ज्युलियाचे धर्मांतर आणि हिंदू...

ज्युलिया रॉबर्टस या इंग्रजी अभिनेत्रीने हिंदू धर्माचा स्वीकार केल्याची बातमी नुकतीच टीव्हीवर वाचली. आपल्या इट, प्रे, लव्ह या चित्रपटासाठी भारतात आल्यावर हिंदुत्त्वाची ओळख झाल्याचे ज्युलियाने सांगितले आहे.
तर एकंदरच मला या निमित्ताने काही प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तरे कुणाला देता आली तर द्यावीत. कदाचित या प्रश्नांची उत्तरे आधीच बर्‍याच जणांना माहित असतील तर निदान ती मलादेखील कळू द्यावीत. मला पडलेले काही प्रश्न असे...

१) हिंदू धर्माबाबत पाश्चात्त्यांमध्ये काय कल्पना आहेत? काही काळापूर्वीच्या साधू, बैरागी, विवेकानंदांचे भाषण वगैरे कल्पना सोडून सध्याच्या काळात हिंदू धर्माबाबत विचार करण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे का? किंवा पूर्वी हिंदू धर्माबाबत काय समजूती होत्या? सध्या काय आहेत?

२) भारतात असलेल्या उपक्रमींना "तुमचा हिंदू धर्म काय आहे हो? तुम्ही कशाची भक्ती करता?" असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तरी परदेशी असलेल्या उपक्रमींना असे प्रश्न विचारले जातात का? अशावेळी ते काय उत्तर देतात?

३)मला तर हिंदू असूनही या धर्माबाबत काडीचीही माहिती नाही. मग मला कुणी कधीकाळी तुमच्या हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान किंवा फिलॉसफी काय आहे? असे विचारले तर मी काय उत्तर देऊ? विकिवरचा हिंदू हा लेख खूपच छोटा वाटतो. त्यात फिलॉसफीच्या भागात हिंदू धर्माचे सहा भाग सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदान्त सांगितले आहेत हे काय आहेत? मला याबाबत काहीच कसे माहित नाही? का ही माहिती माझ्यापासून पद्धतशीरपणे दडवून ठेवण्यात आली? :-)

४) ख्रिश्चनांचा जसा बायबल आणि मुसलमानांचा जसा धर्मग्रंथ कुराण आहे तसा हिंदूंचा कोणता ग्रंथ मानावा? भगवदगीता? मुसलमानांना जसे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कुराणात सापडते तसे रोज असे केले पाहिजे, इतक्या वेळा प्रार्थना केली पाहिजे, याला भजले पाहिजे अशा काही गाईडलाईन्स गीतेत आहेत का? ख्रिश्चन बहुधा दर रविवारी चर्चमध्ये जातात, मुसलमान दिवसात पाच वेळा नमाज पडतात तसे हिंदू धर्मात काय करावे असे सांगितले आहे?

५)याचाच पुढचा प्रश्न असा की असा एक ग्रंथ नसल्याने किंवा हिंदुत्त्वाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या, भलत्याच असल्याने नवीन हिंदू धर्मात प्रवेश करणार्‍यांना गोंधळल्यासारखे होत असावे का?

६) अलीकडेच मीना प्रभू यांचे गाथा इराणी हे पुस्तक वाचले. इराणच्या प्रवासात मीना प्रभू यांनी इराणमधल्या बर्‍याच कट्टर मुसलमानांशी धर्मावर चर्चा केली. शिवाय आपण नास्तिक असल्याचे, देवावर बिलकुल विश्वास नसल्याचे, देव इत्यादी संकल्पना मानत नसल्याचे देखील सांगितले. हे कसे शक्य आहे असे कुणीसे विचारता त्यांनी मी हिंदू असूनही नास्तिक असू शकते व या धर्मात नास्तिक्यवाद वगैरे शाखा असल्याचे सांगितले. असे हे खरेच काही आहे काय? अशा कोणकोणत्या शाखा सांगता येतील हिंदू धर्माच्या?

७) हिंदू धर्माचे स्वरुप समजावून घेण्यासाठी काय केले पाहिजे? याबाबत कोणती पुस्तके आहेत जी वाचण्यासारखी आहेत?

८) नुकतीच नेमाडे यांची हिंदू कादंबरी प्रकाशित झाली. त्यावर उपक्रमावर उल्लेखनीय अशी परिक्षणेही आली. तर या पुस्तकाच्या मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे " वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांनी मांडलेल्या तात्विक विचारधारांमुळे हिंदू संस्कृतीत नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. येणारी प्रत्येक विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली" खरेच आपला धर्म सगळे काही सामावून घेणारा आहे का? सगळे सामावून घेणारा म्हणजे काय? हे चांगले की वाईट?

९)भारतात मराठी लोकांचे धर्माचार (हा शब्द अचू़क म्हणता येणार नाही ) वेगळे (त्यातले परत ब्राम्हण, मराठा आणि अजून इतर जातींचे वेगळे), गुजराती वेगळे, दक्षिणेकडचे वेगळे, उत्तर भारतीय वेगळे, बंगाली वेगळे, परत पूर्वोत्तर राज्यात अजून वेगळे असे आहेत. हे सगळेच तसे हिंदू आहेत. मग यांच्यात जोडणारे असे काय आहे? या सगळ्यांना एकत्र हिंदू का म्हणावे/म्हटले गेले आहे?

१०) भारतात अनेक वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे पंथ, संप्रदाय, परत नवीन नवीन येणारे बुवा, महाराज, त्यांचे अनुयायी असे आणि इतर मला माहित नसलेले असे अनेक, वेगवेगळे हिंदू धर्माचे असंख्य मार्ग आहेत. हे खूपच जास्त आहेत असे वाटत नाही? मुसलमानांच्या शिया सुन्नी, ख्रिश्चनांच्या कॅथलिक, प्रोटेस्टंट यांच्या तुलनेत? आणि हे चांगले की वाईट?

सध्या तरी इतकेच प्रश्न सुचले आहेत. बाकीचे सुचतील तसे विचारीन.

बाकी, ज्युलियाच्या धर्मांतराबाबत तुमचे काय मत आहे? चित्रपट प्रसिद्ध होण्यापूर्वीचा हा एक प्रसिद्धीस्टंट आहे असे वाटते का? की पुढच्या भविष्यात भारत सगळ्या जगाचे आध्यात्मिक (?) नेतृत्व करेल असा आशावाद, असे विचार अनेक जणांनी बोलून लिहून ठेवले आहेत त्याची ही सुरुवात आहे? ( किंवा ऍंजेलिना जोलीच्या मुलं दत्तक घेण्याला सुरुवात केल्यानंतर अशा दत्तक घेण्याला जे ग्लॅमर आले तसे याबाबतीत होण्याची शक्यता आहे का? हिंदू धर्मात प्रवेश करण्याचे प्रमाण यापुढे वाढेल? आणि त्यातून मग पूर्वेचे आध्यात्मिक ज्ञान आणि पश्चिमेची वैज्ञानिक प्रगती, भौतिक ज्ञान यांचा मेळ घालून हे जग अधिक सुंदर करण्याचा विचार कुणीतरी मांडला आहे ( बहुतेक डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन ) त्याची ही सुरुवात आहे?

-सौरभ.

Comments

प्रश्न

सौरभदा,
धन्यावाद.
धर्मांतराचा विचार करताना मला यातील काही प्रश्न पडायचे, पण उत्तरे अर्थातच कोणी देऊ शकले नाही.
मला याव्यतिरिक्त काहे प्रश्न पडायचे:
१. जेव्हा एखादी अहिंदू व्यक्ती हिंदू धर्मात प्रवेश करते, तेव्हा तिची जात कोणती असते?
२. शिवाजीमहाराजांनी जेव्हा नेताजी पालकरांना पुन:श्च हिंदू धर्मात सामावून घेतले, तेव्हा, नेताजी पालकरांची जात कोणती झाली? जर त्यांची पूर्वीचीच जात कायम राहिली असेल तर, जे मुळातच अहिंदू आहेत (उदा. ज्युलिया रॉबर्टबाई ), त्यांचे काय??

||वाछितो विजयी होईबा||

जुईलीताईंचे हिंदू धर्मात स्वागत

ज्युलियाने हिंदू झाल्यावर नाव काय घेतले? (उखाणा नाही हं! धर्मांतर झाल्यावर नाव काय घेतले. आधी धर्मांतर केले की नाव बदलावे असे का? उगीच शेकू म्हणून गेला की नावात काय आहे? पण असो.) ज्युलियाला जुईली राबटेकर (तसे माझ्या डोक्यात रावळे, रावले ;-) अशी अनेक आडनावे आली होती. आडनाव मराठी असले की झाले.) असे नाव द्यावेसे वाटते.

