नवीन उपक्रमः सुभाषित माला - भाग १

ह्या उपक्रमासाठी मी आज एक नवीन संकेतस्थळ निर्माण करणार होतो. परंतु मला आठवले की मराठीच्या उन्नतीसाठी (जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा) नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी हल्लीच एका संकेतस्थळाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे नवीन संकेतस्थळ स्थापन करण्यापेक्षा आपण जर अस्तित्वात असलेल्याच संकेतस्थळाचा फायदा घेतला तर कसे ? म्हणून ही लेखमाला (त्यातील पहिला लेख) येथे येत आहे. आजवरच्या लेखमालेंपेक्षा ह्याचे उद्देश्य वेगळे आहे. हा लेख न ठेवता लेखमाला ठेवण्याचे कारण की उपक्रमावर ५० पेक्षा जास्त प्रतिसाद आलेत की ते प्रतिसाद दुसर्‍या पानांवर जातात. आणि मग नवीन प्रतिसाद शोधणे अवघड होते. त्यामुळे, ह्या लेखाला "भाग १" म्हणण्याचे कारण की, ह्या लेखाला ५० प्रतिसाद आले, की दुसरा लेख सुरू करता येईल.

असो, एवढी प्रस्तावना खूप झाली. आता ह्या उपक्रमाचे स्वरूप सांगतो. ह्या उपक्रमात आपण सर्व मराठीप्रेमी मंडळींनी इतर भाषांतली सुभाषिते (कोट्स) मराठीत आणायची आहेत. उदाहरणार्थ, सार्त्र ने म्हटले आहे की "When the rich make war, it's the poor that die.". ह्याचे भाषांतर असे: "जेव्हा श्रीमंत लोक युद्ध करतात, तेव्हा गरीब लोकच मरतात."

आता, हे शब्दशः भाषांतर झाले. मला स्वतःला तरी अशी भाषांतरे आवडत नाहीत. ह्या भाषांतरांत काही सुधारणा करता येईल का ?

माझा पहिला प्रयत्न असा:

श्रीमंत लोकांच्या युद्धांत गरीब लोक मरतात.

पुन्हा एक प्रयत्नः

लढतात श्रीमंत, मरतात गरीब.

काय, जमलंय का ?
चला तर मग. अनेक भाषांत अनेक महान लोकांनी आपल्याला दिलेली सुभाषिते, ह्या उपक्रमात आपण मराठीत्त भाषांतरित करूया.

ह्या लेखांचे प्रतिसाद अशाप्रकारे अपेक्षित आहेतः

मूळ भाषेतील सुभाषित: ***
कुणाचे सुभाषितः ***
शब्दशः भाषांतरः ***
मूळ अर्थानुसार (मला वाटते ते) भाषांतरः ***

काही उदाहरणे देतो.

मूळ भाषेतील सुभाषितः Satisfaction does not come with achievement, but with effort. Full effort is full victory.
कुणाचे: महात्मा गांधी
शब्दशः भाषांतरः निकालातून समाधान मिळत नाही, तर प्रयत्नांतून (ते मिळते). पूर्ण प्रयत्न म्हणजे पूर्ण विजय.
मूळ अर्थानुसार (मला वाटते ते) भाषांतरः साधन हे समाधान, साध्य नाही. विजय साधनातून मिळतो. विजय हे साध्य नाही.

मूळ भाषेतील सुभाषितः I knew I was going to take the wrong train, so I left early.
कुणाचे: योगी बेरा
शब्दशः भाषांतरः मल माहिती होते की मी चुकीच्या आगगाडीत बसणार आहे, म्हणून मी आधीच निघालो.
मूळ अर्थानुसार (मला वाटलेल्या) भाषांतरः चुका होतातच. मी माझ्या चुकांविषयी जागृत आहे.

मूळ भाषेतील सुभाषितः A happy man is too satisfied with the present to dwell too much on the future.
कुणाचे: अल्बर्ट आईनस्टाईन
शब्दशः सुखी माणूस सद्यस्थितीविषयी समाधानी असतो, त्यामुळे तो भविष्याविषयी विशेष विचार करत नाही.
मला वाटते ते: सद्यस्थिती उत्कृष्ट आहे ना? मग त्यातच सुखी राहा. उगाच उद्याविषयी काळजी करू नका.

