कल्पनागार - भाग २

या आधीच्या भागाला मिळालेला भरघोस (?) प्रतिसाद लक्षात घेऊन ह्या उपक्रमात थोडा बदल केलेला आहे. आता एका विदागाराविषयी फक्त 'त्याचे काय कराल?' हा प्रश्न न देता. त्याविषयी अधिक प्रश्न विचारण्यात येतील. तर, कल्पनागाराचा हा दुसरा भाग.

भारतातील किंवा अन्य कुठल्याही देशातील सर्व वाहनांत एक असे उपकरण लावले, की जे एका विशिष्ट वारंवारितेच्या तरंगाला (सिग्नल फ्रॉम अ फ्रीक्वेन्सी रेन्ज) परावर्तित करते. हा तरंग परावर्तित व्हायला किती वेळ लागतो, ह्यावरून ते उपकरण तरंग-प्रक्षेपकापासून किती दूर आहे, हे प्रक्षेपकाला कळू शकते. तरंग परावर्तित करताना हे उपकरण आपला अनुक्रमांक देखील पाठवते, त्यामुळे प्रक्षेपकाला हे कोणते उपकरण आहे, ते लगेच कळू शकते.

ह्या उपकरणाची जागा (अक्षांश, रेखांश) कळण्यासाठी ह्या उपकरणाशी एकाचवेळी संपर्क साधू शकणारे किती प्रक्षेपक लागतील ?

प्रक्षेपकाने दोन तरंग प्रक्षेपित करताना दोघांत किती वेळेचे अंतर ठेवावे म्हणजे वाहनाचे स्थान एका मीटरच्या परीघाइतके अचूकपणे ठरवता येईल ?

सर्व प्रक्षेपकांकडून एका मध्यवर्ती संगणकाकडे (वाहनक्रमांक, अक्षांश, रेखांश) ही माहिती एकसारखी पाठवली जाते. ह्या प्रक्षेपकाची वाहनक्षमता (बँडविड्थ) किती असावी ?

मध्यवर्ती संगणकाची वाहनक्षमता किती असावी ? (प्रक्षेपकांवर माहितीच्या साठवणुकीसाठी अत्यंत कमी जागा उपलब्ध आहे, हे गृहित धरावे.)

समजा एका देशातील सर्व वाहनांकडून मिळालेला हा विदा, म्हणजे (वेळ, वाहनक्रमांक, अक्षांश, रेखांश) ह्या बहुकांची (टुपल्स) यादी, म्हणजे आपले विदागार. हे साठवायला किती जागा लागेल (बाईट्स?)

हे विदागार तुम्हाला उपलब्ध झाले, तर तुम्ही कुठले निष्कर्ष काढू शकाल ?

युरोपासारख्या खंडात, जेथे प्रायव्हसीला (पडतपावशी) खूप महत्व दिले जाते. तेथे प्रायव्हसी जपण्यासाठी ह्या विदागाराचे स्वरूप कसे असावे ?

डोके खाजवा..

मला या बाबतीत तांत्रिक ज्ञान काहीच नाही. पण थोडी फार माहिती आहे ती अशी...
भारतात टाटा मोटर्सने असे काम केले आहे. त्यांना मदत करणारी त्यांचीच उपकंपनी आहे. टाटा टेक्नॉलॉजीज. भारतातल्या ट्रक चालकांना शोधण्यासाठी ह्या माहितीचा वापर करण्याचा त्यात मानस आहे.


मराठीत लिहा. वापरा.

त्यासाठी

त्यासाठी (म्हणजे ट्रकला स्वतःचे ठिकाण कळावे म्हणून) जीपीएस रिसीव्हर वापरला आहे का ? कारण सर्व प्रमुख रस्त्यांवर मोबाईलच्या सेल टॉवर सारखे मनोरे उभारले नसावे. किंवा मोबाईलच्या टॉवर वरच ही यंत्रणा (म्हणजे पिंग करणारी) बसवण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अधिक माहिती आवडेल.

अर्थात मूळ उपक्रमाचे उद्देश्य 'हे विदागार उपलब्ध असल्यास त्यावरून कुठल्या निष्कर्षाप्रत पोचता येईल?" ह्या प्रश्नाची उत्तरे शोधणे आहे.

- सर्किट
--
सर्किटधर्मात कुठलाही शुद्धिचिकित्सक वापरत नाहीत.

मोबाईल टॉवर

मला वाटते कि मोबाईल टॉवर वापरले आहेत. या बद्दल त्यांनी माहिती कुठेच जास्त जाहिर केलेली नाही. पण अलिकडे त्यांची या तंत्रज्ञान तयार करण्यावर बरिच महत्वाकांक्षा आहे असे कळते.
नवीन टाटा इंडिका गाडी सोबत एक सिम कार्ड येते असे हि ऐकले आहे. अर्थात हि सगळी ऐकिव माहिती आहे. मला सुद्धा अधिक माहिती मिळवायला आवडेल.


मराठीत लिहा. वापरा.

माझी माहीती !