इट,प्रे आणि लवमध्ये (मी ट्रेलर पाहिला होता.) जुईलीताई इटली (कोणीतरी इड्ली म्हणालं), भारत आणि बालीमध्ये जातात वगैरे वगैरे. हे धर्मबदल वगैरे चित्रपटाची जाहीरात नसली म्हणजे मिळवलं.

हे अभिनेते मोठ्या व्यक्तिंच्या, धर्मांच्या वगैरे भूमिकेने प्रेरित होतात तसे गुंड, दहशतवादी वगैरेंच्या भूमिकांनीही प्रेरित होतात का? नाही म्हणजे उद्या ओसामाची भूमिका केली तर अल कायदा जॉईन करतील काय हे लोक्स?

असो. प्रतिसाद हलकेच घ्यावा. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे फारशी माहित नाहीत. मागे एकदा एका द. अमेरिकन बाईने मला विचारले होते - "आर यू इंडू?" मी तिला (मूर्खासारखे) उत्तर दिले "आय ऍम इंडियन."

बायदवे, ज्युलियाला नेमाड्यांची हिंदू कादंबरी वाचायला दिली पाहिजे.

हा हा हा

हा हा हा :)

जुलिया चे जुईली फारच सुंदर :) राबेटकर करून तुम्ही अगदीच देशस्थ बनवला तिला, ते फारसा रुचत नाहीये, पण मला काही सुचत पण नाहीये...पण माधव जुलिअन ह्यांचासारखे जुईली robert कसे राहील?

बाकी मुल प्रश्न फारच गहन आहेत, हिंदू हे जगातील सर्वात क्लिष्ट अश्या सोसायटीचे नाव आहे हे मात्र नक्की, त्याला कोणी भगवा रंग देतात, कोणी अडगळ म्हणतात, कोणी राजकारण करतात, कोणी धर्म म्हणतात, कोणी फक्त लिहिण्यापुरते आहेत, कोणी अर्थ देण्यचा प्रयत्न करतात, कोणी शोधण्याचा प्रयत्न करतात, कोणी समजून घेण्याचा प्रयत्न करतात, कोणी खूपच क्लिष्ट आहे असे म्हणून सोपी वाट शोधण्याचा प्रयत्न करतात.

पण शूल मध्ये सयाजी शिंदे म्हणतात त्याप्रमाणे - क्या है कानून? तुम्हारे मेरे जैसे ४ लोगोने मिलके तय किया तो हो गया कानून? मै सोचता हून मै उनसे उपर हून तो अब मै जो कहेता हून वोह है कानून ( भावना समजून घ्याव्यात, हिंदी अगदीच गरीब आहे)...त्याप्रमाणे क्या है हिंदू? १ लाख(अधिक/वजा) वर्ष काही लोकांना काही वाटते ते हिंदू का? मला वाटते मी त्यांच्यापेक्षा हुशार आहे तेंव्हा आज मला जे अमुक/तमुक वाटते ते म्हणजे हिंदू.

बाकी पश्चिमी सभ्यतेला आपण म्हणजे - साप/मांत्रिक/हत्ती ह्यापलीकडे फार काही नाही. :प

जुईली छान वाटतंय...

जुईली नाव छान आहे, पण आडनावाचे काही तरी चांगले निवडावे लागेल. रावले ठेवायला हरकत नाही, पण मग आपले सतीश रावले 'जुईली आमचीच' म्हणून धावत पुढे जातील. मग आम्ही स्वागतेच्छुंच्या रांगेत इतकावेळ कशासाठी थांबलोय? (ह. घ्या.)
यापूर्वी आम्ही सँड्रा बुलकचे नामकरण 'सुंदरा पोळ', मेगन फॉक्सचे 'मेघा कोल्हे', अँजेलिना जोलीचे ' अंजली जोशी', केट विन्स्लेटचे 'केतकी वनस्थळी' केले आहे. मँडी मॉरीचे 'मंदा मोरे' जमले आहे, पण डेमी मूरला 'ढमी मोरे' म्हणणे जीवावर आल्याने तात्पुरते तिला 'देविका मोरे' म्हणत आहोत.
जेनिफर हडसन, जेनिफर गार्नर, इमा वॅटसन या नावांवर अद्याप विचार सुरु आहे. याबाबत उपक्रमींच्या सूचनांचे स्वागत.

आडनाव

आडनावाचे भारतीयीकरणच करायचे तर राऽबर्ट पण चालेल. :)

(मोनाचा बाऽस) अजित

ज्युलिया हे नाव भारतीयच आहे

माझ्या परिचितांमधील एका मुलीचे नाव ज्युलिया आहे आणि ती संपूर्ण भारतीय आहे. त्यामुळे ज्युलियाचे भारतीयीकरण म्हणजे नेमके काय करायचे हा प्रश्न पडला.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

नावे

जानकी हडसे
जानकी गुणे
यामिनी वासन

ज्युलियाला नेमाड्यांची हिंदू कादंबरी वाचायला दिली पाहिजे.

ज्युलियाला नेमाड्यांची हिंदू कादंबरी वाचायला दिली पाहिजे.

-अगदी, अगदी.
त्यातले तिला काय कळेल? असाही प्रश्न पडतो.

नको. इतक्यातच नको.

ज्युलियाला इतक्या लवकर नेमाड्यांची हिंदू कादंबरी वाचायला देऊ नका. बिच्चारी 'प्रीटी वूमन' जगण्याची ती समृद्ध अडगळ बघून वेडीपिशी होईल. नेमाडे वाचल्यावर त्यापेक्षा 'स्लीपिंग विथ द एनिमी' परवडले म्हणायची वेळ येईल. खरं तर घरी आलेल्या पाहुण्याला प्रथमच अडगळीची खोली दाखवण्यात काय अर्थ आहे.? शोरुम महत्त्वाची की गोडाऊन?

कालांतराने ज्युलियाला अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती करुन देण्याची गरज आहे. वटपौर्णिमा आणि हरितालिकेचे उपवास, चातुर्मासातील व्रतवैकल्ये व कहाण्या, करवा चौथ, ओटी भरणे, घूंगट घेणे, पाळण्यात वरवंट्याला कुंची घालून ठेवण्यामागील शास्त्र आणि बरेच काही. ती चुकून गायत्री मंत्र म्हणेल किंवा गुरुचरित्र वाचेल. शनी शिंगणापूरला जाऊ नकोस आणि कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला गेलीस तर कठड्याच्या मागूनच दर्शन घे, असे बजावावे लागेल.

साखरपुडा, बाळंतविडा, डोहाळजेवण, मंगळसूत्र, बाजूला बसणे, अंगाला लावणे, दृष्ट काढणे, अंगारा फुंकणे यांचे भाषांतर कसे करावे, यावर सध्या काम सुरु आहे.

(सर्व मजकूर ह. घ्या.)

पाहुणी नाही आता ती

खरं तर घरी आलेल्या पाहुण्याला प्रथमच अडगळीची खोली दाखवण्यात काय अर्थ आहे.?

ती आता पाहुणी नाही राहिली. घरातलीच एक आहे. कालांतर झालेले आहे.
शोरूम दाखवून झालेली आहे. (त्यामुळेच तर ती हिंदू झाली. ;))
आता गोडाऊन पहाण्याची वेळ आलेली आहे.

