http://mr.upakram.org/node/777 हे नवीन वाचकांनी प्रथम वाचावे. आता भाग १ मधिल "काही सामान्य शंका "पुढील प्रकरण. फलज्योतिष हा विषय हा तसा अघळपघळ आहे. काही मुद्द्यांची पुनरावृत्ती आढळल्यास ती काही वाचकांची सोय आहे असे मी मानतो. विशेष करुन ज्यांना अनुक्रमे वा शिस्तबद्ध पद्धतीने वाचन करता येणे शक्य नाही त्यांच्या साठी.
२७) पत्रिकेचे गुणमेलन म्हणजे काय?
वधूवरांच्या पत्रिका या विवाहाच्या अनुषंगाने एकमेकींशी किती जुळतात हे पहाणे म्हणजे गुणमेलन. पत्रिका-गुणमेलन करताना वर्णगुणाला १, वैश्यगुणाला २, तारागुणाला ३, योनिगुणाला ४, ग्रहमैत्री गुणाला ५, गणगुणाला ६, राशीकूटगुणाला ७ आणि नाडीगुणाला ८ अशा चढत्या क्रमाने गुण दिलेले असून सर्व गुणांची बेरीज ३६ होते. हे सर्व गुण वधू-वरांच्या पत्रिकेत चंद्र कुठल्या नक्षत्रात कितव्या चरणात आहे यावर ठरलेले असते. त्यासाठी पंचांगात रेकनर सारखे कोष्टक असते. ते पाहून ३६ पैकी १८ पेक्षा अधिक गुण जमले तर विवाह जमवण्यास हरकत नाही असा निकष असतो. खरं तर या गुणमेलनात फक्त चंद्राचाच विचार होतो म्हणून ते परिपूर्ण किंवा ' शास्त्रीय ` नाही असे काही ज्योतिष्यांचंच म्हणणं आहे. एकंदरीत, परीक्षेसाठी असलेल्या अभ्यासक्रमात कुठल्या टॉपिकला किती गुण हे जसे दिलेले असते तसाच इथे प्रकार आहे. गुणमेलन ही संकल्पना वैवाहिक जीवनासाठी वधू-वर एकमेकास अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी निर्माण झाली असावी. प्रेम, त्याग, सांमजस्य, या गोष्टी सुखी वैवाहिक जीवनास पोषक असतात. दोन भिन्न प्रकृतीची माणसं जर एकत्र आली तर वैवाहिक जीवनाचा समतोल ढासळतो. तसे होउ नये म्हणून त्यांच्या प्रकृतीचे मूल्यमापन पत्रिकेच्या माध्यमातून करून त्याचा निष्कर्ष सांगण्याचा प्रयत्न गुणमेलनाद्वारे केला गेला असावा.
२८) विवाह जुळवण्याचे वेळी पत्रिका बघावी का?
महात्मा फुल्यांनी गेल्या शतकात एक प्रश्न केला होता की 'आपल्याकडे पत्रिका पाहून लग्न करूनही बालविधवांचे प्रमाण जास्त का ? इंग्लंड, अमेरिकेत तर पत्रिका वगैरे न बघता विवाह करतात तरी तिकडे हे प्रमाण जास्त नाही.` याचे कारण साधे आहे. आपल्याकडे बालविवाहाची प्रथा व बालमृत्यूचं प्रमाणही जास्त असल्यामुळे साहजिकच बालविधवांचे प्रमाण जास्त होतं. पण त्याचा संबंध ज्योतिषाशी नाही. पत्रिका न पहाता लग्ने झाली असती तरी हेच प्रमाण राहिले असते. प्रश्न हा आहे की पत्रिका पाहून लग्न झालेल्या मुलींच्या नशिबी वैधव्य येत नाही असे दिसते का ?