(हे शेवटचे उदाहरण काही मला स्वतःला पटत नाही, अजूनही. कारण ह्या सद्यस्थितीत मी समाधानी नाही :-)

तर उपक्रमींनो, तुम्हाला माहिती असलेली सुभाषिते ह्या लेखाच्या प्रतिसादांत लिहून आणि त्यावर चर्चा करून हा उपक्रम यशस्वी करा, ही विनंती.

आणि हो. इंग्रजी सुभाषितांचे भांडार येथे उपलब्ध आहे.

येथी टाकलेली आणि सर्वानुमते संमत असलेली (आवडलेल्) भाषांतरे मराठी विकीकोट्स मध्ये टाकण्याची जबाबदारी माझी.

(उपक्रमपंतांना विनंती. ह्या लेखाला अपेक्षित असलेल्या प्रतिसादांत सुमारे पंचेवीस टक्के रोमन लिपीतील अक्षरे येण्याची शक्यता आहे. तर तुमचा १० टक्क्यांचा हा नियम ह्या लेखमालेपुरता अवरोधता येईल का ?)

एक प्रश्न.

माझ्यामते प्रत्येक भाषेला स्वतःचा असा एक डामडौल असतो, स्वतःचं सौंदर्य असतं.

म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते ही त्या त्या भाषेतली त्या त्या भाषेतच शोभून दिसतात. ती उगाच मराठीत किंवा इतर भाषेत आणायचा अट्टाहास कशाला?

संबंधित भाषेचा (मग ती कोणतीही भाषा असो,) आणि त्या भाषेतल्या प्रत्येक सुभषिताला त्या त्या भाषेचा एक लहेजा असतो आणि तो जमून गेलेला असतो. तो लहेजाची मजा घेत ते ते सुभाषित त्या त्या भाषेतच शिकलं तर ते अधिक उत्तम असं मला वाटतं.

सबब, संबंधित उपक्रम मला व्यक्तिशः पसंत नाही.

शुभेच्छा..

तात्या.

अट्टाहास नाही

म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते ही त्या त्या भाषेतली त्या त्या भाषेतच शोभून दिसतात. ती उगाच मराठीत किंवा इतर भाषेत आणायचा अट्टाहास कशाला?

मराठीत कुठलेही इतर भाषातले साहित्य (त्यात सुभाषितेही आलीत) यावे त्याचा अट्टाहास नाही. (आपण आजवर होम्स कथांच्या भाषांतरावर आक्षेप व्यक्त केल्याचे आठवत नाही :-)
आपल्या एखाद्या भाषेच्या डौलाविषयीच्या विधानाशीही सहमत आहे.
परंतु सदर उपक्रम कवितांसारखे आहेत. प्रत्येक भाषेत सारखेच विचार वेगवेगळ्या शब्दरचनेत मांडता येतात. कुणी सुनीत रचतो (परभाषेतील रचनेची नक्कल करून, कुणी गझला रचतो, त्याही मुळात परभाषेतीलच रचना), तर कुणी अस्सल ओव्या. पण ह्यातील जे ज्याला आवडते, ते तो/ती श्रेष्ठ म्हणतो/ते. खरे ना ?

समजा सुनीत आणि गझला ह्यासारख्या पोकळ रचना, आपण् इतर भाषांतून जसेच्या तसे उचलल्यात, तर मग सुभाषिते ही तर पोकळ रचना नाहीत, विचारांचे प्रकटीकरण आहे. विचार तर भाषातीत असावेत, खरे ना ? मग हे विचार इतर भाषांत व्यक्त का करता येऊ नयेत ?

- मिलिंद

लहेज्याचं काय?

विचार तर भाषातीत असावेत, खरे ना ? मग हे विचार इतर भाषांत व्यक्त का करता येऊ नयेत ?

विचार म्हणून म्हणत असाल तर ठीक आहे. कुठलाही विचार हा कुठल्याही भाषेत अवश्य व्यक्त व्हावा. फक्त मूळ सुभाषितातील भाषेचा नाद आणि लहेजा या मराठीकरणाच्या हट्टापायी नष्ट होईल याचे वाईट वाटते.

