सोपे मराठी प्रतिशब्द हवे आहेत: भाग १
नमस्कार,
येथील काही सूचक सदस्यांच्या सूचनेवरून दर आठवड्याला आम्ही काही शब्द येथे देणार आहोत. त्याचे येथे सर्वमान्य झालेले प्रतिशब्द आम्ही स्वतः शब्दभांडारात चढवू ! (आपल्याला थेट तिथेच चढवायचे असल्यास आपले स्वागत आहे !)
चला तर मग,
या आठवड्याचे शब्द (सध्याचे प्रतिशब्द कंसात):
व्हेन्चर कॅपिटलिस्ट
अँजेल इन्व्हेस्टर (आद्य गुंतवणुकदार)
आय पी ओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग)
स्टॉक ऑप्शन्स
डिव्हिडंड (लाभवाटा)
स्टार्टप कंपनी (प्राभावळी)
पेटंट
सोशल नेटवर्क (समाजजाल)
सिमँटिक वेब (अर्थजाल)
बिहेवियरल टार्गेटिंग
रिलेव्हन्स (विषयोचितता)
जियोपॉलिटिक्स (भूराजकारण)
लिबरल (उदारमतवादी)
कॉन्झर्व्हेटिव्ह (पुराणमतवादी)
कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम (उदा. ड्रुपॅल)
पोर्टल
एखादा शब्द मूळ शब्दापेक्ष सोपा की कठीण हे ठरवायला तुम्हाला कदाचित, शब्दांच्या क्लिष्टतामापनाच्या ह्या मी सुचवलेल्या तंत्राचा उपयोग होईल.
तर मग, येऊ द्यात !
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा

आणि हो
वरील शब्दांव्यतिरीक्त वाचकांनाही इतर शब्दांविषयी इतर वाचकांच्या मेंदूंना चालना द्यायची असेल, तर ह्या प्रस्तावाचा वापर करता येईल. कृपया येथे प्रतिशब्दांबद्दल मंथन करावे.
धन्यवाद.
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?
प्रयत्न
१) व्हेन्चर कॅपिटलिस्ट - "व्हेन्चर कॅपिटल" ला साहसवित्त हा शब्द वाचल्यासारखे वाटते तर त्याचे साहसवित्त भांडवलदार?
२) स्टॉक ऑप्शन्स - पर्यायी समभाग??, समभाग पर्याय
३) पेटंट - अभिनवता विशेषाधिकार / हक्क ?
४) पोर्टल - संकेतस्थळाचा एक प्रकार. ह्यात वापरकर्त्याला उपयुक्त अनेकाविध सेवा, सुवीधा (जसे विरोप, चर्चापीठ, शोधसुविधा, खरेदी-विक्रीची सोय) उपलब्ध असतात. (खर्या पोर्टल शब्दाचा अर्थ काहिसा (महालाच्या पुढचा )भव्य प्रवेशद्वार / प्रवेशमार्ग / प्रवेशपरिसर)
५) बिहेवियरल टार्गेटिंग - वर्तणुकीतून वेध / वर्तनातून लक्ष्य साधायची पध्दत, उदा. जसे आंतरजालावरील जाहीरातदार, उपभोक्त्यांच्या वापरायच्या विशिष्ट वर्तनातून (जसे विशिष्ट न्याहळक, पृष्ठे, घेतलेले शोध,) जमा केलेल्या विदातून परिणामकारक जाहीरात करतात.
काही
डिव्हिडंड (लाभवाटा)
ह्याला लाभांश कसा वाटतो? अर्थ तोच आहे पण तरीही...!
पेटंट
हा इतका रूढ झालेला आहे. त्यामुळे तो तसाच चालू ठेवावा असे माझे मत आहे.
सोशल नेटवर्क (समाजजाल)
सामाजिक जाल जास्त बरे वाटेल का?
रिलेव्हन्स (विषयोचितता)
हा चांगला आहे.
लिबरल (उदारमतवादी)
कॉन्झर्व्हेटिव्ह (पुराणमतवादी)
हे तर पूर्वीपासून वापरत आहोत.
