स्वदेस आणि महासंगणन

नमस्कार मंडळी,

कालचा माझा "खास सर्किट शैलीतला" चर्चाप्रस्ताव आपण वाचला असेल अशी आशा आहे. "ती" बातमी बऱ्याच लोकांनी वाचली होती, असे दिसते. पण त्या बातमीचे महत्व बऱ्याचशा लोकांना कळले की नाही, हे मात्र कळत नाही. कुणी जाणकार लोकांनी ह्याविषयी लिहावे, अशी इच्छा असलेले येथे काही लोक आहेत, हेही नसे थोडके.

तर, बातमी अशी होती, की टाटा सन्स च्या एका संस्थेने, म्हणजे पुण्याच्या एका "कॉम्प्युटेशनल रिसर्च लॅब" ह्या संस्थेने ह्या वर्षी एक महासंगणक (सुपर कॉम्प्युटर) विकसीत केला आहे, ज्याला अशा महासंगणकांच्या जागतीक क्रमवारीत चौथे स्थान मिळाले आहे. (उपक्रमावरील एका सदस्याने अशा क्रमवारीत आपल्याला काहीही रस नाही, असे लिहिले आहे. अशा अनेक क्रमवाऱ्या अनेकदा प्रकाशित होतात. त्यातील काही क्रमवाऱ्या अत्यंत क्षुद्र निकषांवर अवलंबित असतात, त्यामुळे "सब घोडे बारा टक्के", अशी सदर सदस्याची धारणा झाली असेल, तर त्याला मी दोष देत नाही. परंतु, एक लक्षात घ्यायला हवे, की २००२ मध्ये जेव्हा एका जपानी महासंगणक - अर्थ सिम्युलेटर - ह्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला, तेव्हा आयबीएम, एचपी ह्या कंपन्यांचे, आणि अमेरिकन सरकारचे धाबे दणाणले. अमेरिकन महासंगणनाचे बजेट चौपट वाढले. आणि त्यानंतर तीनच वर्षात अमेरिकेचा, आयबीएमचा महासंगणक पुन्हा ह्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला. याद्यांचे महत्व आता तरी बाल्टीमोरच्या संशोधकांना पटावे ;-)

पण एका बोस्टनवासीयाने प्रस्तुत केलेला मुद्दा मांडल्याशिवाय ही प्रस्तावना पूर्णत्वास येणार नाही. ते म्हणतात "भारताला महासंगणनापेक्षाही पार्यावरणविषयक संशोधनाची अधिक गरज आहे, आणि अधिक महत्व देखील." असे मुद्दे बोस्टन अथवा सॅनफ्रॅन्सिस्को ह्या "उदारमतवादी" शहरांतच तयार होतात. भारतासारख्या कॉन्झर्वेटिव्ह समाजात ह्या मुद्द्यांना फारसे महत्व मिळत नाही, हे आपले सुदैव. पण खरे सांगायचे, तर पर्यावरणाशास्त्रासाठी महासंगणकांचा वापर भारतात १९८९ पासून होतो आहे. ह्या दोन शाखा परस्पर विलग नाहीत, उलट एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून आहेत. अॅल गोर आपल्या पावरप्वाईंट मध्ये जे आलेख टाकतो, ते आलेख करोडो बाईट्सचा विदा गाळून बनवलेले आहेत. ह्या विद्याचे खनन करण्यासाठी महासंगणक आवश्यक आहेत. महासंगणक ही कुठल्याही देशाची अथवा समाजाची लक्झरी नाही, गरज आहे.

हे वरचे वाक्य लिहिल्यावर "अ ट्रिप डाउन द मेमरी लेन" आवश्यक आहे.

फ्लॅशब्याक.