कालानुरूप पत्रिका गुणमेलनाची चिकित्सा होत गेली व त्यातील निष्फळता सुजाण लोकांच्या ध्यानात येवू लागली. छत्तीस गुण जुळूनही मने न जुळल्याने अयशस्वी ठरलेल्या वैवाहिक जीवनाची उदाहरणे दिसू लागली. उलट, पत्रिका न जुळताही समाधानी वैवाहिक जीवन जगणारी माणसं दिसू लागली. या संदर्भात सुप्रसिद्ध लेखक डॉ अनिल अवचट एकदा म्हणाले, ''सुनंदाशी माझं लग्न होण्यापूर्वी घरच्या मंडळींनी पत्रिका जुळते का नाही हे परस्परच बघितलं. वडिलांना एका ज्योतिषाने सांगितलं कि मुलीची पत्रिका जुळत नाही, तुम्ही हे लग्न जुळवू नका, अरिष्ट आहे. परंतु घरच्यांचा विरोध पत्करून मी हे लग्न केलं. आता मला असं वाटतं की मी आयुष्यातला एकमेव महत्वाचा योग्य निर्णय घेतला होता.``
परंतु आजही समाजात उच्च शिक्षित वर्गातही पत्रिका जुळण्याचे फॅड गेलेले नाही. "त्या रावनं बघा पत्रिका न बघता लग्न केलं, प्रेमविवाह ना! बसलाय आता बोंबलत. बुद्धीवादी ना! " तो जाडया माहीतीये का? अरे त्याने रूपावर भाळून लग्न केलं, तरी आई सांगत होती चांगल्या ज्योतिषाला पत्रिका दाखव म्हणून ! पण नाही, अरे जवानी में तो गधी भी सुंदर दिखती है । आता म्हणतोय आईच ऐकलं असतं तर बरं झालं असतं. 'वालावालकरांच्या मुलाच्या लग्नाचे वेळी ज्योतिषाने सांगितलं होत कि हे लग्न ठरवू नका. कुटुंबातील व्यक्तिच्या जीवाला धोका आहे. वालावालकरांनी दुर्लक्ष केले व लग्न ठरवले. आणि काय सांगू लग्नाच्या ऐन मुहूर्तावर नवऱ्या मुलाचा सख्खा भाऊ अपघातात गेला. मी स्वत: डोळयांनी बघितलेली हकिगत आहे.` 'अहो मुलगी लग्नानंतर आपल्या बॉयफ्रेण्डबरोबर पळून गेली.` 'थोडक्यात वाचलो! ज्योतिषानं सांगितलं होतं मुलीचं कॅरॅक्टर बघा. नीट चौकशी केली तेव्हा कळलं की तिचं कॉलेजमधल्या मुलाबरोबर लफडं आहे म्हणूनं.` 'मुलगा दिसायला वागायला स्मार्ट उच्चशिक्षित, पण ज्योतिषानं सांगितले की मुलगा बाहेरख्याली वाटतो आणि तस्सच निघालं.` अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्या कानावर पडत असतात. ती खोटी असतात अशातला भाग नसतो.
अयशस्वी वैवाहिक जीवनाचं वाढलेलं प्रमाण, घटस्फोट इ. गोष्टी मनावर ताण निर्माण करतात. पत्रिका-मेलन मनाला आधार देतं. तो आधार तर्कबुद्धी किंवा विज्ञान देत नाही. पत्रिका-मेलन करूनही वैवाहिक जीवन अयशस्वी झालं तर ' आपण आपल्याकडून काळजी घेतली होती शेवटी नियतीची इच्छा! ` असं म्हणून मानसिक आधार मिळवला जातो. लग्नाच्या गाठी म्हणे स्वर्गात बांधल्या जातात. एक प्रथितयश ज्योतिषी श्री.श्री. भट हे आपल्या 'ज्योतिषाच्या गाभाऱ्यात` या पुस्तकात म्हणतात, '' विवाह पहाताना ठरविताना पत्रिका पाहणार नाही असा प्रचार केला जातो. तरुणांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. वैवाहिक जोडीदार कोण असणार हे अटळ प्रारब्ध असते त्यात ज्योतिष हे निमित्त असते. `` तर दुसरे मान्यवर ज्योतिषी श्री. व.दा.भट म्हणतात, '' मी स्वत: ज्योतिषी असलो तरी एक गोष्ट प्रंाजलपणे कबूल केली पाहिजे की वधूवरांची कुंडली जुळते अगर जुळत नाही या बद्दल हमखास अनुभवास येतील असे, ज्यावर पूर्ण विसंबून रहावे असे कोणतेही नियम नाहीत. पत्रिका जुळते अगर जुळत नाही या शब्दांना वास्तविक अर्थ नाही.`` ( संदर्भ 'भाग्य` दिवाळी ९७ )
पत्रिका कुठल्या कारणासाठी बघितली जाते ते आपण पाहिले. पण पत्रिकेवरून वजन, उंची, छाती, शिक्षण, विचारश्रेणी, अर्थिक क्षमता, रक्तगट, आरोग्य इत्यादि गोष्टी अजिबात समजत नाहीत. त्यामुळे पत्रिका बघण्यात काही अर्थ नाही. मात्र विवाह जुळवण्याची पद्धत जरूर विचारात घ्यावी. कारण प्रेमविवाहांची संख्या जशी वाढलीय् तशी घटस्फोटांची संख्याही वाढलीय्. शारिरिक आकर्षणातून निर्माण झालेलं प्रेम हे तकलादू असतं. त्यात विवेकापेक्षा भावनेचा पगडा जास्त असतो. तर दुसरीकडे सध्या प्रचलित असलेली विवाह जमवण्याची रीत ही एक प्रकारच्या जुगारासारखी आहे. तिच्यात केवळ व्यावहारिक गोष्टींसाठी बायोडाटा देतात व 'स्थळ बघण्याचा` कार्यक्रम होतो. त्यात मुलगा-मुलगी एकमेकांना थोडेबहुत प्रश्न विचारतात.