ज्युलियाचे स्वागत

हिंदू धर्मात ज्युलियाचे स्वागत. तिने तिच्या मुलांचीही नावे बदलून गणेश, महालक्ष्मी आणि कृष्ण-बलराम अशी केली आहेत असे समजते. तिन्ही रॉबर्ट्स यांचेही हिंदू धर्मात स्वागत.

(हिंदू) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

खूप प्रश्न

तुमचे प्रश्न आवडले.

तुमचे प्रश्न संख्येने खूप आहेत. या विषयावर भरपूर वाद (हिंदू शब्दाची व्याख्या काय) झालेले आहेत. सावरकरांचे हिंदुत्व हे पुस्तक. (http://www.savarkar.org) आणि इतर पुस्तके येथे मिळतील. ती वाचून तुमचे प्रश्न सुटतील असे नाही. याशिवाय त्यांनी केलेला खल समाजमान्य आहे असेही नाही. पण तो एक महत्वाचा विचार मानला जाऊ शकतो.

मला असे वाटते की भारत सरकार जो स्वतःला हिंदू (वा अन्य धर्मीय देखील असावे) आहे असे सांगतो तो हिंदू अशी व्याख्या करते असे मी वाचले होते. त्यामुळे ती सर्वव्यापी होऊ शकते. माझ्या एका मित्राने हिंदू मुसलमान अशी जात वाचली होती.

सर्व धर्मांची काही किमान विधी अपेक्षा असते. सहसा ते जन्म-नामकरण दरम्यानचे, लग्न आणि मृत्यु या तीन बाबतीत असतात. काही तत्वज्ञानात्मक असतात त्यातील दोन महत्वाचे देव आणि प्रेषित कसा व किती, आणि मृत्युनंतर काय होते. काही लोक यात धार्मिक पुस्तके,धर्मगुरु आणि चाली रिती टाकतात पण बहुदा हा धर्मांचा अनिवार्य भाग नसावा.

वरील बाबीवरून कदाचित हिंदू धर्म स्पष्ट करता येईल विवाह विधी, मृत्युविधी (श्राद्धपक्ष) हे दोन महत्वाचे (मुंज हे तिसरे) विधी, अनेक देवांना हरकत नसणे, पुनर्जन्म हे तत्वज्ञानात्मक विचार अनिवार्य समजता येतील. हे ही पूर्ण पणे न करणारे लोक असतात (सर्वच धर्मात) त्यांना गुण देऊन (४ पैकी २ बाबी मानतोस ना तर तू हिंदू) पास करता येते.
दुसर्‍या बाजूला कर्मठ लोक थोड्या थोड्या कारणाने लोकांना धर्माबाहेर काढू शकतात. त्यावर भरपूर लिहिण्यासारखे असेल.

ख्रिश्चन, ज्यू आणि मुसलमान यांच्या धर्मात पुस्तक महत्वाचे आहे. पण त्यांचा अर्थ काय यावरून फार मतमतांतरे आहेत. विशेषत: ख्रिश्चन धर्मात पंथांची (चर्चेसची) संख्या अमाप आहे. कदाचित हिंदूंच्या पंथांच्या संख्येत तुलना होऊ शकेल. मुसलामान धर्मात देखील दोनच पंथ नाहीत.

शेवटचे नेमाडे बहुतेक हिंदू संस्कृतीबद्दल लिहित आहेत धर्माबद्दल नाही.

प्रमोद

हिंदू : संप्रदाय की संस्कृती?

शेवटचे नेमाडे बहुतेक हिंदू संस्कृतीबद्दल लिहित आहेत धर्माबद्दल नाही.

-'हिंदू' ही एक(नेमाड्यांच्या शब्दात 'तृतीयपुरुषी अनेकवचनी') जीवनपद्धती आहे असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आठवतो.
हिंदू असा कोणता 'धर्म'(ईश्वर उपासना संप्रदाय) अशा अर्थाने अस्तित्वात आहे असे वाटत नाही.

प्रयत्न...

तुमच्या प्रतिसादाने प्रश्न उलगडण्याचा बराच प्रयत्न केला आहे. आभार. पण बर्‍याचदा खूप जड चर्चा चालू असतात आणि त्या माझ्या बर्‍याच डोक्यावरुन जातात. आणि आता हे प्रश्न इतके सोपे आहेत, सोप्या भाषेत विचारले आहेत तर त्यांना अजूनही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही असं मला वाटतंय. सोप्या प्रश्नांना उत्तर देणे अवघड असते काय?

शेवटचे नेमाड्यांनी हिंदू संस्कृतीबद्दलच लिहिले आहे. त्यात वाद नाही. पण ते धर्मालाही तसेच सरळ लागू पडते आहेच की. तशी संस्कृती आणि धर्म यांच्यात सीमारेषा असलीच तरी ती खूप धूसर असावी.

-सौरभ.

==================

फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.

सोपे प्रश्न पण अनेक उत्तरे

आणि आता हे प्रश्न इतके सोपे आहेत, सोप्या भाषेत विचारले आहेत तर त्यांना अजूनही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही असं मला वाटतंय. सोप्या प्रश्नांना उत्तर देणे अवघड असते काय?

खरंय. सोपे प्रश्न कधी कधी कठीण जातात.
तुम्हाला अधिकृत उत्तर हवे आहे असे वाटले. आणि ती पात्रता अंगात नाही.

१) हिंदू धर्माबाबत पाश्चात्त्यांमध्ये काय कल्पना आहेत? काही काळापूर्वीच्या साधू, बैरागी, विवेकानंदांचे भाषण वगैरे कल्पना सोडून सध्याच्या काळात हिंदू धर्माबाबत विचार करण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे का? किंवा पूर्वी हिंदू धर्माबाबत काय समजूती होत्या? सध्या काय आहेत?

तुम्ही लोकांची वर्गवारी करून एकच मत हवे आहे अशी अपेक्षा धरता आहात. माझ्या मते हा प्रश्न थोडासा गैरलागू आहे.

२) भारतात असलेल्या उपक्रमींना "तुमचा हिंदू धर्म काय आहे हो? तुम्ही कशाची भक्ती करता?" असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तरी परदेशी असलेल्या उपक्रमींना असे प्रश्न विचारले जातात का? अशावेळी ते काय उत्तर देतात?

उत्तरे ऐकायला आवडतील.

३)मला तर हिंदू असूनही या धर्माबाबत काडीचीही माहिती नाही. मग मला कुणी कधीकाळी तुमच्या हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान किंवा फिलॉसफी काय आहे? असे विचारले तर मी काय उत्तर देऊ? विकिवरचा हिंदू हा लेख खूपच छोटा वाटतो. त्यात फिलॉसफीच्या भागात हिंदू धर्माचे सहा भाग सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदान्त सांगितले आहेत हे काय आहेत? मला याबाबत काहीच कसे माहित नाही? का ही माहिती माझ्यापासून पद्धतशीरपणे दडवून ठेवण्यात आली? :-)

मला वाटते याचे काहीसे उत्तर मी पूर्वीच्या प्रतिसादात दिले आहे. दर्शनांचे तत्वज्ञान हे सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी चांगले सागितले आहे. (हिस्टरी ऑफ इंडीयन फिलॉसॉफी? हे पुस्तक). विवेकानंदांचे सायन्स ऑफ रिलिजन हे सांख्य अद्वैत यावरचे एक चांगले पुस्तक मला आठवले. राधाकृष्णन यांचे पुस्तक वाचण्याचा मी प्रयत्न केला पण जमले नाही. या उलट रसेल चे हिस्टरी ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी हे पुस्तक सहज वाचनीय आहे. तुम्ही दिलेल्या ६ दर्शनात चार्वाक आणि वौद्ध (?) अशी दोन दर्शने राहिली. मला वाटत नाही की ही माहिती तुमच्या पासून दडवून ठेवली गेली असेल. ही दर्शने सहसा कोणालाच माहिती नसतात हे मात्र खरे.

