भाषाभगिनी इ.
टग्या यांच्या वारांची नावे ह्या प्रियालीकृत चर्चेवर आलेल्या अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसादाचा हा वेगळा लेख बनवण्यात आला आहे
उपक्रम
...
लॅटिन, ग्रीक, जर्मेनिक (जर्मन, डच, इंग्रजी, तसेच स्कॅन्डिनेव्हियन भाषा [जसे स्वीडिश इ.] या सर्व भाषांची जननी), संस्कृत, तसेच फारसी भाषेची जी कोणती जननी असेल ती (नावाबद्दल निश्चित खात्री नाही), या भाषाभगिनी आहेत.
या सर्व भाषाभगिनी ज्या मूळ भाषेतून उगम पावल्या, त्या प्रोटोटाइप आदिभाषेस भाषाशास्त्रज्ञ 'इंडोयुरोपियन' या नावाने संबोधतात, असे कळते. म्हणजे, हिंदुस्थानपासून युरोपापर्यंत पसरलेल्या विविध (वांशिकतः परस्परसंबद्ध) लोकसमूहांची मूळ भाषा, असे काहीसे ढोबळमानाने म्हणता यावे.
पैकी लॅटिनपासून उद्भवलेल्या आधुनिक भाषांना 'रोमान्स भाषा' असे म्हणतात. उदा. फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन, र्हेटो-रोमान्श (? नावाच्या उच्चाराबद्दल खात्री नाही. स्वित्झर्लंडमधील एका अल्पसंख्याकाची भाषा.).
जर्मेनिकोद्भव भाषांमध्ये जर्मन, डच, इंग्रजी*, विविध स्कॅन्डिनेव्हियन भाषा, तसेच यिडिश** यांचा समावेश होतो.
*इंग्रजी ही मूळची जर्मेनिकोद्भव भाषा असली, तरी नंतरच्या विविध काळांत तिच्यावर रोम तसेच फ्रान्समधून आलेल्या लोकांची आक्रमणे, वसाहती आणि काही प्रमाणात अशा बाहेरून येऊन स्थायिक झालेल्यांचा प्रत्यक्ष राज्यकारभार यांतून लॅटिन आणि फ्रेंच भाषांचे - विशेषतः शब्दांचे - अनेक संस्कार झाले आहेत, असे कळते.
**उत्तर आणि मध्य युरोपात, विशेषतः जर्मनीत, आणि पूर्वेस रशियन साम्राज्यापर्यंत पसरलेल्या ज्यू लोकांची (Ashkenazi Jews किंवा Ashkenazim) भाषा. ही मूलतः जर्मन भाषेची अपभ्रष्ट भाषा असून, हिच्यात काही प्रमाणात - कदाचित धार्मिक गरजेमुळे आणि त्या गरजेपुरता - हिब्रू शब्दांचाही भरणा आहे, असे कळते. या भाषेच्या नावाचा उगम जर्मन भाषेतील Judische Deutsch (अर्थात "ज्यू लोकांची जर्मन भाषा") (पहिल्या शब्दातील uवर umlaut आहे, पण तो umlaut दिलेले u हे अक्षर इथे नीट दिसत नाही.) या शब्दाच्या अपभ्रंशावरून आहे, अशीही माहिती वाचावयास मिळते. ही भाषा हिब्रू लिपी वापरून लिहिली जाते. (हिब्रू ही भाषा सेमिटिक [अर्थात मध्यपूर्वेतील अरबी, हिब्रू इ.भाषांचा गट] गटातील असली, आणि यिडिश भाषेवर [सेमिटिक वंशाच्या ज्यूंची भाषा असल्याकारणाने आणि ज्यू लोकांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक गरजांमुळे] हिब्रू भाषेचे अनेक संस्कार आणि शब्द - किंबहुना लिपीसुद्धा - असले, तरी यिडिश ही प्राथमिकतः जर्मनच्या अपभ्रंशातून निर्माण झाली असल्यामुळे जर्मेनिकोद्भव भाषा गणली जाते.) याउलट स्पेन-पोर्तुगालच्या बाजूला पसरलेल्या ज्यू लोकांची (Sephardi Jews किंवा Sephardim) Ladino या नावाची स्पॅनिशच्या अपभ्रंशावर आधारित आणि हिब्रू भाषेचे संस्कार असलेली भाषा आहे, ती रोमान्स भाषा गणली जाते.
प्राचीन ग्रीक, संस्कृत आणि आधुनिक फारसी*** भाषेची आदिभाषा (नक्की नाव माहीत नाही.) याही लॅटिन व जर्मेनिक भाषांच्या भगिनी आहेत.
***फारसी आणि अरबी भाषांचा नंतरच्या काळात इस्लामच्या प्रसारामुळे आणि कदाचित आक्रमणामुळे (? नक्की खात्री नाही - चूभूद्याघ्या.) बराच संबंध आला असला, तरी मुळात या पूर्णपणे भिन्न गटांतील भाषा आहेत. फारसी ही इंडोयुरोपियन गटातील तर अरबी ही सेमिटिक गटातील**** भाषा आहे. किंबहुना फारसी आणि संस्कृत भाषांचा खूप निकटचा संबंध आहे.