शहाजहानने बांधलेला ताज हा ताज म्हणूनच बघावा, त्याला आपली वीट जोडून त्यात राजगडाचा बालेकिल्ला पाहायचा प्रयत्न करू नये! तसेच पावनखिंड पाहताना बाजींसमोर नतमस्तक व्हावं, त्यात दिवान ए खास बघायचा प्रयत्न करू नये!

कुसुमाग्रजांची 'प्रेम कुणावरही करावं" ह्या कवितेचा मजा लुटायचा असेल तर मराठी शिकायलाच हवं. हरिवंशरायांच्या मधुशालेत डुंबायचं असेल तर हिंदी भाषाच शिकायला हवी. तिचं मराठीकरण करण्याचा हास्यास्पद पोरखेळ करू नये!

अर्थात, ही सर्व माझी वैयक्तिक मतं!

एक उपक्रमी म्हणून आपल्या उपक्रमाकरता मात्र माझ्या अनेक शुभेच्छा..

तात्या.

संकलित प्रतिसाद..

मिलिंदराव,

आम्ही आमचा मूळ प्रतिसाद संकलित करत होतो, तेव्हाच तुम्ही त्याला नेमकं उत्तर देत होतात असं वाटतं. त्यामुळे आम्हाला access denied अशी सूचना दिसली आणि आमचा मूळ प्रतिसाद आम्हाला संकलीत करता आला नाही.

असो, आमचा मूळ प्रतिसाद संकलित स्वरुपात खालीलप्रमाणे -

माझ्यामते प्रत्येक भाषेला स्वतःचा असा एक डामडौल असतो, स्वतःचं सौंदर्य असतं.

म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते ही त्या त्या भाषेतली त्या त्या भाषेतच शोभून दिसतात. ती उगाच मराठीत किंवा इतर भाषेत आणायचा अट्टाहास कशाला?

संबंधित भाषेचा (मग ती कोणतीही भाषा असो,) आणि त्या भाषेतल्या प्रत्येक सुभषिताला त्या त्या भाषेचा एक लहेजा असतो आणि तो जमून गेलेला असतो. त्या लहेजाची मजा घेत ते ते सुभाषित त्या त्या भाषेतच शिकलं तर ते अधिक उत्तम असं मला वाटतं.

सबब, संबंधित उपक्रम मला व्यक्तिशः पसंत नाही.

शुभेच्छा..

तात्या.

अवांतर १ -

संगीतासारखाच प्रत्येक भाषेलाही स्वतःचा एक नाद असतो आणि तो कुठेही डिस्टर्ब होता कामा नये, होऊ नये, असं मला वाटतं.

मालवणी माणसाने शेट्टी-मंगलोरी पद्धतीचा मच्छी सुरवा करू नये. शेट्टी माणसाने मालवणी पद्धतीचे मटण वडे करू नयेत. मराठी माणसाने लखनवी किंवा आमच्या दिल्ली दरबारच्या जाफरभाईची दम बिर्याणी करायला जाऊ नये, आणि जाफरभाईने भाजणीचं खमंग थालीपीठ किंवा आमच्या कोकणातली पानगी करायला जाऊ नये!

अवांतर- २

उदाहरणार्थ -

"जेणो काम तेणो थाय बिजा करे सो गोता खाए"

अशी गुजराथीत एक म्हण आहे. तिचं मराठीत किंवा इतर कुठल्या भाषेत काय करता येईल सांगा पाहू! आणि कुणी केलंच तर त्याला "जेणो काम.." चा लहेजा असणार आहे का?

"बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर" अशी मराठीत एक म्हण आहे. तिचं हिंदीत किंवा इतर कुठल्या भाषेत काय करता येईल सांगा पाहू! आणि कुणी केलंच तर त्याला 'बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर' मधला डौल असणार आहे का, तेही मला सांगा! ;)

अवांतर ३

मिलिंदराव, आपण सर्व संकलने विकीमध्ये टाकायची म्हणताय, पण तिथे कुणीही सोम्यागोम्या येऊन कुणाचंही लेखन एका क्षणात बदलू शकतो, हा विकीपिडियातला सर्वात मोठा दोष आपल्याला ठाऊक आहे का?