लाभांश
लाभांश, पेटंट, उदारमतवादी आणि पुराणमतवादी हे शब्द इतके रूढ आहेत की बदलायचा प्रयत्न करू नये या मताशी पूर्ण सहमत.
व्हेन्चर कॅपिटॅलिस्ट हा मुळात गुंतवणूकदार असतो. त्याला धाडसी भांडवलदार म्हणण्यापेक्षा धाडसी गुंतवणूकदार म्हणणे अधिक योग्य ठरेल. धाडसीऐवजी साहसी चालेल. --वाचक्नवी
हे काही-
व्हेन्चर कॅपिटलिस्ट - आपसोशी भांडवलदार ('आपसोशी' मोल्सवर्थ वरून)
इनिशियल पब्लिक ऑफरिंग -जाहीर आरंभ निवेदन (निविदा?)
स्टॉक ऑप्शन्स - ऐच्छिक समभाग
पेटंट - फर्मान (मोल्सवर्थ), वर सुचवलेला नवताधिकारही उत्तम आहे.
बिहेवियरल टार्गेट - आचारलक्ष्य
वेबपोर्टल - जालज्ञ ;)
प्रयत्न
आय पी ओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) -> आद्य मुक्तवितरण
स्टॉक ऑप्शन्स -> समभाग मुभा
स्टार्टप कंपनी (प्राभावळी)
मुळात "कंपनी"लाच प्रतिशब्द अत्यावश्यक आहे, "पेढी" चालेल का? -> मुळारंभ पेढी
पेटंट - स्वामित्वाधिकार, स्वामित्व हक्क
सोशल नेटवर्क (समाजजाल) -> लोकसंग्रह हा जुना शब्द काय वाईट आहे?
सिमँटिक वेब (अर्थजाल) -> आशयसंबचजाल
बिहेवियरल टार्गेटिंग -> वर्तनी वेध
रिलेव्हन्स (विषयोचितता) -> औचित्य हा जुनाच शब्द कसा वाटतो?
कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम (उदा. ड्रुपॅल) -> आशय/आशयिक व्यवस्था/नियोजन प्रणाली
पोर्टल -> महाद्वार
- दिगम्भा
मुक्तवितरण??
आय पी ओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) -> आद्य मुक्तवितरण
माझ्या मते 'आद्य मुक्तवितरण' हा शब्द चुकीचा आहे. उलटपक्षी, आय पी ओ चं (प्रायमरी मार्केट) वितरण हे मुक्त नसून मर्यादित स्वरुपातच असतं. प्रायमरी मार्केटात आपण अर्ज करून जेवढ्या समभागांची मागणी करतो तेवढे समभाग आपल्याला मिळतातच असे नाही!
आपला,
(बंदिस्त!) तात्या.
आयपीओ
माझ्या मते 'आद्य मुक्तवितरण' हा शब्द चुकीचा आहे. उलटपक्षी, आय पी ओ चं (प्रायमरी मार्केट) वितरण हे मुक्त नसून मर्यादित स्वरुपातच असतं. प्रायमरी मार्केटात आपण अर्ज करून जेवढ्या समभागांची मागणी करतो तेवढे समभाग आपल्याला मिळतातच असे नाही!
तात्याशी सहमत.
अहो म्हन्जे आपली "बोहनी" किंवा "भवानी" म्हंतात तसे.
प्रकाश घाटपांडे
"आद्य जनवितरण" कसा वाटतो?
काही झाले तरी प्रतिशब्द शक्य तेवढा लहान असला पाहिजे, लांबलचक नको असे मला वाटते. वितरण हा शब्दसुद्धा तितका अचूक नाही कारण तो "ऑफर" च्या ऐवजी "इशू" या अर्थाने योजलेला आहे, पण आशयाच्या दृष्टीने मला योग्य वाटतो.
राइट्स् इशूला हक्कवितरण म्हणता येईल.
ऑफरच हवा असेल तर "प्रस्ताव" चालेल का?