४) ख्रिश्चनांचा जसा बायबल आणि मुसलमानांचा जसा धर्मग्रंथ कुराण आहे तसा हिंदूंचा कोणता ग्रंथ मानावा? भगवदगीता? मुसलमानांना जसे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कुराणात सापडते तसे रोज असे केले पाहिजे, इतक्या वेळा प्रार्थना केली पाहिजे, याला भजले पाहिजे अशा काही गाईडलाईन्स गीतेत आहेत का? ख्रिश्चन बहुधा दर रविवारी चर्चमध्ये जातात, मुसलमान दिवसात पाच वेळा नमाज पडतात तसे हिंदू धर्मात काय करावे असे सांगितले आहे?

आपल्याकडे श्रुती स्मृती पुराणोक्त असा वाक्प्रचार आहेत. त्यात श्रुती म्हणजे चार वेद आणि वेदांग (उपनिषदे वगैरे), स्मृती म्हणजे मुख्यत्वे मनुस्मृती, पुराणे १८ आहेत. हे सर्व ग्रंथ उतरत्या क्रमाने महत्वाचे मानले गेले आहेत. प्रत्यक्षात गीतेला यात स्थान दिसत नाही. बहुदा ते धर्माच्या पुनरुत्थान करणार्‍यांनी (शंकराचार्य) आणले असावे. पण हे ग्रंथ कुराण बायबलच्या तोडीचे मानता येतील. कुराण हा मुसलमानांचा एकमेव ग्रंथ नाही त्यानंतर हदीस येतो. त्याही पुढे जाऊन (ही देखील उतरंड) पुढील खलिफांच्यावर्तनातून झालेला न्याय वगैरे येतो.

मुसलमान पाच वेळा (रोज) नमाज पढतात आणि ख्रिश्चन दर रविवारी चर्चला जातात हे मिथ आहे. ही वर्तने आदर्श मुसलमान वा ख्रिश्चनांची असू शकतात. मला वाटते आदर्श हिंदूंची राहणी पाळणारे हल्ली कोणी फारसे नसावे. त्यामुळे हा गोंधळ होतो.

५)याचाच पुढचा प्रश्न असा की असा एक ग्रंथ नसल्याने किंवा हिंदुत्त्वाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या, भलत्याच असल्याने नवीन हिंदू धर्मात प्रवेश करणार्‍यांना गोंधळल्यासारखे होत असावे का?

मला नाही वाटत की त्यांना गोंधळल्यासारखे होत असेल. पण काय जाणे.

६) अलीकडेच मीना प्रभू यांचे गाथा इराणी हे पुस्तक वाचले. इराणच्या प्रवासात मीना प्रभू यांनी इराणमधल्या बर्‍याच कट्टर मुसलमानांशी धर्मावर चर्चा केली. शिवाय आपण नास्तिक असल्याचे, देवावर बिलकुल विश्वास नसल्याचे, देव इत्यादी संकल्पना मानत नसल्याचे देखील सांगितले. हे कसे शक्य आहे असे कुणीसे विचारता त्यांनी मी हिंदू असूनही नास्तिक असू शकते व या धर्मात नास्तिक्यवाद वगैरे शाखा असल्याचे सांगितले. असे हे खरेच काही आहे काय? अशा कोणकोणत्या शाखा सांगता येतील हिंदू धर्माच्या?

धर्माचरण (विधी) केल्यावर तुम्ही मनात त्याविषयीची काय भावना ठेवता याला महत्व राहत नाही. त्यामुळे असे गैरसमज पसरवले जातात. (नास्तिकांना हिंदू धर्मात स्थान आहे.) तुम्ही विधी तोडले तर जातबाह्य (पर्यायाने धर्मबाह्य केले जातात.) हल्लीचे उत्तरेतील सगोत्र विवाहाचे प्रकरण आठवते ना?

७) हिंदू धर्माचे स्वरुप समजावून घेण्यासाठी काय केले पाहिजे? याबाबत कोणती पुस्तके आहेत जी वाचण्यासारखी आहेत?

मी म्हणीन सुरुवातीपासून प्रयत्न करा. (पहिले वेद वाचा मग उपनिषदे वगैरे) भरपूर करमणूक होईल शिवाय माहिती फर्स्ट सोर्स कडून मिळेल. यातील वेद चित्रावशास्त्रींनी मराठीत आणि सातवळेकर यांनी हिंदीत आणले आहेत. इंग्रजीतील भाषांतर तर जालावर उपलब्ध आहे.

८) नुकतीच नेमाडे यांची हिंदू कादंबरी प्रकाशित झाली. त्यावर उपक्रमावर उल्लेखनीय अशी परिक्षणेही आली. तर या पुस्तकाच्या मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे " वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांनी मांडलेल्या तात्विक विचारधारांमुळे हिंदू संस्कृतीत नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. येणारी प्रत्येक विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली" खरेच आपला धर्म सगळे काही सामावून घेणारा आहे का? सगळे सामावून घेणारा म्हणजे काय? हे चांगले की वाईट?

नेमाडे हिंदू हा धर्म या अर्थाने वापरत नाहीत. हिंदू धर्म शतकभरापूर्वी अतिशय कर्मठ (सामावून न घेणारा) म्हणून प्रसिद्ध होता.
हे चांगले का वाईट? काय माहिती.

९)भारतात मराठी लोकांचे धर्माचार (हा शब्द अचू़क म्हणता येणार नाही ) वेगळे (त्यातले परत ब्राम्हण, मराठा आणि अजून इतर जातींचे वेगळे), गुजराती वेगळे, दक्षिणेकडचे वेगळे, उत्तर भारतीय वेगळे, बंगाली वेगळे, परत पूर्वोत्तर राज्यात अजून वेगळे असे आहेत. हे सगळेच तसे हिंदू आहेत. मग यांच्यात जोडणारे असे काय आहे? या सगळ्यांना एकत्र हिंदू का म्हणावे/म्हटले गेले आहे?

याचे मला वाटणारे उत्तर मी पूर्वी दिले आहे.

१०) भारतात अनेक वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे पंथ, संप्रदाय, परत नवीन नवीन येणारे बुवा, महाराज, त्यांचे अनुयायी असे आणि इतर मला माहित नसलेले असे अनेक, वेगवेगळे हिंदू धर्माचे असंख्य मार्ग आहेत. हे खूपच जास्त आहेत असे वाटत नाही? मुसलमानांच्या शिया सुन्नी, ख्रिश्चनांच्या कॅथलिक, प्रोटेस्टंट यांच्या तुलनेत? आणि हे चांगले की वाईट?

याचे मला वाटणारे उत्तर मी पूर्वी दिले आहे.

प्रमोद

परत एकदा धन्यवाद...

परत एकदा सविस्तर प्रतिसादासाठी आपला आभारी आहे. पुस्तकांच्या नावांसाठीही धन्यवाद.
मात्र हिस्टरी ऑफ इंडियन फिलॉसफी हे धुंडाळता सुरेंद्रनाथ दासगुप्ता यांचे पुस्तक असल्याचे दिसत आहे. हरकत नाही. आपण नावापुढे प्रश्नचिन्ह दिलेच होते.
होता होईल तेवढे वाचन करुनच या प्रश्नांची उत्तरे सापडतील बहुतेक.

-सौरभ.

==================

फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.

