पुन्हा एकदा शब्दभांडार
गेल्या वर्षी मी शब्दभांडार हा प्रकल्प माझ्या संकेतस्थळावर सुरू केला.
इतर प्रकल्पांच्या सुरुवातीला असणार्या उत्साहानुसार, ह्याही प्रकल्पाला सुरुवातीला खूप प्रतिसाद मिळाला. (गोळेकाका, कुठे आहात सध्या ?)
आज मनोगत, उपक्रम आणि अशा सर्व संकेतस्थळांवर वापरला जाणारा "विदा" हा "डेटा"साठी प्रतिशब्द ही शब्दभांडाराला माझे प्रिय मित्र शैलेश खांडेकरांनी दिलेली देण आहे, हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.
(न्याहाळक, शोधयंत्र, संचारक हे शब्दही अनुक्रमे ब्राउझर, सर्च एंजिन, क्रॉलर ह्यांसाठी ह्या शब्दभांडारामुळेच रूढ झालेले आहेत.)
हा प्रकल्प एखाद्या विनालाभ संस्थेच्या अखत्यारीत असावा, फक्त माझ्या खाजगी संकेतस्थळावर न ठेवता, ह्याबद्दल माझे प्रयत्न सुरू आहेत.
मार्च २००७ मध्ये जेव्हा उपक्रम हे स्थळ सुरू झाले, तेव्हा त्यांच्या चालकांना मी अशा प्रकारची विनंती केली होती, हे आपल्या लक्षात असेल.
ह्याचे कारण एकच, की उपक्रम ह्या संकेतस्थळाचा भर मराठीत माहितीपूर्ण लिखाण व्हावे, ह्यावर आहे.
आणि माहितीपूर्ण लिखाण करताना मुख्य अडचण म्हणजे मराठी पारिभाषिक शब्दांची.
म्हणून शब्दभांडार आणि उपक्रम ह्यासारख्या प्रयोगांची "सिनर्जी" (प्रतिशब्द?) असणे आवश्यक.
उपक्रमकारांचा सदर प्रकल्प देखील ह्या एकपात्रीप्रयोगापेक्षा फारसा वेगळा नाही, हे लक्षात येईलच.
जेव्हा असे प्रयोग एका कुठल्यातरी व्यक्तींवर निर्भर असतात, तेव्हा त्या प्रयोगांना समर्थन असणार्या ह्या प्रकल्पांच्या जीवनमानाविषयी लोकांच्या मनात पूर्ण विश्वास निर्माण होत नाही, हे सत्य आहे.
आम्हा मुक्तस्रोत आज्ञावलींवर काम करणार्या लोकांत, "बस फॅक्टर" नावाचा एक मुद्दा नेहमी असतो.
समजवून सांगतो.
"बस फॅक्टर" म्हणजे, तुमच्या प्रकल्पातले किती लोक "बस" ने तुडवून मारले, तर तुमचा प्रकल्प बंद पडेल ?
खेद होतो, की उपक्रम, मनोगत, आणि मिसळपाव, किंवा अगदी क्षुल्लक "शब्दभांडारासारख्या" प्रकल्पांचा बस फॅक्टर १ आहे.
म्हणजे ह्या प्रकल्पांतील एका व्यक्तीला जरी बसचा अपघात झाला (देव करो, आणि तसे न होवो), तरी हे प्रकल्प बंद पडतील.
हे असे होऊ नये, म्हणून काय करावे ?
इतर प्रकल्पांचे मला माहिती नाही, पण शब्दभांडार बंद पडू नये, असे मला मनापासून वाटते.
मी काय करावे, म्हणजे हा प्रकल्प बंद पडणार नाही ?
आणि त्याविषयी विचार करायला सुरुवात केलीच आहे, तर मला हेही सांगा, की येथील विद्वान लोकांना शब्दभांडारात गुंतवण्यास मला काय करणे आवश्यक आहे ?
माझ्या मनात "महिन्याचा प्रतिशब्द" अशी स्पर्धा आयोजित करून प्रत्येक महिन्यात सुचवलेल्या सर्वोत्कृष्ट (म्हणजे सोप्या, आणि नवीन) शब्दाला बक्षीस द्यायचे, असे होते !
मी महिन्याला पाच डॉलरचे बक्षिस माझ्या खिशातून द्यायला तयार आहे. (आणि अर्थातच शब्दभांडाराच्या मुख्यपृष्ठावर मोठ्या अक्षरात घोषणा. आणि माझ्या अनुदिनीवर आणि ऑर्कुटवर देखील !)
आणखी काही योजना ?
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा

वरदा
शब्दभांडारात मराठी प्रतिशब्दांची भर घालणार्यांत आजवर शैलेश खांडेकर, आणि नरेन्द्र गोळे यांच्या व्यतिरीक्त वरदाचे नाव लिहायचे विसरलो.
(इमेल साठी विरोप असा शब्द जे कटाक्षाने वापरतात, त्यांना सांगावेसे वाटते, की हा शब्द नरेन्द्र गोळे, ह्यांनी शब्दभांडारावर सुचवला आहे.)
(वरदाने मॉडेल साठी प्रारूप हा सुंदर शब्द सुचवला आहे.)
धन्यवाद वरदा !
- सर्किट
--
यू हॅव्ह नो प्रायव्हसी ! गेट ओव्हर इट !
नंदन, अनु, प्रमोद देव, धनंजय, सहज, गुंडोपंत, प्रियाली
राधिका, वाचक्नवी, मीरा फाटक, विसुनाना, राजेन्द्र, विकास, मुक्तसुनीत, ऋषिकेश, चाणक्य, विसोबा खेचर, विनायक, शशांक,
शीर्षकात (आणि शीर्षकातली जागा संपल्याने प्रतिसादात) उल्लेखलेल्या माझ्या उपक्रमी मित्रमैत्रिणींनो,
आपण आजवर इतके लिहीत आलात, विविध विषयांविषयी. आपल्याला शब्दभांडाराकडे आकृष्ट करण्यासाठी मी काय करू शकतो ?