इसवी सन १९८९. सदर लेखकाने नुकतेच बी ई पूर्ण केले होते. पण आपण ह्या चार वर्षांत काही शिकलोच नाही, अशी रुखरुख मनात होती, म्हणून आणखी दोन वर्षे शिकावे, असा निश्चय करून कानपूरच्या आयआयटीमध्ये प्रवेश घेतला होता. राजीव गांधींचा हा काळ. तरुणाईला वर आणणारा काळ. देशाच्या पंतप्रधानाने टेक्नॉलॉजीला महत्व देऊन, सॅम पित्रोडा सारख्या "मॅव्हरिक्स" ना सरकारात उच्च पदे देण्याचा काळ. अर्थातच पित्रोडाच्या सी-डॉट मूळे प्रेरित झालेले आम्ही तरुण त्याच्याच सी-डॅक च्या संकल्पनेवर प्रचंड खुश झालो. एका नवीन क्षेत्रात काम करण्यासाठी आता भारत सोडावा लागणार नाही, ह्यातच आम्ही खूष. एम टेक संपवून लगेच सी-डॅक मध्ये कार्यरत झालो. हा सी-डॅक मधला सर्वोत्कृष्ट काळ होता. वय वर्षे वीस-ते-पंचवीस ह्यातील बहुतांश तंत्रज्ञ, आपण आपल्या देशासाठी काहीतरी भव्य दिव्य करतोय, ह्या भावनेने प्रेरित. रोज रात्री दीड-दोन वाजेपर्यंत अर्ध्यापेक्षाही अधीक लोक काम करताना दिसायचे. (माझ्यासारखे काही कामाव्यतिरीक्त इतरही करायचे ;-) माझी भावी बायको देखील तिथेच काम करायची :-) त्याकाळची सी-डॅक मधली अशी "काम" करणारी चार-पाच युगुले मला माहिती आहेत :-)

परम महासंगणकाची निर्मिती काही सहजासहजी झाली नाही. डॉ. आरोग्यसामी पालराज, आणि डॉ. विजय भाटकर (सी-डॅक बंगलोर, आणि पुणे ह्यांचे अनुक्रमे मुख्य अधिकारी) ह्यांचे मतभेद सर्व जगाला ठाऊक होते. शेवटी भाटकर जिंकले, आणि पॉलराज स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक झालेत.

परम महासंगणक १९९२ मध्ये जगापुढे आला. २५६ सीपीयू असलेला एक छोटासा प्रयत्न तो. जगाच्या भव्य संगणकांपुढे कितीसा टिकणार ?

फ्ल्याशब्याक समाप्त.

प्रेझेंट.

दोन वर्षांपूर्वी माझे गुरू डॉ. काळे इथे, म्हणजे बे एरियामध्ये भाषणासाठी आले होते. ते इथे आले, की मी नक्कीच त्यांना भेटतो. त्या भेटीत त्यांनी सांगितले, की "नरेन्द्र करमरकर (लिनीयर प्रोग्रामिंग चे सर्वात उत्कृष्ट सोल्युशन म्हणून करमरकरांची पद्धती विख्यात आहे) टाटांकडून महासंगणनासाठी निधी मागतोय. तू म्हणत होतास, भारतात जायचे म्हणून. करमरकरला जॉईन करायचे आहे काय ?"

मी तेव्हा भारतात परत जायला उत्सुक असलो, तरी "तयार" नव्हतो. पण ही डेव्हलपमेंट मी माझ्या सी-डॅकच्या मित्रांना कळवली. त्यातील काही लोकांनी करमरकरांचे हे नवीन व्हेंचर जॉईन केले. (हेलो शैलेश आणि सीतारामकृष्णा!)

करमरकरांनी टाटांकडून १०० मिलियन डॉलर्सचा निधी गोळा केला, आणि कॉंप्युटेशनल रिसर्च लॅब नावाची संस्था पुण्यात सेनापती बापट रोड वर, कन्वेन्शन सेंटर मध्ये एक पूर्ण मजला भाड्याने घेऊन स्थापन केली.