अवांतर: कधीकधी वाटते की आपण प्रतिशब्द बरोबर आहे का याचा अती विचार करतो. सावरकरांचे मत असे होते की इंग्रजीतही वापरून-वापरूनच शब्दांना वेगवेगळ्या छटा आलेल्या आहेत. ते म्हणायचे की तुम्ही वापरायला सुरुवात करून पहा मराठी प्रतिशब्दांना त्या त्या छटा येतात की नाही. मूळ इंग्रजी शब्दही तितके अचूकपणे बनवलेले असतातच असे नाही. कोणी तरी वापर सुरू करते व प्रचलित झाला की त्याला त्याचा तो खास अर्थ येतो, नंतर कोणी तो बरोबर आहे की नाही याची चिकित्सा करत बसत नाही.
- दिगम्भा
सहमत
सहमत आहे. उदा. "छायाचित्र" याला 'प्रकाशचित्र ' असा शब्द अजून रुढ होत नाही.
अहो आपल्या एम एस ई बी चे त्रिभाजन झाल्यावर सुरुवातीला महाराष्ट्र राज्य वितरण मंडळ असे एका विभागाला नाव नोंदणी केली होती. वितरण कसले? धान्य, रॊकेल कि अन्न .
मग वाचकांच्या अशा प्रतिसादातून त्याचे " महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ मर्यदित" असे मराठी नामकरण झाले. पुढे महा विजेचे चित्र व वितरण असे सुलभीकरण झाले.
तसेच "दर्शक" कि "प्रेक्षक" ? अद्याप कोडं आहे बुवा?
प्रकाश घाटपांडे
दर्शक/ प्रेक्षक
अर्थाच्या दृष्टीने प्रेक्षक हेच बरोबर आहे. दर्शक म्हणजे दाखवणारा. मार्गदर्शक, दिशादर्शक, शोभादर्शक असे शब्द मराठीत आहेतच.
मराठीत ज्याला प्रेक्षक म्हणतात त्याला हिंदीत दर्शक म्हणतात. हे असे का ते मला माहीत नाही. हिंदीच्या प्रभावामुळे हल्ली मराठीतही काही लोक 'दर्शक' असेच म्हणतात. पण माझ्यामते ते बरोबर नाही.
प्रेक्षकच
हिंदी व हिंदीच्या प्रभावाखाली असलेली मराठी प्रसारमाध्यमे यामुळे हा गोंधळ झाला आहे.
- आजानुकर्ण
अवांतर..
हिंदी व हिंदीच्या प्रभावाखाली असलेली मराठी प्रसारमाध्यमे यामुळे हा गोंधळ झाला आहे.
मराठी प्रसारमाध्यमे ही हिंदी व हिंदीच्या प्रभावाखाली का आहेत याचासुद्धा विचार व्हायला हवा असे वाटते!
आपला,
(हिंदीप्रेमी) तात्या.
दर्शक
संस्कृतमध्ये दर्शक चा अर्थ पाहणारा आणि दाखवणारा असे दोन्ही होतात. हिन्दीने पहिला घेतला, आपण दुसरा. आता त्यांत बदल करणे इष्ट नाही. दृश् म्हणजे पाहणे. त्याचे प्रयोजक दर्शय(दाखवणे). दोघांपासून क्रिया करणारा अशा अर्थी -दर्शक हेच नाम होते . त्याचे दोन्ही अर्थ उलटसुलट. --वाचक्नवी
आद्य जनवितरण,
हा शब्द देखील तितकासा योग्य वाटत नाही. माझ्या माहितीप्रमाणे 'आद्य' या शब्दाचा अर्थ 'प्रथम' किंवा 'सुरवातीपासूनचा', किंवा 'प्रारंभापासूनचा'. पण काही काही कंपन्या (उदा आयसीआयसीआय बँक) दोन वेळेला किंवा तीन वेळेलादेखील आयपीओ काढतात त्यामुळे त्या वितरणाला 'आद्य' म्हणणे चूकीचे ठरावे!
