प्रताधिकार आणि कोडी, विनोद वगैरे
उपक्रमावरील लेखनाच्या विषयांच्या यादीत "कायदा" हा उपविभाग नाही, म्हणून तत्वज्ञान ह्या विषयांतर्गत हा प्रस्ताव सुपूर्द करावा लागतोय, त्याबद्दल क्षमस्व.
प्रताधिकार (अर्थातच कॉपीराईट लॉ) हा माझा अभ्यासाचा विषय आहे. मी त्यात तज्ञ वगैरे नाही, किंबहुना जे त्यात स्वतःला तज्ञ समजतात, त्यांना ह्या कायद्याचे अभिरूप समजलेलेच नाही, असे माझे मत आहे.
आपण ऐकलेला विनोद, किंवा कुणी आपल्याला सांगितलेली कोडी, वगैरे, ही आपण ह्या ऐकीव माहितीचे मूळ न सांगता पुनर्प्रकाशित करावीत की नाही? हा विषय इतर लेखांना आलेल्या प्रतिसादांतून गाजतो आहे. माझे ह्याविषयीचे अनुभव सांगितल्यास ह्या विषयावर अधिक उजेड पडेल.
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र टाईम्स मधल्या "हसा लेको" ह्या सदरात आलेले विनोद "माझे शब्द" ह्या संकेतस्थळावर कुठलेही संदर्भ न देता प्रकाशित झाले होते. त्यावर मी प्रतिसाद दिला होता, की कमीत कमी मूळ संदर्भ देत चला. अगदी विनोदासाठीही. माझे मनोगतावरचे एक "मित्र", ह्यांनी माझ्या लेखनावर प्रतिकूल प्रतिसाद देण्यासाठीच जणू मोहीम उघडली आहे, त्या प्रतिसादावर खूपच भडकले. म्हणाले 'विनोद आपण अनेक ठिकाणांहून ग्रहण करतो -ऐकतो- त्या सर्वांचेच संदर्भ देणे आवश्यक नाही.'. आजवर पहिल्यांदाच मला त्यांचे म्हणणे माझ्या मेंदूचा वापर करून वाचावेसे वाटले. एखादा विनोद आपण कुणाकडून तरी ऐकला, तो "मी हा ऐकलेला विनोद" असा अचूक संदर्भ न देता पुन्हा लिहिणे अयोग्य नाही.
पण सदर सद्गृहस्थांना "एखादा ऐकलेला विनोद" आणि "एका विनोदी सदरात प्रकाशित झालेले सात विनोद, त्याच क्रमाने, त्याच शुद्धलेखनातील चुकांसह" पुनर्प्रकाशित करणे, ह्यातला फरक कळला नाही, हेच सिद्ध होते.
तसेच कोड्यांचे. मनोरंजनासाठी एका व्यक्तीने दुसर्या व्यक्तीला घातलेले कोडे, त्याने "मी ऐकलेले कोडे तुम्हाला सांगतो", असे सांगून पुन्हा लिहिले, तर ते प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन होत नाही. परंतु समजा दुसर्याने लिहिलेल्या कोड्याच्या पुस्तकातील एक एक कोडे घेऊन त्याचे मराठीकरण करून प्रकाशन केले, तर मात्र ते कायद्याचे उल्लंघन ठरते.
प्रताधिकार कायदा हा नवनवीन लेखनाला उत्तेजन देणारा कायदा, म्हणून त्याची निर्मिती झाली. मी लिहिलेल्या मूळ लेखनावर माझे अधिकार नसतील, तर नवीन मूळ लेखन होणार नाही, हा सर्वानुमते केलेला विचार, हे प्रताधिकार कायद्याचे मूळ. मला समजा माझे लेखन माझ्याच ताब्यात रहावे असे वाटत असेल, तरच मी मनापासून ते लेखन करणार. नाहीतर पुलंचे रावसाहेब मी उद्या इंग्रजीत भाषांतरित करून मीच हे लिहिले असे म्हटले, तर मुळात पुलंना रावसाहेब लिहिण्याची प्रेरणा येणारच नाही. "काय फायदा आहे लिहिण्यात?" असे म्हणून पुलं त्यांची लेखणी शांत ठेवतील. आणि आपण सर्वच उत्कृष्ट साहित्यापासून वंचित राहू.
भाषांतर हे प्रताधिकार कायद्याअंतर्गत "आधारित साहित्य" अर्थातच डिराइव्ह्ड वर्क, मानल्या गेले आहे. त्यामुळे कुणाच्या लेखनावर जेव्हा "हे अमुक अमुक लेखाचे मराठीकरण आहे" असा आरोप करण्यात येतो, तेव्हा हा आरोप खरा असल्यास, तो लेख प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन मानण्यात यावा. आणि कायद्याच्या उल्लंघनाच्या गंभीरतेने त्याकडे बघण्यात यावे.
तुम्हाला प्रताधिकार कायदा मान्य आहे का ? असा कायदा असावा का ? आणि अशाच अनेक प्रश्नांची ह्या प्रस्तावाच्या प्रतिसादांत उत्तरे यावीत, ही अपेक्षा.
('कायदे' अश्या लेखनविषयाची भर घालून सदर चर्चा त्यात वर्गीकृत केली आहे.)
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा

आणखी काही उदाहरणे
पूर्वी मनोगतावर डार्विनच्या सिद्धांताविषयी मराठीतून एक अत्यंत माहितीपूर्ण लेख एका लेखिकेने लिहिला होता. त्यातील मूळ माहितीवर नव्हे तर, असे लेख म्हणजे चार ठिकाणांतून गोळा केलेली माहिती आहे असे "डिस्पराजिंग" (अनुल्लेख करणारे) प्रतिसाद आले होते. बराच वादही झाला होता. लेखावर टीका करणार्यांपैकी एक जुने जाणते सदस्य, संत साहित्याचा नियमीत अनुवाद करत होते. अर्थात शंभराहून अधिक वर्षे मूळ लेखनाला होऊन गेल्याने संतसाहित्याचा अनुवाद करणे हे प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन ठरत नाही. पण सदर सदस्यांनी डार्विनच्या लेखनालाही अनेक वर्षे झाल्याने अगदी त्याच्या लेखनाचे शब्दशः भाषांतर देखील कुठल्याही कायद्याचे उल्लंघन ठरत नाही, ह्याकडे काणाडोळा केला.