तात्या.

उपक्रमपंतांना विनंती

उपक्रमपंत,

तात्यांच्या वरील दोन-तीन प्रतिसादांतून दोन अत्यंत माहितीपूर्ण चर्चा-प्रस्ताव निर्माण होऊ शकतील. त्यामुळे आपण आजवर कुणाकुणाच्या प्रतिसादांना स्वतंत्र लेखांचा दर्जा स्वतःहून दिलात, तसेच ह्या प्रतिसादांनाही स्वतंत्र चर्चा-प्रस्तावाचे स्वरूप कृपया द्याल का ?

माझ्या मते ते चर्चा प्रस्ताव असे:

मूळ भाषेचा लहजा त्या भाषेतील साहित्याच्या भाषांतरात उतरतो का ? नसल्यास भाषांतर का करावे ? मूळ साहित्य त्या मूळ भाषेतच का वाचू नये ?

दुसरा प्रस्तावः

विकीपीडियासारख्या संकेतस्थळात, जेथे कुणीही संपादन करू शकतो, तेथील माहितीची विश्वासार्हता किती ? (त्यातून उपक्रमावरच्या शेकडो विकीपीडियावरच्या दुव्यांना माहितीपूर्ण कसे समजावे, हा उपप्रस्ताव करता येईल. अथवा कुणी कडवट व्यक्ती "फक्त विकीपीडियावरचे दुवे दिलेले लिखाण उपक्रमाच्या धोरणात कसे बसते ?" असा देखील प्रश्न विचारेल. मजा येईल, आणि उपक्रमाचे गंभीर रूपदेखील सदस्यांना खटकणार नाही.)

बघा, जमतंय का ते.

- मिलिंद

इंदौर, जळगाव की शेगाव??

त्यामुळे आपण आजवर कुणाकुणाच्या प्रतिसादांना स्वतंत्र लेखांचा दर्जा स्वतःहून दिलात,

मिलिंदा, आहेस खरा नागपुरी!! ;)

मूळ भाषेचा लहजा त्या भाषेतील साहित्याच्या भाषांतरात उतरतो का ? नसल्यास भाषांतर का करावे ? मूळ साहित्य त्या मूळ भाषेतच का वाचू नये ?

माझा या चर्चाप्रस्तावाला पाठिंबा आहे!

विकीपीडियासारख्या संकेतस्थळात, जेथे कुणीही संपादन करू शकतो, तेथील माहितीची विश्वासार्हता किती ?

माझ्या मते अगदीच कमी.

लतादीदींचा जन्म शेगावला झाला असे एकदा विकिपिडियावर वाचल्याचे आठवते. मी त्यांचा जन्म शेगावला नसून इंदौरला झाला अशी सुधारणा केली होती. आता ती सुधारणाही कुठे दिसत नाही.

शिवाय समजा पुन्हा एखाद्याने "लतादीदींचा जन्म इंदौरला झाला" यात बदल करून तेथे इंदौर ऐवजी "जळगाव" टाकले तर ते पुन्हा कुणी सुधारायचे? आणि असा हा सुधारण्याचा खेळ कुणी किती वेळ करत बसायचं?

विकीवाल्यांकडे आहे याचं उत्तर?

आपला,
तात्यापिडिया!

इंग्रजी सुभाषिते देवनागरींत

सर्किट राव,
रोमन अक्षरांच्या वापरावरील निर्बंधामुळे मूळ इंग्रजी सुभाषिते देवनागरींत किंवा देवनागरी व रोमन दोन्ही लिप्या वापरून लिहिली तर चालतील का? तसे असेल तर माझ्याकडे बरीच इंग्रजी सुभाषिते आहेत ती मी देऊ शकतो. शिवाय माझ्या स्टॉकमध्ये असलेल्या सुभाषितांचा मूळ लेखक कोण तेही सांगता येणार नाही. ते चालेल का? चालायला हरकत नसावी. संस्कृत सुभाषितांचे मूळ लेखक तरी आपल्याला कुठे ठाऊक असतात?