टाटा ने ट्रकसाठी GPS वापरला आहे,
GPS मध्ये असे का केले आहे की वाहनाची जागा ही २-३ किमी च्या रेंज मध्येच दाखवले जाते ?
माझ्या माहीती प्रमाणे GPS हा इंच इंच जागेची ९९.९ टक्के बरोबर माहीती देऊ शकतो ! मग टाटा अथवा अशी व्यवसायीक सेवा देणा-या सर्व संस्थेला ९० % च माहिती देण्याची अट का केली असावी भरत सरकार ने ?
जर माहीती असेल तर येथे द्यावी ही विनंती !

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

जीपीएस

राज,
जीपीएस् तंत्रज्ञानात एकाच दिशेने संवाद होऊ शकतो. म्हणजे ट्रकमधल्या उपकरणाला स्वतःचे अक्षांश रेखांश कळू शकतात. ते मध्यवर्ती संगणकाकडे पोहोचवण्यासाठी टाटांनी काय वापरले आहे ? बहुधा सेलफोनचे तंत्रज्ञान वापरले असावे.
जीपीएस तंत्रज्ञानाचा दुरूपयोग प्रायव्हसीच्या उल्लंघनासाठी वापरता येऊ शकतो, त्यामुळे रिसोल्युशन कमी ठेवण्याची अट घातली असावी.

(जीपीएस तंत्रज्ञानाची अचूकता १५ मीटर्स इतकी आहे. तुम्ही म्हणता तशी इंच इतकी नाही.)

- सर्किट
--
सर्किटधर्मात कुठलाही शुद्धिचिकित्सक वापरत नाहीत.

ही साईट पहा

माझे निष्कर्ष

आपण विचारलेल्या एकूण ७ प्रश्नांपैकी पहिले ५ अत्यंत तांत्रिक स्वरुपाचे असून ६ वा प्रश्न मात्र तार्किक स्वरुपाचा आहे आणि ७ व्या प्रश्नास तांत्रिक व तार्किक अशा दोन्ही बाजू आहेत.

१) ह्या उपकरणाची जागा (अक्षांश, रेखांश) कळण्यासाठी ह्या उपकरणाशी एकाचवेळी संपर्क साधू शकणारे किती प्रक्षेपक लागतील ?

२) प्रक्षेपकाने दोन तरंग प्रक्षेपित करताना दोघांत किती वेळेचे अंतर ठेवावे म्हणजे वाहनाचे स्थान एका मीटरच्या परीघाइतके अचूकपणे ठरवता येईल ?
मला वाटतं वरील दोन्ही प्रश्नांचे उत्तर जीपीएस तंत्रज्ञानामध्ये आहे. उपग्रहाचे संदेश वहन तंत्रज्ञान वापरल्यास ज्या विशिष्ट भूभागा वरील वाहनांची माहिती मिळवायची असेल तो भूभाग सतत २४ तास कव्हर करु शकतील तेवढे उपग्रह लागतील.

६) हे विदागार तुम्हाला उपलब्ध झाले, तर तुम्ही कुठले निष्कर्ष काढू शकाल ?
मला वाटतं या प्रश्नाचा रोख 'कुठले निष्कर्ष काढू शकाल' यापेक्षा 'हे निष्कर्ष कशासाठी वापरता येतील' हा असावा.

अशी माहिती वाहतुक कंपन्यांना वाहनांची अद्यावत स्थिती कळण्यास खूप उपयोगी आहे.
एखाद्या विशिष्ट मार्गावरुन वाहतुकीचा ओघ किती आहे हे कळू शकते, त्याने वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करता येईल.

- जयेश

उपग्रह

विशिष्ट भूभागा वरील वाहनांची माहिती मिळवायची असेल तो भूभाग सतत २४ तास कव्हर करु शकतील तेवढे उपग्रह लागतील

कमीतकमी चार किंवा सहा उपग्रह लागतील !
एक उपग्रह हा जास्तीत जास्त २०००० किलोमीटर वर लक्ष ठेवू शकतो.

क्षमा असावी,

माझी ही माहीती चूकीची आहे व बरोबर माहीती खाली मिलिंद साहेबांनी दिलेली आहे.

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

ओम्निट्रॅक्स्/काही उपयोग

अमेरिकेत कॉलकॉमने ओम्निट्रॅक्स नावाचे प्रॉडक्ट/सुविधा विकसित केले आहे. त्याबद्दल अधिक माहिती येथे वाचता येईल.

>>६) हे विदागार तुम्हाला उपलब्ध झाले, तर तुम्ही कुठले निष्कर्ष काढू शकाल ?
-- कुठल्या शहरात कुठल्या वेळी/दिवशी/महिन्यात कुठल्या प्रकारची वाहने (मालवाहतूक/आणीबाणीच्या प्रसंगी सेवा पुरविणारी/सामान्य) ये-जा करतात हा एक मुख्य निष्कर्ष वर जयेश यांनी म्हटल्याप्रमाणे काढता येईल.

थोडं पुढे जाऊन विचार केला, तर हा विदा
१. भ्रमणध्वनी-सेवा देणार्‍या कंपन्यांना विरळ लोकसंख्येच्या भागात आपल्या प्रभागाचा (सेल) विस्तार केवढा असावा हे ठरविण्यासाठी (कारण पायी चालणार्‍या भ्रमणध्वनीधारकांच्या संख्येपेक्षा वाहनातून प्रवास करणार्‍या ग्राहकांची संख्या बरीच जास्त असेल.)
२. व्यावसायिकांना कुठला भाग आपला व्यवसाय सुरू करण्यास उपयुक्त ठरेल यासाठी (जसे मुंबई-पुणे किंवा गोवा महामार्गावर उघडलेली उपाहारगृहे, वाहन दुरुस्तीची दुकाने, लॉजेस वगैरे)
३. सुरक्षिततेची तरतूद (रुग्णवाहिकांची सोय, जवळ शाळा असल्यास जड वाहनांना मज्जाव इ.)
यासाठी वापरता येईल.