दुसरे उदाहरण. मी टॉर ह्या आज्ञावलीचा मनोगतावरील "टू मेनी रीक्वेस्ट्स, ट्राय लेटर" ह्या कुप्रसिद्ध संदेशाला टाळण्यासाठी वापर केला. माझ्या अनुभवाविषयी एक लेख मनोगतावरच लिहिला. त्यावर एका सदस्याचा प्रतिसाद असा आला, की "मी हा लेख क्षयज्ञ ह्या मासिकात वाचला आहे, त्याचे मराठीकरण आपण केले आहे". सदर सदस्याला मी आजवर जिथे संधी मिळेल तिथे आपल्या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी पुरावे मागितले आहेत, परंतु खेदाची बाब अशी की अद्याप हा सदस्य ते पुरावे न देता "उजळ" माथ्याने वावरतो आहे. आणि इतर सदस्यही त्याला ते पुरावे मागत नाहीत. नव्हे काही सदस्य तर "मग ? असा आरोप केला तर काय बिघडले?" अशी भूमिका घेताहेत ! (अर्थात त्यांनी ही सिलेक्टिव्ह भूमिका घेणे, हे त्यांच्या एकूण विश्वजालाच्या वावरातूनच कळते.)
असे आणखीही अनुभव आहेत. पण सदस्यांना त्याविषयी फारशी कल्पना नसल्याने आणि त्यातील मूळ विधाने सत्यासत्यतेच्या कसोटीवर पारखून पाहणे हे सदस्यांसाठी खूपच वेळ घालवणारे ठरेल, म्हणून अशी विधाने येथे लिहित नाही.
वेळ पडल्यास, आणि सदस्यांची तयारी असल्यास ती सादर करणे मी माझे कर्तव्य समजीन.
- युयुत्सु
--
पांडवांकडून लढलेला एकमेव कौरव (पूर्वाश्रमीचा सर्किट)
सहमत
सहमत आहे आरोप करणे सोपे असते, पण पुरवे मागितले की टाळटाळ होते.
मला वाटते की या संदर्भात मनोगताच्या प्रशासकांनी निश्चित भुमीका घेऊन सभासदा ला योग्य ती समज द्यायला हवी होती.
(त्यातली तात्यांची टीप्पणी तर् खास आहे बर का!)
गुंडोपंत
~ उपक्रम वयाने वाढावे ह्याचे मी समर्थन करतो!~
अपेक्षा
सदर लेखात नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण लेखन युयुत्सु यांच्याकडून अपेक्षित आहे. काही मित्रांशी झालेल्या चर्चेनंतर जीएंचे माणसे: चे पुढील भाग मनोगतावर देणे सध्या थांबवले आहे. ते लेखन पुन्हा सुरु करण्यासाठी/न करण्यासाठी ही लेखमाला उपयोगी ठरावी.
मात्र या लेखाचे स्वरुप मनोगतावर व इतर ठिकाणी झालेल्या चर्चांवर टीका असे होऊ नये असे वाटते.
समर्थन
वा सही आवडली!
~ उपक्रमावर इतरांच्या सह्या आवडल्यास ढापता याव्यात ह्याचे मी समर्थन करतो ;) ~
ढापली
एखादे लेखन (किंवा सही) प्रताधिकार कायद्याच्या कक्षेत केव्हा येते हे युयुत्सु किंवा इतर जाणकार मंडळी सांगू शकतील काय?
आम्हालाही इतर सदस्यांच्या सह्या मोकळेपणाने ढापता याव्यात असे वाटते.
हा हा हा!
उपक्रम वयाने वाढण्याऐवजी उपक्रमावरील सदस्यांचे मानसिक व बौद्धिक वय वाढावे ह्याचे मी समर्थन करतो.
हा हा हा! 'सही' सही आहे....;)
आपला,
(वयस्कर!) तात्या.
आपली सही
आपली सही ही आपल्या प्रतिभेचा आविष्कार आहे, तेव्हा सही ढापणे ही प्रताधिकार कायद्याच्या अंतर्गत येईल.
आपल्याला आपली सही ढापण्याबद्दल प्रताधिकार कायद्याच्या अंतर्गत कुणावर खटला भरायचा असल्यास साक्ष द्यायला मला बोलवा.
मी अवश्य येईन.
- युयुत्सु
--
पांडवांकडून लढलेला एकमेव कौरव (पूर्वाश्रमीचा सर्किट)
मान्य
आपण जीएंचे लेखन त्यांचा प्रताधिकार अद्याप नाहिसा झाला नसतानादेखील एका संकेतस्थळावर पुनर्लिखीत करीत होतात, असे कळते. (अर्थातच आपण ते लिखाण स्वतःच्या नावाने नव्हे, तर जीएंच्या लेखनाचे पुनर्प्रकाशन म्हणून लिहीत होतात, ही संतोषजनक बाब आहे.) अशा प्रकारचे लिखाण मूळ प्रताधिकार धारकाने आज्ञा केल्यास नष्ट करण्याची आपली क्षमता आणि इच्छा असावी, हे महत्वाचे. पण विश्वजालाच्या युगात आपण मूळ संकेतस्थळावरील लिखाण नष्ट केले, तरी गूगल सारख्या शोधयंत्रात ते लिखाण सापडते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा प्रकारचे लिखाण आपण आपल्या अनुदिनीवर केले, तर ते लिखाण गूगलच्या साठवणीतून नष्ट करण्याची विनंती करण्याची आपली क्षमता निश्चितच असेल, परंतु मनोगतावरील आपले लिखाण गूगलने स्वतःच्या साठवणीतून नाहिसे करावे ही आज्ञा करण्याची क्षमता आपली नाही, तर मनोगताच्या प्रशासकांची आहे, हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
आपल्याला प्रताधिकारांविषयी लेखनाचा फायदा ह्या लेखाच्या प्रतिसादातून व्हावा, ही इच्छा. ज्या लेखनाचे प्रताधिकार संपले आहेत, उदा. गांधीजींची पत्रे, त्याचे भाषांतर करतानादेखील मूळ पत्राचा संदर्भ लिहिण्याचे तारतम्य मी बाळगले होते, (नैतिकदृष्ट्या ते लेखन अधिकृत ठरावे म्हणून, कायदेशीररीत्या नव्हे) हे आपल्याला आठवतच असेल. मूळ लेखनाचा संदर्भ द्यावा, ह्याविषयी मी गुंडोपंतांच्या एका प्रतिसादातील विचारांशी सहमत आहे. मूळ लेखनाचा संदर्भ देणे, हे एखाद्या लिखाणाचे महत्व वाढवते, कमी करत नाही. हे एक लक्षात ठेवले, तर आपल्या भाषेची समृद्धीच होईल, (हे विधानदेखील गुंडोपंतांचेच) ह्याविषयी देखील सहमत आहे.