यातून एकमेकाच्या व्यक्तिमत्वाचा काय अंदाज येणार? तसं ही 'माण्ूास` ओळखणं हे अवघडच काम. एकमेकाच्या सहवासात जन्म काढूनही परस्परांची खऱ्या अर्थानं ओळख न झालेली माणसं आढळतात. तिथं आपल्या आयुष्याचा साथीदार इतक्या तकलादू पद्धतीने निवडणे कितपत उचित होईल ? परिचयोत्तर विवाह हा एक चांगला पर्याय होउ शकेल. मैत्रीतून स्वभावाविषयी थोडाफार तरी अंदाज आलेला असतो. त्यामुळे अशा रितीने होणारा विवाह हा जुगार ठरण्याची शक्यता कमी. पण शेवटी, मैत्री आपल्या जागी रहाते व विवाह आपल्या जागी रहातो. विवाह ही व्यावहारिक बाब आहे. नुसत्या उदात्त कल्पनेने वैवाहिक जीवन काही जगता येत नाही. सांपत्तिक स्थिती, स्थावर, मानलौकीक, कौटुंबिक स्थिती या गोष्टी वा व्यावहारिक गरजा ही महत्वाच्या आहेत. फिल्मी स्टाईल प्रेमाच्या व त्यागाच्या बाता व्यवहारात कुचकामी ठरतात हे ध्यानात आल्यावर भ्रमनिरास होउन विवाह अयशस्वी ठरतात. म्हणूनच 'घटस्फोट मिळेल का?` असे ज्योतिषाकडे विचारायला जाणारा वर्ग वाढलाय. विवाह हा संस्कार न ठरता सोपस्कार व्हायला लागला आहे. आमच्या मते विवाह जुळवण्यासाठी पत्रिका पहाणे निरर्थक आहे.
२९) मंगळदोष म्हणजे काय?
जन्मकुंडलीत १, ४, ७, ८, १२ यापैकी कुठल्याही स्थानात मंगळ असेल तर तो मंगळदोष आहे असे समजले जाते. ताऱ्यांच्या तेजाची जशी प्रतवारी असते तशी या मंगळाच्या कडकपणाचीही प्रतवारी आहे. कडक मंगळ, सौम्य मंगळ, क्षम्य मंगळ ही प्रतवारी कशी ठरवतात तर पत्रिकेतला मंगळ राशीबल व स्थानबळ यांच्यामुळे किती पॉवरफुल आहे यावरून ठरवतात.
सांगून आलेल्या मुलाची / मुलीची पत्रिका मंगळाची आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी हल्ली ज्योतिषाची गरज भासत नाही. किरकोळ आजारासाठी आपण लगेच डॉक्टरकडे धावतो का? आपल्याला घरगुती वा प्राथमिक उपचार माहीत असतात. तद्वत हा मंगळाचा प्रथमोपचार हल्ली पुष्कळ लोकांना - बायकांना सुद्धा - माहीत असतो. मंगळ दिसल्याबरोबर नकार देण्यात येतो!
बापाला मुलगी म्हणजे एक भार त्यातून मुलीला मंगळ असला की विचारायलाच नको. अशावेळी एखादे गुरुजी-कम-ज्योतिषी-कम मध्यस्थ अशी मंगळी मुलगी खपवायचं काम कुशलतेनं करीत असतात. मुलीच्या मंगळाला जाब विचारणारे राहू, केतू शनी यांना पुढे करून मंगळदोषाचा परिहार होतोय् असे मुलाकडच्यांना पटवून ते ही मुलगी खपवतात. अशा मध्यस्थीतून त्यांना आर्थिक लाभही होत असतो. साहजिकच मंगळाचा बागुलबुवा ज्योतिषीलोक जोपासतात. विवाहाच्या सौदेबाजीत मंगळ हा एक हुकमी पत्ता ठरतो.
मंगळदोष म्हटला की वैवाहिक सौख्याचा बोऱ्या, वैधव्य असा समज आहेे. उगीच विषाची परिक्षा कशाला घ्या असे म्हणून लोक मंगळ असलेल्या मुलीला नकार देतात. पण त्यातही गंमत अशी आहे की 'मंगळ्या` मुलाला मंगळ नसलेली मुलगी एकवेळ चालते पण मंगळ असलेल्या मुलीला मात्र मंगळ्याच नवरा लागतो कारण तो तसा नसेल तर तिला कायमच्या वैधव्याची भीती असते. मुलांना विधुरावस्थेची भीती निदान पूर्वीच्या काळी तरी वाटत नसावी. कारण त्यांना पुन: पुन: लग्ने सहज करता येत असत ! जन्मकुंडलीत बारा स्थाने असतात त्यातल्या पाच स्थानात मंगळ असण्याची शक्यता जवळजवळ चाळीस टक्के असते. म्हणजे शेकडा ४० टक्के कुंडल्यात हा पीडादायक मंगळ असणारच! त्यामुळे विवाह जुळवणे फार मुश्कील व्हायचे म्हणून पूर्वाचार्यांनी काही अपवाद शोधून काढले. सौम्य मंगळ, क्षम्य मंगळ असे ते अपवाद आहेत. मंगळ-दोषाचा हा इतिहास काही फार प्राचीन नाही, अलीकडचाच म्हणजे १७ व्या शतकापासूनचा आहे पण त्याचा जबरदस्त पगडा लोकांच्या मनावर बसला आहे. मंगळदोषाचे उल्लेख हे मुहूर्त गणपती, मुहूर्त चिंतामणी, भाव चिंतामणी, ज्योतिर्महार्णव अशा ग्रंथांमध्ये आढळतात.