खरं पाहता, दुसर्यांना किंवा तिसर्यांदा केलेल्या वितरणाला 'आयपीओ' म्हणणेही योग्य होणार नाही. कारण दुसरं किंवा तिसरं वितरण हे इनिशियल वितरण म्हणता येणार नाही! :)
अवांतर - 'आद्य ' या शब्दाचा नेमका अर्थ काय? तो 'पहिला' किंवा 'प्रथमपासूनचा' किंवा 'सुरवातीपासूनचा' असा असेल तर पहिल्या अपत्याला थोरला मुलगा किंवा थोरली मुलगी असं न म्हणता आद्य मुलगा किंवा आद्य मुलगी असं का नाही म्हणत? :)
असो,
आपला,
आद्य तात्याचार्य, ठाणे आद्यपीठ!
कंपनी
कंपनी शब्दाइतका चांगला शब्द मिळणे शक्य नाही. पेढी म्हणजे खरेतर बॅंक. सावकारी पेढी, पतपेढी, सोन्याचांदीची पेढी(सोनेचांदी गहाण ठेवून कर्ज देणारी संस्था.), व्यापारी पेढी(उधारीवर माल खरेदी करून विक्रीनंतर पैसे देणारी संस्था).
सहकारी बँक साठी सैंक, सहकारी पतपेढी साठी सेढी, तसेच साढी, सोढी, व्याढी असे तांत्रिक शब्द (लघुरूपे नव्हे)प्रचारात आणावेत असे माझे फार जुने मत आहे.
महानगरपालिका साठी महापालिका. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ साठी 'एस्टी.' देवकरण नानजी'चे देना झाले, 'स्टॅन्डर्ड व्हॅक्यूम ऑइल कंपनी'चे 'स्टॅन्डर्ड ऑइल' आणि पुढे 'एस्सो' झाले तर मरापममं चे एस्टी का नको? 'बॅंक ऑफ महाराष्ट्र'चे 'महाबँक'.
लोकसंग्रह आणि औचित्य हे दोन्ही शब्द अत्यंत उचित आहेत.
पोर्टलसाठी महाद्वार चालण्यासारखा आहे. --वाचक्नवी
बिहेवियरल टार्गेटिंग
(खरेदीदारांच्या) वागणुकीचा कल/अंदाज/वेध घेऊन केलेला प्रतिक्रियानुरूप (जाहिरातीचा वगैरे)मारा. वर्तनवेधी लक्ष्य.-वाचक्नवी
आणखी सोपा - वर्तनवेध
वेध घेणे म्हटले की "लक्ष्य" हे दुहेरी नको.
वेध आणि लक्ष्य
मग लक्ष्याचा वेध घेणे म्हणजे काय? मला वाटते की वेध म्हणजे नुसताच नेम धरणे. लक्ष्य म्हणजे ज्याचा नेम धरायचा ते. त्यामुळे लक्षवेधी वागणूक, वर्तनवेधी लक्ष्य हे दोन्ही शब्द माझ्या कल्पनेतल्या अर्थानुसार बरोबर आहेत.(चूभूद्याघ्या)--वाचक्नवी
पेटंट
पेटंटला एकत्व असा शब्द चित्तरंजनांनी मनोगतावर सुचवलेला पाहिला. स्वामित्व हक्क हा शब्द कॉपीराईटसाठी वापरला जातो असे कळले.
प्रताधिकार
कॉपीराइटसाठी प्रताधिकार. पेटंटसाठी स्वामित्वहक्क हा शब्द अगदी वापरात आहे. --वाचक्नवी
देऊकरण
आय्पीओ साठी (समभागांचे जाहीररीत्या)पहिले देऊकरण .--वाचक्नवी
आय्पीओसाठी
आय्पीओसाठी श्रीनिविदा कसा वाटतो? (श्रीगणेशावरून सुचला :))
चमत्कारिक व हास्यास्पद
आय्पीओ साठी (समभागांचे जाहीररीत्या)पहिले देऊकरण .--वाचक्नवी
आयपीओ या सर्वपरिचित, सहज, सोप्या शब्दाला पहिले देऊकरण हा शब्द अत्यंत चमत्कारिक व हास्यास्पद वाटतो!
असो...
तात्या.