- सर्किट
--
यू हॅव्ह नो प्रायव्हसी ! गेट ओव्हर इट !
मराठीसाठी
तुम्ही काय आम्हाला ५ डॉलर चे आमिष दाखवत हो?
मराठीसाठी आम्ही असेही येवू त्यात काय...
पण मी तुमच्या जागी असतो तर निश्चितपणे माझ्या प्रत्येक पोस्ट मध्ये सही म्हणून लिंक तरी दिलीच असती...
(नि एक काहीतरी चमत्कृतीपूर्ण वाक्य)
असो,
आता खरं हे मी सुचवायला नको... तरी
मोठी लोकं विसरतातच अश्या छोठ्या मोठ्या गोष्टी... चालायचंच.
आपला
तसेही करू
गुडोपंत,
तुम्ही सुचवलेला उपाय (म्हणजे आमच्या सहीत शब्दभांडाराचा दुवा देणे) आम्ही लवकरच कार्यरत करणार आहोत.
पण एवढे सगळे आपण लिहिलेय, ह्या कष्टांपेक्षा शब्दभांडारात एक दोन शब्द टाकणे आपल्याला अधिक सोपे गेले असते.
आता मुक्तसुनितांनीच बघा, तेवढ्या वेळात दोन नवीन शब्द टाकलेत !
मुक्तसुनितांचा विजय असो, एवढेच म्हणू इच्छितो !
(गुंडोपंतांचा विजय असो, असे म्हणायलाही आवडले असते ;-)
- सर्किट
--
यू हॅव्ह नो प्रायव्हसी ! गेट ओव्हर इट !
स्पर्धा
प्रतिशब्द स्पर्धा हा चांगला उपक्रम होऊ शकेल. ज्यांना अद्याप रुढ मराठी प्रतिशब्द नाहीत, अशा शब्दांची एक सूची बनवली आणि उपक्रमावर त्यांच्या प्रतिशब्दांसाठी चर्चा होत राहिली, तर शब्दभांडारात नियमित भर पडत राहील. उपक्रमावरील काही शास्त्रीय लेखांत काही मराठी प्रतिशब्दांचा अंतर्भाव आहेच. त्यांचाही समावेश शब्दभांडारात करता येईल.
पण काही तरी शब्द टाक ना !
नंदन,
मेटा विचार, म्हणजे, विचारांविषयी विचार, हे आपण सर्वच उपक्रमासारख्य मेटा स्थळांवर नेहमीच अनुभवत असतो.
प्रत्यक्ष विचार कृतीत आणण्यास्स आपण नेहमीच *ंडीला पाय लावून पळत आलो आहोत.
जे सदस्य माझ्यावर कृतीशून्यतेचा आरोप करत आले आहेत, त्यांचीही ह्याबद्दलची कृती शून्यच आहे ;-)
तेव्हा ह्या लेखाला प्रतिसाद लिहिण्याआधी लोकांनी जर शब्दभांडारात एक जरी नवीन शब्द लिहिला, तरी मी त्या प्रकल्पाचे सार्थक झाले असे समजेन.
- सर्किट
--
यू हॅव्ह नो प्रायव्हसी ! गेट ओव्हर इट !
रेघदूत
= इन्स्टंट मेसेंजर एवढाच माझा आत्तापर्यंतचा सहभाग आहे :(. पण काही शब्दांविषयी विचार करतो आहे (जसे व्हेन्चर कॅपिटॅलिस्ट). त्याबद्दल अधिक काही सुचले की भर टाकेन.
नक्कीच !!
मीही विसरलो होतो :-(
इन्स्टंट मेसेंजर साठी "रेघदूत" हा शब्द नंदन रावांनी सुचवलेला आहे.
मला हा शब्द खूपच आवडलेला आहे.
कालिदास आणि एओएल, याहू ह्यांना एकत्र आणणारा हा शब्द !
पण का कोण जाणे, हा शब्द अद्याप लोकप्रिय झालेला नाही !
आजपासून मी हा शब्द मुद्दाम वापरायला लागणार. मग बघू..
उदा:
रेघदूतावर मला संपर्क साधायचा असल्यास कृपया व्यनि पाठवा, अथवा माझा विरोपपत्ता माहिती असल्यास विरोप पाठवा.
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? थू तुमच्या जिंदगानीवर !
माझी नवीन सही !
गुंडोपंतांच्या सूचनेनुसार, ही नवीन सही आता टाकलेली आहे.
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? थू तुमच्या जिंदगानीवर !
विदा/विरोप..
आज डेटा या शब्दाकरता किती मंडळी आपल्या रोजच्या व्यवहारात, बोलण्या-वावरण्यात विदा हा शब्द वापरतात, किंवा इमेल या साध्यासोप्या, आपल्या सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या शब्दाकरता विरोप हा शब्ददेखील किती माणसं वापरतात हा खरे तर संशोधनाचा विषय आहे. माझ्या माहितीत/परिचयात तरी रोजच्या व्यवहारात, बोलण्याचालण्यात मला हे शब्द वापरताना कुणी दिसलेले नाही!
तात्या.
कदाचित
आदरणीय विसोबा,
कदाचित आपल्या ओळखीतले लोक आपण बदलायला हवेत.
कारण आपले प्रिय मित्र मनोगताचे प्रशासक (जे कुणी असतील ते) त्यांनी हा शब्द वापरण्यास गेल्या डिसेंबरात (मनोगताच्या विदागाराला अपघात) सुरुवात केली !