नक्कीच

नक्कीच आवडतील, पण इंग्रजी सुभाषितांचे मराठीत रुपांतर करणे मात्र आवश्यक आहे.

- मिलिंद

लढाया

लढतात श्रीमंत, मरतात गरीब ऐवजी "लढाया श्रीमंतांच्या, मराया गरीब" असे जास्त चांगले वाटेल असे वाटते. लढाया हे लढाई चे अनेकवचन तर मराया हे मरण्यासाठी ह्या अर्थाने. लढाया श्रीमंतांच्या असल्या, तरी प्रत्यक्ष लढणारे गरीब असतात. ते श्रीमंतांसाठी वा वतीने लढत असतात, त्यामुळे मरतातही तेच. लढतात श्रीमंत हे बरोबर वाटले नाही. असो.

आवडले

लढाया, मराया ह्यात एक नाम, आणि एक क्रिया विशेषण हे विशेष आवडले.
नवनवीन सुभाषितांचे असेच रुपांतर व्हावे, ही अपेक्षा.

- मिलिंद

लढाया ..

लढाया श्रीमंतांच्या, मरण मात्र गरिबांचे! हे कसे वाटते?
हे म्हणजे कथा कुणाची व्यथा कुणा...च्या चालीवर वाटते.

खरे तर अशी भाषांतरे करण्याची जरूर आहे असे वाटत नाही. कारण आपापल्या अनुभवाप्रमाणे प्रत्येक भाषेत ज्या म्हणी आणि वाक्प्रचार आहेत त्यातही बर्‍याच प्रमाणात साम्य आहेच.

उदा.A happy man is too satisfied with the present to dwell too much on the future. ह्याच्याशी साधर्म्य असलेले तुकारामांचे वचन म्हणजे.... ठेविले अनंते तैसेची रहावे,चित्ती असो द्यावे समाधान!
अ मॅन पाईन्स फॉर व्हॉट इज नॉट!.... हातचं सोडून पळत्याच्या मागे धावणे
माईट इज राईट.... बळी तो कान पिळी ... किंवा .... ज्याच्या हाती ससा तो पारधी....किंवा ...जिसकी लाठी उसकी भैंस! वगैरे वगैरे.
ए मॅन प्रपोजेस,गॉड डिसपोजेस...... कार्य सिद्धीस नेणेस श्री समर्थ आहे... असा खरा अर्थ असायला हवा ....पण लोक असा अर्थ न मानता..... दैव देतं आणि कर्म नेतं.... असे समजतात.

तेव्हा भाषांतर करण्या ऐवजी समानार्थी म्हणी आणि वाक्प्रचार ह्यांचा शोध घ्यावा हे उत्तम होईल.

लोक बरोबर आहेत

ए मॅन प्रपोजेस,गॉड डिसपोजेस...... कार्य सिद्धीस नेणेस श्री समर्थ आहे... असा खरा अर्थ असायला हवा ....पण लोक असा अर्थ न मानता..... दैव देतं आणि कर्म नेतं.... असे समजतात.

लोक बरोबर आहेत, असे मला वाटते.

- मिलिंद

डिसपोजेस...

चा अर्थ कार्य पार पाडणे असा घेतल्यास(होकारार्थी) 'कार्य सिद्धीस नेणेस श्री समर्थ आहे 'असा होतो.
देव (मानत असाल तर!) कधीही तुमच्या कार्यात विघ्न आणत नाही असे समजतात. मग तुम्ही जे योजले आहे ते कार्य तडीस नेण्यास तो निश्चितच मदत करणार! त्यात विघ्न कसे आणेल?
टू डिसपोज ह्या शब्दाचा एक अर्थ जसा 'विल्हेवाट लावणे' असा आहे तसाच 'कार्य तडीस नेणे' असाही होतो. आपण तो कोणत्या संदर्भात वापरतो त्यावर तो अर्थ अवलंबून आहे. आणि निदान देवांच्या बाबतीत तरी(इंद्र वगैरे देव सोडले तर... बहुधा त्यांचे तेच काम होते!) आपण असे म्हणू शकत नाही की ते विघ्ने आणतात. उलट कार्य निश्चिंतपणे पार पडावे म्हणून त्यांना साकडे घातले जाते.गणपतीला तर लोक सुखकर्ता,दु:खहर्ता,विघ्नहर्ता वगैरे विशेषणे लावतात आणि कोणत्याही कार्यारंभी त्याची पूजा करतात ते उगीच काय?('दूर्जनं प्रथमं वंदे' असा अर्थ आहे का त्यामागे?)
आता आपणच ठरवा.