पण करमरकरांचे त्यानंतर लगेच, म्हणजे सहा महिन्यांतच टाटा सन्स च्या संचालकांशी "वैचारिक" मतभेद झालेत. टाटांना ह्या संस्थेकडून आर्थिक नफा कसा मिळेल, ह्याची फिकीर होती, तर करमरकरांना हा "रीसर्च टेस्टबेड" म्हणून टाटांकडून अनुदान मिळवायचे होते. करमरकर तिथून बाहेर पडले. सी आर एल पुढे मोठाच पेच निर्माण झाला. करमरकरांच्या ज्ञानाचा आणि कल्पनांचा सी आर एल ला मुळीच फायदा करून घेता आला नाही. पण टाटांकडून मिळालेल्या पैशांचा पुरेपूर उपयोग करून घेऊन हिंजवडीच्या डेटासेंटर मध्ये एचपी कडून विकत घेतलेल्या संगणकांचे जाळे सीतारामकृष्णाने विणले. आणि भारताला जगातील सर्वोच्च ५०० संगणकांमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचवले !

अभिनंदन, सी आर एल, आणि मुख्यत: एन सीताराम कृष्णा, आणि शैलेश कोल्हटकर !! आय ऍम प्राऊड अॉफ यू, ऍंड ऑल ऑफ इंडिया शुड बी, टू.

आता एकच विनंती.

टॉप५०० च्या इतर महासंगणकांचे कार्यक्षेत्र आधिच ठरले आहे. काही अणु विज्ञानावर तर काही पर्यावरणावर केंद्रित आहेत. टाटांच्या ह्या महासंगणकाचे कार्यक्षेत्र अद्याप निश्चित नाही.

त्यामुळे मी रतन टाटांना एक पत्र लिहितोय, ते असे,

प्रिय रतन टाटा,

आपण भारतातल्या आजवरच्या भारतातील सर्वाधिक शक्तिमान महासंगणकाला निधी पुरवून ह्या स्वप्नाची पूर्तता केली, ह्याबद्दल आपले अनेक आभार. माझ्या लक्षात आलेले आहे, की इतर महासंगणकांच्या निर्मात्यांनी जशी त्यांच्या महासंगणकांच्या कार्यक्षेत्रांची निश्चिती केलेली आहे, तसी आपण केलेली नाही. समजा आपल्या ह्या महासंगणकाचे कार्यक्षेत्र आपण अद्याप निश्चित केले नसेल, तर माझी आपल्याला सूचना आहे, की हा महासंगणक भारतातल्या संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी खुला करावा. माझ्या विद्यार्थीदशेतील अनुभवांतून मी आपणास सांगू इच्छितो, की ह्या विद्यार्थ्यांना महासंगणनाचे जे उपयोग सापडताय, ते आपल्या संस्थेच्या महान वैज्ञानिकांना देखील सापडणार नाहीत.

सर्व आय आय टी आणि आय आय एस सी, ह्या संस्थांच्या सर्व विद्यार्थ्यांना हा महासंगणक फुकट वापरण्याची संधी मिळावी, त्यातच टाटा सन्सचे भले आहे, एवढेच आपल्याला सांगू इच्छितो,

आपला शुभचिंतक,

सर्किट

मस्त

आपला लेख आणि टाटांना केलेली विनंती दोन्ही मस्त आहेत. आपल्या विनंती वर नक्किच विचार होइल असे वाटते. टाटांचा तरुणाईवर खास विश्वास आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर हल्ली टाटा मोटर्स कंपनी मध्ये अनेक तरुणांना चांगल्यासंधी मिळत आहेत. तसेच आपण देशासाठी असे काही करत आहोत जे जगाला एक भारतीय उत्पादन म्हणुन ओळख देणार आहे ही भावना ते देतात. काही म्हणजेच १-२ वर्षांपुर्वी PICT मधील होउ घातलेल्या अभियंत्यांना सर्वोच्च पगाराची म्हणजेच ४ लाख प्रति वर्ष असा पगार देउ करणारी कंपनी म्हणजे टाटा मोटर्स होय.

एक मतः
सर्व सामान्य भारतीय जनतेची तांत्रिक जगतातली उडी म्हणजे सर्वान नवीन असलेला मोबाइल फोन वापरणे. तंत्रज्ञान, त्याचा रोजच्या गोष्टींसाठीचा वापर याबद्दल भारतीयांच्या मनोवृत्तीमध्ये फारच तफावत आहे हे मात्र सत्य आहे.