आपण कदाचित मिसळपाअवावरच्या खरडवह्यात "येथे खरड न लिहिता मला विरोप पाठवावेत" असे वाचले नसेल. पण "विरोप" ह्या शब्दाचा वापर अगदी मिसळपावात देखील होतो, हा माझा अनुभव आहे.
- (आपला आ.) सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? थू तुमच्या जिंदगानीवर !
आंतरजाल नव्हे,
मित्रवर्य सर्किटराव,
मी मनोगत, उपक्रम, मायबोली, मिसळपाव इत्यादी मराठी आंतरजालासंबंधी बोलत नाहीये. तिथे विदा, विरोप इत्यादी मराठी शब्दांचा वापर होतो हे मलाही मान्य आहे.
मी रोजच्या बोलण्याचालण्यातील (आंतरजालाच्या बाहेर!) वापराबद्दल बोलत होतो.
"अरे तू मला इमेल पाठव रे", किंवा "माझी मेल मिळाली का?', किंवा "मला सगळा डेटा हवा होता"
असेच संवाद माझ्याआजूबाजूला ऐकू येतात. पटकन कुणी "माझा विरोप मिळाला का?" असं म्हणत नाही. एक तर ते ऐकायला चमत्कारिक वाटतं आणि पटकन कुणाला कळतही नाही! आज माझे काही पंजाबी क्लाएंट आहेत त्यांना जर दूरध्वनीवर मी असं म्हटलं,
"साब, आपका विदा मेरे पास आया है, मै एकदो दिन मै आपको विरोप भेजता हू!" :)
तर त्याला एक शब्दही समजणार नाही अशी माझी खात्री आहे!
असो..
तात्या.
कृपया
आदरणीय विसोबा,
आपण आपल्या पंजाबी ग्राहकांना इमेल अथवा डेटा साठी पंजाबी प्रतिशब्द विचारावेत. म्हणजे त्यांचे मराठी दुकानदार असे शब्द का वापरतात त्याचे कारण त्यांना लगेच कळून येईल.
आपण असे शब्द वापरत नसाल, तर मात्र आपण संस्कृतात बोलत आहात असे आपल्या पंजाबी ग्राहकांनादेखील वाटेल. त्यांना डेटा, आणि विदा ह्यातला फरक कळत असेल, असे गृहित धरले तर. डेटा ह्या शब्दाच अर्थ आपण आपल्या पंजाबी ग्राहकांना विचारावात, हा आमचा आग्रह.
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? थू तुमच्या जिंदगानीवर !
रास्त सूचना
आपण आपल्या पंजाबी ग्राहकांना इमेल अथवा डेटा साठी पंजाबी प्रतिशब्द विचारावेत. --अगदी रास्त सूचना!--वाचक्नवी
एक प्रश्न
नवनव्या तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टींचे मराठी प्रतिशब्द तयार करण्याइतकेच , किंबहुना त्यापेक्षा महत्त्वाचे काम म्हणजे शतकानुशतके जुन्या असणार्या ज्ञानशाखा - मग ती सामाजिक शास्त्रे असोत की जीवभौतिकाच्या अभ्यासाच्या शाखा असोत - त्यांच्यातील काही अगदी मुलभूत अशा संकल्पना-संज्ञांचे प्रतिशब्द योजणे.
उदाहरणार्थ , "रेघदूत" ही शब्दसंगती अगदी गमतीशीर आहे आणि ती बनवणार्याच्या शब्दसंपदेची द्योतक आहे. पण ज्या उद्देशाने "शब्दभांडार" अस्तित्वात आले त्या मूळ उद्देशाला हे प्रयत्न कितपत पूरक ठरतात ? याउलट, काही अगदी मूलभूत अशा संज्ञाना प्रतिशब्द भांडारात नव्हते असे थोडेसे खरवडून पाहता दिसते.
कुणाला दुखविण्याचा हेतू नाही. (आणि नंदन तर तसे मनात आणणार नाही अशी खात्री वाटते. )
नक्कीच
हजारो वर्षांपूर्वीच्या ज्ञानशाखा अभ्यासल्याशिवाय अस्सल (ह्याचा अर्थ, संस्कृतोतद्भव नव्हे, हे लक्षात येण्याइतके उपक्रमी ज्ञानी आहेत) प्रतिशब्द सुचणार नाहीत. आजवर तथाकथित ज्ञानी लोकांनी केलेल्या चुका म्हणजे "पुरातन सर्व ज्ञान संस्कृत साहित्यात आहे, आणि त्यामुळे आजकालच्या सर्व इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द हे संस्कृतोद्भवच असावेत" असा धरलेला हट्ट.
नाही.
जरा संस्कृतीच्या पारंपरिक व्याख्येतून बाहेर पडा.. शब्दांच्या मुळांपर्यंत जा... अर्थ समजून घ्या.. मग झोप काढा..
रात्री मनात जो शब्द येईल त्यावर विचार करा.
ही प्रक्रिया समजा, नवीन शब्द तयार करण्याची..
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? थू तुमच्या जिंदगानीवर !
संस्कृतोद्भव ?
संस्कृतोद्भव शब्दांचा आग्रह मी कुठे धरलाय् ? माझे म्हणणे इतकेच ,की नवनवीन शब्दांची उपाययोजना करण्याचे कसब दाखविणे हाच केवळ "भांडारा"चा हेतू नाही ; त्याचा हेतू (बहुदा) "सर्व प्रकारच्या ज्ञानशाखांच्या , क्षेत्रांच्या संज्ञांना प्रतिशब्द सहज मिळण्याचे एक विदागार असावे" हाही असू शकतो. (चू.भू.द्या.घ्या.)