मुहूर्तचिंतामणी या ग्रंथामध्ये मंगळदोषासाठी अपवादही सांगितले आहेत. वधूच्या पत्रिकेत जर वरील स्थानापैकी एकात मंगळ असून वराच्या पत्रिकेतही तशाच स्थानात असेल तर मंगळाने मंगळास जाब पाहिला असे म्हटले जाते. आखाड्यातील पहिलवान जशी एकमेकाची ताकद अजमावत असतात त्या पद्धतीने वधूवरांच्या पत्रिकेत मंगळ एकमेकांना जाब विचारतात म्हणे! अंगात आलेल्या बायकांच्या देव्या सुद्धा एकमेकीला श्रेष्ठत्वाबद्दल जाब विचारतात. अर्थात याचा शेवट प्रत्येकजण आपापल्या जागी श्रेष्ठ अशा समन्वयात होतो. तद्वत मंगळ्याला मंगळी जमून जाते. नंतरच्या ग्रंथकारांनी जाब विचारण्याचे हे अधिकार शनी, राहू, केतू यांना दिले आहेत. पत्रिकेतील गुरु, शुक्र हे ही शुभ ग्रह आपापल्या स्टेटस नुसार नैतिक दबाव आणू लागले. मेष, कर्क, वृश्चिक, धनु, मीन या राशीही मंगळाला आंजारू गोंजारू लागल्या. पत्रिका गुणमेलनात जर २७ किंवा त्यापेक्षा अधिक गुण झाले तर मंगळाकडे काणाडोळा करू लागले. अशा रितीने मंगळाचे अपवाद वाढू लागले. अनेक मान्यवर ज्योतिषांनी सुद़्धा मंगळ-दोष हे खूळ आहे अशी सडेतोड भूमिका घेतली. वि.गो.नवाथे, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, द्वा.ना. राजे, ज्योतिषाचार्य सुंठणकर इत्यादि मोठमोठ्या लोकांचा त्यात समावेश आहे. ज्योतिषाचार्य महामहोपाध्याय शां. श्री. सुंठणकरांनी तर मंगळदोषाचे स्तोम ज्योतिष्यांनीच माजवले आहे असे म्हणून 'विवाह मंगळाची अनावश्यकता` या १९६६ साली लिहिलेल्या पुस्तकात ज्योतिष्यांंचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यात त्यांनी मंगळदोषाला १०७ अपवाद दिले आहेत. ते म्हणतात, '' जगात अगणित विवाह होत असतात. भारत सोडल्यावर सर्व जगभर मंगळ पद्धती विचारात न घेता विवाह जमत असतात. मंगळ पद्धती सर्व जगातल्या लोकांना कशी भोवत नाही? का फक्त भारतीय जनतेच्या बोकांडी बसण्याचा तिचा हेका आहे? सदा सर्वदा पृथ्वीतलावर थोडयाशा लोकांना वैवाहिक जीवन विफलतेचा फटकारा बसत राहणार या निसर्गक्रमास थांबवण्याची ताकद मंगळाच्या कुवतीच्या बाहेरची आहे.`` मंगळाच्या बाबतीत ज्योतिर्विद मंडळी लुच्चेगिरी करतात असे खुलेपणाने सांगण्याचे धाडस त्यांनी केले आहे. पुस्तकातली आणखी काही निवडक वाक्ये उद्धृत करतो:- 'यदाकदाचित् मंगळाच्या पद्धतीचा बाष्कळपणा समाजास उकलला तर ज्योतिषी लोकांचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात मार खाईल अशी साधार भीती त्यांना वाटत असल्यास न कळे! ज्योतिष कार्यालयांच्या उत्पन्नाचा फार मोठा वाटा या मंगळाने उचललेला असल्याने ज्योतिर्विद मंडळी या पद्धतीच्या भंपकपणाकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करीत असतील असे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही.` आम्ही तरी यापेक्षा अधिक परखड काय म्हणू शकणार ? लोकांना हे उमजेल तेव्हा खरे !