मराठीत लिहा. वापरा.

आपले काँटॅक्ट्स

चाणक्य,

आपले किंवा आपल्या स्नेह्यांचे, अथवा इतर कुणाही उपक्रमीचे टाटा ग्रुपच्या उच्चपदाधीष्टित अधिकार्‍यांशी निकट संबंध असतील, तर आम्ही हे पत्र श्री. रतन टाटांकडे पोहोचवू इच्छितो.

कळवा.

- सर्किट

आउट ऑफ कॉन्टेक्स्ट

पण एका बोस्टनवासीयाने प्रस्तुत केलेला मुद्दा मांडल्याशिवाय ही प्रस्तावना पूर्णत्वास येणार नाही. ते म्हणतात "भारताला महासंगणनापेक्षाही पार्यावरणविषयक संशोधनाची अधिक गरज आहे, आणि अधिक महत्व देखील." असे मुद्दे बोस्टन अथवा सॅनफ्रॅन्सिस्को ह्या "उदारमतवादी" शहरांतच तयार होतात.

आणि सर्कीट साहेब, तुम्ही जिथे राहता तेथे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट लिहीणारे तयार होत असाबेत... मी त्या संदर्भात काय लिहीले होते ते जसेच्या तसे:

पर्यावरण हा माझा आवडता विषय आणि माझ्या दृष्टीने भारताच्या दृष्टिनेपण अतिशय महत्वाचा विषय. आज सुपरकाँप्यूटरपेक्षा चांगल्या हवापाण्याची जास्त गरज आहे. पण असले समाजवादी बोलणे मलाच रुचत नाही. या दोनही गोष्टी बातमी, आनंद, काळजी म्हणून "मुच्युअली एक्सूझीव्ह" आहेत आणि त्या तशाच अशा ठिकाणी वाचाव्यात असे वाटते.

आम्हाला उदारमतवादी म्हणालात सर्व पावले, आता स्वतःला कोणी दिशाभूल करणारा असे म्हणायला लावू नका म्हणजे झाले.

असो बाकी आपला लेख चांगला आहे. टाटांना पत्र लिहीण्याची कल्पना जरा बालीश वाटली तरी....

माफ करा, पण

सुपरकाम्प्युटर पेक्षा हवापाण्याची जास्त गरज असते, हे आपणच लिहिले होते ना ?
असो, मी हे लिहिताना आपला प्रतिसाद डोळ्यांपुढे नव्हता. (आठवणीतून लिहित होतो.) त्यामुळे आपली नंतरची सारवासारव "समाजवादी बोलणे मला रुचत नाही" वगैरे, ह्याकडे दुर्लक्ष झाले.

- सर्किट

बालीश वगैरे

टाटांना पत्र लिहीण्याची कल्पना जरा बालीश वाटली तरी....

मग रतन टाटांना फोन करू म्हणता ?

नंबर द्या. तोही करीन.

- सर्किट

कराच

खरतर तुम्ही असा वैयक्तिक संवाद साधणे जास्त परिणाम कारक राहिल. अनेक शोध लागण्या पुर्वी लोकांना त्या कल्पना बालीश वाटतात हा इतिहास आहे. माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की जाउन भिडणे जास्त परिणाम कारक ठरेल. सर्वांसाठीच.

याचा तसेच याचा सुद्धा काही उपयोग होतो का ते पहा.




मराठीत लिहा. वापरा.

धन्यवाद

मी नक्कीच ह्या दूरध्वनीक्रमांकांचा उपयोग करेन. सी आर एल, ही आपल्या टाटा सन्सच्या सब्सिडियरींच्या दुव्यांत कुठेच दिसत नाहीत. पण टाटा ट्रस्टचा एज्युकेशन प्रकल्प उपयोगी ठरेल, असे वाटते.

- सर्किट

टाटा ट्रस्ट

मला ही असेच वाटते.