महापुरे जेथे झाडे जाती तेथे लव्हाळी (गवत पाते) वाचती

हिन्दू ही जगण्याची एक जीवन पद्धति आहे. जगातील सर्वात प्राचीन धर्म म्हणून हिन्दू धर्म ओळखला जातो. प्राचीन काळा पासून हिंदू धर्मावर परकीय आक्रमणे होत आली आहेत पण या सर्व आक्रमणा तून हा धर्म नष्ट झाला नाही याचे कारण या धर्माची सर्वसमावेशकता. इतर ख्रिस्त, मुसलमान धर्मा प्रमाणे हिंदू ला धर्म प्रचारा करता हाती तलवार कधी ही घावी लागली नाही. हे एक या धर्माचे वैशिष्ट्य आहे. मोगल आले त्यांना पण या धर्माने सामावून घेतले. कित्येक मुसलमान हिदू पेक्षा जास्त शुद्ध येथील प्रांतिक भाषा बोलतात,चालीरीती अवलंबतात. जर तुम्ही कोकणात गेला तर कोण मुसलमान कोण ब्राम्हण ये सुद्धा त्यांच्या अस्सल मराठी बोलण्या वरून समजत नाही. राजकीय नेते सोडले तर स्थानिक पातळीवर हिंदू-मुसलमानाचे सण उत्सव,उरूस-यात्रा या कोणत्या ही धर्म भावने वर आधारित नसतात.
रामायण महाभारत या दोन ग्रंथाचा प्रभाव सर्वदूर भारत भर पसरला आहे. जीवनाचे सर्व रंग या दोन ग्रंथात चित्रित केले गेले आहेत, राम आणि कृष्ण ही दोन आदर्श भारतीय समाजाचे आहेत .त्यात राम हा सत्यवादी राजा आदर्श पुत्र बंधू म्हणून ओळखला जातो. तर श्रीकृष्ण हा सर्व रंगात रंगून गेलेला तरीही हवाहवासा वाटणारा सखा सवंगडी, मित्र , गोपींचा हरी, मीरेचा सत की नाव खेवहिया सतगुरु, भवसागर तर आयो। मीरा के प्रभु गिरधरनागर, हरख-हरख जस पायो॥ युद्धाच्या पार्श्वभूमी वर श्रीकृष्णाने भांबावलेल्या अर्जुनाला जीवनाचे तत्वज्ञान सांगितले ते अजरामर झाले आहे. त्याचा आजही व्यवस्थापन शास्त्रात उपयोग शिक्षणा साठी केला जातो. हिदू ग्रथ,भाषा संस्कृती यावर भारतीयान पेक्षा आज पाशिमात्य जास्त अभ्यास करत आहेत
महत्वाचे म्हणजे या धर्माला असा कोणता ही एक देव नाही.त्याच बरोबर कोण्या एकाचीच भक्ती पूजा करायची, अमाक्यावारी मंदिरात जा ही सक्ती नाही. ह्या धर्मात अनेक पंथ आहेत. प्रत्येकाची पूजा आराधना करण्याची पद्धत वेगळी तरी पण त्याने यांच्या परस्पराच्या संबंधात फरक पडत नाही. येथे दगडाला शेंदूर फासले की त्याला देवत्व प्राप्त होते एव्हडी या हिंदूची ईश्वरावर श्रद्धा आहे. आठवड्याचे सात ही वार वेगवेगळ्या देवाच्या दर्शनाचे असल्या मुळे भक्त आपल्या सोयी नुसार केंव्हाही देवाच्या दर्शनास जातो त्याने नाही गेले तरी फरक पडत नाही. मुंबई सारख्या वेगवान शहरात तर भक्त चालता-चालता कोणत्याही मंदिरा समोर नतमस्तक होतो. विविधतेत एकता हेच या धर्माचे व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि कोण्या पाशिमात्य वाऱ्याने हे उडून जाणार नाही. महापुरे जेथे झाडे जाती तेथे लव्हाळी (गवत पाते) वाचती नम्रपणा हाच याचा गुण आहे.

ह्म्...

इतर ख्रिस्त, मुसलमान धर्मा प्रमाणे हिंदू ला धर्म प्रचारा करता हाती तलवार कधी ही घावी लागली नाही.

पण हिंदू धर्माने कधी त्याच्या प्रसाराचा प्रयत्न केला आहे? कधी प्रयत्न केलाच नाही तर तलवार घेण्याचा प्रश्नच येतो कुठे?

हिंदू धर्माने कधी प्रसाराचा प्रयत्न केला आहे की नाही यावर कोणी अधिक माहिती देईल का? की आपला धर्म नेहमीच असा आमच्यात आलात तर या, आमच्यातून बाहेर गेलात, जा असा कशाचेही बरेवाईट न मानणारा राहिला आहे?

-सौरभ.

==================

फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.

छान विषय

छान विषय.. नंतर वेळ होताच अनुभव टंकेन

तुर्तास स्मृतीचित्रे वाचतोय.. इथे ज्युलियाचा सुरू झालेला प्रवास लक्षुमीबाईं इतका रोचक नसावा असे वाटते

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

तुम्ही

बायबल आणि कुराणासारखे आपल्याला कसले बंधन नाही म्हणून तर मी आनंदाने हिंदू आहे!
अन्यथा मी या भानगडी राहिलेच नसतो!

तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची काही उत्तरे विनोबाजींच्या गीता प्रवचने मध्ये आहेत.(सगळी नाहीत)

मात्र सध्या तुम्ही रिलिजन आनि स्पिरिच्युआलिटी मध्ये गल्लत तर करत नाही आहात ना?

जुलियाबाई हिंदू झाल्या आहेत त्या बहुदा त्यातल्या स्पेरिचुअलिटीमुळे - माझा कयास. नक्की त्यांनाच माहीत.

या शिवाय फेथफ्रीडम डॉट कॉम वरही भरपुर वाचण्यालायक खाद्य तुमच्यासाठी आहे.
http://www.faithfreedom.org/
जरा शोधाशोध करावी लागेल.

आपला
गुंडोपंत

शक्य आहे

जुलियाबाई हिंदू झाल्या आहेत त्या बहुदा त्यातल्या स्पेरिचुअलिटीमुळे - माझा कयास. नक्की त्यांनाच माहीत.

शक्य् आहे असे असेल तर प्रसिद्धीच्या स्टंटसाठी झाल्या असे म्हणता येणार नाही. कारण स्टंट साठी अन्यही मार्ग उपलब्ध असतात.
प्रकाश घाटपांडे

ह्म्...

काय सांगता? समजा तुम्ही ख्रिश्चन किंवा मुसलमान असता तर बायबल आणि कुराण वाचून एवढे उपद्व्याप कोणी करा असे म्हणून हिंदू झाला असता? :-)

रिलिजन आणि स्पिरिच्युआलिटी मध्ये गोंधळ झाला असण्याची शक्यता आहे. तरी मला काय हवे आहे ते पुरेसे स्पष्ट केले आहेच.

-सौरभ.
==================

फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.

उत्तरे

१. पाश्चात्य कोण आहे यावर अवलंबून आहे. ब्रिटीश लोकांना भारताबद्दल बर्‍यापैकी माहिती असते. इतरांचे सामान्यीकरण करणे कठीण आहे. तरीही बॉलीवूडमुळे जनजागृती होते आहे. (फ्रान्समध्ये आम्हाला पाहून बरेचदा मुले-मुली दिलवालेची गाणी म्हणत असत.) आपल्याकडील जातींबद्दल सर्व लोकांना फार कुतूहल असते. तुम्ही अजूनही हे पाळता का असे विचारतात. मग त्यांना वेदांपासून सर्व इतिहास सांगवा लागतो. काहीलोक भारतभ्रमण केलेलेही असतात. अशा वेळी त्यांचे प्रश्न अधिक सयुक्तिक असतात. सिल्व्हियासारखे काही भारताच्या प्रेमातही पडतात आणि संधी मिळेल तेव्हा इथे येऊन धारावीतील मुलांना शिकवण्यासारखी कामे करून जातात.

२. अशा वेळी त्यांना हिंदू आणि इतर धर्मातील फरक समजावून सांगावा लागतो. हिंदू ही जेनेरिक टर्म आहे त्याखाली अनेक संप्रदाय. देव-देवता, चालीरीती येतात. लै मोठा इषय, ऐकणार्‍याची आणि आपली सहनशक्ती किती आहे यावर किती सांगायचे हे अवलंबून असते. आपल्याकडे एक पुस्तक, एक देव असे नाही त्यामुळे गोंधळाला भरपूर वाव आहे.

ज्युलियाने हे पब्लिकसिटी ष्टंट म्हणून केले असावे असे वाटत नाही.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

आभार...

हिंदू ही जेनेरिक टर्म आहे त्याखाली अनेक संप्रदाय. देव-देवता, चालीरीती येतात.

हे वाक्य बरेच काही सांगणारे आहे.
पाश्चात्त्यांच्या दृष्टिकोनाबद्दलची माहिती दिल्याबद्दलही धन्यवाद.

-सौरभ.

==================

फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.