३०) एकनाड असल्यास रक्तगट एक येतो व संतती होत नाही अथवा अडचणी येतात यात तथ्य काय?
आमच्या मते या समजुतीत काहीही तथ्य नाही. फलज्योतिषात नाडी या शब्दाचा नेमका अर्थ काय ते कुठेही स्पष्ट सांगितलेले नाही. एकनाड-दोषामुळे होणारे दुष्परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सांगितले आहेत. नाडीग्रंथात नाडी म्हणजे एक पळाचा अवधी. शरीरशास्त्रात नाडी म्हणजे रक्तवाहिनी. फलज्योतिषात अमुक नक्षत्रावर जन्मलेल्या माणसाची नाडी अमुक एवढेच सांगितले आहे. अंत्य, आद्य, मध्य अशा तीन प्रकारच्या नाड्या सांगितलेल्या आहेत. जगातला प्रत्येक माणूस या तीनपैकी कोणत्या तरी एका नाडीचा असतोच. पंचांगात अवकहडा चक्र नावाचे एक कोष्टक असते. त्यावरून जन्मनक्षत्राच्या आधारे तुमची नाडी कोणती ते कळते. उपवर मुलगा व मुलगी या दोघांची नाडी एकच आहे असे दिसले तर तिथे एकनाडीचा दोष आहे म्हणून त्या दोघांचे लग्न करू नये कारण अशा जोडप्याला संतती होत नाही अशी वेडगळ श्रद्धा प्रचलित आहे. पत्रिका-गुणमेलनात नाडीला सर्वात जास्त म्हणजे आठ गुण दिले आहेत. नाडीचा संबंध रक्तगटाशी जोडण्याचा प्रयत्न काही ज्योतिषीलोक करतात पण तो त्यांचा कावेबाजपणा आहे. का? ते पहा. रक्तगट हे अे, बी, अेबी, ओ, आरएच पॉझिटीव्ह व निगेटीव्ह असे एकूण आठ प्रकारचे आहेत. तीन नाडया व आठ प्रकारचे रक्तगट यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. पत्नीचा रक्तगट आरएच निगेटिव्ह व पतीचा रक्तगट आरएच पॉझिटिव्ह असल्यास एक प्रॉब्लेम निर्माण होतो तो असा की, त्या जोडप्याच्या पहिल्या अपत्याला जरी काही त्रास झाला नाही तरी नंतरच्या अपत्याला धोका संभवतो. पण यावरही आता डॉक्टरी उपाय निघाला आहे. एकनाड-दोषामुळे जोडपे निपुत्रिक रहाते ही समजूत जर खरी असती तर संभवनीयतेच्या नियमानुसार जगातली एक-तृतीयांश जोडपी निपुत्रिकच राहिली असती! पण तसे काहीच आढळत नाही. यावरून उघड दिसते की ही समजूूत म्हणजे एक खुळचटपणा आहे. एकनाड-दोषाला काही अपवाद गर्गसंहितेमध्ये दिले असले तरी पूर्वीच्या - व आजच्याही -ज्योतिष्यांच्या अडाणीपणामुळे म्हणा किंवा अंधानुकरणाने म्हणा एकनाडीचे फालतू स्तोम माजले आहे.
एकनाड-दोषावर आजवर झालेल्या टीकेचा एक परिणाम असा झालेला दिसतो की आता दाते पंचांगात पृष्ठ ८६ वर नाडी-दोषाचे वेगळेच परिणाम सांगण्यात आले आहेत. तिचा संबंध आता संततीशी नसून माणसाच्या स्वभावाशी जोडण्यात आला आहे, संतती बाबत मौन पाळण्यात आले आहे, पण एकनाडीमुळे मृत्यूदायक दोष निर्माण होतो अशी दहशत आता पृष्ठ ९० वर घातली आहे ! दुसरा महत्वाचा बदल म्हणजे एकनाड -दोष ठरवण्यासाठी आख्ख्या नक्षत्राऐवजी त्याचा फक्त एक चरणच विचारात घ्यावा असे नरपतिजयचर्या स्वरोदय या ग्रंथाचा आधार देउन सांगितले आहे. या बदलामुळे एकनाड -दोषाच्या केसेसचे प्रमाण एकदम खाली येउन ते फक्त २५ टक्क्यावर येते असा दावा केला आहेे. पण या प्रकाराचा खरा अर्थ काय होतो ते पहा. गेली शेकडो वर्षे चालत आलेल्या रूढीमुळे ७५ टक्के केसेस मध्ये निष्कारणच एकनाड-दोष मानून स्थळे नाकारली गेली असाच याचा अर्थ होत नाही का ? आम्ही तर म्हणतो की एकनाड-दोष ही कल्पनाच मुळी मूर्खपणाची असल्यामुळे तिच्याकडे सरळ दुर्लक्ष करावे.
