्षान्त्या भीरुर्यदि न सहते प्रायशो नाभिजातः
सेवाधर्मः परमगहनो योगिनामप्यगम्यः॥
भर्तृहरि नीतिशतक.

(सेवक) मितभाषी असला तर मुका ठरतो, बोलका असला तर वेडा किंवा बडबडया ठरतो, सहनशील असला तर भित्रा आणि सहन न करणारा असला तर बहुतांशी नीच पातळीचा ठरतो. सेवकाचा धर्म कळायला अवघड आणि ज्ञात्यांच्याहि समजुतीपलीकडचा आहे.

११) अति सर्वत्र वर्जयेत्. अति तेथे माती.

अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात्सुयोधनः
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्॥
शार्ङ्गधरपद्धति

अतिदानामुळे बळिराजा बांधला गेला. अति गर्वामुळे सुयोधन पराभूत झाला. अति मोहामुळे रावणाचा नाश झाला. म्हणून कोठल्याहि गोष्टीचा अतिरेक करू नये.

१२) अतिपरिचयादवज्ञा.

अतिपरिचयादवज्ञा सन्ततगमनादनादरो भवति।
मलये भिल्लपुरन्ध्री चन्दनतरुकाष्ठमिन्धनं कुरुते॥
(लोकः प्रयागवासी कूपे स्नानं समाचरति॥)
शार्ङ्गधरपद्धति.

अति घसटीतून अवज्ञा होते आणि सारखे गेल्याने आदरभाव नष्ट होतो. उदा. मलयपर्वतावर राहणारी भिल्ल स्त्री चंदनाच्या लाकडाचे जळण करते. (संगमाच्या क्षेत्री राहणारे लोक विहिरीवर स्नान करतात.)

१३) यावज्जीवं सुखं जीवेत्.

यावज्जीवेत्सुखं जीवेदृणं कृत्वा घृतं पिबेत्।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः॥
सर्वदर्शनसंग्रह चार्वाकदर्शन

आयुष्य आहे तोंवर सुखाने जगावे, कर्ज काढून तूप प्यावे. देह भस्मसात् झाल्यावर तो परत कोठून येईल?

(हा श्लोक सर्वदर्शनसंग्रहातच असाहि दर्शविला आहे:

यावज्जीवेत्सुखं जीवेन्नास्ति मृत्योरगोचरः।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः॥

आयुष्य आहे तोंवर सुखाने जगावे, मृत्यु ज्याला शोधणार नाही असा कोणीहि नाही. देह भस्मसात् झाल्यावर तो परत कोठून येईल?

सर्वदर्शनसंग्रहात चर्चेच्या प्रारंभी हा श्लोक असा देऊन अखेरीस चार्वाकदर्शनाचा सारांश दाखवितांना प्रथम दाखविलेल्या रूपान्तरात तो दिला आहे. ग्रंथकर्ते विद्यारण्यस्वामी हे अस्तिक परंपराभिमानी असल्याने त्यांनी हा बदल केल्याचे दिसते आणि जनमानसाची पकड ह्या रूपान्तरानेच घेतली आहे.)

१४) खल्वाटो निर्धनः क्वचित्.

क्वचित्काणो भवेत्साधुः क्वचिद्गानी पतिव्रता।
दन्तहीनो क्वचिन्मूर्खः खल्वाटो निर्धनः क्वचित्॥
सुभाषित.

काणा माणूस क्वचितच सज्जन असतो, गाणेबजावणे करणारी स्त्री क्वचितच पतिव्रता असते, तोंडाचे बोळके झालेला माणूस क्वचितच मूर्ख असतो आणि टक्कलवाला क्वचितच निर्धन असतो.

१५) कालाय तस्मै नमः.

सा रम्या नगरी महान्स नृपतिः सामन्तचक्रं च तत्।
पार्श्वे सा च विदग्धराजपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः।
सर्वं यस्य वशादयात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः॥
भर्तृहरि नीतिशतक.

ती रमणीय नगरी, तो महान् राजा, ते मन्त्रिमंडळ, पार्श्वभूमीवर ती विद्वानांची सभा, त्या चन्द्रमुखी युवती, तो उच्छृंखल राजपुत्रांचा घोळका, ते भाटचारण, त्या गोष्टी....हे सगळे ज्याच्यामुळे स्मृतिशेष झाले त्या काळाला नमस्कार असो.

१६) दुःखं न्यासस्य रक्षणम्.

सुखमर्थो भवेद्दातुं सुखं प्राणाः सुखं यशः।
सुखमन्यद्भवेत्सर्वं दुःखं न्यासस्य रक्षणम्॥
स्वप्नवासवदत्त १.१०

धनाचे, प्राणांचे आणि यशाचे दान करणे सोपे आहे. बाकी सर्व सोपे आहे. (विश्वासाने सोपविलेल्या) ठेव्याचे रक्षण करणे कष्टदायक आहे.

१७) न स्त्रीः स्वातन्त्र्यमर्हति.

पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
पुत्रो रक्षति वार्धक्ये न स्त्रीः स्वातन्त्र्यमर्हति॥
मनुस्मृति ९.३

कुमारवयात पिता, तरुणवयात पति आणि वार्धक्यात पुत्र स्त्रीला सांभाळतो. स्त्री स्वतन्त्र राहू शकत नाही.