'हिंदू होणे' म्हणजे नक्की काय?

वरील लेखात उपस्थित प्रश्न अगदी योग्य आहेत.
किंवा (माझ्यासह आणि नेमाड्यांसह) अनेक व्यक्ती हिंदू आहेत म्हणजे काय आहेत?
आजानुकर्णांना मागे मी विचरलेला एक प्रश्न असा - "हिंदू ही कादंबरी मराठी अथवा अन्य भारतीय भाषा सोडून भाषांतरीत करता येईल का?"(म्हणजे त्या इतर भाषिकाने ती वाचली तर तिला त्यातून काय उमजेल?)
त्याही पलिकडे जाऊन नेहमीच विचारला जाणारा प्रश्न असा की कोणी भारताबाहेर जन्मणारी 'क्ष' व्यक्ती (जाणत्या वयात - तत्त्वज्ञान वाचून आणि समजून) हिंदू 'धर्म' स्विकारते तेव्हा ती
खरोखरी हिंदू होते का? आणि हिंदू धर्म स्विकारणे म्हणजे नक्की काय?
'य' व्यक्तीने (जाणत्या वयात - तत्त्वज्ञान वाचून आणि समजून) हिंदूधर्म सोडला आणि इतर धर्म स्विकारला म्हणजे तरी नक्की काय घडते?

मला

य' व्यक्तीने (जाणत्या वयात - तत्त्वज्ञान वाचून आणि समजून) हिंदूधर्म सोडला आणि इतर धर्म स्विकारला म्हणजे तरी नक्की काय घडते?

मला याच बाबतीत पुढचा प्रश्न पडतो. एका वेळी दोन धर्म असणे शक्य आहे का? कायद्याने नसेल तर गोष्ट वेगळी पण धर्मांच्या बाबतीत म्युच्युअली एक्सक्लुझिव्हिटी असते का? मी सकाळी किरिस्ताव म्हणून चर्चमध्ये आणि दुपारी हिंदू म्हणून देवळात जाऊ शकतो का?

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

अपवाद

ही सोय केवळ हिंदू धर्मातच आढळते.
जैन, नास्तिक, बौद्ध, यांना 'हेही आमचेच' असे म्हणण्याचा प्रयत्न झालेला आहे. बुद्ध आणि महावीराला तर दशावतारातही घातलेले आहे.
कुरुंदकरांनी लिहिले आहे की हिंदूंना जमले असते तर त्यांनी इस्लामलाही एक महंमदीय पंथ ठरविले असते.

मुळात ज्युलिया मोडर हे आडनाव गृहीत धरून मग त्याचे अपभ्रंश शोधले माहिजेत ना? 'आपली' संस्कृती अधिक पुरुषप्रधान आहे हे कसे विसरता येईल? ;)

हा आगलावेपणा कशाला करायचा?

मुळात ज्युलिया मोडर हे आडनाव गृहीत धरून मग त्याचे अपभ्रंश शोधले माहिजेत ना? 'आपली' संस्कृती अधिक पुरुषप्रधान आहे हे कसे विसरता येईल? ;)

जुईली मोडक नाव कसे वाटेल? पण मग विचार केला हा आगलावेपणा कशाला करायचा? बाहेर समाज नावाची एक अत्यंत गुंतागुंतीची चीज आहे. ती फक्त श्रावण मोडक ह्यांनाच ठाऊक असते. त्यामुळे त्यांची परवानगी घ्यायला हवी.

(अत्यंत सरळसोट) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पुस्तकाचे नाव...

कुरुंदकरांच्या पुस्तकाचे नाव देता येईल का? इतर काही पुस्तके तुम्ही वाचली असल्यास त्यांचीही नावे द्या.

-सौरभ.

==================

फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.

क्षमस्व

त्यांचे केवळ जागरच मी वाचलेले आहे. आज ते चाळून बघितले (एफ३ का नसते?) पण ते वाक्य सापडले नाही, म्हणून तो दावा मी मागे घेतो. ते विधान कुणाच्या लेखनात वाचले ते मला आठवत नाही.

नेमाड्यांची कादंबरी समजेल का?

आजानुकर्णांना मागे मी विचरलेला एक प्रश्न असा - "हिंदू ही कादंबरी मराठी अथवा अन्य भारतीय भाषा सोडून भाषांतरीत करता येईल का?"(म्हणजे त्या इतर भाषिकाने ती वाचली तर तिला त्यातून काय उमजेल?)

मराठी भाषकांनाच ही कादंबरी कितपत उमजेल हा मोठा प्रश्न आहे. सर्वश्री सहस्रबुद्धे आणि सौरभदा यांनी इतक्या पटकन ही कादंबरी संपवल्याचे वाचून माझ्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. पुस्तकाचे एक एक पान मी मोठ्या प्रयत्नाने उलटवत आहे. तरीही एका वाचनात ही कादंबरी संपूर्ण समजेल असा गैरसमज अजिबात नाही. साध्या साध्या परिच्छेदांचे संदर्भ किती खोलवर जाणारे आहेत याची जाणीव सतत होत राहते. साधे उदाहरण म्हणजे नेमाड्यांनी सातपुड्याच्या अलीकडचे, पलीकडचे व सातपुड्यातल्या खिंडी यांचा एक संदर्भ दिला आहे. हे मला हिंदूधर्मातील जातीव्यवस्थेचे प्रतीक वाटते. (नेमाड्यांनाही तसेच वाटत असावे असा माझा कयास आहे.) थोडेसे लोक खिंडींमधून अलीकडून पलीकडे गेले पण ती रुढ वहिवाट होऊन एकत्र होणे कोणालाच जमले नाही वगैरे धाटणीची वाक्ये. हे वाक्य धर्मांतरितांबाबतचे रुपक म्हणूनही वापरता येईल का? (हा संदर्भ चांगदेव चतुष्टयमधील बिनी आणि पारु सावनूर यांच्यावरुन ओढून आणला आहे)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

प्रश्न् क्रमांक १०

श्री.सौरभ यांच्या धर्माबाबतच्या दहा "यक्ष" प्रश्नापैकी "भारतात अनेक वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे पंथ, संप्रदाय, परत नवीन नवीन येणारे बुवा, महाराज, त्यांचे अनुयायी असे आणि इतर मला माहित नसलेले असे अनेक, वेगवेगळे हिंदू धर्माचे असंख्य मार्ग आहेत. हे खूपच जास्त आहेत असे वाटत नाही? मुसलमानांच्या शिया सुन्नी, ख्रिश्चनांच्या कॅथलिक, प्रोटेस्टंट यांच्या तुलनेत? आणि हे चांगले की वाईट?" हा शेवटचा (मला) महत्वाचा वाटतो.

"हिंदू" धर्म सर्वव्यापी म्हणून त्यातील धर्मतत्वेही लवचीक आहेत. बायबल, कुराण (माझा थोडा अभ्यास आहे) यातील शिकवण त्या त्या धर्मीयांच्या कल्याणाप्रतच जरी असली तरी त्यातील काही बंधने आपल्या हिंदुमनाला जाचक वाटण्यासारखी आहेत (उदा.इस्लाम मूर्तीपूजा मानत नाही हे सर्वश्रुत आहे, पण तसे कुणी केले तर ते "अक्षम्य पाप" मानले जाते. अर्थात हा आदेश मुस्लिमधर्मीयांसाठी आहे. कुराणात अन्य धर्मातील अशाबाबतीतील श्रद्धेवर टीका नाही. पण प्रेषितानंतर त्यांच्या अनुयायांनी साम्राज्यविस्ताराच्या नावाखाली मूर्तीपूजा हे पाप आहे हे अंगिकारले अन् मग मूर्तीभंजनाचे ते अघोर प्रकार सुरू झाले. असो. तो विषय वेगळा आहे.); पण हिंदू धर्माचे "सर्वांना सामावून" घेण्याचे जे तत्व आहे ते समाज रचनेतील विविध उतरंडीला मोहक वाटत गेले व एकातून् दोन, दोनातून चार असे अर्थ काढणार्‍या गुरुंची आणि त्यांच्या राहुट्यांची संख्याही त्याप्रमाणात वाढत गेली त्यामुळे गवेगळ्या जाती, वेगवेगळे पंथ, संप्रदाय, परत नवीन नवीन येणारे बुवा, महाराज, त्यांचे अनुयायी हा प्रवास वाढत गेला. मग माझीच छाटी किती डौलात फडफडते यावर रणकंदन.