३१) मृत्यूषडाष्टक काय आहे?
समजा तुमची जन्मरास मेष आहे व तुम्हाला सांगून आलेल्या जोडीदाराची रास कन्या आहे. मेषेपासून कन्या रास ६ वी येते. कन्येपासून पुढे मोजल्यास मेष रास आठवी येते. सहा-आठ म्हणजे षडाष्टक. असा योग असलेल्या जोडीदारांचे एकमेकाशी पटत नाही अशी समजूत आहे. षडाष्टक शब्दामागे मृत्यू हा शब्द जोडला म्हणजे एकदम दहशत निर्माण होते. ज्योतिषांना तेच हवे असते. ते अशी समजूत घालतात की मृत्यू शब्दाचा अर्थ वैवाहिक सुखाचा मृत्यू असा घ्यायचा. हाच अर्थ शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. ज्योतिष्यांचे एकूण धोरण काय तर विवाह या गोष्टीसंबंधात मंगळ, मृत्यूषडाष्टक, एकनाड असे काहीतरी प्रश्न वा अडचणी आपणच आधी निर्माण करायच्या व आपणच त्याला 'शास्त्राधार` देउन मार्गदर्शन करण्याचा आव आणायचा व स्वत:च्या तुमड्या भरायच्या.
३२) मुहूर्त पहाणे योग्य का अयोग्य?
मुहूर्त म्हटले की भास्कराचार्य-लीलावतीची गोष्ट हमखास सांगितली जाते. लीलावती ही भास्कराचार्यांची लाडकी लेक. तिच्या कुंडलीत वैधव्ययोग होता. पण भास्कराचार्यांनी असा विवाहाचा मुहूर्त शोधून काढला की तिचा वैधव्ययोग टळेल. पण विवाहाचे वेळी अक्षतेचा दाणा का मणी घटिकापात्रात पडलेने तो तळाशी जावून भोकात अडकला व मुहूर्त चुकला व शेवटी व्हायचे तेच झाले. या दंतकथेच्या छटा बदलतात पण आशय तोच. मुहुर्ताची महती. थोडा इकडेतिकडे झाला की काय उलथापालथ?
मे महिना म्हणजे सुट्टी,लग्नसराईचे दिवस. आता या काळात लग्नाचा मुहूर्त नाही म्हणजे गैरसोयच नाही का? कार्यालयाची उपलब्धता हा पण हल्ली एक महत्वाचा मुद्दा झाला आहे. मुहूर्त असलेल्या तारखांना कार्यालय मिळणे हे देखील भाग्यच मानायची वेळ आली आहे. पंचांगात रेडीमेड मुहूर्त दिलेले असतात. पण हे रेडिमेड मुहूर्त सुद्धा 'लाभतात` की नाही हे बघावे लागते. जसे रेडिमेड कपडे सर्वांनाच 'फिट` होतील असे नसतात कधी कधी ते 'अल्टर` करावे लागतात तसेच मुहूर्ताचे आहे. एखादी वेळ ही कुणासाठी आनंदाची असते तर कुणासाठी दु:खाची असते, कुणासाठी कसोटीची असते तर कुणासाठी निवांतपणाची असते, कुणासाठी जोडायची असते तर कुणासाठी तोडायची असते, कुणाची जन्माची असेल तर कुणाची मृत्यूची असेल. कुणाची कशीही असो ती ग्रहांच्या सोयीची असते म्हणून तिला मुहूर्त म्हणायचे. एकदा पेपरमध्ये बातमी आली होती की इ.स. २००० मे,जून मध्ये मुहूर्त नाहीत म्हणून. कारण त्या काळात गुरु,शुक्राचा अस्त होणार होता. विवाहासारख्या महत्वाच्या संस्काराचे वेळी गुरु शुक्रासारख्या शुभ ग्रहांची उपस्थिती नाही म्हणजे त्यांचे आशिर्वाद, नैतिक बळ नाही. मग मंगळ शनी सारख्या दुष्ट ग्रहांचे चांगलेच फावले की? कुणाला वैधव्य दे, कुणाचे सासू-सासरे मार, कुणाला अपघात कर, कुणाला सासुरवास कर असा धुडगूूस ते घालतील. मग काही नडलंय का मुहूर्त नसताना लग्न करायला ? मुहूर्त म्हणजे खरं तर कार्याच्या सोयीची पूर्वनियोजित वेळ. पण तिला शुभाशुभत्वाची कल्पना एवढी घट्ट चिकटली आहे की बोलता सोय नाही. पंचांगात दिलेले रेडिमेड मुहूर्त खरं तर अंदाजपंचे असतात. पण गुरुजींनी स्वत: काढून दिलेला मुहूर्त केवळ पंचांगात दिसत नाही म्हणून लग्नाची ठरलेली तारीख बदलण्याचा प्रसंग मी पाहिलेला आहे. तारीख ठरली, कार्यालय ठरलं, पण मुलाच्या ज्योतिष-शिक्षित भावजयीच्या लक्षात आलं की ठरवलेला मुहूर्त पंचांगात दिलेला नाही. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना हेही सांगितलं की गुरुजींनी वधूवरांच्या पत्रिका पाहून मुहूर्त काढलाय्. तो पंचांगात नसेना का? पण नाही. मग काय? तारीख बदला. आता आली का पंचाईत? दुसऱ्या तारखेला हॉल बुक करा. नशीबानं म्हणजे योगायोगानं ती तारीख त्याच हॉलसाठी उपलब्ध झाली म्हणून ठीक नाहीतर मुलीकडच्यांचे पैसे पाण्यात !