****अवांतर: (ऐकीव माहिती) सेमिटिक भाषांची एक खासियत सांगितली जाते, ती म्हणजे त्रिव्यंजन शब्दमुळे (tri-consonant roots). जसे, क्, त्, ल् या तीन व्यंजनांतून '(ठार) मारणे' ही संकल्पना दर्शवली जाते. यात अध्येमध्ये वेगवेगळे स्वर पेरून, त्यातून 'कातिल' ('मारणारा'), 'कत्ल' ('मारणे' अर्थात मराठीतली 'कत्तल') असे संबंधित अर्थ असलेले शब्द निर्माण होतात. (तसेच क्, त्, ब् पासून किताब, कुतुब इ., किंवा क्, फ् [नुक्तावाला - हा पायमोडका नुक्तावाला फ् इथली प्रणाली वापरून लिहिता येत नाही.], र् पासून कुफ्र, काफिर इ. हे सर्व शब्द अरबी भाषेतून आलेले आहेत, असे समजते.)
डिस्क्लेमर: ही सर्व माहिती मला जशी ऐकायला किंवा वाचायला मिळाली तशी, आणि त्यातूनही मला समजली तशी, दिलेली आहे. चूभूद्याघ्या - तज्ज्ञ चुका सुधारण्यास समर्थ आहेतच.
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा

दखल
या प्रतिसादाची अशाप्रकारे घेतलेली दखल आवडली. उपक्रमाचे अनेक धन्यवाद!
अतिशय माहितीपूर्ण लेख आहे.
सहमत
सहमत आहे. लेख अत्यंत माहितीपूर्ण आहे.
कालमान
टग्यामहोदय, या लेखामुळे बरीच माहिती कळली. भाषांमध्ये झालेले हे बदल साधारणपणे कधी झाले? या बदलांच्या कालमानाबद्दल काही सांगता येईल का?
या संस्कृत, लॅटिनादी भाषाभगिनी आणि त्यांच्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या प्राचीन इजिप्शियन वगैरे भाषांमध्ये साम्य आहे का?
संस्कृत, लॅटिन आणि इजिप्शियन
इजिप्शियन भाषेचा संस्कृत आणि लॅटिनशी संबंध नसावा परंतु सेमेटिक भाषांशी असावा. ऍफ्रो-आशियातील भाषांचा एक वेगळा गट आहे त्यात इजिप्शियन भाषेचा समावेश होतो असे वाटते. यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राचीन इजिप्शियन हायरोग्लीफ भाषेतून कॉप्टीक भाषेची निर्मिती झाली परंतु कालांतराने कॉप्टिक भाषा लिहीताना ग्रीक मूळाक्षरांसदृश अक्षरेही वापरली जाऊ लागली.
ग्रीक, रोमन आणि इजिप्शियन संस्कृती यांची मोठ्याप्रमाणावर एकमेकांत सरमिसळ आहे.
बरेचसे प्राचीन दस्तऐवज कॉप्टिक भाषेत लिहीलेले आढळतात. यासंदर्भात, हायरोग्लीफ डिकोड करणार्या एका फ्रेंच भाषातज्ज्ञावर (कॅम्पोलियन की चँम्पोलियन असे काहीसे नाव) चित्रपट पाहिल्याचे आठवते. तो आठवला तर येथे दुवा देईन. अतिशय माहितीपूर्ण चित्रपट आहे.
विशिष्ट अक्षरे
jüdische सारखे इंग्रजीव्यतिरिक्त इतर वेगळी अक्षरे असलेले शब्द लिहिण्यासाठी <font face="arial"> विशिष्ट अक्षरे असलेले लेखन </font> असे लिहिले असता व्यवस्थित दिसते.
९०% देवनागरीसाठी अवांतर माहिती - डायनॅमिक फाँट वापरणार्या कुठल्याही संकेतस्थळावर ही युक्ती वापरता येते.
चिनी, जपानी
आधी म्हटल्याप्रमाणे लेख उत्कृष्ट आहे.
चिनी आणि जपानी भाषांच्या उगमाबद्दल काही सांगता येईल का? भाषांच्या स्वरुपावरून (इतर भाषांशी जास्त साम्य नाही) त्यांचे मूळ वेगळे असावे असे वाटते.
जपानी लिपीमध्ये चिनी 'कांजी' लिपीचा थोडाफार वापर केला जातो. जपानमध्ये तीन लिप्या वापरतात, हिरागाना, काटाकाना आणि कांजी*. त्यापैकी नवीन शब्द जसे की कॉम्पुटर लिहीण्यासाठी हिरागाना/काटाकाना वापरतात. याउलट कोरियन भाषेत एकच लिपी आहे. ही लिपी बाकीच्यांपेक्षा वेगळी आहे.
कांजीमध्ये जवळ्जवळ २०,००० मूळाक्षरे आहेत. चिनी भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे ही 'टोनल' भाषा आहे.** (जुनी संस्कृत टोनल होती असे ऐकून आहे).
*जपानी भाषेत त्यांच्या संस्कृतीप्रमाणेच औपचारिकपणा आहे. धन्यवाद ५ प्रकाराने म्हणता येते.
आरिगातो, दोमो आरिगातो, आरिगातो गोझायमास, दोमारिगातो गोझायमास, दोमारिगातो गोझायमाशिता. या सर्वांचा अर्थ धन्यवाद किंवा अनेक धन्यवाद, पण वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे प्रकार वापरले जातात.
** एका चिनी मित्राने पाच वेळा म, म, म, म, म असे म्हटले. माझ्या कानाला त्यात तसूभरही फरक जाणवला नाही. पण त्याच्या मते ह्या पाचही शब्दांचे टोन वेगळे असल्याने त्यांचा अर्थ पूर्णपणे वेगळा होता.
डिस्क्लेमर: ही सर्व माहिती मला जशी ऐकायला किंवा वाचायला मिळाली तशी, आणि त्यातूनही मला समजली तशी, दिलेली आहे. चूभूद्याघ्या - तज्ज्ञ चुका सुधारण्यास समर्थ आहेतच.
(टग्या यांचे डिसक्लेमरबद्दल आभार.)
राजेंद्र