उदाहरणार्थ , "विरोप" सारखे शब्द तिकडे आहेत ; पण ब्युरोक्रसीला अत्यंत चपखल असा "नोकरशाही" हा टिळकानी योजलेला शब्द तिथे नव्हता. हा शब्द संस्कृत नव्हे , त्यातून उद्भवणारा नव्हे , तर चक्क कुठल्यातरी २ फार्सी शब्दातून बनलाय्. पण मॅकॉलेने बनवलेल्या यंत्रणेला इतका , जनसामान्याना सहज समजेल असा देशी शब्द दुसरा नसता मिळाला.
शेवटी, एखाद्या मिशनच्या (मराठी शब्द) मागे डोळसपणे जायचे असेल तर त्याचे उद्दिष्ट, धोरण, (व्हीजन् !) काय याबाबत नीट कल्पना आल्याखेरीज त्या मिशनला उपयुक्त कार्य होणार नाही.
क्षमस्व
माफकरा मुक्तसुनीत,
आपले म्हणणे आम्हाला नीट कळले नव्हते.
नोकरशाहीसारखे शब्दही तेथे असावेत, असे आम्हाला वाटते.
अनेक् इंग्रजी शब्दांना टिळक, सावरकरांनी सोपे शब्द दिलेत (धनादेश?).
पण अद्याप ते सर्वसाधारण वापरात नाहीत.
आणि काही नवीन शब्दांना तर मराठी शब्दच नाहीत. (इमेल - विरोपच्या आधी, डेटा - विद्याच्या आधी, एंजल इन्वेस्टर?)
ह्या सर्वच शब्दांसाठी नवीन सोपे, सहज वापरण्यासारखे (हे मुद्दाम , कारण नाहीतर अग्नीरथगमनागमनलोहपट्टिका असे शब्द येतात रुळासाठी) मराठी शब्द असल्यास त्यांची नोंद व्हावी, नसल्यास निर्मिती व्हावी हे ह्या स्थळाचे उद्दिष्ट आहे.
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? थू तुमच्या जिंदगानीवर !
आठवण
या वरुन आठवले शाळेत आमच्या देव गुरुजींच्या सायकलच्या चेन कव्हर वर लिहिले होत "वायुजित" खाली बा. न. देव. आम्हाला गंमत वाटायची . गुरुजी सायकल खूपच व्यवस्थित ठेवायचे. पण गुरुजींनीच एकदा अर्थ सांगितला " वा-याला ही जिंकणारी अशी ती सायकल" म्हणुन वायुजित. मग मला मनातल्या मनात रामरक्षेतील
' मनोजवं मारुत तुल्य वेगं॥
जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठ्म ॥
वातात्मजं वानरयुथ मुख्यम॥
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥
हा श्लोक आठवला.
प्रकाश घाटपांडे
देव गुरुजी
काका,
आपले देव गुर्जी अद्याप हयात असल्यास आम्हाला त्यांचा विरोपपत्ता कळवा.
(कारण आपण जो मनोजवं.. हा श्लोक दिलाय, त्यातील बरेच शब्द कुणा देव गुरुजींच्या डोक्यांतूनच निघालेले आहेत, असा आमचा संशय आहे..)
असेच लोक आम्हाला हवे आहेत.
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? थू तुमच्या जिंदगानीवर !
देव गुरुजी
हे बघा आमचे देव गुरुजी. आजच त्यांना भेटून आलो.

त्यांना शब्दभांडार प्रकल्पाबाबत माहिती दिली. त्याना आश्चर्य व आनंद दोन्ही झालं. आता ते पुण्यात च कोथरुड मध्ये स्थायिक झाले आहेत. विरोपाचा पत्ता मुलाकडे असेल तो घेतो.
प्रकाश घाटपांडे
सहमत
आहे. शब्दभांडारात भर घालताना ती विचारपूर्वक घालायला हवी. म्हणजे मराठी प्रतिशब्द अर्थवाही हवा, तसंच शक्यतो वापरायला सोपा. शिवाय, तुम्ही म्हणता तसे अजूनही अनेक मूलभूत शब्दांना प्रतिशब्द नाहीत हा मुद्दाही आहेच.
[रेघदूत हा तसा गमतीगमतीतून तयार झालेला शब्द आहे.एअर होस्टेसला हवाई सुंदरी म्हणतात, तर नर्सला दवाई सुंदरी का म्हणू नये? या पुलंच्या कोटीवरून थोडाफार सुचलेला (अर्थातच त्या दर्जाच्या आसपासही नाही.) मित्रांशी चॅट करताना आम्ही एखाद्याला ऑनलाईन बोलवायचे असेल तर 'रेघेवर ये' असे म्हणतो; त्यावरून हा रेघदूत डोक्यात आला. मग खरडवहीतून गप्पा मारताना मिलिंदरावांनी त्याची शब्दभांडारात भर घातली.]
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)
नवीन शब्द असेच तयार होतात
नवीन शब्द असेच गमती गमतीतूनही तयार होतात.
झाड ह्या शब्दाची उत्पत्ती काय ?
गोड ?
सोड ?
झोड ?
फोड ?
मोड ?
रोड ? (रोडावलेला, ह्या अर्थाने, रस्ता ह्या अर्थाने नाही)
कोड ? (पांढरे "चट्टे")
लोड ? (टेकायचा)
सोड ?
पण हे शब्द व्युत्पत्ती माहिती नसूनही आपण वापरत नाही काय ?
मग ?
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? थू तुमच्या जिंदगानीवर !