अर्थात या झाल्या थेट उपयोगी गोष्टी. सकाळी ८ ते १० आणि संध्याकाळी ४ ते ६, या वेळात होंडा गाड्यांचे प्रमाण सर्वाधिक असते, तर दुपारच्या वेळात अधिक महागड्या गाड्यांचे इत्यादी वरकरणी फारसा उपयुक्त न वाटणारा विदादेखील एखाद्या समाजशास्त्रीय सिद्धांताला पूरक म्हणून वापरता येऊ शकतो.

किती प्रक्षेपक लागतील ?

कुठल्याही बिंदूचे अचूक ठिकाण कळावे, म्हणून कमीत कमी तीन प्रक्षेपकांची गरज असते. प्रत्येक प्रक्षेपकाला वाहनाचे स्वतःपासून अंतर कळते. म्हणजे त्या अंतराच्या त्रिज्येच्या वर्तुळावर ते वाहन आहे, हे कळते. दोन प्रक्षेपक असतील, तर दोन वर्तुळांचा छेद ज्या बिंदूंवर होतो त्या दोन पैकी एका छेद बिंदूवर ते वाहन आहे ते कळते. परंतु ह्या दोन छेदबिंदूंपैकी कुठल्या बिंदूवर ते वाहन आहे, हे कळण्यासाठी तिसर्‍या प्रक्षेपकाची गरज आहे.

- सर्किट

--
सर्किटधर्मात कुठलाही शुद्धिचिकित्सक वापरत नाहीत.

प्रतिसाद

प्रतिसाद समजला नाही,
थोडी जास्त माहीती देता का ?

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

चित्र == १००० शब्द

राज,

हे चित्र माझा प्रतिसाद योग्यपणे व्यक्त करू शकेल. एका बिंदूचे अचूक स्थान ठरवण्यासाठी, तो बिंदू तीन वर्तुळांचा छेदबिंदू असणे आवश्यक आहे.

--
सर्किटधर्मात कुठलाही शुद्धिचिकित्सक वापरत नाहीत.

ह्म्म्म् !

सहमत !
पण एक अडचण परत येत आहे... ह्या आपल्या धरतीवर असली कुठलीच जागा नसेल का जेथे हे सर्कल एक दुस-याशी भेटणार नाहीत असे ? छेदबिंदू हा प्रत्येक जागी योग्यच असावा ह्यासाठी काही नियम आहे का ?
जसे समजा अ ब क हे तीन उपग्रह आहेत हे कसे ठरवले जाते की प्रत्येक उपग्रहाने ठरावीक जागेतूनच फिरावे.... कारण वरील कारणाचे उपग्रह सोडून वरती आवकाशात अनंत (माझ्या माहीती प्रमाणे १८०० ) उपग्रह फिरत आहेत मग त्यांचे दिशानिर्देशन कसे केले जाते अथवा ह्यासाठी देखील प्रणाली वापरली जाते ?
बाळबोध प्रश्न आहे पण उत्तर अपेक्षीत आहे :)

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

१८०० उपग्रह

राज,

एकूण उपग्रह कितीही असू देत. सर्वच उपग्रह जीपीएसच्या उपकरणांनी युक्त नाहीत. जीपीएस साठी (म्हणजे जी जीपीएस नागरिकांनाअ उपलब्ध आहे त्यासाठी, सैन्यासाठी वेगळी यंत्रणा आहे.) फक्त २४ उपग्रह अवकाशात आहेत.
संपूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 510,065,600 चौ. किमी इतके आहे.
इथल्या प्रत्येक बिंदूवरून तीन उपग्रहांचे तरंग मिळावे, ह्यासाठी फक्त २४ उपग्रह वापरले, तर प्रत्येक उपग्रहाने कमीत कमी ६०,०००,००० चौ. किमी इतके क्षेत्रफळ व्यापणे आवश्यक आहे.
हे शक्य नाही, हे स्पष्ट आहे.

- सर्किट
--
सर्किटधर्मात कुठलाही शुद्धिचिकित्सक वापरत नाहीत.

माझी चूक

ह्यासाठी फक्त २४ उपग्रह वापरले, तर प्रत्येक उपग्रहाने कमीत कमी ६०,०००,००० चौ. किमी इतके क्षेत्रफळ व्यापणे आवश्यक आहे.
हे शक्य नाही, हे स्पष्ट आहे.

आकडे मोड करताना चूक झाल्याने हा चुकीचा निष्कर्ष काढला.
हे क्षेत्रफळ व्यापण्यासाठी प्रत्येक उपग्रह कमीतकमी १५,००० किमी उंचीवर असला पाहिजे. जीपीएस उपग्रह २०,००० किमी उंचीवर असतात, त्यामुळे पूर्ण पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणे शक्य आहे.

- सर्किट
--
सर्किटधर्मात कुठलाही शुद्धिचिकित्सक वापरत नाहीत.