आता, पंचांगात लग्नाचे मुहूर्त नाहीत म्हणून लग्न व्हायची थोडीच रहाणार आहेत! ज्यांना कसंही करून लग्न करायचचं आहे ते कशाला कशाला मुहूर्तासाठी अडून बसतील ? ज्यांना मुहूर्त न पहाता लग्न केल्याची रुखरुख वाटणार असेल त्यांच्या सोयीसाठी कुठला तरी 'शास्त्राधार` देउन मुहूर्त दिले जातात. एखादे धर्म-संकट कोसळले की शास्त्राधार शोधले जातात व ते मिळतातही. या फलज्योतिषाचं अगदी कायद्यासारखं आहे. वाटा तेवढया पळवाटा. पण एवढा द्राविडी प्राणायम करीत बसण्यापेक्षा आपल्या सोयीची तारीख-वेळ घेतली तर काय वाईट?
समजा एवढं सगळं करून मुहूर्तावर लग्न केलं आणि संसार विसकटला तर मग ? त्यालाही उत्तर आहे. जर तुमच्या जन्मकुंडलीतच विवाहसौख्य नाही तर कितीही चांगला मुहूर्त पाहिला तरी काय उपयोग ? जे आडातच नाही ते पोहऱ्यात कुठून येणार? एका ज्योतिषाला एकदा मी विचारल, '' काहो, आता डॉक्टरी शास्त्रामुळे प्रसूतीची वेळ पुढे मागे करता येते. म्हणून चांगल्या मुहूर्तावर मूल जन्माला घालणे डॉक्टरांना सहज शक्य आहे. म्हणजे भविष्य ठरवणं त्यांच्या हातात आलं की नाही ? `` त्यावर त्यांनी शांतपणे सांगितलं की, '' अस जन्माला येणे हे निसर्गाला धरून नसल्यानं जन्मकुंडलीचे नियम तिथे लागू होत नाहीत.`` मुहूर्ताची महती काय सांगावी. निवडणुकीचे फॉर्म सुद्धा मुहूर्तावर भरणे जरूरीचे मानतात. उगाच पनौती नको. प्रचाराचा प्रारंभसुद्धा मुहूर्तावरच होतो. कुणीतरी एकच उमेदवार निवडून येणार हे सर्वांना जरी माहीत असले तरी आपण आपल्या बाजूने काळजी घ्यावी. त्यातूनही अपयश आलंच तर नशीब, प्राक्तन आहेच.
वरील विवेचनावरून आपल्या लक्षात आले असेल की मुहूर्ताना महत्व देणं - न देणं हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे.
३३) गुरुबल कशासाठी बघतात?
विवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या शुभ ग्रहाची साथ आहे की नाही हे पहातात. हे मंगल प्रसंग असतात त्यामुळे अशा प्रसंगी अमंगल ग्रहांची वाकडी नजर पडून काही अमंगळ होउ नये म्हणून गुरुबळ बघितले जाते. गुरु हा ग्रह नैतिक बळ देतो, चांगले गुण वृद्धिंगत करतो. गुरु जर अनुकूल नसेल तर गुरुच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन करून तो अनुकूल करून घेता येतो.
एकूण हा प्रकार पुतळयाचे अनावरण, संस्थेचे उदघाटन, भूमीपूजन, वृक्षारोपण या वेळी मंत्री, पुढारी जसे उपस्थित लागतात त्या प्रकारचा आहे. जेवढा मंत्री पॉवरफूल तेवढा सोहळा जंगी. त्याच्या सोयीसाठी प्रसंगी वेळा पुढे मागे ढकलल्या जातात.
३४) मूळ नक्षत्रावर जन्मल्यावर शांंती करावयास का सांगतात?
मूळ नक्षत्र हे तमोगुणी, दारूण, अनिष्ट मानले गेले आहे. त्यामुळे मूळ नक्षत्रावर मूल जन्मले तर ते आईबापाच्या मूुळावर आले आहे असा समज निर्माण झाला. त्यातला अनिष्ट भाग काढून टाकण्यासाठी त्याची शांती करण्याचे प्रकार अर्थातच भीतीपोटी निर्माण झाला. संत एकनाथ मूळ नक्षत्रावर जन्मले. त्यांनी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे.