अपवाद
हो, पण हा अपवाद झाला. एरवी ही पर्यायी शब्द सुचवण्याची प्रक्रिया अधिक फॉर्मल/तंत्रशुद्ध असावी (उत्तम उदाहरण म्हणजे विद् = जाणणे या धातूवरून आलेला शब्दसमूह) असे मुक्तसुनीतांचे मत असावे (आणि माझेही आहे). अर्थात, अपवाद वगळून :)
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)
सुचना
शब्दभांडार प्रकल्प नक्कीच चांगला आहे. पण हि चर्चा, एखादी स्पर्धा अथवा आपल्या सहित न उघडणारा दुवा देउन आणि त्यावर एक कडी म्हणजे इतरांच्या जिंदगानीवर थू करुन हा प्रकल्प तरेल असे वाटत नाही. विधायक कार्य करायचेच आहे तर विधायक मार्गाने करु. नाहि का?
उपक्रमींनी यात सक्रिय सहभाग घ्यावासा वाटत असेल तर माझी एक सुचना आहे.
लोकांचा उत्साही सहभाग हवा असेल तर लोकांना आवडणारे काही तरी करा. आता काही तरी म्हणजे काय? तर काहि शब्दांचा संच करुन त्यासाठी प्रतिशब्द सुचवा अशी चर्चा सुरु करता येइल. त्यावर जाणकार, उत्साही उपक्रमी प्रतिसाद लिहितलच. मग या चर्चांची मालिका तयार करा. उपक्रमपंत कदाचित याला मुख्य पानावर प्रसिद्धी देतील. बघा पटतयं का ते. मला वाटतं यातुन लोकसहभाग वाढेल. तसेच प्रकल्पाला गती येइल. मग विदा व्यवस्थापन करायला तुम्ही आहातच.
आणखी काहि सुचल्यास लिहिले जाइलच.
मराठीत लिहा.
हेच
काहि शब्दांचा संच करुन त्यासाठी प्रतिशब्द सुचवा अशी चर्चा सुरु करता येइल.
हेच म्हणतो. शब्दभांडारात गेलो पण काम करायच्या (नवे शब्द टाकणे व "आनंदवनात" राहीलेल्या कोणाची थुंकी अंगावर पडू न देणे ;-) ह. घ्या.) ऐवजी इतर शब्द बघण्यात अडकलो. त्या ऐवजी इथे जर का शब्द टाकले व "प्रतिशब्द सुचवा - ह्या आठवड्याचे शब्द" मालीका सुरू केली तर काम सोपे होईल.
सहज महाशय
आपली सूचना शिरसावंद्य.
आम्ही उद्या येथे पाच शब्द देऊ. त्याचे प्रतिशब्द तयार करण्यास आपण सहकार्य केले नाही, तर, आम्हा महारोग्यांची थुंकी आपल्याला झेलावी लागेल ! (अरे, हो, ह. घ्या, बरं का ! कैच्याकैच !)
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? थू तुमच्या जिंदगानीवर !
इगो
चाणक्यराव हे आव्हान पण आहे आणि आवाहन पण. ज्यांना हे "आव्हान" वाटेल त्यांनी ते आव्हान म्हणुनच स्विकारावे. इतरांनी ते आवाहन म्हणुन स्विकारावे. सर्कीटरावांनी http://mr.upakram.org/node/276#comment-3440 येथे डिवचल्यामुळेच ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ....प्रश्नोत्तरातून सुसंवाद भाग १ उपक्रमावर येउ शकला.त्यावेळी मला टंकन अजिबात येत नव्हते. तसेच युनिकोड रुपांतराची अडचण होती. ती उपक्रमींच्या सहाय्याने व स्वशोधनातून दूर केली.आम्ही केवळ संगणक साक्षर आहोत
DIT , ADIT हे सी डॆक चे संगणक साक्षरतेचे कोर्स मी ९९-२००० ला केले होते. आता आम्हाला संगणक शिक्षित व्हायचे आहे, ज्याचे उपयुक्ततेत रुपांतर होईल असे. पुण्यात अनेक संगणक प्रशिक्षण संस्था पालथ्या घातल्या. पण कुणी आम्हाला समाधानी करु शकले नाही. आर्थिक दृष्ट्याही परवडत नाही इतके महाग संगणक शिक्षण पुण्यात आहे.डिजिटल ग्रंथालय व मिडिया लायब्ररी या अनुषंगाने आवश्यक ते सर्व ग्यान एकाच छत्रात कुठल्याही कोर्सेस मधे नाही ( अपवाद cec-ugc.org )
शेवटी अजानुकर्णाने आम्हाला एकलव्य पद्धतीने शिकणे हा पर्याय सुचवला. बघु या पुढे काय होते ते?
( शिकवणीच्या प्रतिक्षेत असलेला)
प्रकाश घाटपांडे
डिवचणे
येथे डिवचल्याशिवाय काही होत नाही, हे आमच्या लक्षात आल्याशिवायच का आम्ही लहान मुलांसाठी लेखन, तंत्रज्ञानविषयक लेखन असे सगळे डिवचणे चालू ठेवले आहे ?
त्याला उपयुक्त प्रतिसादही आम्हाला मिळालेला आहे.
चाणक्याचा प्रतिसादही त्याच्या विचारांना साजेसाच आहे. तो आम्हाला अपेक्षितच होता.. आणखी एक अशाच सदस्याच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत आम्ही आहोत.. रात्रीतून तोही येईलच.. ;-)
तोवर एक मुक्तसुनीत शब्दभांडाराला लाभला, हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? थू तुमच्या जिंदगानीवर !
इगो
काही लोकांचा "इगो" दुखावल्यामुळे कामे होतात तर काही लोकांचा "इगो" सुखावल्यामुळे कामे होतात. कुठल्यावेळी कुणाचा इगो 'दुखवायचा 'आणि कुठल्यावेळी कुणाचा इगो 'सुखवायचा 'हे गणित ज्याला जमते तो "यशस्वी " ठरतो. जरा गणित चुकल कि जातो बाराच्या भावात.