माफी असावी

तुमचा दुरुस्तीचा प्रतीसाद येऊ पर्यंत (अथवा ज्यावेळी तुम्ही लिहीत होता त्याच वेळी मी देखील कळपटल बडवत होतो ) मी माझा प्रतिसाद पाठवला होता.

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

साहेब,

म्हणजे अजून ही सुविधा ईतकी प्रगत नाही आहे की जगात कोठे ही सुविधा भेटावी !

पण मिलिंद साहेब, एके जागी मी वाचले होते की जिपीएस साठी जी सुविधा लागले (उपग्रह, त्याचे सेवागृह व ग्राहक) ह्यांच्या साठी काही नियम आहेत, त्यातील एक नियम मी वर उल्लेखला आहे,
दुसरा सामान्य नियम जर सेवा देणार असेल व सेवा घेणारा असेल तर सामान्य ग्राहकांचे व विक्रेत्यांचे नियम वरील सेवा देणा-या संस्थेसाठी लागू होतील की नाही ? उदा. मी एखादा दुरध्वनी घेतला तो जर योग्य पध्दतीने (संस्थेने दिलेल्या माहीती प्रमाणे चालत नसेल तर) चालत नसेल तर संस्था दोन सुविधा देते एक तर ते यंत्र दुरुस्त करुन देते अथवा बदलून देते, पण जेथे वरील जीपीएस सुविधा नाही आहे पण ग्राहक आहे तेथे जर ग्राहकाने तक्रार केली तर ?

समजा माझे एक वाहन जे वरील तंत्र वापरत आहे व मला त्याची माहीती हवी आहे पण तो सेवा
क्षेत्राच्या बाहेर आहे तर ?

काहीतरी वेगळी पर्यायी सुविधा ह्यांच्या कडे असेलच ना ?
जसे वर लिहले गेले आहे की मोबाईल टॉवरचा उपयोग अथवा अजून एक मार्ग रेडीयो तरंग ( जीपीएस पण रेडीओ तरंगावरच काम करतात पण ती तरंगे अती सुक्ष्म असातात अशी माहीती अत्ताच हाती लागली)
पण जगामध्ये अशा काही जागा आहेत (जमीनी /पाण्याखालील मार्ग) जेथे वरील प्रणाली काम करेलच ह्याची प्रचेती येत नाही आहे (उदाहरण भेटले नाही मला पण ईतके माहीत आहे की पनडूबी ची माहीती घेण्यासाठी अशाच एखाद्या प्रणालीची मदत घेतली जाते ती प्रणाली कोणती असावी बरे ?)

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

दृष्टिरेखा

जीपीएस साठी तुम्ही उपग्रहाच्या दृष्टिरेखेत (लाईन ऑफ साईट) असणे आवश्यक आहे. त्यामुळे जमिनीखाली (बोगद्यांमध्ये) ही सेवा चालणार नाही, हे स्पष्टच आहे. परंतु ह्यावर उपाय, म्हणजे, पुनर्प्रक्षेपन. जीपीएसचे तरंग पृथ्वीवरच्या मनोर्‍यांनी ग्रहण करून ते पुनर्प्रक्षेपित केले (जसे मोबाईलच्या मनोर्‍यांवरून बोगद्यांत केल्या जातात तसे) तर ही सेवा चालू शकेल का ?

तुमच्या दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर, म्हणजे ह्या सुविधेचा ग्राहक बनताना, ग्राहकाकडून "ही सेवा काही ठिकाणी उपलब्ध नाही" असे लिहिलेल्या करारावर सही करून घेणे.

- सर्किट
--
सर्किटधर्मात कुठलाही शुद्धिचिकित्सक वापरत नाहीत.

पुनर्प्रक्षेपित

सहमत.

पण पुनर्प्रक्षेपित मध्ये काही कालावधीचा फरक देखील पडेल ना मग ?

माझे मत समजा... मी एखा-या गाडीची अथवा प्रणाली गोष्ट करत नाही आहे येथे मी शेकडो हजारो प्रणालांची एकाच वेळी येणा-या अडचणी संबधी लिहीत आहे .
उदा. तुम्ही डीशटीव्ही चे नाव वाचलेच असेल ना ?
डीशटीव्ही ही देखील जीपीएस प्रमाणे उपग्रहावर काम करते, ही सुविधा देखील जमीनी खाली व पाण्याखाली काम करत नाही , ही सुविधा देखील दोन्ही बाजूने काम करते जसे रिसिव्हींग व डेटा ट्रांसफर !
जर डीशटीव्ही वाल्यांना एकाच वेळी एकाच जागेतून असंख्य अडचणी येतात पण त्यांना ती अडचण दुर करण्यासाठी / माहीती गोळा करण्यासाठी कमीत कमी १५ मी. लागतात तर जिपीएस देखील वेळ घेईल ना ? त्या १५ मी. मध्ये माझे वाहन कमीत कमी ८ कीमी दुर गेले असेल अथवा जो घपल्ला करावयाचा असेल तो त्या वाहन चालकाने केला असेल कारण १५ मी. ही खुप आहेत ( जास्तच आहेत)
जास्त माहीती हवी :)

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

किती जागा लागेल ?