इतर ठिकाणी झालेल्या चर्चांवर टीका करणे हे प्रताधिकार कायद्याच्या अंतर्गत येत नाही. न्यूयॉर्क टाईम्स मध्ये आलेल्या संशोधनावर टाईम्स ऑफ इंडियात एखाद्या वार्ताहराने टीकात्मक लेख लिहिला, तर त्यात गैर काही नाही, असे वाटते. परंतु त्या लेखातील १०% पेक्षा जास्त मजकूर मूळ लेखनाचा उल्लेख न करता लिहिला, तर मात्र ते प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन ठरेल.
- युयुत्सु
--
पांडवांकडून लढलेला एकमेव कौरव (पूर्वाश्रमीचा सर्किट)
लेखातील १०% पेक्षा जास्त
परंतु त्या लेखातील १०% पेक्षा जास्त मजकूर मूळ लेखनाचा उल्लेख न करता लिहिला, तर मात्र ते प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन ठरेल.
हा निकष योग्य आहे असे वाटते.
(१०% च्या आतला)
गुंडोपंत
~ उपक्रम वयाने वाढावे ह्याचे मी समर्थन करतो!~
जबाबरीतून मुक्ततेची सूचना
कोडी, विनोद यांचा मूळ उगम माहिती नसल्यास(तो नसतोच बहुतेकदा) 'ही कोडी/विनोद त्यातला काही भाग/पूर्ण भाग हे इतरत्र वाचलेल्या/ऐकलेल्या माहितीचे संकलन आहे.मूळ स्रोत माहिती नाही' असा काहीसा डिसक्लेमर देऊन हा वाद सोडवता येईल असे वाटते.

य नां ची कोडी त्यांनी पूर्णतः स्वतः बनवलेली नसली तरी त्यातले त्यांचे उत्कृष्ट मराठीकरण, नावे, भाषा हे निश्चित क्रिएशन या सदरात मोडते. या कोड्यांच्या मूळावरुन वाद करत बसण्याऐवजी ती सोडवून प्रत्येकाला आनंद मिळावा असेही वाटते.
लेख छान आहे..
मिलिंदकाका,
लेख छान आहे. या विषयावर अजूनही असे काही लेखन येऊ द्या..
--तात्या.
अवांतर -
उपक्रमावरील लेखनाच्या विषयांच्या यादीत "कायदा" हा उपविभाग नाही, म्हणून तत्वज्ञान ह्या विषयांतर्गत हा प्रस्ताव सुपूर्द करावा लागतोय,
शेम शेम! माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीच्या संस्थळावर 'कायदा' हा विभागच नाही! आता बोला! माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीमध्ये ललितलेखनासोबतच कदाचित 'कायदा' विभागही बसत नसावा! ;)
आपला,
(मधल्या आळीतला!) तात्या देवगडकर.
झकास!
शेम शेम! माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीच्या संस्थळावर 'कायदा' हा विभागच नाही! आता बोला! माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीमध्ये ललितलेखनासोबतच कदाचित 'कायदा' विभागही बसत नसावा! ;)
हा हा हा!
तात्या तुम्ही म्हणजे अगदी अस्सल नमुना अहात! ;)
नवा प्रतिसाद पाठवा
तुमचे नाव:
गुंडोपंत
~ अरे!? चुकुन सगळेच कॉपी झाले वाटते :) ~
दुनियादारी..
मजकूर संपादित... अशा प्रतिसादांसाठी कृपया खरडवहीचा वापर करावा.
माझे शब्द
मिलिंद, विषय फारच चांगला आहे. उदाहरणार्थः माझे शब्दवर माझी एक कविता अशीच एक मेकांमध्ये देवाण घेवाण करतानाच्या गप्पांमध्ये दिसली होती. मला वाटत कि हे लेखन माझे नसुन अमुक अमुकचे आहे ते सांगणे त्या लेखनाचे, लेखकाचे आणि जो सांगतो आहे त्याचे महत्व वाढवते. एकुणच माझेशब्द वर असे प्रकार जास्त आहेत असे वाटु लागले आहे. आता या प्रकारचे संकेतस्थळ म्हणजे जिथे बराचसा माल ढापिव आहे ते विकुन पैसा मिळवणे हे कितपत योग्य आहे?
यू ट्यूब आणि माझे शब्द
यू ट्यूब वर प्रसारित होणारे व्हिडिओ आणि प्रताधिकार कायदा यांचा असा गोंधळ झाला नाही का? तेथे तर बहुतेक सगळाच माल ढापीव होता ना.
ह्याबद्दल आर्य यांचे काय मत आहे?
ढापीव
नक्किच. तो माल ढापीव आहेच. अर्थात तज्ञ लोक यावर जास्त चांगले मत देउ शकतील. येथे आपण बोलत आहोत ते लिखाणा बद्दल.
लिखाण आणि व्हिडिओ
दोन्ही प्रताधिकार कायद्यांतर्गत सुरक्षित असावेत.
माझे शब्द च नव्हे तर या स्वरुपाचे डिस्कशन फोरम सुविधा देणार्या सर्वच मराठी संकेतस्थळांनी
The fact that a particular message is posted on or transmitted using this web site does not mean that Upakram management has endorsed that message in any way or verified the accuracy, completeness or usefulness of any message.
या स्वरुपाची सूचना दिली आहे. याउप्पर जर सदस्यांनी ढापीव माल तेथे टाकला, व त्यामुळे ते संकेतस्थळ लोकप्रिय झाले व संचालकांनी ते विकून पैसे मिळवले तर त्यात संचालकांचा काही दोष नाही असे वाटते.
एक व्यंगचित्र पहा. मग माहितीची देवाणघेवाण व आजकालच्या वाचकांच्या / प्रेक्षकांच्या अपेक्षा याबाबत थोडी कल्पना येईल. :)
प्रतिसाद्
योगेश आपला प्रतिसाद आल्याने मी माझा प्रतिसाद बदलु शकलो नाही. :) असो, काही प्रश्न मनात आले.
१. युट्युब वर एखादा माल (उदा: एखादे अमिताभवर चित्रित गाणे) हा माझा आहे वा मी तयार केला आहे असे सांगणारे कोणी आहे का? माझे युट्युब बद्दलचे ज्ञान यथातथाच आहे.
२. मला वाटत कि चोरीचा माल विकत घेणारा आणि विकणारा हे दोघे हि दोषी धरले जातात. अर्थात याला अनेक फाटे फुटू शकतात. शेवटी कायद्याच्या पळवाटा अनेक असतातच.
बरोबर आहे.