( बाराच्या भावात गेलेला)
प्रकाश घाटपांडे
काही आवडणार्या न आवडणार्या सूचना
प्रत्येक इंग्रजी शब्दाला प्रतिशब्द सुचवलाच पाहिजे असे नाही. जर इंग्रजी शब्द उचारायला सोपा , जोडाक्षरे नसलेला किंवा अगदी सोपी जोडाक्षरे असलेला(व्याख्या करावी लागेल) आणि मराठीत रूढ असेल तर प्रतिशब्द तयार करू नये, केल्यास तो इंग्रजीपेक्षा अधिक सोपा असला पाहिजे. एका शब्दाला एक प्रतिशब्द हा आग्रह सोडून द्यावा. अनेक प्रतिशब्द वापरात आणावेत, कालान्तराने त्यातले जे दोन तीन राहतील त्यांचा अधिकृत शब्दकोशात समावेश करावा. शब्द केल्यावर नाम असल्यास जोडीने त्याचे लिंग, अनेकवचन, सामान्यरूप, विशेषण किंवा गरजेनुसार क्रियाविशेषण तयार करून ठेवावे. आणि या उलट.
आंही इमेल(संदेश) आला म्हणतो(आली नाही!). मेल(आगगाडी) गेली. मेल(टपाल) गेले. त्यामुळे नवीन शब्दांची लिंगनिश्चिती केलीच पाहिजे.
पुल्लिंगी विदाचे अनेकवचन करायची गरज पडली तर ते घोडे सारखे विदे करायचे का? हिन्दीतला संस्कृतोद्भव 'विदा'(प्रस्थान, निरोप, बिदागी) स्त्रीलिंगी आहे.
मराठी शब्द शक्यतो, शुद्ध मराठी(दंत्य च, झ, ळ असलेले), नाहीतर संस्कृत, इंग्रजी, फार्सी, अरेबिक, हिंदी, कानडी , तेलुगू यातल्या कुठल्याही भाषेतून उचलावेत. उच्चारायला सोपे, शक्यतो अर्थ सहज समजणारे, वापरून वापरून रूढ होण्याची क्षमता असलेले आणि त्याचा मराठीत किंवा इतर भाषेत विपरीत किंवा अश्लील अर्थ न होणारे असावेत. हे शेवटी उल्लेख केलेले धोरण इंग्रजांनी जमेल तेवढे पाळले होते. म्हणूनच त्यानी पुणं चे प्यून, अहमदाबादचे म्याडाबाद, लखनौचे लखनाव, कानपूरचे क्यानपर् आणि मुंबईचे मम्बाय(हल्लीचा पाश्चात्य रेडिओ-टीव्ही वरचा उच्चार) अशा उच्चारांचे स्पेलिंग केले नव्हते.--वाचक्नवी
आणखी एक
येथे एक समुदाय सुरु करा. शब्दभांडार असा. नवे शब्द, अथवा चर्चा करताना हा निवडल्यास आर एस एस फिड घेतलेल्यांना हि माहिती जाइल आणि शब्दभांडार समुदाय आणि त्या बरोबरच त्याच्याशी संबंधीत सर्व काही कधीच मृत होणार नाही.
मराठीत लिहा.
मिलिंदराव,
आणि माहितीपूर्ण लिखाण करताना मुख्य अडचण म्हणजे मराठी पारिभाषिक शब्दांची.
अहो पण जी मंडळी माहितीपूर्ण किंवा उदाहरण द्यायचं झालं वैज्ञानिक वगैरे विषयांवर लेखन करतात ती स्वतःच 'मराठी शब्द हवे आहेत' या सदरात रांग लावून उभी असतात. आता मला सांगा, की खुद्द लेखकालाच जर मूळ मराठी परिभाषिक शब्द माहिती नसेल तर वाचकांना ते लेखन कसे बरे कळावे? त्यापेक्षा तिथे सहज सोपा, सर्वांच्या परिचयाचा एखादा इंग्रजी शब्द आला तर ते लेखन वाचण्यास अधिक सोपं नाही का जाणार?
उदाहरणार्थ, 'ऑक्सिजन' या वायूबद्दल आपण आता बोलू. हा जो काही वायू आहे त्याला मुळात 'ऑक्सिजन' असं म्हणायला नक्कीच कुणा मराठी माणसाने सुरवात केलेली नाही. आज त्या वायूला सगळी दुनिया आज 'ऑक्सिजन' म्हणूनच ओळखते. असं असताना उगाच एखाद्या लेखात त्याला 'प्राणवायू' म्हणण्यात काय हशील आहे? अर्थात, ऑक्सिजन हे मी फार सोपं उदाहरण दिलं परंतु असे कितीतरी वैज्ञानिक शब्द आहेत की ज्यांची मराठी परिभाषिक नांवे लिहायला, उच्चारायला, वाचायला अत्यंत भयानक आणि चमत्कारिक वाटतात!
असो...
अवांतर (ह घ्या)
म्हणजे ह्या प्रकल्पांतील एका व्यक्तीला जरी बसचा अपघात झाला (देव करो, आणि तसे न होवो), तरी हे प्रकल्प बंद पडतील.
अरे मिलिंदा तू माझ्या जिवावर का उठला आहेस?:)
त्यातून अचानक गेलोच तर नीलकांताशी संपर्क साधून पुढे काय करायचं ते तुम्ही सगळे ठरवा, कारण सगळ्या चाव्या त्याच्याच हातात आहेत! फार फार तर दरवर्षी माझ्या मयंतीच्या दिवशी मिसळपाव च्या चित्राच्या जागी माझा फोटो लावत जा! :)
आपला,
(मॉर्टल!) तात्या.
ऑक्सिजन
आदरणीय विसोबा,
आपण समजा ऑक्सिजनवर लेख लिहिणार असाल, तर प्राणवायू असे लिहून पुढे कंसात (ऑक्सिजन) लिहायला आपली काही हरकत आहे का ? (जोवर आपल्या वाचकांना प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन कळत नाही, तोवर ?)