प्रत्येक विदाबिंदूतः

वाहनक्रमांक, अक्षांश, रेखांश

ह्यात वाहनक्रमांक ८ बाईट्स (म्हणजे अधिकाधिक २^६४ वाहने)
अक्षांश आणि रेखांश प्रत्येकी चार बाईट्स (फ्लोटिंग पॉइंट).
म्हणजे प्रत्येक विदाबिंदू साठी १६ बाईट्स लागतील.
एका प्रक्षेपकाचे क्षेत्र १ चौ किमी असे मानले, तर सर्वात गर्दीच्या जागी सुमारे २५० * २५० वाहने = सुमारे ६५५३६ (२^१६) वाहने (ह्यात एका वाहनाला ४ मी बाय ४ मी जागा लागते असे गृहीत धरले आहे.)
म्हणजे सर्व वाहनांचा विदा = २^ १६ * २^४ बाईट्स = २^२० बाईट्स.
प्रत्येक सेकंदाला हा विदा मध्यवर्ती संगणकाला पाठवायचा म्हणजे प्रक्षेपाची वाहनक्षमता १ मेगाबाईट प्रति सेकंद इतकी महत्तम असायला हवी.

- सर्किट
--
सर्किटधर्मात कुठलाही शुद्धिचिकित्सक वापरत नाहीत.

अक्षांश व रेखांश

जीपीएस हे तंत्र अक्षांश व रेखांश ह्यावर अवलंबून आहे हे खरे पण माझे मत आहे की अजून देखील काही पुरक प्रणाली व्यवस्था ह्याबरोबर वापरली जाते का ?

जीपीएस हे तंत्र काम कसे करते....
ह्याची काही माहीती मिळेल का ?
वर तुम्ही लिहल्याप्रमाणे मी विचार केला तेव्हा काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्या खालील प्रमाणे असाव्यात.
जीपीएस साठी एक उपग्रह असावा
जीपीएस साठी एक रिसीव्हर असावा (जो माहीती उपग्रहाकडून ग्रहण करेल)
जीपीएस साठी एक प्रेक्षपक देखील असावा (जो माहीती उपग्रहाकडे पाठवेल)
* जीपीएस साठी एक माध्यम देखील असावे (जो उपग्रहातील व प्रेक्षपकातील माहीतीचे विष्लेशन करुन योग्य ती माहीती ग्राहकापर्यंत पोहचवत असेल)

* हे माध्यम् काय असावे ? अथवा ही प्रणाली कुठली असावी ? कारण ही माहीती गरजेची नाही आहे पण महत्वाची आहे, कारण काही गैर-कामासाठी जर जीपीएस तंत्राचा उपयोग केला गेला तर ? कुठली माहिती ग्राहकाला समजने महत्वाचे आहे अथवा समजने महत्वाचे नाही आहे हे कसे ठरवले जात असावे ?

उदा. माझे एक वाहन समजा भारताच्या एका अती महत्वाच्या अणूप्रकल्पाच्या आसपास (१०-१५ ते ५०-४० कीमी च्या अंतरावर) असेल तर ? ती माहीती कशी दीली जाईल ? म्हणजे पोखरण च्या जवळून एखादा रस्ता जात आहे व त्या रस्त्यावर माझे वाहन आहे व मी एखादया देशद्रोही संस्थेचा सदस्य आहे व मला ही माहीती व जागा कळली तर मी काय करु शकतो ? ती माहीती त्या संस्थेस देईन व ती संस्था त्या जागी आक्रमण करेल .... बरोबर ना ? मग हे कसे ठरवले जाते की कोणती जागा ही अती महत्वाची आहे व कोणती नाही ? की मोबाईल तरंग रोखणारी जशी प्रणाली वापरली जाते तशी एखादी जीपीएस तरंग रोखणारी प्रणाली अस्तीत्वात आहे ? तर अशी प्रणाली आहे तर त्याचा वापर करुन एखादा वाहन चालक आपल्या मालकाचा उल्लू बनवणार नाही हे कसे ठरवले जाते ?

प्रश्न खुप आहेत पण काय करावे माहीती देखील आवश्यक आहे ;)
ह्यामुळे माझा किती फायदा होईल हे माहीत नाही पण संस्थळाच्या सदस्यांना एक महत्वपुर्ण माहिती मिळेल अशी अपेक्षा. कारण जे प्रश्न माझे आहेत तेच सर्व सामान्य सदस्यांचे आहेत असे मी समजतो आहे.
राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

जीपीएस्

जीपीएस साठी वाहनात फक्त रिसीव्हर असतो.
उपग्रहाला माहिती पाठवण्यास किती पॉवर लागेल, ते बघा, म्हणजे सामान्य प्रक्षेपक उपकरण त्यासाठी गाडीत बसवता का येत नाही, ते कळेल.
इतर तंत्रज्ञ त्याविषयी माहिती देतीलच पण विकीपीडिया वरची जीपीएस विषयी माहिती बरीच अचूक आहे असे वाटते.

- सर्किट

--
सर्किटधर्मात कुठलाही शुद्धिचिकित्सक वापरत नाहीत.

समजले !

म्हणजे रिसीव्हर कडून माहीती पाठवण्यासाठी जीपीएस तंत्रामध्ये अजून एखादी मोबाईल टॉवर सारखी सुविधा देखील गरजेची आहे जो रिसीव्हर कडून माहीती गोळा करेल व ती उपग्रहाकडे पाठवेल बरोबर ना ?