पण असे असले तरी हिंदू धर्माची स्पिरिच्युआलिटीची जी भावना आहे (जी ज्युलियाला आवडली असे म्हटले जात आहे) तीतून "चांगला माणूस" तयार होईल अशी निखळ श्रद्धा असते. शेवटी धर्माचा इतिहास हा अखेर माणसाचाच इतिहास असतो. पृथ्वीच्या उगमापासून माणूस "जन्मजात चांगला" नव्हताच; पण उत्क्रांतीच्या उलाढालीत "धर्मा"चे तत्वज्ञान उदयाला आले, नंतर त्याला वेगवेगळ्या "नामा"चे किरण लाभले. हिंदूत माणुसकीची ("आपल्यातील वाटा भुकेलेल्याला देणे") भावना प्रबळ राहिली आहे. ख्रिश्चनात जेवणातील "उरलेसुरले" टाकून देण्याचा प्रघात आहे, पण हिंदु गृहिणी "असु दे, उद्या कुणाच्या तरी पोटाला जाईल" या हेतुने उरलेला स्वयंपाक झाकून सुरक्षित ठेवते.

धर्मातील हा विचार सुंदरच आहे....म्हणून मला चांगला वाटतो.

आभार...

हिंदू धर्माची स्पिरिच्युआलिटीची जी भावना आहे

हे जरा सविस्तर सांगता का? ही भावना म्हणजे काय? अशा कोणत्या भावनेमुळे ज्युलियाला हिंदू धर्माबाबत आकर्षण वाटू लागले असावे?

-सौरभ.

==================

फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.

किरिस्ताव

मुसलमानांच्या शिया सुन्नी, ख्रिश्चनांच्या कॅथलिक, प्रोटेस्टंट यांच्या तुलनेत?

किरिस्तावांमध्येही भरपूर प्रकार आहेत. कॅथोलिक, प्रोटेस्टंट, मेथडिस्ट, ऍंग्लिकन, ऑर्थोडॉक्स, येहोवाज विटनेस.. यादी लई मोठी आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

जीझस ख्राईस्ट...

जीझस ख्राईस्ट... यादी चांगलीच मोठी आहे. हिंदूना टक्कर देऊन राहिले भौ!

==================

डुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे!

आन मंग?

दुव्यातील माहीतीनुसार किरिस्तावांचे ३८,००० डिनॉमिनेशन्स आहेत!

मागोवै

हिंदूत माणुसकीची ("आपल्यातील वाटा भुकेलेल्याला देणे") भावना प्रबळ राहिली आहे.

संघाचे निरीक्षण तुमच्या निरीक्षणाच्या विपरित आहे.

ख्रिश्चनात जेवणातील "उरलेसुरले" टाकून देण्याचा प्रघात आहे

काही संदर्भ आहे काय?

दोन खुलासे

१. 'तो' संदर्भ वाचला होताच; पण संघ हा "इन टोटो" हिंदूधर्मियांच्या मताचे प्रतिक होऊ शकत नाही असा मानणारा प्रबळ घटक आहेच. त्यामुळे 'वाट्या' विषयीचे मत (भिन्नता असली तरी) हे कुटुंबसापेक्ष असेल असे म्हणू या. माझ्या पाहण्यातील जी कुटुंबे आहेत तिथे अशा प्रकारचे पालन कटाक्षाने केले जाते (आजकाल 'वृद्धाश्रम' हे एक अशा कार्यासाठी चांगले स्थान निर्माण झाले आहे.)

२. ख्रिश्चन जेवणातील उरलेसुरले टाकणे... याचा संदर्भ थोडासा वाचनात होताच, तो असा :

Chapter 15 Verse 6 :

People would pray to statues and sacrifice food to them. The priests at the temples then sold the leftover food in the marketplace. Christians were afraid to eat this food, because they felt that eating it was almost like worshiping these gods. So, if the Christians conscience made it seem wrong to eat that food, they should follow the conscience and not eat the food and act alike.

इथे लेफ्ट ओव्हरचा अर्थ 'उरले सुरले' असाच होत असणार आणि पुढे म्हटल्याप्रमाणे जर ख्रिश्चन स्वतः लेफ्ट ओव्हर अन्न गृहण करीत नसेल तर तो स्वतःही इतरानी ते स्वीकारावे असे म्हणत नाही. हेही खरे की ही शिकवण सार्वत्रीक स्वरूपात अंमलात आणली जात असेल किंवा नाही याचा विदा मिळविणे कठीण आहे. शेवटी ही बाब "ऑब्झर्वेशन" गटात येते.

अलिकडे आफ्रिकेत कामे करून परतलेल्या कित्येक ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विचारसरणीत लक्षणीय फरक पडला आहे. मला माझ्या काही ख्रिश्चन मित्रांच्या घरी राहण्याचा काही वेळा प्रसंग येतो, तर अशाच एका प्रसंगी त्यांच्या समवेत एका रविवारी चर्चमध्ये गेलो होतो त्यावेळी एका धर्मोपदशकाने जे व्याख्यान दिले त्यात त्यानी "लेफ्ट ओव्हर फूड आणि रिसायकलिंग" चे महत्व विशद केले होते (म्हणजेच दुसर्या अर्थाने ख्रिश्चन उरलेसुरले अन्न ठेवीत नाही हे त्यांनी म्हटले). त्यांच्या मते आफ्रिकेतील काही बारमाही दुष्काळ प्रजेसाठी अशा प्रकारचे रिसायकलिंग फूड देता येण्यासारखे आहे आणि त्याला परमेश्वराचा आशीर्वादही लाभेल. अर्थात हे नक्कीच त्यांच्या धर्मशिकवणीविरूद्ध नसेल.

संदर्भ

ख्रिश्चनात जेवणातील "उरलेसुरले" टाकून देण्याचा प्रघात आहे, पण हिंदु गृहिणी "असु दे, उद्या कुणाच्या तरी पोटाला जाईल" या हेतुने उरलेला स्वयंपाक झाकून सुरक्षित ठेवते.

वर संदर्भ विचारला आहेच पण पुन्हा विचारते.

हिंदू धर्मात अनेक घरांत शिळे-पाके खायला घातले जात नाही. ताजा स्वयंपाक घरातल्या माणसांना (विशेषतः पुरुषांना) जावा अशी रीत असते. शिळेपाके घरातल्या गृहिणी, नोकरवर्ग आणि मग पाळीव प्राणी (त्यांच्या पोटांवर अत्याचार) दिले जाते.

यावरून हिंदू धर्मात अन्नाची नासाडी केली जात नाही असे म्हणता येईल पण हे ख्रिश्चनांत होते असे आहे का?

अन्न नासाडी

>>> यावरून हिंदू धर्मात अन्नाची नासाडी केली जात नाही असे म्हणता येईल पण हे ख्रिश्चनांत होते असे आहे का? <<<

वर एक संदर्भीय खुलासा दिला आहेच. तरीही वरील वाक्याशी सहमत आहे.
हिंदू घरात शिळेपाके खायाला देत नाही ही स्थिती देशातील सर्वच हिंदू घरात आहे असे विधान करणे थोडे धाडसाचे होईल. आर्थिक परिस्थितीनुसार या स्थितीत फरक पडत असतो. दोन वेळेच्या पोटभर अन्नाला महाग असलेली लाखो कुटुंबिय आहेत, त्यातील आईमाईताई दुपारच्या वेळी असे अन्न शिल्लक राहिलेच तर ते रात्रीच्या वेळी कामी येईल असे म्हणतेच म्हणते. इथे पुरुष, स्त्री, मुलगा, मुलगी असा भेदभाव नसतो. "अन्न टाकू नये" हा रोखठोक विचार थोर ठरतो.