यूट्यूब प्रमाणेच माझे शब्द वरही हे साहित्य "आमचे" आहे असा कोणी दावा केल्याचे माझ्या मर्यादित वाचनात आले नाही.
चू.भू.दे.घे.
या मुद्याशी सहमत पण चोरी म्हणजे नक्की काय या बाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे.
माझे शब्द
एखादी कविता/लेख वाचताना खाली ज्याचे नाव आहे तोच/तिच कवि/कवियीत्री/लेखक/लेखिका मानली जाते वा समजली जाते. हे लक्षात घ्या कि आपण लेखना बद्दल चर्चा करतो आहे. तसेच एखादा सिनेमा तयार करताना सुद्धा त्याचे नाव ठरवताना हल्ली प्रताधिकार घेतात असे वाचनात आले आहे. उद्या भोले असे नाव ठेवुन मी परत शोले हा मी तयार केलेला चित्रपट असे करू शकतो का? मुद्दा हाच आहे कि लेखन आणि दृकश्राव्य यांची चर्चा एकत्र होणे थोडे गोंधळाचे वाटते.
अवांतरः माझ्या मित्राने, त्याच्या मित्राच्या गरजेसाठी माझ्या पाकिटातले पैसे नकळत घेतले आणि त्याला दिले तर त्याच्या मित्राने काय समजावे? मी काय समजावे? माझ्या पाकिटातून चोरी झाली? त्या मित्राला मदत करणारा माझा मित्र महान आहे? ती महानता तो मिरवताना मी झालेल्या प्रकारा बद्दल अनभिज्ञ आहे कि माझ्य पाकिटातले पैसे चोरीला गेले आहेत. वास्तविक मित्राने घेतले हे न कळल्यास मी चोरीचा गुन्हा दाखल करावा कि कळल्यावर ते विसरून जावे वा ठिक आहे ते पैसे माझे आहेत म्हणून सांगावे आणि परत मागावेत कि गप्प बसावे? नक्कि काय करावे?
कायदा नक्किच असे सांगेल कि आधि चोरीचा गुन्हा नोंदवा. मग न्यायालयात हे सिद्ध होउ द्यात कि पैसे मित्राने तुम्हाला न सांगता घेतल्याने ती चोरी आहे. आता तुमचा मित्र चोर आहे असे वाटू नये म्हणून तुम्ही झाला तो सगळा प्रकार त्या तिसर्या मित्राकडून पैसे परत घेउन सगळा प्रकार न्यायालया बाहेर मिटवा.
थोडक्यात काय? जर श्रेय देउन गोष्टी समजल्या तर प्रत्येकाला आनंद आहे. पण जर त्याचा गैरवापर/गैरफायदा घेतला जात असेल तर ते थांबवायला कयद्याची गरज आहे.
प्रश्नः माझेशब्द संचालकांना जर माहित असेल कि येथे श्रेय लाटण्याचे गैरप्रकार सुरू आहेत तर त्याला प्रतिबंध घालणे हे त्यांचे कर्तव्य नाही काय? त्यावर प्रतिबंध न घालता वर त्यावरून फायदा कमावणे हे सुद्धा गैर नाही का?
सदस्यलेखनाधारित संकेतस्थळे
माझेशब्द संचालकांना जर माहित असेल कि येथे श्रेय लाटण्याचे गैरप्रकार सुरू आहेत तर त्याला प्रतिबंध घालणे हे त्यांचे कर्तव्य नाही काय? त्यावर प्रतिबंध न घालता वर त्यावरून फायदा कमावणे हे सुद्धा गैर नाही का?
आपण उपस्थित केलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. सदस्यलेखनाधारित संकेतस्थळाचे सदस्य बनताना चालकांकडून जो अर्ज दाखवण्यात येतो, त्यात ""ह्या संकेतस्थळावर मी लेखन करताना प्रताधिकारांचे उल्लंघन करणार नाही." असेही लिहिलेले असते. (विकीपीडियाच्या तळटीपेवर एक नजर टाका.) ह्याचाच अर्थ चालक सदस्य-लेखनाची जबाबदारी स्वतःवर घेत नाही. ही जबाबदारी सदस्यावर असते.
परंतु ज्या संकेतस्थळांवर चालक संपादनाचे अधिकार स्वतःकडे ठेवतात, त्यांना एखादे लेखन कुठल्याही कायद्याचे उल्लंघन करते असे निदर्शनास आणून दिले, तर सदर लेखन नाहिसे करण्याची जबाबदारी चालकांची असते.
व्हायाकॉम ह्या संस्थेने यूट्यूबवरील त्या संस्थेचे सगळे शोज काढून टाकण्याची आज्ञा करताच यूट्यूबच्या चालकांनी दोन दिवसात ती चलचित्रे काढून टाकली होती, आणि कायद्याच्या बडग्यापासून स्वतःचे संरक्षण केले होते, हे नुकतेच घडलेले आपल्याला आठवत असेल.
- युयुत्सु
--
पांडवांकडून लढलेला एकमेव कौरव (पूर्वाश्रमीचा सर्किट)
मी केला
जिथे जिथे माझे शब्द वर मनोगतींचे /इतर मला माहिती असलेल्या कोणाचे साहित्य निनावी येते तेव्हा मी त्याचा स्रोत नमूद करते. आईशप्पथ मीच पहिल्यांदा लिहीलेल्या खारोळ्या काही ओळी काटून आणि 'कापणारी' ऐवजी 'कापणारा', असे सोयीस्कर पुरुषवचनी बदल करुन विरोपांतून फिरत फिरत माझे शब्द वर येतात तेव्हा ती रचना माझी आहे हा दावा मी केलेला आहे. 'बैठे काम? आराम की हराम?' हा लेख निनावी प्रसिद्ध झाला तेव्हाही तो माझा आहे असे सांगितले आहे. व्यवस्थापकांनी व सदर लेखकाने व्यवस्थित माफी मागून त्यानाच तो लेख विरोपातून निनावी मिळाला असे म्हटले आहे. मराठी गझल या संकेतस्थळाच्या चालकांच्या कविता जेव्हा जेव्हा निनावी दिल्या जातात आणि मिळणारी वाहवा सोयीस्कररित्या कविता टाकणार्याकडे जाते तिथे मूळ कवी दुवा व पुराव्यासहित सांगितला आहे. मायबोलीवरच्या एका लेखिकेची कथा कोणीतरी निनावी दिली होती तेव्हासुद्धा इतरांनी त्याचा स्रोत सांगितला आहे. मागे एकदा म वर स्वर्गामधले वैभव या कवितेबाबत ही मी तसे सांगितले होते.