अ मॅन पाईन्स फॉर व्हॉट इज नॉट!....

वी लुक बिफोर ऍंड आफ्टर
ऍंड पाइन फॉर व्हॉट इज नॉट
अर सिन्सिरेस्ट लाफ्टर
विथ सम पेन इज फ्रॉट
अर स्वीटेस्ट सॉन्ग्ज आर दोज
दॅट टेल ऑफ सॅडेस्ट थॉटस

Shelly

सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे
जे सुदूर, जे असाध्य, तेथे मन धावे
शांता शेळके

है सबसे मधुर वो गीत जिन्हें
हम दर्द के सुर में गाते हैं
शैलेंद्र

सन्जोप राव

क्या बात है !

इतर भाषांतले विचार, आपल्या भाषेचा लहेजा सांभाळूनच येथे यावेत. ह्याची दोन उत्कृष्ट उदाहरणे दिल्याबद्दल धन्यवाद संजोपराव.

- मिलिंद

आत्मसात!

इतर भाषांतले विचार, आपल्या भाषेचा लहेजा सांभाळूनच येथे यावेत. ह्याची दोन उत्कृष्ट उदाहरणे दिल्याबद्दल धन्यवाद संजोपराव.

अहो तेच तर मी ही सांगत होतो! ते आपलं लहेज्याचं हो! ;)

बाकी सर्कीटराव, संजोपरावांना दाद दिल्यामुळे आपण कळीचे मुद्दे फटाफट आत्मसात करता हेच सिद्ध होते. आपले खरंच कौतुक वाटते! ;)

तात्या.

प्रयत्न

मूळ सुभाषित ('मूळ भाषे'तील सुभाषित नव्हे!): Life is what the least of us make the most of us feel the least of us make the most of.
कुणाचे: W V Quine
शब्दार्थानुसार (शब्दशः नव्हे) भाषांतरः आयुष्य म्हणजे, तर आपल्यातले थोडक्यांनीच आपल्या बर्‍याचजणांना, 'थोडके'च 'बरेच' आहेत असे भासवणे.
आशयानुसार (अर्थानुसार नव्हे) भाषांतरः वाटतंय मला, सांगतोय तुला, वाटे जे मला तेच हवे तुला.

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

खतरनाक

ते इंग्रजी वाचताना माझा इंग्रजीचा पार्सर कोलमडला (सेगमेंटेशन फॉल्ट, कोअर डंप्ड्)

- मिलिंद

तो साहेब / अवांतर...

राम राम तो साहेब,

आपण विकिपिडियाचे सदस्य असल्याचे नेहमी आपल्या सहीत दिसते. येथील एका प्रतिसादात आम्ही विकिपिडियाबद्दल खालील विधान केले आहे -

शिवाय समजा पुन्हा एखाद्याने "लतादीदींचा जन्म इंदौरला झाला" यात बदल करून तेथे इंदौर ऐवजी "जळगाव" टाकले तर ते पुन्हा कुणी सुधारायचे? आणि असा हा सुधारण्याचा खेळ कुणी किती वेळ करत बसायचं?

विकीवाल्यांकडे आहे याचं उत्तर?

आपण या बाबतीत काही खुलासेवार सांगू शकाल का? सांगितल्यास बरे होईल. मलाही हिंदुस्थानी रागदारी संगीताबद्दल काही लेखन विकिपिडियावर करावयाचे आहे. माझ्या वरील शंकेचे उत्तर मिळाल्यास मला लेखन करण्यास सोयीचे होईल असे वाटते.