अर्थात आपण लिहिणार ते असे:
बरे का वाचकहो, आम्ही आज ऑक्सिजन ओढला बरे का ? नाही, म्हणजे आमचे अण्णा पण ओढतात. आणि आमचा *** शक्तिवेलू पण, पण प्रत्येकाला त्या प्राणवायूचा काय परिणाम होतो, ते आमच्या व्याडेश्वरालाच ठावूक ..
वगैरे वगैरे..
पण ह्या शैलीत लिहिलेले लेख तेथील वाचकांना आवडतात, आणि म्हणूनच, जे लेख वाचकांना आवडतात, त्यात उल्लेखलेले शब्द समजून घेण्याचा वाचकही प्रयत्न करतो. म्हणून तुम्हाला आग्रह.
नाहीतर काय "ओलेकाकांच्या गहन" चर्चाप्रस्तावात त्यांना हे शब्द वापरण्याचा आग्रह करू ?
कैच्याकैच !
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? थू तुमच्या जिंदगानीवर !
ऑक्सिजन
ऑक्सिजनला प्राणवायू हा अगदी खेडोपाडी रूढ असलेला शब्द आहे . मी आणि माझ्या माहितीतील असंख्य लोक प्राणवायू हा शब्द बोलताना सर्रास वापरतो. यावरून आठवले...मुंबईची एक बाई तिच्या पुणेरी मैत्रिणीबद्दल सांगत होती. 'फारच शिष्ट आहे ती! आपण कसे मराठीत मेयर म्हणतो, ती महापौर का असेच काहीतरी संस्कृतमध्ये बोलते. ती पेपरला चक्क वर्तमानपत्र म्हणते'. आम्हाही म्हणतो, पुणेरी नसलो तरी! आज महाराष्ट्रात महापौर, तसेच नगरसेवक, नगराध्यक्ष हे शब्द रूढ आहेत कारण ते काउन्सिलर, कॉर्पोरेटरपेक्षा सोपे आहेत. आणि याच कारणासाठी प्राणवायू!--वाचक्नवी
हायड्रोजन
परंतु हायड्रोजन ला उदजनवायू का काहीसा शब्द आहे, तो मात्र लोकप्रिय नाही.
सरळ सरळ जलवायू म्हटले तर तो अधिक लोकप्रिय होईल की नाही ?
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?
जलवायू
हिंदीत जलवायू म्हणजे क्लायमेट्. हवापाणी. म्हणून तो चालणार नाही. उदजन बोलताना जास्त लागत नाही म्हणून तो पुस्तकाबाहेर सापडत नाही, पण अतिशय सोपा शब्द आहे, हायड्रोजन् पेक्षा खूप सोपा.--वाचक्नवी
चाणक्यांचे धन्यवाद
माझ्या सहीतल्या दुव्यातली चूक चाणक्यांनी आपल्या खास शैलीत दाखवून दिली, ती आता दुरुस्त केली आहे.
धन्यवाद.
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? थू तुमच्या जिंदगानीवर !
स्वागत.
वेळेच्या अभावी प्रत्येक प्रतिसाद वाचू शकलो नाही, परंतु आपल्या उपक्रमात हार्दिक सहकार्य राहीलच.
लोकप्रियता करण्यासाठी आपणाला लोकांमध्ये जावे लागेल.
नंतर लिहितो.
नक्कीच
लोकप्रियता करण्यासाठी आपणाला लोकांमध्ये जावे लागेल.
नक्कीच !
वृत्तपत्रांखेरीज "लोकांमध्ये जाणे" सध्या शक्य नाही, असे वाटते.
तुम्हाला काय वाटते ?
मटा मध्ये नील वेबर ह्यांनी एकदा शब्दभांडाराविषयी लिहिले होते. एकदा मटा मध्येच "विदा" हा शब्ददेखील वाचण्यात आला होता.
शब्दभांडारात २००० नवीन शब्द येतील तेव्हा, मी मटाकारांना स्वतःहून पिडेन.
तोवर वाचकांच्या पत्रांत ह्या शब्दांचा उल्लेख व्हावा, ह्याव्यतिरीक्त आणखी काय सुचतेय तुम्हाला ?
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? थू तुमच्या जिंदगानीवर !
अवांतर - निषेध! निषेध!! निषेध!!!
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? थू तुमच्या जिंदगानीवर !
भांडारकर सरांना आपल्या सहीच्या माध्यमातून वाचकांवर थुंकण्याचा अधिकार नाही. मी त्यांच्या थुंकीचा जाहीर निषेध करतो...:)
तात्या.
--
न लगे मुक्ती आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
:-) :-)
आदरणीय विसोबा,
आम्ही आपल्या निषेधाचा आदर करतो !
- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?
निषेध - २
आयुष्यभर झटून घडवलेल्या तुमच्या शब्दभांडारात तुम्हाला 'जिंदगानी'साठी योग्य मराठी प्रतिशब्द सापडला नाही? उपयोग काय मग अशा जिण्याचा??? असलं जगणं व्यर्थ आहे!
स्तुत्य
स्तुत्य प्रयत्न आहे. लिनक्स, ओपनऑफिस, विकीपिडीया सारख्या ओपन सोर्स धर्तीवरील प्रकल्पांना आमचा नेहेमीच पाठींबा असतो. प्रतिशब्द ओढूनताणून आणलेला असला तर तो वापरला जात नाही. आमच्या मते चपखल प्रतिशब्द सुचण्यासाठी प्रतिभेची गरज असते आणि काही लोकांकडे ती निसर्गतः असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शैलेश खांडेकर आणि त्यांचा विदा हा शब्द. या बाबतीत आमची झोळी फारच दुबळी आहे. बरेचदा साध्या शब्दांनाही प्रतिशब्द आठवत नाहीत, तेव्हा आम्ही नंदनरावांना साकडे घालतो. तरीही आम्हाला एखादा शब्द सुचला तर आम्ही नक्कीच त्याची भर घालू ही हमी देतो.