स्रोत माहिती नाही, हरकत नाही, जगातल्या प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला माहिती असतील असे अजिबात नाही. पण निदान 'मला स्रोत माहिती नाही, ज्याना माहिती असेल त्यानी सांगावा, मूळ श्रेय स्रोताला दिले जाईल' असे तरी लिहावे असे वाटते.(मला वाटून काय उपयोग?जोपर्यंत इमेलची सुविधा आणि कळफलकावर कॉपी आणि पेस्टची आणि प्रिंट स्क्रिनची बटने अस्तित्वात आहेत तोपर्यंत असे होतच राहणार.)
माझे शब्द चे संचालक ढापूगिरीची भलामण अजिबात करत नाहीत, जिथे उघडकीस येते तिथे सुधारणा करतात. पण कोणी दावा केला नाही तर ढापूगिरीकडे दुर्लक्ष करतात/दुर्लक्ष कामामुळे होते असे वाटते.
जिथे जिथे असे लिखाण दिसेल तिथे आपण/इतरांनी मूळ स्रोत (पक्का माहिती असल्यास)सांगणे हाच असे प्रकार थांबवण्याचा उपाय वाटतो.
निर्भत्सना
मनोगतावर सर्वसाक्षींनी लिहिलेला एक लेख प्रशांत कांबळे नावाच्या एका व्यक्तीने स्वतःच्या अनुदिनीवर मूळ लेखकाचे नाव न लिहिता प्रकाशित केला होता. तेव्हा त्याच्या अनुदिनीवर आणि मनोगतावरही त्याची पब्लिक निर्भत्सना करून मी त्याला योग्य ऋणनिर्देश करणे भाग पाडले होते.
- युयुत्सु
--
पांडवांकडून लढलेला एकमेव कौरव (पूर्वाश्रमीचा सर्किट)
नव्हे, निर्भर्त्सना
फक्त एक रफार कमी पडतो आहे.
तो शब्द निर्भत्सना नसून निर्भर्त्सना असा आहे.
(बाकी ठीकच)
- दिगम्भा
प्रकाटाआ
प्रकाटाआ
ढापणे आणि घेणे
एखादे लिखाण/व्हिडीओ मालकाच्या परवानगीशिवाय/त्याच्या नामनिर्देशाशिवाय/दोन्हीशिवाय प्रकाशित करणे याला ढापणे म्हणता येईल. याउलट, एखादे लिखाण मूळ संदर्भाचा उल्लेख करुन व मूळ लेखकाची परवानगी घेऊन एखाद्या ठिकाणी टाकल्यास त्याला घेणे म्हणता येईल. यूट्यूबवरची चलतचित्रे 'घेतली' आहेत,'ढापली' नाहीत ही आशा आहे.
बर्याच संकेतस्थळांवर एखाद्या प्रसिद्ध लेखकाचे लिखाण 'त्याने पाहिले आणि आक्षेप घेतला तर माफी मागून टाकू आणि लिखाण काढू, तोपर्यंत राहू देत. त्यात काय?' हा विचार करुन ठेवले जाते ते मात्र पटत नाही. एकतर नामनिर्देश किंवा परवानगी किंवा दोन्ही. जी पुस्तके बाजारात २०० पेक्षा जास्त किमतीला विक्रीला आहेत आणि ज्यांचे लेखक हयात आहेत त्यांची पुस्तके/कथा त्यांच्या/कुटुंबियांच्या परवानगीविना टंकून किंवा स्कॅन करुन संकेतस्थळांवर ठेवणे हा त्या विक्रीवर अन्याय नाही काय?
तात्पर्यः 'घेणे' व 'ढापणे' हे निकष व त्यातला फरक नीट ठरवून ढापणार्यावर योग्य ती कारवाई केली जावी असे वाटते.
यूट्यूब बद्दल गैरसमज
यूट्यूबवरची चलतचित्रे 'घेतली' आहेत,'ढापली' नाहीत ही आशा आहे.
ती रूढ अर्थाने ढापलेलीच आहेत. कोणीही "मूळ कर्त्याच्या परवानगीने देत आहोत" असा उल्लेख केल्याचे पाहण्यात आलेले नाही.
एक शंका मनात डोकावली. दिवसभर हिंदी गाण्यांचा रतीब घालणार्या एफ एम वाहिन्या ही गाणी प्रसारित करताना परवानगी घेतात का? (कदाचित घेत असाव्यात पण एक आपली शंका.)
पण
गाणी ही चित्रपटाच्या प्रसिद्धीला मदत व्हावी म्हणून निर्मात्यांनी/संबंधित लोकांनी स्वतःच वाहिन्यांना दिलेली असतात ना?(मला तसेच वाटायचे.) चित्रपट प्रसारीत करण्यासाठी एखाद्या वाहिनीला त्या चित्रपटांचे वितरण हक्क विकत घ्यावे लागतात. पण 'अमक्या चित्रपटाच्या गाण्यांचे हक्क विकत घेतले' असे कधी ऐकले नाही.जाणकारांनी खुलासा करावा.
मलाही असेच
वाटत होते. पण "हॅलो मधुमालती" सारख्या कार्यक्रमांमध्ये फोन "घुमवून" हवे ते गाणे ऐकता येते. तेव्हा फोन करुन विनंती केल्यानंतर गाणे सुरु होईपर्यंतच्या कालावधीत परवानगी घेणे मर्त्य मानवाला शक्य नाही असे वाटते. पण मग कोणत्या गाण्यांची परवानगी आधीच घेऊन ठेवावी हे देखील कळणे (जर ती व्यक्ती अंतर्ज्ञानी नसेल तर) शक्य नाही.
बाकी हॅलो मधुमालती सारख्या कार्यक्रमांमध्ये हल्ली गाण्यांपेक्षा गाण्याआधीचा संवाद अतिशय मजेशीर असतो. :)
हॅलो मालती
हा कार्यक्रम कधी ऐकला नाही म्हणून विचारते: ते विनंती केलेली कुठलीही जुनी गाणी/कुठलीही नवी गाणी/कुठलीही जुनीनवी गाणी वाजवतात का? आणि एखादा चित्रपट रिलीज झाल्यावर त्याची गाणी कुठेही वाजवण्याची परवानगी अध्याहृत असते असे काही आहे काय? तसेच फोन केल्यावर नाही, पण वाहिनी सुरु केल्यावरच त्यांनी शक्य तितक्या सर्व लोकप्रिय गाण्यांसाठी परवानगी घेऊन ठेवली असेल का?
(यातले काहीही माहिती नाही. या केवळ शक्यता आणि शंका आहेत.)