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

बरोबर

हे अचूक ओळखले आपण, राज साहेब. पाठवलेली माहिती ही वारंवारितेच्या वर्गप्रमाणात आणि अंतराच्या समप्रमाणात पॉवर (शक्ती) शोषते.

- सर्किट

--
संत तात्याबांच्या रौशनीचे आम्ही चाहते आहोत.

प्रगतीकारक कल्पना

जर प्रत्येक वाहनातील उपकरण सतत एका मध्यवर्ती संगणकाकडे ही माहिती एकसारखी पाठवत असेल आणि पडतपावशीला क्षणभर बाजूला ठेवले तर नेत्रदिपक प्रगती शक्य आहे. यासाठी आपण एक उदाहरण घेऊ या.

उदाहरण - समजा तुम्ही पुण्यात बालगंधर्वजवळ राहता आणि तुम्हाला चेंगणे-बुद्रक येथील अमुक-तमुक यांचेकडे जायचे आहे. श्री. अमुक-तमुक यांचा पत्ता तुमच्याजवळ आहे.

गृहीत धरलेल्या गोष्टी -
१. ज्याप्रमाणे पुणे-मुंबई दृतगतीमार्ग आहे तसे मार्ग भारतातील प्रत्येक शहरापासून सगळ्या खेड्यापर्यंत आहेत.
२. या मार्गावरून केवळ संगणकच वाहने चालवतात. कुणीही मनुष्य गाडी हाकत नाही.
३. संपूर्ण भारतातील रस्त्यांचे नकाशे आणि मोठ्या बिंदूंपासून जायचे प्रमाणित मार्ग मध्यवर्ती संगणकात उपलब्ध आहेत.
४. तांत्रिक अडचणींवर तोडगे निघालेले आहेत, जसे जीपीएस मध्ये काहीच अडचण येणार नाही, संगणक व्यवस्थित काम करेल इ.इ.

प्रगती -
१. भारतातील कुठलाही पत्ता हा केवळ एक संख्यामात्र असेल. ही संख्या म्हणजे (अक्षांश, रेखांश).
२. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी केवळ (अक्षांश-आरंभ, रेखांश-आरंभ, अक्षांश-गंतव्य, रेखांश-गंतव्य) या बहुकाचा वापर करावा लागेल.
३. संपूर्ण प्रवासात आपल्याला गाडी चालवण्याची गरज पडणार नाही. गाडीतील संगणकच गाडी चालवेल.
४. कुठेही एकही अपघात होणार नाही (किंवा आत्ता जितके आहे त्याच्या तुलनेत अतीनगण्य असेल).
५. संगणकाच गाडी अतिशय वेगात चालवू शकतो.
६. एखाद्या ठिकाणी वाहतूकीचा खोळंबा होण्याची शक्यता दिसल्यास ही माहिती मध्यवर्ती संगणकाकडे आधीच पोहोंचल्याने आणि त्याने इतरांना कळवल्याने खोळंबा झालेल्या मार्गाऐवजी इतर मार्गांचा वापर होऊन मुदलातच तो खोळंबा टाळण्यास मदत होऊ शकेल.
७. मानवी प्रज्ञेचा वापर गाडी हाकणे याच्यापेक्षा अधिक महत्त्वांच्या कामासाठी होऊ शकेल - अर्थात याबद्दल बरीच मते-मतांतरे असण्याचा संभव आहे.

शैलेश

भविष्याची एक झलक

तुमचा प्रतिसाद वाचला व आवडला ही, भविष्याची एक झलक तुमच्या प्रतिसादामध्ये दिसली.
पण तुम्हाला आठवतच असेल की काही दिवसापुर्वी i-robot नावाचा विदेशी सिनेमा आला होता व त्यामध्ये काही प्रमाणात तुम्ही सांगीतलेली सुविधा वापरली गेलेली दाखवले आहे ! तुमचा प्रतिसाद पाहून पुन्हा त्या चित्रपटाची आठवण होण्याचे कारण त्याचे संगणकाच्या प्रगतीचे फायदे व तोटे त्या चित्रपटामध्ये दाखवले आहेत.

धन्यवाद.

>काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

आय-रोबोट/भविष्य

धन्यवाद राज!

मानवी मेंदूत १ खर्व (१०० अब्ज) चेताकेंद्रे (न्यूरॉन्स्) असतात. एक चेताकेंद्र इतर हजारो चेताकेंद्रांशी जोडलेले असते. त्यांच्या आपांपासातील एकूण जोडण्या साधारणपणे १० निखर्व (१०००० अब्ज) इतक्या असतात. भौतिकशास्त्रातील मर्यादांचा विचार करता वालुक-तंत्रज्ञानाने (सिलिकॉन) कितीही प्रगती केली तरी मानवी शरीरीच्या सारख्या आकारामानात बसेल असा, मानवी मेंदूसदृश्य संगणक तयार करणे शक्य नाही. उदाहरणार्थ, समजा एका सेकंदास ५० अब्ज सूचना पाळणारी चिप बनवली तर तीचे आकारमान (आईन्स्टीनच्या सिद्धांनुसार प्रकाशाच्या वेगाच्या मर्यादेमुळे) ०.६ मिलीमीटरचा घन इतके असावे लागेल. व्यावहारीकदृष्ट्या त्या आकाराच्या सूक्ष्म चिपमध्ये इतकी उष्णता निर्माण होईळ की ती सुरू केल्यावर क्षणार्धात वितळेल.