आयपीओ
आयपीओ हा शब्द जेव्हा प्रथम वर्तमानपत्रात वाचायला मिळाला तेव्हा जवळजवळ सहा महिने त्याचा अर्थ मला लागला नव्हता. शोधायची सोय नव्हती, कारण कुठेच त्याचे स्पष्टीकरण येत नव्हते. असे अनेक शब्द केवळ आद्याक्षरावगुंठित असल्याने त्यांचे पूर्ण रूप न जाणताच मी ते वापरायला सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ हल्ली विद्यार्थी देत असलेल्या सीईटी सारख्या अनेक स्पर्धापरीक्षांची नावे. समभागांच्या संदर्भात डीमॅट, एन्एस्डीएल, सीडीएस्एल. टेलिफोनच्या संदर्भात एफ्एस्के, डीटीएम्एफ़, एन्एस्डी, ईटेनबी, आणि असे कितीतरी. त्यामुळे आय्पीओचे पूर्ण रूप माहीत नसणारे असंख्य असतील. प्राथमिक समभाग विक्री सगळ्यांनाच समजते आणि 'हे म्हणजे आय्पीओ होय?' असे म्हणणारे लोक नक्की आढळतील.--वाचक्नवी
प्राथमिक समभाग विक्री
हा सोपा शब्दप्रयोग आधीच प्रचारात आहे.
उदा. मुंद्रा पोर्टच्या प्राथमिक समभाग विक्रीला भरपूर प्रतिसाद मिळाला.
- आजानुकर्ण
धन्यवाद !
वा वा वा !
खूपच छान !
एका शब्दाला एकच प्रतिशब्द असायला हवा, असा हट्ट नाही, नियमही नाही. जो शब्द वाचकांना आवडेल तो रूढ होईल, इतर मागे पडतील. त्यामुळेच, शब्दभांडाराचे स्वरूप विकीसारखे ठेवले आहे. हे सर्वच शब्द हळू हळू चढवीन.
सर्वांना धन्यवाद !
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?
कॅप्चा
कॅप्चा ला मराठीत काय म्हणावे ?
- सर्किट
(ता. क. दरम्यान तुम्हाला उपक्रमावर वावरताना हा संदेश मिळतो आहे का ?)
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?
टुरिंग संकेताक्षर किंवा टुरिंग शब्द किंवा टुरिंग कूटप्रश्न
कॅप्चा क्रिया टुरिंग चाचणी वापरते, capTcha मध्ये 'टी' फॉर टुरिंग आहे. मराठी प्रतिशब्दात टुरिंगचा माननीय उल्लेख केला तर चालावा. ट्युरिंग असा उच्चार करा पाहिजे तर. ही चाचणी "पूर्णपणे स्वयंचालित" असणे हे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही, असे मला वाटते. Gotcha शी यमक जुळवण्यासाठी captcha मधील अनेक शब्द घेतले आहेत असे मला वाटते. कंप्लीटली ऑटोमेटेड पब्लिक टुरिंग टेस्ट टु टेल् कंप्यूटर्स अँड ह्यूमन्स अपार्ट. यात "टु टेल् कंप्यूटर्स अँड ह्यूमन्स अपार्ट" ही केवळ द्विरुक्ती आहे, कारण "टुरिंग टेस्ट"चा हाच अर्थ आहे. "पब्लिक" म्हणून काय मोठे साधले?
त्यामुळे :
टुरिंग संकेताक्षर (किंवा) टुरिंग शब्द (किंवा) टुरिंग कूटप्रश्न
+१
सगळे पर्याय आवडले. टुरिंगचा उल्ल्लेख नको असल्यास चित्रशब्द कसे वाटते ?
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?
चित्राक्षर / कुटचित्राक्षर
कुटचित्राक्षर (किंवा हवंतर विचित्राक्षर ;)) कसं वाटतं?
विचित्राक्षर
हा शब्द तर मस्तच आहे.. कदाचित चित्रकूट ही चालेल ?
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?
+१
विचित्राक्षर +
(चित्रकूट ;-) मध्ये चित्र-आकार छवी वगैरे कोड्यात टाकणारी पाहिजे, इथे उत्तर अक्षरातले आहे.)
चित्रकूट
कदाचित चित्रकूट ही चालेल ?
मला तर तो पळेल असे वाटते.