काही कल्पना नाही.
या मुद्द्यांबाबत जाणकारांकडून अधिक वाचायला आवडेल.
शंका
अशाच शंका भ्रमणध्वनीच्या डायलर ट्युन्स बद्दल सुद्धा आहेत.
गाण्याबद्दल
आणि एखादा चित्रपट रिलीज झाल्यावर त्याची गाणी कुठेही वाजवण्याची परवानगी अध्याहृत असते असे काही आहे काय?
आपण जेंव्हा गाण्याची सीडी/कॅसेट विकत घेतो तेंव्हा त्याच्या मागे प्रताधिकारासंबंधी माहिती लेहिलेली दिसते. (एम. पी. थ्री ला हे लागू नाही, त्याच्या माहितीप्रमाणे भारतीय भाषांतील कुठलेच एम.पी.थ्री संगीत प्रताधिकाराचे उल्लंघन न करता बनवले जात नाही.)
असे प्रताधिकार सामान्यपणे रेकॉर्डिंग कंपन्यांकडे असतात. (गायक किंवा संगीतकाराकडे नव्हे!, तसे त्याने खास घेतले असल्यास गोष्ट वेगळी.)
अशी खरेदी करताना आपण ही गाणी आपण आपल्या खाजगी ऐकण्यासाठीच घेत आहोत अशी हमी विक्रेत्याला (ऑडिओ कंपनीला) देतो.
अशी गाणी खास परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी वाजवणे (लंच दरम्यान ऑफिसेस मध्ये, गॅदरिंगसाठी वगैरे) हे प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन आहे. आर्थिक लाभासाठी असा वापर हा याहूनही मोठा गुन्हा आहे. (स्टेज शोज्, नाईट क्लब्स)
रेडिओ कंपन्या गाणी 'अशी' विकत घेत नसावीत. प्रसारण हा हेतू स्पष्ट असल्याने व यात दोहोंचा फायदा असल्याने यातील आर्थिक गणित ऋण/धन असू शकते.
पळवाटा
कायदा काढणार्यांपेक्षा पळवाटा काढणारे संख्येने जास्त असल्याने असे प्रकार होतच राहणार.
अवांतरः गाण्याच्या चालीवर प्रताधिकार आहेत का? बरेच प्रसिद्ध संगीतकार दंड भरतील असे असेल तर.
जीवदानी,साईबाबा किंवा कोणतीही प्रसिद्ध देवस्थानांच्या शेजारच्या दुकानांमध्ये सध्याच्या हिट हिंदी गाण्यात त्या त्या देव देवतेचे नाव टाकून दडपून बनवलेली गाणी आणि कॅसेट वाजत असतात. 'पंख होते तो उड आती रे' ला बदलून साईबाबांची आरती, 'झलक दिखला जा' बदलून 'जै माता दी ' चे भजन असे. ऐकून खूप मजेशीर वाटतात. या गाण्यांवर प्रताधिकाराची गदा येईल का शब्द बदलले म्हणून खपून जाईल?
पळवाट
भारतीय कायद्याच्या कोणत्यातरी ५२, १५२ की १४२ कलमान्वये जर आधी प्रसिद्ध (म्हणजे रिलीज या अर्थाने) झालेले गाणे दुसर्या गायकाच्या आवाजात ध्वनिमुद्रित करणे शक्य आहे. त्यामुळे मो. रफीची गाणी सोनू निगमच्या आवाजात आपण ऐकू शकतो. तेच गाणे दुसर्याच्या आवाजात कॉपी करणे हा भारतीय कायद्यान्वये गुन्हा नाही. गुलशनकुमार, अनुराधा पौडवाल व टी सीरिज ही कंपनी ह्या पळवाटेच्या सहाय्याने इतके दिवस टिकून आहे.
कोणत्याही रिमिक्स किंवा मो. रफी/लताची गाणी सोनू निगम/अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात सादर करणार्या कॅसेटवर या कलमाचा आधार घेतल्याचा स्पष्ट उल्लेख असतो.
गुलशन कुमार
गुलशन कुमार अजुन टिकून नाहीत. आता ते स्वर्गात (?) टिकून आहेत. त्यांची हत्या झाली आणि त्यासाठी नदिम इंग्लंडमध्ये टिकून आहे. :))
सार्वजनिक ठिकाणी ?
ऑफिस व गॅदरिंग ही ठिकाणे सार्वजनिक कशी काय? बहुतेक कार्यालये ही खाजगी मालकीची व वापराची ठिकाणे असतात.
शिवाय बर्याच गॅदरिंगांना केवळ निमंत्रितांनाच प्रवेश असतो.
स्नेहसंम्मेलन इत्यादी..
बरोबर. वरील ठिकाणे सार्वजनिक नाहीत. (शब्दांकडे बारकाव्याने न पाहिल्याचा परिणाम दुसरं काय!)
स्नेहसंम्मेलनाबाबत, भारतीय कायद्यानुसार 'विविधगुणदर्शना'साठी केल्या गेलेल्या शैक्षणिक संस्थांनी केलेल्या आयोजनाला, ज्याचा प्रेक्षकवर्ग (विद्यार्थी, पालक व शिक्षक इतकाच आहे.) या कायद्यामध्ये लेखी सूट आहे. मात्र इतर स्नेहसंम्मेलनांना नाही. (ज्यासाथी शुल्क आकारले आहे, निमंत्रितांसाठी पास विकत मिळतात, ज्याला संबंधित शैक्षणिक संस्थेचा अधिकृत आश्रय नाही, ज्यात सहभागी कलाकार त्या शिक्षणसंस्थेतील नाहीत.... अशांना ही सवलत नसावी.)
अशी कुठलीही सवलत नफा मिळवण्याच्या हेतूने प्रस्थापित न झालेल्या संस्थांपुरती आहे. (यालाही काही अपवाद आहेत जसे वृत्तपत्रात बातमी (उदा. वर्तमानपत्रात आलेले काव्या विश्वनाथन (?) चे उतारे;))). यामुळे कार्यालयीन संगीत या कचाट्यात सापडावे.
रसग्रहण, समीक्षा, शैक्षणिक संदर्भ (धडा/कविता शिकवले जाणे.) इत्यादींनाही या कायद्यात सूट आहे. (यात संगणक आज्ञावली मात्र नाहीत असे पुसटसे आठवते.)
रेडिओ
मला वाटत कि गाणी प्रसारीत करताना परवानगी घेणे गरजेचे असते. एकदा रेडिओ मिरचीचा असा वाद झालेले ऐकिवात आहे. तसेच जुने रेडिओ चॅनेल्स आज सुद्धा प्रसिद्ध आहेत कारण त्यांच्याकडे जास्तित जास्त गाणी (खास करून जुनी) प्रसारीत करण्याची परवानगी असवी.