मराठीत लिहा. वापरा.

दै.सकाळ मधील वाचकाचे पत्र दि.१६ नोव्हे २००७

देशाचे ऋण फेडावे

मुकेश अंबानी यांनी आपल्या पत्नीस तिच्या वाढदिवसानिमित्त २४८ कोटी रुपये किमतीचे एक विमानच भेट म्हणून दिले आहे. या विमानातील अंतर्गत सोयी व सुविधा यावर १०० कोटी रुपये खर्च गृहीत धरल्यास अंबानी कुटुंबीय आधुनिक युगातील "गंधर्व'च म्हणून गणले जातील. अंबानी या जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत व त्यांच्या संपत्तीचा विनियोग कसा करावयाचा हा सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे; परंतु खरोखरीच त्यांची संपत्ती त्यांची एकट्याचीच आहे काय? या देशातील सर्वसामान्य व्यक्तीचा तिच्यावर काहीच अधिकार नाही काय? भारतातील औद्योगिक क्रांतीचे प्रणेते जमशेटची टाटा एक आदर्श उद्योगपती होते. टाटा उद्योगसमूहातील नोकरी ही शासकीय नोकरीपेक्षाही अधिक सुरक्षित कर्मचाऱ्यांच्या हितास जपणारी होती. टाटा यांनी अनेक शैक्षणिक संस्था निर्माण केल्या. सामाजिक, आरोग्यविषयक, मूलभूत संशोधन करणाऱ्या अग्रणी संस्था निर्माण केल्या व आजही त्यांचे नाव सर्वतोमुखी आहे. बिर्ला उद्योगसमूहानेदेखील भारतभर अनेक भव्य व सुंदर मंदिरे उभारून लाखो भाविकांना ईश्‍वरभक्तीकरिता निवांत स्थाने मिळवून दिली. अनेक क्षेत्रांत अग्रणी संशोधन संस्थाही त्यांनी उभारल्या आहेत. अगदी अलीकडील काळात नारायणमूर्ती यांनी त्यांच्या "इन्फोसिस' या उद्योगात कर्मचाऱ्यांना समभाग देऊन एकप्रकारे सामाजिक क्रांतीच केली आहे. त्यांचे नाव व त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन एका मध्यमवर्गीय कुटुंबासारखेच राहिले आहे. मुकेश अंबानी यांनी मिळालेल्या संपत्तीचा अधिक योग्य विनियोग करून आपल्या समाजाचे व देशाचे ऋण फेडणे अपेक्षित आहे.

- श्री. वि. बेलसरे, पुणे.

आपण तर बाबा यवढच करु शकतो. फार सहन नाही झालं तर अस एखाद पत्र लिहून मोकळ व्हाव

प्रकाश घाटपांडे

टाटांना संपर्क

टाटांना पत्र लिहीण्याची कल्पना जरा बालीश वाटली तरी....

ह्याचे साधे कारण असे आहे की इतरांप्रमाणे मला देखील हे वाचताना छान वाटले आणि त्यामागचा हेतू (वापर करायला देणे) खर्‍या अर्थाने योग्यच वाटला. पण असे "फील गूड" वाटणे सोडल्यास यातून काही सहजसाध्य होईल असे मला वाटले नाही. तरी देखील माझ्या आपल्यास बालीश म्हणणारे माझे विधान बालीश आहे हे समजून आपणास विनंती करतो की आपण आपले पत्र लवकरात लवकर इंग्रजीत "ऑफिशिअयली" लिहून टाटांना पाठवल्याचे येथे कळवाव. जमल्यास त्याची स्कॅन आवृत्तीचे चित्र येथे दिसेल अशी व्यवस्था करावी. म्हणजे मग माझ्यासार्ख्याला हुरूप येईल. नाहीतर नुसतेच बोलले गेले आणि काही तसे आपल्याहातून घडले नाही तर उगाच "आरंभशूर" ही मराठी माणसाची पदवी आपल्यास पण लागेल.