प्रतिशब्द कसे असावेत याबद्दल बर्याच चर्चा झाल्या आहेत. आमच्या मते जे शब्द इथे रूळलेले आहेत त्यांना प्रतिशब्दांची गरज नसावी. मराठी संकेतस्थळांवर आल्यापासून आमचेही मराठी बरेच सुधारले आहे. धन्यवाद, दुवा यासारखे शब्द आता सहज सुचतात.
थोडेसे याबद्दल लोकांना प्रवृत्त करण्याविषयी. याचे वेगवेगळे मार्ग असतात आणि याबद्दल बरीच म्यानेजमेंट पुस्तके भरभरून बोलत असतात. आमच्या मते याचा उत्तम मार्ग म्हणजे आमचे एक ज्येष्ठ सहकारी (कोलॅबोरेटर) प्राध्यापक डेव्हीड ली* यांच्या संकेतस्थळावरील हे वाक्य.
"If you want to conquer the ocean and reach out for new continents don't tell your men to get wood and nails to build a ship, just instil in them the yearning for the expanse of the seas and distant lands" --- Antoine de Saint-Exupery
*अवांतर : इतके आंग्लशब्द वापरल्याबद्दलचे पापक्षालन म्हणून प्राध्यापकांविषयी थोडी माहिती. ते एक उत्कृष्ट रसायनशास्त्रज्ञ आहेतच, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दुसरे पैलूही मनोरंजक आहेत. ते उत्तम जादूगार आहेत. प्रोजेक्ट मिटींगचा डिनर (आमची दुबळी झोळी इथे दिसावी!) संपल्यावर अर्धा-पाउण तास ते एकाहून एक जादूच्या प्रयोगांनी सर्वांना थक्क करतात. त्यांच्या स्कॉटलंडमधील प्रयोगशाळेत एक घड्याळ आहे, त्याचे काटे उलटे फिरतात. यामागचे कारण मात्र अजूनपर्यंत कळाले नाही :-)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
तोकडे
शब्द सुचवण्याच्या बाबतीत माझेही ज्ञान तोकडेच आहे पण शंका किंवा सुचवणीबद्दल विचारू शकते आणि त्याचे निराकरण झाले तर शब्दभांडाराला नवा शब्द मिळून जाईल.
कॉजवेसाठी काजवाट असा सोपा शब्द मनोगतावर चर्चेतून शोधला होता तो मला शब्दभांडारात दिसत आहे.
साकव
कॉजवेसाठी 'साकव' हा शब्द अगोदरपासून वापरात आहे. काजवाट हाही छान शब्द आहे, साकवच्या बरोबरीने वापरायला हरकत नसावी. एकसे दो भले!
यावरून आठवले... फ्लायओव्हर साठी उड्डाणपूल वापरतात, त्याऐवजी नुसताच उड्डाणी(स्त्री) वापरावा, त्यामुळे सबवेसाठी भुयारी मार्गऐवजी 'भुयारी', एक्सप्रेस हायवे साठी शीघ्रगतिमार्गऐवजी 'गतिमार्ग', सिटी बायपास रोडला बाह्य वळण मार्गऐवजी 'बाहेरी', डायव्हर्शन(डिटुअर)साठी 'विमार्ग' (विपरीत मार्ग) अल्टरनेट रोडसाठी वेमार्ग(वेगळा मार्ग). टोल रोडसाठी टोलमार्ग मुळातच रूढ आहे, जकातमार्ग पण चालून जाईल.
--वाचक्नवी
प्रकल्पास शुभेच्छा !!!
शब्दभांडाराचा ( शब्दभांडारकरांचा) प्रकल्प आम्हाला आवडला. प्रतिशब्द सुचण्यासाठी प्रतिभा लागते आणि दुदैवाने ती आमच्याकडे नाही, असे आपला पहिला भाग वाचुन वाटला. मात्र जर प्रतिशब्द सुचला तर त्याची सुचवणी नक्की करु . !!!
अज्ञान, आणि काहि सुचना
शब्दभांडार न वाढायला अनेक कारणांबरोबर त्याच्या अस्तित्वाचं अज्ञान हे मुख्य कारण समजता येईल. मला या शब्दभांडाराच्या अस्तित्वाचा पत्ताच नव्हता. यात माझ्या अ़ज्ञानाचा जितका वाटा आहे तितकाच कमी जाहिरातींचाही.
काहि सुचना:
१. माझ्यामते मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव या तिन्ही संकेतस्थळांनी याकामी एकत्र येऊन एक बदल करायची गरज मला आहे. आपल्या संकेतस्थळांवरील हेडर व फुटर(?) मधे शब्दभांडाराचा दुवा द्यावा. ही संकेतस्थळे नवीनच पाहणार्याला असे शब्दभांडार आहे हेच कळेल. लक्षात ठेवा ओरडणार्याची करवंदे खपतात गप्प रहाणार्याची द्राक्षे देखील नाहित. (करवंदे ज्यांना द्राक्षापेक्षा आवडतात त्यांनी म्हण उलट वाचावी :)
२. शब्दभांडारत सुचलेल्या शब्दांबरोबरच असे शब्द ज्याचे प्रतिशब्द मिळाले नाहि आहेत त्याचीही नोंद प्रत्येक पानावर एकाबाजूला ठळकपणे व्हावी. जेणेकरून एखादा शब्द टाकायला गेलेल्याला अथवा नुसतेच शब्दभांडार बघायला गेलेल्याला महित असलेला शब्द लगेच सुचवू शकेल
-ऋषिकेश