युयुत्सु - आपल्या तज्ञ प्रतिक्रियाच्या प्रतिक्षेत आहोत.
तज्ञ नाही
चाणक्य, अनुताई, तो, आणि योगेश
आपल्या चर्चेतून बरीच माहिती मिळाली. मी सदर विषयातला तज्ञ नाही. प्रताधिकार कायद्याचे जाणतेपणे अथवा अजाणतेपणे माझ्या हातून कधिच उल्लंघन झालेले नाही, असा दावाही केलेला नाही. ह्या पार्श्वभूमीवर माझे प्रतिसाद वाचावेत, ही विनंती.
गाणी रेडियोवर लावताना ज्याच्याकडे त्या गाण्याचे प्रताधिकार आहेत, त्याला मानधन (रॉयल्टी) मिळावी का, हा विषय चार पाच वर्षांपूर्वी अमेरिकेत खूप चर्चिला गेला. २००० साली डीएमसीए (डिजिटल मिलेनियम कॉपीराईट ऍक्ट) हा नवीन प्रताधिकार कायदा येथे लागू झाला. तो कायदा बनवताना, येथील रेडिओ स्टेशनच्या मालकांनी (म्हणजे क्लियरचॅनल रेडिओ सारखे) खासदारांवर बराच दबाव आणून मानधनाचे कलम काढून टाकण्यास भाग पाडले. परंतु हे झाले ए एम आणि एफ एम रेडिओविषयी. इंटरनेट वरील रेडिओ स्टेशन्स, किंवा उपग्रहामार्फत डिजिटल स्वरूपात प्रक्षेपित होणारी रेडिऑ स्टेशन्स (एक्स एम, सीरिअस) ह्यांना मात्र प्रक्षेपित केलेल्या गाण्यांसाठी मूळ रेकॉर्ड् कंपनीला मानधन देणे आवश्यक आहे. ह्या विसंगतीबद्दल खुलासा म्हणून कायदेपंडितांनी लिहिले आहे, की डिजिटल स्वरूपातील प्रक्षेपण ही मूळ गाण्याची हुबेहूब नक्कल असते, तर ऍनॅलॉग प्रक्षेपणात गाण्याचा मूळ स्त्रोत तसाच्या तसा श्रोत्यांना उपलब्ध होत नाही.
एखादी सीडी तुम्ही विकत घेतली, आणि त्यातली गाणी कट-पेस्ट करून आपल्या संगणकावर उतरवून घेतली, तर ते प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन ठरते. परंतु ती सीडी वाजवत असताना स्पीकरसमोर टेपरेकॉर्डर ठेवून रेकॉर्ड करून घेतली, तर मात्र ते डीएमसीए चे उल्लंघन ठरत नाही.
ट्यून-बाईट्स नावाची आज्ञावली ह्या कायद्यातील हे लूपहोल ओळखून बनवलेली आहे.
- युयुत्सु
--
पांडवांकडून लढलेला एकमेव कौरव (पूर्वाश्रमीचा सर्किट)
तुमची कविता
माझे शब्दवर माझी एक कविता अशीच एक मेकांमध्ये देवाण घेवाण करतानाच्या गप्पांमध्ये दिसली होती. मला वाटत कि हे लेखन माझे नसुन अमुक अमुकचे आहे ते सांगणे त्या लेखनाचे, लेखकाचे आणि जो सांगतो आहे त्याचे महत्व वाढवते. एकुणच माझेशब्द वर असे प्रकार जास्त आहेत असे वाटु लागले आहे. आता या प्रकारचे संकेतस्थळ म्हणजे जिथे बराचसा माल ढापिव आहे ते विकुन पैसा मिळवणे हे कितपत योग्य आहे
तुमची कविता एका संकेतस्थळावर तुमच्या नावासकट दिल्या गेली. मग ती ढापिव कशी काय? आणि दुसरं तुम्ही त्यावर कॉपीराईट दिलं होतं का? इतरत्र प्रकाशन् करण्या आधी मूळ लेखकाची परवानगी आवश्यक आहे असं नमूद केलं होतं का?
मूळावरून वाद घालण्याऐवजी वाचून मनोरंजन करणं आणि करून घेणं शक्य नाही का? एका संकेतस्थळावर दुसर्या संकेतस्थळाची नाव घेऊन निंदा नालस्ती इथल्या कायद्यात बसते का? मनोगत् आणि माझे शब्द् या दोन्ही संकेतस्थळावर् मी भेटी दिल्या परंतू उपक्रम सोडता कुठंही दुसर्या संकेतस्थळावर् अशी नालस्ती दिसली नाही. जाणत्यांनी समजून घ्यावं.
नावासकट
ती कविता, आणि ज्या ज्या उचललेल्या साहित्याचा इथे उल्लेख आहे ती सर्व साहित्यं (माझे व अनेक इतरांचे) माझे शब्द वर नावासकट नव्हती.
ती दुसर्याच्या नावावर 'स्वलिखीत कविता' या प्रकारात होती .
हा दुवा
एकटेपणा
निंदा नालस्ती
येथे फक्त उदाहरणे दिली आहेत. निंदा नालस्ती करण्याचा कोणताही हेतू नाही. मुळात हि चर्चा कायदा असावा का? या बद्दल आहे आणि कायदा आला की पुरावे आले. मला नाही वाटत मी कोणाची निंदा नालस्ती करतो आहे. आपणच उपक्रमावर येउन उपक्रमावरच्या सदस्यांची निंदा करत आहात असे नाही का वाटत?
आम्ही सुद्धा आपण नमूद केलेल्या संस्थचे सदस्य आहोत. तिथे काय झाले होते, कोणी केले होते, काय केले होते हे आम्हाला सुद्धा माहीत आहे. कृपया विषयांतर करू नका.
कॉपीराईटः एक नेहमीचा प्रश्न
आणि दुसरं तुम्ही त्यावर कॉपीराईट दिलं होतं का? इतरत्र प्रकाशन् करण्या आधी मूळ लेखकाची परवानगी आवश्यक आहे असं नमूद केलं होतं का?
कॉपीराईट (प्रताधिकार) असा द्यावा/मागावा लागत नाही. कुणीही काहीही साहित्य निर्माण केले, तर निर्मात्याला त्या निर्मितीचा प्रताधिकार आपसूकच मिळतो. त्यासाठी "परवानगी आवश्यक" वगैरे सूचना देण्याचीही अजिबात गरज नाही.