नाहीतर आपणच म्हणल्याप्रमाणे बॉस्टन ब्राम्हीन्स खडूस असतात हे लक्षात ठेवून माझी प्रतिक्रीया सोडून द्या! आणि हो, अजून एक बॉस्टन ब्राम्हीनच्या व्याख्येप्रमाणे मी काही त्यात बसत नाही.

धन्यवाद

छानच

तुमच्या आजवरच्या अनुभवामुळे तुम्हाला अशा घटनांची पार्श्वभुमी माहीती असते अन् एकंदरीतच् अधिक् माहीती असते, म्हणुन अशा विषयांवर् लेख लिहावा तर तुम्हीच. संगणक इथे म्हणजे हिंजवडीतच् आहे हे माहित होते पण तुमचा या घटनांशी इतका जवळचा संबध् होता हे समजुन उगाचच आनंद झाल्यासरखे वाटले. (बालिशपणा अजुन् काय ;) )

(शशांकराव् प्रत्येक् 'अ'कारान्त् शब्दनंतर् 'अ' किंवा बॅक्स्पेस् मारायला जिवावर् येते हो.)

हिंजवडी

प्रसाद,

गेल्या उन्हाळ्यातच (जुलै २००७ मध्ये) पुण्यात सी आर एल ला भेट दिली, माझा मित्र शैलेश कोल्हटकर तिथे असल्याने हे सुलभ झाले. तेव्हाच हिंजवडीला त्यांचे विदाकेंद्र असल्याचे कळले. (हे आधीपासून माहिती नव्हते, हे कळावे, आणि मनोगतापासूनचा आपला लोभ वृद्धिंगत व्हावा, ही विनंती :-)

- सर्किट

अकारान्तासाठी ए?

उपक्रमावर टंकायचे म्हणजे इथलेच फॉन्ट वापरायला पाहिजेत असे नाही. गमभनच्या किंवा मनोगताच्या पानावर टंकून इथे चिकटवता येते. किवा बरहा देवनागरी फॉन्ट्‌स उतरवून घ्या आणि ते वापरून इथे उपक्रमावर लिखाण करा. अकारान्तासाठी ए मारणे किंवा माघार घेण्याची अजिबात गरज नाही .--वाचक्‍नवी

द्राविडी प्राणायम

वाचक्‍नवी, सर्वप्रथम धन्यवाद.
आपण सुचविलेले उपाय रास्तच आहेत पण हे द्राविडी प्राणायम कशासाठी ?
व्यवस्थित टंकता येणे ही कोणत्याही स्थिरस्थावर संकेतस्थळाची बेअर मिनीमम रिक्वायरमेंट नाही काय ?

क्.लो.अ.
(अकुशल टंकलेखक्) प्रसाद

अवांतर : शशांक तुझ्या प्रोग्राम मधे स्पेस डिटेक्ट करुन लास्ट बट वन अ़क्शर अकारान्त असल्यास त्याची मोडलेली तंगडी काढुन टाकता येणार नाही का ? उदा. जसे सध्या बॅकस्पेस मारल्यावर जोडाक्शर् तुटत् जाते, तसाच् लूप् स्पेस रिकगनाइज् करणारा असावा. लहान तोंडी मोठा घास असे झाले असल्यास् क्शमस्व्.

(जुना अकुशल आद्न्यावली लेखक्) प्रसाद

लोभ आहेच

तुम्ही भारतात येउन गेलात हे माहीती पडले होते, पण त्या काळात तुमच्या देशातल्या बँकासाठी मर मर राबत होतो, त्यामुळे प्रचंड इच्छा असुनही संपर्क् करु शकलो नाही.

(मिलिंद भांडारकर आपला जिगरी मित्र आहे अशी बिन्दिक्कत चाट् मारणारा)
प्रसाद.

फुकट डिंगे...

ज्या देशात अजून साध्या ८०८५चे उत्पादन होऊ शकत नाही अशा देशात परकीय बनावटीच्या एचपी सर्वरक्लस्टरचा सुपर काँप्युटर बनवण्यात कसला आलाय अभिमान? त्याचे इन्फिबँड स्विचेससुद्धा बाहेरचेच आहेत.
टाटा सीआरएलचे कर्तृत्व काय? तर इतके सर्वर्स एकत्र जोडले. ओएससुद्धा लिनुक्स आहे.