प्रकाश घाटपांडे
हा संदेश
बर्याच दिवसात मिळालेला नाही, पण पूर्वी उपक्रम आणि मनोगत उघडताना मिळायचा. --वाचक्नवी
होय
उपक्रमने काही मिनिटांकरता "ढेकर" दिली. (द सिस्टम् हॅड् अ बर्प् !)
ढेकर
"ढेकर" दिला कि दिली यावरुन आमच्या घरात नेहमी वादंग होतात. आम्ही (घाटावरचे) दिला म्हणतो. तसेच तो लसूण म्हणतो. ती लसूण नाही. तसेच ते शिक्रण म्हणतो. ती शिक्रण नाही
प्रकाश घाटपांडे
शिक्रण
म्हणजे तुम्ही शिक्रण खाल्ली असं न म्हणता शिक्रण खाल्लं म्हणता? आईस्क्रिम खाल्लं सारख?
लसूण खाल्ली/खाल्ला दोन्ही ऐकिवात होते पण शिक्रणीचे नविनच कळले.
-कोलबेर
शिक्रण खाल्लं
आम्हीसुद्धा शिक्रण खाल्लं असंच म्हणतो. आईस्क्रिमसारखं. आणि लसूण खाल्ली. हो! आणि आम्ही घाटावरचे नाही.
शिकरण की शिक्रण?
आम्ही शिक्रण म्हणतो, पण लिहिताना शिकरण लिहितो. आणि ते शिकरण. मोल्सवर्थ ती शिकरण देतो. आणि लसूण खाल्ला. मोल्सवर्थ लसूण पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही बरोबर म्हणतो.--वाचक्नवी
विदा व्यवस्थापन प्रणाली
याला विदा व्यवस्थापन प्रणाली हा शब्द कसा वाटतो? कारण कंटेंट ला मजकूर म्हणलं तर तो शेवटी विदाच आहे. किंवा मजकूर व्यवस्थापन प्रणाली हा शब्द कसा वाटतो?
मे.सो। जा. व्हावे
( मेहेरबान साहेबास जाहीर व्हावे ) हे आजही सरकारी अर्जात लिहावे लागते.
प्रकाश घाटपांडे
लाभवाटा
गुंतवणुकदाराला या मिळालेले लाभ हे आयकर वाचवण्यासाठी पुरेशा पळवाटा आहेत असे यातून सूचित होते.
प्रकाश घाटपांडे
माझेही दोन पैसे
पोर्टल - याला साधाच "प्रवेशद्वार " हा शब्द कसा आहे? (वर दिगम्भा यांनी सुचवलेला महाद्वार हा शब्दही ठीक आहे)
व्हेन्चर कॅपिटलिस्ट - व्हेन्चर शब्दात रिस्क घेणे आहे , त्यामुळे जोखमी भांडवलदार?
आता आजपुरती तरी मराठी म्हणून घ्यायला हरकत नाही मला (फारसा वेळ उरला नाही आहे)!
आपल्यापैकी,
आपल्यापैकी कोण कोण मंडळी, इथे सुचवले गेलेले प्रतिशब्द आपल्या नेहमीच्या वागण्याबोलण्यात, लिहिण्यात, कार्यालयात, घरी, इतरत्र वावरताना अगदी हटकून वापरणार आहेत ते कळले तर बरं होईल!
एक निरिक्षण - आपल्यापैकीच एक सभासद (त्यांचा प्रतिसादही इथे आहे, परंतु वैयक्तिक उल्लेख टाळण्याकरता त्यांचे नांव घेणे मी उचित समजत नाही,) जे मराठी भाषेचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी एकदा मनोगताच्या ठाणे कट्ट्यावर हजेरी लावून मराठी भाषेच्या पुरस्काराबद्दल चार शब्दांचं भाषण केलेलं माझ्या स्मरणात आहे. परंतु त्या भाषणा दरम्यानही त्यांच्या बोलण्यात अनेक इंग्रजी शब्द आले होते असेही मला स्मरते! असो, कुणाला दोष द्यायचा हेतू नाही, परंतु क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे एवढं मात्र खरं! :)
माझ्यापुरतं बोलायचं तर जे शब्द मला बोलायला, लिहायला, लक्षात ठेवायला तसेच इतरांना कळायला(!) सोपे जातील तेच शब्द मी वापरेन, मग भले ते इतर भाषांतले असतील तरी मला चालतील..