१८) यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रियाः॥
मनुस्मृति ३.५६

जेथे स्त्रियांना आदर दिला जातो तेथे देवांचा निवास असतो. जेथे त्यांना आदर दिला जात नाही तेथील सर्व कार्ये निष्फल असतात.

१९) स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्यं देवो न जानाति कुतो मनुष्यः.

राष्ट्रस्य चित्तं कृपणस्य वित्तं मनोरथं दुर्जनमानुषाणाम्।
स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्यं देवो न जानाति कुतो मनुष्यः ॥
सुभाषित.

राष्ट्राचे मन, कृपणाचे धन, दुष्टांचे कल्पनाविलास, स्त्रीचे चारित्र्य आणि पुरुषाचे दैव हे देवालाहि माहीत नसतात तर मग माणसाचे काय?

२०) हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार.

रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्
भास्वानुदेष्यति हसिष्यति पङ्कजश्रीः।
इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनीं गज उज्जहार॥
अप्पय्यदीक्षितकृत कुवलयानन्द.

(दैवाचा कल्पनेत नसलेला हस्तक्षेप.) रात्र संपेल, सकाळ होईल, सूर्य उगवेल, कमळ फुलेल - कमळाच्या कोशात अडकलेला भुंगा असा विचार करीत असतांनाच अरेरे, हत्तीने कमळाची वेलच उपटली.

’नरो वा कुञ्जरो वा’ किंवा ’अश्वत्थामा हतो नरो वा कुञ्जरो वा’ ह्या आणि ’अधिकस्याधिकं फलम्' अशा दोन सुप्रसिद्ध वचनांचा मूलस्रोत अनेक प्रयत्न करूनहि मला मिळालेला नाही. कोणास माहीत असल्यास प्रतिसादामधून अवश्य कळवावे.

पहिल्या वचनामागची गोष्ट द्रोणपर्वामध्ये ७-८ श्लोकांमध्ये दिली आहे ती अशी. द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी कृष्ण असे सुचवितो की त्यांना निःशस्त्र केल्याशिवाय ते होणे अशक्य आहे. म्हणून अश्वत्थामा नावाचा एक हत्ती मारावा आणि द्रोणाचार्यांपर्यंत पर्यंत ही वार्ता पोहोचवावी. तदनुसार भीमाने हत्ती मारून तसे द्रोणाचार्यांना कळविले. तो आपला पुत्र अश्वत्थामा किंवा कसे ह्याची निश्चिति करण्यासाठी द्रोणाचार्यांनी सत्यवचनी युधिष्ठिराला ते विचारले. त्यावेळी त्याने अश्वत्थामा मारला गेला असे उच्च आवाजात सांगून ’हत्ती किंवा मनुष्य’ हे शब्द आपल्याशीच उच्चारले. आपला पुत्र मारला गेला असे वाटून द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली टाकले आणि हे पाहून धृष्टद्युम्नाने रथावर चढून त्यांचा वध केला.

महाभारतातील ह्याविषयीचा श्लोक असा आहे:

तमतथ्यभये मग्नो जये सक्तो युधिष्ठिर:।
अव्यक्तमब्रवीद्राजन् हतः कुञ्जर इत्युत॥ ७.१६५.१०६.

वेणीसंहार नाटकामध्ये ह्याच प्रसंगाचे वर्णन असे आहे (अंक ३):

अश्वत्थामा हत इति पृथासूनुना स्पष्टमुक्त्वा
स्वैरं शेषे गज इति किल व्याहृतं सत्यवाचा।
तच्छ्रुत्वासौ दयिततनयः प्रत्त्ययात्तस्य राज्ञः
शस्त्राण्याजौ नयनसलिलं चापि तुल्यं मुमोच॥

’नरो वा कुञ्जरो वा’ किंवा ’अश्वत्थामा हतो नरो वा कुञ्जरो वा’ हे शब्द महाभारतात वा अन्य कोठल्याच प्रसिद्ध रचनेत सापडत नाहीत आणि तरीहि सर्व भारतीय भाषांमध्ये हे वचन सरावाचे आहे. तर मग ते आले कोठून? पुनः ते गद्यात आहे, कोठल्याच वृत्तात बसत नाही. सर्व संस्कृत रचना जवळजवळ ९९% काव्यबद्ध असतात, हेहि गूढ आहेच.

ते वृत्तात बसविण्याचा एक प्रयत्न मला सापडला. ’अश्वत्थामा हतो ब्रह्मन् नरो वा कुञ्जरोऽथवा’ असा तो प्रयत्न आहे पण ही कोणाचीतरी नंतरची रचना दिसते कारण कारण सर्वप्रसिद्ध वाक्य ’नरो वा कुञ्जरो वा’ किंवा ’अश्वत्थामा हतो नरो वा कुञ्जरो वा’ असेच आहे.

अशीच दुसरी अडचण ’अधिकस्याधिकं फलम्’ ह्या वाक्याच्या स्रोताबाबतची. एका ठिकाणी मला हे वाक्य नारदस्मृतीत आहे असा उल्लेख मिळाला. पैतृक संपत्तीचे वाटप करतांना कुटुंबासाठी जॊ जास्ती झटतो त्याला अधिक वाटा मिळावा अशा अर्थाने ते वचन नारदस्मृतीमध्ये आहे असे म्हटले होते. मी सर्व नारदस्मृति चाळली. मजसमोरील आवृत्तीत मला हे वाक्य दिसले नाही.