फक्त सॉफ्टवेअर नको, आता हार्डकोअर हार्डवेअरही बनले पाहिजे. मेम्सवाले सेन्सर बनले पाहिजेत.तेही फक्त डिझाईन नको, उत्पादन झाले पाहिजे.
ज्या दिवशी १२८बिट प्रोसेसर्स भारतातून निर्यात होऊ लागतील त्या दिवशी मला खरा आनंद होईल.

मलाही

ज्या दिवशी १२८बिट प्रोसेसर्स भारतातून निर्यात होऊ लागतील त्या दिवशी मला खरा आनंद होईल.

मला आताही आनंद आहेच...
पण असे झाले तर नक्कीच जास्त आनंद होईल...

आपला
गुंडोपंत

१२८ ?

१२८ बिट प्रोसेसर्स ला मार्केट आहे का ?
टाटा सी आर एल चे कर्तृत्व आपल्यालेखी नसल्यास, इतर कर्तृत्त्वशून्य संस्थांनी असे महासंगणक का बनवलेले नाहीत, ह्याचा विचार व्हावा.
प्रोसेसर्सचे उत्पादन होणारा तैवान हा एकमेव देश आहे. (इण्टेल, एएमडी च्या अमेरिका, आयर्लंड, जर्मनीतल्या फॅब्ज मध्ये फक्त चिपसेट बनतात असे ऐकले आहे. चू भू द्या घ्या.)
चिपांच्या उत्पादनात भारतीयांची क्रीयाशीलता वाया जात नाही, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.

- सर्किट

अधिक तांत्रिक माहिती वाचायला आवडेल

सर्किटराव,
आपण बारकाव्यांसहित दिलेली बातमी आवडली.
या निमित्ताने या विषयाची अधिक तांत्रिक माहिती (सोप्या पद्धतीने लिहिलेली) वाचायला आवडेल.
काही वर्षांपूर्वी मी "बिओवुल्फ क्लस्टर" संबंधी माहिती वाचली होती. त्यावरून असा समज झाला की परम महासंगणक वगैरे अशाच प्रकारचे काहीतरी असावे. परंतु याची तपशीलवार रीत पूर्वीच उपलब्ध होती ना? अनेक संगणक एकमेकांना जोडून महासंगणक बनवणे यात नक्की कोणती आव्हाने असतात? यात अडचणी कोणत्या? पूर्वीपेक्षा वेगळी प्रगती किंवा नवे नक्की काय चालले आहे? की केवळ जोडल्या जाणार्‍या प्रक्रियकांची/संगणकांची संख्या वाढते आहे?
या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण लिहावीत (वाटल्यास स्वतंत्र लेखात) अशी विनंती आहे.
- दिगम्भा

नक्कीच

नक्कीच लिहेन. सध्या तरी कम्युनिकेशन नेटवर्क ही महासंगणकाच्या जुळणीतली महत्वाची पायरी सी आर एल ने नव्याने विकसीत केलेली आहे, ह्यावर भर द्यावा.

- सर्किट

सर्किटराव

कृपया जरा हा (चौथा) महासंगणक करणे म्हणजे नक्की काय? हे विस्तारपुर्वक सामान्यांना समजेल असा समजवा.

विसुनानांच्या प्रतिसादावरुन वाटतेय की अनेक सर्व्हरस् जोडून एक मोठा महासंगणक होतो. तसे असेल तर मग जगातला लांब डोसा, सर्वात मोठा पिझ्झा अश्या उपक्रमात ह्यात फरक काय? तसेही संपूर्ण देशी बनावटीचा असा उल्लेख (फुकट डिंगा...) मला नाही दिसला त्यामुळे असेना का परदेशी बनावटीचे भाग. तसेही एक तंत्रज्ञान सगळ्यांनीच परत परत बनवायचे मग झालीच प्रगती व पोहोचली जनतेपर्यंत, गोगलगायीच्या स्पीडमधे.