ज्या मध्यमवर्गीयांच्याकडे नोकर/नोकराणी आहेत त्यांना रात्रीच्या वेळी राहिलेले अन्न देण्याचा प्रघात सर्वत्र आहे, आणि ते चांगल्या स्थितीत आहे हेदेखील पाहिले जाते (हे मी पाहिले आहे). त्यामुळे पोटावर अत्याचारचा प्रश्न येऊ नये असे वाटते.

आर्थिक परिस्थिती(?)

आर्थिक परिस्थितीनुसार या स्थितीत फरक पडत असतो. दोन वेळेच्या पोटभर अन्नाला महाग असलेली लाखो कुटुंबिय आहेत

आर्थिक परिस्थिती बरोबरच जात-पातही येथे आहे हे ध्यानात घेणे आवश्यक आहे. विशेषतः, काही दाक्षिणात्य तथाकथित सवर्ण कुटुंबांचा (अगदी अमेरिकेतही) असा अनुभव आहे की घरातील पुरूषांना शिळेपाके दिले जात नाही. द. भारतात अशी प्रथा पाहिलेली आहे जिथे अन्नाला महाग असले तरीही शिळेपाके खायचे नाही. जैनांमध्येही हे पाहिलेले आहे. त्याचवेळेस घरातील नोकरांना, कुत्र्याला आणि बायकांना हे अन्न दिले जाते. अशावेळी आर्थिक परिस्थिती हा एकच निकष नसावा. असो.

"अन्न टाकू नये" हा रोखठोक विचार थोर ठरतो.

या विचारासह "मी जे अन्न निकृष्ट म्हणून खाणार नाही ते इतरांनाही देणार नाही." हा विचारही थोर नाही पण अगदीच टाकाऊ नाही असे वाटते.

मूर्तीभंजन

कुराणात अन्य धर्मातील अशाबाबतीतील श्रद्धेवर टीका नाही. पण प्रेषितानंतर त्यांच्या अनुयायांनी साम्राज्यविस्ताराच्या नावाखाली मूर्तीपूजा हे पाप आहे हे अंगिकारले अन् मग मूर्तीभंजनाचे ते अघोर प्रकार सुरू झाले.

माझ्या माहितीत हे चुकीचे आहे. पैगंबरांच्या वेळी पूर्ण अरबदेश मूर्तीपूजक आणि अनेकेश्वरवादी होता. या धर्माचे आता कोणीच शिल्लक राहिले नाही. त्या अनेक देवातील एक देव 'अल्ला' होता. तोच एकटा देव बाकीचे देव नाहीत अशी त्यांची भूमिका होती. या मूर्तीपूजक अरबांविरुद्ध त्यांनी एक मोठी मोहिम उघडली (शेवटी शेवटी). जे लोक इस्लामचा स्वीकार करीत ते स्वत: आपल्या हाताने आपल्या घरातील मूर्त्या फोडून टाकीत. हे करण्यास पैगंबरांची प्रेरणा होती. अशा मूर्तिपूजकांविरुद्ध कुराणात अनेक वचने सापडतील. (नक्की संदर्भ काढायचे कष्ट काढत नाही.)

मूर्तिपूजा हे खूप मोठे पाप आहे हे सुरुवातीपासून इस्लाम मधे होते. अगदी आपली आई मूर्तिपूजक होती (इस्लाम जन्मायच्या आधीच तिचे निधन झाले) आणि तिला स्वर्ग मिळणार नाही या भावनेने पैगंबर दु:खी असत.

प्रमोद

कुराण

>>> हे करण्यास पैगंबरांची प्रेरणा होती. <<<

माझ्याकडे "कुराण" ची प्रत आहे. वेळ लागेल, पण तुम्ही म्हणता तो संदर्भ पाहतो व प्रतिसाद देतो.

हे बघा

हा दुवा http://www.submission.info/perspectives/monotheism/idolworship.html पहा.
मी काही दिवसांपूर्वी कॅरन आर्मस्ट्राँग यांचे 'मुहमद अ बायोग्राफी ऑफ द प्रोफेट' पुस्तक वाचले होते. इतर पुस्तकांपेक्षा हे बरेच चांगले पुस्तक आहे. इस्लामचे तत्वज्ञान जरा नीटसे समजते.

प्रमोद

अरब कोणत्या देवांची पूजा करत?

प्रमोदजी,
इस्लामचा जन्म होण्यापूर्वी अरब लोक मूर्तिपूजा करत असत, हे वाचनात आले आहे, पण या मूर्ती कोणत्या देवतांच्या होत्या? इजिप्शियन, ग्रीक, माया, इन्का, वैदिक अशा संस्कृती ज्या देवतांना पूजत असत त्यांचा तपशील आजही सापडतो. तसा या अरब देवतांचा तपशील उपलब्ध आहे का? यावर काही लेखन झाले आहे का?

अज्ञात?

कुरेशी टोळी महायान बौद्ध होती की हिंदू, ते अज्ञात असल्याचे कुरुंदकरांनी जागर या पुस्तकात दिले आहे.

मुली

पूर्वीच्या अरब धर्मात अल्लाला तीन मुली होत्या. अल् लाट, अल् उजा आणि अल् मनत. बर्‍याच अरबांना त्यांच्या विषयी आस्था होती. ज्याला सैतानाची आयत (बहुसंख्य मुसलमानांच्या मते हे खरे नाही.) म्हणता येईल त्यात याचा उल्लेख आहे असे म्हणतात. रश्दीने याचाच वापर आपल्या पुस्तकात केला.
http://www.answering-islam.org/Shamoun/satanic_verses.htm हा संदर्भ पहा (भरवशाचा आहे की नाही माहित नाही.)

याशिवाय बरेच देव होते. कुठे तरी वाचले की ३६० देव होते. प्रत्येकाची वर्षाच्या एका दिवशी पूजा व्हायची. मात्र याचा संदर्भ नक्की नाही.

प्रमोद

अरबी देव

इस्लामपूर्व अरबी देव बरेच आहेत. इजिप्शियन आयसीसप्रमाणे अरबी देवता इश्तार. ही देवी सुप्रसिद्ध आहे. सहस्त्रबुद्ध्यांनी सांगितल्याप्रमाणे अल् लात, अल् उज्झा, मनत् वगैरे देवताही आहेत. हे देव मूळ अक्केडियन किंवा मेसोपोटेमियन संस्कृतीतील असावेत असा अंदाज बांधला जातो. अधिक माहिती येथे मिळेल.

बाकी मूर्तीभंजनाच्या या सुप्रसिद्ध चित्रात अनेक इस्लामपूर्व देव बघता येतील. :-)

मजेशीर योगायोग

प्रियाली,
चित्र लहान दिसत असल्याने कडेच्या देवांच्या आकृती ओळखता येत नाहीत, पण तुम्ही दिलेला वरील दुवा पाहताना एक मजेशीर योगायोग आढळला. अरबी देवतांमध्ये रुदा नावाची देवता आहे. ते नाव रुद्र या संस्कृत नावापासून आले असावे, असे रुदाबाबतच्या विकी माहितीत नमूद केले आहे. दुसरी एक देवता सुवा आहे. मग रुदा हे नाव रुद्राचे आणि सुवा हे नाव सूर्याचे तर नसेल?

योगायोग नाही

ते नाव रुद्र या संस्कृत नावापासून आले असावे, असे रुदाबाबतच्या विकी माहितीत नमूद केले आहे. दुसरी एक देवता सुवा आहे. मग रुदा हे नाव रुद्राचे आणि सुवा हे नाव सूर्याचे तर नसेल?

हो, ते नाव रुद्र या संस्कृत नावावरून आले आहे हे मी देखील वाचले पण अधिक ठोस माहिती मिळवायला हवी. :-) शिवाय रुद्र कुठून उत्पन्न झाले तेही तपासावे लागेल.

बाकी, सर्व पुरातन संस्कृती एकमेकांत मिसळलेल्या आहेत आणि त्यांच्यात विलक्षण साम्य शोधता येते म्हणून तर आमचा त्यांचा इतिहास या समुदायाची निर्मिती केली आहे.

 
^ वर