तात्या.
--
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
१०० टक्के सहमत
याबद्दल पूर्वीही मी लिहिले होते. आग्रह असावा, दुराग्रह/अट्टाहास नको :)
मिठाईशी देणे घेणे.
एक निरिक्षण - आपल्यापैकीच एक सभासद (त्यांचा प्रतिसादही इथे आहे, परंतु वैयक्तिक उल्लेख टाळण्याकरता त्यांचे नांव घेणे मी उचित समजत नाही,) जे मराठी भाषेचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी एकदा मनोगताच्या ठाणे कट्ट्यावर हजेरी लावून मराठी भाषेच्या पुरस्काराबद्दल चार शब्दांचं भाषण केलेलं माझ्या स्मरणात आहे. परंतु त्या भाषणा दरम्यानही त्यांच्या बोलण्यात अनेक इंग्रजी शब्द आले होते असेही मला स्मरते! असो, कुणाला दोष द्यायचा हेतू नाही, परंतु क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे एवढं मात्र खरं! :)
बहुधा तो मी नसावा.
जो कोणी असेल त्यात त्याचा दोषही नसावा, कारण सध्या इतक्या प्रदुषित भाषा कानावर पडत असते की नकळतच आपणही तसे बोलत जातो आणि निषेधही करत असतो.
तात्या तुम्ही तर ज्ञानी आहातच, तुम्ही सांगितलेली गोष्ट आठवते, की दोन संगितकारामध्ये काही मतभेद होते. दुसर्या दिवशी दुसर्या संगितकाराच्या बैठकीसाठी पहिले संगितकार जात असतांना कोणातरी शहाण्याने सांगितले की तुमचे मतभेद आहेत, तुम्ही कशाला त्याचे संगित ऐकतात? तेंव्हा त्यांनी सागितले मिठाईवाल्याशी भांडण आहे मिठाईशी नाही?
असो, तुमचा मवाळपणाही आवडला. ( त्या मान्यवाराचे नाव घेणे टाळले).
सूचना, तात्या तुम्ही मिसळपावासारखे झणझणीत रहा बरे...
व्हायब्रेटर?
करता मराठी प्रतिशब्द हवा होता! कुणाला सुचतो आहे का? :))
तात्या.
थरारक/कंपनी
व्हायब्रेटर पुल्लिंगी असेल तर थरारक/थरथराट व स्त्रीलिंगी असेल तर कंपनी ?
हे शब्द अजित ओक यांच्या अनुदिनीवर वाचले होते.
- आजानुकर्ण
कंपू
कंपनी आणी कंपू.
सुचेल तसे
व्हेन्चर कॅपिटलिस्ट - साहसी गुंतवणुकदार *, धैर्यधर
आय पी ओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) - प्राथमिक सामाजिक आवाहन *
स्टॉक ऑप्शन्स - समभाग पर्याय
डिव्हिडंड (लाभवाटा) - लाभांश
स्टार्टप कंपनी (प्राभावळी) - 'प्रभा'वळी, (प्रभा+गोतावळा ना?)
पेटंट - विशिष्टत्व, स्वामित्व
सिमँटिक वेब (अर्थजाल) - अर्थ > पैसा म्हनून अर्थजाल नको.
रिलेव्हन्स (विषयोचितता) - संबंध, रिलेव्हन्ट - संबंधित
जियोपॉलिटिक्स (भूराजकारण) - ठीक
लिबरल (उदारमतवादी) - हेच
कॉन्झर्व्हेटिव्ह (पुराणमतवादी) - हेच
* इंग्रजीत शब्द समुहातून अर्थ स्पष्ट होत असल्याने मराठीत शब्द समूह अर्थ भरकटवणारे ठरणार नाहीत असे वाटते. त्यामुळेच संकल्पनेसाठीचा प्रतिशब्द (रूढ प्रतिशब्दांपासून बनलेला) शब्द समूह
असण्यास हरकत नसावी.