आता वाटायला लागलेय पुढच्या दिवाळीत श्री राजा देशपांडे (गॅरेजवाले) मित्रमंडळ महासंगणक बनवणार!!! सुंदरनगर इंडस्ट्रीजच्या सौजन्याने ;-) ह. घ्या.

संपूर्ण

संपूर्ण देशी बनावटीच्या कुठल्याही वस्तू आजकाल (फ्लॅट वर्ल्ड मध्ये) कोणत्याही देशात दिसत नाहीत. त्यामुळे तशा डिंगा कुणीही मारू नयेत.

अगदी परम च्या वेळीही इनमॉस कंपनीचे (ब्रिस्टल, यू के) ट्रान्सप्यूटर हे प्रोसेसर्स वापरल्याने (आणि नंतर इण्टेल चे आय ८६०, नंतर सनचे अल्ट्रास्पार्क, नंतर आयबी एमचे पॉवर पीसी) त्याही उपलब्धीला कमी लेखणारे लोक कमी नव्हते.

- सर्किट

चांगली माहिती.

असा महासंगणक तयार झाला आहे हे उत्तम. पण तो टेस्टिंगच्या स्टेजमध्ये नसला तर तो फुकट का द्यावा? त्याची किंमत भारतीय रूपयांत किती असते?

सर्व आय आय टी आणि आय आय एस सी, ह्या संस्थांच्या सर्व विद्यार्थ्यांना हा महासंगणक फुकट वापरण्याची संधी मिळावी, त्यातच टाटा सन्सचे भले आहे, एवढेच आपल्याला सांगू इच्छितो,

आता फक्त आय आय टी किंवा आय आय एस सी च्या विद्यार्थ्यांपुरते ही मागणी मर्यादित का? बाकीचीही कॉलेजेस आहेत की? रीजनल इंजिनीअरींग कॉलेजे आहेतच, आय आय एम, आणि इतर खाजगी आणि सरकारी कॉलेजेस - त्यातील विद्यार्थ्यांना का नको? विषयाला फाटे फोडायचे नाहीत, पण ही सुविधा टाटांनी केवळ अशा निवडक संस्थांना दिल्यास तो मला अन्याय झाल्याप्रमाणे वाटेल.

सहमत

पण ही सुविधा टाटांनी केवळ अशा निवडक संस्थांना दिल्यास तो मला अन्याय झाल्याप्रमाणे वाटेल.
-सहमत

मान्य आहे

मान्य आहे. त्या वाक्यांत "किमान" हा एक शब्द टाकणे आवश्यक आहे. पण दुसरेही एक कारण असे, की समांतर प्रक्रियणाचे कोर्सेस हे मास्टर्स लेव्हल ला अधिक असतात, आणि मास्टर्स डिग्र्या देणारी काही थोडीच रेप्युटेबल महाविद्यालयात आहे, असे वाटते.

- सर्किट

वा वा !

त्याकाळची सी-डॅक मधली अशी "काम" करणारी चार-पाच युगुले मला माहिती आहेत :-)

ते सगळे "कामातूर" झाले असणार (कामासाठी आतूर्) म्हणून दिड दोन कसे वाजले ते कळत नसेल.

हलकेच घ्या.

कार्यक्षेत्र/बोइंग

टाटांच्या ह्या महासंगणकाचे कार्यक्षेत्र अद्याप निश्चित नाही.

काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार बोइंग एअरोडायनॅमिक सिम्युलेशनसाठी टाटांचा महासंगणक वापरणार असल्याचे कळले. वृत्तात म्हटल्याप्रमाणे No financial details were disclosed. यावरून महासंगणक व्यावसायिक कारणांसाठीही वापरला जाईल असे दिसते. टाटांचा इतिहास पाहता शैक्षणिक/संशोधन संबंधी कामांसाठीही महासंगणकाचा उपयोग होईल अशी आशा आहे.