मूळीच्या मूळी एका जन्मला । मायबापे घोर धाक घेतला ।
कैसे नक्षत्र आले कपाळा । स्वये लागला दोहोच्या निर्मूळा ।
शांती हे कर्मकांड भट भिक्षुकांच्या उपजिविकेचे साधन होते. त्यामुळे अशा प्रकारची कर्मकांड जाणीवपूर्वक जोपासली गेली व गतानुगतिकतेचा भाग म्हणून त्याचे अंधानुकरण झाले.
३५) मूळ नक्षत्र सासऱ्यास वाईट आश्लेषा नक्षत्र सासूस वाईट असे म्हणतात ते कितपत बरोबर आहे?
वर आपण मूळ नक्षत्राच्या इतिहासात जे बघितले त्याचीच ही पुढची मालिका आहे. जेष्ठा नक्षत्र दीरास वाईट वगैरे वगैरे. मुलगी सासरी आल्यानंतर जर काही दुर्घटना घडली तर त्याचे खापर लगेच मुलीच्या पायगुणाशी जोडून काहीतरी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच कुठतरी नक्षत्राशी संबंध जोडून काहीतरी बादरायण संबंध प्रस्थापित केला जातो.
३६) सिंहस्थात विवाह करू नये असे का म्हणतात?
सिंहस्थ याचा अर्थ असा की, गुरु जेव्हा सिंह राशीत असतो तो काळ. गुरु एका राशीत वर्षभर असतो. गुरु हा संततीचा कारक ग्रह असला तरी सिंह रास ही वंध्या रास मानली गेली आहे त्यामुळे या काळात विवाह केल्यास संतती होत नाही असा समज दृढ झाला. परंतु प्रसिद्ध ज्योतिषी श्री. के. केळकर यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कुंडल्यांवरून जो सर्व्हे केला त्याचे निष्कर्ष मात्र या समजुतीच्या विरुद्ध आहेत. आक्टोबर १९४३ ते सप्टेंबर १९४४ या सिंहस्थ-काळात विवाहित झालेल्या १०२ दांपत्यांपैकी ९३ दांपत्यांना संतती झाली, तसेच आक्टोबर १९५५ ते आक्टोबर १९५६ या सिंहस्थ-काळात विवाहित झालेल्या १७४ दांपत्यापैकी १६५ दांपत्यांना संतती झाली, असे त्यांना आढळून आले. यावरून वरील समज बिनबुडाचा आहे हे सिद्ध होते. (संदर्भ :- ग्रहांकित जाने १९९१.)
३७) गुरु संततीकारक ग्रह का मानतात?
गुरुलाच संतती देण्याचा मक्ता कुणी दिला याविषयी खुलासा सापडत नाही. तसे सर्वच ग्रहाचे कारकत्व कुणी ठरविले यालाही समर्पक उत्तर नाही. केवळ ग्रंथप्रामाण्य हेच त्याचे उत्तर आहे. पण गुरु हा संततीकारक ग्रह आहे याविषयी मात्र ज्योतिषांचे एकमत आहे. त्याविषयी एक किस्सा सांगतो. आक्टोबर १९९३ ते आक्टोबर १९९४ या काळात गुरु तुला राशीत होता. त्यावेळी प्रख्यात ज्योतिषी श्री. श्री. भट यांनी १ एप्रिल १९९४ च्या साप्ताहिक लोकप्रभेत असे म्हटले होते की, गुरु तूळ राशीत असल्याने तुला-प्रधान व्यक्तींना व गुरुच्या दृष्टीमुळे मिथुन मेष व कुंभ या राशी-प्रधान व्यक्ंतिनाही या वेळी संततीयोग आहे. त्यांनी असे आवाहन केले होते की कोणत्याही प्रसूतीगृहात सध्या दाखल झालेल्या स्त्रियांच्या व त्यांच्या पतींच्या पत्रिकेवरून या ज्योतिषनियमाची सत्यता कोेणालाही ताडून पहाता येईल. आता वरकरणी बिनतोड वाटणारे हे आवाहन कसे दिशाभूल करणारे आहे ते पहा :- "राशीप्रधान " या शब्दाची त्यांची व्याख्या अशी :- लग्नरास, किंवा ज्या राशीत चंद्र, रवि वा अनेक ग्रह असतील ती रास. राशीप्रधान शब्दाची ही व्याख्या एवढी ऐसपैस आहे की ती प्रसूतीसाठी आलेल्या प्रत्येक स्त्रीला लागू पडेल, आणि नाहीच लागू पडली तर तिच्या नवऱ्याला तरी नक्कीच लागू पडेल ! असल्या होल्डॉल-टाईप भोंगळ नियमांचा पडताळा घ्यायचा तरी कशासाठी ?