अजून एक शंका -

'यमन' हा हिंदुस्थानी राग संगीतातील एक राग. त्यात शुद्ध गंधाराचा प्रयोग केला जातो. जर मी ही माहिती विकिपिडियावर लिहिली, आणि नंतर जर त्यात एखाद्याने शुद्ध गंधाराऐवजी कोमल गंधाराचा प्रयोग केला जातो, असे लिहिले तर त्यावर काय उपाय आहे? की पुन्हा मी किंवा इतर कुणी येऊन तिथे कोमल गंधाराचा शुद्ध गंधार करायचा? आणि in the meantime, जर विकीवर एखाद्या वाचकाने यमनबद्दल काही माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या वाचनात कोमल गंधार असे आले तर त्याची दिशाभूल होणार नाही का?

की विकीवरील माहिती वाचून वाचकांची जबरदस्त दिशाभूल होऊ शकते/होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून विकिपिडिया हा प्रकार वाचकांनी तेवढा सिरियसली घेऊ नये?

तात्या.

कृपया

विकीपीडियाविषयी चर्चेसाठी नुकताच स्वतंत्र चर्चाप्रस्ताव निर्मित केला आहे, त्यावर कृपया चर्चा करावी, ही विनंती.

- मिलिंद

काही इंग्रजी सुभाषिते

खाली काही इंग्रजी सुभाषिते अंशतः रोमन् व देवनागरी लिपींत दिली आहेत. मला त्यांचे शैलीदार मराठींत रूपांतर जमणार नाही व साध्या भाषांतरांत मूळ सुभाषितांचे सौंदर्य हरवून जाईल असे वाटते म्हणून ते देत नाही. ज्यांना शैलीदार लिखाणाचे अंग आहे त्यांनी ते माझ्यासाठी व इतरांसाठी जरूर करावे.
१) Whatever द शेप् अँड् साइज् ऑफ् द कंटेनर्, क्रीम् इज् ऑल्वेज् at द टॉप्.
२) नो बॅट्ल् इज् लॉस्ट् मोअर् sorely दॅन् द वन् नॉट् फॉट्.
३) नेव्हर् फियर् शॅडोज्; दे मीन् देअर् इज् लाइट् somewhere.
४) इट् इज् बेटर् टु वेअर् आउट् दॅन् टु रस्ट् आउट्.
५) फ्रेंड्स् कम् अँड् गो enemies accumulate.
६) Worry कान्ट् चेंज् द पास्ट्, नॉर् कॅन् इट् शेप् द फ्युचर्; बट् इट् कॅन् ruin द प्रेझेंट्.
७) एव्हरीवन् इज् गिफ्टेड्; सम् ओपन् द पॅकेज् sooner.
८) Obstacles आर् दोज् फ्राइट्फुल् थिंग्ज् यू सी व्हेन् यू टेक् युवर् eyes ऑफ् युवर् goal.
९) डू नॉट् पुट् युवर् फेथ् इन् व्हॉट् statistics says until यू हॅव् carefully कंसिडर्ड् व्हॉट् इट् डझन्ट् से.
१०) एव्हरी saint हॅज् अ पास्ट्; एव्हरी sinner हॅज् अ फ्यूचर्.
११) Glory इज् अ टॉनिक् इन् स्मॉल् डोसेस्, बट् अ पॉइझन् इन् लार्ज् डोसेस्.

६) Worry कान्ट् चेंज् द पास्ट्, नॉर् कॅन् इट् शेप् द फ्युचर्; बट् इट् कॅन् ruin द प्रेझेंट्.
शब्दशः चिंता भूतकाळ बदलू शकत नाही, भविष्य घडवू शकत नाही. पण वर्तमान मात्र नासवू शकते.
तत्वतः चिता माणसाला मेल्यावर जाळते, चिंता जीवंतपणी जाळते.

उचलली जीभ

५) फ्रेंड्स् कम् अँड् गो enemies accumulate.

शब्दार्थानुसार: मित्र येतात आणि जातात, पण शत्रू साठतच जातात.
भावार्थानुसारः सगे-सोयरे येती जाती, वैर्‍यांच्या जन्मांच्या गाठी.

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

८. लक्ष्यावरील लक्ष (!) हटल्यामुळे वाटेत येणार्‍या गोष्टींना अडथळे म्हणतात.