- युयुत्सु
--
पांडवांकडून लढलेला एकमेव कौरव (पूर्वाश्रमीचा सर्किट)
कायदे आणि कायद्यांचे समर्थन
योगेशरावांनी आमच्या "नेहमीच्या" अभ्यासपूर्ण शैलीत प्रतिसाद द्यावे असे सुचवले आहे, त्यामुळे हा प्रतिसाद ;-)
कायदे बनवणारी मंडळी बहुतेक देशात लोकनियुक्त प्रतिनिधी असतात. परंतु ते फक्त आपल्या मतदारांच्या मागणीवरून वाट्टेल ते कायदे बनवू नयेत, म्हणून देशांच्या घटनांनी त्यांच्यावर नियंत्रण म्हणून न्यायालयाची योजना केलेली आहे.
जोवर एखाद्या कायद्याचा वापर करून सर्वोच्च न्यायालय कुणाला शिक्षा ठोठावत नाही, तोवर त्या कायद्याची अधिकृतता प्रश्नांकितच असते.
तसेच बरेच दिवस ह्या प्रताधिकार कायद्याचे झाले.
परंतु, अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने ह्या कायद्याच्या बर्याचशा कलमांवर शिक्कामोर्तब झाले, ते एका खटल्यात ह्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून.
गॉन् विथ द विंड ही श्रीमती मार्गारेट मिचेल ह्यांनी लिहिलेली कादंबरी अमेरिकेतील यादवी युद्धावर कल्पिलेल्या एका कथेवर आधारित आहे. परंतु ही कथा गोर्या लोकांच्या भूमिकेतून लिहिलेली आहे असे मानून ऍलिस रँडल ह्या लेखिकेने "द विंड बी गॉन" नावाची कादंबरी लिहिली. कथा तशीच (तीच, म्हणायला हरकत नाही), पात्रेही तीच, पण कथा वर्णणारी व्यक्ती काळी. भाषा साधारणतः अमेरिकेतील काळे लोक वापरतात तशी अशुद्ध (प्रमाणबाह्य म्हणणे अधिक योग्य) एबोनी.
न्यायालयाचा निर्णय असा की असे सगळे फरक जरी असले, तरी कथा आणि पात्रांच्या साम्यामुळे ही नवीन कादंबरी श्रीमती मिचेल् ह्यांच्या मूळ कादंबरीवर आधारित आहे, हे कळायला वाव आहे. आणि त्यामुळे प्रताधिकार कायद्याचा ह्या साहित्यात भंग केला गेलेला आहे.
(परंतु नंतर सर्वोच्च न्यायालयाने,हे एक विडंबन आहे, म्हणून ह्या कादंबरीच्या प्रकाशनाला परवानगी दिली.)
ह्या एका निर्णयाने प्रताधिकार कायद्याला न्यायालयाचा पाठिंबा मिळाला, त्यातील खाचाखोचा उघड केल्या, आणि त्यामुळे हा कायदा खर्या अर्थाने कायदा ठरला.
- युयुत्सु
--
पांडवांकडून लढलेला एकमेव कौरव (पूर्वाश्रमीचा सर्किट)
अवघड
प्रश्न अवघड आहे. यात वेगवेगळे पैलू आहेत. महाजालावर लिहिताना जेवढे माहित असतील तेवढे संदर्भ देणे केव्हाही चांगले. साहित्यामध्ये या प्रश्नाचा विचार करताना काही प्रमाणात सापेक्षता येते. (जगात फक्त 'क्ष' कल्पना असतात, सर्व साहित्य या कल्पनांवर आधारलेले असते अशी ऐकीव माहिती आहे. क्ष = ? हे लक्षात नाही.)
खुद्द शेक्सपिअरचे हॅम्लेट हे ही उर हॅम्लेट नावाच्या ग्रीक नाट्यावर आधारलेले होते. (चू. भू. द्या. घ्या.)
हिंदी चित्रपटांची गोष्टच वेगळी. रामू एकाच गॉडफादर वरून न सांगता सत्या आणि सांगून सरकार काढतो. पण रामू हे हुशारीने करतो त्यामुळे पटकन लक्षात येतेच असे नाही. :)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
सरकार
सरकारचा नाम फलकांमध्ये हा चित्रपट गॉडफादर संकल्पने वरून घेतला आहे असे स्पष्ट दाखवले आहे.
सत्या कसा?
रामू एकाच गॉडफादर वरून न सांगता सत्या आणि सांगून सरकार काढतो.
'सत्या' गॉडफादर वरून कसा?
सत्या
प्रथम एक लिहायचे राहिले ते म्हणजे हा कायदा असावा. महाजालावर जी सरळसरळ उचलाउचली चालते ती नक्कीच थांबवायला हवी.
चाणक्य
तुमचे म्हणणे बरोबर आहे. म्हणूनच सरकार हा सांगून काढला आहे.
तो
सत्या आणि गॉडफादरमधे बरेच साम्य आहे.
१. सोनी - भिकू म्हात्रे आणि सत्या - मायकेल यांचे स्वभाव, व्यक्तिरेखा यात बरेच साम्य आहे.
२. गॉडफादरमध्ये जॉनी फाँटेनला चित्रपटात काम मिळावे म्हणून निर्मात्याला धमकावणे आणि सत्यामध्ये उर्मिलाला गाणे मिळवून देण्यासाठी तोच प्रकार.
३. पोलिस अधिकार्याला मारल्यावर हाहा:कार उडेल अशी भीती दोन्हीकडे व्यक्त होते. मारल्यानंतरची परिस्थिती चित्रित करतानाच्या प्रसंगांमध्ये कमालीचे साम्य आहे. (वर्तमानपत्राच्या बातम्या दाखवणे)
४. सोलाझ्झोचा खून मायकेलची पहिली कामगिरी. क्लबमधल्या गुंडाचा खून ही सत्याची पहिली कामगिरी. इथे क्लेमेंझा मायकेलला पिस्तुल देतो, तिथे भिकू.
५. मायकेल/सत्या दोघेही शांत, कमी बोलणारे, डोक्याने काम करणारे. नंतर दोघे टोळीचे मुख्य होतात. भिकू/सोनी तापट, जास्त विचार न करणारे.
आधी म्हटल्याप्रमाणे हे हुशारीने केले आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
पटले
सत्याबद्दलची मिमांसा बर्यापैकी पटली. पण असे असेल तर उचलेगिरी भयंकर कौशल्याने केली आहे आणि त्यात स्वतःच्या बर्याच कल्पना उद्धृत केल्या आहेत.