त्यामुळे यंत्रे कितीही प्रगत झाली तरी (जोवर मनुष्य विचार करणे बंद करणार नाही तोवर) ती मनुष्यांवर पुढल्या दोनशे वर्षातही कुरघोडी करू शकत नाही. इतर तंत्रज्ञाने, जसे क्वांटम् संगणन वगैरेत आश्चर्यजनक प्रगती झाली तर यात बदल होऊ शकेल. परंतू, सध्या त्या तंत्रज्ञानांची बाळबोध अवस्था पाहता त्यांच्या सहाय्याने, दैनंदिन वापरासाठी उपयुक्त अशी साधी उत्पादने बनायला किमान शतक जावे लागेल असे वाटते. कृत्रिम हि-यांचा वापर करून वेगवान चिप बनवण्याचेही प्रयत्न झाल्याचे ऐकतो. परंतू, सध्यातरी आजचे तंत्रज्ञान आणि नजीकच्या भविष्यातील दृष्टीने विचार करता ते व्यावहारिक दिसत नाही.

दुसरा भाग म्हणजे, जरी मानवी मेंदूसदृश्य संगणक तयार झाला तरी त्यांस मानवी उस्फुर्तता असेल का हा मोठाच प्रश्न आहे. प्रगतीसाठी तर्क आणि उस्फुर्तता या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. अजूनही मानसशास्त्रांत, मानवी प्रज्ञा नक्की काम कशी करते आणि त्यामुळे कविता किंवा प्रमेय, संगीत इत्यादी कोणतीही नवीन रचना नक्की कशी निर्माण होते हे नीटसे ज्ञात नाही. काही वर्षांपूर्वी गॅरी कास्पारोव्हचा ज्या संगणकाने पराभव केला होता त्यात मागील १०० वर्षात खेळल्या गेलेल्या बुद्धीबळाच्या विश्वस्पर्धांची माहिती भरलेली होती. म्हणजेच, संगणकाने विचार न करता अज्ञानवश आकडेमोडीतून चाली बांधल्या. परंतू, बुद्धीबळाच्या बाहेर त्या संगणकातील कृतीक्रम अगदीच कुचकामी आहेत.

एकंदरीत, समजा पुढील दोनशे वर्षात प्रगती झालीही तरी मानवी मेंदूशी अतीसामान्य पातळीवर सुद्धा बरोबरी करणारा यंत्रमेंदू बनण्यास इतका खर्च येईल की आय-रोबोट सारखी व्यवस्था खरंच होईल की नाही ही शंकाच आहे. विज्ञानकथा या दृष्टीने चित्रपटात यंत्रांनी मानवांवर राज्य या गोष्टी दाखवू शकतात, पण त्याला सत्याचा आधार नाही आणि पुढील शंभर वर्षे तरी भीती नाही, :) असो. हा विषय माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि यावर चर्चा करायला खूप मजा येते. पण, विस्तारभयास्तव प्रतिसाद आटोपता घेतो, :)

शैलेश

भविष्य

हा विषय माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि यावर चर्चा करायला खूप मजा येते.

माझ्याही हा विषय जिव्हाळ्याचा आहे. शैलेश, आपण आपला प्रतिसाद स्वतंत्र चर्चेच्या रूपात मांडल्यास, आपण तिथे चर्चा करू शकू.

- सर्किट
--
संत तात्याबांच्या रौशनीचे आम्ही चाहते आहोत.

चांगली कल्पना

सर्किटराव,

आपली सूचना आवडली. या दुव्यावर ही चर्चा सुरू केली आहे.

शैलेश

मते - मतांतरे

शैलेश,

आपला प्रतिसाद सुरेख आहे, आणि बहुधा पहिल्यांदाच मी संगणकाकरवी गाडी हाकण्याचा प्रस्ताव जीपीएस-सदृश तंत्रज्ञानाच्या मार्फत केला जावा असे ऐकतोय. पण कदाचित सर्व महत्वाच्या रस्त्यांवर असे प्रक्षेपक टांगले (प्रत्येक चौरस किलोमीटराला एक असे, म्हणजे ३२.५मीटर * ३२. ५ मीटर अशा क्षेत्रासाठी) तर कदाचित हे शक्यही होऊ शकेल. लेक्सस आणि टोयोटाची काही नवीन वाहने आपोआप दोन गाड्यांच्या मध्ये स्वतःला पार्क करू शकतात. त्याला जीपीएस ची किंवा इतर कुठल्याही "जागतिक" तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही. त्यामुळे गाडीचे चालन करण्यासाठी (म्हणजे पुढच्या गाडीला टक्कर देऊ नये ह्यासाठी) ह्या तंत्रज्ञानाची गरज नसावी. परंतु पूर्ण दिशानिश्चितीसाठी ह्याची नक्कीच गरज आहे. गाडीच्या चालनासाठी मात्र ह्या मॅक्रो (दीर्घ) आणि सूक्ष्म (मायक्रो) अशा दोन्ही तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, हे मात्र पटले.

सर्किट

( १००० चौ मीटरचे ३२.५ * ३२.५ असे केलेले गणितींना खटकेल, परंतु ह्यात जीपीएस ची पंधरा मीटरची त्रुटी अंतर्भूत आहे, हे कृपया लक्षात घ्यावे, ही विनंती.)
--
संत तात्याबांच्या रौशनीचे आम्ही चाहते आहोत.

समाघात परिज्ञान

धन्यवाद सर्किट! आपले विवेचन विस्तृत आहेत. आपल्या निष्कर्षांना पूरक अशी अधिक माहिती या विषयावर सापडली.

संगणकाद्वारे समाघात परिज्ञान (कोलायजन डिटेक्शन) यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाची आवश्यकता पडत नाही. गाडीच्या चारही बाजूस पुरेसे संवेदक बसवले की ते गाडीजवळ वेगाने येणारी कुठल्याही वस्तूची माहिती गाडीच्या संगणकास देऊ शकतील. चांगला कृतीक्रम हा या माहितीतून समाघात परिज्ञान करू शकतो. यासाठी गाडीच्या संगणकास मदतनीस अशी रचनाही उपलब्ध आहे. आयईईईच्या १९९६ च्या अंकात या विषयावर एक सुबंध (पेपर) प्रकाशित झाला होता. त्यात या विषयावर अधिक माहिती मिळू शकेल. बहुधा लेक्सस आणि तोयोताच्या नवीन वाहनांमध्ये बहुधा अशाच प्रकारची व्यवस्था असेल.

शैलेश

जी आय एस

पुढील माहिती जी आय एस विषयी द्यावी,ती ग्राहकाभिमुख आहे.

जी आय एस

जी आय एस ह्या विषयात आपल्या उपक्रमावरील काही तज्ञ सदस्य आपल्याला बरीच माहिती देऊ शकतील. आमच्या संगणक तंत्रज्ञानाच्या उमेदीच्या काळात एन आय सी ह्या संस्थेला आम्ही त्यांची एक बाल-जीआयएस बनवून दिली होती. भारतातल्या सर्व जिल्ह्यांत ती (जिसनिक ह्या नावाने) कार्यरत आहे, अशी बातमी नुकतीच मिळाली. तरीदेखील त्यात आम्ही स्वतःला तज्ञ समजत नाही.

--
सर्किटधर्मात कुठलाही शुद्धिचिकित्सक वापरत नाहीत.

जी आय एस

हा काय प्रकार आहे ? हा वेगळा आहे का जीपीएस पासून ?
की हा देखील जीपीएस चा उपविभाग आहे ?

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

जी आय एस

जी आय एस म्हणजे जॉग्रफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, अर्थातच: भौगोलिक माहिती प्रणाली. समजा तुम्हाला जगाचा नकाशा दिला, आणि तुम्हाला प्रश्न पडला ह्या इथल्या भागातली लोकसंख्या (प्रति चौ किमी) किती? (किंवा ह्या भागातील प्रति चौकिमी तेलाचे उत्पादन किती?) तर त्या नकाशावर त्या भागावर आपला मूषक (अथवा एखादी विशिष्ट लेखणी) फिरवला, आणि एकदोन कळा दाबल्या तर लगेच त्या भागात राहणार्‍या लोकांची संख्या (किंवा प्रति चौ किमी सरासरी, किंवा अशीच इतर माहिती) मिळेल ह्या प्रणालीतून. गूगल अर्थ ही आज्ञावली जगातली सर्वोत्कृष्ट जीआयएस बनण्याच्या मार्गावर आहे महाराजा, कारण त्यात लोकांचे, म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांचे योगदान आहे.

एक लक्षात घ्या:

ब्रिटानिया हा विश्वकोष -> विकीपीडिया
व्यावसायिक जी आय एस -> गूगल अर्थ

कळले ?

- सर्किट

--
संत तात्याबांच्या रौशनीचे आम्ही चाहते आहोत.

अरे हो !

गुगल बाबाला तर मी विसरलोच होतो की ;)
पण मी काय म्हणतो, समजा मला व्यवसायासाठी गुगलबाबाचा (धरतीचा) वापर करता येतो का ? माझ्या मते सध्या नाही कारण गुगल बाबा अजून पुर्ण तयार नाही आहेत (भारताच्या बाबतीत) काही ठरावीक शहरेच येथे दाखवली गेली आहेत :))

पण मी माझ्या व्यवसायासाठी जीपीएस जरुर वापरु शकतो !

धन्यवाद. सध्यातरी काही अडचणी संपल्या आहेत पण तीकडे इंद्र माझी वाट पाहतो आहे... चला तीकडे जाऊ ;)

राज जैन

काहीतरी करावे हा विचार मनात असणे म्हणजेच तुम्ही जिवंत आहात ह्याचे लक्षण आहे !!! काय म्हणता !

हे गूगल सर्च ईंजिन वर ईंग्रजीत टाईप करा सर्व खुलासा होईल

"हाऊ जी पी एस रिसिवर वर्क" हे गूगल सर्च ईंजिन वर ईंग्रजीत टाईप करा
सर्व उत्तरे येथे सापडतील
खरे तर मला या वेब साईटची लिंक येथे द्यायची होती ती देता आली नाही ते जाता कोणी सांगेल का ?

नाही सांगणार

कारण येथे ती उपलब्ध आहे. क्लिकून बघा.

प्रकाश घाटपांडे